Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘डी. फार्मसी’ला शिक्षक नाहीत; सरकारनेच केले मान्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय औषधनिर्माणशास्त्र कॉलेजांमध्ये सुरू असलेल्या 'डॉक्टर ऑफ फार्मसी'चा मुद्दा विधीमंडळात गाजला. अभ्यासक्रमानंतर पदनिर्मिती नाही, अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आलेल्या नाहीत, असे सरकारतर्फे सांगण्यात आले. शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत तासिका तत्वावर शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

राज्यात औरंगाबाद व अमरावती येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र कॉलेजांमध्ये हा अभ्यासक्रम २०११मध्ये सुरू करण्यात आला. मात्र, आवश्यक सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. अभ्यासक्रम सुरू करताना सांगण्यात आलेल्या सोयीसुविधा नसल्याने अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झाला आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले. राज्यभर विद्यार्थ्यांचे आंदोलन गाजले. गुरुवारी विधीमंडळ अधिवेशनात धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण, हेमंत टकले, विक्रम काळे, अब्दुल्ला खान दुर्राणी यांनी प्रश्न उपस्थित केला. अभ्यासक्रमाबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. यामध्ये पदवी प्रमाणत्र न मिळणे, अभ्यासक्रम शिकविण्यासाठी पात्र शिक्षकांची पदे भरलेली नाहीत, शिष्यवृत्ती बंद अशा प्रश्नांचा समावेश होता. तावडे यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, सहा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तीर्ण झालेल्या पहिल्या तुकडीकरिता पदवी प्रमाणपत्र देण्यासाठीची आवश्यक कार्यवाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्यापातळीवर सुरू आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या नामांकनानुसार २२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शासनाने पदनिर्मिती केली नाही, हे खरे का? याबाबत विचारलेल्या प्रश्नाला तावडे यांनी होय, असे उत्तर दिले. यासह ओबीसी, एसबीसी, व्हीजे, एनटीच्या विद्यार्थ्यांना २०११-१२, २०१३-१४ या शैक्षणिक वर्षाची शिष्यवृत्ती दिली नाही, हे खरे का? या प्रश्नाला नाही, असे उत्तर दिले. यासह अभ्यासक्रमासाठी शिक्षकांच्या २२ आणि २४ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनास मिळाला असून तो विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अंडी, ब्रेड देणे बंद

$
0
0

औरंगाबाद: घाटी रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहारातून अंडी, ब्रेड देणे बंद झाले आहेत. बिले थकल्याने कंत्राटदाराने पुरवठा बंद केला असून, दोन महिन्यांपासून नाष्ट्यात केवळ पोहे व गूळ-शेंगदाण्याचे लाडू दिले जात आहेत. प्रशासनाकडून वॉर्डांमध्ये दाखल रुग्णांना नाश्ता व जेवण दिले जाते. रुग्णांना जेवणाबरोबर अंडी, गूळ, शेंगदाण्याचा लाडू तसेच दूध, ब्रेड दिले जाते. मात्र थकित बिलासाठी कंत्राटदाराने अंडी, ब्रेडचा पुरवठा बंद केल्याची स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीईटी’कक्षातर्फे २४ पासून नव्याने प्रक्रिया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) चार अभ्यासक्रमासाठी राबविण्यात येत असलेल्या नोंदणी प्रक्रियेत सर्व्हर बंद पडल्यामुळे चार दिवसांपासून राज्यातील विद्यार्थी व पालक हैराण झाले आहेत. सर्व्हर सुरळीत होत नसल्यामुळे 'सीईटी सेल'वर सर्व प्रक्रियाच नव्याने करण्याची नामुष्की आली आहे. आता ही प्रक्रिया २४ जून पासून राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा नव्याने अर्ज भरावा लागणार आहे.कक्षाने तसे परिपत्रक जाहीर केले.

कक्षाने जाही केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, 'एसएएआर' पोर्टलवर जनरल रजिस्ट्रेशन व सीईटी पोर्टलवर प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचे काम सुरू केले होते. एकाच वेळी सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी व त्या अनुषंगाने प्रवेश प्रक्रिया अर्ज भरण्यास सुरुवात केल्यामुळे सर्व्हरवरील ताण वाढल्याने प्रक्रिया संथ गतीने झाली. सदोष माहितीआधारे अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे धोकादायक असल्याने ही प्रक्रिया संस्थगित करून नव्याने प्रक्रिया राबविण्याचा निर्णय प्रवेश नियामक प्राधिकरणाने घेतलेला आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ जूनपासून सुरू करण्यात येईल. त्याचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरलेला आहे, अशा सर्वांना पुन्हा नव्याने प्रक्रियेसाठी अर्ज सादर करावा लागणार आहे.

