Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

औरंगाबादचा कचरा खुलताबादेत!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

औरंगाबाद शहरातील कचरा खुलताबाद येथे म्हैसमाळ रोड व उरूस मैदानातील कब्रस्तान परिसरात कचरा टाकण्यात येत आहे.

हा प्रकार शनिवारी रात्री एक वाजता उघडकीस आला. याप्रकरणी हजरत ख्वाजा शेख मुन्तजिबोद्दिन दर्गा कमिटीचे सचिव मोईनोद्दिन शरफोद्दिन यांच्या फिर्यादीवरून औरंगाबाद महापालिकेचे वॉर्ड अधिकाऱ्यांसह पाच जणांवर खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री एकच्या सुमारास दोन टिप्पर म्हैसमाळ रस्त्याने जातांना दिसले. उरूस मैदानावर कचरा टाकून ते परत जाताना दुर्गंधी पसरली, त्याचवेळी तिसरा टिप्पर त्याच दिशेने जाताना दिसल्याने काही तरुणांनी टिप्परचा पाठलाग केला. त्याचवेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू हे तेथे आले. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना बोलावले. म्हैसमाळच्या दिशेने गेलेले टिप्पर नागरिकांनी पकडून खुलताबाद पोलिसांच्या ताब्यात दिले. 'झोन अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांनी खुलताबाद येथे जाऊन राजेश जाधव सांगतील तेथे कचरा टाकावा,' असे सांगितल्याचे टिप्परसोबत सापडलेल्यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरात सहा महिन्यांपासून कचऱ्याची समस्या तीव्र झाली असून पालिकेचे कचरा टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. खुलताबाद परिसरात रात्रीच्या अंधारात निर्जन ठिकाणी कचरा आणून टाकला जात आहे. सद्यस्थितीत खुलताबाद ते वेरूळपर्यंत ठिकठिकाणी कचऱ्याचे दिसत आहेत. मात्र, त्याचा वाऱ्याने उडून हा कचरा वस्त्यांच्या परिसरात येत आहे. याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम न करता इतर शहर, गावांच्या परिसरात टाकण्याचा सोपा उपाय औरंगाबाद महापालिकेने शोधल्याबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

\Bयांच्यावर गुन्हा दाखल \B

मनपा झोन तीनचे वॉर्ड अधिकारी मुकुंद कुलकर्णी, खालेद खान नवाज खान, रफिक रशीद शेख, सागर गणपत माने (सर्व रा. हुसेननगर, पुंडलिकनगर औरंगाबाद), राजेश जाधव (रा. खुलताबाद) यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता १८६०चे कलम २६९,२७०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एक टिप्पर (एम एच २० बी टी ३२१) ताब्यात घेतले आहे.

\Bस्थानिकांत नाराजी \B

खुलताबाद येथे पर्यटक व भाविक सतत भेट देतात. वनराईने नटलेल्या या परिसरात निसर्ग पर्यटनासाठीही अनेकजण येतात. त्यामुळे हा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात खुलताबाद नगर पालिका काहीच करत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

औरंगाबाद महापालिका हद्दीमधील मोकाट कुत्रेही खुलताबाद परिसरात आणून सोडतात. आता कचरा टाकला जात आहे. कचरा टाकण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ असूनही ते पालिका भवनातच बसून राहतात. नेमून दिलेल्या हद्दीत पाहणी करत नाहीत. त्यांच्यावर पालिका आयुक्त यांचे नियंत्रण नसल्याचे दिसते. यापुढे महापालिकेने खुलताबाद परिसरात कचरा टाकल्यास आंदोलन केले जाईल.

- कैसरोद्दीन, माजी नगराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘लिज दिलेल्या विद्यापीठाच्या जागा परत घ्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने १४ संस्थांना १७३ एकर जमीन लिजवर दिली आहे. विद्यापीठाच्या चोहोबाजूने जमीन दिली असल्यामुळे अतिक्रमणांचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे जमिनी लिजवर देऊनही विद्यार्थ्यांचा फायदा झाला नाही. त्यामुळे लिजवर दिलेली जमीन परत घ्या, अशी मागणी अधिसभा सदस्य डॉ. सतीश दांडगे यांनी केली आहे.

विद्यापीठाच्या शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या होत्या. विद्यापीठाने १९६८ पासून जमिनी इतर संस्थांना लिजवर देण्यास सुरुवात केली. २०१५ पर्यंत विद्यापीठाने १४ संस्थांना एकूण १७३ एकर ८० गुंठे ४ आर जमीन लिजवर दिली आहे. या जमिनीवर संस्थांचे नाममात्र बांधकाम असून मोठ्या प्रमाणावर ताब्यातील जमीन पडून आहे. या जमिनी शेतकऱ्यांनी विद्यापीठ स्थापनेसाठी व विकासासाठी दिल्या होत्या. या स्थितीत विद्यापीठाला जमीन इतरांना देण्याचा अधिकार आहे का असा सवाल अधिसभा सदस्य डॉ. सतीश दांडगे यांनी उपस्थित केला आहे. इतर संस्थांचा फायदा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळत नाही. तसेच विद्यार्थ्यांचा फायदा होईल किंवा शैक्षणिक संधी मिळेल असा करार विद्यापीठाने केला नाही. विद्यापीठाने एकूण ७२४.२४ एकर जागेपैकी ४७३ एकर जागेचा वापर शैक्षणिक बांधकाम व इतर साधनांसाठी केला आहे. शिल्लक ५४ एकर जागा आहे. या स्थितीत इतर कोणत्याही संस्थांना विद्यापीठ जागा देऊ शकत नाही. शैक्षणिक विकासासाठी जमिनीची नितांत गरज आहे. त्यामुळे इतर संस्थांना भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनीचा ताबा घ्यावा व गरजेप्रमाणे बांधकाम करावे असे दांडगे यांनी कुलगुरुंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. विद्यापीठाच्या सर्व बाजूने जागा लिजने दिल्यामुळे जागा नियंत्रणात ठेवण्याचे प्रश्न उपस्थित होत आहेत असे दांडगे यांनी सांगितले.

\Bजमीन दिलेल्या १४ संस्था \B

विद्यापीठाने एकूण १४ संस्थांना ९९ वर्षे आणि ६० वर्षे करारावर जमीन दिली आहे. यशवंत वसतीगृह, स्पोर्टस अॅथॉरिटी ऑफ इंडिया (साई), इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, औरंगाबाद महानगरपालिका, बँक ऑफ महाराष्ट्र, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डेप्युटी डिरेक्टर ऑफ स्पोर्टस अँड यूथ सर्व्हिसेस, जिल्हा सैनिक वेल्फेअर ऑफिस हॉस्टेल फॉर सन्स ऑफ एक्स मिलिटरी पर्सन्स, हॉस्टेल फॉर डॉटर्स ऑफ एक्स मिलिटरी पर्सन्स, सोनेरी महल, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीक बोर्ड सब-स्टेशन, भारतीय पुरातत्त्व विभाग आणि आदिवासी वसतीगृह या संस्थांचा समावेश आहे. साई संस्थेला सर्वाधिक ९९ एकर जमीन दिली आहे.

इतर संस्थांसोबत करार झाल्यास विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. जागा परत घेऊन विद्यापीठाच्या महत्त्वपूर्ण बांधकामास जागा उपलब्ध करावी आणि कोणत्याही संस्थेला लिजवर जागा देऊ नये.

डॉ. सतीश दांडगे, अधिसभा सदस्य

\Bविद्यापीठाची एकूण जमीन ७२४.२४ एकर

विद्यापीठाकडून वापर ४७३ एकर

१४ संस्थाना लीजवर १७३ एकर ८० गुंठे ४ आर

शिल्लक जमीन ५४ एकर\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशोधन गाइडची घुसखोरी

$
0
0

मटा विशेष

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संशोधन केंद्रास मान्यता नसलेल्या महाविद्यालयातील शिक्षक व पदवी स्तरावरील शिक्षकांची पीएच. डी. मार्गदर्शक (गाइड) म्हणून निवड केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमाला विद्यापीठानेच फाटा दिल्यामुळे संशोधक विद्यार्थी अडचणी सापडले आहेत. नियमबाह्य गाइडची निवड रद्द करा, अशी मागणी जोर धरीत आहे.

