Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वाघांचे बछडे खुल्या पिंजऱ्यात खेळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील समृद्धी या वाघिणीचे बछडे पंधरा दिवसानंतर खुल्या पिंजऱ्यात बागडणार आहेत. त्यामुळे प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना हे बछडे आकर्षणाचा विषय ठरणार आहेत.

समृद्धी वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला. या बछड्यांचे वय आता दोन महिने दहा दिवस झाले आहे. पायात पूर्णपणे ताकद येईपर्यंत त्यांना बंदिस्त पिंजऱ्यात आईजवळ ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. सध्या हे बछडे बंदिस्त पिंजऱ्यातच आहेत. त्यांची वाढ उत्तम होत असल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाचे कार्यालयीन अधीक्षक संजय नंदन यांनी दिली. बछड्यांचे वजन पाच किलोच्या जवळपास आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. समृद्धीला रोज दोन तास खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात येते. दोन तासांनंतर तिला पुन्हा पिंजऱ्यात बंद केले जाते. बछड्यांचे पोषण आईच्या दुधावरच होत आहे. परंतु त्यांना सवय व्हावी, म्हणून चिकनचे तुकडे चघळण्यासाठी टाकले जातात. बछड्यांची काळजी घेण्यासाठी तीन कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. दोन कर्मचारी दिवसा तर एकजण रात्री बछड्यांवर लक्ष ठेवण्याचे काम करतात. डॉक्टरांकडून बछड्यांची आरोग्य तपासणी केली जाते. स्वत:च्या पायावर चालण्याचा - पळण्याचा विश्वास बछड्यांमध्ये निर्माण झाल्यावर त्यांना खुल्या पिंजऱ्यात सोडले जाणार आहे. त्यासाठी किमान पंधरा दिवस लागतील, असे नंदन यांनी सांगितले.

\Bअवधी टप्प्याने वाढवणार

\Bबछड्यांना सुरुवातीला सकाळी लवकर खुल्या पिंजऱ्यात सोडण्याचे नियोजन केले जात आहे. प्राणिसंग्रहालय सकाळी नऊ वाजता सुरू होते, त्यापूर्वीच बछड्यांना खुल्या पिंजऱ्यात सोडून नऊ वाजता पुन्हा त्यांना बंदिस्त पिंजऱ्यात घेतले जाईल. प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या गोंगाटामुळे बछडे गांगरून जाऊ नयेत म्हणून ही खबरदारी घेतली जाणार आहे. खुल्या पिंजऱ्याचा अंदाज आल्यावर त्यांचा या पिंजऱ्यातील अवधी टप्प्या टप्प्याने वाढवला जाणार आहे. बछड्यांची खुल्या पिंजऱ्यातील दंगामस्ती प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी येणाऱ्यांना आकर्षणाचा नवीन विषय ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेटिनोपॅथीला दूर ठेवा मधुमेह नियंत्रणात ठेऊन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाढत्या मधुमेहाच्या प्रमाणामुळे डोळ्याच्या रेटिनावर गंभीर परिणाम होण्याचे प्रमाणही अलीकडे वाढले आहे. परिणामी, मधुमेहींमध्ये रेटिनोपॅथी हा गंभीर आजार झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे व अंधत्वापर्यंतच्या विविध दुष्परिणामांचे दुष्टचक्र बघावयास मिळत आहे. त्यामुळेच रेटिनोपॅथीला दूर ठेवण्यासाठी आधी मधुमेहाला नियंत्रणात ठेवा, वेळच्या वेळी निदान करा व लवकरात लवकर उपचार सुरू करा, असे आवाहन रेटिना तज्ज्ञांनी डायबेटिक रेटिनोपॅथी परिषदेत केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (घाटी) नेत्रचिकित्साशास्त्र विभाग, वैद्यकीय संशोधन समिती व नेत्रशल्यचिकित्सक असोसिएशनच्या वतीने रविवारी (७ जुलै) हॉटेल ग्रँड कैलास येथे ही परिषद घेण्यात आली. या परिषदेच्या उद्घाटनावेळी पुणे येथील नेत्रतज्ञ डॉ. नितीन प्रभुदेसाई, डॉ. मेधा प्रभुदेसाई, नेत्रशल्यचिकित्सक असोसिएशनचे डॉ. सुनील कसबेकर, डॉ. आनंद पिंपरकर, घाटीच्या नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. पहिल्या सत्रात डॉ. अर्चना वारे म्हणाल्या, मधुमेह हा एकेकाळी श्रीमंताचा आजार म्हणून ओळखला जात होता व आपल्या देशापेक्षा इतर पाश्चात्य देशांमध्ये मधुमेहाचे प्रमाण एकेकाळी जास्त होते. आता मात्र आपल्या देशात मधुमेहाचे प्रमाण खूप मोठ्या पातळीपर्यंत वाढले आहे व हे प्रमाण आणखी झपाट्याने वाढतच आहे. लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, आहारातील बदल ही मधुमेहामागची कारणे आहेत, असेही डॉ. वारे म्हणाल्या. डॉ. मनोज सासवडे यांनी, डायबेटिक रेटिनोपॅथी हा आजार नेमका कसा ओळखावा, त्याची सामान्य लक्षणे कोणती आदींबाबत मार्गदर्शन केले. तर, मधुमेहाकडे दुर्लक्ष हे अंधत्वाला आमंत्रण देणारे ठरू शकते, असेही डॉ. नांदेडकर म्हणाल्या. याच परिषदेत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, डॉ. जगदीश लोया यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. वैशाली उने यांनी परिषदेचे प्रास्ताविक केले व डॉ. सुरजकुमार कुरील यांनी उपस्थितांचे आभार मानले. या परिषदेत १८० नेत्रतज्ञांची सहभाग नोंदवला.

