Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन फेâटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडकोतील आरोग्य कुटुंब प्रशिक्षण केंâद्रातील डॉक्टर महिलेचा मानसिक छळ केल्याच्या प्रकरणात प्रशासकीय अधिकारी रत्नकला मोहिते यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. शिंदे यांनी फेटाळ‌ला.

या केंâद्रातील ४९ वर्षांच्या महिला डॉक्टरने तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, संबंधित महिला डॉक्टर साथरोग शास्त्रज्ञ या पदावर २०१६पासून कार्यरत आहे. तक्रारदार महिलेने पदाचा कार्यभार घेतल्यानंतर प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. गोविंद चौधरी यांनी संबंधित महिलेस रुजू झाल्यापासून त्रास देण्यास सुरुवात केली. आवश्यक त्या सुविधांपासून वंचित ठेवले, कार्यालयात दालन देण्यास टाळाटाळ केली. संबंधित महिला डॉक्टरने वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर दालन दिले. दालन दिल्यानंतर त्या दालनामध्ये कॅâमेरा लावण्यात आला आणि त्याचे सर्व्हर डॉ. चौधरी यांच्या दालनामध्ये ठेवण्यात आले. त्याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, महिला डॉक्टरला अपमानास्पद वागणूक दिली. त्याच कार्यालयातीन प्रशासकीय अधिकारी रत्नकला मोहिते, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनीदेखील विभागीय चौकशीच्या नावाखाली आपल्या दालनात बोलवून 'दहा वर्षे नोकरी रहिली आहे, नोकरी कशी करता पाहतो,' अशी धमकी देत जातीवाचक शब्द वापरून मानसिक त्रास दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिस ठाण्यात डॉ. गोविंद चौधरी, प्रशासकीय अधिकारी रत्नकला मोहिते व डॉ. स्वप्नील लुळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणात रत्नकला मोहिते यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता, आरोपीला जामीन मंजूर केल्यास आरोपी ही महिला डॉक्टरच्या वेतन व अन्य कागदपत्रांमध्ये फेरफार करू शकते; तसेच गुन्हा प्राथमिक अवस्थेत असून, आरोपीला अटक केल्याशिवाय तपास पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळ‌े आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी विनंती सहायक सरकारी वकील कैलास पवार यांनी केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केज तालुक्यात बसवर दगडफेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे या मागणीसाठी साळेगाव येथील संजय ताकतोडे या युवकाने बीडजवळील बिंदुसरा धरणात मंगळवारी जलसमाधी घेतली होती. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी बस फोडल्याची घटना केज तालुक्यात घडली. त्यात गाडीच्या काचा फुटल्या असून एक प्रवाशी किरकोळ जखमी झाला.

जय लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत ताकतोडे यांचे धाकटे बंधू संजय ताकतोडे यांनी जलसमाधी घेतली. मातंग समाजाला अनुसूचित जातीच्या प्रवर्गात लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळावे. या मागणीसाठी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बीडजवळील पालीच्या बिंदुसरा प्रकल्पात जलसमाधी घेतली.

संजय ताकतोडे यांच्या मृत्यूस सरकार जबाबदार असल्याची भावना झाल्याने एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. बुधवारी दुपारी ४ वाजता केजकडून कळंबकडे जात असलेल्या कळंब आगारच्या केज-कळंब (एमएच २०डी ९५२१)या बसवर साळेगाव येथे मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात युवकांनी दगडफेक केली.

फोटो ओळी..

साळेगाव येथील संजय ताकतोडे या युवकाने जलसमाधी घेतली. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी केज तालुक्यात बस फोडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्थानकावर मोबाइल चोरणाऱ्यास सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे स्थानकारवर तिकिट काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या एकाचा मोबाइल चोरणारा आरोपी अब्दुल सईद अब्दुल समद याला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. हुसेन यांनी ठोठावली.

या प्रकरणी मोहम्मद इरफान मोहम्मद जमील यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीचा मित्र जान मोहम्मद खान याला परतूर येथे जायचे होते. त्यासाठी ८ सप्टेंबर २००८ रोजी दोघे रेल्वेस्थानकारवर आले होते. फिर्यादी हा तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे असताना आरोपी अब्दुल सईद अब्दुल समद (४२, रा. अबरार कॉलनी, सिल्कमिल कॉलनी) याने फिर्यादीच्या कंबरेच्या बेल्टला लावलेला मोबाइल चोरला. ही बाब लक्षात येताच फिर्यादीसह इतर लोकांनी आरोपीला पकडून लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले व अंगझडतीत आरोपीकडे मोबाईल सापडला. प्रकरणात लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठाविली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस नाईक सोपान धुमाळ यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅड. शेळके यांना पुरस्कार प्रदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य शासनाच्या मराठी विभागामार्फत मराठी भाषा गौरव दिनी अॅड. डी. आर. शेळके यांना त्यांच्या 'समाज परिवर्तनाच्या दिशेने' या साहित्यकृतीस स्व. यशवंतराव चव्हाण वाडमय पुरस्कार २०१७ अंतर्गत भाई माधवराव बागल यांच्या नावे पुरस्कार (रक्कम १ लाख) प्रदान करण्यात आला.

