Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

औरंगाबाद महापालिकेत गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या ठरावावरून गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्ण गोंधळ झाला. जलील यांच्या नावाने अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्याचा हट्ट 'एमआयएम'च्या नगरसेवकांनी धरला. ठराव मंजूर होईपर्यंत सर्वसाधारण सभा चालू न देण्याचा इशारा त्यांनी दिला. महापौरांनी ही मागणी अमान्य केली. त्यामुळे 'एमआयएम'च्या नगरसेवकांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. गोंधळ वाढतच गेल्यामुळे महापौरांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनी या नगरसेवकांना सभागृहाच्या बाहेर काढले. एमआयएमच्या २० नगरसेवकांचे नगरसेवकपद कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. दरम्यान, काळात महापौरांनी तीनवेळा सर्वसाधारण सभा तहकूब केली.

लोकसभा निवडणुकीनंतर गुरुवारी प्रथमच महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद या सभेत उमटतील असे गृहित धरण्यात आले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. सभा सुरू झाल्यावर भाजपचे नगरसेवक राजू शिंदे, माजी महापौर भगवान घडमोडे यांनी पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला शिवसेना, भाजपच्या नगरसेवकांनी अनुमोदन दिले. प्रस्ताव मंजूर करताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, 'नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच सर्व नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात येत आहे.' हा प्रस्ताव मंजूर केला जात असताना 'एमआयएम'चे नगरसेवक सभागृहात नव्हते. सभागृहात आल्यावर 'एमआयएम'चे गटनेते नासेर सिद्दिकी यांनी,'औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून इम्तियाज जलील निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर करा,' असा विषय मांडला. विरोधीपक्षनेच्या सरिता बोर्डे यांनी देखील जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला, परंतु महापौरांनी हा प्रस्ताव मान्य करण्यास नकार दिला. महापौर 'एमआयएम'च्या नगरसेवकांना म्हणाले, 'नवनिर्वाचीत खासदारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभा सुरू झाल्यावर लगेचच मंजूर करण्यात आला आहे. नवनिर्वाचीत खासदारांमध्ये जलीलसुद्धा येतात. त्यामुळे त्यांचे स्वतंत्रपणे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची गरज नाही.'

महापौरांच्या या भूमिकेमुळे एमआयएमचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. नगरसेवक अफसर खान यांनी देखील जलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावाला विरोध केला आणि त्यांनी जलील यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली. त्यामुळे 'एमआयएम'चे नगरसेवक अधिकच संतापले. त्यांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली. महापौरांनी नगरसेवकांना जागेवर बसण्याची सूचना केली, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे महापौरांनी सुरुवातीला सहा नगरसेवकांना एक दिवसासाठी निलंबित केले. त्यांनी या नगरसेवकांना सभागृहाबाहेर जाण्याची सूचना केली. त्या सहा नगरसेवकांच्या समर्थनार्थ 'एमआयएम'चे अन्य नगरसेवक एकत्र आले. त्यांनी महापौरांच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. नगरसेवक जमीर कादरी, नासेर सिद्दिकी यांनी महापौरांच्या समोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे गोंधळ अधिकच वाढला. दरम्यानच्या काळात महापौरांनी दोन वेळा आणि नंतर एक वेळा अशी तीन वेळा सर्वसाधारण सभा तहकुब केली. नगरसेवक ऐकत नाहीत, असे लक्षात आल्यावर सभागृहात उपस्थित असलेल्या 'एमआयएम'च्या सर्व २० नगरसेवकांना निलंबित करण्यात येत आहे, असे महापौरांनी जाहीर केले. त्यांना सभागृहाबाहेर जाण्याची सूचना त्यांनी केली, पण ते बाहेर जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना बोलावण्यात आले. सुरक्षा रक्षक देखील नगरसेवकांना बाहेर नेऊ शकले नाहीत. त्यामुळे महापौरांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनी एकेका नगरसेवकाला उचलून सभागृहाच्या बाहेर नेले.

त्यानंतर शिवसेना, भाजप, काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या भूमिकेचे स्वागत केले. महापौर झिंदाबादच्या घोषणा दिल्या. या २० नगरसेवकांचे नगरसेवकपद कायमस्वरुपी रद्द करण्याचा प्रस्ताव शिवसेना, भाजप, काँग्रेसच्या गटनेत्यांनी मांडला. महापौरांनी तो मान्य केला व तशी शिफारस प्रशासनाने शासनाकडे करावी, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

या नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा झाला प्रस्ताव

खान फेरोज, विकास एडके, नासेर सिद्दिकी, अब्दुल नाईकवाडी, जमीर कादरी, आबु हाश्मी, सरिता बोर्डे, अजिम अहेमद, लता निकाळजे, खान इर्शाद, खान सायराबानो, सरवत बेगम, शेख नर्गिस, खान नसरीन बेगम, नसीम बी सांडू खान, सलीमा कुरेशी, तसनीम बेगम अब्दुल रऊफ, गंगाधर ढगे, पठाण अस्मा फिरदोस, शेख जफर अख्तर.

खासदारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला त्यावेळी 'एमआयएम'चे नगरसेवक सभागृहात नव्हते. ते मुद्दाम उशिरा आले. त्यांना वाद घालायचा होता. 'एमआयएम'च्या नगरसेवकांकडून सतत गैरवर्तन केले जात आहे. त्यामुळे २० नगरसेवकांचे पद कायमस्वरुपी रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यांनी महापौरांबद्दल असंसदीय शब्द वापरले. सभागृहाचे कामकाज बंद पाडले म्हणून त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचे आदेश देखील प्रशासनाला दिले आहेत.

- नंदकुमार घोडेले, महापौर

महापौर नंदकुमार घोडेले कोणताही निर्णय स्वत:च्या मताने घेत नाहीत. खैरे यांनी उठ म्हणताच उठणारे आणि बस म्हणताच बसणारे हे महापौर आहेत. शिष्टाचार डावलून वेगवेगळ्या कार्यक्रमात मला डावलणे कोणत्या स्तराचे राजकारण आहे? घडलेला प्रकार दुर्दैवी आहे.

