Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वैजापुरातील रस्त्यांसाठी १३ कोटींना मंजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

रस्ता देखभाल दुरुस्तींतर्गत वैजापूर तालुक्यातील सात रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १३ कोटी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

निधीला मान्यता दिल्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील हे रस्ते चकचकीत होणार आहेत. वैजापूर तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून, या रस्त्यांचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदन आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले होते. त्यानुसार रस्ते देखभाल दुरुस्ती योजनेंतर्गत डांबरी रस्त्यांचे नूतनीकरण किंवा मजबुतीकरणासह नूतनीकरण करण्यासाठी निधीला मान्यता देण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश रस्ते विभागाचे सचिव एस. एस. घोडके यांनी जारी केले आहेत. त्यानुसार हे रस्ते नाबार्ड, अर्थसंकल्प किंवा केंद्रीय रस्ते निधीमध्ये नसल्याची खात्री करून कामाला जॉब क्रमांक देण्याचे आदेश आहेत.

\Bदुरुस्त करण्यात येणारे रस्ते\B

- राज्य मार्ग २११ सातकुंड उपळा वाकला,तलवाड पारळा जरुळ ते रामा, प्रमुख जिल्हा मार्ग : २३ किलो मीटर (चार कोटी रुपये)

- गंगापूर तालुक्यातील रामा, नागपठाण, गाडेपिंपळगांव माजरा रस्ता : ३० किलो मीटर (एक कोटी २० लाख रुपये)

- बाभुळगाव, लासूर, घोंदलगांव, वडजी ते जिल्हा हद्दीपर्यंत : २६ किलो मीटर (तीन कोटी ३६ लाख रुपये)

- लासूर, शहाजतपूर, जळगाव, पालखेड, चोरवालगाव रस्ता : २८ किलो मीटर (९६ लाख रुपये)

- लोणी, अचलगाव एमडीआर : ६१ किलो मीटर (एक कोटी २८ लाख)

- बाभूळगाव, लासूर, राहेगाव, घोंदलगाव, नालेगाव, शिवूर, वडजी रस्ता : २६ किलो मीटर (एक कोटी ५२ लाख)

- संजरपूरवाडी ते धोंदलगाव : ८९ किलो मीटर (८० लाख रुपये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कृषी संजीवनीत ४५ गावांचा समावेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

शेतकऱ्यालासाठी राज्य शासनामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यात सिल्लोड तालुक्यातील ४५ गावांचा सामावेश या योजनेत करण्यात आला आहे. अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांनी दिली.

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी जवळपास चार हजार कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. यामध्ये राज्य शासनाचा एक हजार २०० कोटी रुपयांचा हिस्सा असणार आहे. येणाऱ्या सहा वर्षांच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्यांने ही योजना राबविण्यात येणार असून भाजपा प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड तालुक्यातील ४५ गावांचा समावेश करण्यात आला आहे, पहिल्या टप्प्यात तालुक्यातील १३ गावांचे आराखडे तयार करण्यात आले असून यामध्ये सिल्लोड तालुक्यातील अजिंठा, बाळापूर, डिग्रस, हळदा, डकला, जळकी वसई, वसई जळकी, खंडाळा, पानस, बोदवड, सराटी, मुखपाठ, पिंपळदरी गावांचा समावेश झालेला आहे. दुसऱ्या टप्प्यात भराडी, धामणी, धानोरा, जळकी घाट, कासोद, पिरोळा, वढोदचाथा, वांगी बुद्रुक, वांगी खुर्द, वांजोळा, अनाड या गावांचा समावेश असल्याचेही मोठे यांनी सांगितले.

पुढील टप्प्यात धोत्रा, गोळेगाव बुद्रुक, गोळेगाव खुर्द, खुल्लोड, पानवडोद बुद्रुक, पानवडोद खुर्द, सारोळा, चांदापूर, लिहा, आसडी, पालोद, भवन, पिंपळगाव पेठ, वरूड बुद्रुक, उंडणगाव, रहिमाबाद, अन्वी आदी गावांचा समावेश करण्यात येणार आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा मध्ये शेतकऱ्यांसाठी शेततळे, प्लास्टिक अस्तरीकरण, विद्युत पंप, पाइप, शेडनेट, पॉलिहाउस, बंदिस्त शेळीपालन, मत्स्य शेती, शेतीवर आधारित उद्योग, नवीन सिमेंट बांध, गांडूळ युनिट, सेंद्रीय निविष्ठा युनिट, सामूहिक शेततळे, नाला खोलीकरण, जलसंधारण, शेतबांध बंदिस्तीकरण, वैयक्तिक विहिरी, पाझर तलाव दुरुस्ती, नवीन नाले बंधारे आदींचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांनी केले.