विद्यापीठात एम. फिल व पीएच. डी. हे दोन अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) नियमावलीनुसार सुरू नसल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. या अभ्यासक्रमासाठी युजीसीच्या नियमावलीनुसार एम. फिल व पीएच. डी. संशोधनाची किमान मानके निश्चित आहेत. या मानकांचे उल्लंघन करीत प्रशासनाने पदवी स्तरावरील महाविद्यालयीन शिक्षकांना व संशोधन केंद्रास मान्यता नसलेल्या महाविद्यालयातील शिक्षकांना संशोधन मार्गदर्शक (गाइड), अशी मान्यता दिली आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर प्रशासनाकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली. तक्रारकर्ते हनुमंत गुट्टे यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात नियमावली सांगत विद्यापीठाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संशोधन मार्गदर्शकांची मान्यता देण्यासाठी निश्चित नियमावली आहे. महाविद्यालयातील पदव्युत्तर विभागात पूर्णवेळ कार्यरत असलेल्या व पदव्युत्तर महाविद्यालयाने संशोधन केंद्रास मान्यता घेतलेली असेल तरच या शिक्षकांना संबंधित विषयाचा संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळते. विद्यापीठात २००९-१० पासून व त्यापूर्वीही अनेक विषयातील पदवी स्तरावरील पूर्णवेळ शिक्षकांना संलग्नीकरण विभागाच्या मान्यतेशिवाय संशोधन विभागाद्वारे थेट पदव्युत्तर शिक्षक अशी मान्यता देण्यात आली. मान्यता देताना पदवी अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यलायातील शिक्षकही संशोधन मार्गदर्शक अशी मान्यता मिळवतात. हा प्रकार नियमबाह्य असून संशोधकाची व शासनाची मोठी फसवणूक होत आहे. या प्रकाराला आळा घालण्याची गरज आहे, असे गुट्टे यांनी निवेदनात म्हटले आहे.

युजीसीच्या नियमावलीनुसार अपात्र मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखालील पीएच. डी. प्रवेश किंवा पदवी अवैध आहेत. या पदवीधारकांना विद्यापीठाने 'युजीसी'च्या २००९/२००१६ च्या नियमावलीनुसार समकक्षता प्रमाणपत्र दिले आहेत. हे पदवीधारक शासकीय नोकरीत रूजू होण्याचा प्रकार गंभीर आहे. या विद्यार्थ्यांच्या पीएच. डी. पदवीवर व समकक्षता प्रमाणपत्रावर आक्षेप घेतल्यास विद्यार्थ्यांची पदवी नियमानुसार असल्याचे न्यायालयात सिद्ध करण्याची जबाबदारी विद्यापीठ प्रशासन घेणार का, असा सवाल गुट्टे यांनी उपस्थित केला आहे.

\Bमान्यता रद्द करा\B

पदवी स्तरावर कार्यरत आणि पदव्युत्तर विभागात पूर्णवेळ कार्यरत नसलेल्या शिक्षकांची व पदव्युत्तर महाविद्यालयाने संशोधन केंद्रास मान्यता घेतलेली नसलेल्या महाविद्यालयातील पदव्युत्तर शिक्षकांची 'संशोधन मार्गदर्शक' मान्यता रद्द करा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नवीन पीएच. डी. संशोधक विद्यार्थ्यांना नियमबाह्य मार्गदर्शक न देता संशोधन केंद्रास मान्यता असलेल्या महाविद्यालयातील किंवा विद्यापीठ विभागातील शिक्षकांकडेच मार्गदर्शनासाठी पाठवा असे प्रशासनाला संशोधक विद्यार्थ्यांनी सांगितले.

'गाइडशिप'साठी असलेल्या 'युजीसी'च्या नियमावलीचा विद्यापीठाला विसर पडला आहे. किमान तीन वर्षे अध्यापनाचा अनुभव असलेल्या पदवी स्तरावरील शिक्षकांनाही गाइड केले. यावर्षीच्या नवीन प्रस्तावात अशा शिक्षकांचा भरणा आहे. हा गैरप्रकार थांबविण्याची गरज आहे.

-हनुमंत गुट्टे, संशोधक विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झुंजारच्या जिल्हाध्यक्षपदी तुरे

$
0
0

औरंगाबाद: झुंजार छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निखील तुरे यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय कार्याध्यक्ष निलेश डव्हळे यांनी त्यांना नियुक्तपत्र प्रदान केले. प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव माने, मराठवाडा अध्यक्ष नवनाथ गारखेडे, उपाध्यक्ष शिवाजी जगताप, संघटक कृष्णा भानुसे, युवक जिल्हाध्यक्ष प्रशांत भालेराव, जगदीश वर्मा, विशाल हिवराळे, रोशनलाल शर्मा, ऋषिकेश भालेराव, वैभव वाघ, सुनील घोंगे, अरुण नवले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रलंबित रेल्वे प्रस्तावांसाठी मुख्यमंत्र्याची भेट घेणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील रेल्वेचे अनेक प्रस्ताव प्रलंबित असून ते लवकरात लवकर मंजूर करावे याकरिता मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय मराठवाडा विकास मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील मराठवाडा विकास मंडळाच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थआनी मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड हे होते. औरंगाबाद-चाळीसगाव ९० किमी, रोटेगाव-कोपरगाव २२ किमी कॉडलाइन रेल्वेमार्ग आणि औरंगाबाद येथे पिटलाइन तयार करण्याच्या प्रस्तावावर बैठकीत चर्चा करण्यात आली. यासह मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या अनेक रेल्वे मनमाड स्थानकावर थांबून असतात. त्या औरंगाबाद येथून सोडण्याबद्दलही चर्चा करण्यात आली. औरंगाबाद-चाळीसगाव रेल्वेमार्ग अत्यावश्यक असल्याने यासह इतर प्रस्तावांसाठी येत्या १५ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मराठवाड्याचे रेल्वेप्रश्न सोडवण्याचा आग्रह धरावा, असे ठरवण्यात आले.

या बैठकीत मंडळाचे सचिव डी. एम. मुगळीकर, शंकरराव नागरे, मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा, मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर, प्रल्हाद पारटकर, संतोष भाटिया, दामोधर पारीख, राजेश मेहता, संजय खंबायते, गोपीनाथ वाघ, संजय गव्हाणे, सुरेश राऊत, कल्याण जंजाळ, नितीन अमृतकर, चंद्रकांत मेने, कन्नड येथील नगराध्यक्ष स्वाती कोल्हे, कन्नड नगर पालिकेचे गटनेते संतोष कोल्हे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे, वर्धमान जैन, आर. जी. लहाने, दक्षिण मध्य रेल्वेचे सहअभियंता विजयकुमार खोबरे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना राखी बांधून साजरी केली राखी पौर्णिमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बंदोबस्तावरील पोलिसांना सण साजरे करण्याचे प्रकार दुर्मिळच म्हणावे लागतील. रविवारी भावा-बहिणीच्या प्रेमाचा राखी पौर्णिमेचा सण सर्वत्र साजरा करण्यात आला. नागेश्वरवाडी वॉर्डाच्या नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राखी बांधून अगळ्या पद्धतीने हा सण सादरा केला.

नगरसेविका शिंदे यांनी राखी पौर्णिमेनिमित्त शहरातील सिटीचौक, क्रांतीचौक पोलिस ठाण्याला भेट दिली. येथील सर्वच कर्मचाऱ्यांना त्यांनी औक्षण करीत राख्या बांधल्या. सिल्लेखाना चौकात पोलिसांचा फिक्स पॉइंट आहे. या पॉइंटवरील कर्मचाऱ्यांना देखील नगरसेविका शिंदे यांनी राखी बांधली. शिंदे यांच्या या उपक्रमामुळे पोलिस बांधव देखील भारावून गेले. पोलिस बांधव २४ तास समाजाचे रक्षण करतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राखी बांधली. यामध्ये एक वेगळी आनंदाची अनुभूती मिळाली. आपल्या शहरातील सर्व माता भगिनीचे आजपर्यंत करीत आहात तसेच रक्षण करावे, अशी ओवाळणी यावेळी मागितल्याचे नगरसेविका शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हल्ल्याचा मनसुबा पोलिसांनी उधळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुपारी किलर इम्रान मेहंदीला सोडविण्यासाठी त्याचे जामीनावर सुटलेले साथीदार खालेद व शोएबने कट रचला. मात्र, पोलिसांच्या गाडीवर हल्ला होण्यापूर्वीच, हा मनसुबा नियोजनबद्ध पद्धतीने आरोपींवरच उलटविण्यात आला. त्यानंतर कडेकोट बंदोबस्तात सोमवारी मेहंदीला कोर्टात हजर करण्यात आले. चित्रपटालाही लाजविणाऱ्या या थरारनाट्यात पोलिसांची भूमिका उजळून निघाली.

पोलिसांच्या ताफ्यावर गोळीबार करून इम्रान मेहंदीला पळवून नेण्याच्या कटाची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दोन दिवसांपूर्वीच मिळाली होती. त्यानंतर रविवारी रात्री पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, निकेश घाटमोडे पाटील अशा मोजक्या अधिकऱ्यांनी नियोजन करून पथकांना त्यांची कामे वाटून दिली. इम्रान मेहंदीला कोर्टात आणण्याऐवजी त्याची हर्सूल जेलमधूनच व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी करण्याचे ठरवले. मात्र, तुरुंगातील खराब वायरमुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर पोलिसांनी वायरिंग बदलले. मात्र, मेहंदीने व्हिडिओ कॉन्फरसिंगमध्ये स्पष्ट ऐकू येत नाही, असा कांगावा करत कोर्टासमोर हजर करण्याची मागणी केली. यामुळे त्याला कोर्टात आणण्याशिवाय पोलिसांपुढे पर्याय नव्हता.