- इम्तियाज जलील, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्यांची यादी आता २२५ कोटींची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सव्वाशे कोटींच्या रस्त्यांच्या यादीला सुधारणेसह मंजुरी देण्यात आली. मालमत्ता कराची जादा वसुली व बेटरमेंट चार्जेस जास्त प्रमाणात भरण्यात आलेल्या भागात प्राधान्याने रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या दोन दिवसांत रस्त्यांची यादी अंतिम करून मुख्यमंत्र्यांना सादर करण्याचे ठरविण्यात आले, याचे सर्वाधिकार महापौरांना देण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील रस्त्यांसाठी सव्वाशे कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे. या निधीतून ७९ रस्त्यांची कामे करण्याची यादी पदाधिकाऱ्यांनी तयार केली. ही यादी आयुक्तांकडे प्रशासकीय मान्यतेसाठी दिली तेव्हा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शहराच्या सर्व भागात फिरून रस्त्यांची नवीन यादी तयार केली. त्यांच्या यादीत ५७ रस्त्यांचा समावेश आहे, या रस्त्यांच्या कामांसाठी २१२ कोटी रुपये लागतील असे त्यांनी नमूद केले आहे. ५७ रस्त्यांच्या यादीचे सादरीकरण आयुक्तांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत दृकश्राव्य माध्यमातून केले. त्यानंतर २१२ कोटींऐवजी २२५ कोटी रुपये किंमतीचे रस्ते करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला. रस्त्यांची यादी अंतिम करण्याचे अधिकार महापौरांना देण्यात आले. सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन महापौरांनी रस्त्यांची यादी अंतिम करावी व दोन दिवसात ती मुख्यमंत्र्यांना सादर करावी, असे सर्वसाधारण सभेत ठरवण्यात आले. याबद्दल माहिती देताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, ज्या भागातून मालमत्ता कर जास्त वसूल होतो व ज्या भागातून बेटरमेंट चार्जेस भरले जातात त्या भागात रस्त्यांची कामे प्राधान्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्त्यांची यादी दोन दिवसात मुख्यमंत्र्यांना सादर केली जाईल.

\Bनेहरू भवनचा प्रस्ताव स्थगित \B

नेहरू भवनचा विकास बीओटी पद्धतीने करण्याचा प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव गुरुवारी दीर्घ काळासाठी स्थगित करण्यात आला. हा प्रस्ताव स्थगित करण्याची मागणी सभागृहनेता विकास जैन व भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाईट नजरेने पाहतो म्हणून खून; कोर्टाने जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पत्नी व बहिणीकडे वाईट नजरेने पाहतो म्हणून पन्नास वर्षीय व्यक्तीचा खून केल्याच्या प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर दोन आरोपींपैकी आरोपी राहुल विश्वनाथ मुगदल याने सादर केलेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. देशपांडे यांनी फेटाळला.

या प्रकरणी मृत सोनाजी नारायण शेजवळ (५०, रा. कुंभेफळ झोपडपट्टी, ता. जि. औरंगाबाद) याचा मुलगा अमोल सोनाजी शेजवळ (२३, रा. कुंभेफळ झोपडपट्टी) याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १८ फेब्रुवारी २०१९ रोजी फिर्यादी हा त्याच्या पत्नीसह औरंगाबादला आला होता आणि सासुरवाडीला थांबला होता. दुसऱ्या दिवशी 'घरी अडचण आहे', असा फिर्यादीला फोन आला होता. फिर्यादी घरी परतला असता, भालगाव रस्त्यावरील नरेश चौंडे यांच्या भूखंडावरील मोकळ्या जागेत पित्याचा खून झाल्याचे समजले. त्यावेळी मृताच्या कानातून रक्त येत होते, चेहरा तसेच गुप्तांगांवरही गंभीर जखमा होत्या. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन करमाड पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या ३०२, २०१ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आरोपी राहूल विश्वनाश मुगदल (२२, रा. काळघर, ता. जि. औरंगाबाद) व आरोपी श्याम रतन शेजवळ (२०, रा. कुंभेफळ झोपडपट्टी) यांनी दारू पिऊन सोनाजीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी श्याम हा सोनाजी याच्यासोबत बँड पथकात काम करत होता आणि सोनाजी हा श्यामच्या पत्नी व बहिणीवर वाईट नजरेने पाहात होता, असा श्यामचा आरोप होता. त्यामुळे राहुल व श्याम या दोन्ही आरोपींनी सोनाजीला दुचाकीवर बसवून नेले आणि गंभीर स्वरुपाची मारहाण करीत गळा दाबून खून केला. तसेच घटनेपूर्वी दोन्ही आरोपींनी मद्यसेवन केल्याचेही तपासात समोर आले.

\Bसबळ पुरावे उपलब्ध

\Bप्रकरणात दोन्ही आरोपींना १९ फेब्रुवारी २०१९ रोजी अटक करण्यात आली होती व त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी राहुल याने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, गुन्हा गंभीर असून, प्रकरणात सबळ पुरावे उपलब्ध आहेत. दोन्ही आरोपी हे मृताला दुचाकीवर घेऊन जाताना दिसून आले आहेत. त्यामुळे आरोपीचा जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेलचालकाला ग्राहकांची मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हॉटेलमध्ये वेटरसोबत झालेल्या वादातून ग्राहकाने साथीदाराच्या मदतीने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. मंगळवारी (११ जून) एन सहा येथील फिजा हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी आठ आरोपीविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी गणेश संजय शेवाळे (वय २६, रा. आयोध्यानगर, एन सात) यांनी तक्रार दाखल केली. शेवाळे हे फिजा हॉटेलमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. मंगळवारी रात्री अकरा वाजता त्यांच्या हॉटेलमध्ये कैलास प्रकाश सुलाने (वय ३२, रा. शेवगा, ता. औरंगाबाद) हा सात मित्रांसह जेवणासाठी आला होता. रात्री अकरा वाजता हॉटेल बंद करायचे असल्यामुळे शेवाळे यांनी सुलाने आणि इतरांना तुम्ही बिल भरून निघून जा असे सांगितले. या गोष्टीचा राग आल्याने सुलाने आणि साथीदारांनी कर्मचाऱ्यांसोबत वाद घालत त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण सुरू केली. तसेच सुलाने याने टेबलावरील काचेचा ग्लास शेवाळेच्या डोक्यात मारल्याने शेवाळे जखमी झाले. तसेच 'तू जर आमच्या विरोधात पोलिसात केस केली तर, तुला जिवंत सोडणार नाही' अशी धमकी दिली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध मारहाण, दंगल करणे, धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार अधाने या प्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवेश प्रक्रियेसाठी मदत केंद्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर वर्गाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सीईटी देण्यासाठी ग्रामीण भागात व परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन करण्यासाठी एसएफआयने मदत केंद्र उभारले आहे. या केंद्राला शेकडो विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली.

शैक्षणिक वर्ष २०१९-२०साठी विद्यापीठात सीईटी देण्यासाठी आणि प्रवेश प्रक्रियेची माहिती जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने (एसएफआय) विद्यार्थी मदत केद्र सुरू केले आहे. वाय कॉर्नर परिसरात मदत केंद्र सुरू आहे.