अॅड. शेळके यांच्या समवेत राज्यातील ३४ साहित्यिकांना उत्कृष्ठ वाडमय निर्मितीबाबत पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा मुंबई येथील यशवंतराव प्रतिष्ठान सभागृहात झाला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या 'झाकाळलेल्या वाटा' या आत्मचरित्रासही लक्ष्मीबाई टिळक यांच्या नावे पुरस्कार (एक लाख) देण्यात आला. या दोन्ही साहित्यकृती औरंगाबाद येथील स्वरुप प्रकाशनाची आहेत. मराठवाड्यातील अन्य लेखक मधुकर धर्मापुरीकर, प्रा. यशपाल भिंगे, अमृत तेलंग, अॅड. निशा शिवूरकर यांनाही त्यांच्या विविध साहित्यकृतीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, मराठी विभागाचे सचिव भूषण गगराणी, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष दिलीप दोंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या समारंभापूर्वी राजभवनात राज्यपाल डॉ. विद्यासागर राव यांनी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना चहापानासाठी आमंत्रित केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी अधिकाऱ्यांचा कंपनीला गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कंपनीतून तांत्रिक माहिती चोरल्यानंतर सुनियोजित पद्धतीने राजीनामे देत तिघांनी स्वत:ची कंपनी स्थापन केली. जुन्या कंपनीतून चोरलेल्या माहितीचा वापर करीत यंत्रे बनवत त्याची विक्री देखील केली. रेल्वे स्टेशन एमआयडीसी येथील ग्राइंड मास्टर कंपनीमध्ये जून २०१५ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत हा प्रकार घडला. या तिन्ही संशयित आरोपीविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ग्राइंड मास्टर कंपनीचे अधिकारी रवींद्र प्रल्हाद गोखले (वय ५०, रा. दत्तनगर, बीड बायपास परिसर) यांनी तक्रार दाखल केली. रेल्वे स्टेशन एमआयडीसीमध्ये मिलिंद केळकर यांची ग्राइंड मास्टर मशिन्स प्रा. ली. नावाने कंपनी आहे. या कंपनीमध्ये डिबरिंग, ग्राइंडिंग, पॉलिशिंग आणि मायक्रोफिनिशिंगसाठी खास मशिनरी तयार केली जाते. या कंपनीमध्ये संशयित आरोपी जयेश दुडकेकर, देवेंद्रकुमार जैन आणि अरुण तिडके विविध पदावर कार्यरत होते. या तिघांनी ठराविक कालावधीनंतर नियोजितपणे आपले राजीनामे देत नोकरी सोडली. यानंतर या तिघांनी वाळूज एमआयडीसीमध्ये ट्रायसिंग ऍटोमेशन नावाने कंपनी स्थापन केली. नोकरीवर असतानाच्या काळात यांनी गोपनीयतेचा भंग करीत तांत्रिक माहिती चोरली. या माहितीचा वापर करीत एक सनराईज ऑटोमेशन या कंपनीचे मालक शेखर गुडेकर यांच्या मदतीने हुबेहुब ग्राइंड मास्टर कंपनीच्या डिझाइनची मशिनरी तयार करून ग्राइंड मास्टरच्याच ग्राहक असलेल्या पश्चिम बंगाल येथील कंपनीला एक कोटी ३२ लाख ९७ हजार रुपयात विक्री केली. हा प्रकार ग्राइंड मास्टर कंपनीच्या लक्षात आला. याप्रकरणी गोखले यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी जयेश अंबादास दुडकेकर, देवेंद्र रमेशचंद्र जैन आणि अरुण श्रीराम तिडके (सर्व रा. औरंगाबाद) यांच्याविरुद्ध फसवणूक, अपहार आणि कॉपीराइट अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयभवानीनगरात आग

$
0
0

औरंगाबाद: जयभवानीनगर गल्ली क्रमांक १५मधील तिर्थे यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागली. हा प्रकार मंगळवारी रात्री साडे आठ वाजता घडला. या आगीत घरगुती साहित्य, कपडे, दागिने, रोख रक्कम आदी ऐवज जळाल्याने मोठे नुकसान झाले. घराबाहेरील वीज मीटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. घराच्या पत्र्यावरील लाकडी बल्ल्या आणि कचऱ्यामुळे ती भडकली. अग्निशमन दलाने धाव घेत आग आटोक्यात आणली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपादित जमीन दाखविली दुसऱ्याच्याच नावावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

समृद्धी महामार्गासाठी संपादित झालेले क्षेत्र गंगापूर भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने परस्पर दुसऱ्याच्या नावावर केल्याची तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी व वैजापूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे डोणगाव (ता. गंगापूर) येथील शेतकरी लक्ष्मण शिवलाल आहेर यांनी तक्रार केली आहे.