…पोलिसांवर हल्ला करणारे आरोपी पकडले नाही, तर पोलिसांनी दुसरा प्लॅन देखील तयार केला होता. हल्लेखोरांना चकवा देण्यासाठी दोन ताफे तयार केले. यामध्ये एक ताफा खरा व दुसरा डमी होता. सुरुवातीला डमी ताफा पोलिसांनी कोर्टात वापरला. मेहंदी असलेल्या वाहनांच्या ताफ्यासाठी मात्र अभूतपूर्व सुरक्षा दिली. बुलेटप्रुफ जाकीट व अत्याधुनिक शस्त्रे असलेले जवान दुचाकीवर ताफ्याच्या मागे पुढे होते. मेहंदीला देखील बुलेटप्रुफ वाहनांमध्येच नेले व आणले. शीघ्र कृती दलाचे पथक ताफ्यासोबत होते. ताफ्यावर हल्ला झाल्यास त्याला चोख उत्तर देण्याची तयारी पोलिसांनी केली होती. विशेष म्हणजे मेंहदीला कोर्टात नेताना व आणताना पोलिसांनी ताफ्याचे मार्गही बदलले.

…गुन्हे शाखेच्या पथकाला मेहंदीच्या सुटकेसाठी आलेल्या टोळीच्या वाहनांचा क्रमांक मिळाला. दिल्ली गेटपासून त्यांनी या वाहनांचा पाठलाग सुरू केला. दिल्लीगेट येथे एका हॉटेलमधून एकजण या टोळीला सामील झाला. कटकटगेट मार्गे ही टोळी नारेगाव येथे पोहचली. या ठिकाणावरून देखील त्यांना दोनजण मिळाले. नारेगावमध्ये या वाहनांची चुकामूक झाली. त्यामुळे पथकाला शोधमोहीम करावी लागली. एका देशीदारूच्या दुकानाजवळ त्यांना संशयित वाहन आढळले. आरोपींजवळ शस्त्र असल्याची माहिती पथकाकडे होती. पथकातील अधिकाऱ्यांकडे शस्त्र होते, मात्र बुलेटप्रुफ जाकीट नव्हते. सुरुवातीला दुचाकीवर आरोपी सरुफखान व दुसरा आरोपी निघाले. पथकाने नारेगाव चौकातच सापळा रचला होता. चारचाकी वाहनामुळे वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र निर्माण केले. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत स्वत: चालकाच्या जागी बसले होते. दुचाकीवर आलेल्या आरोपींना पकडण्यासाठी पीएसआय अमोल देशमुख यांनी दुचाकीस्वाराच्या हाताला पकडले. यावेळी दोघे खाली पडले. सरुफखाने तत्काळ कमरेला लावलेले पिस्तूल काढून देशमुख यांच्यावर रोखले. मात्र, कर्मचाऱ्यांनी झडप घालत दोघांनाही जेरबंद केले. यानंतर पाठीमागून आलेल्या तवेराला देखील याच पद्धतीने अडवले. तवेराच्या मागे देखील पोलिसांचे वाहन होते. एकाच वेळी निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय घनश्याम सोनवणे, पीएसआय अनिल वाघ, अमोल देशमुख यांनी वाहनातील सर्वांवर रिव्हॉल्वर रोखत हात वर करण्याचे आदेश दिले. क्षणार्धात तवेराचे दरवाजे उघडून त्यांना जेरबंद करण्यात आले. अवघ्या काही मिनिटांत पोलिसांनी हे जोखमीचे ऑपरेशन पार पाडले. …मेहंदीसोबत सहआरोपी असलेले खालेद मोहम्मद व मोहम्मद शोएब हे जामिनावर सुटले होते. दरम्यानच्या काळात दोन वर्षांपूर्वी गुन्हे शाखेने सरुफखान शकुरखान याला शस्त्र विकण्यासाठी आला असताना अटक केली. सरूफखान हर्सूलमध्ये असताना त्याची ओळख मेहंदी गँगसोबत झाली. तो एप्रिलमध्ये हर्सूलमधून बाहेर पडला. जामिनावर असलेल्या खालेद व शोएब यांनी मेहंदीची पोलिसांच्या ताब्यातून सुटका करण्याचा कट रचला. सरूफखानने या कामी मदत केली. त्याच्याकडे मध्यप्रदेशवरून पोलिसांवर गोळीबार करण्यासाठी शार्पशूटर आणण्याची जबाबदारी सोपवली गेली. त्याने ती चोख पार पाडली. मात्र, पोलिसांनी हे मनसुबे उधळले.

\Bचार दिवसांपूर्वी केली रेकी\B

शार्पशूटरची टोळी २२ ऑगस्ट रोजी शहरात आली. त्यांनी हर्सूल जेलची रेकी केली. त्यांच्याकडे असलेल्या पिस्तूलमधून गोळीबार व्यवस्थित होतो का नाही, याची चाचणी या भागात फायरिंग करून केली. दरम्यान सोमवारी सकाळी एका संशयिताने इम्रान मेहंदीची हर्सूल जेलमध्ये जाऊन भेट घेतल्याचे समोर आले आहे. ही व्यक्ती कोण आहे व मेहंदीला या हल्ल्यासंदर्भात काही निरोप देण्यासाठी गेली होती का, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात चोख बंदोबस्त तैनात केला होता. या ठिकाणी एसीपी नागनाथ कोडे, ज्ञानोबा मुंडे यांच्यासह तीन पोलिस निरीक्षक तसेच १२५ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. …शीघ्र कृती दल, गुन्हे शाखा व विशेष शाखेचे पथक देखील तैनात होते. तपासणी करून नागरिकांना कोर्टात सोडण्यात येत होते. कोर्टात मोबाइल नेण्यास देखील मनाई केली.

\Bया पथकाने बजावली कामगिरी

\Bहल्लेखोरांचा कट उधळून लावण्याची कामगिरी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, निकेश खाटमोडे, एसीपी नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय घनश्याम सोनवणे, पीएसआय अमोल देशमुख, अनिल वाघ, नंदकुमार भंडारे, सुभाष शेवाळे, नितीन मोरे, विजयानंद गवळी, मनोज चव्हाण, अशरफ सय्यद, संतोष सुर्यवंशी, हकीम पटेल, सिद्धार्थ थोरात, शिवाजी भोसले, भगवान शिलोटे, संजय खोसरे, नवाब शेख, नितीन धुळे, दत्ता गाडेकर, वीरेश बने, ओमप्रकाश बनकर, धर्मा गायकवाड, सुलताना शेख यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेहंदीच्या सुटकेसाठी आलेल्यांना बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गँगस्टर इम्रान मेहंदीची सुटका करण्यासाठी आलेल्या मध्यप्रदेशच्या सात शार्पशूटरसह स्थानिक तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. सोमवारी सकाळी नारेगाव परिसरात हा थरारक प्रकार घडला. मेहंदीला सुनावणीसाठी कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यावर गोळीबार करून त्याची सुटका करण्याचा या टोळीचा डाव होता. मात्र, शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव वेळेपूर्वीच उधळला गेला.

कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहंदी याची सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयात सलीम कुरेशी हत्या प्रकरणात सुनावणी होती. या सुनावणी दरम्यान त्याला हर्सूल जेलमधून कोर्टात आणण्यात येणार होते. त्याला जेलमधून बाहेर काढल्यानंतर पोलिसांच्या ताफ्यावर गोळीबार करून मेहंदी याची सुटका करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मध्यप्रदेश येथील हे हल्लेखोर असल्याची माहिती देखील गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी पहाटे पाच वाजेपासून सापळा रचला होता. दिल्लीगेट भागात सकाळी संशयित तवेरा कार आढळली. या कारचा पाठलाग करण्यात आला. नारेगाव चौकात सापळा रचून दुचाकीवरील दोन जण व तवेरा कारमधील सात जणांना रिवॉल्वर रोखून ताब्यात घेण्यात आले. यावेळी दुचाकीवरील एका आरोपीने पोलिसांवर पिस्तूल रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच त्याला झडप टाकून पकडण्यात यश आले. पकडलेल्या आरोपीमध्ये शब्बीरखान (वय २२), फैजुल्लाखान गणीखान (वय ३७), शाकीरखान कुर्बानखान (वय ४०), नफीसखान मकसूदखान (वय ४०), नकीबखान रयाज मोहम्मद (वय ५५), फरीदखान मन्सूरखान (वय ३५), सरूफखान शकूरखान (वय ४५ सर्व रा. जिल्हा खरगोन व धार, मध्यप्रदेश) यांच्यासह शेख यासेर शेख कादर (वय २३ रा. कौसरपार्क, नारेगाव), सय्यद फैसल सय्यद ऐजाज (वय १८ रा. किलेअर्क), मोहम्मद नासेर मोहम्मद फारूख (वय २४ रा. चंपा चौक), व मोहम्मद शोयेब मोहम्मद सादेक (वय २८ रा. जाहेदनगर) यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दिपाली धाटे घाडगे, उपायुक्त निकेश घाटमोडे पाटील, एसीपी नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय घनश्याम सोनवणे, पीएसआय अनिल वाघ, अमोल देशमुख व पथकाने केली.