विविध विभागातील सीईटी, सीईटीचे स्वरूप, वसतिगृह प्रवेश, ऑनलाइन नोंदणी यााबाबत माहिती दिली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एसएफआय दरवर्षी मदत केंद्राचा उपक्रम राबवत आहे. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत केंद्राचा उपयोग होत आहे. विद्यापीठाचा परिसर मोठा असून, नवीन विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. प्रशासनाने मार्गदर्शनासाठी मध्यवर्ती केंद्र उभारलेले नाही. त्यामुळे एसएफआयचे केंद्र विद्यार्थ्यांसाठी आधार ठरला आहे. या उपक्रमात स्टॅलिन आडे, लोकेश कांबळे, नितीन वावळे, सत्यजित मस्के, रवी खंदारे, समाधान बारगळ, आकाश जगताप, ज्ञानेश्वर वाघ, श्रीनिवास लांडगे आदी सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमानी निर्णयाने विद्यार्थिनींची तारांबळ

$
0
0

पूर्वसूचनेशिवाय वसतिगृहातील खोल्या केल्या बंद

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पूर्वसूचनेशिवाय विद्यार्थिनी वसतिगृहातील खोल्या बंद करण्यात आल्यामुळे वाद उफाळला. अखेर विद्यार्थिनींनी विद्यार्थी विकास संचालक डॉ. मुस्तजिब खान यांची भेट घेतल्यानंतर खोल्या उघडण्यात आल्या. विद्यापीठाला आपल्याच निर्णयाचा विसर पडल्याने विद्यार्थिनी संतप्त झाल्या होत्या.

दुष्काळी परिस्थितीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या पूर्ण सुटीत वसतिगृहात राहू देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. पदव्युत्तर वर्ग जून महिन्यात सुरू होणार आहेत. स्पर्धा परीक्षा आणि सेट परीक्षा असल्यामुळे वसतिगृहात राहू देण्याची विनंती विद्यार्थ्यांनी केली होती. प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत झाले होते, पण कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे बुधवारी विद्यार्थिनींची तारांबळ उडाली. दुपारी विद्यार्थिनींच्या खोल्या बंद करण्यात आल्या. खोलीतील सामानसुद्धा घेऊ न देता ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात कोणतीही कार्यवाही केली नाही. याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने विद्यार्थी विकास संचालक डॉ. मुस्तजिब खान यांची भेट घेतली. त्यानंतर विद्यार्थिनींच्या खोल्या उघडण्यात आल्या. मनमानी निर्णय घेणाऱ्या अधीक्षकावर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थिनींनी केली. यावेळी विद्यापीठ अध्यक्ष दीपक बहिर, दीक्षा पवार, मंगेश शेवाळे, रमा बोर्डे, श्रद्धा सहाणे, अस्मिता मोरे, मिताली धनवट, सना शेख आदी उपस्थित होते.

\Bकुलगुरूंनी केली पाहणी\B

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी विद्यार्थिनी वसतिगृहाला गुरुवारी सायंकाळी भेट दिली. यावेळी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्यासह वॉर्डन डॉ. कावेरी लाड व कर्मचारी उपस्थित होते. विद्यापीठातील मुली व मुलाबाबतही पालकत्वाच्या भावनेतून प्रश्न सोडवू असे शिंदे म्हणाले. तसेच विद्यार्थिनींच्या झालेल्या गैरसोयीची माहिती घेऊन सहकार्य करण्याची सूचना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरू बंगल्यातील वस्तूंची तपासणी करा

$
0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर कुलगुरू निवासस्थान सोडले मात्र, विद्यापीठाच्या नावे नोंद असलेल्या वस्तू सोबत घेऊन गेल्याची तक्रार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मागासवर्गीय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने केली आहे. याबाबत अध्यक्ष सुभाष बोरीकर यांनी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना निवेदन दिले. कुलगुरू निवासातील अनेक वस्तू तीन टेम्पोत नेण्यात आल्या आहेत. नवनियुक्त कुलगुरूंच्या वापरासाठी वस्तू परत न मिळाल्यास नवीन खरेदी करून विद्यापीठाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. एक बॅग घेऊन विद्यापीठात आलेले चोपडे जाताना तीन टेम्पो भरून साहित्य घेऊन जातात. त्यांचे अनुकरण विभागप्रमुख, अध्यापक व कर्मचाऱ्यांनी केल्यास विद्यापीठात जागा व भिंतीशिवाय काहीच उरणार नाही, असे बोरीकर यांनी निवेदनात म्हटले आहे. कुलगुरू निवासस्थानातील वस्तूंची सविस्तर माहिती द्यावी आणि कार्यवाही करावी, अशी मागणी बोरीकर यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील बिनविरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे नितीन पाटील यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या निधनानंतर फेब्रुवारीपासून ही जागा रिक्त होती. गुरुवारी संचालक मंडळाच्या बैठकीत नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांचे २५ फेब्रुवारी रोजी निधन झाले. या रिक्त पदावर कोणाची वर्णी लागते. अध्यक्ष निवडीची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबली होती. आचारसंहिता संपताच सहकार खात्याने १३ जून रोजी संचालक मंडळ बैठक बोलावून त्यात अध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबविण्याचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी अकरा वाजता बँकेच्या मुख्य सभागृहात अध्यासी अधिकारी व जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेटे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्ष निवडीसाठी माजी आमदार नितीन पाटील यांचेच दोन अर्ज ठरवून दिलेल्या वेळेत दाखल झाले. दामोधर नवपुते, किरण पाटील सूचक तर, अभिजित देशमुख, रंगनाथ काळे अनुमोदक होते. अन्य कुणाचाही अर्ज न आल्याने नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे दाबशेडे यांनी जाहीर केले.

विद्यमान संचालक मंडळाची मुदत २० मे २०२० रोजी संपत आहे. तोपर्यंत अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात होती. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, रामकृष्णबाबा पाटील, प्रभाकर पालोदकर, आमदार संदीपान भुमरे यांची नावे चर्चेत होती. बागडे यांनी आधीच नकार दिल्यामुळे नेमके अध्यक्ष कोण होणार याविषयी तर्कवितर्क लढविले गेले. नितीन पाटील यांच्या निवडीत हरिभाऊ बागडे यांची भूमिका महत्त्वाची होती.