आहेर यांची डोणगाव शिवारात गट क्रमांक २५० व २५१मध्ये जमीन आहे. या जमिनीतून नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग जातो. आहेर यांनी जमीन संपादन व मोबदला स्वीकारण्यासाठी संमती लिहून दिली. त्याआधारे त्यांच्या जमिनीची संयुक्त मोजणी करण्यात आली. या मोजणीनुसार आहेर यांचे संपादीत क्षेत्र बरोबर दाखविण्यात आले. आठ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांना संपादनाबाबत नोटीस मिळाली. या नोटीसमध्ये मात्र त्यांचे संपादीत क्षेत्र कमी दाखविण्यात आले. त्यावर त्यांनी १८ ऑगस्ट रोजी भूसंपादन अधिकाऱ्याकडे लेखी आक्षेप नोंदवून क्षेत्र कमी नोंदविल्याचे सांगितले. शेतातून पाइप लाइन गेली असून, त्याची नोंद घेण्याची विनंती केली; तसेच चुकीची नोंद झाल्याने भूसंपादनाचे पैसे देऊ नयेत, असा आक्षेप घेतला, परंतु अधिकाऱ्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले.

गंगापूर भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून खोटी मोजणी, खोटे पंचनामे केले. आहेर यांच्या नावावरील जमीन लक्ष्मण मारोती नवले व लक्ष्मीबाई आसाराम नवले यांच्या नावावर लावली. खोटा व बनावट अहवाल सादर केला. त्यामुळे माझे मानसिक संतुलन बिघडले असून, आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी लक्ष्मण आहेर यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेविका पुत्रांसह तिघांचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कारमधून कचरा टाकण्यास विरोध केला म्हणून महापालिकेच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला दांड्याने मारहाण करून जखमी केल्याच्या प्रकरणात विशाल रामदास गायके, वैभव रामदास गायके व गणेश भुजंगराव काळे या आरोपींचा नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. देशपांडे यांनी बुधवारी (६ मार्च) फेटाळला. या आरोपींमध्ये नगरसेविका मीना गायके यांच्या दोन मुलांचा समावेश आहे.

या प्रकरणी पालिका कर्मचारी विजय सांडू पाटील (वय ३९, रा. शिवनेरी कॉलनी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १४ मे २०१८ रोजी ते पटियाला बँकेजवळ कचरा टाकणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी उभे होते. त्यावेळी तिथे आलेल्या एका कारमधून खाली उतरून एकजण कचरा टाकत असता, त्याला पाटील यांनी विरोध केला. त्यावेळी त्याच व्यक्तीने फोन केल्याने संशयित आरोपी विशाल रामदास गायके (वय २७) व वैभव रामदास गायके (वय २३) हे तिथे आले आणि 'या ठिकाणी कचरा टाकणार, काय करायचे ते करा' असे ते म्हणाले. त्यावर पाटील यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, या दोघांसह संशयित आरोपी गणेश भुजंगराव काळे (वय २३) याने त्यांना दांड्याने मारहाण करीत गंभीर जखमी केले. या मारहाणीत तीन ते चार टाके पडल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तिघांनी सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्यानंतर तिन्ही संशयित आरोपी बुधवारी पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले व आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती पोलिसांकडून करण्यात आली.

\Bगुन्हा घडल्यापासून फरार

\Bन्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर संशयित आरोपींनी नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, आरोपी व फिर्यादी हे जवळजवळ राहात असल्याने आरोपी पुन्हा गुन्हा करू शकतात, फिर्यादीला मारहाण करू शकतात व पुरावे नष्ट करू शकतात. तसेच तपास प्राथमिक अवस्थेत असून, आरोपी हे राजकीयदृष्ट्या प्रबळ असल्याने दबाव आणू शकतात. त्याचवेळी आरोपी हे गुन्हा घडल्यापासून फरार होते. त्यामुळे आरोपींना नियमित जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने तिघांचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एक लाखाचा गुटखा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिसारवाडी परिसरात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या आरोपीला सिडको गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून एक लाख रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिसारवाडी गल्ली क्रमांक दहा येथे एका घरात बासीत अन्सारी हा दुकानदार गोळ्या बिस्किट, चॉकलेट विक्रीच्या नावाखाली गुटखा विकत असल्याची माहिती खबऱ्याने पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांना दिली होती. या माहितीनुसार पथकाने अन्सारी याच्या घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना त्याच्या घरात हिरा, गोवा, राजनिवास पानमसाला; तसेच इतर तंबाखुजन्य पदार्थाचा एक लाख रुपयाचा साठा आढळून आला. आरोपी अन्सारीला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त राहुल खाडे, एसीपी गुणाजी सावंत, पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भरत पाचोळे, राजेश बनकर, प्रकाश डोंगरे, स्वप्नील रत्नपारखी, सुरेश भिसे, विजय भानुसे, किशोर गाढे तसेच अन्न आणि औषधी प्रशासनाच्या अधिकारी श्रीमती सु. त्रि. जाधवर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबाद शेवटून दुसरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात ऐतिहासिक औरंगाबादचा राज्यातील ४३ शहरांमधून शेवटून दुसरा क्रमांक आला आहे, तर देशपातळीवर २२० असे रँकिंग झाले आहे.

