Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नऊ खासदारांच्या निवडीला आव्हान

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, डॉ. प्रीतम मुंडे, ओमप्रकाश पवनराजे निंबाळकर, प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, हिना गावित, संजय उर्फ बंडू जाधव, सुधाकर श्रृंगारे यांच्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.

एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांविरोधात त्या-त्या मतदारसंघांतील पराभूत उमेदवारांनी निवडणूक याचिका केल्या आहेत. औरंगाबाद खंडपीठाच्या क्षेत्रातील नऊ खासदारांविरोधात या याचिका करण्यात आल्या आहेत. उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर यांच्याविरोधात मनोहर आनंदराव पाटील यांनी याचिका केली आहे. याचिकाकर्त्याचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला होता. चुकीच्या पद्धतीने त्यांना अवैध ठरविले आहे आणि ओमराजे यांचा अर्ज अवैध पद्धतीने स्वीकारला, असा आक्षेप याचिकाकर्त्याने नोंदवला आहे.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (जालना) यांच्याविरोधात बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे यांनी निवडणूक याचिका केली आहे. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार यशपाल नरसिंगराव भिंगे (नांदेड), विष्णू तुळशिराम जाधव (बीड), मोहन राठोड (हिंगोली), आलमगिर मोहम्मद खान (परभणी) व रामाव नरसिंह गरकर (लातूर) यांनीही अनुक्रमे प्रताप पाटील चिखलीकर, डॉ. प्रीतम मुंडे, हेमंत पाटील, संजय उर्फ बंडू जाधव व सुधाकर श्रृंगारे यांच्या निवडीला आव्हान दिले आहे. लोकसभा निवडणुकीत मतमोजणीत अनेक मतदान केंद्रांत मतदान आणि मतमोजणीच्या संख्येत फरक आहे. मतदानाचे आकडे चुकीचे आहेत आणि मतमोजणीमध्ये विसंगती आहे, असा आक्षेप बहुजन वंचित आघाडीच्या याचिकाकर्त्यांनी घेतला आहे.

बीड लोकसभा मतदारसंघात डॉ. प्रीतम मुंडे यांच्याविरोधात बनावट कर्जवाटप केल्याप्रकरणी परळी पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल आहे. त्या वैद्यनाथ अर्बन बँकेच्या संचालक आहेत याची माहिती मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केली नाही, असा आक्षेप पराभूत उमेदवार कालिदास आपेट यांनी घेतला आहे. नंदूरबार लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपच्या डॉ. हिना गावित यांच्याविरोधात शंकर वसावे यांनी याचिका केली आहे. बाँडपेपरवर सादर करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र बनावट आहे. हे प्रतिज्ञापत्र पूर्णपणे भरलेले नाही. डॉ. गावित यांनी उत्पन्नाचे स्त्रोत उघड केलेले नाहीत; तसेच त्यांनी निवडणुकीचा खर्च लपविला, असा आक्षेप घेण्यात आला आहे.

याचिकाकर्त्यांतर्फे अजित बी. काळे, सिद्ध्रेश्वर ठोंबरे, डी. एस. बागूल, गजानन सोनटक्के, प्रियेंद्र सोनटक्के, मुकूलानंद वाघ हे बाजू मांडत आहेत. याशिवाय औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधातही निवडणूक याचिका करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेठे ज्वेलर्स प्रकरणातील आरोपीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वामन हरी पेठे ज्वेलर्समधील ६५ किलो सोन्याचे हिरेजडित दागिने लांबवल्याप्रकरणात जडगाववाला ज्वेलर्सचा मालक राजेंद्र मन्नालाल सेठिया याला सोमवारी (८ जुलै) रात्री अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला शुक्रवारपर्यंत (१२ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. मोटे यांनी दिले.