अध्यक्ष निवडीपूर्वी हरिभाऊ बागडे यांनी सर्व संचालक मंडळाचे मते जाणून घेतले, बिनविरोध निवडीची परंपरा पुढे सुरू ठेवण्यावर एकमत झाले. अध्यक्षांची निवड घोषित होताच नितीन पाटील यांचा बागडे यांनी सत्कार केला. 'जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि माझे वडील सुरेश पाटील यांनी बँकेचा कारभार काटकसर करीत बँक नफ्यात आणली. त्यांचा आदर्श समोर

ठेवून बँकेची प्रगती साधण्याचा प्रयत्न केला जाईल,' असे नितीन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

याप्रसंगी संचालक रामकृष्णबाबा पाटील, आमदार अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, प्रशांत बंब, संचालक बाबुराव पवार, प्रभाकर पालोदकर, रंगनाथ काळे, किरण पाटील डोणगावकर, दशरथ गायकवाड, अंकुशराव रंधे, नंदकुमार गांधिले, अभिजित देशमुख, पुंडलिक काजे, जावेद पटेल, अशोक मगर, मंदाताई माने, माजी आमदार अण्णासाहेब माने, शांतीलाल छापरवाल, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकृष्ण पठाडे, जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, जितसिंह करकोटक, के. यू. गोडे, जयराम साळुंके, पांडुरंग घुगे, कार्यकारी संचालक आर. आर. शिंदे, सरव्यवस्थापक अजय मोटे, सुनील पाटील, सुनील चौधरी आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नितीन पाटीलांच्या यशाचा चढता आलेख कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा बँकेचे चेअरमन झालेले नितीन पाटील यांचा राजकीय व सहकार क्षेत्रातील आलेख कायम चढता राहिला आहे. बी. कॉम, एमबीए झालेल्या नितीन पाटील यांना २२व्या वर्षी पीपल्स बँकेचे संचालक म्हणून संधी मिळाली. १९९७ मध्ये ते औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून निवडून आले ते आजवर संचालक आहेत. १९९९ मध्ये कन्नड विधानसभेतून ते काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून गेले. दरम्यान जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांना २००२ मध्ये संधी मिळाली. पुढे २००४ ते २००६ या काळात राज्य सहकारी बँकेचे विभागीय अध्यक्ष म्हणून नितीन पाटील यांची निवड झाली. त्यांचे वडील सुरेश पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर गुरुवारी त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. सहकार क्षेत्रात त्यांचा आलेख सातत्याने चढताच राहिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करिअर म्हणून पॉलिटेक्निक उत्तमच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पॉलिटेक्निक डिप्लोमा काय आहे, प्रवेश प्रक्रिया कशी असते, डिप्लोमानंतर नोकरीच्या, स्वयंरोजगाराच्या संधी याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना जाणून घेता आली. निमित्त होते तंत्रशिक्षण संचालनालय, राज्य तंत्रशिक्षण मंडळ व 'महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्पस'तर्फे आयोजित 'करिअर फेअर, रोजगाराच्या संधी, प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन मेळावा'चे. प्रात्यक्षिकावर आधारित पॉलिटेक्निक अभ्यासक्रमामुळे रोजगाराच्या संधी वाढल्या असून, मिळालेल्या संधीचे सोनं करा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले. ज्ञानासोबत कौशल्ये आत्मसात करून सकारात्मक रहा, व्यवसायाच्या संधीकडे बारकाईने लक्ष द्या, असेही आवाहन मार्गदर्शकांनी केले.

दहावीनंतर पॉलिटेक्निकच का, नोकरी, व्यवसायाच्या संधी, प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी, पालकांच्या मनातील प्रश्न, शंका दूर व्हावेत त्यांना माहिती व्हावी या हेतूने तंत्रशिक्षण संचालनालय, राज्य तंत्रशिक्षण मंडळ व 'महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्पस'तर्फे गुरुवारी 'करिअर फेअर, रोजगाराच्या संधी, प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन मेळावा' घेण्यात आला. जिमखाना सभागृहात झालेल्या मेळाव्यासाठी व्यासपीठावर तंत्रशिक्षण मंडळाचे उपसचिव डॉ. आनंद पवार, उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील, प्राचार्य एफ. ए. खान, एस. पी. जवळकर, प्रभारी प्राचार्य डी. डी. अहिरराव, प्रशासकीय अधिकारी शोभा परांजे, प्रवेश समितीचे समन्वयक आर. टी. आघाव, आस्थापना अधिकारी व्ही. एम. बुक्का, मुख्य समन्वयक एम. बी. सानप, आर. ए. बुरकुल यांची उपस्थिती होती. दहावी पास झाल्यानंतर तंत्रनिकेतनमधून शिक्षण घेण्याचे महत्त्व व त्यानंतर उपलब्ध रोजगारांच्या संधी यावर मार्गदर्शन करण्यात आले. ऑनलाइन अर्ज भरताना कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. लॉग-इन आयडी, पासवर्ड, कॉलेजांचे पर्याय निवडताना घ्यायची काळजी, नावातील चुका टाळणे, नॅशनॅलिटी, डोमीसाईल, जात प्रमाणपत्राचे महत्व, 'ट्युशन फी वेव्हर' स्कीममधील (टीएफडब्ल्यू) प्रवेश, त्यासाठी उत्पन्नाची अट, टेक्निकल विषयांची नोंद, दिव्यांगासाठी अर्जातील नोंदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गणेश भोंबे, विठ्ठल यरावार, प्रा. माधुरी गणोरकर यांचीही उपस्थिती होती. सीमा बोरडे यांनी सूत्रसंचालन केले.

तंत्रनिकेतनमध्ये विविध ६२ अभ्यासक्रमांला प्रवेश घेण्याची संधी तुम्हाला आहे. दोन वर्षांपूर्वी पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमात उद्योगातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने बदल करण्यात आले. आता ६० टक्के प्रात्यक्षिक व ४० टक्के थिअरी आहे. प्रत्येक विषय हा प्रोजेक्ट बेस्ड आहे. सहाव्या सत्रात 'लेटेस्ट ट्रेंड' हा एक विषय समाविष्ट करण्यात आला आहे. ज्यात जागतिक पातळीवर अद्ययावत तंत्रज्ञानाचे विद्यार्थ्यांचे ज्ञान अवगत करून दिल्या जाते. या बदलामुळे विद्यार्थ्यांची नाळ आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योगांशी जोडण्यास मदत झाली आहे. यामध्ये दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना सहा आठवड्यांची इटर्नशिप सुरू करण्यात आली. प्रत्यक्ष कंपनीत जाऊन प्रशिक्षण घेता येत आहे. यंदा ६७ हजार विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. कौशल्य विकसित करण्यासाठी आणि उद्योगांच्या गरजेनुसार मनुष्यबळ निर्मितीचा प्रयत्न होतो आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, अत्याधुनिक शिक्षण मिळावे यासाठी तंत्रशिक्षण मंडळ दरवर्षी पाच हजार शिक्षकांना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देते. दहावीनंतर पॉलिटेक्निक केले आणि बारावीनंतर अभियांत्रिकीला जायचे असेल तर, अभियांत्रिकी पूर्ण होण्यास तेवढाच कालावधी लागतो. पॉलिटेक्निक पूर्ण करून गेल्यानंतर विद्यार्थ्यांना ६० ते ७० टक्के ज्ञान याचदरम्यान मिळते आणि त्यामुळे संधीही वाढतात. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमानंतर करिअरच्या संधी कमी नाहीत. केवळ मानसिकतेचा प्रश्न आहे. सकारात्मक रहा, स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करा.