केंद्र सरकारने स्वच्छ सर्वेक्षणाच्या अंतर्गत देशपातळीवर ४२३ शहरांचे सर्वेक्षण केले. त्याचा निकाल बुधवारी दिल्लीत जाहीर करण्यात आला. त्यानुसार देशपातळीवर औरंगाबादचा क्रमांक २२०, तर राज्यातील ४३ शहरांमधून औरंगाबादचा क्रमांक ४२वा आला. २०१७मध्ये झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबादचा क्रमांक २९९, तर २०१८मध्ये झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात १२६ वा क्रमांक होता. पहिल्या शंभर शहरात स्वच्छ रँकिंगमध्ये लातूरला घनकचरा व्यवस्थापनात केलेल्या कामासाठी स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देण्यात आला. अंबाजोगाईला स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला. पन्नास हजार ते एक लाख लोकसंख्येच्या शहरांसाठी हा पुरस्कार दिला जातो. परळी आणि वैजापूरला कचरा मुक्त शहर म्हणून गौरविण्यात आले असून, या शहरांना 'थ्री स्टार दर्जा' देण्यात आला आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने देशातील ४२३ शहरांची रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या १०० शहरांत महाराष्ट्रातील २४ शहरांचा समावेश आहे. या शहरामध्ये नवी मुंबई (७), कोल्हापूर (१६), मीरा-भाईंदर (२७), चंद्रपूर (२९), वर्धा (३४), वसई-विरार (३६), पुणे (३७), लातूर (३८), सातारा (४५), पिंपरी-चिंचवड(५२), उदगीर (५३), सेालापूर (५४), बार्शी (५५), ठाणे (५७), नागपूर (५८), नांदेड-वाघाळा (६०), नाशिक (६७), अमरावती (७४), जळगाव (७६), कल्याण-डोबिंवली (७७), पनवेल (८६), अचलपूर (८९),बीड (९४) व यवतमाळ (९६) या शहरांचा समावेश आहे.

-

मटा भूमिका

-

दिरंगाईचा फटका

-

स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबादचे रँकिंग कमालीचे घसरले. त्याला महापालिकेची दिरंगाई कारणीभूत ठरली. कचराकोंडी फोडण्यासाठी शासनाने ९१ कोटींच्या डीपीआरला मंजुरी दिली. निधी उपलब्ध करून दिला. कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी संनियंत्रण समितीने शहराच्या चार दिशांना चार जागा निश्चित करून दिल्या. त्यामुळे कचराकोंडी फोडण्याचे काम युद्धपातळीवर करणे पालिका प्रशासनाच्या हाती होते, पण प्रत्येक कामात दिरंगाई झाली. कंपोस्ट पिटमध्ये काही अधिकाऱ्यांनी हात ओले करून घेतले. संनियंत्रण समितीने ठरवलेल्या चार जागांपैकी एकाच जागेवर प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम हाती घेतले. ते देखील धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. अन्य तीन जागी तर कामाची प्रतीक्षाच आहे. स्वच्छतेच्या कामात घसरलेल्या रँकिंगमधून पालिकेच्या प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी बोध घ्यावा. 'इंटरेस्ट' बाजूला ठेवून त्यांनी काम केले नाही, तर पुढील वर्षी शहराचा आणखी कचरा होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन लाखांची फसवणूक; दुसऱ्यांदा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कंपनी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याचा खोटा ई-मेल तयार करुन त्याच कर्मचाऱ्याने ई-मेलवरुन स्टेशनरी साहित्याची मागणी केल्याचे भासवून कंपनीला दोन लाख ८६ हजार ११६ रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणात आरोपी कांतीलाल लक्ष्मण शिंदे याने दुसऱ्यांदा दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी फेटाळला.