\Bलेझरद्वारे उपचार शक्य

\Bमधुमेहींनी त्यांच्या रक्तशर्करेबरोबरच डोळ्यांची तपासणी नियमितपणे करणे गरजेचे आहे. अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने रेटिनोपॅथीचे लवकर निदान करणे शक्य झाले आहे, असे डॉ. नितीन प्रभुदेसाई म्हणाले. तसेच मधुमेह जेवढा तीव्र असेल तेवढाच तो डोळ्यांवर परिणाम करतो, असे सांगतानाच डॉ. तम्मेवार यांनी, लेझरद्वारे डोळ्यांच्या पडद्यावर उपचार करणे शक्य झाल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध मागण्यांसाठी उद्या ‘रिक्षा बंद’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रिक्षाचालकांच्या विविध प्रलंबित मांगण्यासाठी मंगळवारी (९ जुलै) राज्यात 'रिक्षा बंद'ची हाक देण्यात आली आहे. यानिमित्त मंगळवारी शहरातील रिक्षा वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती ऑटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीतर्फे शेख लतीफ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत आंदोलन करण्यात येणार आहे.

ऑटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्रतर्फे शासनापुढे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. ऑटो रिक्षाचालक-मालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, राज्यातील ऑटोरिक्षाचे मुक्त परवाने वाटप बंद करावे, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी विशेष भरारी पथकाची नियुक्ती करावी, हकीम समितीच्या शिफारशीनुसार भाडे वाढवावे, विमा रकमेतील भरसाठ वाढ तत्काळ कमी करावी, ओला,उबेर सारख्या अवैध टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करावी, आरसी बूक व ड्रायव्हिंग लायसन्स हे अर्जदाराला थेट देण्याची सुविधा पूर्ववत करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनावरांची वाहतूक करणारे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद संशयितरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. फुलंब्री पोलिस ठाणे हद्दीतील पोखरी येथे रविवारी ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून सहा बैल जप्त करण्यात आले. याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोखरी शिवारात बायपासवर गस्त घालत होते. यावेळी त्यांना एका ट्रकमध्ये जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने ट्रक अडवून तपासणी केली असता आत जनावरे आढळून आली. ट्रकचालक शेख ताहेर शेख उस्मान (वय ४०, रा. देवळाई) याला ताब्यात घेतले असता, त्याने ही जनावरे नायगाव येथील शेख जावेद शेख सुभान (वय ३२, रा. नायगाव) याची असल्याची माहिती दिली. शेख जावेद याला ताब्यात घेतले असता त्याने धुळे येथील बाजारातून ही जनावरे विकत घेतल्याची माहिती दिली. धुळे येथे खातरजमा केली

असता ही जनावरे तेथील नसल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी शेख ताहेर, शेख जावेद आणि शेख खलील शेख समशेर (वय २२, रा. नायगाव) यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून सहा जनावरे; तसेच दोन वाहने जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक

मोक्षदा पाटील, अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पोलिस उपनिरीक्षक सोळुंके, रतन वारे, श्रीमंत भालेराव, विठ्ठल राख, विनोद खांडेभराड,

संजय भोसले, सागर पाटील, राहुल पगारे, विनोद तांगडे आणि रामेश्वर धापसे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरिपावर अस्मानी संकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड अजिंठा-गोळेगाव मंडळात गेल्या दहा दिवसांपासून जोरदार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गोळेगाव मंडळात आजपर्यत २९५ मिमीटर, अजिंठा मंडळात २५१ मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे सुमारे ५०० हेक्टर शेती खरडून गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर शेकडो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सलग चार वर्षे दुष्काळ सहन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर आता आस्मानी संकट घोंघावतांना दिसत आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याच्या मागणीसाठी हतबल शेतकरी आता महसूल प्रशासनाचे उंबरठे झिझवू लागला आहे. अजिंठा मंडळातील शिवना, मादणी, आमसरी, वाघेरा, नाटवी, जळकीबाजार, खुपटा, डिग्रस, गोळेगाव मंडळातील पानवडोद, धोत्रा येथे सलग दहा दिवस जोरदार पाऊस झाला. परिसरातील नदी, नाले ओसंडून वाहत असून, पाणीपुरवठा करणारे स्रोतही १०० टक्के भरल्यात जमा आहे. आधी मान्सूनपूर्व व आता मान्सूनच्या पावसाने परिसर जलमय केला आहे. जोरदार पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नदी-नाल्यांचा प्रवाह शेतशिवरात शिरल्यामुळे पेरणी केलेले क्षेत्रही खरडून गेले आहे. खरिपाची धूळ पेरणी पुरात वाहून गेल्याने आता दुबार पेरणीची वेळ आली आहे, पण त्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसाच उपलब्ध नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षांचे काम बंद मागे; आज आंदोलन नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील राज्यभरातील रिक्षा चालक व मालकांनी बुधवारी पुकारलेला संप मागे घेतला आहे. शहरातील ४७ संघटनांनी बंदची हाक देत महाराष्ट्र अॅटो रिक्षा चालक - मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर राज्य संघटनेने रात्री उशिरा हे आंदोलन मागे घेतले. त्यामुळे बुधवारी शहरात रिक्षा सुरू राहणार आहेत.