राज्यातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे १७ जूनपासून सुरू आहे. यामध्ये अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर अशा अभ्यासक्रमांची कागदपत्र पडताळणी, निश्चिती, कृषी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना माहिती अपलोड करणे यासह विविध अभ्यासक्रमांची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन होत असलेली ही प्रक्रिया पहिल्या दिवशीपासून रडतपडत सुरू आहे. १८ जूनपासून तांत्रिक बिघाड वाढला आणि पूर्ण यंत्रणाच ठप्प पडलेली आहे. गुरुवारी पहाटे यंत्रणा सुरू झाली आणि सेतु सुविधा केंद्रावर सकाळी आठपासून विद्यार्थी, पालकांची गर्दी वाढली. सकाळी दोन तास प्रक्रिया सुरू राहत नाही तोच पुन्हा बंद पडली. त्यामुळे विद्यार्थी, पालकांनी संताप व्यक्त केला. अनेक तास उपाशी पोटी रांगेत थांबलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा सायंकाळी संपली. सायंकाळी प्रक्रिया सुरू होत न तोच सव्वासहा वाजता सर्व्हर पुन्हा ठप्प झाले. राज्यातील हजारो विद्यार्थी यामुळे वैतागले आहेत. संतापाचा कडेलोट झालेल्या विद्यार्थ्यांनी सेतु सुविधा केंद्रावरच नाराजी व्यक्त केली. कक्षाने दिलेल्या हेल्पलाइनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथून कोणीच प्रतिसाद देत नसल्याने विद्यार्थी, पालकांसह सेतु सुविधा केंद्र असलेल्या कॉलेजांमध्येही गोंधळ उडाला. प्रक्रियेकडे डोळे लावून बसलेल्या राज्यातील हजारो पालक, विद्यार्थ्यांचा प्रक्रियेवरून भ्रमनिरास झाला आहे.

\Bप्रवेश परीक्षा कक्ष नापास \B

प्रवेश परीक्षा कक्षाला राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अंदाज आला नाही की, काय असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. राज्यातील केवळ काही अभ्यासक्रमांचीच प्रक्रिया सुरू आहे. त्यात हा गोंधळ उडाला आहे. प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाच्या असलेल्या प्रवेश फेरी अद्याप शिल्लक आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियाही राहिलेली आहे. अभियांत्रिकी, फार्मसी, कृषीसारख्या अभ्यासक्रमांचा विचार केला, तर दोन लाखांपेक्षा अधिक प्रवेश होतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी प्रवेशात परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरावी प्रवेशासाठी बाहेर जिल्ह्यातून विद्यार्थी आला असेल, तर प्रवेश देण्यापूर्वी उपसंचालक कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. 'उत्तीर्ण होण्याच्या अटी'वर अनेक कॉलेजांमध्ये दिल्या जाणाऱ्या भरमसाठ प्रवेशाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यासह प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश झाले का, हे तपासण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात येणार आहेत.

दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रवेशात सुसूत्रता ठेवण्याबाबत सूचना केल्या आहेत. उपसंचालकांमार्फत शिक्षणाधिकाऱ्यांना तसे निर्देश देण्यात आले आहेत. अकरावीची प्रवेश प्रक्रिया मराठवाड्यात फक्त औरंगाबाद शहरात ऑनलाइन, तर इतर ठिकाणी ऑफलाइन आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश, 'हमखास पास'ची हमी यावर बाहेर जिल्ह्यातून विद्यार्थी ठराविक कॉलेजांमध्ये प्रवेश घेणे, असे अनेक गैरप्रकार प्रवेश प्रक्रियेत समोर येतात. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यंदाच्या प्रवेश प्रक्रिया कशी असावी याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. दहापेक्षा अधिक सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या असून त्यांच्या पातळीवर त्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. क्षमतेपेक्षा अधिकचे विद्यार्थी दिले का, हे तपासणीसाठी जिल्हास्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात येणार आहे. बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा असेल, तर त्यासाठी उपसंचालक कार्यालयाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.

\Bअशा आहेत सूचना\B

क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यास प्रवेश देऊ नये, बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रवेश देण्यापूर्वी उपसंचालक कार्यालयाची परवानगी आवश्यक, विनापरवानगी प्रवेश होणार नाहीत याची दक्षता घेणे, अकरावीला प्रवेश विद्यार्थी असतील तेवढेच बारावीला विद्यार्थी राहतील याची दक्षता घेणे, महापालिका, नगरपालिका क्षेत्रापासून दहा किलोमिटर अंतरात उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश झालेत का याच्या तपासणीसाठी भरारी पथकांची नेमणूक, पथकांनी भेट देऊन पडताळणी करणे, त्याची यादी सादर करणे, प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देणाऱ्यांचे अधिकचे प्रवेश तत्काळ थांबवणे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपसरपंचांच्या निवडीला जिल्हाधिकाऱ्यांकडे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