याप्रकरणी महिंद्रा रुरल्स हाउसिंग फायनान्स कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक प्रमोद मनोहर लांडगे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आरोपी कांतीलाल लक्ष्मण शिंदे (३६, रा. अशोकनगर, मसनतपूर, एमआयडीसी, चिकलठाणा) याची नेमणूक कंपनीच्या स्टेशनरी साहित्य खरेदी विभागात करण्यात आली होती व आरोपी तीन वर्षांपासून महाराष्ट्राचे काम पाहत असे. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी आरोपीने खोट्या ई-मेलद्वारे कंपनी सोडून गेलेला कर्मचारी सिद्धार्थ पांढरे याने उमरगा शाखेसाठी स्टेशनरी मागवल्याचे भासवले. प्रत्यक्षात पांढरे हा कर्मचारी दोन महिने आधीच कंपनी सोडून गेला होता व कंपनीच्या आयटी विभागाने त्याचा ई-मेल आयडी बंद केला होता.

याप्रकरणी आरोपीने खुलताबाद, जळ‌कोट, माहूर, देवणी, उदगीर, नांदेड या शाखेला स्टेशनरी पाठवल्याचे दाखवून दोन लाख ८६ हजार ११६ रुपयांचे बिल उचलून कंपनीची फसवणूक केल्याची तक्रार दिल्यावरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात आरोपीने दुसऱ्यांदा अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला असता, कोर्टाने तो फेटाळला. जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी काम पाहिले. अॅड. देशपांडे यांना अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैन्यभरती घोटाळा; चौघांचा जामीन फेटा‌ळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सैन्यभरतीसाठी बनावट शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे जन्मतारखेत बदल केल्याच्या प्रकरणात विठ्ठल लक्ष्मण धनगे, सचिन काकासाहेब भोसले, रविंद्र आण्णा गरुड व दिपक संतोष बोखारे या आरोपींचा नियमित जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी गुरुवारी (सात मार्च) फेटाळला.

या प्रकरणात यापूर्वी न्यायालयाने विठ्ठल लक्ष्मण धनगे (२५, रा. सारोळा, ता. कन्नड), सचिन काकासाहेब भोसले (२३, रा. आडगाव, ता. कन्नड), रवींद्र आण्णा गरूड (२५, रा. केळगाव, ता. सिल्लोड) व दीपक संतोष बोखारे (२४, रा. कळमसर, ता. पाचोरा, जि. जळगाव) या आरोपींना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आरोपींना कोर्टात हजर केले असता, कोर्टाने आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर आरोपींनी नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला होता. सुनावणीवेळी, तपास प्राथमिक अवस्थेत आहे, आरोपींच्या साथीदारांना अटक करायची आहे व आरोपींविरोधात सबळ पुरावे आहेत, असा युक्तीवाद करत सहाय्यक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी आरोपींना जामीन देण्यास विरोध केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून कोर्टाने आरोपींचा नियमित जामीर अर्ज फेटाळला.

या प्रकरणात सचिन काकासाहेब भोसले, किरण सुरेश पाटील, अमोल पोपट जाधव, ज्ञानेश्वर भिसन जाधव, अनिल लक्ष्मण निकम, प्रमोद तुकाराम राऊत, दीपक संतोष भोकारे, बाबुलाल रतन नागलोड, अक्षय दादाराव देशमुख, द्वारकादास किसन जाधव, विठ्ठल लक्ष्मण जाधव, संदीप नारायण बारवे, भिकन साहेबराव लोणकर, रवींद्र अण्णा गरूड, अमोल ज्ञानेश्वर आमटे, राहुल तातेराव हावाले या १६ उमेदवारांच्या कागदपत्रांमध्ये जन्मतारखेत बदल असल्याचे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायत जाळणाऱ्या उपसरपंचाला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खोडेगाव ग्रामपंचायत जाळल्याप्रकरणातील आरोपी उपसरपंच पूनम धनसिंह नागलोद याला गुरुवारी (७ मार्च) पहाटे अटक करून कोर्टात हजर केले असता त्याला शनिवारपर्यंत (नऊ मार्च) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी दिले.

याप्रकरणी ग्रामसेवक संतोष बाबुराव शेवते (४३, रा. बाजार गल्ली, ता. पाटोदा, जि. बीड, ह. मु. देवळाई चौक) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, सहा मार्च रोजी फिर्यादी ग्रामपंचायतीमध्ये काम करून सायंकाळी घरी परतले होते. रात्री नऊ वाजता खोडेगाव येथील माजी पंचायत समिती सदस्य कल्याण गायकवाड यांनी फोन करून ग्रामपंचायत कार्यालयाला आग लागल्याचे फिर्यादीला सांगितले. फिर्यादी घटनास्थ‌ळी पोचले असता, ग्रामपंचायतीचा मुख्य दरवाजा, इलेक्ट्रिक मीटर बोर्ड, सदस्यांची नावे असलेला बोर्ड जळताना दिसून आला. याबाबत आरोपी उपसरपंच पूनम धनसिंह नागलोद (५०, रा. लांडकवाडी, ता. जि. औरंगाबाद) याने, 'मला डावलले जाते, मी गावाचा उपसरपंच आहे,' असे म्हणत रात्री साडेआठला कर्यालयाला पेटवून दिल्याचे नागरिकांनी फिर्यादीला सांगितले.