समर्थनगरातील वामन हरी पेठे ज्वेलर्समधून व्यवस्थापक अंकुर राणे व कपडा व्यापारी राजेंद्र किसनलाल जैन यांनी कट रचून ६५ किलो सोने लांबवल्याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी अंकुर राणे याला बुधवारपर्यंत (१० जुलै), तर राजेंद्र जैन याला शनिवारपर्यंत (१३ जुलै) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, राजेंद्र जैन याने चोरलेल्या सोन्यापैकी बरेचसे सोने 'मण्णपुरम गोल्ड फायनान्स'मध्ये गहाण ठेवले होते. जैन याने जडगाववाला ज्वेलर्सचा राजेंद्र मन्नालाल सेठिया (५४, रा. उस्मानपुरा, स्वाद हॉटेलशेजारी) याला सोने सोडविण्यासाठी सांगितले होते. त्यावर सेठिया याने २२ लाख रुपये प्रती किलोप्रमाणे सोने विकत घेण्याचे मान्य केले होते व त्यानुसार जैनच्या अ‍ॅक्सिस बँकेच्या खात्यावर रक्कम टाकली होती. त्यानंतर जैन व सेठियाचा चुलत भाऊ अनिल सेठिया याच्यासोबत जाऊन 'मण्णपुरम'मधून दागिने सोडवून घेतले व ते दागिने अनिल सेठियाकडे दिल्याचे जैन याने पोलिस कोठडीदरम्यान सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीयोजनेचा ‘डीपीआर’ शुल्कामुळे आडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरासाठीच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा 'डीपीआर' (सविस्तर प्रकल्प अहवाल) शासन दरबारी सादर होण्याच्या आधीच २२ कोटींनी वाढला आहे. दरम्यान, या 'डीपीआर'ला तांत्रिक मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महापालिकेकडून प्रकल्पाच्या किंमतीच्या एक टक्के रक्कम शुल्क म्हणून मागिलती आहे. शुल्क भरल्याशिवाय 'डीपीआर'ला मान्यता देणार नाही, अशी भूमिका प्राधिकरणाने घेतल्यामुळे 'डीपीआर' आता 'एमजेपी'मध्ये आडकला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यामुळे महापालिकेने औरंगाबाद शहराचा वाढीव पाणीपुरवठा योजनेचा 'डीपीआर' तयार केला. यामध्ये औंरगाबाद शहरासह सिडको - हडको, हर्सूल, चिकलठाणा, मुकुंदवाडी, सातारा - देवळाई परिसरासह गुंठेवारी भाग आणि 'नो नेटवर्क एरिया' यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रशासनाने एक हजार ६७३ कोटींचा 'डीपीआर' तयार केला. त्याचे सादरीकरण आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी महापालिकेचे पदाधिकारी व नगरसेवकांच्यासमोर केले. त्यानंतर तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तांत्रिक मान्यतेसाठी सादर करण्यास पदाधिकाऱ्यांनी मान्यता दिली. 'डीपीआर' महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर करताना त्यात २२ कोटींची वाढ करण्यात आली. आता हा डीपीआर एक हजार ६९५ कोटींचा झाला आहे. काही पूरक योजनांचा समावेश मूळ 'डीपीआर'मध्ये नव्हता. त्यामुळे त्या योजनांचा समावेश करून एक हजार ६९५ कोटींचा 'डीपीआर' तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

तयार केलेला 'डीपीआर' तांत्रिक मान्यतेसाठी महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवला. तांत्रिक मान्यता देण्यासाठी 'डीपीआर'च्या किंमतीच्या एक टक्के शुल्क भरा, असे पत्र प्राधिकरणाने महापालिकेला दिले आहे. त्यामुळे पालिकेला आता सुमारे १६ कोटी रुपये प्राधिकरणाला भरावे लागणार आहे. शुल्क भरेपर्यंत 'डीपीआर'ला तांत्रिक मान्यता मिळण्याची शक्यता नाही.

पाणीपुरवठा योजनेसाठी शासन निधी देणार आहे. शासनाकडून निधी आल्यावर महापालिका १६ कोटी रुपये देईल, असे पत्र महापालिकेतर्फे प्राधिकरणाला दिले जाणार आहे. प्राधिकरणाला १६ कोटी रुपये देण्याची महापालिकेची क्षमता नाही. शासनाच्या निधीच्या आधीन राहून प्राधिकरणाने 'डीपीआर'ला तांत्रिक मान्यता द्यावी व १२ जुलैपर्यंत 'डीपीआर' शासनाला सादर करावा, असेही प्राधिकरणाला कळवणार आहोत. प्राधिकरणाच्या एक टक्के शुल्काबद्दल नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांशी देखील आम्ही बोलणार आहोत.