राज्यभरातील रिक्षा चालकांचे प्रश्न पाच वर्षांपासून प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर शासनाने कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे हे आंदोलन पुकारण्यात आले होते. मंगळवारी सकाळपासून सर्व रिक्षा बंद राहणार होत्या. कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते १ या दरम्यान निदर्शने करण्यात येणार होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार असल्याची माहिती संघटनेचे शहर अध्यक्ष लतीफ शेख आणि निसार अहेमद खान यांनी दिली होती. दरम्यान, रिक्षा बंद काळात नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून शहर बसची संख्या वाढविण्यात आली होती. सध्या ३६ बस शहरात धावतात. उद्या २७ जादा बस सोडण्यात येणार आहेत, अशी एसीडीसीएलच्या अधिकाऱ्यांनी विभाग नियंत्रक यांना दिली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिक्षा संघटनांमध्ये मंगळवारी रात्री उशिरा बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हा बुधवारचा संप मागे घेण्यात आला.

\Bकृती समितीच्या मागण्या …

\B- रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी मंडळ हवे.

- रिक्षाचे मुक्त परवाने वाटप बंद करण्यात यावे.

- हकीम समितीच्या शिफारसीप्रमाणे रिक्षांचे भाडे वाढवा.

- विम्याचे वाढलेले दर कमी करा, ओला-उबेर बंद करा.

\Bजिल्ह्याचे चित्र

\B- जिल्ह्यातील रिक्षा - ३२, ७२७

- शहरात रिक्षा - २७ हजार ८३९

- एलपीजी रिक्षा - २१ हजार

- पेट्रोल रिक्षा - ६ हजार

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी चोरांवर गुन्हे दाखल होणार

$
0
0

औरंगाबाद : मुख्य जलवाहिनीतून अनधिकृतपणे नळ कनेक्शन घेणाऱ्या २५४ पाणी चोरांवर महापालिका पोलिसांत गुन्हे दाखल करणार आहे. त्याशिवाय त्यांच्याकडून पाणी वापराचे पैसे देखील वसूल केले जाणार आहेत.

मुख्य जलवाहिनीवरून अनधिकृतपणे नळ कनेक्शन घेणाऱ्यांवर महापालिकेने गेल्या महिन्यात आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवस मोहीम राबवली. दोन दिवसात २५४ नळ कनेक्शन तोडण्यात आले. त्यामुळे दोन 'एमएलडी' पाणी वाढल्याचा दावा करण्यात आला होता. पाण्याची चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. त्यानुसार या सर्व पाणी चोरांविरोधात पोलिसांत 'एफआयआर' दाखल केला जाणार आहे. त्यांनी मुख्य जलवाहिनीवरून पाणी घेणे सुरू केल्यापासून त्यांच्याकडून पाणीपट्टी वसूल करण्याचे देखील ठरविण्यात आले आहे. याप्रकरणांतील पंचनामे आणि अन्य कागदपत्रे उपायुक्त कार्यालयाकडून पुढील कार्यवाहीसाठी पाणीपुरवठा विभागाकडे पाठवण्यात आली आहेत. त्यानुसार येत्या काही दिवसांत 'एफआयआर' दाखल होतील असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सारथी’त तांत्रिक अडचणी; विद्यार्थी वैतागले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) 'एम.फील', 'पीएचडी' करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र, तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरता येत नाही. 'सारथी'कडून त्याबाबत योग्य ती उत्तरे ही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

एम.फील, पीएच.डी.साठी मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसाठी 'सारथी'कडून शिष्य़वृत्ती देण्यात येणार आहे. नॉन क्रिमीलेयर गटातील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. https://sarthi-maharashtragov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. त्यासाठी दहा जुलै अंतिम मुदत आहे तर, आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी २० जुलैपर्यंत सादर करावयाची आहे. तीन प्रकारात हे अर्ज मागविण्यात आले असून, यात ७४६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. अर्जासाठी तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. सोमवारी उमेदवारांनी विविध विभागांमध्ये जावून चौकशी केली. 'सारथी'ने अर्जातील त्रुटीबाबत कोणाला चौकशी करायची याबाबत संपर्क नंबरही दिलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक मनस्ताप सहन करावा लागला.