\Bराज्यातील पाच हजारांवर गावांचा समावेश\B

निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गावांची निवड करताना शासनाने मागील ३० वर्षातील पर्जन्यमान, पीक पद्धती, तापमानातील बदल, मृदा प्रकार यांची तपासणी केली व त्याआधारे गावांची निवड केली आहे, शेतकऱ्यांची उत्पादन शाश्वत होऊन शेतकरी सक्षम व्हावा या दृष्टिकोनातून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राज्यातील १५ जिल्ह्यातील पाच हजार १४२ गावांत व सिल्लोड तालुक्यातील ४५ गावामध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक कर्मचाऱ्याला घरात घुसून मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुलाच्या वाढदिवसाला का बोलावले नाही, म्हणून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याला घरात घुसून दोघांनी मारहाण केली. हा प्रकार रविवारी रात्री साडेदहा वाजता घडला. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी कैलास अमृत काळे (वय ५६, रा. हर्सूल) यांनी तक्रार दाखल केली. काळे हे वाहतूक शाखेत कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. रविवारी रात्री साडेदहा वाजता काळे यांच्या घरात संशयित आरोपी बापू भागवत काळे आणि सुनील साईनाथ औताडे हे दोघे जबरदस्तीने शिरले. मुलाच्या वाढदिवसाचे निमंत्रण का दिले नाही, या कारणावरून त्यांनी घरात घुसून धूडगूस घातला. काळे यांना मारहाण करीत घरातील दरवाजे आणि खिडक्याची तोडफोड करीत नुकसान केले. जाताना काळे यांना ठार मारण्याची; तसेच नोकरी करू न देण्याची धमकी आरोपींनी दिली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जमादार राठोड तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिषदांमधला संवाद हरवला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आजच्या परिषदांमध्ये पेपर वाचयचे अन् परिषद संपली असे होते. हा एककल्ली कार्यक्रम होतो आहे, असे सडेतोड प्रतिपादन गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. जी. गायकर यांनी केले. ते देवगिरी अभियांत्रिकी कॉलेजमध्ये आयोजित कम्प्युटिंग इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी परिषदेत बोलत होते.

डॉ़ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या सहकार्याने दोन दिवशीय परिषदेला गुरुवारी सुरुवात झाली. व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. जी. गायकर, तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. एस. पी. यावलकर, 'बाटू'चे डॉ. एस. बी. देवसारकर, विवेक भोसले यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी डॉ. गायकर म्हणाले, पूर्वी परिषदेमध्ये प्रश्न-उत्तरे होत असायची. संशोधकाने पेपर वाचला, तर त्याला प्रश्न विचारणारे असायचे. संशोधकही अभ्यास करून उत्तरे देत असे. असा संवाद होत असे. सध्या संशोधनासाठी देण्यात येणाऱ्या एकूण अनुदानापैकी जवळपास ८० ते ९० टक्के अनुदान हे परदेशातून तयार साधने आयात करण्यावर खर्च होते. संधोधन हे शिक्षणातून उद्योगाकडे जाणे अपेक्षित असते. त्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली़. यावेळी अमेरिकेतील ख्यातनाम संशोधक अजित अब्राहम म्हणाले, कृत्रिम बुद्धीमत्ता ही मानवाच्या जीवनावर परिणामकारक ठरते आहे. रोबो, डाटा प्रोसेसिंग यातील नवनवे तंत्रज्ञान हा त्याचाच भाग असून जीवनाचा अविभाज्य घटक बनत चालला आहे. आपण रोबो तंत्रज्ञानात नवनवीन बदल करतो आहोत. रोबो फायरमन ही उपयुक्त संकल्पना पुढे आली आहे. यावेळी त्यांनी 'डाटा'चे वेगवेगळे प्रकार, कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवाच्या जीवनावर कशा प्रकारे परिणाम करते आहे, तिचे उपयोग काय याबाबत सविस्तर विवेचन केले. विवेक भोसले म्हणाले, संशोधन संस्कृती ही फक्त परिषदेपुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये रुजवली पाहिजे. कॉलेजांनी इंडस्ट्री ४.०चा अवलंब करणे गरजेचे आहे, असे डॉ. शिऊरकर आपल्या भाषणात म्हणाले.

\B७५ शोधनिबंध सादर होणार

\Bदोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ७५ शोधनिबंध सादर होणार आहेत़ हे शोधनिबंध इमेज प्रोसेसिंग, क्लाउâड कम्प्युटिंग इन मेकॅनिकल अॅँड सिव्हिल इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी इन इंजिनिअरिंग एज्युकेशन, हार्डवेअर डिझाइन अँड कम्युनिकेशन, सॉफटवेअर इंजिनिअरिंग अँड इन्फॉरमेशन सिस्टीम या विषयावर आहेत़ परिषदेसाठी समन्वयक डॉ. गजेंद्र गंधे, डॉ. सत्यवान धोंडगे, डॉ. राजेश औटी, डॉ. प्रकाश तौर, डॉ. संजय कल्याणकर, डॉ. रूपेश रेब्बा, प्रा़ उमेश पाटील, डॉ़ सुनील शिंदे आदी परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भविष्यातील चंद्रवसाहत चितारली..!