या आगीत सुमारे पाच हजारांचे नुकसान झाले. प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीला गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर केले असता, आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून, आरोपीने त्यासाठी रॉकेल कुठून आणले, नेमका हेतू काय होता आणि आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याबाबत तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकानदार, ग्राहकाला मारहाण; तिघांना सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिठाई दुकानदारासह ग्राहकाला शिविगाळ करुन मारहाण करणारे सुरेश जगन्नाथ त्रिभुवन, संघर्ष सुरेश सोनवणे व विक्रम साहेबराव निकम या तिघा मद्यपींना एक वर्ष सक्तमजुरी व एकूण १२ हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरुंदळे यांनी गुरुवारी (सात मार्च) ठोठावली; तसेच आरोपींना ठोठाविण्यात आलेल्या दंडापैकी सहा हजार रुपये फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचेही आदेश कोर्टाने दिले.

याप्रकरणी भगाराम धीराजी देवासी (५०, रा. उल्कानगरी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २४ मार्च २०१६ रोजी रात्री ११च्या सुमारास फिर्यादी हा चेतक घोड्याजवळील 'माँ जोधपूर स्वीट्स' येथे मिठाई घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी सुरेश जगन्नाथ त्रिभुवन (२६, रा. पंचशील नगर), संघर्ष सुरेश सोनवणे (२६, शिवशंकर कॉलनी) व विक्रम साहेबराव निकम (३४, मित्रविहार कॉलनी) हे आरोपी मद्यप्राशन करून दुकान मालक मनिंद्रसिंह बिलवाल यांना शिविगाळ करून धक्काबुकी करीत होते. त्याचवेळी फिर्यादी हा दुकानात गेला असता तिघांनी फिर्यादीलाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी आरोपी विक्रम निकम याने फिर्यादीच्या डोक्यात कुंडी मारून जखमी केले.

प्रकरणात तिघांविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खटल्यावेळी, सहय्यक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने तिन्ही आरोपींना भारतीय दंड संहितेच्या ३२४ कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, ३२३ कलमान्वये सहा महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, ५०४ कलमान्वये तीन महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, तर दारुबंदी कायद्याच्या ८५ कलमान्वये तीन महिने सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार मंजूर हुसेन यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकान फोडणारे गजांआड

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शटर उचकटून दुकान फोडणाऱ्या टोळीसह रिक्षा चोरणाऱ्या आरोपीला क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली. या आरोपींनी तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. आरोपींच्या ताब्यातून दोन लाखांचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला.

औरंगपुरा येथील युवा फॅशन मेन्स वेअर हे रेडिमेड कपड्याचे दुकान चोरट्यांनी १४ फेब्रुवारी रोजी फोडले होते. शटर उचकटवून ८२ हजाराचा ऐवज लंपास करण्यात आला होता. त्याच प्रमाणे चार फेब्रुवारी रोजी चोरट्यांनी बन्सीलालनगर येथील डेली निड्स येथील दुकानाचे शटर उचकटून ७० हजारांचा ऐवज लंपास केला होता. या दुकान फोडल्याप्रकरणी क्रांतीचौक आणि वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, या गुन्ह्यामधील संशयित आरोपींची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी संशयित आरोपी गौरव तुकाराम निकम (वय १९), विक्रम विष्णू वायाळ (वय १९, दोघे रा. घाटी क्वार्टर्स); तसेच निलेश संजय श्रीसुंदर (वय २२, रा. करमाड) यांचा शोध घेतला. पोलिसांनी त्यांना अटक केली. चौकशीमध्ये या आरोपींनी या दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. या टोळीतील आणखी एक आरोपी सागर रवींद्र शर्मा (रा. घाटी परिसर) हा पसार झाला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहायक आयुक्त गोवर्धन कोळेकर, पोलिस निरीक्षक उत्तम मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. व्ही. राऊत, एस. बी. शिंदे, राजेश फिरंगे, गजानन मांटे, संतोष रेड्डी, राजेश चव्हाण, सतीश जाधव, गणेश वाघ आणि किरण नितनवरे यांनी केली.

\Bरिक्षाचोर आठ दिवसांत गजाआड\B

२७ फेब्रुवारी रोजी शेख हाफीज शेख माजिद (वय ३६ रा. रेंगटीपुरा) यांची दुचाकी रविवार बाजारातून चोरीस गेली होती. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे प्रकटीकरण पथकाने या प्रकरणी तपास करीत रिक्षा चोरणारा आरोपी शेख अनीस शेख युसूफ (रा. बायजीपुरा) याला अटक करून रिक्षा जप्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातव्या वेतनश्रेणीबद्दल अनेक शंका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातव्या वेतन आयोगातील वेतनवाढ कशी असेल, एकाकीपदाची वेतन निश्चिती कशी करावी, विकल्प काय याबाबत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील लिपिकांनी शिक्षण विभागाने घेतलेल्या कार्यशाळेला मोठी गर्दी केली. यावेळी अनेक शंका व्यक्त करण्यात आला. दरम्यान, सुमारे १८ ते १९ टक्के वेतनवाढीची शक्यता आहे.