\Bदिवसभर वेबसाईट हँग\B

एमफील, पीएचडीसाठी एक जून २०१८ला किंवा त्या तारखेनंतर नोंदणी असलेल्या उमेदवारांसाठी या शिष्यवृत्ती देण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वेबसाइट सुरू केल्यानंतर प्रक्रिया सुरू होते मात्र, पूर्ण अर्ज भरता येत नाही. अर्ज अपूर्ण असताना 'एरर' येऊन वेबसाइट बंद होते. तांत्रिक अडचणी दूर करून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. याबाबत व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार जलील यांच्या निवडीला आव्हान

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून 'एआयएमआयएम' पक्षाचे विजयी उमेदवार खासदार इम्तियाज जलील यांच्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे . या निवडणूक याचिकेवर १३ जुलै रोजी प्राथमिक सुनावणी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीतील बहुजन महापार्टी या पक्षातर्फे निवडणूक लढविलेले उमेदवार शेख नदीम शेख करीम यांनी ही निवडणूक याचिका सादर केली आहे. त्यांना १२१० मते मिळाली आहेत. जलील हे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा ४४९२ मतांनी पराभव केला. जलील यांना ३२.४७ तर, पराभूत उमेदवार नदीम यांना ०.१ टक्के मते प्राप्त झाली आहेत. इम्तियाज जलील निवडणूक लढवीत असलेल्या 'एआयएमआयएम' (ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमिन) पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांनी मुस्लिम; तसेच दलितांच्या नावावर मते मागितली, असा आक्षेप याचिकेत नोंदविला आहे. इम्तियाज जलील यांनी निवडणुकीदरम्यान ८२ हजार रुपये रोख खर्च केला. निवडणूक नियम ८७नुसार निवडणुकीचा खर्च करण्यासाठी वेगळे अकॉउंट उघडून त्यातूनच सारा खर्च करावा लागतो.

याशिवाय एका अल्पवयीन मुलाची सीडी तयार करून ती मतदानाआधी सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली. त्या सीडी आफताब खान याने बनविली असून, तो 'एमआयएम'चा कार्यकर्ता आहे. या सीडीमध्ये 'एमआयएम'ला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याशिवाय यामध्ये धार्मिक तेढ निर्मित होईल, अशा पद्धतीची वक्तव्ये अश्लाघ्य भाषेत करण्यात आली होती. याचिकेमध्ये इम्तियाज जलील यांची निवडणूक रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. याचिकेत निवडणूक आयोग, खासदार इम्तियाज जलील यांच्यासह निवडणुकीतील सर्वच उमेदवारांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे सिद्धेश्वर ठोंबरे हे काम पाहत आहेत.

धर्मात तेढ निर्माण करणारे भाषण

असदुद्दीन ओवेसी यांनी दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशी भाषणे निवडणूक प्रचारादरम्यान केली. आपल्या म्हणण्यापुष्टयर्थ त्यांनी काही सीडी सादर केल्या आहेत. त्यांनी मशीदींमधूनही प्रचार केला आणि त्याची छायाचित्रेही सादर करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद विमानसेवेबाबत उद्या बैठक

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सध्या केवळ मुंबई, दिल्ली व हैद्राबाद अशीच विमानसेवा देण्यात येत असून या ‍विमानसेवेत अधिक वाढ करावी, यासाठी केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्त्वाखाली औरंगाबादच्या शिष्टमंडळासह बुधवारी (१० जुलै) दिल्लीत उड्डायन मंत्रालयाच्या प्रधान सचिवांसोबत बैठक होणार असल्याचे मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.