- डॉ. आनंद पवार उपसचिव, तंत्रशिक्षण मंडळ.

अभ्यास करायचे, मोठे व्हायचे हे स्वप्न उराशी बाळगून प्रवेश घ्या. मिळालेल्या संधीचे सोनं करण्याची धडपड तुमच्यात असेल तर यश तुमचे आहे. कोणतेही काम एकाग्रतेने करा. बिकट परिस्थितीला घाबरून न जाता त्याला सक्षमपणे तोंड देण्याची क्षमता स्वत:मध्ये विकसित करा. तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम शिकता काही कौशल्यही आत्मसात करायला शिका. जसे की, वेगवेगळ्या देशांच्या भाषा आपल्याला कशा येतील याकडे लक्ष द्या. आकाशाला गवसणी घालताना पाय जमिनीवर ठेवा.

- एस. पी. जवळकर शिक्षणतज्ज्ञ.

करिअरसाठी अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. कोणतेही क्षेत्र निवडताना त्यातील सूक्ष्म बारकावे आपल्याला माहिती असावेत. अभियांत्रिकीचे क्षेत्र निवडत असताना तंत्रनिकेतनसारख समर्थ पर्याय आपल्याकडे दुसरा नाही. कोणतेही क्षेत्राला कमी लेखू नका. आपल्या आसपास असलेल्या व्यवसायाच्या संधी बारकाईने लक्ष ठेवा. डोळे,उघडे ठेवून लक्ष द्या. सर्वात आधी ध्येय निश्चित करा. आई-वडिलांनी, मित्र-मैत्रिणीने सांगितले म्हणून प्रवेश नका घेवू. आपली आवड, क्षमता लक्षात घ्या.

- प्रियाराणी पाटील, उपशिक्षणाधिकारी.

तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व कायम आहे आणि राहणार आहे. अभियांत्रिकी क्षेत्राचा विस्तार विचारात घेता येणाऱ्या काळात तांत्रिक मनुष्यबळाची गरज वाढणार आहे. त्यामुळे संधी कमी झाल्या किंवा होतील असे म्हणता येणार नाही. तंत्रनिकेतचे अभ्यासक्रम हे रोजगाराभिमूख, व्यवसायाभिमूख आहेत. अभ्यासक्रमातून ज्ञान आणि कौशल्य मिळते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासाच्या दृष्टीकोना उपक्रमा तीन वर्षात तिनशे प्रकारचे कौशल्य देण्याचा प्रयत्न आम्ही करतो.

- एफ. ए. खान, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन

दहावीनंतर पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम हे उत्तम करिअर होवू शकते. निवडल्यानंतर आपण त्यात पूर्ण क्षमतेने स्वत:ला झोकून देण्याची गरज असते. औद्योगिक विकासाचा दर वाढला आहे. गेल्या काही काळात यामध्ये प्रचंड बदल झाला आहे. त्यामुळे तांत्रिक शिक्षण मनुष्यबळाची नितांत आवश्यकता आपल्या देशाला लागणार आहे. तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम हा अत्यल्प खर्चात रोजगार देणारा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाकडे वळायला हवे.

- डी. डी. अहिरराव, प्रभारी प्राचार्य.

टेक्निकल शिक्षणानंतर रोजगारासह स्वयंरोजगारही करता येऊ शकतो. पॉलिटेक्निक संस्था आणि विविध कारखाने, इंडस्ट्री यांच्यासोबत झालेल्या करारांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करतानाच उद्योगांशी ओळख होते. उद्योगांना कुशल मनुष्यबळ लागते. नव्या जगात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर, पदवी पेक्षा सॉफ्ट स्किल आवश्यक असतात. कॉलेजमधील 'ट्रेनिंग अँड प्लेसमेंट' विभाग सक्षम आहेत. उद्योगांना काय हवे हे लक्षात घेत अभ्यासक्रमात आवश्यक सुधारणा सुचविण्याचे कामही होते.

- व्ही. एम. बुक्का, आस्थापना अधिकारी.

विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी आवश्यक ती कागदपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. काय विचारले आहे हे लक्षात घेऊन माहिती भरावी. काही माहिती राहिली का, हे पुन:पुन्हा तपासणे आणि त्यानंतर अर्ज निश्चित करणे याबाबी लक्षात घ्याव्यात. प्रक्रियेतील बदलांकडे लक्ष असायला हवे. लॉग-इन आयडी आणि पासवर्ड दुसऱ्यांना न देणे. कॉलेजांचे पर्याय देताना आपल्याला हव्या त्या कॉलेजाचा प्रर्याय दिला गेला आहे की, नाही हे पुन्हा तपासावे.

- आर. टी. आघाव, समन्वयक, प्रवेश समिती.

विद्यार्थी, पालकांसाठी मार्गदर्शक असा हा उपक्रम होता. जात प्रमाणपत्रासह इतर प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि वेळापत्रक याबाबतचे प्रश्न विचारता आले.

- आसाराम जाधव

माझ्यासाठी प्रोत्साहनपर असे हे मार्गदर्शन होते. प्रवेश प्रक्रियेतील टप्प्यांची माहिती अतिशय उपयुक्त होती. संधी कशा प्रकारे आहेत याबाबतही उत्तम माहिती मिळाली.

- मानसी मोदानी

करिअर निवडताना प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे विचार असतात. अशावेळी मार्गदर्शन महत्वाचे ठरते. कार्यक्रमाचा निश्चितच उपयोग झाला. अनेक प्रश्नांची उकल झाली.

- दिव्या साठे

पॉलिटेक्निक करिअर म्हणून कसे याबाबत फारसे माहिती नव्हते. मेळाव्यातून तज्ज्ञांनी करिअर, संधी याबाबत सांगितलेच. त्याचबरोबर प्रक्रियेतील बारकावे माहिती झाले.

- निकिता शिंदे

आवश्यक ती कागदपत्र, प्रवेशाचा पॅर्टन, वेळापत्रक याबाबतची इत्यंभूत माहिती उपक्रमातून मिळाली. वेबसाइटवर माहिती उपलब्ध असली तरी, एवढे डिटेल्स नसते. त्यामुळे फायदाच झाला.

- विशाल पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना-‘एमआयएम’मध्ये सत्तासंघर्ष सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचे शल्य उराशी बाळगलेल्या शिवसेनेने संधी मिळेल तिथे 'एआयएमआयएम'ला रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सिद्धार्थ उद्यानात बछड्यांच्या नामकरणाला खासदार इम्तियाज जलील यांना निमंत्रण देण्यात आले नाही. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत खासदार जलील यांच्या अभिनंदनाच्या स्वतंत्र ठरावाला विरोध करीत 'एमआयएम'च्या सहा नगरसेवकांना निलंबित करण्यात आले. विधानसभा आणि महापालिका निवडणुकीपर्यंत दोन्ही पक्षातील सत्तासंघर्ष वाढण्याचे संकेत आहेत.