- विजय औताडे, उपमहापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलादीर्घा गॅलरीत वारीची आनंदयात्रा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वारकरी संप्रदाय आणि वारीच्या बहुरंगी छायाचित्रांचे 'वारी - एक आनंदयात्रा' प्रदर्शन आषाढी एकादशीचा आनंद द्विगुणित करणारे ठरले आहे. वारीच्या दीर्घ प्रवासात छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी टिपलेली दर्जेदार छायाचित्रे पाहताना रसिकांचे भान हरपले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाने आषाढी एकादशीनिमित्त संदेश भंडारे यांचे 'वारी - एक आनंदयात्रा' हे छायाचित्र प्रदर्शन भरवले आहे. एमजीएम कॅम्पसमधील कलादीर्घा आर्ट गॅलरीत मंगळवारी या प्रदर्शनाचे प्रतिष्ठानच्या अपर्णा कक्कड यांनी उदघाटन केले. यावेळी छायाचित्रकार संदेश भंडारे, चित्रपट दिग्दर्शक शिव कदम, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शहाजी भोसले, प्रतिष्ठानचे नीलेश राऊत, सुबोध जाधव उपस्थित होते. समता आणि माणुसकीची शिकवण वारीच्या निमित्ताने रुजवली जाते. वारकरी संप्रदाय मागील आठशे वर्षे भक्कम उभा आहे. सामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या वारीचे विविध छटांची छायाचित्रे रसिकांसाठी पर्वणी ठरले. रिंगण, पालखी यांची छायाचित्रे टिपताना भंडारे यांनी वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील विविध भाव उत्तम टिपले आहेत. त्यामुळे छायाचित्र प्रदर्शन वारीचा खरा आनंद देणारे ठरले आहे. येत्या १४ जुलैपर्यंत सकाळी ११ ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे. रसिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी सर्वसाधारण सभा वादळी ठरणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी ११ जुलै रोजी होणार आहे. अर्थसंकल्प पूनर्विनियोजन, समाजकल्याण विभागातील योजनांची अंमलबजावणी, आरोग्य विभागातून औषधी खरेदीचा परत गेलेला निधी या विषयांवरून सभा गाजण्याची चिन्हे आहेत.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी दुपारी एक वाजता सभा होईल. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपण्यास तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे कदाचित ही या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील अखेरची सर्वसाधारण सभा ठरू शकते.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यंदाच्या अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केला होता. त्यात अनेक विभागांसाठीची तरतूद कमी केली गेली. त्याचा फटका दिंडीच्या टँकर व आरोग्य पथकाच्या निधीला बसला होता. प्रशासनाने शेवटच्या टप्प्यात धावपळ करुन तरतूद करुन घेतली. यासह विविध विभागांच्या निधीत प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत पदाधिकारी, सदस्यांची नाराजी आहे. त्यामुळे या सभेत पुर्नविनियोजन केले जाईल. डीपीसीतून आरोग्य विभागाला औषधी खरेदीसाठी ६० लाख रुपये मंजूर होते. दोन वर्षांत हा निधी खर्च न झाल्याने हे पैसे परत गेले. त्यावरुन सभेत वाद निर्माण होणार आहे. याशिवाय समाजकल्याण, महिला व बालकल्याण, बांधकाम विभागांतर्गत मंजूर योजनांवरुनही सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारात बसण्याचा वाद; प्रवाशाला रेल्वेतून ढकलले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये सोमवारी रात्री १० च्या सुमारास दारात बसण्यावरून झालेल्या वादात ४० वर्षांच्या प्रवाशाला एका प्रवाशांने लाथ मारून एक्स्प्रेसमधून ढकलून दिले. ही घटना छावणी रेल्वे उड्डाणपुलाजवळ घडली. या घटनेत गंभीर जखमी प्रवाशाने कसेबसे छावणी रेल्वे उड्डाणपुलावर जाऊन रिक्षाने रेल्वेस्टेशन गाठले. त्यानंतर त्याला उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

सुदर्शन साहेबराव गवई (वय ४०, रा. मेहकर ), असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून सैतानसिंह जगजीतसिंह राजपूत (वय ३९, रा. ह. मु. सातारा परिसर) याला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. गवई हे नाशिक येथे मजुरी करतात, ते नंदीग्राम एक्स्प्रेसने सोमवारी पत्नीसह नाशिकला जात होते. ते रेल्वेच्या दारात बसलेले होते. औरंगाबादहून रेल्वे रवाना झाल्यानंतर अवघ्या काही अंतरावर छावणी रेल्वे उड्डाणपुलाजवळ दारात बसण्यावरून संशयित आरोपीसोबत वाद झाला. वादानंतर रेल्वेच्या दारात बसला असताना संशयिताने थेट त्यांच्या पाठीत लाथ मारली. त्यामुळे गवई हे रेल्वेतून खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. याविषयी प्रवाशांनी लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक देशमाने, हवलदार प्रधान यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत जखमी प्रवाशाने रेल्वेस्टेशन गाठले होते. याठिकाणाहून १०८ रुग्णवाहिकेने प्रवाशाला उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. नव्या वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना २३ जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

सारथीतर्फे एमफील, पीएचडीसाठी मराठा, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी दहा जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करायचे होते व हॉर्डकॉपी देण्याची मुदत २० जुलैपर्यंत होती. वेबसाईट वारंवार हँग असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरता येत नव्हते. अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी अन् संपणारी मुदत यामुळे विद्यार्थ्यांना संधी जाण्याची भीती होती. ७४६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणीबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रकाश टाकला. यावर अखेर सारथीने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन अर्ज करण्याचे नवीन वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत असणार आहे तर, आवश्यक दस्तऐवजांसह ऑनलाइन भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी सादर करण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसगाव चौफुली येथे मोबाइस दुकानात चोरी

$
0
0

\Bवाळूज महानगर:\B तिसगाव चौफुली येथे अज्ञात चोरांनी मोबाइल दुकानाचे शटर उचकटून दुकानातील रोख रक्कम व मोबाइलचे साहित्य, असा एकूण ३५ ते ४० हजारांचा मुद्देमाल लंपास करून साहित्याची तोडफोड केल्याची घटना मंगळवार सकाळी उघडकीस आली.