सतर्कतेमुळे अंधे तीर जेरबंद

पकडण्यात आलेले मध्यप्रदेशचे सात जण शार्पशूटर आहेत. यांना अंधे तीर म्हणून ओळखण्यात येते. अवघ्या दोन हजार रुपयात ही मंडळी सुपारी घेत होती. मेहंदीला नेणाऱ्या पोलिसांच्या वाहनांवर दुचाकी व तवेराच्या मदतीने घेऊन गोळीबार करून त्याची सुटका करण्याचा या टोळीचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळल्या गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहराचे हित कशात आहे ते सांगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'समांतर जलवाहिनीचा पीपीपी तत्वावरचा करार रद्द करण्यात शहराचे हित आहे की कराराचे पुनरुज्जीवन करण्यात शहराचे हित आहे? शहराचे हित नेमके कशात आहे ते तर सांगा', असा सवाल करून नगरसेवकांनी समांतर जलवाहिनीबद्दल प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.

समांतर जलवाहिनीच्या कराराचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी भूमिका मांडल्या. सुरुवातीला सभागृहनेते विकास जैन म्हणाले, कराराच्या पुनरुज्जीवनाच्या प्रस्तावाबद्दल आयुक्तांनी खुलासा करावा, त्यानंतर चर्चा करता येईल. अफसर खान यांनी सर्वोच्च न्यायालयाचे नेमके आदेश काय आहेत ते सभागृहात सांगण्याची मागणी केली. एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दिकी यांनीही कोर्टाचे निर्देश सांगा अशी सूचना केली आणि कराराच्या पुनरुज्जीवनास एमआयएमचा विरोध आहे, असे स्पष्ट केले. प्रस्तावाला विरोध करणारे पत्र एमआयएमच्या सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षरीने तयार करण्यात आले होते. या पत्राचे वाचन गंगाधर ढगे यांनी केले. भाजपचे गटनेते प्रमोद राठोड म्हणाले, प्रस्तावातील प्रत्येक मुद्यावर चर्चा झाली पाहिजे. सीताराम सुरे, भाऊसाहेब जगताप, गजानन बारवाल यांनी मत व्यक्त केले. त्यानंतर महापौरांच्या सूचनेनंतर आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सविस्तर खुलासा केला. त्यांनी कंपनीच्या व पालिकेच्या प्रस्तावातील ठळक मुद्दे सभागृहात मांडले. आयुक्तांच्या मनोगतानंतर माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी सविस्तर विवेचन केले. पीपीपी तत्वावरील करार जनतेच्या हिताचा नाही हे तत्कालीन आयुक्तांनी स्पष्टपणे सभागृहात सांगितले होते, तुम्ही अशी स्पष्ट भूमिका सभागृहात सांगितली नाही, असे ते आयुक्तांना उद्देशून म्हणाले. एकदा करार रद्द झाल्यावर पुन्हा त्याच कंपनीकडून काम करून घेता येते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला व त्याबद्दल कायदेशीर खुलासा करण्याची मागणी केली. शहराचे हित नेमके कशात आहे, असे त्यांनी विचारले. कराराचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव फेटाळला पाहिजे, असे एमआयएमचे विकास एडके म्हणाले.

सायराबानो अजमल खान, कीर्ती शिंदे, सविता बोर्डे, अॅड. माधुरी अदवंत, राजेंद्र जंजाळ, अब्दुल नाईकवाडी, दिलीप थोरात, राजगौरव वानखेडे, माजी महापौर भगवान घडमोडे, स्थायी समितीचे सभापती रेणुकादास वैद्य, राखी देसरडा आदी नगरसेवकांनी देखील कराराबद्दल मत व्यक्त केले. भाजपचे राजू शिंदे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. समांतरचा करार ३० जुन २०१६ च्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला होता, या सभेच्या इतिवृत्तात नगरसेवकांनी केलेल्या भाषणांचा उल्लेख नाही, असे ते म्हणाले. तत्कालीन आयुक्तांनी संपूर्ण समांतर योजना मारून टाकली, समांतर जलवाहिनीचा करार रद्द व्हावा म्हणून काही तरी व्यवहार झाला असावा, असे शिंदे म्हणाले. करार रद्द झाल्यावर एक महिन्याने कंपनीला ८ कोटी ३४ लाख ७५ हजार रुपयांचे पेमेंट करण्यात आले. करार रद्द केल्यावर पेमेंट कसे काय केले, हे पेमेंट दिल्यावरच 'तो' व्यवहार झाला, असा आरोप त्यांनी केला. करार रद्द केल्याची जबाबदारी त्या आयुक्तांवर निश्चित करा, असा उल्लेख करून शिंदे डॉ. निपुण विनायक यांना म्हणाले, तुम्ही ही योजना जिवंत केली तर शेवटच्या घराला पाणी मिळेपर्यंत तुम्हाला शहर सोडता येणार नाही. महापालिकेत येणाऱ्या प्रत्येक आयुक्ताने औरंगाबाद शहराची प्रयोगशाळा करून टाकली आहे.

काळ - वेळ अशी येते

माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी भाजपचे गटनेते तथा माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांना चिमटा काढला. ते म्हणाले, मी महापौर असताना करार रद्द झाला. करार रद्द करण्याच्या सभेत राठोड व्यासपीठावर माझ्या शेजारी होते व करार रद्द करण्याचा निर्णय घेतलाच पाहिजे, असे ते वारंवार सांगत होते. आता तेच राठोड कराराचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आग्रह धरत आहेत. काळ - वेळ अशी असते बघा असा उल्लेख तुपे यांनी केला आणि सभागृहात हशा पिकला.

आज हे शांत का?

सर्वसाधारण सभेवर मुख्यमंत्र्यांच्या व्हीसीचे सावट होते. याच संदर्भाने विरोधीपक्ष नेते जमीर कादरी यांनी भाजप-शिवसेनेच्या काही नगरसेवकांचा उल्लेख केला. हे नगरसेवक नेहमी बोलत असतात, सभागृह दणाणून सोडत असतात. आज कुणीच कसे काही बोलत नाही, आज हे सर्वजण शांत का? असा सवाल त्यांनी केला. हा सवाल युतीच्या नगरसेवकांच्या वर्मी लागला.

मटा भूमिका

करार हाणून पाडा

राज्यामध्ये सर्वात जास्त पाणीपट्टी आकारली जाते ती औरंगाबाद शहरात. समांतर जलवाहिनीचा पहिला करार करताना अनेक जाचक अटी होत्या. त्यातील एक अट दरवर्षी दहा टक्के पाणीपट्टी वाढीची होती. हीच अट खऱ्या अर्थाने नागरिकांची डोकेदुखी आहे. गेल्या १२ वर्षांपासून समांतर जलवाहिनीचा प्रश्न सत्ताधारी शिवसेनेला सोडविता आलेला नाही, हे त्यांचे अपयशच म्हणावे लागेल. खासदार चंद्रकांत खैरे हा प्रकल्प राबविण्यात कमी पडले, तसेच महापालिकेचे प्रशासनही. आज नागरिकांना साडेचार हजार रुपये प्रतिवर्ष पाणीपट्टी द्यावी लागते. ३६५ दिवसांपैकी २६५ दिवस पाणी मिळत नाही. केवळ १०० दिवसाचेच साडेचार हजार रुपये आकारले जातात, हे सर्वस्वी चुकीचेच आहे. औद्योगिक कंपन्यांना दिले जाणारे पाणीही यापेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे आज जरी शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला खिंडीत गाठले असले तरी हे दोन्ही पक्ष पाणी देण्यामध्ये कमी पडले, हे मान्य करावेच लागेल. नव्याने होऊ पाहणारा हा करार नागरिकांनीच हाणून पाडला पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याचे राजकारण करू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हमीपत्राच्या आडून शिवसेना पाण्याचे राजकारण करीत आहे. पाण्याचे राजकारण करू नका. एक तर शहरवासियांना तुम्ही पाणी द्या, नाही तर आम्ही पाणी देऊ, अशा शब्दात भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी, नगरसेवकांना सुनावले आहे.

सर्वसाधारण सभा संपल्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, शहराच्या हितासाठी समांतर जलवाहिनीचे काम झाले पाहिजे यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी व्हीसी घेतली. आवश्यक ती सर्व मदत करण्याची तयारी दर्शवली. असे असताना लेखी हमीची अट कशासाठी? समांतर जलवाहिनीचे काम स्वबळावर करण्याची महापालिकेची किंवा शिवसेनेची ताकद आहे का, असा सवाल त्यांनी केला. शिवसेना उगीचच राजकारण करीत आहे. यामागे खासदार चंद्रकांत खैरे यांची फूस आहे. खैरे यांच्या सांगण्यामुळेच हे सर्व घडत आहे, असा आरोप करून तनवाणी म्हणाले, जनता त्यांना माफ करणार नाही. शिवसेनेने राजकारण करताना शहराचा विचार केला पाहिजे, आपली मुले याच शहरात राहणार आहेत याचाही त्यांनी विचार केला पाहिजे, असे तनवाणी म्हणाले.