शहरातील लहान-मोठ्या कार्यक्रमात 'एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील यांना डावलण्याचा एककलमी कार्यक्रम शिवसेनेने हाती घेतला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील गोंधळानंतर त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले. खासदार जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची मागणी एमआयएमच्या नगरसेवकांनी केली होती. मात्र, देशभरातील सर्व खासदारांचा एकत्रित ठराव झाल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी जाहीर केले. त्यामुळे संतप्त नगरसेवकांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. या सहा नगरसेवकांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले. या राजकीय नाट्यावरून शिवसेना व 'एमआयएम' आमनेसामने आले आहेत. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे पराभूत झाल्यानंतर शिवसेनेने शहरात विस्तारत असलेल्या 'एमआयएम'सह वंचित बहुजन आघाडीला रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील भाषणात त्याची चुणूक दिसली होती. सिद्धार्थ उद्यानातील वाघांच्या बछड्यांचा नामकरण कार्यक्रम नुकताच झाला. शिष्टाचारानुसार खासदार इम्तियाज जलील यांना निमंत्रण देणे अपेक्षित होते. महापालिकेने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना निमंत्रण दिले. पण, जलील यांना निमंत्रण देणे टाळले. या कारणावरून 'एमआयएम'ने निदर्शने केली होती. जलील यांच्या विजयानंतर शहरातील सामान्य माणूस सुरक्षित नसल्याचा प्रचार वाढला आहे. एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते दादागिरी करीत असल्याचा जाहीर आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. या संघर्षात सामाजिक शांतता भंग झाली आहे. विधानसभा आणि महापालिका निवडणुकीपर्यंत हा सत्तासंघर्ष आणखी वाढण्याचे संकेत आहेत.

\Bमध्य व पूर्वचा धसका \B

दलित-मुस्लिम मतदारांना एकत्र आणणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचा सेना-भाजपच्या उमेदवारांनी धसका घेतला आहे. पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघात दोन्ही मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या मतदारसंघात 'वंचित'ला रोखण्याचे युतीसमोर आव्हान आहे. राजकीय असुरक्षिततेतून एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी लक्ष्य ठरली आहे. राजकीय संघर्ष आणि नियोजन दोन्ही पक्षांसाठी गरजेचे ठरले आहे.

चंद्रकांत खैरे खासदार नाहीत हे महापौर नंदकुमार घोडेले यांना खरंच वाटत नाही. त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत. मला पाच वर्षांसाठी लोकांनी निवडून दिले. दहा सेकंदाच्या ठरावासाठी एवढे राजकारण करणे दुर्दैवी आहे. औरंगाबाद शहर कुणाची जहागीर नाही. महापौर, खासदार ही पदं जन्मसिद्ध नसतात. जनताच निवडणुकीतून उत्तर देईल.

-इम्तियाज जलील, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायालयाच्या आदेशाने धनंजय मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

$
0
0

बीड:

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्यानुसार आदेश दिल्याच्या आज चौथ्या दिवशी सकाळी ७ वाजता धनजंय मुंडे यांच्यासह १४ जणांवर बिड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस स्टेशन मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल करावा यासाठी तक्रारदार राजाभाऊ फड हे गुरुवारी रात्रभर बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये बसून होते. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून आजच या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात काय सुनावणी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

राजाभाऊ फड यांच्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे यांच्यासह चंद्रकांत रणजीत गिरी, ज्ञानोबा सीताराम कोळी, गोविंद सीताराम कोळी, बाबू सीताराम कोळी, उद्धव कचरू सावंत, माणिक तुकाराम भालेराव, विठ्ठल गणपतराव देशमुख, धोंडीराम अण्णा चव्हाण, दिगंबर वसंत पवार, राजश्री धनंजय मुंडे, प्रेमा पुरुषोत्तम केंद्रे, वाल्मिक बाबुराव कराड आणि सूर्यभान हनुमंतराव मुंडे या १४ जणांवर बर्दापूर पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६८, ४६५, ४६४, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे हे करत आहेत.

वाचा: धनंजय मुंडेंच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमीन खरेदी प्रकरण; धनंजय मुंडेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

$
0
0

बीड:

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून दोन दिवसापूर्वी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाने दिलेल्या गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे . त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर आज पहाटे दाखल केलेल्या बर्दापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यालाही स्थगिती मिळाली आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथे नियोजित जगमित्र शुगर मिल साठी चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती सदर जमीन ही देवस्थानची असल्याचा दावा वादी तर्फे करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी करताना औरंगाबाद उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देता गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाविरुद्ध धनंजय मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली त्या ठिकाणी या प्रकरणावर आज सुनावणी होणार असताना पोलिसांनी आज पहाटेच बरदापुर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही पूर्ण केली. या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असता सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे त्याच बरोबर आज सकाळी दाखल झालेल्या गुन्ह्याही आता स्थगिती मिळाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे धनंजय मुंडे यांनी स्वागत केले असून सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशातील कॉलेजांमध्ये घाटी ३२व्या स्थानावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशभरातील शासकीय; तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ३२वे स्थान मिळवले आहे. विविध पायाभूत सोयी-सुविधा, शैक्षणिक उपक्रम, वैद्यकीय शिक्षकांचे योगदान आदी निकषांच्या आधारे केलेल्या सर्वेक्षणात घाटीने हे स्थान पटकाविले आहे. या सर्वेक्षणासाठी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. मोहन डोईबळे, डॉ. वर्षा रोटे, डॉ. वर्षा नांदेडकर, डॉ. सरोजिनी जाधव, डॉ. अनिल जोशी, डॉ. रेषाकिरण शेंडे, डॉ. सिराज बेग, डॉ. सुधीर कुलकर्णी, डॉ. रझवी नासेर, प्रशासकीय अधिकारी सुभाष जाधव, गणेश चव्हाण आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राम विकासात पदव्युत्तर शिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्राम विकास व संशोधन संस्थेत शैक्षणिक वर्ष २०१९-२०च्या प्रथम सत्रापासून ग्रामविकासासंबंधी विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होत आहेत. महाराष्ट्रात केवळ ग्रामीण भागातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, जैववैज्ञानिक व तंत्रशास्त्रांचा अभ्यास करून ग्रामीण समाजाच्या जीवन जगण्याच्या समस्यांचा अभ्यास व संशोधन करणारे हे विभाग असणार आहेत, अशी माहिती मानद संचालक डॉ. सर्जेराव ठोंबरे यांनी दिली.