नामदेव दत्तात्रय घावटे यांचे हे दुकान असून आजारी असल्याने सोमवारी दुपारीच दुकान बंद करून ते घरी गेले होते. रात्री अज्ञात चोरांनी दुकानाचे कुलूप तोडून रोख रक्कम व मोबाइलचे साहित्य खिडकीची काच फोडून लंपास केले. मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेले सोपान नाडे यांच्या निदर्शनास ही बाब आली, त्यांनी घावटे यांना दिली. घावटे यांनी पाहणी केली असता रोख १४ हजार ५०० रुपये, तसेच मोबाइलचे साहित्य, बँकेचे चार क्रेडिट कार्ड आदी साहित्य गायब असल्याचे, तसेच कलर प्रिंटर, होमथिएटर, लाइटिंगची तोडफोड केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच फौजदार सतीश पंडित व पोहेकाँ. तातेराव शिनगारे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माजी सैनिकाच्या जमिनीवर अवैध ताबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लष्करामध्ये उत्कृष्ट सेवा बजावल्यामुळे सैनिकांना देण्यात आलेल्या जमिनीवर इतरांनी अवैध ताबा घेतला, पतीची जमीन मिळवण्यासाठी विधवा तब्बल २२ वर्षांपासून शासनदरबारी खेट्या मारत असून प्रशासन मात्र दाद देण्यास तयार नाही. आता १५ ऑगस्टपूर्वी जमिनीचा ताबा द्या अन्यथा विभागीय कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा कमल खरात या माजी सैनिकाच्या विधवा पत्नीने दिला आहे.

सोमवारी (८ जुलै) खरात यांच्यासोबतच कमल पवार (मेहकर) आणि लता भालेराव (सोयगाव) या सैनिक पत्नींनीच्या जमिनीही अशाच प्रकारे बळकावल्या असल्याने या सर्वांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेतली. लष्करामध्ये चांगली सेवा केली म्हणून भगवान भगवान खरात यांना शासनाने १९९७ मध्ये राजुरा गाव (सज्जा मांडकी, ता. वैजापूर) येथे ४ एकर १० गुंठे जमीन दिली व अलॉटमेंट लेटर, सात बारा दिला. त्यानंतर सर्व कागदपत्रासह ताबा घेण्यासाठी खरात कुटुंब गेले असता त्या जमिनी शेजारी असलेल्यांनी अवैधरित्या ताबा मिळवल्याचे लक्षात आले. यानंतर दोन कुटुंबामध्ये वारंवार भांडणे होऊ लागली. पोलिसामध्ये तक्रारही झाली. या प्रकारानंतर २००७ मध्ये भगवान खरात यांचे निधन झाले. त्यानंतर वारसा हक्काने ही जमीन कमल खरात यांच्या नावावर झाली. फेरही त्यांच्या नावावर झाला. तरीही अद्याप ही जमिनीचा ताबा मिळालेली नाही. या प्रकरणामध्ये खरात यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले, मात्र त्यांना कोणीही दाद देण्यास तयार नसल्याने त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

\Bपर्यायी जमिनीचे पत्र\B

जमिनीवर ताबा द्यावा या मागणीसाठी कमल खरात यांनी गेल्यावर्षीही आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यावेळी उपविभागीय अधिकारी वैजापूर यांनी तुम्हाला पर्यायी जमीन देतो, आत्मदहन स्थगित करावे, असे पत्र दिले होते. मात्र वर्षभरापासून या जमिनीबाबतही प्रशासनाकडून काहीही उत्तर मिळाले नाही. केवळ आज ताबा देतो, उद्या ताबा देतो, असे अधिकारी सांगत असल्याचा कमल खरात यांचा दावा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फार्मसी’साठी पर्याय देण्याची मुदत सपंली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औषधनिर्माणशास्त्र पदवी (बीफार्मसी), पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (एमफार्मसी) प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. बीफार्मसीसाठी 'कॅप राउंड-एक' संस्थांचे पर्याय देण्याची मुदत मंगळवारी संपली. आता गुरुवारी जाहीर होणाऱ्या निवड यादीकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे.

राज्य सामाईक प्रवेश पूर्व परीक्षा कक्षाकडून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सुरुवातीला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने प्रक्रिया पुन्हा जुन्या पद्धतीनेच राबविणे सुरू आहे. औषधनिर्माण अभ्यासक्रमाची प्रक्रियाही फार्मसी कॉलेजांच्या सहाय्याने राबविली जात आहे. प्रक्रियेत सध्या प्रवेशाचा पहिला टप्पा सुरू असून दोन दिवस विद्यार्थ्यांना 'कॅप राउंड-एक'साठी कॉलेजांचे पर्याय देण्यासाठी देण्यात आले. ही प्रक्रिया मंगळवारी संपली. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कायम आहे. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आहे. प्रवेश इच्छुकांची संख्या तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी पेक्षा मोठी असल्याने सीईटीच्या गुणांच्या आधारावर नामांकीत कॉलेज मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये असलेली स्पर्धा अधीक असल्याचे प्रवेश प्रक्रियेतील सूत्रांनी सांगितले.