सुधारित सातवा वेतन आयोग संरचनेबाबत अनुदानित शाळांतील लिपिकांना माहिती होण्याकरिता जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेतर्फे गुरुवारी देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात दोन टप्प्यात कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके, शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण, लेखाधिकारी प्रदीप बाहेकर, उपप्राचार्य रजनीकांत गरुड, संघटनेचे अध्यक्ष वाल्मिक सुरासे, कार्यवाह आसाराम शेळके, कार्याध्यक्ष भारत चाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षकांनी शंका, अडचणी मांडल्या. एकाकीपदाची वेतननिश्चिती कशी करावी, विकल्प कोणत्या तारखेस, पदोन्नती, वेतनश्रेणी, वरिष्ठ वेतन श्रेणी, १ जानेवारी २०१६ नंतर ज्यांची नियुक्ती झाली त्यांची वेतननिश्चिती कशी, असे प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या प्रश्नांना लेखाधिकारी बाहेकर यांनी उत्तरे दिली. यावेळी शिक्षण विभागाचे एम. एम. कुलकर्णी, आर. एन. गडवे यांची उपस्थिती होती. कार्यशाळेसाठी अरुण शिंदे, विजय निकम, मुरलीधर घोगरे आदींनी परिश्रम घेतले.

बदलाची माहिती घ्या

आयोगाच्या नियमांचे वाचन करा, आत्मसात करा. त्यानुसार सेवापुस्तिका तपासून सहाव्या वेतन आयोगात कोणती श्रेणी होती, वेतनश्रेणीचे स्तर कोणते याची माहिती ठेवा, अशा सूचना देत सातव्या वेतनश्रेणीत होणाऱ्या बदलाची माहिती लेखाधिकारी प्रदीप बाहेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचायत समिती पथकाची उपजिल्हा रुग्णालयाला भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

पंचायत समितीच्या पथकाने गुरुवारी येथील उपजिल्हा रुग्णालयास अचानक भेट दिल्याने डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. डॉक्टर वारंवार गैरहजर राहत असल्याच्या तक्रारीनंतर ही तपासणी करण्यात आली.

पंचायत समितीच्या सभापती इंदूबाई सोनवणे, सदस्य सुरेश राऊत, संभाजी पाटील डांगे, जिल्हा आरोग्य समितीचे सदस्य धोंडिरामसिंह राजपूत, जिल्हा.समन्वयक अर्जुन जगताप, तालुका समन्वयक सुनील उगले, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष कल्पना पवार यांच्या पथकाने दुपारी १२च्या सुमारास रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांच्या रांगा होत्या. तीनपैकी दोन डॉक्टर रुग्ण तपासत होते. बालरुग्ण केबिनमध्ये डॉक्टर नव्हते. दंत रुग्ण विभागाला कुलूप होते. तपासणीत १७ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी सहा अधिकाऱ्यांनी सही केली नव्हती. काही वैद्यकिय अधिकाऱ्यांनी एक मार्चपासून मस्टरवर सहीच केली नसल्याचे आढळून आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुंढे हे बैठकीसाठी औरंगाबादला गेल्याचे सांगण्यात आले. पथकाने परिचारिका प्रमुख एम. बी. खंडागळे यांच्या सोबत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया विभाग, आंतररुग्ण विभागाला भेट दिली. रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सोनोग्राफी कक्ष, स्वच्छता गृह व वार्ड स्वच्छता बघून समाधान व्यक्त केले. यावेळी मोहन साळुंके, दिगंबर मतसागर, शेषराव सोमवंशी आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची माहिती द्या अन्यथा कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

येत्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असून प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी विविध शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयांतून कर्मचारी घेतले जातात. यासाठी पाठवावयाच्या कर्मचाऱ्यांची यादी निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ३३६६ कार्यालयांकडून मागितली होती. आतापर्यंत १११ कार्यालये तसेच शाळा-महाविद्यालयांनी यादीच दिली नाही. त्यामुळे या सर्वांविरोधात कारवाई करण्याचा इशारा निवडणूक उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी यांनी दिला आहे.