या चार पदव्युत्तर अभ्यासक्रमापैकी मास्टर ऑफ रुरल स्टडीज (एमआरएस : समाज सांस्कृतिक व राजकीय स्थिती), मास्टर ऑफ रुरल स्टडीज (ग्रामीण अर्थशास्त्र, बँक व उद्योग) या दोन विभागांचा समावेश सामाजिक शास्त्रे, मानव्य विद्याशाखेत समावेश करण्यात आला आहे. मास्टर ऑफ सायन्स (एमएस्सी, जैववैविध्याचे संवर्धन) व मास्टर ऑफ सायन्स (ग्रामीण तंत्रज्ञान) या दोन विभागांचा समावेश विज्ञान व तंत्रशास्त्र विद्याशाखेत केलेला आहे. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांनी चारही विभागांच्या अभ्यासक्रमांस व शिकणे-शिकविणे व मूल्यमापन पद्धतीस मान्यता दिलेली आहे. अभ्यासक्रम निश्चित करताना विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार करून पसंती आधारित श्रेयांक पद्धती आधारित अभासक्रम तयार करण्यात आलेले आहेत. अभ्यासक्रमाचे विषय निवडीच्या पुरेशा संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

पाठ्यक्रम व पाठ्यचर्या ठरवताना शिक्षण, शिकविण्याची उदिदष्टे, फलश्रुती निश्चित केलेली आहे. दोन वर्षे म्हणजे चार शैक्षणिक सत्रांत हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी पूर्ण करायचा असून, त्यासाठी एवूâण २६५० गुणांची अंतर्गत व बाह्य परीक्षा आहे. या परीक्षेत १०३ श्रेयांक प्राप्त करायचे आहेत. या चार विभागांपैकी दोन मानव्य विद्याशाखेत, दोन विभाग विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत समाविष्ट आहेत. चारही विभागात ५० टक्के वर्गशिक्षण असणार आहे. त्यात केवळ व्याख्यान पद्धती नसून, गटचर्चा, सादरीकरण, शिक्षक-विद्यार्थी संवाद या नव्या शिक्षण पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. ५० टक्के अभ्यासक्रम प्रात्यक्षिके, क्षेत्रीय भेटी, सर्वेक्षण, संशोधन व अहवाल लेखन या पद्धतीने पूर्ण केला जाणार आहे.

\Bपदविका अभ्यासक्रमही सुरू\B

या विभागातर्फेâ सहा महिन्यांचे नऊ पदविका अभ्यासक्रमही शिकविले जाणार आहेत. फळे व भाजीपाला प्रक्रिया, जल व भू व्यवस्थापन, सेंद्रीय शेती, फलोद्यान, पुष्पोद्यान व रोपवाटिका व्यवस्थापन, रोपांचे उती संवर्धन, पशुधन उत्पादन व व्यवस्थापन, मत्स्यपालन व व्यवस्थापन, मधुमक्षिका पालन व व्यवस्थापन, महिला व बालाकांचे जीवनसत्व व्यवस्थापन, पंचायतराज व्यवस्थापन, स्वयं सहायता बचतगट संघटन व व्यवस्थापन, फळे व भाजीपाला प्रक्रिया, फळे व भाजीपाला निर्जलीकरण प्रक्रिया, फलोद्यान व रोपवाटिका व्यवस्थापन, ज्येष्ठ नागरिक सेवासृश्रुषा आदी अभ्यासक्रमांना प्रवेश देणे सुरू आहे. या विभाग व प्रवेशाची अधिक माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा मॉडेल रस्त्यांचे एका महिन्यात लोकार्पण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहा मॉडेल रस्त्यांचे एका महिन्यात लोकार्पण करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. १५ जुलैच्या दरम्यान दहा रस्त्यांचे लोकार्पण होणे शक्य असल्याचे बोलले जात आहे.

राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी पालिकेला शंभर कोटी रुपये दिले आहेत. या अनुदानातून ३० सिमेंट रस्ते करण्याच्या निर्णय घेण्यात आला. त्यापैकी १६ रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत. महापौर नंदकुमार घोडेले यांनी अधिकाऱ्यांसह या कामांची पाहणी केली. त्यापैकी दहा रस्त्यांची कामे एका महिन्यात पूर्ण होऊ शकतील, असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. हे रस्ते मॉडेल रस्ते म्हणून विकसित केले जाणार आहेत. त्यावर लेन मार्किंग, पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही बाजुने साइड ड्रेन, फूटपाथ, दुभाजकांत झाडे लावली जाणार आहेत. दुभाजक व त्यातील झाडांच्या देखभालीचे काम या रस्त्याच्या कंत्राटदारालाच दिले जाणार आहे. रस्त्याच्या 'डिफेक्ट लायब्लिटी पिरियड'मध्ये त्याचा समावेश करण्याचे महापौरांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी महापौरांच्या सोबत पालिकेच्या दक्षता विभागाचे प्रमुख एम. बी. काजी, उप अभियंता बी. डी. फड, फारुक खान, शफी, ढेंगे आदी उपस्थित होते.

\Bही रस्ते मॉडेल \B

मॉडेल रस्त्यांमध्ये नंदनवन कॉलनी, डी मार्ट ते सिद्धार्थ चौक, टीव्ही सेंटर चौक ते सेव्हन हिल्स, आझाद चौक ते बजरंग चौक, चिश्तिया चौक ते बळीराम पाटील चौक, हायकोर्ट ते कामगार चौक या रस्त्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग संवर्धन संस्थेतर्फे रविवारपासून योग सप्ताह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जागतिक योग दिनानिमित्त योग संवर्धन संस्थेने १६ ते २१ जून या कालावधीत योग सप्ताहाचे आयोजन केले आहे. यानिमित्त व्याख्यान, योग शिबिरांपासून ते योग फेरीपर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून योगाचा प्रचार व प्रचार केला जाणार आहे.