\B'कॅप राउंड'ची अशी असेल प्रक्रिया\B

कॅप राउंड-एकसाठी निवड यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 'अॅडमिशन रिर्पोटिंग सेंटर' (एआरसी) येथे निश्चितीची प्रक्रिया करावी लागेल. त्यानंतर याचदरम्यान कॉलेजला जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल. यात विद्यार्थ्याला तीन पर्याय असतील. सोयीनुसार विद्यार्थी त्याची निवड करू शकतो. बीफार्मसीसाठी प्रक्रिया १२ ते १६ जुलैदरम्यान असेल. यामध्ये १२ ते १५ 'एआरसी' निश्चिती व कॉलेज निश्चितीची प्रक्रिया १३ ते १६ जुलैपर्यंत करावयाची आहे.

\B'एमफार्मसी' कागदपत्र तपासणी प्रक्रिया पूर्ण\B

औषधिनर्माणशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कागदपत्र तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची प्रक्रिया मंगळवारी संपली. त्यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना ११ व १२ जुलैपर्यंत आक्षेप नोंदविण्यासाठी देण्यात आले असून, १३ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. ही यादी कॅप राउंड-एकसाठी असेल.

एम.फार्मसी तात्पुरती गुणवत्ता यादी : १० जुलै

बी. फार्मसी निवड यादी : ११ जुलै

एम.फार्मसी कॉलेज : ११

प्रवेश क्षमता : ४१४

बी.फार्मसी कॉलेज : ४४

प्रवेश क्षमता : ३४९०

औरंगाबादेतील महाविद्यालये

एमफार्मसी : ४

प्रवेश क्षमता : १८०

बीफार्मसी संस्था : १४

प्रवेश क्षमता : १२८०

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’ प्रवेशाची तिसरी सोडत आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) मोफत प्रवेश प्रक्रियेत तिसरी सोडत बुधवारी होणार आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सोडतीनंतर पालकांना 'एसएमएस'द्वारे माहिती होणार आहे. प्रत्यक्ष शाळेत प्रवेशासाठी १८ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

यावर्षी प्रवेश प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने कागदपत्र तपासणीसाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली. प्रवेश प्रक्रिया लांबल्याने प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला. राज्यात नऊ हजार १९५ शाळांतील एक लाख १६ हजार ८०८ जागांवर प्रवेश देण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन लाख ४५ हजार ४८८ विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत. त्यापैकी दोन फेऱ्यांनंतर केवळ ६७ हजार ५९ जागांवर प्रवेश झाले आहेत. मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याने तिसरी फेरीकडे पालकांचे लक्ष लागले होते. बुधवारी तिसरी सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर पालकांना एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. एसएमएस न आल्यास पालकांना वेबसाईटवर जावून अॅप्लीकेशन वाईज्ड नंबर लागला की नाही हे पाहता येणार आहे. सोडतीनंतर पालकांना प्रवेशासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. ११ ते १८ जुलैपर्यंत पालकांना ज्या शाळेत क्रमांक लागला आहे तेथे जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोपर्डी येथे शनिवारी श्रद्धांजली

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

कोपर्डी घटनेला १३ जुलै रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. कोपर्डी येथील घटनेतील मुलीला आणि मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या ४४ मराठा बांधवांना शनिवारी (१३ जुलै) सकल मराठा समाजातर्फे श्रद्धांजली देण्यात येणार आहे. मराठा क्रांतीमोर्चाच्या सोमवारी औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीतमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

कोपर्डी (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथे एका शेतकरी कुटुंबातील मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ नऊ ऑगस्ट रोजी पहिला ऐतिहासिक मराठा क्रांतीमोर्चा औरंगाबाद शहरातून निघाला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर, देशाच्या इतर भागामध्येही त्याच ताकदीने क्रांती मोर्चे काढण्यात आले.