पळसखेडा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाच्या निवडीमध्ये एकछत्री अंमल चालवण्याच्या हेतूने सरपंचांनी दोन मतदानाचा अधिकार वापरून उपसरपंचांची केलेली निवड स्थगित करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण आगवान यांच्या तीन सदस्यांनी औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

पळसखेडा ( खापरखेडा) ग्रुप ग्रामपंचायत रिक्त उपसरपंचपदासाठी तीन जून रोजी निवडणूक घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियम व कायद्याची माहिती दिली नाही. निवडणुकीच्या प्रक्रियेत कायदेशीर बाबींचा अवलंब झाल्याचे दिसून येत नाही. सरपंच कन्हीराम राजपूत यांनी आपल्याला मिळालेल्या संवैधानिक मतदान अधिकाराचा गैरवापर करत आपला एकछत्री अंमल ठेवण्यासाठी निवडणुकीत लोकशाही तत्वांचा भंग केला, असा आरोप करण्यात येत आहे.

आपला एकछत्री अंमल चालण्याच्या हेतूने सरपंचाने सदस्यपदाचे एक मत असंवैधानिकरित्या ज्योती पवार यांच्या बाजूने दिले. त्यामुळे दुसरे उमेदवार लक्ष्मण आगवान यांना समान मते मिळाली. यानतंर राज्य घटनेने दिलेला निर्णायक मताचा आधार घेत आपले मत ज्योती पवार यांच्या बाजूने दिले. यामुळे एक व्यक्ती एकमत या तत्वांचा भंग झाल्याचे निर्दशनास दिसून येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी राज्य घटनेच्या मूळ तत्वांचा भंग करून निर्णय प्रक्रिया नियमबाह्य व चुकीच्या पद्धतीने राबवली आहे. पद व अधिकाराचा गैरवापर केला. शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून काम करणाऱ्या सरपंच, निवडणूक निर्णय अधिकारी यांची चौकशी करून कारवाईची मागणी ग्राम पंचायत सदस्य लक्ष्मण आगवान, निर्मला काकडे, पुष्पा आगवान, जयकोरबाई घुनावत यांनी वेगवेगळ्या निवेदनाद्वारे औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारा टंचाईने पशुपालक हैराण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री सततच्या दुष्काळामुळे यंदा फुलंब्री तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना हिरवा चारा मिळत नाही. त्यामुळे चार हजार ८०० ते साडेपाच हजार रुपये टन यादराने शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाची खरेदी करावी लागत आहे. फुलंब्री तालुक्यात गेल्या चार, पाच वर्षांपासून सतत दुष्काळजन्य परिस्थिती आहे. सातत्याने जाणावणारी पाणी टंचाई, पशुखाद्य; तसेच चाऱ्यांचे वाढलेले भाव, शासनाच्या विविध योजना गावपातळीवर न पोचणे आदी कारणांमुळे जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एकेकाळी मोठ्या संख्येने दिसणारे पाळीव प्राण्यांचे गोठे आता दिवसेंदिवस कमी होत आहे. परिणामी जनावरे राखणाऱ्या शेतकाऱ्यावरही दुष्काळाची कुऱ्हाड कोसळली आहे. ग्रामीण भागात गाय, म्हैस, बैल, शेळ्यांसह इतर पाळीव प्राण्यांची संख्या मोठी होती. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी गाई-म्हशी पाळल्या आहे. दुष्काळावर मात करीत अनेकांनी पशुपालन व दुग्ध व्यवसाय सुरू केला होता मात्र, सतत दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना हिरवा चारा मिळणे अवघड झाले आहे. त्याचा परिणाम दुग्ध व्यवसायावर झाला आहे. दुग्ध व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळतो, परंतु आता हा व्यवसायही धोक्यात आला आहे. पावसाळा सुरू होऊन १५ दिवस झाले तरीही अद्याप पेरणीयोग्य दमदार पाऊस पडलेला नाही. तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यंदा चांगला पाऊस झाला तर, किमान पुढच्या वर्षीतरी चारा टंचाई भासणार नाही, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पूर्वी चांगला पाऊस पडत असल्याने हिरवा चारा मुबलक प्रमाणात मिळत असे. उसाच्या चाऱ्यांच्या पेंडीचे भाव सामान्य शेतकऱ्यांना परवडणारे होते. पाच ते दहा रुपयांत हिरव्यागार लुसलुशीत गवाताचा भारा मिळत असे, परंतु महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला उसाचा चारा न परवडत नाही. शेतकरी आधीच कर्जबाजारी असल्यामुळे आणि त्यातही शेतीला पुरेसे पाणी मिळत नसेल तर, जनावरांची निगा कशी राखायची, असा प्रश्न आहे. दुष्काळजन्य स्थितीत जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबा रामदेव म्हणतात, प्रभू राम हे मुस्लिमांचेही पूर्वज!