$
0
0

म. टा. प्रति‌निधी, औरंगाबाद

शंभर तास खगोल शास्त्र या अनोख्या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी चित्रकला स्पर्धेत चिमुकल्यांनी 'भविष्यातील चंद्र वसाहत' या विषयावर सुंदर चित्रे काढली. पहाटे दुर्बिणीद्वारे आकाशातील तेजस्वी शुक्र ग्रहाची कला, सूर्यमालेतील सर्वात मोठा असलेला गुरू ग्रह, त्याचे चंद्र व सोबत नक्षत्रांची महोत्सवात ओळख करून देण्यात आली. एमजीएमच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय खगोल महासंघाला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे खगोलशास्त्र महासंघाच्या निर्देशानुसार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकला स्पर्धेमध्ये शहरातील सेंट लॉरेन्स माध्यमिक शाळा, लिटल फ्लॉवर, एमजीएम संस्कार, वेणुताई चव्हाण माध्यमिक शाळा, मॉन्टेसरी बालक मंदिर येथील २८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच जैन इंटरनॅशनल स्कूलच्या तिसरी तसेच चौथी वर्गातील ८२ विद्यार्थ्यांनी, शहरातील अनेक नागरिकांनी तारांगणातील शोचा तसेच दुर्बिणीद्वारे थेट सूर्य निरीक्षणचा लाभ घेतला. महोत्सवात दुपारी खगोलशाश्त्रीय प्रश्नमंजुषा घेण्यात आली. सायंकाळी चंद्र सफर घडवून आणली. यात चंद्र पृष्ठभागावरील अनेक विवरे, डोंगर रांगा तसेच वाळवंट दाखवण्यात आले. १३ जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन विज्ञान केंद्र संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जबरी चोरी, दुचाकी चोरी, पाकीटमारी सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात चोऱ्या घरफोड्यांनी धुमाकूळ घातला आहे. विविध पाच घटनांत चोरांनी विद्यार्थ्याच्या मोबाइलसह, प्रवाशाचे पाकीट मारले. तसेच दोन घटनांत दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

\Bपाकिटमार ताब्यात

\Bमुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसर गुन्हेगारांचा अड्डा ठरत आहे. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता बाळासाहेब दिलीप निंबाळकर (वय ३०, रा. अंबड सध्या रा. म्हाडा कॉलनी) हे खिडकीवर तिकीट घेण्यासाठी रांगेमध्ये उभे होते. यावेळी दोन पाकिटमारांनी त्यांचे पाकीट मारले. त्यात रोख पाचशे रुपये, पॅनकार्ड, आधारकार्ड आणि एटीएम कार्ड होते. यावेळी नागरिकांनी त्या दोघांना पकडले. त्यांची नावे काशीनाथ पिंपळे आणि बाबासाहेब डुकळे (रा. मुकुंदवाडी), अशी आहेत. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bविद्यार्थ्याचा मोबाइल पळवला\B

मोबाइलवर पायी बोलत जात असलेल्या अक्षय नवनाथ गायकवाड (वय २४ रा. रचनाकार कॉलनी) या विद्यार्थ्याचा मोबाइल दुचाकीवर आलेल्या तिघांनी पळवला. हा प्रकार बुधवारी सायंकाळी सात वाजता गव्हर्मेंट ऑफ फार्मसी कॉलेजच्या गेटजवळ घडला. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bदोन दुचाकींची चोरी\B

चोरट्यांनी विविध दोन घटनांत दोन दुचाकी चोरून नेल्या. सहा ते नऊ जानेवारी दरम्यान शहानूरवाडी येथील उद्योगविश्व अपार्टमेंटमधून चेतन राजेश खोबरे यांची दुचाकी चोरीस गेली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी रात्री संजयनगर गल्ली क्रमांक ए ४ येथे नवनाथ दामोधर महानोर यांची दुचाकी घरासमोरून चोरून नेली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

\Bरिक्षाची परस्पर विक्री\B

रिक्षाचालकाने रिक्षा विकत घेत तिचे हप्ते न भरता परस्पर विक्री केली. याप्रकरणी आकाश ज्ञानेश्वर भालेराव (वय २६ रा. फुलेनगर) याने तक्रार दाखल केली. त्याने रिक्षाचालक कृष्णा भावराव पाते याला रिक्षा विकली होती. कृष्णा हा रिक्षाचे फायनान्सचे हप्ते भरणार होता. मात्र हप्ते न भरता रिक्षा परस्पर विकल्याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनेला पेटवले; सासुला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कामधंदा करत नाही, आयते खाते' असे टोमणे मारत रॉकेल टाकून पेटवून देत जिवे मारण्याचा प्रयत्न करणारी सासू शबनूरबी जब्बार खान हिला सात वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी शुक्रवारी (११ जानेवारी) ठोठावली.

