Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पैठणमध्ये पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

नेहरू चौक भागातील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शनिवारी रात्री उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने छापा मारला. यावेळी झन्ना मन्ना जुगार खेळणाऱ्या सात जुगाऱ्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

नेहरू चौक भागातील कय्युम धांडे यांच्या घरातील तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांना मिळाली. त्यांनी या जुगार अड्ड्यावर कार्यवाही करण्याचे आदेश त्यांच्या विभागातील पथकाला दिले. शनिवारी संध्याकाळी पोलिसांच्या पथकाने नेहरू चौक येथे छापा टाकला. यावेळी पोलिस पथकाला कय्युम मुराद धांडे, आमेर अय्युब पठाण, समीर अय्युब पठाण, सदाशिव भानुदास चीडनार, अय्युब मेहबूब पठाण, मंजित रमेश पगारे व लइक बारी सिद्दिकी हे सात जण पैसे लावून झन्ना मन्ना जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी या सात जणांना अटक केली असून, दोन जुगारी घटना स्थळारून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. कार्यवाही करणाऱ्या पोलिस पथकात, फिरोजखा पठाण, विलास घुंगरे, गणेश घोरपडे व राजेंद्र जाधव यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता परतीच्या पावसावर मराठवाड्याची भिस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अपेक्षित सरासरीपेक्षा यंदा अधिक पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करणाऱ्या हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र, हा अंदाज खोटा ठरत सध्या मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. आता मराठवाड्याची भिस्त फक्त परतीच्या पावसावरच आहे. पाऊस पडेल या आशेवर आतापर्यंत राहिलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत केवळ ७५ टक्के पाऊस पडला आहे. विभागातील ४२१ महसुली मंडळांपैकी १७३ मंडळांत ७५ टक्क्यांपेक्षा कमी, तर ५७ मंडळांत निम्मा पाऊसही पडलेला नाही. यामुळे केवळ पावसावर अवलंबून असलेल्या खरीप पिकांची आशा शेतकऱ्यांनी सोडली आहे. मराठवाड्यात जूनमध्ये १६, जुलैमध्ये १३, ऑगस्टमध्ये केवळ नऊ दिवस पाऊस पडला. विभागात प्रामुख्याने परतीचा पाऊस पडतो, मात्र सप्टेंबर महिन्याचे १६ संपले तरी वरूणराजा अद्याप रुसलेला आहे. विभागातील पिकांची वाढ खुंटली असून हलक्या प्रतिच्या जमिनीवरील पिके कोमेजली आहेत. त्यामुळे पेरणीसाठी केलेली कोट्यवधीची गुंतवणूक मातीमोल झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ६३.१५ टक्के, जालना ७३.२०, परभणी ७२.७३, हिंगोली ८६.७१, नांदेड ९४.४७, बीड ६१.०४, लातूर ७६.९४ तर उस्मानाबाद जिल्ह्यात ६६.६३ टक्के पाऊस पडला आहे. ७६ पैकी तब्बल ६४ तालुक्यांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. विभागात केवळ १२ तालुक्यांमध्येच अपेक्षित सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी परतीच्या पावसाकडे डोळे लागले आहेत.

जून महिन्याच्या प्रारंभीच्या १२ दिवसांत दमदार हजेरीमुळे पावसाने ७६ पैकी ६४ तालुक्यांमध्ये अपेक्षित सरासरी ओलांडली होती. त्यानंतर मोठ्या खंडामुळे सर्व गणित बिघडले. या कालावधीत लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाने दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर केवळ नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांना पावसाने दिलासा दिला. इतर जिल्ह्यांत जुलै आणि ऑगस्टमध्ये मोठा खंड दिला. औरंगाबाद आणि जालना जिल्‍ह्यांत जून व जुलै महिन्यातही खूप कमी पाऊस पडला. या दोन जिल्ह्यात सर्वाधिक चिंतेजनक स्थिती आहे. मराठवाड्यातील फक्त ६४ मंडळांमध्ये अपेक्षित सरासरीच्या तुलनेत १०० टक्के पाऊस झाला आहे.

\Bया तालुक्यांनी ओलांडली सरासरी\B

मराठवाड्यातील फक्त १२ तालुक्यांनी अपेक्षित सरासरी ओलांडली आहे. त्यापैकी दहा तालुके नांदेड व एक तालुका परभणी जिल्ह्यातील आहे. यात परभणी जिल्ह्यातील पालम तालुका (१०८.०७ टक्के), नांदेड जिल्ह्यातील नांदेड (१०८.४८), मुदखेड (१३१.०० टक्के), अर्धापूर (११०.४६ टक्के), भोकर (१२२.८४ टक्के), उमरी (१०१.२८ टक्के), कंधार (१११.२१ टक्के), लोहा (१००.१४ टक्के), हदगाव (१०३.८३ टक्के) व हिमायतनगर (१०९.५५ टक्के) या तालुक्यांचा समावेश आहे.

----.

महसूल मंडळनिहाय पाऊस

जिल्हा........... २५ ते ५० टक्के............... ५० ते ७५ टक्के............ ७५ ते १०० टक्के......... १०० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त

औरंगाबाद............११...............................३६..........................१५..................................३

जालना................६...............................२१..........................१२..................................३

परभणी...............४.................................१९.........................१२..................................३

हिंगोली................१..................................१०.......................९....................................१०

नांदेड..................५................................१७........................२१.................................३७

बीड.....................२०.............................२६.........................१७..............................००

लातूर.................२..................................२१.........................२३................................७

उस्मानाबाद...........७................................२३...........................१०..............................२

----------------------------------------------------------------------------------.