$
0
0

नांदेड

हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे. मुस्लिम आमचे बांधव असून आमचे पूर्वज एकच आहेत. त्यामुळे प्रभू राम फक्त हिंदूंचे पूर्वज नसून मुस्लिमांचे ही पूर्वज असल्याचे वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले. पूर्वजांचा सन्मान करायला हवा असे सांगत राम मंदिर बनणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बाबा रामदेव उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी झाले होते. बाबा रामदेव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, प्रभू राम हे राष्ट्राचे पूर्वज आहेत. आस्था ही मोठा बाब असून त्यावर आघात करता कामा नये. सुप्रीम कोर्टाने राम मंदिर वादाबाबत चर्चेसाठी मध्यस्थ नेमला असला त्यातून फार निष्पन्न होत नसल्याचे मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केले. राम मंदिर निर्माणासाठी दुसरा पर्याय म्हणजे लोकांनीच पुढाकार घेऊन मंदिर निर्माणाचे कार्य हाती घेतले पाहिजे. मात्र, त्यालाही काहीजण विरोध करणार असल्याचेही बाबा रामदेव यांनी सांगितले.

राममंदिरासाठी सुप्रीम कोर्टाने लवकरात लकवर सुनावणी घेऊन निर्णय द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राम मंदिर निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाअभावी शेतकऱ्यांनी धरली ‘मनरेगा’ची वाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाला अद्याप सुरुवात झाली नसल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) दुष्काळी कामांवर मराठवाड्यात अद्याप सुमारे एक लाख २२ हजार मजूर काम करत आहेत. जून महिन्याच्या अखेरपर्यंतही समाधानकारक पावसाला सुरुवात न झाल्याने मजूर, शेतकरी रोजगार हमी योजनेच्या कामावर आहेत. दुष्काळाचे सर्वाधिक चटके सहन करत असलेल्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३९ हजार मजूर कामावर आहेत.

यंदा मराठवाड्याला पूर्वमोसमी पावसाने दगा दिल्यामुळे पावसाच्या तोंडावरही आठही जिल्ह्यात सव्वालाख मजूर मनरेगाच्या कामावर आहेत. पाऊस आज पडेल, उद्या पडेल, अशी आशा बाळगून शेतकऱ्यांनी शेती पेरणीसाठी शेत तयार केले आहे. मात्र पावसाने अद्याप कृपादृष्टी केलेली नाही. दुसरीकडे हाताला काम नसल्याने मजूर तसेच शेतकरी मनरेगाच्या कामावर येत आहेत. गेल्यावर्षी अत्यल्प पावसामुळे शेतीचे अर्थचक्र विस्कटले, खरीप पीक करपल्यामुळे मराठवाड्यात शेती आणि शेतकरी या दोघांची अवस्था बिकट झाली आहे. या धक्क्यातून शेतकरी अजून सावरलेले नाहीत. त्यामुळेच ते मनरेगाच्या कामावर अवलंबून असल्याचे दिसते.

मराठवाड्यात बीड, जालना आणि नांदेड जिल्ह्यात मजुरांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्या पाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यात दैनंदिन मजुरांची संख्या दहा हजारांपेक्षा जास्त आहे. मनरेगात प्रत्येकाला काम देण्याचे आश्वासन आहे. त्यानुसार प्रशासनाने शेल्फवरील कामे मोठ्याप्रमाणावर तयार करून ठेवली आहेत. पाऊस पडल्यानंतर मजुरांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

दोन आठवड्यात वाढले ४७ हजार मजूर
एप्रिल महिन्याअखेर मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात ७४ हजार मजूर मनरेगाच्या कामावर होते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या संख्येत झपाट्याने वाढ झाली. ५ जून अखेर ही संख्या एक लाख २२ हजार २२३ झाली होती.

जिल्हानिहाय मजूरसंख्या
(जून पहिला आठवडा)
जिल्हा........................ दैनंदिन संख्या
औरंगाबाद.......................११२३६
जालना..........................२०४९३
परभणी............................५२७८
हिंगोली............................१००९४
बीड................................३९१३८
नांदेड.............................२१४२७
उस्मानाबाद.......................८९५२
लातूर..............................५६०५
--------------------------------
एकूण............................१२२२२३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार जिल्ह्यांत भूकंपाचे सौम्य धक्के

$
0
0

नांदेड :

मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड व विदर्भातील यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे. या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

नांदेडमधील हिमायतनगर तालुक्यात प्रामुख्याने भूकंपाचे जाणवले आहेत. किनवट माहुर तसेच पवना परिसरात भूकंपाच्या धक्क्यानंतर भीतीचे वातावरण आहे. स्थानिक प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक लोक घाबरून रस्त्यावर आले आहेत.