या प्रकरणी पीडित विवाहिता भोरिबी हरुण शेख (२४, रा. मोहाली आडगाव, ता.औरंगाबाद) हिने फिर्याद दिली होती. तिचे लग्न आरोपी हरुण खान जब्बार खान याच्याशी २००७ मध्ये झाले होते. लग्नानंतर भोरिबी हिला सहा महिने चांगले वागवले, पण नंतर 'तुला कामधंदा येत नाही' असे म्हणत तिचा शारीरिक-मानसिक छळ करण्यात येत होता. याच कारणास्तव मारहाण करून घराबाहेर काढले व उपाशीही ठेवले होते. २३ जानेवारी २०११ रोजी सकाळी दहाच्या सुमारास त्या घरात होत्या, तर तिचा आरोपी पती घराबाहेर गेला होता. त्याचवेळी आरोपी सासू शबनूरबी जब्बार खान (५२) हिचा वाद होऊन 'कामधंदा येत नाही, आयते खाते, थांब तुला जाळूनच टाकते' असे सुनावत सासूने तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. यात ती ३५ टक्के जळाली. त्यानंतर तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी भोरिबी हिने दिलेल्या तक्रारीवरुन भादंवि ३०७, ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ कलमान्वये करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\B... तर दोन महिने आणखी शिक्षा

\Bखटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील ज्ञानेश्वरी नागुला यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपी सासुला भादंवि ३०७ कलमान्वये सात वर्षे सक्तमजुरी व दा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सबळ पुराव्याअभावी कोर्टाने आरोपी पतीला सोडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्तोरस्ती गॅस बॉम्ब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील विविध भागात रस्त्यावरच टपरीवजा हॉटेल थाटण्यात आली आहेत. या ठिकाणी वापरण्यात येणारी गॅस सिंलिडर रस्त्यावरच मांडण्यात येतात. हे धोकादायक असून एखाद्या घटनेत वाहनांचा धक्का लागून सिलिंडर फुटल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. महत्त्वाची बाब म्हणजे याप्रकरणी कारवाई कोणी करायची, हा प्रश्न निर्माण झाला असून सबंधित यंत्रणांनी हात वर केले आहेत.

औरंगाबाद शहरातील विविध रस्त्यावर चहा, नाष्ट्याची अनेक हातगाडीवरील हॉटेल थाटण्यात आलेली दिसून येतात. या हॉटेलवर बनवण्यात येणाऱ्या पदार्थासाठी गॅस शेगडी आणि सिलेंडरचा वापरही अनेक ठिकाणी केलेला दिसून येतो. या हॉटेल परिसरातील नागरीकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या कडेलाच असलेल्या अशा हॉटेलमध्ये गॅस सिलेंडर रस्त्यावर ठेवण्यात येऊन त्याचा वापर सर्रास होत असल्याचे दिसून येते.

\Bअपघाताचा धोका\B

बीड बायपास, वाळूज महानगर, अदालत रोड, जालना रोड या मार्गावर छोट्या वाहनांसोबतच अवजड वाहनांची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर होते. या मार्गावर देखील अशी हॉटेल मोठ्या प्रमाणात आहे. वाहनांचे ब्रेक निकामी होऊन अनेक वेळा अपघात झाल्याचे किंवा दुकान, घरात वाहन शिरल्याचे प्रकार शहरात घडले आहेत. अशा एखाद्या वाहनांचा चुकून अपघात होऊन सिंलिडर असलेल्या हॉटेलवर जाऊन आदळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

\Bकारवाईचे अधिकार कोणाला\B

धोकादायक पद्धतीने गॅस सिलिंडर रस्त्यावर ठेवून वापर करणाऱ्या मंडळीवर कारवाई कोणी करायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेचा अग्निशमन दल, अतिक्रमण विभाग, पुरवठा विभाग आणि पोलिसाने ही आपली जबाबदारी नाही म्हणत हात वर केले आहेत.

मध्यंतरी पोलिसांचा बंदोबस्त कमी असल्याने अतिक्रमण हटाव मोहीम थांबवण्यात आली होती. या संदर्भात नुकताच पोलिसांची पत्रव्यवहार झाला आहे. अतिक्रमण हटाव मोहीम लवकरच सुरू करण्यात येणार असून यामध्ये रोडसाइडच्या हॉटेलवर देखील कारवाई करण्यात येणार आहे.

ए. बी. देशमुख, अतिक्रमण हटाव विभाग प्रमुख, पालिका

अशा हॉटेलवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाची नाही. पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने ही कारवाई करावी, त्यांना लागेल तो बंदोबस्त पोलिसांतर्फे देण्यात येईल.