या घटनेतील आरोपींना फाशीच्या शिक्षेवर तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने कठोर प्रयत्न करावेत, असा सूर या बैठकीत निघाला. या बैठकीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुरेश वाकडे, विजय काकडे, मनोज गायके, आत्माराम शिंदे, रमेश गायकवाड, शिवानंद भानुसे, शिवाजी जगताप, राहुल बनसोड, विकीराजे पाटील, अमोल साळुंके, बाबासाहेब दाभाडे, रेखा वहाटुळे, रवींद्र वहाटुळे, सुवर्णा मोहिते, अभिजीत काकडे, प्रदीप हारदे, किशोर घोडके, सतीश जगताप, अक्षय रोडे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात वाहनचोरांचा धुमाकूळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहनचोरांनी धुमाकूळ घातला आहे. सात दुचाकीसह चोरांनी टिप्पर पळवण्याच्या घटना या कालावधीत घडल्या. याप्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दुचाकी चोरीचा पहिला गुन्हा सोमवारी दुपारी दोन वाजता पीरबाजार, उस्मानपुरा भागात घडली. मुकींद विठ्ठल दाभाडे (वय ५७, रा. गारखेडा परिसर) या ज्येष्ठ नागरिकांची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी चोरीचा दुसरा गुन्हा मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. नंदकिशोर बाबुराव वाघ (वय २७ रा. जयभवानीनगर) याची दुचाकी ३ जुलै रोजी घरासमोरून लांबवली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ६ जुलै रोजी रात्री एन ९, पवननगर भागातून आशिष गोविंद शास्त्री यांची दुचाकी चोरीस गेल्याचा गुन्हा सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ६ जून रोजी रात्री दिनकर नामदेव लोखंडे (वय ४५ रा. एन ११) यांची दुचाकी चोरीस गेल्याचा गुन्हा सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. २३ जून रोजी संजयनगर, बायजीपुऱ्यातून शेख शफीक शेख गुलाब यांची दुचाकी चोरीस गेल्याचा गुन्हा जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी धावणी मोहल्ला येथून सचिन कृष्णाराव जोशी यांची बुलेट चोरीस गेली. सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bबीड बायपासवरून टिप्पर लांबवला\B

जबिंदा लॉन्सच्या मैदानावरून चोरट्यांनी पाच लाख रुपये किंमतीचा टिप्पर लंपास केला. हा प्रकार ३ जुलैच्या रात्री घडला. याप्रकरणी राजू ताराचंद दौलतपुरे (वय ५०, रा. जवाहर कॉलनी) यांच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वाराने पिरगाळला महिला पीएसआयचा हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावती देण्याच्या कारणावरून एका दुचाकीस्वाराने वाहतूक शाखेच्या महिला पोलिस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की करत हात पिरगाळला. हा प्रकार सोमवारी सकाळी सेंट्रल नाका येथे घडला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी शहर वाहतूक शाखेच्या सरला काशीनाथ गाडेकर (वय ३५) यांनी तक्रार दाखल केली. गाडेकर या पथकासह सेंट्रल नाका येथे वाहतूक नियमाचे कर्तव्य आणि वाहनधारकांवर कारवाई करत होत्या. यावेळी विखारखान निसारखान (वय १९, रा. रहेमानिया कॉलनी) याला त्यांनी अडवले. यावेळी विखारखानने विनाकारण मोबाइलमध्ये शुटिंग घेऊन दंड का भरून घेता, असे म्हणून वाद घातला. तसेच गाडेकर यांच्या हाताला झटका देत हात पिरगाळून ई-चालान मशीन हिसकावण्याचा प्रयत्न केला. तसेच मी तुम्हाला बघून घेईन, अशी धमकी देखील विखारने दिली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गाडेकर यांच्या तक्रारीवरून विखार खान याच्या विरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, कर्तव्य बजावण्यापासून रोखणे, धमकी देणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एपीआय गिते तपासणी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुयश कॉलनीत वृक्षारोपण

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

क्रांतीचौक वॉर्डातील काल्डाकॉर्नर ते शिवमंदिर वृक्षारोपण अभियानाच्या अंतर्गत सुयश कॉलनीमधील महापालिकेच्या खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले. वॉर्डच्या नगरसेविका शिल्पाराणी वाडकर आणि माहेश्वरी प्रभाग श्रेयनगर यांच्या पुढाकाराने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला उपायुक्त वर्षा ठाकूर, माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष सी.एस. सोनी यांची विशेष उपस्थिती होती. माधव काळे, सुनीता काळे, विनय देशमुख, सागर वाडकर, स्वप्निल पारगावकर, समीर विटेकर, वैशाली विटेकर, डॉ. पानट, डॉ. सविता पानट, प्रशांत जोशी,कांतीलाल व्यास, स्वप्निल श्रॉफ, दक्षा श्रॉफ, स्वप्निल सेवेकरी, सुचेता सेवेकरी, राजश्री कुलकर्णी, स्वप्निल देशपांडे, नितीन देशमुख, प्रदीप देशपांडे, संजय मंत्री, मनोज तोतला, माहेश्वरी प्रभाग श्रेयनगरचे अध्यक्ष रामेश्वर करवा, सचिव अमर मुंदडा, ओमप्रकाश हेडा, सुनेत्रा हेडा, राजश्री करवा, अमित मंत्री यांच्यासह वॉर्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेनेच्या माजी उपमहापौर निधीसाठी खासदाराकडे धावल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मयुरबन कॉलनी वॉर्डातील शंभूनगर या वसाहतीसाठी जलवाहिनी टाकण्याच्या कामाबद्दल महापालिकेचे प्रशासन दोन वर्षांपासून फिरवाफिरवी करत आहे. गुंठेवारी भागात महापालिकेच्या निधीतून जलवाहिनी टाकता येत नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या माजी उपमहापौर स्मिता घोगरे यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे धाव घेतली आहे. शंभूनगरात जलवाहिनी टाकण्यासाठी खासदार निधीतून ५० लाख रुपये द्या, अशी मागणी त्यांनी जलील यांच्याकडे केली आहे.