एकूण...............५६.................................१७३........................१२६.........................६५

\B(परभणी जिल्ह्यातील एका मंडळात २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे.)\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नड येथे विद्यार्थिनीला विनयभंग करून मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

कन्नड शहरातील एका तरुणा विद्यार्थिनीचा विनयभंग करून तिला मारहाण करण्याची घटना रविवारी (१६ सप्टेंबर) सकाळी घडली आहे.

ही २१ वर्षांची विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. तिने कन्नड शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, शहरातील राकेश पोपट मोरे याने, जुन्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून विनयभंग केला. तू माझी पोलिसांत तक्रार दिली, माझे जीवन उद्ध्वस्त केले, मी तुला जीवंत ठेवणार नाही, असे म्हणत त्याच्या बॅगमधून लोखंडी हातोडी काढून डोक्यावर व उजव्या हातावर मारून जखमी केले. तरुणीच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपी पसार झाला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनरेगाचे अपूर्ण प्रस्ताव; ग्रामसेवकांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातून परिपूर्ण प्रस्ताव येत नसल्यामुळे मनरेगाची कामे करण्यात अडचणी येत आहेत. यास जबाबदार असलेल्या ग्रामसेवकांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश रोहयोच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत देण्यात आले.

रोजगार हमी योजना विधीमंडळ समितीचे अध्यक्ष आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या सभागृहात ही बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर, उपाध्यक्ष केशव तायडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अशोक शिरसे यांच्यासह विभागप्रमुख जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते. रोहयोचे प्रस्ताव गावपातळीवरून परिपूर्ण येत नाहीत, गटविकास अधिकाऱ्यांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जातात आणि परिपूर्ण नसल्यामुळे ते परत पाठवले जातात. पर्यायाने या योजनेचे काम सुरू होत नसल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. तेव्हा अपूर्ण प्रस्ताव पाठविणाऱ्या ग्रामसेवकांना तातडीने कारणे दाखवा नोटीस पाठविण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. अपूर्ण प्रस्ताव येत असल्यामुळेच या योजनेची कामे होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान, या योजनेचे अपूर्ण असलेले पेमेंट तातडीने करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे कर्मचाऱ्यांचा स्वच्छतेसाठी पुढाकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत' या उपक्रमांतर्गत नांदेड विभागातील सर्व रेल्वे स्टेशनवर स्वच्छता पंधरवाडा सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे परिसराच्या स्वच्छता करून या उपक्रमात आपला हातभार लावला.

औरंगाबाद रेल्वे स्टेशनसह नांदेड विभागातील ३९ छोट्या-मोठ्या रेल्वे स्टेशनवर स्वच्छता उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नांदेड रेल्वे स्टेशनवर विभागीय व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा या उपक्रमात सहभागी झाले. औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर शनिवारी (१५ सप्टेंबर) ला स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमात विभागीय अभियंता सुजित कुमार यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. रविवारीही (१६ सप्टेंबरला) औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत रेल्वे स्टेशन व्यवस्थापक एल. के. जाखडे, यांच्यासह धनंजय सिंह, स्वच्छता निरीक्षक आशुतोष गुप्ता यांच्यासह अन्य रेल्वे कर्मचारी अधिकारी यांच्या उपस्थितीत रेल्वे स्टेशन परिसराची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता अभियानात रेल्वे स्टेशनच्या जुन्या इमारतीसमोरील परिसरासह रेल्वे स्टेशनवरही स्वच्छता करण्यात आली. सोमवारी या अभियानात शहरातील काही एनजीओंसह, शाळेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहितीही रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

…………

४८ जणांवर कारवाई

स्वच्छता अभियानात रेल्वे स्टेशनवर स्वच्छता राहावी, रेल्वे स्वच्छ राहावी, यासाठी विशेष जनजागृती केली जात आहे. या अंतर्गत सहा रेल्वेंमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. या शिवाय विविध रेल्वे स्टेशनच्या फलाटावर थुंकणाऱ्या तसेच घाण करणाऱ्या ४८ जणांकडून ९ हजार ६०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.

………

पथनाट्यातून जनजागृती

स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी नांदेड येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात नांदेड रेल्वे स्टेशनसमोर रेल्वे विभागातील काही कर्मचाऱ्यांनी पथनाट्य नाटक सादर केले. नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापकांसह रेल्वेच्या अन्य अधिकाऱ्यांसमोर पथनाट्य सादर करण्यात आले. औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे अधिक्षक हुसैन अफसर अहेमद यांच्या निर्देशनाखाली सुनील महाजन, देवीदास किसन, विष्णु चरण सेठी, माया देवीदास, सी. एम. येडके यांच्यासह शाहरूख हुसैन अफसर यांनी पथनाट्य सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्येस प्रवृत्त केल्याने चौघांवर पोलिसांत गुन्हा