खैरेंच्या फोनची चर्चा

सर्वसाधारण सभा सुरू असताना खासदार चंद्रकांत खैरे यांचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना फोन आला, त्यांनी शासनाची लेखी हमी घेण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले. त्यांच्या आदेशामुळे महापौर व सभागृहनेत्याला हमीच्या संदर्भात भूमिका घ्यावी लागली अशी चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय युवक महोत्सवावर पावसाचे सावट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाची महाविद्यालयात जय्यत तयारी सुरू आहे. विद्यार्थी कलाकार सादरीकरणाचा सराव करण्यात मग्न आहेत. पावसाची दाट शक्यता असल्यामुळे महोत्सवाच्या पहिल्या दिवशी विद्यापीठात मिरवणूक काढण्याबाबत साशंकता आहे. सप्टेंबर महिन्यात महोत्सव असल्यामुळे काही महाविद्यालये मोजक्याच कला प्रकारात सहभागी होऊन पळवाट शोधत आहेत.

विद्यार्थी कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यापीठाने केंद्रीय युवक महोत्सव आयोजित केला आहे. विद्यापीठाशी संलग्नित ४१९ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळणार आहे. दरवर्षी पदवी-पदव्युत्तर वर्गाच्या सत्र परीक्षेच्या काही दिवस अगोदर महोत्सव होतो. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग घटला होता. फक्त १२५ ते १५० महाविद्यालये सहभागी होत असल्यामुळे महोत्सवाचा उद्देश संपुष्टात आला होता. सरावासाठी वेळ नसल्याने विद्यार्थ्यांचा सहभाग घटला होता. युवक महोत्सव सप्टेंबर किंवा डिसेंबर महिन्यात घेण्याची मागणी होती. परीक्षा आणि महोत्सवात अंतर ठेवण्यासाठी यंदा सप्टेंबर महिन्यात महोत्सव होत आहे. येत्या पाच ते आठ सप्टेंबर या कालावधीत युवक महोत्सव रंगणार आहे. विद्यापीठ कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या रंगमंचावर विद्यार्थी सादरीकरण करणार आहेत. यावर्षी महोत्सवात जलसा, कव्वाली आणि शॉर्टफिल्म या तीन नवीन कला प्रकारांचा समावेश करण्यात आला. तर इन्स्टॉलेशन व उपशास्त्रीय गायन प्रकार वगळले आहेत. शॉर्टफिल्म निर्मितीत तरुणांचे सर्वाधिक प्रमाण असल्यामुळे महोत्सवात त्याचा समावेश आहे. सध्या शहर व गाव पातळीवर युवक महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. भारुड, गोंधळ, शास्त्रीय गायन, पाश्चात्य गायन, एकांकिका, वादविवाद, वक्तृत्त्व, समूहगान, पोवाडा, लावणी, मिमिक्री, रांगोळी, चित्रकला, वादन अशा विविध प्रकारांची कलाकार तयारी करीत आहेत.

दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता असल्यामुळे बंदिस्त रंगमंच उभारण्याचे मोठे आव्हान आहे. या अडचणीमुळे महोत्सवाच्या पहिल्या दिवशी निघणारी मिरवणूक रद्द करण्याचा प्रशासन विचार करीत आहे. तर वातावरण स्वच्छ असल्यास मिरवणूक काढावी असे महाविद्यालयांचे म्हणणे आहे.

\Bमहाविद्यालयांची पळवाट

\Bकेंद्रीय युवक महोत्सवात दरवर्षी मोजकीच महाविद्यालये सहभागी होतात. प्रत्येक महाविद्यालयाने सहभाग घेणे बंधनकारक आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासन कडक कारवाई करीत नसल्यामुळे महाविद्यालये सहभाग टाळतात. काही महाविद्यालये एक किंवा दोन प्रकारात सहभागी होऊन तोंडदेखला सहभाग नोंदवतात. या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा मुद्दा यावर्षीही उपस्थित झाला आहे.

केंद्रीय युवक महोत्सवाला चांगला प्रतिसाद आहे. पावसाचा अडथळा नसल्यास पहिल्या दिवशी मिरवणूक निश्चित निघेल. दरवर्षीप्रमाणे आटोपशीर आणि शिस्तबद्ध पद्धतीने महोत्सव होईल.

- डॉ. मुस्तजीब खान, संचालक, विद्यार्थी कल्याण मंडळ

यावर्षी महोत्सवात तीन नवीन कला प्रकारांचा समावेश समाधानकारक आहे. शॉर्टफिल्मचे चित्रीकरण सुरू असून नवीन प्रकाराची विद्यार्थी जोरदार तयारी करीत आहेत. महोत्सव भरगच्च झाल्यास अधिक आनंद होईल.

- डॉ. अनिलकुमार साळवे, देवगिरी महाविद्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॉट वाटपात मनमानी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुढील ५० वर्षे डोळ्यासमोर ठेवून विकास आराखडा तयार झाला पाहिजे. नियमावली प्रमाणे सोयी सुविधा मिळाव्यात, अशी मागणी जुना मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी केली. जुन्या मोंढ्यातील ११९ व्यापाऱ्यांना सर्वप्रथम प्लॉट देणे अपेक्षित असतानाच कृषी उत्पन्न बाजार समितीने काही प्लॉट परस्पर अन्य व्यापाऱ्यांना दिलेत, असा आरोपही व्यापाऱ्यांनी करत याप्रश्नी कोर्टात जाणार असल्याचे सांगितले.

बाजार समितीच्या सुधारित विकास आराखड्यास नुकतीच मंजुरी मिळाली. त्यामुळे विकासकामांना व जुना मोंढा स्थलांतर होण्यास मोठी मदत मिळेल, असा विश्वास बाजार समितीने व्यक्त केला आहे. त्यासाठी प्लॉट विक्री प्रक्रियाही सुरू केली आहे. एकीकडे बाजार समितीकडून असे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र या प्रक्रियाबाबत जनरल किराणा मर्चंट असोसिएशनचे सचिव देवेंद्र सेठ यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. महापालिकेने सुधारित आराखड्यास मंजुरी दिल्याचे संचालक मंडळ सांगत असले, तरी मंजुरी देताना महापालिके अनेक अटी घातल्या आहेत. जाधववाडीत स्थलांतर होण्यास येथील होलसेल व्यापारी तयार आहेत, पण निर्विवाद प्लॉट देण्यात यावेत. २००६पासून ११९ व्यापाऱ्यांनी आतापर्यंत साडेसहा कोटी बाजार समितीकडे प्लॉटपोटी दिले आहेत. त्यात आणखी १९६ व्यापाऱ्याची भर पडली. कोर्टानेही बाजार समितीने होलसेल बाजार उभारताना येथील व्यापाऱ्यांना सर्वप्रथम प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिलेले आहेत, पण त्याप्रमाणे प्रक्रिया पार न पडता काही प्लॉट जालन्यातील व इतर व्यापाऱ्यांना दिल्या गेल्याचा आरोप सेठ यांनी केला.

आता समितीने सात दिवसांत प्लॉटचे उर्वरित पैसे भरण्यास सांगितले आहे, असे ही सेठ यांनी नमूद करत समितीने आधी प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवावी. पुढील भविष्याचा विचार करून होलसेल बाजाराचा आराखडा तयार करून सोयी सुविधा द्याव्यात, अशी मागणी केली आहे.

\Bदिशाभूल करण्याचा प्रयत्न : पठाडे\B

यासंदर्भात बोलताना बाजार सममितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी जुन्या मोढ्यांतील काही ठराविकच व्यापारी मोंढा स्थलांतराचा प्रश्‍न सुरू झाल्यापासून विविध कारणे दाखवत आहे. सुधारित आरखडा मंजूर झाल्यानंतर पैसे भरणार असल्याचे आधी सांगितले. आता आराखडा मंजूर झाल्यानंतर पुन्हा नवी मागणी करीत इतरांची दिशाभूल करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, असा आरोप पठाडे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाच्या शिलेदारांचे मनोगत

$
0
0

दहावी म्हणजे, तसे पाहिले तर काही नाही. सुरुवातीपासून अभ्यास केला आणि हे यश मिळविले. यश मिळविताना पुढच्या शिक्षणाबाबत परिस्थिती अडसर ठरते की काय, असे वाटत असताना 'महाराष्ट्र टाइम्स' आमच्या मदतीला धावून आला. 'मटा'च्या वाचकांनी दिलेले पाठबळ आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्याचे मोल कायम आमच्या स्मरणात राहील. सगळ्यांना एवढेच सांगेल 'कोशीश करनेवालों की कभी हार नही होती'. प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. 'उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, परंतु क्षीतिजा पलिकडे झेप घेण्याची जिद्द असावी,' असेच मी म्हणेल. आपल्यात जिद्द असेल, तर येणाऱ्या संकटावर मात करून आपण पुढे जाऊ शकतो.

-आरती जोशी

..