खासदार इम्तियाज जलील यांना दिलेल्या पत्राबद्दल माहिती देताना स्मिता घोगरे म्हणाल्या, 'शंभूनगर हा परिसर गुंठेवारी अंतर्गत येणारा परिसर आहे. या भागात राहणारे नागरिक गोरगरीब आहेत. त्यांच्यात स्वत: बोअर घेण्याची आर्थिक क्षमता नाही. या भागात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून मी महापालिकेकडे शंभूनगरातील जलवाहिनीसाठी पाठपुरावा करीत आहे. गुंठेवारी भाग, नो नेटवर्क एरिया असे कारण सांगून जलवाहिनी टाकण्याची फाईल मंजूर केली जात नाही. त्यातच महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे आणि शंभूनगरात जलवाहिनी टाकणे देखील गरजेचे आहे.

गुंठेवारी भागात विकास कामांसाठी आमदार, खासदारांचा निधी वापरण्याची मुभा आहे. त्यामुळे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांना शंभूनगरातील जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी खासदार विकास निधीतून ५० लाख रुपये देण्याची विनंती केली आहे. नागरिकांची गरज लक्षात घेता खासदार ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देतील, असा विश्वास वाटतो' असेही घोगरे म्हणाल्या. जलवाहिनीचे काम झाल्यास शंभूनगरातील गेल्या अनेक वर्षांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, असा उल्लेख त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयटीआय’मध्ये आजपासून प्रत्यक्ष प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशासाठीची पहिली गुणवत्तेनुसार निवड यादी जाहीर झाली असून, गुरुवारपासून प्रत्यक्ष प्रवेशाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत १५ जुलैपर्यंत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील शासकीय व खासगी आयटीआयमधील प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन सुरू आहे. तीन जूनपासून सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेत गुणवत्तेनुसार निवड यादी वेबसाइटवर विभागाने जाहीर केली. विद्यार्थ्यांना 'एसएमएस'द्वारे ही कळविण्यात आले आहे. कॉलेजांनीही आपापल्या स्तरावर यादी नोटीस बोर्डवर लावलेली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे आपला पहिल्या यादीत नंबर लागला की नाही, हे पाहता येते. राज्यात सव्वा लाख जागांसाठी चार लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले. मराठवाड्यात १८ हजार २८५ जागांसाठी ५० हजार १९१ अर्ज आहेत. यामध्ये शासकीय आयटीआयमधील १४ हजार ९६४ जागांसाठी ४९ हजार ३४१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. प्रवेशासाठी इच्छुकांमध्ये प्रचंड चुरस आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रवेशासाठीची मुदत ११ जुलै ते १५ जुलै अशी देण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना सर्व मूळ कागदपत्रांसह पडताळणी आणि प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. १५ जुलै रोजी सायंकाळी पाचपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्ण करता येणार आहे.

\Bसर्व जिल्ह्यांत चुरस\B

'आयटीआय'मधील प्रवेशासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये प्रवेश क्षमतेच्या चार-पाच पट अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी मोठी चुरस आहे. मराठवाड्यात सर्वाधिक अर्ज औरंगाबाद जिल्ह्यातील 'आयटीआय'साठी आहेत. जिल्ह्यात दोन हजार ८०९ जागांसाठी नऊ हजार ५१ विद्यार्थी प्रवेशासाठी इच्छुक आहेत. त्यापाठोपाठ बीडमध्ये दोन हजार ९९६ जागांसाठी आठ हजार ३९३ विद्यार्थ्यांनी अर्ज केलेली आहे. यामध्ये खासगी 'आयटीआय'पेक्षा शासकीय 'आयटीआय'मधील अभ्यासक्रमांना मागणी जास्त आहे. मराठवाड्यातील 'आयटीआय'मध्ये २८ प्रकारच्या अभ्यासक्रमाना (ट्रेड) प्रवेश दिला जातो.

मराठवाड्यात आयटीआय.....१०१

प्रवेश क्षमता......................१८२८५

अर्ज.................................५०१९१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात दमदार पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आठवड्याभरपासून शहरातून गायब असलेल्या वरुणराजाने बुधवारी (१० जुलै) संध्याकाळी पाच वाजता जोरदार हजेरी लावली. शहराच्या बहुतांश भागात तसेच शहर परिसरामध्येही दमदार बरसला. रात्री साडेआठ वाजेपर्यंत २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाड्याने शहरातील नागरिक हैराण झाले होते. राज्यभर बरसत असलेला पावसाची मराठवाड्याकडे मात्र पाठ होती. पावसाचे वातावरण निर्माण होत असले तरी, प्रत्यक्षात पाऊस हुलकावणी देत होता. बुधवारी संध्याकाळी पाच वाजता शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली, तासभर सुरू असलेल्या पावसाने वातावरण आल्हाददायक झाले. सिडको, हडको, गारखेडा परिसर, औरंगपुरा, निराला बाजार, क्रांतीचौक, चिकलठाणा, मुकुंदवाडी, सातारा परिसर, विद्यापीठ परिसर यासह जुन्या शहरात पाऊस जोरदार बरसला. या पावसामुळे औरंगपुरा, सलीम अली सरोवरासमोर तसेच गणेश कॉलनी, औषधी भवन येथील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे तारांबळ उडाली.