डॉ. नागनाथ कोडे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शोरूममध्ये धुडगूस; कार पळवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चारचाकी वाहनाच्या शोरूममध्ये धुडगूस घालून पाच जणांनी कार पळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शस्त्राचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. हा प्रकार गुरुवारी दुपारी चिकलठाणा एमआयडीसी येथील सतीश मोटर्समध्ये घडला. या प्रकरणी चार आरोपींना नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले असून कार घेऊन पळालेल्या आरोपीला अंबड येथून अटक करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी सतीश मोटर्सचे सर्व्हिस मॅनेजर अनिल यशवंत पिसे (वय ५२ रा. एन ७, सिडको) यांनी तक्रार दाखल केली. सतीश मोटर्समधून नोव्हेंबर २०१८ मध्ये परमेश्वर जाधव याने एक लाख ३० हजार रुपये भरून कार खरेदी केली हेाती. या कारची एकूण किंमत सहा लाख ८२ हजार रुपये आहे. उर्वरित रक्कम स्पीड गर्व्हनर बसवल्यानंतर देतो, असे म्हणत जाधव यांनी कार नेली होती. गुरुवारी जाधव यांनी स्पीड गर्व्हनर बसवण्यासाठी कार शोरूममध्ये टाकली होती. जाधव हे कार नेण्यासाठी चार अनोळखी तरुणासोबत आले. त्यावेळी पिसे यांनी त्यांना कारचे उर्वरित पेमेंट करून कार घेऊन जा, असे सांगीतले. या कारणामुळे जाधव आणि त्यांच्या सोबतच्या लोकांनी शिवीगाळ करीत तोडफोड सुरू केली. कर्मचाऱ्यांना चाकू आणि तलवारीचा धाक दाखवला. या घटनेमुळे शोरूममध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी परमेश्वर जाधव कार घेऊन पळून गेला. तेथील कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत नागरिकांनी जाधवसोबतच्या चौघांना चांगलाच चोप दिला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून धुडगूस घालणारे राजू नामदेव निकाळजे, सुनील सुभाष वेलदोडे, सुशील शको ढोकळ आणि दिनेश लक्ष्मण जाधव यांना ताब्यात घेतले. परमेश्वर जाधव याला शोध घेऊन अंबड येथून अटक करण्यात आली.

\Bपोलिस आयुक्तांचे रौद्र रूप\B

दरम्यान, शोरूममध्ये सुरू असलेला हा धुडगूस वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कानावर गेला. या पाच जणांनी तेथे गेलेल्या पोलिसांसोबत देखील शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली होती. ही बाब वरिष्ठांनी गांभीर्याने घेतली. स्वत: पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी घटनेची चौकशी करीत रौद्र रूप धारण करीत या धुडगूस घालणाऱ्या मंडळींचा चांगलाच समाचार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिस आयुक्तांचे हे रूप पाहून पेालिस दलातील इतर अधिकारी देखील थक्क झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... त्यानंतरच ठाकरे स्मारकाची निविदा काढा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय निधी मंजुरीच्या आधीन राहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाची निविदा काढा असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना दिले आहेत. महापौर नंदकुमार घोडेले यांनी ही माहिती दिली.

एमजीएमच्या परिसरात महापालिकेच्या मालकीच्या जागेत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. स्मारकासाठी साठ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. साठ कोटींचा निधी शासनाकडून मिळावा यासाठी महापौर घोडेले यांच्यासह सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, सभागृह नेता विकास जैन यांनी शुक्रवारी मुंबईत जावून एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी दिला जाईल, त्याची प्रक्रिया लगेचच सुरू केली जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे महापौर म्हणाले. निधी मंजुरीच्या आधीन राहून स्मारकाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू करा, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याशीही संपर्क साधला व शासनाच्या निधी मंजुरीच्या आधीन राहून निविदा काढा, असे आदेश दिले असा उल्लेख महापौरांनी केला.

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी फोनवरून दिलेल्या आदेशानुसार आयुक्तांनी निविदा काढली तर दोन महिन्यात स्मारकाचे काम सुरू होईल, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोजंदारी कर्मचारी करणार अन्नत्याग आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्याच्या मागणीसाठी रोजंदारीवरील कर्मचारी १४ जानेवारीपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. ही माहिती कामगार शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात यांनी दिली आहे.