$
0
0

वाळूज महानगर : बलात्काराचा आरोप असणाऱ्याने वाळूज महानगरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बलात्काराचा खोटा आरोप करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार मृताच्या पत्नीने दिल्यानंतर चौघांवर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; वाळूज एमआयडीसीतील सुशीला हाउसिंग सोसायटी (साईनगर, रांजणगाव शेणपुंजी) येथे राहणाऱ्या आशा अंभोरे यांचे पती चंद्रकांत अंभोरे यांनी दहा सप्टेंबर रोजी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. अंभोरे दांपत्य दोन मुलांसह दोन वर्षांपासून येथे राहते. १७ मार्च रोजी आशाच्या बहिणीचा मुलगा विजय गोपाल साळवे व त्याची पत्नी ज्योती विजय साळवे कामानिमित्त वाळूज एमआयडीसीत आले होते. त्यांनी १७ मार्च ते ३१ मार्च यादरम्यान चंद्रकांत अंभोरे यांच्या घरी राहून येथील एका खासगी कंपनीमध्ये काम केले. एक एप्रिल रोजी साळवे पती-पत्नी गावाकडे जात असल्याचे सांगून निघून गेले. नंतर साळवे पती-पत्नीमध्ये भांडण झाल्यामुळे ज्योती साळवे माहेरी निघून गेल्या. त्यानंतर २२ एप्रिल रोजी ज्योती साळवे तिची आई लिलाबाई अशोक भालेराव व संदीप जयवंत पाटील यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात चंद्रकांत अंभोरे यांनी त्यांच्या घरी ज्योतीचा विनयभंग करून तिच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्तास्थात केल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार चंद्रकांत अंभोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. त्यांनतर जामिनावर सुटका झाली.

जामिनावर सुटून घरी आल्यानंतर त्यांनी पत्नीला सांगितले की, मी असे काही केलेच नाही. त्यांनी फसवले आहे. त्यानंतर विजय साळवे अंभोरे यांना नेहमी फोन करून धमक्या देत असल्यामुळे ते मानसिक तणावात होते. या जाचाला कंटाळून गळफास घेतील असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. पतीच्या आत्महत्येस ज्योती विजय साळवे, लिलाबाई अशोक भालेराव, संदीप जयवंत पाटील (रा. शिवरे, ता. पारोळा, जि. जळगाव) आणि विजय गोपाळ साळवे (रा. पिंपलेशिम ता. धरणगाव, जि. जळगाव) हे जबाबदार असल्याची तक्रार अंभोरे यांची पत्नी आशा यांनी केली आहे. त्यानुसार वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात या चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापुरात पावसाची २५ दिवसांनंतर हजेरीवैजापुर : शहरात रात्रीच्या वेळी सुमारे एक त -(A)

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

वैजापूर शहरात शनिवारी रात्रीच्या वेळी सुमारे एक तास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसाळ्यातही उकाड्याने हैराण झालेल्या वैजापुरकरांना दिलासा मिळाला.

तब्बल २५ दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात रात्री पावणेआठ ते नऊ यादरम्यान जोरदार पाऊस झाला. पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

तालुक्यात २० ते २२ ऑगस्टदरम्यान अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, परंतु त्यानंतर पुन्हा २५ दिवस पावसाने उसंत घेतल्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले होते. त्यात तीन दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली होती. सूर्य उन्हाळ्यासारखी आग ओकत होता. त्यामुळे नागरिकांच्या अंगातून घामांच्या धारा वाहत होत्या. शनिवारी सायंकाळी मात्र पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रात्री साडेसातनंतर आभाळ दाटून आले. त्यानंतर थोड्याच वेळात पावसाने सुरुवात केली. सुरुवातीला या पावसाला जोर नव्हता, मात्र पावणेआठनंतर पावसाच्या एक तास जोरदार सरी कोसळत होत्या. या पावसाने क्षणार्धात सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले होते. रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत होते. या पावसामुळे गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची धांदल उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्याला मागासलेपणापासून मुक्ती हवीः मुख्यमंत्री

$
0
0

औरंगाबाद

मराठवाड्याला विकासाची भूक आहे आणि मागासलेपणापासून मुक्ती हवी आहे, असं भावनिक वक्तव्य हैदाराबाद मक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. राज्य सरकारने मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आतापर्यंत १५ हजार कोटींहून अधिकचा निधी दिल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा मुंबई-नागपूर समृद्धी महमार्गातून सर्वांधिक विकास मराठवाड्याचा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याच्या विकासावर आधारित 'अग्रेसर मराठवाडा' या पुस्तिकेचं प्रकाशन केलं.

शेती आणि सिंचनावर भर

राज्य सरकारने मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष भरून काढला असून अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत १५ हजार कोटींचा निधी दिला आहे. मराठवाड्याची वाटचाल दुष्काळमुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. एकूण शेततळ्यांपैकी ३५ टक्के शेततळी मराठवाड्यात बांधली गेली आहेत. तसंच जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठं काम मराठवाड्यात झालं आहे. यातून ६० हजार हेक्टर क्षेत्राहून अधिकचं सिंचन मराठवाड्यात हेऊ शकतं. याशिवाय मराठवाड्यात वॉटर ग्रीडद्वारे १४ प्रकल्पांचे पाणी उद्योग, सिंचन, शेती आणि पिण्यासाठी पुरण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे. या महामार्गाच्या विकासातून औरंगाबाद आणि जालना हे जिल्हे उद्योगांचं मॅग्नेट ठरणार आहे. तसंच उद्योगांना आकर्षित करण्यासाठी छत्तीसगडसह इतर शेजारी राज्यांपेक्षाही कमी दरात मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिन्याभरानंतर औरंगाबाद चिंब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल महिन्याभराच्या दीर्घ खंडानंतर सोमवारी (१७ सप्टेंबर) दुपारी दोनपासून पावसाने हजेरी लावली. सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात अर्धा ते पाऊण तास बरसलेल्या सरींनी शहर चिंब झाले.