मला आज आनंद मावेनासा झाला आहे. येथे आई-वडील उपस्थित आहेत त्यांच्या चेहऱ्यावरही आनंद आहे. मी, सर्वप्रथम 'महाराष्ट्र टाइम्स'ला धन्यवाद देते. त्यांनी मदतीसाठी योग्य समजले. दहावीत खूप अभ्यास केला. हे यश मिळविले पण ते काही नसून यापुढेही चिकाटीने, जिद्दीने पुढे जायचे आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ला वचन देते की, या पैशाचा योग्य तो उपयोग करून योग्य ते शिक्षण घेऊन माझ्या सारख्या गरीब विद्यार्थ्यांना मदत करेल. जीवनात ध्येय निश्चित केले नाही, तर यशस्वी होऊ शकत नाहीत. मी, पीएसआय बनण्याचे स्वप्न आहे. माझ्या शिक्षकांनीही मला मदत केली. तसेच 'महाराष्ट्र टाइम्स'च्या माध्यमातून आम्हाला ज्यांनी प्रोत्साहन दिले त्यांचे ऋण विसरणार नाही. पुढेही चांगला अभ्यास करून चांगले यश मिळवेल.

-सिद्धी मोरे

..

आत्तापर्यंतचा माझा शैक्षणिक प्रवास अतिशय खडतर आहे. माझ्या आई-वडिलांनी अशा परिस्थिती आजपर्यंतचे शिक्षण दिले. त्यात अनेकांनी मला पाठबळ दिले. आता 'महाराष्ट्र टाइम्स'ने आमच्या पुढच्या शिक्षणासाठी आम्हाला बळ दिले. त्यासाठी ज्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मदत केली. त्याला कायम स्मरणात ठेवून पुढे चांगले करिअर निवडेल आणि यशस्वी होईल. आमच्यावर विश्वास ठेवून मदत करणाऱ्यांच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू. चांगला अभ्यास, कठोर मेहनतीच्या बळावर भविष्यात यश मिळवून आणि माझ्याकडूनही पुढे भविष्यात इतरांना मदत करेल. जेणे करून कोणाचे शिक्षण पूर्ण होऊन तो इतरांना मदत करण्यासाठी सज्ज असेल.

-वैभव यादव

..

आमच्या पुढच्या शिक्षणासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या माध्यमातून दानशुरांनी केलेली मदत ही लाखमोलाची आहे. त्या सर्वांचा कायम आभारी आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेण्याऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे, म्हणजे देणाऱ्याचा दातृत्वाचा गुण आपण घेतो. मला मिळालेले यश खडतर परिस्थीतून मिळाले असले तरी त्यात मला प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येकाचा वाटा आहे. तुम्हाला अभ्यासासाठी स्वतंत्र खोली नसेल, तुमच्याकडे पैसा नसेल, परंतु मेहनतीची तयारी असेल, तर यश मिळविता येते. परिस्थितीवर मात करत मिळविलेले हे यश माझ्यासाठी सोन्यावरून पिवळे आणि अमृताहून गोड आहे. पुढच्या शिक्षणातही अशाच प्रकारची मेहनत आणि ध्येय समोर ठेवून यशस्वी होईल. भविष्यात माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी कायम मदत करणार आहे.

-प्रसाद गोसावी

..

आमच्यासारख्या विद्यार्थ्यांसमोर उच्च शिक्षणासाठी असलेल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' राबवित असलेला 'बळ द्या पंखांना' हा कार्यक्रम खूप प्रेरणादायी आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर होणार आहे. आम्हाला मदत करणाऱ्या प्रत्येकाला धन्यवाद देते. दहावीचा अभ्यास करताना अनेक अडचणी आल्या, परिसरात गोंगाट असायचा. परंतु, त्यात एकाग्रता साधून नियमित अभ्यास केला आणि हे यश मिळाले. शिक्षकांनीही त्यासाठी मदत केली. तुमच्यात इच्छाशक्ती असेल, तर तुम्हाला यश मिळविता येते. यश तुमच्या पर्यंत कधीच चालून येणार नाही, तुम्हाला त्यापर्यंत पोहचावे लागेल, हे मी अनेक पुस्तकात वाचले. त्यानुसार दहावी हे माझे 'शार्ट टर्म गोल' ठेवले. यात मेहनतीतून मी ९७.२० गुण मिळवित हे उद्दिष्ट पूर्ण केले. पुढे'आयएएस' होण्याचा 'लाँग टर्म गोल' आहे. त्यासाठी मेहनत घेईन. अनेकांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही, त्यांना मदत करण्याचा हेतुने मी काम करेल.

-रोहणी बोर्डे

..

\Bपालक भावुक... म्हणाले 'मटा'मुळेच मुलीचे ‌शिक्षण\B

सहा वर्षांपूर्वी 'मटा हेल्पलाइन'मध्ये निवडलेल्या सुभद्रा चिखलोंडे या विद्यार्थिनेचे वडील प्रभुदयाल चिखलोंडे यांनी या कार्यक्रमात मन मोकळे केले. त्यांनी अत्यंत भारावलेल्या स्वरात 'मटा'चे आभार मानले. ही मदत मुलीसाठी खूप उपयोगी आली. त्यामुळेच तिचे सुभद्राचे 'बी.फार्मसी'चे शिक्षण पूर्ण होऊ शकले. आता दोन दिवसांपूर्वीच तिला नोकरी मिळाली आहे. दोन दिवसातच खाडा मारणे योग्य नाही. त्यामुळे या कार्यक्रमाला मी आलो. ती आली असती, तर ती बोलली असती, असे सांगतना प्रभुदयाल चिखलोंडे यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिरियल किलर इम्रान मेहंदीसह आठ जणांना जन्मठेप

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

सबंध मराठवाडा हादरवून सोडणाऱ्या आणि औरंगाबादवासीयांच्या काळजाचा ठोका चुकविणाऱ्या सलीम कुरेशी निर्घृण खून प्रकरणी सिरियल किलर इम्रान मेहंदीसह आठ जणांना मोक्काचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी सोमवारी जन्मठेपची शिक्षा सुनावली. सर्व दोषी आरोपींना १५ लाख ११ हजार रुपये असा एक कोटी २० लाख ८८ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी नगरसेवक आणि रॉक्सी टॉकीजचे मालक सलीम हनीफ कुरेशी हे रॉक्सी टॉकीजवरून चार मार्च २०१२रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास आसेफिया कॉलनी येथील घरी जाण्यासाठी कारने निघाले. तेव्हा त्यांची कार टाउन हॉल उड्डाणपुलाजवळ पोहचल्यावर त्यांच्यासोबत असलेला त्यांचा मित्र फहीम शेख यासीन हा खाली उतरून दुचाकीवरून सलीम कुरेशीच्या घरी जाऊन थांबला. दहा पंधरा मिनिटे झाले तरी कुरेशी न आल्यामुळे तो पुन्हा उड्डाणपुलाजवळ आला आणि सलीम कुरेशीच्या कारचा शोध घेतला. सलीम कुरेशी किंवा त्यांची कार दिसत नसल्यामुळे फहीम घाबरला आणि त्याने हर्शद खान, जाकेर या दोघांना उड्डाणपुलाखाली बोलवून घेतले. त्या नंतर या तिघांनी उड्डाणपुलाखाली थांबलेल्या नागरिकांकडे चौकशी केली असता, त्यावेळी सलीम कुरेशीची कार मकाई गेटच्या दिशेने सुसाट वेगात गेल्याचे सांगितले. त्यांनी त्या दिशेने शोध घेतला. मात्र, त्याचा शोध न लागल्यामुळे सलीम कुरेशीचा भाऊ हलीम हनिफ कुरेशी यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात सलीम कुरेशीचे अपहरण झाल्याची तक्रार मध्यरात्री दिली. तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त संदीप भाजीभाकरे यांच्या पथकाने १० मार्च रोजी सलीम कुरेशीचा निर्घृण खून करणाऱ्या या अकरा जणांना अटक करण्यात आली. त्यात इम्रान मेहंदी उर्फ दिलावर शेख नसीर (वय ४४, असेफिया कॉलनी), सय्यद नाजेर सय्यद नासेर अली (वय ३३, कांसबरी नगर), शेख इम्रान उर्फ सुलतान सौफोद्दीन शेख (वय, ३५ कोरखैरानी ह. मु. कटकटगेट), सय्यद जहीर उर्फ शेरा बाखर कुरेशी (वय, ३६ चेलिपुरा), नुमान खान अब्दुल कय्युम (वय ३०, असेफिया कॉलनी),जुबेर खान शबीर खान (वय ३७, कैसर कॉलनी), हबीब खालेद हबीब महदम (वय ३१, युनूस कॉलनी), महमद शोयब मोहमद सादीक (वय ३०, रा. बाबर कॉलनी), फरीदखान फेरोज खान (वय ३३, शहा नगर बीडबायापास), शेख हसन शेख हुसेन (वय ५३, शरीफ कॉलनी) आणि महमद अश्पाक उर्फ अशू अजम खान (वय ३३, असेफिया कॉलनी) या अकरा जणांनी ११ मार्च रोजी पंचासमक्ष सलीम कुरेशीला गळ्या एवढा खड्ड्यात ढकलले. त्याचा गळा चिरून निर्घृण खून केला असल्याची कबुली दिली.