निवडणूक कामासाठी जिल्ह्यातून किमान २२ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ तसेच शासकीय कार्यालयांनी त्यासाठी आपापल्या कर्मचाऱ्यांची नावे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पाठवायची आहेत. आतापर्यंत ३ हजार १४८ संस्थांनी माहिती भरली आहे, तर १०७ संस्थांची माहिती अपूर्ण आहे. विशेष म्हणजे १११ कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांनी आयोगाच्या सॉफ्टवेअरवर कोणतेही काम केलेले नाही. निवडणुकीसारख्या राष्ट्रीय कार्याबाबत असलेली उदासिनता गंभीर आहे. यापूर्वी या कार्यालयांना दोनदा नोटीस बजावण्यात आली आहे. यावेळी येत्या आठ दिवसांत माहिती न देणाऱ्या संस्थांच्या प्रमुखांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवडणुकीच्या कामास असहकार्य करणाऱ्या शासकीय कार्यालये तसेच शैक्षणिक संस्थांविरोधात लोकप्रतिनिधीत्व अधिनियमांतर्गत दंड बजावणे, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवणे. आयोगाला माहिती न देणे, खोटी किंवा अर्धवट माहिती दिल्याप्रकरणी देखील गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. तसेच निवडणूक आयोग संबंधीत विभागप्रमुखाची विभागीय चौकशीही प्रस्तावित करू शकते, अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रींगी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजीवनगर येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

$
0
0

औरंगाबाद : राजीवनगर, रेल्वे स्टेशन भागातून १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी सोमवारी दुपारपासून बेपत्ता झाली आहे. या मुलीची उंची चार फूट सहा इंच, रंग गव्हाळ, चेहरा लांब, सडपातळ बांधा, अंगात लाल रंगाचा फ्रॉक, लाल रंगाची लेगीन असून, निळा स्कार्फ आहे. याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरील वर्णनाची मुलगी कोणाला आढळल्यास वेदांतनगर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोषणा ३० ची, सुरू फक्त ६ रस्ते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सरकारने दिलेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील ३० रस्त्याची कामे सुरू करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ३ जानेवारी रोजी मोठा गाजावाजा करत उद्घाटनही करण्यात आले. प्रत्यक्षात केवळ सहा रस्त्यांचीच कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यांचे कामही अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे शहरातील रस्ते केव्हा पूर्ण होणार, हा प्रश्न कायम आहे.

राज्य सरकारने शहरातील रस्त्यांच्या कामासाठी २०१७ मध्ये महापालिकेला शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. कंत्राट, प्रशासकीय कामकाज यात पालिकेने दीड वर्षापेक्षा अधिक काळ घेतला. त्यात यंदा ३ जानेवारी रोजी या रस्ताकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दीड महिला लोटला तरी कंत्राटदारांनी प्रत्यक्षात सगळ्या रस्त्यांची कामे सुरू केली नाहीत. ३० कामांपैकी केवळ सहा रस्त्यांची कामे सुरू असून त्यालाही गती नाही. करारानुसार पालिकेने ३० रस्त्यांच्या कामांसाठी चार कंत्राटदार नेमले आहेत. वर्षभरात ही कामे पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले. प्रत्यक्षात उद्घाटनाला दोन महिने होत आलीतरी, कामांना गती नाही. एका कंत्राटदारांकडे सात, आठ किंवा त्यापेक्षा अधिक रस्ते आहेत. त्यातील सहाच कामे सुरू झालेली आहेत. एक रस्ता पूर्ण करू त्यानंतर दुसरा हाती घेतला जाईल असा प्रकार होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे देण्यात आलेल्या मुदतीत रस्ते पूर्ण होणार नाहीत, अशी स्थिती आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी पाहणी केली. या सगळ्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत कंत्राटदारांकडून रस्त्याच्या कामांचा ताळेबंद मागविण्यात आला.

\Bकंत्राटदारांना पालिकेचे अभय\B

रस्त्यांची कामे सुरू होताना पालिकेकडून मोठा गाजावाजा करण्यात आला. सगळी कामे सुरू होतील, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही. प्रारंभी टीव्ही सेंटर ते सेव्हन हिल, हायकोर्ट ते कामगार चौक या दोनच रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली. त्यात आता बजरंग चौक ते आझाद चौक, शिवाजीनगरातील पीरबाजार ते सुतगिरणी चौक, निराला बाजार ते पालिका मुख्यालय, चिकलठाणा एमआयडीसीतील रस्त्याचे काम सुरू आहे. ही कामेही अतिशय संथ गतीने सुरू आहेत. त्यानंतर पालिकेकडून अशा कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. केवळ नोटीस देत उत्तराची प्रतीक्षा पालिका करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कंत्राटदारांनी सर्व रस्त्यांची कामे सुरू करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. सध्यातरी सहा रस्त्यांची कामे सुरू आहेत. किमान ५० टक्के तरी कामे सुरू होणे अपेक्षित होते. अशा सर्व कामांबाबत माहिती घेत तातडीने पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

-नंदकुमार घोडेले, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images