चिकलठाणा वेधशाळेमध्ये केवळ १.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली, तरी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये पावसाचा जोर होता. सिडको, हडको, चिकलठाणा, औरंगपुरा, चिकलठाणा, क्रांती चौक, निराला बाजार, हर्सूल, विद्यापीठ परिसरासह जुन्या शहरातही पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. पाऊस पडण्याची चिन्हे दिसत होती. मात्र, सोमवारी पाऊस बरसला. महिन्याभराच्या खंडानंतर झालेल्या पावसानंतरही अद्याप ग्रामीण भागामध्ये मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतीक्षा परतीच्या पावसाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अपेक्षित सरासरीपेक्षा यंदा अधिक पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करणाऱ्या हवामान विभागाने व्यक्त केला, मात्र आता तो खोटा ठरत असून, सध्या मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. आता मराठवाड्याची भिस्त फक्त परतीच्या पावसावरच आहे. पाऊस पडेल या आशेवर आतापर्यंत राहिलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत केवळ ७५ टक्के पाऊस पडला आहे. विभागातील ४२१ महसुली मंडळांपैकी १७७ मंडळांत ७५ टक्क्यांपेक्षा कमी, तर ५६ मंडळांत निम्मा पाऊसही पडलेला नाही. यामुळे केवळ पावसावर अवलंबून असलेल्या खरीप पिकांची आशा शेतकऱ्यांनी सोडली आहे. मराठवाड्यात जूनमध्ये १६, जुलैमध्ये १३, ऑगस्टमध्ये केवळ नऊ दिवस पाऊस पडला. विभागात प्रामुख्याने परतीचा पाऊस पडतो, मात्र सप्टेंबर महिन्याचे १६ संपले तरी वरूणराजा अद्याप रुसलेला आहे. विभागातील पिकांची वाढ खुंटली असून, हलक्या प्रतिच्या जमिनीवरील पिके कोमेजली आहेत. त्यामुळे पेरणीसाठी केलेली कोट्यवधीची गुंतवणूक मातीमोल झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ६२.६८ टक्के, जालना ७२.९४, परभणी ७२.१६, हिंगोली ८६.११, नांदेड ९३.६९, बीड ६०.६९, लातूर ७६.१९ तर उस्मानाबाद जिल्ह्यात ६६.६१ टक्के पाऊस पडला आहे. ७६ पैकी तब्बल ६५ तालुक्यांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. विभागात केवळ ११ तालुक्यांमध्येच अपेक्षित सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी परतीच्या पावसाकडे डोळे लागले आहेत.

जून महिन्याच्या प्रारंभीच्या १२ दिवसांत दमदार हजेरीमुळे पावसाने ७६पैकी ६४ तालुक्यांमध्ये अपेक्षित सरासरी ओलांडली होती. त्यानंतर मोठ्या खंडामुळे सर्व गणित बिघडले. या कालावधीत लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाने दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर केवळ नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांना पावसाने दिलासा दिला. इतर जिल्ह्यांत जुलै आणि ऑगस्टमध्ये मोठा खंड दिला. औरंगाबाद आणि जालना जिल्‍ह्यांत जून व जुलै महिन्यातही खूप कमी पाऊस पडला. या दोन जिल्ह्यात सर्वाधिक चिंतेजनक स्थिती आहे. मराठवाड्यातील फक्त ६२ मंडळांमध्ये अपेक्षित सरासरीच्या तुलनेत १०० टक्के पाऊस झाला आहे.

\Bया तालुक्यांनी ओलांडली सरासरी

\Bमराठवाड्यातील फक्त ११ तालुक्यांनी अपेक्षित सरासरी ओलांडली आहे. त्यापैकी ९ तालुके नांदेड जिल्ह्यातील तर लातूर व परभणी जिल्ह्यातील प्रत्येक एक तालुका आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यातील पालम तालुका (१०७.८६ टक्के) तर लातूर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ (१०२.१६ टक्के) या तालुक्यांचा समावेश असून नांदेड जिल्ह्यातील नांदेड (१०७.५०), मुदखेड (१२९.८६ टक्के), अर्धापूर (१०९.३८ टक्के), भोकर (१२१.५७ टक्के), उमरी (१००.२४ टक्के), कंधार (११०.३० टक्के), माहुर (१००.१९ टक्के), हदगाव (१०३.११ टक्के) व हिमायतनगर (१०८.८६ टक्के) या तालुक्यांचा समावेश आहे.

\Bमहसूल मंडळनिहाय पाऊस\B

जिल्हा...........२५ ते ५० टक्के.......५० ते ७५ टक्के......७५ ते १०० टक्के.........१०० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त

औरंगाबाद........१२........................३६.........................१५.............................२

जालना.............५.........................२३.........................१८.............................३

परभणी.............४........................१९.........................१२.............................३

हिंगोली.............१........................१०.........................१०.............................९

नांदेड...............५........................१७........................२२..............................३६

बीड.................२०......................२६.........................१७..............................००

लातूर...............२........................२३.........................२१................................७

उस्मानाबाद.......७........................२३..........................१०..............................२

एकूण...............५६......................१७७........................१२५.........................६२

(परभणी जिल्ह्यातील एका मंडळात २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्यास गंडविणाऱ्या परप्रांतीयाला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वीस लाखांचे कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून ७ लाख १६ हजारांचा गंडा घालणारा परप्रांतिय आरोपी जितेंद्रसिंग गजेंद्रसिंग मिना याला दिल्लीतून अटक करण्यात आली. त्याला सोमवारी (१७ सप्टेंबर) कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीला बुधवारपर्यंत (१९ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले.