पर्यटनाची राजधानी आणि उद्योगनगरी अशी औरंगाबादची ओळख आहे. जागतिक वारसा स्थळ वेरूळ, अजिंठा लेण्याही औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. त्यामुळे पर्यटक, उद्योजक परदेशातून औरंगाबादेत येतात. त्यांच्या सुविधेत अधिक वाढ व्हावी यासाठी औरंगाबाद विमानतळावरून मुंबईला सकाळ-संध्याकाळ विमान सेवा असावी. औरंगाबाद- दिल्ली- जोधपूर- जयपूर-दिल्ली, औरंगाबाद-गोवा, पुणे-औरंगाबाद-नागपूर, नागपूर-औरंगाबाद-पुणे अशा स्वरुपाची विमान सेवा देण्यात यावी. त्याचबरोबर औरंगाबाद विमानतळावरील विमानाचा इंधनावरील कर कमी करावा आदी मागण्या शिष्टमंडळाने केल्या होत्या. त्यानुसार बुधवारी विमान कंपन्यांचे मालक, संचालक यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उडाण योजनेंतर्गत औरंगाबाद विमानतळावरून लहान शहरांना कनेक्टीव्हिटी देण्यासाठी बैठकीत निर्णय होण्याची अपेक्षा आहेत. दानवे यांच्या नेतृत्वाखाली उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. कराड, उपमहापौर विजय औताडे, प्रमोद राठोड, किशनचंद तनवाणी, अनिल मकरिये, शिरीष बोराळकर, सीएमआयचे उद्योजक राम भोगले, मसिआचे किरण जगताप, हॉटेल व रेस्टॉरंट संघटनेचे अध्यक्ष हरपीतसिंग नीऱ्ह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष जसवंत सिंग आदी बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात ५१ टक्के पेरण्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाच्या आगमनामुळे जिल्ह्यात पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५१.३५ टक्के पेरण्या झाल्या असून, सिल्लोड, सोयगाव तालुक्यात ७० टक्क्याहून अधिक क्षेत्रात पेरणी झाली आहे. पावसाची प्रतीक्षा असलेल्या पैठणमध्ये आतापर्यंत केवळ १८ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात मका पिकाची ७७ टक्के तर, कापसाचा पेरा ४९ टक्के झाला आहे, अशी माहिती कृषी खात्याने पिक पेरणी अहवालात सोमवारी नमूद केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र सात लाख १८ हजार हेक्टर असून, यंदा सात लाख ३५ हजार ५८५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित आहे. सुरुवातील प्रतीक्षा करावी लागल्यानंतर गेल्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावली असून पैठण तालुका वगळता जिल्ह्यात सर्वत्र खरीप पेरण्यांना वेग आला आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांनी कपाशी, मका लागवडीसह पेरणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ७७ हजार ७१६ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात कापशी पिकाचे सरासरी पेरणी क्षेत्र चार लाख ३७ हजार८१६ हेक्टर असून, आतापर्यंत दोन लाख १७ हजार २८८ हेक्टर (४९.६३ टक्के) क्षेत्रावर कपाशी लागवड झाली आहे. मका पिकाचे सरासरी लागवड क्षेत्र एक लाख ५३ हजार १७३ हेक्टर असून, आतापर्यंत एक लाख १८ हजार ४५९ हेक्टरवर (७७.३४ टक्के) पेरणी झाली आहे. खरीप ज्वारी ४३२ हेक्टर (१०.६८ टक्के), बाजरी ११ हजार ५८९ हेक्टर(२२.२२ टक्के), तूर ११ हजार ४६३ हेक्टर (२८.२४ टक्के), उडीद दोन हजार ४८३ हेक्टर(१६८ टक्के), मुगाचे सरासरी लागवड क्षेत्र चार हजार १५६ हेक्टर असून, आतापर्यंत पाच हजार ७७२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यासह इतर तृणधान्य २०६ हेक्टर (१३.६३ टक्के), भुईमूग दोन हजार ९१६ हेक्टर(५८.१८ टक्के), तीळ १२६ हेक्टर(२२.४० टक्के), सोयाबीन सहा हजार ५९२ हेक्टर(३७.३९ टक्के) असे मिळून जिल्ह्यात तीन लाख ७७ हजार ७१६ हेक्टर (५१.३५ टक्के) क्षेत्रात पेरणी झाली आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांनी दिली.

\Bएकूण खरीप पेरणी\B

तालुका.......सर्वसाधारण क्षेत्र......प्रत्यक्ष पेरणी.......टक्के

औरंगाबाद.........७०,६६०...........२६,८१३........३७.९५

पैठण...............९४,०१९...........१७,७५५........१८.८८

फुलंब्री.............६९,१०६............३९,५०६........५७.१७

वैजापूर............१,०५,६३५.........५६,९५६........५३.९२

गंगापूर............१,०५,७९५.........५२,०२०........४९.१७

खुलताबाद.......३९,९४७............२८,१३९........७०.४४

सिल्लोड..........१,१३,५२०.........७७,१७३........६७.९८

कन्नड............९४,०८६............४६,७९१........४९.७३

सोयगाव..........४२,८१७............३२,५६३........७६.०५

एकूण..............७,३५,५८५.........३,७७,७१६.....५१.३५

(क्षेत्र हेक्टरमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डॉक्टर ऑफ फार्मसी’चे संलग्निकरण रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद येथील शासकीय औषधिनर्माणशास्त्र कॉलेजमध्ये सुरू करण्यात आलेल्या 'डॉक्टर ऑफ फार्मसी' (फार्म.डी.) अभ्यासक्रमाचे संलग्निकरण रद्द करण्याचा निर्णय 'फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया'ने घेतला आहे. त्यामुळे २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी अभ्यासक्रमाला प्रवेश होणार नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यसरकार, तंत्रसंचालनालयाच्या दुर्लक्षामुळे अभ्यासक्रमाची अवस्था झाल्याचे विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे.

युरोपातील देशांच्या धर्तीवर राज्यात औरंगाबाद व अमरावती येथील शासकीय फार्मसी कॉलेजमध्ये हा अभ्यासक्रम २०११पासून सुरू करण्यात आला. हा अभ्यासक्रम 'पीसीआय'ने (फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया) तयार केलेला आहे. सरकारी कॉलेजांमध्ये राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाकडे राज्य सरकाराच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यामुळे अभ्यासक्रम चर्चेत राहिला. त्यानंतर आता येत्या शैक्षणिक वर्षात कौन्सिलने अभ्यासक्रमाची मान्यता काढल्याचे समोर आले आहे. या शैक्षणिक वर्ष चालू ठेवण्यासाठी मान्यता नसल्याने अभ्यासक्रमासाठी प्रवेश होणार नाहीत हे स्पष्ट झाल्याने फार्मसीच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. फार्मसी कौन्सिल आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने याबाबतची कार्यवाही केल्याचे सूत्रांनी सांगितले. अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांनीही त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कौन्सिलने संलग्नीकरण रद्द करण्यामागे शैक्षणिक सुविधा नसणे, पूर्णवेळ शिक्षक नसल्याने ही कारवाई केल्याचे सुत्रांनी सांगितले.