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेत २७ वर्षांपासून २०४ कर्मचारी रोजंदारीवर काम करतात. त्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्याबद्दल १९ जुलै १९९९ मध्ये प्रशासकीय प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच एकत्रित नऊ प्रस्ताव करण्यात आले. महापालिकेतील रिक्त जागांवर या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा प्रस्ताव ११ जुलै २०१८ रोजी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला, परंतु अद्याप त्याची कार्यवाही करण्यात आली नाही. महापालिकेच्या अस्थापनेवर वर्ग ३ आणि वर्ग ४ ची किमान ७०० पदे रिक्त आहेत. या जागांवर रोजंदारी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा परिपूर्ण प्रस्ताव तयार असून त्याबद्दल लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे. वारंवार पाठपुरावा करू देखील प्रस्तावाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे १४ जानेवारीपासून रोजंदारीवरील कर्मचारी अन्नत्याग आंदोलन करतील असे खरात यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑटो रिक्षांवर धाड, पाच लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ऑटो रिक्षांवर धाड टाकून पाच लाख ६७ हजार १५० रुपयांचा गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू जप्त केली. औरंगाबाद-जळगाव रस्त्यावरील एका गॅसच्या गोदामाजवळ ही कारवाई करण्यात आली. ऑटो रिक्षा क्रमांक एमएच २० क्यू ५४७०, एमएच २० डब्ल्यू ४६८२, एमएच २० इएस ०३३४ या रिक्षांमधून तंबाखू, गुटखा आणि पान मसालाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यावर सापळा रचून अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. अब्दुल खालीद युनुस देशमुख आणि अन्य तीन जणांच्या विरोधात सिल्लोड येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी विशाल नेहूल, लोखंडे, ढोले, भुमे, घुगे यांच्यासह पोलीस नाईक शेळके यांनी केली. अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती एस.टी. जाधव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्याकडून रिक्षा चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भानुदासनगर भागातून रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसात जेरबंद केले आहे. तौफिकखान उबेदखान (रा. उस्मानपुरा) असे त्याचे नाव आहे. तो रिक्षाला फायनान्स करणाऱ्या कंपनीचा कर्मचारी निघाला असून रिक्षा जप्त करण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

भानुदासनगर भागातील गल्ली क्रमांक पाच येथून नऊ जानेवारी रोजी अॅटोरिक्षा चोरीला गेली होती. ही रिक्षा चोरणारा संशयित आरोपी तौफिकखान हा उस्मानपुरा येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने रिक्षा चोरीची कबुली देत ती पळशी रोड, कान्हा पार्क येथे उभी केल्याची माहिती दिली. तौफिक हा सेव्हन हिल येथील राजेंद्र फायनान्स कंपनीत कर्मचारी असून कंपनीमालक राजेंद्र सेठ यांच्या सांगण्यावरून ही रिक्षा चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी रिक्षा जप्त करत तौफीकखानला जवाहरनगर पेालिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय राहूल सुर्यतळ, जमादार संतोष सोनवणे, बापुराव बावीस्कर, लालखान पठाण, नंदलाल चव्हाण, योगेश गुप्ता यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडी प्रकरणात पाच जणांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिल्पानगर, नागेश्वरवाडी परिसरातील घरफोडी प्रकरणांमध्ये दाखल वेगवेगळ्या गुन्ह्यांतील आरोपी सतपालसिंग उर्फâ फौजी ओमपालसिंग चौहान, परमिंदरसिग रमेशसिंग तंवर, सोमविंदरसिंग मुलसिंग तंवर, सूर्यकांत उर्फâ सनी गोपीनाथ जाधव व दीपक चोखाजी दळवी यांना अटक करून शुक्रवारी (११ जानेवारी) कोर्टात हजर केले असता, त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी दिले. दोन्ही प्रकरणांत पावणे सहा लाखांची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

यातील एका प्रकरणात महेश घनश्याम अग्रवाल (रा. शिल्पानगर) यांनी फिर्याद दिली होती. ते घराबाहेर गेले असता, आंतरराज्य टोळीने घराचे कुलूप तोडून पाच लाख १४ हजार ६०० रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरला. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन, आंतरराज्य टोळीतील सतपालसिंग उर्फâ फौजी ओमपालसिंग चौहान (३८, रा. हरियणा), परमिंदरसिग रमेशसिंग तंवर (२५, रा. हरियाणा) व सोमविंदरसिंग मुलसिंग तंवर (३८, रा. हरियाणा) या तिघांना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर केले असता, दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करणे बाकी आहे. त्याचवेळी आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकार पक्षाने केली. कोर्टाने तिघांना १८ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दुसऱ्या प्रकरणात गजानन आष्टूरकर (रा. नागेश्वरवाडी) यांनी फिर्याद दिली होती. त्यांच्या घरातून ४८ हजारांचा सोन्याचा ऐवज व पिग्मीचे रोख आठ हजार रुपये, असा ५६ हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी झाल्याचा गुन्हा क्रांतीचौक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी सूर्यकांत उर्फâ सनी गोपीनाथ जाधव (२२, रा. क्रांतीनगर) व दीपक चोखाजी दळवी (३२, रा. सातारा) यांना अटक करून कोर्टात हजर केले असता, त्यांना १४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिषदांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधक विद्यार्थी, प्राध्यापकांना व्यासपीठ मिळते. येणाऱ्या काळात सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती वाढीस लागण्यास अशा परिषदांचा निश्चितच उपयोग होईल,' असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र - कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी केले.

देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कम्प्युटिंग इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी' या चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचा समारोप शुक्रवारी झाला. यावेळी डॉ. तेजनकर बोलत होते. कार्यक्रमाला कॅनडा येथील डॉ. वीरेंद्रकुमार भावसार, स्प्रिंजर नेटरचे सिनिअर एडिटर अनिंद बोस, डॉ. ए. बी. नांदगावकर, डॉ. एस. एल. नालबलवार, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे शेख सलीम शेख अहेमद, त्र्यंबक पाथ्रीकर, विश्वास येळीकर यांची विशेष उपस्थिती होती. महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिउरकर यांचेही यावेळी भाषण झाले. 'विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढावी हा या परिषदेच्या आयोजनामागचा हेतू होता. प्रत्येक विभागासाठी मान्यताप्राप्त संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील आहे,' असा उल्लेख देखील त्यांनी केला. परिषदेचे समन्वयक डॉ. गजेंद्र गंधे व डॉ. ब्रीजेश अय्यर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय कल्याणकर, डॉ. सत्यवान धोंडगे, प्रा. प्रकाश तौर, डॉ. राजेश औटी, प्रा. उमेश पाटील, डॉ. सुनील शिंदे, प्रा. रूपेश रेब्बा यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


३६० कार्यालयांना कारणे दाखवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

येत्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विविध पथके व मतदान अधिकारी नियुक्त करण्यासाठी सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मागवण्यात आलेली माहिती वेळेत सादर न केल्याने तालुक्यातील ३६० कार्यालयांना उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

निवडणूक कामात दिरंगाई करणाऱ्या कार्यालय प्रमुखांना या नोटीसा बजावण्यात आल्या असून २४ तासात खुलासा करयाचे आदेश देण्यात आले आहेत. या नोटीसकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून, विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन स्वरुपात भरून प्रमाणपत्राची प्रत सादर करण्याच्या अनेकदा सूचना देण्यात आल्या होत्या. कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन पाठवण्याबाबत कार्यशाळाही घेण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही संबंधित कार्यालय प्रमुखांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नोटीस बजावण्यात आलेल्यांमध्ये प्रामुख्याने महापालिका वार्ड कार्यालय, वस्तू व सेवा कर कार्यालय औरंगाबाद, प्रादेशिक परिवहन कार्यालय, वन्य रक्षक कार्य आयोजन विभाग, प्राचार्य शासकीय कला महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शिक्षण अधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद औरंगाबाद, शासकीय अध्यापक महाविद्यालय, शासकीय विद्यानिकेतन, महापालिका शाळा, जिल्हा परिषद मल्टिपर्पस हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदींचा समावेश आहे.

\Bकार्यालयांनी दिली अपूर्ण माहिती

\Bविविध शासकीय कार्यालये, महाविद्यालये व शाळांना कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची शंभर टक्के माहिती दिलेल्या सूचनेप्रमाणे ऑनलाइन भरावयाची होती व संपूर्ण भरलेल्या माहितीची प्रत निवडणूक विभाग तहसील येथे सादर करणे बंधनकारक होते. मात्र, यातील अनेक कार्यालयांनी माहिती पूर्ण भरली नाही. राष्ट्रीय कार्यात हेतुपुरस्सरपणे टाळाटाळ व दिरंगाई केल्याने अधिनियम १९५० चे कलम २९ नुसार कार्यवाही का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रेनेज लाइन फुटली, नारळीबाग भागात दुर्गंधीचे साम्राज्य

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

ड्रेनेज लाइन फुटल्यामुळे वॉर्ड क्रमांक ५२ मधील नारळीबाग, संतोषीनगर, नूर कॉलनी या भागात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जीर्ण झालेली ड्रेनेज लाइन तातडीने बदलण्यात यावी, अशी मागणी या भागातील शिवसेना शाखेतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांना निवेदन देण्यात आले.

नारळीबाग, संतोषीनगर, नूर कॉलनी या भागात ३० वर्षांपूर्वी ड्रेनेज लाइन टाकण्यात आली आहे. त्यावेळी या भागाची लोकसंख्या सुमारे एक हजार होती. आता लोकसंख्या दहापट वाढली आहे. त्यामुळे ड्रेनेजलाइन कालबाह्य झाली आहे, शिवाय ती जागोजागी फुटल्यामुळे रस्त्यांवर घाण पाणी वाहत आहे. त्यामुळे नागरिक आजारी पडण्याचा धोका वाढला आहे. जुनी झालेली ड्रेनेजलाइन तातडीने बदलण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेनेचे पदाधिकारी सुगंधकुमार गडवे, कृष्णा भोसले, बंटी जैस्वाल यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांची झाली नियुक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) क्ष-किरण विभागात डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी व डॉ. पंकज अहिरे यांची सहयोगी प्राध्यापक म्हणून, तर मनोविकृती विभागामध्ये डॉ. संजीव सावजी यांची प्राध्यापक म्हणून शुक्रवारी (११ जानेवारी) कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. 'मनोविकृती'मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी, तर 'क्ष-किरण'मधील पदव्युत्तर जागा वाचवण्यासाठी या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. औषधवैद्यकशास्त्र विभागासाठीही अशा पद्धतीने नियुक्त्या होणार असून, इच्छुकांनी संस्थेशी संपर्क साधावा, असेही आवाहन घाटीचे उपअधिष्ठाता (रुग्णालय) डॉ. शिवाजी सुक्रे यांनी घाटीच्या वतीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय विद्यार्थिंनींविरूद्ध कारवाई न करण्याचे आदेश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