याप्रकरणी दलपतभाई दामजीभाई पटेल (४२, रा. कीर्ती हौसिंग सोसायटी, सिडको एन-आठ, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीचा चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील नारेगाव येथे टाइल्सचे गोदाम आहे. त्यांना त्यांच्या मोबाइलवर २० सप्टेंबर २०१७ रोजी कॉल आला. बजाज फायनान्स (पुणे) येथून प्रिया शर्मा बोलत असल्याचे सांगत 'तुम्हाला कर्ज हवे असेल तर आमच्या मेलवर आपली 'केवायसी' कागदपत्रे पाठवा,' असे सांगण्यात आले. कर्जाची गरज असल्यामुळे फिर्यादीने त्या 'मेल-आयडी'वर 'केवायस' व इतर कागदपत्रे अपलोड केâली. त्यानंतर पुन्हा कॉल आला आणि २० लाखांचे कर्ज मंजूर झाल्याचे त्यांना मेलद्वारे कळविण्यात आले. या रकमेतील दहा टक्के रक्कम म्युच्युअल फंâडात जमा करावी लागेल, असे फिर्यादीला कळविण्यात आल्यानंतर दिल्लीतील यश बँकेच्या शाखेत 'बँक ऑफ बडोदा'च्या खात्यातून दोन लाख रुपये फिर्यादीने 'आरटीजीएस' केले. त्यानंतर पुन्हा 'एनओसी चार्जेस' म्हणून २ लाख ८३ हजार ७ रुपये आणि लोन कार्डसाठी २ लाख ३२ हजार ५०० रुपये भरण्यास सांगितल्यामुळे ती सर्व रक्कम भरण्यात आली. फिर्यादीने सुमारे सात लाख १६ हजार २०० रुपये यश बँकेच्या खात्यात जमा केल्यानंतरही कर्जाची उर्वरित रक्कम खात्यात वर्ग कगरण्यात आली नाही. याबाबत वेळोवेळी पैसे भरण्यास सांगण्यात येत असल्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने सायबर गुन्हे शाखेत तक्रार केली होती.

\Bरक्कम हस्तगत करणे बाकी\B

याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने जितेंद्रसिंग गजेंद्रसिंग मिना (२६, हरी नगर, मायपुरी दिल्ली) याला दिल्लीतून अटक केली. त्याला सोमवारी कोर्टात हजर केले असता, मिना याच्या साथीदारांना अटक करायची आहे; तसेच त्याच्या ताब्यातून सात लाख १६ हजार २०० रुपये हस्तगत करावयाचे असल्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला बुधवारपर्यंत (१९ सप्टेंबर) पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयसीटी योजनेतील शिक्षकांना सेवेत रुजू करण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र सरकार पुरस्कृत आयसीटी योजनेअंतर्गत सेवेत घेतलेल्या राज्यातील टप्पा क्रमांक एक ते तीनमधील सुमारे आठ हजार संगणक शिक्षकांना मानधनावर सेवेत रुजू करून घेण्याबाबत शासनाने योग्य ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात श्रमिक संघाने म्हटले आहे की, 'संगणक शिक्षकांना मानधनावर रुजू करून घेण्याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करण्यात आली. जावडेकर यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत आर्थिक तरतूदीतून या शिक्षकांचा खर्च भागवता येईल अशा प्रकारची योजना निश्चित करून फेर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही पूर्ण करावी.' निवेदनावर योगेश काथार, संजय राठोड, नारायण रिठे, दिलापी सूर्यवंशी, प्रवीण सोनवणे या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भंगार चोराला मुद्देमालासह अटक

$
0
0

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीतील ७० हजार रुपयाचे भंगार चोरणाऱ्याला सोमवारी (१७ सप्टेंबर) पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली.

मोहमंद सरताज मोहमंद फारूख (२७, रा़ बक्कलगुडा, शहागंज, औरंगाबाद) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या ताब्यातून अ‍ॅल्युमिनीयम, प्लास्टिक, ग्राइंडर मोटार असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ के. जी. एन. इंडस्ट्रीज या कंपनीत ३० मे ते दो सप्टेंबर यादरम्यान चोरी झाली असल्याची तक्रार तीन सप्टेंबर रोजी साजुद्दिन हारूण कुरेशी (रा़ धारावी, मुंबई) यांनी दिली होती़ महाराष्ट्र राज्य कर्मचारी वसाहतीजवळ चोरीचे भंगार ठेवले असल्याची माहिती सोमवारी सकाळी ११च्या सुमारास पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी तेथे छापा मारला आणि आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले़ ही कारवाई पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, हेड कॉन्स्टेबर वसंत शेळके, रामदास गाडेकर, फकीरचंद फडे, सुधाकर केंद्रे, सुधीर सोनवणे, बाबासाहेब काकडे, आडियाल, देवीदास इंदोरे, बाळासाहेब आंधळे, बाळू लहरे, राजकुमार सूर्यवंशी, बंडू गोरे, अंबादास प्रधान यांच्या पथकाने पार पाडली़ आरोपीविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक उपनिरीक्षक भास्कर खरात हे करत आहेत़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालाजी मंदिर देखाव्याचे सिडकोत आकर्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नवीन औरंगाबादमधील सिडकोतील एन-आठमधील राजे छत्रपती चौकात असलेल्या मुद्रा गणेश मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाच्या आकर्षक मूर्तीची परंपरा जपली आहे. नवसाला पावणारा विघ्नहर्ता अशी ओळख असलेल्या मुद्रा गणेश मंडळाचा यंदा १४ फुटांची गणेशमूर्ती मुंबईहून तयार करून आणली आहे. त्याचबरोबर मंडळाने उभारलेला ४० फुटांचा तिरुपती बालाजी मंदिराचा देखवा सिडको-हडकोवासीयांचे लक्ष वेधत आहे.