\Bराज्य सरकार, तंत्रशिक्षण विभाग जबाबदार\B

अभ्यासक्रम सुरू होऊन आठ वर्षे झाली तरी, अभ्यासक्रमासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. हा अभ्यासक्रम सहा वर्षे कालावधीचा आहे. प्रत्येक वर्षी ३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाच्या दोन बॅच बाहेर पडल्या मात्र, या अभ्यासक्रमासाठीच्या सोयी सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. शिकविण्यासाठी पात्र शिक्षक नसल्याने तासिका तत्वावरील शिक्षकांकडून अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. आवश्यक त्या प्रयोगशाळा, पात्र शिक्षक, सरकारी रुग्णालयांमध्ये प्रात्यक्षिक करण्याबाबतची उदासिनता त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यात आता अभ्यासक्रमाला प्रवेशच थांबविण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. राज्य सरकार, तंत्रशिक्षण विभाग याला जबाबदार असल्याचे विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

कॉलेजकडून पुढील वर्षासाठीचा संलग्निकरणाचा प्रस्ताव आपण पाठविला होता मात्र, 'पीसीआय' आणि 'एआयसीटीई'ने तो स्वीकारला नाही. त्यामुळे नवीन प्रवेश प्रक्रियेत अभ्यासक्रमाचा समावेश होवू शकलेला नाही. पात्र शिक्षक असतील किंवा सोयीसुविधांबाबत आमचा पाठपुरावाही सुरू आहेच.

- डॉ. व्ही. के. मौर्य, प्राचार्य, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात पाऊस; मराठवाडा कोरडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात वरुणराजा जोरदार हजेरी लावत असताना मराठवाडा मात्र कोरडा आहे. एकीकडे मुंबई, नाशिक, सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील बहुतांश नद्यांना पूर येत असताना मराठवाड्यात मात्र अपेक्षित सरासरीच्या तुलनेत निम्माही पाऊस झालेला नाही.

राज्यभर दमदार पाऊस पडत असताना मराठवाड्यात पुरसा पाऊस पडलेला नाही. अपेक्षित सरासरीच्या तुलनेमध्ये विभागातील ७६पैकी तब्बल ४३ तालुक्यांमध्ये निम्माही पाऊस झालेला नाही.

मराठवाड्यात यंदा पूर्वमोसमी पावसाने दगा दिल्याने मान्सूनच्या पावसावरच पेरण्यांची मदार होती. गेल्या दोन आठवड्यांपासून कमी अधिक प्रमाणात सुरू असलेला पाऊस काही मंडळामध्येच पडत आहे. मराठवाड्यात एक जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत सरासरी ७९९ मिली मीटर पर्जन्यमान आहे. जूनमध्ये वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ६७.३४ मिमी (३६.४ टक्के) पाऊस झाला तर, आठ जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण १०१.४८ मिली मीटरपर्यंत (५१.५ टक्के) पुढे सरकली. सध्या केवळ औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यानेच अपेक्षित सरासरी गाठली आहे. उर्वरीत एकाही तालुक्यात अपेक्षित सरासरीएवढा पाऊस झालेला नाही. निम्माही पाऊस न झालेल्या तालुक्यांमध्ये सर्वाधिक १५ तालुके नांदेड जिल्ह्यातील आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण आणि खुलताबाद, जालना जिल्ह्यातील जालना आणि अंबड, परभणी जिल्ह्यातील परभणी, पूर्णा, सेलू, पाथरी आणि जिंतूर आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, वसमत, औंढा नागनाथ हे पाचही तालुके कोरडे आहेत. नांदेड जिल्ह्यात पावसाने मोठी उघडीप दिली असल्याने अनेक महसूल मंडळांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती आहे. जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड, अर्धापूर, भोकर, कंधार, लोहा, किनवट, हदगाव, हिमायतनगर, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव व मुखेड, बीड जिल्ह्यातील गेवराई, शिरूर कासार, वडवणी, अंबाजोगाई, केज व परळी, लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, उदगीर, चाकूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, उमरगा, लोहारा व परंडा तालुक्यातही सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही.

\Bजमिनीत ओल नाही, पेरण्या करायच्या कधी?\B

गेल्या तीन आठवड्यात किरकोळ झालेल्या पावसामध्ये जमिनीत ओल आली नाही. त्यामुळे कमी-अधिक होत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर पेरण्या करायच्या कधी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. गेल्यावर्षी जून अखेर वार्षिक सरासरीच्या तुलनेत तब्बल १२२ टक्के (वार्षिक सरासरीच्या तुलनेत २३ टक्के) पाऊस होऊन विभागात आठ टक्के पेरण्या झालेल्या होत्या. यंदा मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतरही केवळ १०१. ४८ मिलीमिटर (वार्षिक सरासरीच्या तुलनेत १३ टक्के) पाऊस झाला आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये पावसाचे सातत्य राहिले तरच खरिपाच्या पेरण्या वेळेत होतील अन्यथा पेरण्या उशिराने करून शेतकऱ्यांच्या खिशाला फटका बसण्याची भीती आहे.