दहा घरांचे नुकसान

रात्री साडेनऊच्या सुमारास विदर्भ-मराठवाड्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर ग्रामीण भागातील लोक घराबाहेर आले. भूकंपामुळे माहूर येथे काही घरांवरील टिनाचे पत्रे कोसळले. भिंतींनाही तडे गेल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. घरांमधील लाकडाच्या फळ्यांवरील भांडी खाली पडली. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात सदोबा-सावळीपासून काही अंतरावर असलेल्या चिंचबर्डी, बारभाई, इचोरा, माळेगाव, वरुड-उमरी या गावात हे धक्के जाणवले. महागाव तालुक्यातील हे धक्के बसले. दरम्यान या धक्क्यांमुळे किनवट तालुक्यातील दहा घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून जिल्हा प्रशासन पुढील उपाय करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘योगासन निरोगी जीवनाची गुरूकिल्ली’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आजच्या धक्काधकीच्या जीवनात शारीरिक व्याधीसोबतच मानसिक ताणतणाव वाढले आहे. योगासन ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले. ते विद्यापीठात बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जागतिक योगदिनानिमित्त शुक्रवारी सकाळी योग शिबिर घेण्यात आले. योगशास्त्र विभाग, क्रीडा विभाग, विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने बॅडमिंटन हॉलमध्ये योग शिबिर झाले. या शिबिरात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कुलसचिव डॉ. साधना पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. संजय साळुंखे, डॉ. गणेश मंझा यांची प्रमुख उपस्थिती होती. 'योग ही नियमित करण्याची प्रक्रिया असून शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वैचारिक आणि भावनिक पातळीवर संतुलित राहण्यासाठी योग आवश्यक आहे,' असे कुलगुरू शिंदे म्हणाले. अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी ताडासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, वृक्षासन, पादहस्तासन, भद्रासन, वज्जासन, अर्ध उष्ट्रासन, उष्ट्रासन केले. शिबिरासाठी डॉ. मुस्तजिब खान, डॉ. टी. आर. पाटील, डॉ. जयंत शेवतेकर व डॉ. सोनाली क्षीरसागर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पीलची यादी मिळेना, अर्थसंकल्प रखडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्पीलच्या कामांची यादी वॉर्ड कार्यालयांकडून मिळत नसल्यामुळे अर्थसंकल्प तयार करण्याचे काम रखडले असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी लेखा विभागात जाऊन अर्थसंकल्पाच्या तयारीसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकसभा निवडणूकीमुळे पालिका प्रशासनाने लेखानुदान सादर केले होते, आता २०१९-२० वर्षाचा उर्वरित अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी लेखा विभागाने सुरू केली आहे, परंतु या कामाला गती आली नाही. गती न येण्याचे कारण महापौरांनी विचारले असता वॉर्ड कार्यालयांकडून स्पीलच्या कामांची यादीच मिळाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अर्थसंकल्प तयार करताना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करा, अशी सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी त्यांच्या बरोबर स्थायी समितीच्या सभापती जयश्री कुलकर्णी, सभागृहनेते विकास जैन उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१७ किलो प्लास्टिक जप्त, पालिकेची कारवाई

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

महापालिकेने प्लास्टिक विरोधी कारवाई करीत १८ ते २१ जूनच्या दरम्यान २१७.३ किलो प्लास्टिक जप्त केले आणि एक लाख ३६ हजार ४०० रुपयांचा दंड वसुल केला. १४० दुकानदारांकडून ही दंडाची रक्कम वसुल करण्यात आली. चार दिवसांमध्ये पालिकेच्या पथकाने ९३९ दुकानांची तपासणी केली. प्लास्टिक विरोधातील कारवाई या पुढेही सुरुच राहील असे पालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशेष मुलांनी केला योगाभ्यास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'विशेष मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा हा अनोखा योगदिन पाहणे, अनुभवणे माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. संगीताचा उपयोग विशेष मुलांसाठी होतो हे पाहून माझे संगीतावरील प्रेम अजूनच वाढले,' असे प्रतिपादन पंडित विश्वनाथ ओक यांनी केले.