मुद्रा गणेश मंडळाची स्थापना २००९ मध्ये करण्यात आली. यंदा मंडळाचे हे दहावे वर्ष आहे. आकर्षक मूर्ती आणि सामाजिक उपक्रमांची परंपरा जपलेल्या या मंडळाकडून सलग पाच वर्षांपासून रक्तदानाचा उपक्रम राबवण्यात येतो. गेल्या दहा वर्षांपासून वृक्षारोपण तसेच वृक्षसंवर्धनाचा संदेश देऊन विविध उपक्रम राबवण्यात येतात. सामाजिक अपप्रवृत्तींवर प्रहार करणारे सत्यपाल महाराज यांचा सत्यवाणी कार्यक्रम असो की परमार्थाचा माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे इंदुरीकर महाराजांचे कीर्तन, असे विविध कार्यक्रम मंडळाने आयोजित केले आहेत.

मंडळाचे कार्यकर्ते वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतात. यंदा मंडळाने २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५०१ जोडप्यांच्या हस्ते महाआरतीचा कार्यक्रम, भावगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. २१ सप्टेंबर रोजी दुपारी १२पासून महाप्रसाद भंडाऱ्याचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यंदा मंडळाचे अध्यक्ष प्रतीक शिंदे आहेत.

मूर्तीवर दीड हजार खड्यांची सजावट

मंडळाने आकर्षक मूर्तीची परंपरा कायम ठेवली असून, पहिल्याच वर्षी पहिल्या बसवलेल्या दगडूशेठ हलवाई गणपती मूर्तीची मोठी प्रशंसा झाली होती. दुसऱ्या वर्षी अष्टविनायक, तिसऱ्या वर्षी लालबागचा राजाच्या रुपातील मूर्ती बसवण्यात आली होती. यंदाही १४ फूट उंचीची, मुंबई येथील परळचा राजा या गणेशाची मूर्तीची स्थापना करण्यात आली असून, या मूर्तीवर गणेश मंडळाच्या सदस्यांनी तीन दिवस मेहनत करून तब्बल दीड हजार चमचमते खडे बसवले आहेत. यामुळे गणेशाचे रुप अधिकच मनोहारी झाले आहे.

देखावा पाहण्यास गर्दी

यंदा मंडळाने तिरुपती मंदिराच्या समोरच्या भागाची तब्बल ४० फुटांची प्रतिकृती उभारली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सुलतानपूर येथील कारागीरानी अडीच महिन्यांत हा देखावा उभारला. सेट तयार करून औरंगाबाद येथे आणण्यात आला. त्यानंतर सेटची उभारणी व रंगकाम, सजावट औरंगाबाद येथे करण्यात आली. दररोज सायंकाळी देखावा पाहण्यासाठी सिडको- हडकोमधील भाविकांची गर्दी वाढत आहे.

भंडाऱ्याला येणाऱ्यांना देतात रोपटे

मंडळातर्फे वृक्षरोपण, वृक्षसंवर्धनासंदर्भात विविध उपक्रम राबवण्यात येतात. गणेशोत्सवादरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद, भंडाऱ्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक भाविकाला मंडळातर्फे एक रोपटे देण्यात येते. यंदाही भंडाऱ्यादरम्यान रोपटे वाटपाचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनगर समाजाची आरक्षणासाठी निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सिद्धार्थ उद्यानात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमस्थळी धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्रतर्फे सोमवारी (१७ सप्टेंबर)अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मज्जाव केल्यामुळे आंदोलकांनी 'यळकोट यळकोट, जय मल्हार; भारत माता की जय; वंदे मातरम्' अशा घोषणा दिल्या.

घोषणा दिल्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. निवेदन मुख्यमंत्र्यांनाच देण्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी अखेर विमानतळावर निवेदन दिले. 'टिस'चा अहवाल आल्यानंतर आरक्षण देतो, असे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण निवेदनात करून देण्यात आली आहे. आता हा अहवाल आला असून २०१८ मध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही, तर संपूर्ण समाजाचा रोष आपल्यावर राहील, असा अशी विनंती वजा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. याप्रसंगी धनगर समाज संघर्ष समितीचे विभागीय अध्यक्ष अरुण रोडगे, जिल्हाध्यक्ष रंगनाथ राठोड, डॉक्टर संदीप घुगरे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चारशे सदस्यांचे वीर बलराम पावली पथक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रंगारगल्ली हा शहरातील जुना ऐतिहासिक भाग म्हणून ओळखला जातो. तेथे असलेल्या प्रसिद्ध हिंगलाज अंबिका मंदिरसमोर २००५मध्ये वीर बलराम गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाचे पावली पथक शिस्तबद्ध व आकर्षक म्हणून प्रसिद्ध आहे. या मंडळाचे ४०० सदस्य असून, यामध्ये शहरातील इतर भागात राहणाऱ्या देखील नागरिकांचा समावेश आहे.

या शिस्तबद्ध पथकाचा सराव गणेशोत्सवामध्ये रात्री दहा दिवस सुरू असतो. यांच्या पथकामध्ये ३५ ढोल, सात ताशे, चार कच्छी; तसेच टोल या पारंपारिक वाद्याचा समावेश आहे. कच्छीचा वापर करणारे हे पहिलेच मंडळ आहे. आकर्षक अशा चालीवर पावली पथकाचे सदस्य सराव करीत असताना हा सराव पाहण्यासाठी देखील रात्री नागरिक गर्दी करतात. शहरातील उत्कृष्ट ताशा वादक संदीप मिठ्ठे या ढोल पथकाचा प्रशिक्षक आहे.