\Bनाशिकमधील पाणी नाथसागराकडे

\Bनाशिक जिल्ह्यात रविवारी झालेल्या जोरदार पावसानंतर नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यांचे दरवाजे उघडून गोदापात्रात पाणी सोडणयास सुरुवात करण्यात आली होती. हे पाणी सोमवारी वैजापूर तालुक्यापर्यंत पोचले. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून मध्यरात्री दोन ते सकाळी सहा या वेळेत २६ हजार क्युसेस पाणी सोडण्यात येत होते. त्यानंतर दोन तास १५ हजार क्युसेस पाणी सोडण्यात येत होते. त्यानंतर त्यात नऊ हजार ४६५ क्युसेसपर्यंत कपात करण्यात आली. दुपारी बारापर्यंत तीन हजार क्युसेसपाणी नदीपात्रात सोडण्यात येत होते. सायंकाळनंतर त्यात आणखी घट करून ३०० क्युसेस पाणी गोदावरीच्या पात्रात सोडण्यात येत होते.

नऊ जुलैअखेर मराठवाड्यातील पाऊस

जिल्हा.......................प्रत्यक्ष पाऊस

औरंगाबाद...............७४.० टक्के (११.५ टक्के)

जालना...................६३.४ टक्के (१६.९ टक्के)

परभणी...................५३.७ टक्के (१२.५ टक्के)

हिंगोली...................४०.४ टक्के (१०.६ टक्के)

नांदेड.....................९१.९३ टक्के (९.६ टक्के)

बीड.......................४९.० टक्के (१२.७ टक्के)

लातूर.....................५०.४ टक्के (१२.३ टक्के)

उस्मानाबाद.............५०.२ टक्के (१२.९ टक्के)

एकूण सरासरी..........५१.५ टक्के (१३.० टक्के)

(कंसात वार्षिक सरासरीच्या तुलनेत पडलेला पाऊस)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिहारी शिक्षकाला लुटले; तिघांना अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बिहारमधील शिक्षकाचा २८ हजारांचा ऐवज लुटल्याप्रकरणी अनिक रावसाहेब हिवाळे, विशाल बाळासाहेब जाधव व सतीश रमेश नाथभजन यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना बुधवारपर्यंत (१० जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांनी सोमवारी (८ जुलै) दिले.

या प्रकरणी मनीषकुमार सियाराम प्रसाद (२९, रा. बिहार) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीचा रविवारी झाल्टा येथील टेंडर केअर होम शाळेत सीटीईटीचा पेपर होता. त्यासाठी सहा जुलैला ते शहरात आले व मुक्कासाठी लॉज शोधत होते. तसेच शिवाजीनगर येथे जाण्यासाठी ते मुकुंदवाडी बसस्टॉपजवळ उभे होते. त्यावेळी एक रिक्षाचालक व आत बसलेले दोघे त्यांच्याजवळ आले. त्यांनी शिवाजीनगरऐवजी मनीषकुमार यांना बीड बायपास रोडवरील बाळापूर कमान येथे नेले. तिथे त्यांना मारहाण करून तीन हजार रुपये रोख, सोन्याची अंगठी, चांदीची चैन, मोबाईल असा सुमारे २७ हजार ८०० रुपयांचा ऐवज हिसकावून धूम ठोकली. प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन अनिकेत रावसाहेब हिवाळे (२१, रा. लोकशाही कॉलनी, मुकुंदवाडी), विशाल बाळासाहेब जाधव (२१), सतीश रमेश नाथभजन (२३, दोघे रा. मुकुंदनगर) यांना सिडको बसस्थानक परिसरातून अटक करण्यात आली व त्यांचा रिक्षाही ताब्यात घेण्यात आला. तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंढरीसाठी १२० गाड्या; पहिली बस रवाना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पंढरीच्या आषाढीवारासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले असून, शहरातून १२० गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यातली भाविकांची पहिली गाडी मध्यवर्ती बसस्थानकाहून पंढरपूराला रवाना झाली.

आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे ८ ते २१ जुलै दरम्यान यात्रा भरणार आहे. या यात्रेत लाखोंच्या संख्येने भाविक विठ्ठल दर्शनासाठी जातात. या यात्रेकरूंसाठी एसटीचे विभाग नियंत्रक अरुण सिया आणि विभागीय वाहतूक अधिकारी अमोल अहिरे यांनी जादा बसगाड्यांचे नियोजन केले आहे. पंढरीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्यास लक्षात घेता प्रत्येक आगार व्यवस्थापकांनी त्यांच्या हद्दीतील फुलंब्री, अंधारी, बिडकीन, देवगाव (रंगारी), हतनूर यासह विविध मोठ्या गावांमधून प्रवाशांच्या मागणीनुसार वाहतूक व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी मध्यवर्ती बसस्थानकातून पहिली बस सोडण्यात आली. या बसची पूजा आगार प्रमुख एस. ए. शिंदे यांच्यासह वारकऱ्यांनी केली. यावेळी माजी आगार प्रमुख श्याम महाजन, स्थानक प्रमुख योगेश गिते, वाहतूक निरीक्षक ललित शहा, मिलिंद पानपाटील, धनश्याम म्हस्के, दीपक बागलाने यांची उपस्थिती होती.