मुंबईच्या सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिंनींविरूद्ध जात वैधता प्रमाणपत्राअभावी कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. मन्नेरवारलू जातीच्या अनुसूचित जमातीच्या वैधता प्रमाणपत्रासंबंधी दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे व न्या. एस. एम. गव्हाणे यांनी वैधता समितीस नोटीस बाजावून महाविद्यालयास विद्यार्थीनीविरूद्ध कारवाई न करण्याचे निर्देशित केले आहे.

राणी विठ्ठल पुंजरवाड या सीईटी परीक्षेत राज्यात अनुसूचित जमाती संवर्गातून प्रथम आल्या होत्या. त्यांना मुंबईच्या सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयात आरक्षणातून प्रवेश मिळाला आहे. याचिकाकर्त्या पुंजरवाड यांचे जात प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांनी निर्गमित केले आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती औरंगाबाद यांनी त्यांचा जातीचा दावा अवैध करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयास खंडपीठात आव्हान दिले आहे. खंडपीठात युक्तिवाद करताना अॅड. थोरात यांनी याचिकाकर्तीच्या रक्ताच्या नात्यात वैधता प्रमाणपत्र असूनही दावा अवैध ठरविला जात आहे. वडील, सख्खी बहीण, सख्खे काका यांच्याकडे अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र आहे. गृहचौकशी अहवाल दक्षता पथकाने चुकीचे व जे अर्जदाराचे नातेवाईक नाहीत, त्यांचे नाव नातेवाईक दाखविण्यात आले आहे. नातेवाईक नसलेल्याचे शालेय अभिलेख हे मनुरवार असून मन्नेरवारलू नाहीत. अर्जदाराची वंशावळ बघता पथकाने चुकीची माहिती समितीसमोर सादर केल्याचे याचिकाकर्त्याचे वकील चंद्रकांत थोरात यांनी निदर्शनास आणून दिले. थोरात यांना राहुल गारूळे यांनी सहाय्य केले. शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील मंजुषा देशपांडे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूरमधील आठ इंग्रजी शाळांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

'सीबीएसई' बोर्डाची मान्यता नसताना विद्यार्थ्यांकडून आर्थिक लूट होत असल्याची तक्रार आल्यामुळे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने वैजापूर येथील नामांकित इंग्रजी शाळांची चौकशी केली असून आठ शाळांना कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. 'सीबीएसई' बोर्डाला संलग्न नसताना तशी जाहिरात करून विद्यार्थ्यांचे प्रवेश कोणत्या आधारावर केले याचा खुलासा या शाळांना करावा लागणार आहे.

वैजापूर शहरात इंग्रजी माध्यमांच्या अनेक शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थी व पालकांना 'सीबीएसई' अभ्यासक्रमाच्या नावावर संभ्रमित केले जात आहे. पालकांकडून अव्वाच्या सव्वा फी वसूल करून सर्वसाधारण अभ्यासक्रम शिकवला जात आहेत. याबाबत भाजपाचे सुधाकर डगळे यांनी वरिष्ठस्तरावर तक्रार केली होती. त्यानुसार गटशिक्षण अधिकारी आर. जी. दिवेकर यांच्या आदेशाने शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांमार्फत देवगिरी ग्लोबल अकॅडमी, छत्रपती इंटरनॅशनल, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल, फादर जॅकवेअर मेमोरियल इंग्लिश स्कूल, होली एंजेल्स इंग्लिश स्कूल, आरोहण अकॅडमी, सेंट मोनिका प्रायमरी इंग्लिश स्कूल व सेंट मोनिका पब्लिक स्कूल या शाळांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये फादर जॅकवेअर स्कूल ही शाळा अद्याप सुरू झाली नाही. राजमाता जिजाऊ व सेंट मोनिका प्रायमरी या शाळा राज्य शासनाने प्रमाणित केलेले अभ्यासक्रम राबवतात. आरोहण अकॅडमीला 'सीबीएसई'ची संलग्नता आहे. पण पाचवीपर्यंत बालभारतीचा अभ्यासक्रम शिकवला जात नाही. होली एंजेल्स व सेंट मोनिका पब्लिक स्कूलला प्रस्तावित 'सीबीएसई' स्कूल म्हणून मान्यता आहे. देवगिरी ग्लोबल व छत्रपती इंटरनॅशनल या शाळांना शासनाची मान्यता आहे. शासनाने प्रमाणित केलेले अभ्यासक्रम राबवणे आवश्यक असतांना खासगी प्रकाशनाची पुस्तके वापरत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. या सर्व शाळांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images