साधारण १६ ते १८ प्रकारच्या चाली पथक सादर करते. दोन किंवा चार टप्प्यांच्या या चाली असून, या चालीवरच पावली खेळावी लागते. पावली खेळण्यासाठी शारीरिक क्षमता खूप महत्त्वाची आहे. पावली खेळताना संपूर्ण शरीराचा उपयोग होत असतो. पावली खेळणे हा देखील एका प्रकारे व्यायामच असल्याची माहिती मंडळाचे सदस्य चेतन जांगडे यांनी दिली. गणेश विसर्जनाच्या दिवशी मंडळातर्फे मिरवणूक काढण्यात येते. यामध्ये पावलीसाठीचे पारितोषिक अनेक मंडळापासून वीर बलराम मंडळाला मिळत आहे. गणेशोत्सवाशिवाय दुर्गादास अहीर यांच्या मार्गदर्शनाखली दहीहंडी गोविंदा पथक देखील कार्यरत आहे. मंडळातर्फे रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आदी कार्यक्रम देखील घेण्यात येत असल्याची माहिती जांगडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाई देशाला एकसंध ठेवील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'तिरंगा पदयात्रा राष्ट्रचेतना आणि राष्ट्रप्रेम जागृत करणारी आहे. या माध्यमातून देशभक्तांना मानवंदना देण्यात येत आहे. तिरंग्याच्या छत्राखाली तरुणाई देशाला एकसंध ठेवील,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते तिरंगा पदयात्रा कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.

हैदराबाद मुक्‍तिसंग्राम दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सोमवारी सकाळी (१७ सप्टेंबर) एक हजार १११ फूट तिरंगा पदयात्रा काढली. सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदयात्रेचे उद्‌घाटन केले. यावेळी अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान, प्रदेशमंत्री अभिजित पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी पन्नालाल गंगवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या लढ्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रकाश टाकला. 'आजचा दिवस मराठवाड्यासाठी स्वातंत्र्याचा दिवस आहे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर इंग्रजांनी संस्थानांना स्वतंत्र ठेवण्याची खेळी केली होती. मराठवाडा प्रदेश निमाजाच्या आधीन होता. विविध संस्थानांचे सरदार वल्लभाई पटेल यांनी एकत्रिकरण केले. मराठवाड्यात स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्यासह सर्वसामान्यांनी रझाकाराच्या विरोधात लढा दिला. देश स्वतंत्र झाल्यानंतर एक वर्ष एक महिन्यानंतर मराठवाडा भारतात विलीन झाला. त्यानंतर महाराष्ट्रात विलिनीकरण झाले. तिरंगा यात्रेमुळे नवचेतना निर्माण झाल्या आहेत. शहीदांना मानवंदना देऊन राष्ट्रभावना जागृत करण्याचे काम सुरू आहे. या तिरंग्याखाली देश एकसंध ठेवण्याची शक्ती आहे असे फडणवीस म्हणाले. यावेळी चौहान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\Bपदयात्रेचा जल्लोष

\B

सरस्वती भुवन मैदानावरून निघालेली तिरंगा पदयात्रा निराला बाजार, विवेकानंद कॉलेजमार्गे क्रांती चौकातील स्मृतीस्तंभाजवळ पोहचली. या ठिकाणी जयघोष करीत पदयात्रेचा समारोप करण्यात आला. तब्बल एक हजार १११ फूट तिरंगा असलेली पदयात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली. हजारो विद्यार्थी पदयात्रेत सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा मागास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मराठवाड्याला विकासाची भूक असून, त्याला मागासलेपणापासून मुक्ती हवी आहे,' अशी स्पष्ट कबुली सोमवारी (१७ सप्टेंबर) हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनामित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, 'विकासासाठी मराठवाड्याचा संग्राम सुरू आहे. सरकारने मागील चार वर्षांमध्ये सिंचनाचा अनुशेष, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, बळीराजा शेतकरी संजीवनी योजना, समृद्धी महामार्ग, मराठवाडा वॉटरग्रीड अशा अनेक उपक्रमांमधून विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याची वाटचाल सुरू केली आहे. यापुढेही मराठवाड्याला विकास, समृद्धीच्या दिशेने पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करू. देश स्वतंत्र झाल्‍यानंतर इंग्रजांनी स्वतंत्र अधिकार संस्थानिकांना दिले. या अधिकाराचा गैरवापर करून निजामांनी हैदराबाद संस्थानाबाबत निर्णय घेतला. मात्र, त्यांच्याविरुद्ध मराठवाड्याच्या मुक्तिसाठी स्वातंत्र्यसेनानींनी उठाव, संघर्ष केला. बलिदान दिले. त्याचे फलित म्हणजे आजचा मुक्तिसंग्राम दिन आहे. आज मराठवाड्याला विकासाची भूक असून, मागासलेपणापासून मुक्ती हवी आहे. यासाठी मराठवाड्यासाठी पूरक असणाऱ्या सर्व योजना राबवण्यासाठी शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. सरकारने मराठवाड्याच्या सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला. हक्काचे पाणी मिळावे यासाठी वॉटरग्रीड, जलयुक्त शिवार अभियान तसेच मागेल त्याला शेततळेसारख्या प्रभावी योजनांची अंमलबजावणी केली. यासह बळीराजा शेतकरी संजीवनी योजनेतून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मराठवाड्यातील अर्धवट प्रकल्पांना १५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी दिला. राज्यातील एकूण शेततळ्यांच्या उद्दीष्टापैकी तब्बल ३५ टक्के उद्दिष्ट मराठवाड्याने पूर्ण केले. यामुळे ६० हजार हेक्टर क्षेत्रावर संरक्षित स‌िंचन करता आले. याशिवाय मराठवाड्यात वॉटर ग्रीडद्वारे १४ प्रकल्पांचे पाणी उद्योग, सिंचन, शेती आणि पिण्यासाठी पुरण्यात येईल,' अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, या कार्यक्रमात मराठवाड्यातील विविध योजनांचा आणि उपक्रमांचा समावेश असणाऱ्या विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या पुढाकाराने तयार केलेल्या 'अग्रेसर मराठवाडा' पुस्तिकेचे आणि प्रा. अ. मा. पहाडे यांनी लिहिलेल्या हैदराबाद मुक्तिसंग्रामातील 'माणिक' ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून फडणवीस व मान्यवरांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यसेनानी, त्यांच्या नातेवाईकांकांची भेट घेऊन मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ध्वजवंदन कार्यक्रमासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार चंद्रकांत खैरे, जि. प. अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, डॉ. भागवत कराड, विजया रहाटकर, आमदार सतीश चव्हाण, प्रशांत बंब, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर तसेच विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी आदींची उपस्थिती होती.