\Bअसे आहे बस नियोजन

\B- मध्यवर्ती बसस्टॅँड - २४

- सिडको बसस्टॅँड - २२

- सिल्लोड - १५

- पैठण - १३

- कन्नड - १३

- वैजापूर - १२

- गंगापूर - १२

- सोयगाव - ७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला तरी, दुष्काळग्रस्त असलेल्या पैठण तालुक्यात जेमतेम पाऊस पडला असून, पाणीटंचाईची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीशी सामना करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

गोर्डे यांनी यासंबंधी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आतापर्यंत संपूर्ण तालुक्यात केवळ २० ते २५ मिलिमीटर पाऊस झाला. सरासरीपेक्षा ही आकडेवारी खूप कमी असून, सध्या शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. कर्ज काढून बी बियाणे खरेदी केली आहे. मात्र, पाऊस नसल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. हिरडपुरी व आपेगाव बंधारे पूर्णपणे कोरडे पडल्याने या दोन्ही बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असलेले शेतकरी व नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः तरसावे लागत आहे. पावसाळा सुरू होऊन एक महिना लोटला तरी, अद्याप तालुक्यातील जवळपास दोनशे गावात पाण्याचे टँकर सुरू आहे. पाणीटंचाईमुळे निर्माण झालेल्या या सर्व गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचीही माहिती गोर्डे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोखरीच्या संरपंचाविरुद्ध अविश्वास

$
0
0

वैजापूर : सरपंचाचे पती त्यांच्या कारभारात ढवळाढवळ करतात म्हणून तालुक्यातील पोखरीच्या सरपंच वनिता दिलिप जाधव यांच्याविरुद्ध ग्रामपंचायतीच्या नऊपैकी आठ सदस्यांनी सोमवारी तहसिलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला. या ठरावावर चर्चा करण्यासाठी ११ जुलै रोजी दुपारी दोन वाजता विशेष सभा घेण्यात येणार आहे.

जाधव कामकाज करताना कोणत्याही सदस्यास विश्वासात घेत नाहीत, त्यांनी विकास कामे थांबवली आहेत. गावाच्या बाबतीत त्या चुकीचे निर्णय घेतात, कार्यालयात थांबत नाहीत, मनमानीपणे कारभार करतात व सरपंच पती कारभार पाहतात, असे आरोप या ठरावात करण्यात आले आहेत. प्रभाकर ठुबे, काकासाहेब ठुबे, विजय सोनवणे, अरुणाबाई ठुबे, नंदाबाई भोसले, मीनाबाई ठुबे, कस्तुरा बोर्डे व लताबाई गायकवाड या आठ सदस्यांनी तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्यासमक्ष सह्या करून ठराव दाखल केला. ठरावावर ११ जुलै रोजी चर्चा करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेडफोन लावलेल्या तरुणाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हेडफोन घालून जनावरे चारणाऱ्या तरुणााचा पाठीमागून आलेल्या रेल्वेच्या धक्क्यात जागीच मृत्यू झाला. रविवारी दुपारी साडेचार वाजता हा अपघात मयूरबन कॉलनीजवळील रेल्वे रुळावर झाला. शेख नाबीद शेख नूर पाशा (वय २२, रा. राजनगर, मयूरबन कॉलनी) असे या तरुणाचे नाव आहे.

शेख नाबीद याच्याकडे जनावरे असून, राजनगर भागात त्याचा गोठा आहे. रविवारी दुपारी नाबीद म्हशी चारण्यासाठी घेऊन गेला होता. यावेळी म्हशी चरत असताना नाबीद हा मोबाइलवर हेडफोन लावून गाणी ऐकत होता. गाणी ऐकता ऐकता तो रेल्वे रुळावर आला. यावेळी नेमकी पाठीमागून रेल्वे आली. हेडफोनमुळे नाबीदला रेल्वेचा आवाज एकू आला नाही. रेल्वेची धडक बसल्यामुळे त्याच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि छातीला मार लागला. त्याचा मित्र योगेश वाघमारे याने त्याला रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान नाबीदचा मृत्यू झाला. जवाहरनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली, असून जमादार दाभाडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वयंपाक घरात भाजल्याने आजीचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वयंपाक घरात काम करताना भाजलेल्या आजीचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयामध्ये रविवारी मृत्यू झाला. अजबनगर भागात हा प्रकार घडला होता. उमाबाई तात्याराव देशमुख (वय ७०, रा. कोकणवाडी) असे या आजीचे नाव आहे.

उमाबाई ह्या तीन जून रोजी अजबनगर येथील दामले यांच्या घरी स्वयंपाक घरामध्ये काम करत होत्या. यावेळी गॅसने पेट घेतल्यामुळे उमाबाई भाजून गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी प्रथम खासगी रुग्णालयामध्ये आणि नंतर घाटी रुग्णालयाच्या ट्रामा केअरमध्ये दाखल करण्यात आल्या. उपचारादरम्यान रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला मेडिकल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली असून, नंतर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जमादार जैस्वाल तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images