अपंग सबलीकरण संस्था मार्गतर्फे शुक्रवारी योगदिन पाटीदार भवन येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शहरातील आरंभ ऑटिझम सेंटर, आय प्रोग्रेस, यलो स्कूल, उत्कर्ष कर्णबधीर मुलांची शाळा, स्वयंसिद्ध, इंदिरा गांधी मूकबधीर विद्यालय, श्रुती वाणी, कानिफनाथ, तारामती बाफना अंध विद्यालय आदी शाळांतील विशेष मुलांनी सहभाग घेतला. पंडित विश्वनाथ ओक, डॉ. मिलिंद धनेश्वर, योग शिक्षिक बाळासाहेब जोशी आणि प्राजक्ता कुलकर्णी, मार्गच्या अध्यक्ष डॉ. प्रिया भाले प्रमुख पाहुण्या होत्या. वृषाली पतंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलांकडून योगासने करवून घेतली. हा अनोखा प्रयोग मुलांना आवडला. त्यानंतर म्युझिक थेरेपिस्ट मंजुषा राऊत यांनी ताल आणि सुराच्या समवेत मुलांच्या विविध कृती आणि गाणी घेतली. अमर लाटकर यांनी तबल्यावर साथ दिली. स्वयंसिद्धची दक्षा गाडे आणि आरंभची भक्ती कुलकर्णी यांनी गाणे सादर केले. मानव सेवा ग्रुप आणि इस्कॉन यांनी सहकार्य केले. यावेळी जयश्री गोडसे, मार्गच्या उपाध्यक्ष अर्चना जोशी, अंबिका टाकळकर, वर्षा भाले, अंजू तायल, डॉ. अंजली बंगलोर, नीता देवळाणकर, कविता अग्निहोत्री उपस्थित होत्या. रुपाली जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

\Bपुरस्कार प्रदान \B

मार्ग संस्थेने दृष्टीबाधित असूनही राष्ट्रीय स्तरावर योगासने, मैदानी खेळ आणि विविध कलांमध्ये सन्मानित औरंगाबादची शिवानी पाटील आणि दृष्टीबाधित गायक दिलावर पठाण यांचा विशेष सन्मान केला. स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम पुरस्काराचे स्वरूप होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवस तुझे हे फुलायचे…

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आपल्या अवीट गायकीने घराघरात पोहचलेले गायक अरूण दाते यांना 'नवा शुक्रतारा' कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. दर्जेदार भावगीतांनी रसिकांना अंतर्मुख केले. दाते यांचा सांगितीक प्रवास नवीन पिढीतील गायकांनी नेमका सादर केला.

प्रसिद्ध गायक अरुण दाते यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त अरुण दाते कला अकादमी आणि गेट सेट गो यांच्या वतीने 'नवा शुक्रतारा' संगीतमय कार्यक्रम घेण्यात आला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शुक्रवारी सायंकाळी कार्यक्रम पार पडला. 'शुक्रतारा'च्या माध्यमातून घराघरात पोहचलेल्या अरुण दाते यांच्या गीतांना आणि स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरला. गायक-संगीतकार मंदार आपटे, गायक श्रीरंग भावे, गायिका मनिषा निश्चल यांनी दाते यांची गाजलेली गाणी सादर केली. श्रीराम जय राम जय जय राम या गीताने मैफलीला सुरुवात झाली. मंदार भावे यांनी गायलेल्या 'स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला' गीताला उत्तम प्रतिसाद मिळाला. 'दिवस तुझे हे फुलायचे', 'देवाघरच्या फुला', 'भेट तुझी नि माझी', 'दिस नकळत जाई', 'येशील येशील राणी', 'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी', 'शुक्रतारा मंदवारा' अशा अवीट गाण्यांनी मैफल रंगली. अनुश्री फडणीस व अतुल दाते यांनी निवेदन केले. अरुण दाते यांच्या आठवणी आणि किस्से अतुल यांनी सांगताच रसिक भारावून गेले. अमित ओक, मिलिंद डोलारे, जीवन कुलकर्णी, गणेश चव्हाण, राहुल जोशी यांनी संगीत साथसंगत केली. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'हात तुझा हातातून'चे प्रकाशन

अरुण दाते यांचा मुलगा अतुल दाते यांनी वडीलांच्या आठवणी शब्दबद्ध करीत लिहिलेल्या 'हात तुझा हातातून' या पुस्तकाचे कवी दासू वैद्य यांनी प्रकाशन केले. यावेळी अतुल दाते व कुलकर्णी उपस्थित होते. मुलगा आपल्या वडिलांच्या कारकिर्दीकडे कसे पाहतो ते म्हणजे हे पुस्तक आहे. वडीलांचे संचित त्यांनी आपल्यापर्यंत पोहचवले, असे दासू म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव येथील घरफोडी गुन्हे शाखेकडून उघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालेगाव (जि. नाशिक) येथे घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या आरोपींच्या ताब्यातून घरफोडीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींना पुढील तपासासाठी मालेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