\B११ हजार कोटी गंतवणूक; तीन लाख रोजगार मिळणार

\Bमुख्यमंत्री म्हणाले, 'मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे. या महामार्गाच्या विकासातून औरंगाबाद आणि जालना हे जिल्हे उद्योगांचे मॅग्नेट ठरणार आहे. तसेच उद्योगांना आकर्षित करण्यासाठी छत्तीसगडसह इतर शेजारी राज्यांपेक्षाही कमी दरात मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे. डीएमआयसीसारख्या महत्त्वाच्या योजनेतून शेंद्रा-बिडकीन येथे ऑरिक सिटी होत आहे. या योजनेत ११ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, यातून तीन लाख रोजगार मराठवाड्यात निर्माण होणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जुलमी निजामी राजवट व रझाकारांच्या तावडीतून मराठवाड्याची सुटका करण्यासाठी मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणाची बाजी लावली आहे. या जुलमी राजवटीच्या अनेक आठवणी आजही अंगावर शहारे आणतात. हा लढा लढणाऱ्या जेष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचा सोमवारी(१७ सप्टेंबर) जिल्हा गणेश महासंघाच्या वतीने गौरव करण्यात आला.

समर्थनगर, सावरकर चौक येथील गणेश महासंघांच्या कार्यालयात प्रातिनिधिक स्वरुपात काही जेष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात धानोरा येथील स्वातंत्र्यसेनानी जयसिंग बाबुराव साळुंके, कडुबा लहानू सोळुंके, डॉ. मोरेश्वर देशमुख यांचा समावेश होता. यावेळी गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष डी. एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची ओळख व्हावी आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीला त्यांचा खरा इतिहास माहित व्हावा यासाठी लवकरच गणेश महासंघाची एक वेबसाइट तयार करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यसैनिकांचे सुवर्णक्षण या संकेतस्थळावर असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यकमाचे सूत्रसंचालन राजेंद्र दाते पाटील यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक विजय वाघचौरे, संजय सुर्वे, महासंघाचे कार्याध्यक्ष धीरज पाटील, गणेश गिरी, भास्कर निकाळजे यांच्यासह प्रसिद्धीप्रमुख सचिन अंभोरे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेची सिटी बस स्वातंत्र्यसैनिकांना मोफत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'सिटी बस सेवा सुरू झाल्यानंतर स्वातंत्र्यसैनिकांना मोफत प्रवास योजना लागू केली जाईल,' अशी घोषणा महापौर नंदकुमार घोडेले यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात केली. मुक्तिलढ्यात सहभागी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल त्यांनी यावेळी आदर व्यक्त केला.

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त महापालिकेच्या मुख्यालयात महापौरांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती रेणुकादास वैद्य, सभागृह नेता विकास जैन, नगरसेविका कीर्ती शिंदे, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग व डॉ. डी. पी. कुलकर्णी, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त वसंत निकम, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर, मुख्य लेखा परीक्षक दीपाराणी देवतराज यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी बोलताना महापौरांनी पालिकेतर्फे सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सिटी बस सेवा लवकरच सुरू होणार असून तिच्यात स्वातंत्र्यसैनिकांना मोफत प्रवासाची योजना अंमलात आणली जाईल. औरंगाबाद शहर मराठवाड्याची राजधानी असून ऐतिहासिक व जागतिक पर्यटनाचे शहर म्हणून ओळख आहे. त्यामुळे शहराच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध आहोत. पालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी कर अदालत घेण्यात येणार आहे. कर वसुली संबंधीची प्रलंबित प्रकरणे त्यातून निकाली निघतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालिकेच्या अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्यांचा त्यांनी भाषणामध्ये उल्लेख केला.

\Bआयुक्तांच्या कार्याचा उदो उदो\B

महापौरांनी आपल्या भाषणात आयुक्तांच्या कामाचा उदो उदो केला. डॉ. निपुण विनायक यांनी कामाला धडाकेबाज सुरुवात केली आहे. प्रशासन गतीमान करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यांची काम करण्याची इच्छापाहून आम्ही पदाधिकारी त्यांना योग्य ते सहकार्य करीत आहोत, असा उल्लेख त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images