\B११ साक्षीदार फितूर; तिघे निर्दोष

\Bइम्रान मेहंदी खून खटल्याची अंतिम सुनावणी मोक्काचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या समोर झाली असता मोक्काचे विशेष सरकारी वकील राजेंद्र मुगदिया यांनी ६१ साक्षीदार तपासले. यामध्ये ११ साक्षीदार फितूर झाले. न्यायालयाने इम्रान मेहंदी, सय्यद नाजेर, शेख इम्रान उर्फ सुलतान, सय्यद जहीर उर्फ शेरा, नुमान खान, जुबेर खान, हबीब खालेद, फरीदखान फेरोज खान या आठ जणांना खून, अपहरण, पुरावा नष्ट करणे या कलामखाली प्रत्येकी जन्मठेप, प्रत्येकी पाच हजार दंड, दंड न भरल्यास तीन वर्षे सक्तमजुरी सुनावली. मोक्का अंतर्गत ३, १, २, ३ (१) २, आणि ३ व ४ या कलमान्वये प्रत्येकी जन्मठेप, प्रत्येकी पाच लाख रुपये दंड, दंड न भरल्यास तीन वर्ष सक्तमजुरी सुनावली. या आठ आरोपींकडून एक कोटी २० लाख ८८ हजार रुपये दंड वसूल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या गुन्ह्यात सबळ पुराव्याअभावी महमद शोएब, शेख हसन आणि महमद अश्फाक या तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील भाजी मार्केट रखडले

$
0
0

शहरातील भाजी मार्केट रखडले

इमारतीतील असुविधांचे कारण; शेतकऱ्यांचीही होतेय दिशाभूल

म. टा. प्रतिनिधी, नगर

सावेडीतील प्रोफेसर कॉलनी येथे महापालिकेच्या इमारतीत सेंद्रीय भाजीपाला मार्केट सुरू करण्याच्या कृषी विभागाच्या प्रयत्नांना अपयश आले आहे. मार्केट सुरू करण्यासाठी महापालिकेने करारनामा करण्याबाबत कृषी विभागास पत्र पाठवले आहे. कृषी विभागाकडून मात्र यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. भाजी मार्केट ज्या इमारतीत सुरू होणार आहे, तेथे अस्वच्छता आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्यासाठी सुरक्षित व्यवस्था नाही. नुसतेच ओटे बांधण्यात आले आहेत, अशा अडचणी समोर आल्याने मार्केट सुरू होण्यास आणखी काही कालावधी लागण्याची चिन्हे आहेत.

सावेडीत टीव्ही सेंटर येथे तहसील कार्यालयासमोर महापालिकेचे भाजी मार्केट आहे. या मार्केटमध्ये ७२ ओटे बांधण्यात आले आहेत; परंतु, हे मार्केट अनेक वर्षांपासून बंद असल्याने येथे अस्वच्छता वाढली आहे. जागोजागी कचरा साचला आहे. इमारतीची दुर्दशा झाली आहे, तसेच येथे मार्केटसाठी पुरेशा सुविधा नसल्याचे समोर आले आहे. ओटे बांधले असले, तरी शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्यासाठी येथे काहीच व्यवस्था केलेली नाही. जिल्हाभरातून येथे शेतकरी येणार आहेत. एखाद्या दिवशी शेतमालाची विक्री झाली नाही, तर पुन्हा शेतमाल गावाकडे घेऊन जाणे शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. इमारतीत अस्वच्छताही वाढली आहे. महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने इमारतीची सुरक्षितताही धोक्यात आली आहे. त्यामुळे असुविधांचे आगर असलेल्या या इमारतीत मार्केट सुरू करणे शक्य होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने इमारतीत या सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय येथे मार्केट सुरू करता येणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जवळपास दोन वर्षांनंतरही कृषी विभागास मार्केट सुरू करता आले नाही, तसेच सेंद्रीय शेतमालास बाजारपेठ उपलब्ध करून देता आली नाही. या प्रकल्पामध्ये 'आत्मा' अंतर्गत येणारे ३६ गट, १४ शेतकरी उत्पादक कंपन्या यांना सर्वांत प्रथम सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर गटांची संख्या वाढवण्यात येणार आहे.

नुसतीच टोलवाटोलवी

मार्केट सुरू करण्यासाठी करारनामा करून डिपॉझिट भरण्यासाठी महापालिकेने कृषी विभागास पत्र पाठवले आहे. या पत्राला मात्र विभागाने अद्याप उत्तर दिलेले नाही. मार्केटसाठी 'आत्मा' विभागाने जवळपास २६ शेतकरी गटांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे पैसे जमा करून घेतले आहेत. शेतकरी मार्केट कधी सुरू होणार याबाबत विचारणा करत असले तरी विभागाकडून पुढील कार्यवाही झालेली नाही. या इमारतीत शेतमालाच्या सुरक्षेसाठी उपाययोजना नाहीत. ओटे असले तरी शेतमाल ठेवायचा कोठे, अशी समस्या येथे असल्याने कृषी विभागाकडून पुढील कार्यवाही झाली नसल्याची माहिती आहे. सुरुवातीस शेतकऱ्यांना मात्र भाजी मार्केटबाबत मात्र वेगळीच माहिती दिली गेली होती. त्यामुळे या मार्केटबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

कोट :

शहरातील सेंद्रीय भाजीपाला मार्केट सुरू करण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत लवकरच शेतकऱ्यांना बोलावून बैठक घेण्याचे नियोजन आहे. यामध्ये मार्केटबाबत चर्चा होऊन त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल.

- पंडीत लोणारे, जिल्हा कृषी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मटा’ हेल्पलाइनतर्फे गुणवंतांना धनादेश प्रदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अभ्यास करण्यासारखी परिस्थिती नाही... सभोवतालचे वातावरणही अभ्यासाला पोषक नाही... घरची परिस्थिती अत्यंत बिकट...हाता तोंडाची गाठ दिवसातून दोन वेळा पडणेही मुश्किल...याचा मुकाबला करत, रडत न बसता, परिस्थितीशी लढत दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवणाऱ्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांना 'महाराष्ट्र टाइम्स' च्या वाचकांनी दिलेल्या मदतीचे वाटप सोमवारी (२७ ऑगस्ट) करण्यात आले. 'म.टा'च्या हेल्पलाइन कार्यक्रमला जिल्हाधिकारी उदय चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशूशास्‍त्र विभागाचे प्रमुख डॉ. एल. एस. देशमुख, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शेख सलीम, सदस्य विश्वास येळीकर, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिऊरकर, कॉसमॉस बँकेचे असिंस्टंट जनरल मॅनेजर राजेश बजाज यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मदतीचे धनादेश देण्यात आले. \B

\Bहा कार्यक्रम देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक 'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक प्रमोद माने यांनी केले. 'मराठवाड्यातील 'मटा'च्या वाचकांनी हेल्पलाइनसाठी मोकळ्या हाताने मदत केली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत होणार आहे. आतापर्यंतच्या सात वर्षांत 'मटा'च्या औरंगाबाद आवृत्तीतर्फे २८ विद्यार्थ्यांना मदत करता आली,' असे सांगत माने यांनी दात्यांचे आभार मानले. यावेळी गुणवंत विद्यार्थी रोहिणी बोर्डे, आरती जोशी, सिद्धी मोरे, प्रसाद गोसावी व वैभव यादव यांनी आतापर्यंतचा शैक्षणिक प्रवास व पुढील उद्धिष्ट सांगितले. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंलन डेप्युटी न्यूज एडिटर श्रीपाद कुलकर्णी यांनी केले, तर सिनियर करस्पाँडंट तुषार बोडखे यांनी आभार मानले.

\Bपरिस्थितीच्या कोषातून बाहेर पडा, यश तुमचेच \B

आयुष्यात पुढे जाण्यासाठी, यश मिळवण्यासाठी परिस्थिती आड येऊ शकत नाही. आयुष्याच्या वाटेवर आपल्या जवळ जे आहे त्यात आपण काय उत्तम करू शकतो हे पाहुन पुढे जा. सकारात्मक दृष्टीकोण ठेवला, तर अडचणी दूर होऊ शकतात. आपलं हसू हरवू देऊ नका. जो पर्यंत परिस्थितीच्या कोषातून बाहेर पडत नाही, तो पर्यंत आपण विकास करू शकत नाही. शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे. परिस्थिती कशीही असली तरी प्रमाणिकपणे कष्ट केल्यास यश मिळेतच, हेल्पलाइन कार्यक्रमातही ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले त्यातील सर्वच विद्यार्थ्यांनी कठीण परिस्थितीतून यश मिळवले असून ते कौतुकास पात्र आहेत. येणाऱ्या काळातही ते असेच यश मिळवतील असा विश्वास वाटतो. या कार्यक्रमानिमित्त मदत करणारे दाते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांना 'मटा'ने एकत्र आणले हे महत्त्वाचे आहे. या पुढील काळात 'मटा' हेल्पलाइन कार्यक्रमाचा परीघ वाढवून अधिकाधिक विद्यार्थ्यांना मदत केली जाईल, अशी खात्री आहे.