घरात पाणी शिरले

जवाहर कॉलनी पोलिस ठाण्याजवळील वीजनगर चौक परिसरामध्ये आठ ते दहा घरांमध्ये पाणी शिरले होते. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने घरातील पाणी काढण्याचे प्रयत्न केले. तर विश्वभारती कॉलनी भागातील महापालिकेच्या उद्यानासमोर असलेल्या एका विजेच्या खांबावर झाड कोसळल्याची घटना घडली.

भिजण्याचा मनमुराद आनंद

शाळा सुटण्याच्या ऐन वेळेवर पावसाने हजेरी लावल्याने शाळकरी मुलांनी पावसात भिजण्याचा मनमुदाराद आनंद लुटला. औरंगपुरा, हडको, सिडकोसह शहरातील इतर भागांमध्येही चिमुकल्यांनी पावसाचा आनंद घेतला.

आठवड्याअखेर बरसणार

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आठवड्याअखेर शहरात येणाऱ्या चारही दिवसांमध्ये ढगाळ वातावरणासह पाऊस होणार आहे. जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून शहरात किमान तापमानामध्येही घट झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनहित नर्सिंग कॉलेजच्या संस्थाचालकाला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नर्सिंगच्या अभ्यासक्रमाला मान्यता नसताना प्रवेश देऊन तब्बल ६० विद्यार्थिनींना १० लाखांचा गंडा घालणारा जनहित नर्सिंग कॉलेजचा आरोपी संस्थाचालक सुभाष भागिनाथ पाटील याला मंगळवारी (९ जुलै) अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले असता, आरोपीला शुक्रवारपर्यंत (१२ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. मोटे यांनी दिले.

या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, नर्सिंग अभ्यासक्रमाची मंगळवारी परीक्षा असताना विद्यार्थिनींना हॉलतिकीट न मिळाल्याने विद्यार्थिनींनी ठिय्या आंदोलन केले होते. दरम्यान, मुंबई येथील टेक्निकल बोर्डाच्या संचालकांनी संबंधित जनहित कॉलेजला कोणतीही परवानगी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुभाष पाटील याला मंगळवारी अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले असता, कॉलेजमध्ये किती प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे किंवा नाही, आरोपीने यापूर्वीच्या किती बॅचच्या विद्यार्थ्यांची फसवणूक केली, आरोपीने यासारख्या किती विनापरवाना संस्था सुरू केल्या, आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का आदी बाबींचा तपास करून, ज्या ठिकाणी संस्था सुरू केली त्या ठिकाणचा भाडेकरारनामा व गुन्ह्यासंबंधीची कागदपत्रे आणि फसवणूक केलेली रक्कम जप्त करणे बाकी आहे. तसेच आरोपीच्या बँक खात्याबरोबरच त्याने इतर कुणाच्या नावावर बँक खाते सुरू केले आहे का, याचाही तपास करावयाचा आहे. संस्थेचे सर्व व्यवहार पाहणाऱ्या निर्मला ब्रह्मराक्षस हिला अटक करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशाचा पाऊस; जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैशाचा पाऊस पाडतो, ५ ते १० कोटी रुपये मिळवून देतो, असे आमीष दाखवून हैदराबाद येथील एका मेकॅनिकला ८ लाख ५० हजारांचा गंडा घालणारा आरोपी साहेब खान यासीन खान पठाण याने दाखल केलेला नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. एच. जोशी यांनी फेटाळला.

या प्रकरणी डोडू सत्यनारायण डोडू जंगैयय (४१, रा. न्यू एलबी नगर, हैदराबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, डोडू यांचा मित्र हजारी खत्री (रा. धुलपेठ, हैदराबाद) याने आरोपी साहेब खान यासीन खान पठाण (५३, रा. नारेगाव) याची ओळख डोडू यांच्याशी करून दिली होती. त्यानंतर आरोपी साहेब खान व त्याचा मुलगा जावेद खान याने डोडू यांना '११ लाख रुपये दे, चमत्कारी विद्येने तुला ५ ते १० कोटी रुपये मिळवून देतो' असे आमीष दाखविले होते. आमिषाला बळी पडून डोडू यांनी आरोपींना ८ लाख ५० हजार रुपये रोख व २ लाख ५० हजार रुपयांचे धनादेश दिले होते. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डोडू यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात आरोपीला तीन जुलै रोजी रात्री अटक करण्यात आली होती व न्यायालयाने त्याची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत केली होती. त्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, न्यायालयाने तो फेटाळला. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images