यानिमित्त योगविद्या गुरुकुलच्या (नाशिक) कुलसचिव पौर्णिमा विश्‍वास मंडलिक यांचे रविवारी (१६ जून) 'आरोग्याचे दिव्य चिंतन' या विषयावर व्याख्यान होणार आहे. भानुदास चव्हाण सभागृहात दुपारी चार ते साडेसहा या वेळेत व्याख्यान होणार आहे; तसेच गुरुवारी (२० जून) सकाळी सातला योग फेरी काढण्यात येणार आहे. ही फेरी क्रांती चौक ते डेअरी, काल्डा कॉर्नर, चेतक घोडा, रामायणा हॉल, उल्कनगरीमार्गे विभागीय क्रीडा संकुलात पोचेल. तेथे फेरीचा समारोप होईल. फेरी विविध शाळा, महाविद्यालय व शहरातील योग प्रचार, प्रसार करणाऱ्या २० संस्थांचे पदाधिकारी सहभागी होतील. जागतिक योग दिनी शुक्रवारी (२१ जून) शहरातील विविध भागांत योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सिद्धार्थ उद्यानामध्ये पहाटे साडेपाच ते सात या वेळेत योग शिबिर घेण्यात येईल. योग मित्र मंडळ व योग संवर्धन संस्थेच्या वतीने स्वामी शिवानंद योग केंद्र (सिडको-एन-५) येथे सकाळी सहा ते साडेसात या वेळेत योग शिबिर होईल. त्याचबरोबर याच कालावधीत शहरातील अन्य पाच ठिकाणी मोफत शिबिरे होणार आहेत. सर्व योग प्रेमींनी कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या कार्याध्यक्षा डॉ. चारुलता रोजेकर, सचिव श्रीकांत पत्की व योगशिक्षक उमेश दरक यांनी शुक्रवारी (१४ जून) पत्रकार परिषदेत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांवरच्या फांद्या उचलणार कोण ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चार दिवसांपूर्वी शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळात २५हून अधिक झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या फांद्या, झाडे तशीच आहेत. ते उचलणार कोण?, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

शनिवार, रविवार व सोमवारी सलग तीन दिवस शहरात पावसाने हजेरी लावली. सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यात अनेक झाडे उन्मळून पडली. फांद्या व झाडे वीजतारांवर पडून मोठे नुकसान झाले. वीजपुरवठा खंडित झाला. रात्री उशिरपर्यंत युद्धपातळीवर यंत्रणा राबवून महापालिका, महावितरणने वीजपुरवठा सुरळीत केला आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्ते तात्पुरत्या स्वरुपात मोकळे करून दिले. चार दिवस उलटून गेल्यानंतरही बहुतांश ठिकाणच्या फांद्या रस्त्यावर पडून आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. महावितरण आणि अग्निशमन दलाने नागरिकांच्या सोयीसाठी दुरुस्ती केली. महापालिकेच्या स्वच्छता विभागाने या फांद्या उचलून नेणे अपेक्षित आहे. मात्र यंत्रणांच्या टोलवाटोलवीत नागरिकांचे हाल होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेट फुगवू नका; महापौरांची सूचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बजेट फुगवू नका, पण बजेटमध्ये अत्यावश्यक कामांचा समावेश करा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी महापालिकेच्या लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी लेखा विभागास भेट देवून बजेटचा आढावा घेतला.

लोकसभा निवडणुकीमुळे महापालिका प्रशासनाने चार महिन्यांसाठी लेखानुदान सादर केले होते. आचारसंहितेनंतर उर्वरित वर्षाचे बजेट तयार करण्यात येत आहे. महापौरांनी लेखा विभागाला भेट देऊन स्पील ओव्हरची कामे, नियमित कामांचा समावेश यावर चर्चा केली. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालून बजेट करावे, अत्यावश्यक कामांचा समावेश करावा, त्यासाठी सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांशी चर्चा करून अत्यावश्यक कामांची माहिती घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. त्यांनी आरोग्य विभागालाही भेट दिली. पावसाळ्यात साथरोगांना पायबंद घालण्यासाठीच्या नियोजनाची माहिती त्यांनी घेतली. आरोग्य विभाग सतर्क असला पाहीजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोजगार नसल्याने भाषा विषयांना घरघर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाषा आणि सामाजिकशास्त्रे विषयांना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने विद्यापीठातील विभाग रिकामे राहण्याची भीती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 'सीईटी'साठी भाषा विषयांसाठी दहांपेक्षा कमी नोंदणी झाली आहे. रोजगाराभिमुख कौशल्य नसल्याने विद्यार्थी विभागाकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दरवर्षी भाषा, फाइन आर्ट, सामाजिकशास्त्रे विभागातील घटती प्रवेशसंख्या चिंताजनक आहे. भाषा विषयाला प्रवेश घेण्याचा कल दिवसेंदिवस कमी झाला आहे. मागील वर्षी संस्कृत, उर्दू, पाली विषयांना प्रत्येकी पाच ते नऊ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. या विभागांची प्रवेश क्षमता ७० विद्यार्थ्यांची आहे. सामाजिकशास्त्रात समाजशास्त्र व अर्थशास्त्राचा अपवाद वगळता इतर विषयांना जेमतेम प्रतिसाद मिळाला. नियमित नसलेल्या तासिका आणि रोजगाराच्या संधीचा अभाव असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, संस्कृत विषयांनाही कमी प्रतिसाद असल्याने विद्यापीठाच्या शैक्षणिक दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी विभागात अनुवाद, संहिता लेखन, मुद्रितशोधन हे पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आले होते. पूर्णवेळ प्राध्यापक नसल्यामुळे पदविका अभ्यासक्रम बंद पडले. 'सीएचबी' प्राध्यापकांची नेमणूक वेळेवर होत नसल्याने अभ्यासक्रमाची विचारणा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नकार मिळत आहे. किमान कौशल्य विकसित करणारे अभ्यासक्रम नसल्यामुळे विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याची वस्तुस्थिती आहे. रसायनशास्त्राच्या ७० जागांसाठी एक हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व परीक्षा दिली. संगणक व माहितीशास्त्र, केमिकल टेक्नॉलॉजी, प्राणिशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र विषयांना पुरेसे प्रवेश आहेत. इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन, राज्यशास्त्र विषयांची उपयुक्तताही विद्यार्थ्यांना नोकरीसाठी वाटत नाही. त्यामुळेच विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रम शिकण्यावर भर देत आहेत.

\Bअर्ध्यात सोडले अभ्यासक्रम\B

भाषा व सामाजिकशास्त्रे विषयांना प्रवेश घेणारे विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करीत नसल्याचे पाहणीत आढळले. द्वितीय सत्रानंतर मोजकेच विद्यार्थी उरतात. स्पर्धा परीक्षा किंवा अन्य संधीच्या शोधातील विद्यार्थी पारंपरिक अभ्यासक्रमात अडकत नाहीत. या विषयात पदवी घेतल्यानंतर नोकरी मिळणे कठीण असल्याचे लक्षात येताच विद्यार्थी अभ्यासक्रम सोडतात. या गळतीकडे विद्यापीठ प्रशासनाने अद्याप तरी लक्ष दिलेले नाही.

विद्यार्थी तोच अभ्यासक्रम निवडतात, जो पूर्ण केल्यानंतर नोकरीची हमी असते. भाषा आणि सामाजिकशास्त्रे जुन्याच साच्यात अडकलेली आहेत. रोजगाराभिमुख अभ्यासक्रम असल्यास विद्यार्थ्यांचा कल वाढून प्रवेश क्षमतेवर परिणाम होणार नाही. याबाबत निश्चित विचार करण्यात येईल.

-डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images