-उदय चौधरी, जिल्हाधिकारी

\Bतंत्रज्ञानाचे गुलाम होऊ नका \B

मोबाइल वापरू नका, असा सल्ला दिला जातो. मला हे पटत नाही. आजचा विद्यार्थी डिजिटल युगातील आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठ्या प्रमाणावर ज्ञानाचा खजिना आहे. त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. हे करताना डिजिटल पद्धतीने मिळणाऱ्या माहितीची खात्री अवश्य करून घ्यावी. त्यातून नेमके आपल्या उपोयगी काय आहे हे ठरवता आले पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर करा पण त्याचे गुलाम होऊ नका. हे पथ्य पाळले तर खूप काही साध्य करता येईल. 'मटा'ने निवडलेल्या विद्यार्थ्यांचे मनोगत ऐकूण ते खूप हुशार आहेत हे जाणवते. त्यांनी परिस्थितीवर मात केली. मात्र आमच्या सारख्यांपुढील परिस्थितीही माझ्यादृष्टीने खूप आव्हानात्मक होती. माझे वडील सतत कोणत्या ना कोणत्या निवडणुकीत गुंतलेले असायचे. ते अभ्यास कसा झाला हे क्वचितच विचारत असत. मात्र पोटचिट किती लिहिल्या हे आवर्जन विचारत असत. घर खूप मोठे होते. पण, प्रत्येक खोलीत दहा जण झोपलेले. त्यामुळे गॅलरीत जाऊन अभ्यास करावा लागायचा. प्रत्येकासमोरची आव्हाने अशी वेगवेगळी असतात. नियोजन करून त्यावर मात कसे करतो हे महत्त्वाचे. आज काल 'आय क्यू'ला महत्त्व दिले जाते. परंतु, यासोबतच 'ई क्यू' आणि 'एस क्यू' यालाही खूप महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी व्यायाम, एकाग्रतेसाठी प्रार्थना व संतुलित आहार यावर लक्ष द्यावे. 'मटा'ने फक्त पाच विद्यार्थी निवडण्याऐवजी अधिक विद्यार्थी निवडावेत. त्यांनाही समाज मदत करेल.

-डॉ. एल. एस. देशमुख,नवजात शिशूशास्‍त्र विभागप्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

\Bमदतीसाठी सतत तयार \B

आपण अपयशाचे खापर परिस्थितीवर फोडतो. प्रत्यक्षात मात्र आयुष्यात नेहमीच बदल होतात हे लक्षात घेतले पाहिजे. पालकांना माझी एक विनंती आहे, मुलांना स्मार्ट फोन घेऊन देऊ नका. सध्या मोबाइल हा सर्वात मोठा अडथळा असल्याचे जाणवत आहे. त्याऐवजी पुस्तके घेऊन द्या. पुस्तकांचे वाचन आयुष्याची दिशा ठरवते. 'मटा'ने निवडलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणात पुढे जावे. त्यांच्या मदतीसाठी आम्ही सर्वच जण सतत तयार आहोत.

- डॉ. उल्हास शिऊरकर, प्राचार्य, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय

\Bपरिस्थिती आड येत नाही \B

आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम केले तर परिस्थिती कधीही आड येत नाही. एक चहा विकणारा मुलगा नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत. नावाड्याचा मुलगा एपीजे अब्दुल कलाम यांनी महामहिम राष्ट्रपतीपदापर्यंत मजल मारली. पालकांनी विद्यार्थ्यांची आवड ओळखावी. त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करावी. कठोर परिश्रम केल्यास यश नक्कीच आपले आहे. 'मटा'चा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा व समाजोपयोगी आहे.

- राजेश बजाज, असिस्टंट जनरल मॅनेजर, कॉसमॉस बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडेगाव येथील कचरा डेपो हटवण्यासाठी धरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पडेगाव येथील गट क्रमांक ६६, ६७ मधील कचरा डेपो त्वरित हटवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी करत पडेगाव तसेच परिसरातील नागरिकांनी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून आयुक्तांना निवेदन दिले.

परिसरातील भावसिंगपुरा, ग्लोरिया सिटी, लाल माती परिसर, कासंबरी दर्गा, निसर्ग कॉलनी, श्रावस्ती कॉलनी, राजधानीनगर, अंसार कॉलनी, के. टी. हाइट, शहा कॉलनी, गीतानगर, पेठेनगर, कोयनानगर आदी नागरी वसाहतींच्या मध्यभागी व महापालिका प्रशासनाने कत्तलखान्यासाठी आरक्षित केलेल्या जागेच्या परिसरामध्येही मोठ्या प्रमाणावर कचरा टाकणे सुरू आहे. या ठिकाणापासून अवघ्या १५० मीटरवर नागरी वसाहती असून परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या ठिकाणी कचरा टाकण्यास प्रारंभी नागरिकांनी व‌िरोध केला. त्यावेळी महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केवळ चारच वार्डांचा कचरा टाकण्यात येणार असून त्यावर प्रक्रिया करणार असल्याचे खोटे आश्वासन दिले होते. आजही या जागेवर ओला व सुका कचरा टाकणे सुरू आहे, या संदर्भात शांततेच्या मार्गात आंदोलन केले होते. मात्र, महापालिका प्रशासन दडपशाही करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या गंभीर समस्येची दखल घेऊन गट क्रमांक ६६-६७मधील कचरा डेपो कायमस्वरूपी हटवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरीत बुडून दोन विद्यार्थ्यांचा अंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

तालुक्यातील बाबतरा येथे गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. विवेक कालीचरण कुमावत (वय १५) व तुषार सतीश गांगड (वय १४) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत अग्निशामन दल, वीरगाव पोलिस व महसूल प्रशासनाने ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचे मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला, पण शोध न लागल्याने शोधकार्य थांबवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघे बाबतरा येथील रहिवासी असून पुणतांबा (जिल्हा अहमदनगर) येथील न्यू इंग्लिश स्कूलचा तुषार हा आठवीचा तर विवेक हा नववीचा विद्यार्थी होता. हे दोघे सार्थक एकनाथ भवर या विद्यार्थ्यासोबत गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेले होते. रविवारी ज्या ठिकाणी ते गेले होते त्याच ठिकाणी सोमवारी हे तिघे पुन्हा गेले. सार्थक काठावरच बसला होता. विवेक व तुषार हे दोघे नदीत उतरले. मात्र, यावेळी पावसामुळे पात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे प्रवाहाबरोबर वाहून गेले. इतर मुलांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थांनी तातडीने पाण्यात उड्या मारून शोध घेण्याचा प्रयत्न केला. वीरगाव पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी अग्निशामन दलाला पाचारण केले. दोन बोटींच्या सहाय्याने संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुलांचा शोध घेण्यात आला, मुलांचे सापडली नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवयवदात्याच्या भावाचा मृत्यू, खासदारांची मदत

$
0
0

औरंगाबाद: रस्ते अपघातामध्ये ब्रेन डेड झाल्यानंतर घाटीमध्ये २२ फेब्रुवारी २०१७ मध्ये अवयवदान केलेले मिलिंद मनोहर हेलवाडे यांचे भाऊ शरद मनोहर हेलवाडे यांचे किडनीविकाराने घाटीमध्ये निधन झाले. नाजूक आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून त्यांच्या कुटुंबाला दहा हजार रुपयांची मदत रविवारी (२६ ऑगस्ट) देण्यात आली. ही मदत पुष्पा मनोहर हेलवाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या वेळी घाटीचे उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, श्री. कानकाटे आदींची उपस्थिती होती. संबंधित रुग्णाला घाटीकडून सर्वतोपरी सर्वतोपरी मदत करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगीकरणाच्या विरोधात संघर्ष समिती, आपची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीच्या पीपीपी तत्वावरील कराराचे पुनरुज्जीवन करून पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यास समन्वय संघर्ष समिती आणि आपतर्फे महापालिकेच्या मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

समांतर जलवाहिनीच्या कराराच्या पुनरुज्जीवनाबद्दल सोमवारी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालिका मुख्यालयाच्या समोर समन्वय संघर्ष समितीतर्फे निदर्शने करण्यात आली. समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला देऊ नका, नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी द्या, पाणीपट्टी कमी करून १८०० रुपये करा, टँकरचे दर तीन महिन्यांसाठी २५० रुपये करा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. निदर्शनात राहुल इंगळे, डॉ. गफार कादरी, भारत गायकवाड आदी सहभागी झाले होते.

पाणी पुरवठ्याच्या खासगीकरणाच्या विरोधात आम आदमी पार्टी तर्फे देखील महापालिकेच्या समोर निदर्शने करण्यात आली. खासगीकरणाचा करार रद्द करा, पाणीपट्टी पुर्वीप्रमाणे १८०० रुपये करा, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी अजबराव मानकर, सिद्धार्थ बनसोडे, महमद बशीर, रामेश्वर भारती, अशीर जयहीद, सतीश संचेती, सुग्रीव मुंडे आदी सहभागी झाले होते.

सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी एमआयएमच्या नगरसेवकांची गो बॅक वॉटर युटिलीटी असा मजकूर लिहीलेले फलक सभागृहाच्या बाहेर फडकवले, हातात हे फलक घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images