मालेगाव येथील एका घरफोडीत हर्सूल परिसरातील धम्मा अशोक कांबळे (वय २५ रा. चेतनानगर, हर्सूल) याचा सहभाग असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पथकाने कांबळेला ताब्यात घेतले. कांबळेची चौकशी केली असता त्याने मालेगाव येथील एक बंद घर फोडल्याची माहिती दिली. कांबळे याच्यासोबत विनोद विजय बत्तीसे (वय २३, रा. मिलिंदनगर, उस्मानपुरा) आणि संतोष राजू खरे (वय २५ रा. मिलिंदनगर) हे दोघे असल्याची माहिती दिली. या माहितीवरून पथकाने सापळा रचून पिरबाजार भागात विनोद बत्तीसे याला ताब्यात घेतले. विनोदजवळ असलेल्या पिशवीमध्ये घरफोडीतील चांदीची भांडी पोलिसांना झडतीमध्ये आढळली. पोलिसांनी धम्मा कांबळे आणि विनोद बत्तीसेला मालेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अजबसिंग जारवाल, जमादार शिवाजी झिने, राजेंद्र साळूंके, गजानन मांटे, प्रभाकर राऊत आणि विशाल सोनवणे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विधानसभा निवडणुकीपूर्वी नवीन पाणी योजना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरासाठीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ विधानसभा निवडणुकीपूर्वी होणार आहे. नवीन पाणीपुरवठा योजना २५०० मिलीमीटर व्यासाची राहणार असून त्याचा सर्व खर्च शासन करणार आहे. येत्या १५ जुलैपर्यंत नवीन योजनेला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद शहरासाठी एकत्रित पाणीपुरवठा योजना तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांना दिले होते. त्यानुसार, महापालिकेने 'पीएमसी'च्या माध्यमातून तयार केलेल्या २२४५ मिलीमीटर व्यासाच्या नवीन जलवाहिनीच्या 'डीपीआर'चे गुरुवार व शुक्रवार, असे दोन दिवस मुंबईत नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या समोर सादरीकरण करण्यात आले. त्यांनी जलवाहिनीचा व्यास वाढवण्यात मान्यता दिली. त्यानुसार, आता २५०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे.

याच संदर्भात उपमहापौर विजय औताडे यांनी मुंबईहून माहिती दिली. औताडे म्हणाले, पाणीपुरवठा योजनेच्या नवीन प्रस्तावाबद्दल राज्यमंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सायंकाळी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी पालिकेतील भाजप गटनेते प्रमोद राठोड उपस्थित होते. सखोल चर्चेत औरंगाबादचा पाणीप्रश्न सुटला पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. २५०० मिलीमीटर व्यासाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला शासन मंजुरी देईल व विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेचे काम सुरू करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती औताडे यांनी दिली.

२५०० मिलीमीटर व्यासाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव महापालिकेने येत्या दहा दिवसांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर करावा. प्राधिकरणाने या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता देवून तो १० जुलैपर्यंत नगरविकास खात्यास सादर करावा. १५ जुलैपर्यंत शासनाकडून प्रस्तावाला अंतिम मान्यता दिली जाईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे औताडे यांनी सांगितले. नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी १५०० कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता असून तो शासनाकडून देण्याची तयारी देखील मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे.

महापालिकेच्या कारभाराची पद्धत लक्षात घेता नवीन योजनेचे काम पालिकेच्या पातळीवर होण्याची शक्यता नसल्याने शासनाने योजनेवर विशेष अधिकारी नेमावा, त्याच्या देखरेखीत योजनेचे काम पूर्ण करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. त्यावेळी योजनेच्या कामाचा आढावा नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव दर आठवड्याला घेतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे औताडेंनी सांगितले.

\Bनवीन योजनेची वैशिष्ट्ये \B

- जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी

- फारोळा ऐवजी नक्षत्रवाडी येथे जलशुद्धीकरण केंद्र

- योजनेत ५० नवीन जलकुंभ

- २३०० किलोमीटरची अंतर्गत जलवाहिन्या

- औरंगाबाद शहरासह सिडको-हडको परिसर, सातारा-देवळाई, गुंठेवारी व नो नेटवर्क एरियातील वसाहती, झालर पट्ट्यातील पालिकेच्या हद्दीत असलेल्या गावांचा समावेश.

\Bरस्त्यांची यादी मुख्यमंत्र्यांच्या हाती\B

महापालिका पदाधिकाऱ्यांनी तयार केलेली २२५ कोटी रुपयांच्या रस्त्यांची यादी मुख्यमंत्र्यांना सादर केल्याचे उपमहापौर विजय औताडे यांनी सांगितले. या यादीला तांत्रिक मान्यता घेण्याची सूचना त्यांनी केली. रस्त्यांच्या कामासाठी पैसा देणारच आहोत, पण त्याआधी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु करू, असे मुख्यमंत्री सांगितल्याचे औताडेंनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे पाच विषयांचे गुणच प्रवेशास ग्राह्य

$
0
0

म. . प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरावी प्रवेशासाठी आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे पाच विषयांचेच गुण ग्राह्य धरले जातील असे शासनाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने नुकतेच एक परिपत्रक काढले आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या सह सचिव डॉ. सुवर्णा खरात यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, सीबीएसई आणि आयसीएसई मंडळांच्या विषयांची संख्या; तसेच गुण पद्धती राज्य मंडळापेक्षा वेगळी आहे. या मंडळाचे विद्यार्थी राज्य मंडळाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असल्यास अशा विद्यार्थ्यांच्या गुणांसदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयात म्हटले आहे की, आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांबाबत गुणपत्रिकेवर सरासरी गुण दाखवण्यात आले आहेत. हे सरासरी गुण ग्राह्य धरण्यात येतील. उत्रपत्रिकेवर एकूण सहा विषयांचे सरासरी गुण दाखवण्यात आले आहेत, त्यापैकी पाच विषयांचे सरासरी गुण अकरावीच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड, हिंगोली जिल्ह्यात भूकंप

$
0
0

नांदेड: मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड व विदर्भातील यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली. या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक घरे सोडून रस्त्यावर आले आहेत. यवतमाळ, नांदेड जिल्ह्याच्या अनेक भागात भूकंपाचे जाणवले. यवतमाळमध्ये महागाव, उमरखेड, तर नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर, हिमायतनगर, हदगाव तालुक्यात भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या शिवाय काही भागात भूकंपाच्या धक्क्यामुळे कच्ची घरे पडल्याचे वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्ष, सचिवांच्या कोठडीत रविवारपर्यंत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) जनश्री योजनेत ९९ लाखांचा अपहार केल्याच्या प्रकरणात सप्तशृंगी बहुद्देशीय सेवाभावी संस्था व विशाल प्रतिष्ठान बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष भारत बोराडे, सचिव नंदा बोराडे-कानडे व आनंद श्यामकुळे या आरोपींच्या पोलिस कोठडीत पुन्हा रविवारपर्यंत (२३ जून) वाढ करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. मोटे यांनी शुक्रवारी (२१ जून) दिले. 'एलआयसी'च्या जनश्री योजनेत अपहार केल्याच्या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून, ते सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रकरणातील आरोपी मुरलीधर खाजेकरने पोलिस कोठडीदरम्यान आरोपी रिक्षाचालक राजेंद्र नागरेकडून मृत्यू प्रमाणपत्र घेतल्याचे सांगितल्यामुळे राजेंद्र नागरे यास अटक करण्यात आली होती. दरम्यान, नागरे याने पोलिस कोठडीदरम्यान सप्तशृंगी बहुद्देशीय सेवाभावी संस्था व विशाल प्रतिष्ठान बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष भारत बोराडे, सचिव नंदा बोराडे-कानडे व आनंद श्यामकुळे यांची नावे सांगितल्याने तिघांना १५ जून रोजी रात्री अटक करण्यात आली होती व त्यांना शुक्रवारपर्यंत (२१ जून) पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, तिघांची १६३ अतिरिक्त प्रकरणे उघडकीस आली असून, त्याच्या तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. ही विनंती मान्य करुन तिघांच्या पोलिस कोठडीत रविवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका शाळेत ‘स्मार्ट सिटी’तून वर्ग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी मिशनमधून महापालिकेच्या शाळेत पाच नवीन वर्गांची सुरुवात करण्यात आली आहे. त्याशिवाय सहा शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग देखील सुरू करण्यात आले आहेत.

स्मार्ट सिटी मिशनच्या माध्यमातून पालिका शाळेतील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी काम केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पडेगाव येथील शाळेत या वर्षीपासून आठवीचा वर्ग सुरू करण्यात आला. आरेफ कॉलनी येथील शाळेत सहावीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे. ज्युबली पार्कच्या शाळेत आठवीचा, सिल्कमिल कॉलनीच्या शाळेत दहावीचा, सिल्लेखाना येथील शाळेत पाचवीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे. आरेफ कॉलनी, पडेगाव, ज्युबलीपार्क, चेलिपुरा, शहाबाजार, गणेश कॉलनी या शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी शासनाकडून पालिकेला अद्याप पैसे प्राप्त झाले नाहीत. शासनाच्या पैशांची वाट न पाहता पालिका फंडातून विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी पैसे देण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले होते. त्यानुसार ११ हजार विद्यार्थ्यांसाठी ६६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. हा निधी त्या त्या शालेय समितीला देण्यात आला आहे. एका विद्यार्थ्याला दोन गणवेश खरेदी करण्यासाठी प्रत्येकी ६०० रुपये दिले जाणार आहेत.

शिक्षण हक्क कायद्यानुसार पालिका क्षेत्रातील शाळांमध्ये प्रवेश देण्याची जबाबदारी शासनाने महापालिकेवर टाकली आहे. पालिकेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १७०० प्रवेश देण्यात आले आहेत. उर्वरित प्रवेश दुसऱ्या टप्प्यात केले जाणार आहेत.

\Bशाळांमध्ये सोमवारी वृक्षारोपण\B

महापालिकेच्या शाळा ११ केंद्रांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. ११ केंद्रांमधील प्रत्येकी एका शाळेत सोमवारी वृक्षारोपण केले जाणार आहे, अशी माहिती महापौर घोडेले यांनी दिली. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातून शाळेच्या आवारात झाड लावण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images