Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दुचाकीस्वाराकडून पैसे घेताना ‘एसपीओ’ कॅमेरात कैद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज महानगर

वाळूज 'एमआयडीसीतील तिरंगा चौकात महिला विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) यांनी एका दुचाकीस्वराला अडवून 'तू रँग साइड आला आहेस,' असे म्हणत पैसे मागितले. ते घेत असताना एकाने त्याचे व्हिडिओ चित्रिकरण केले आहे.

येथील तिरंगा चौकात दोन महिला 'एसपीओ' दुचाकीस्वारांना अडवून त्यांच्याकडून शंभर रुपये घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. पोलिसांना मदत व्हावी यासाठी परिसरातील पुरुष व महिला यांची विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे असून, येथे कंपनीत कामासाठी देशातील विविध भागातून कामगार आले असल्याने येथील लोकसंख्या वाढली आहे, मात्र लोकसंख्येच्या तुलनेत येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची संख्या तोकडी आहे यात 'एसपीओ'ची नियुक्ती झाल्याने पोलिसांवरील ताण कमी होईल, अशी अपेक्षा होती. त्यांनी वेगळाच मार्ग अवलंबल्याने पोलिसांचीच अडचण होत आहे.

यापूर्वीही असेच काही प्रकार उघडकीस आले होते त्यानंतर अनेकांची तेथून हकालपट्टी केली होती, मात्र आजच्या या घटनेने त्यांनी पुन्हा उद्योग सुरू केल्याचे सिद्ध झाले आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देवून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. या महिला 'एसपीओ' अनेक दिवसापासून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोलिसाबरोबर दिसत होत्या. त्यांनी पोलिसांसोबत अनेक कारवायांमध्ये भाग घेतल्याने त्या पोलिस कर्मचारी असल्याची नागरिकांची धारणा झाली असावी. त्यामुळे मोठी कारवाई करून जास्तीचा दंड भरावा लागेल, अशी भिती दाखवून या 'एसपीओ' दुचाकीचालकांकडून दररोज पैसे घेत असल्याची चर्चा झाल्यानंतर त्यांचा पैसे घेतानाच व्हिडिओ चित्रित करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विधान परिषदेसाठी इच्छुकांनी नेले ११ अर्ज

$
0
0

औरंगाबाद: विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी गुरुवारपासून (२५ जुलै) अर्ज भरण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसला तरी इच्छुकांसाठी ११ अर्ज नेले आहेत. अद्याप युती तसेच आघाडीचा उमेदवार कोण यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. अर्ज दाखल करण्याची मुदत एक ऑगस्टपर्यंत असून पाच ऑगस्ट हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असेल. प्रमुख पक्ष आणि एक किंवा दोन अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली. औरंगाबाद जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेत एकूण ३८४, तर जालना जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण २७२ मतदार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणीप्रकरणात तिघांचा नियमित जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांना बदनामी करण्याची धमकी देत आठ लाखांची खंडणी मागत १६ हजार रुपये स्वीकारणाऱ्या उदय अरुणराव पालकर, भानुदास शंकर मोरे व अमोल सांडू साळवे या आरोपींनी दाखल केलेला नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. एच. जोशी यांनी गुरुवारी (२५ जुलै) फेटाळला.

याप्रकरणी मिलकॉर्नर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सुरेश लक्ष्मण गणेशकर (५५, रा. एन-चार, सिडको) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आरोपी उदय अरुणराव पालकर (४६, रा. एन-पाच, सिडको) याने वीज कंपनीच्या कार्यालयात माहिती अधिकाराखाली अर्ज केला. विविध कामांची माहिती मागून गणेशकर यांना बदनामी करण्याची धमकी दिली होती; तसेच पालकर व त्याचे साथीदार भानुदास शंकर मोरे (३१, रा. जयभवानीनगर), अमोल सांडू साळवे (३५, रा. एन-पाच, सिडको) यांनी गणेशकर यांना आठ लाखांची खंडणी मागितली.

याप्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर २१ जुलै रोजी पोलिसांनी सापळा रचून तिघा आरोपींना १६ हजार रुपयांची खंडणी स्वीकारताना पकडले होते. तिघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयाने आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर तिघांनी नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोतया परीक्षार्थी; तिघांवर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तोतया विद्यार्थी बसवून टायपिंगची परीक्षा देणाऱ्या दोघांसह टायपिंग इन्स्टिट्युटच्या चालकावर छावणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी नागसेनवन येथील मिलिंद मल्टीपर्पज स्कूलच्या केंद्रावर हा प्रकार घडला.

या प्रकरणी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी तक्रार दाखल केली. बुधवारी शहरात शासकीय टंकलेखन परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये मिलिंद मल्टीपर्पज स्कूलच्या केंद्रावर माणिकराव गावंडे हा विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आला हेाता. यावेळी गौरव विजय मेश्राम हा विद्यार्थी देखील परीक्षेसाठी आला होता. गावंडे यांचा पेपर मेश्राम याने सोडवून दिल्याचे तपासणीमध्ये समोर आले आहे. हे दोघेही विद्यार्थी नेहा टायपरायिंग इन्स्टिट्युटचे आहेत. या कामासाठी त्यांना संचालक विजय राणाजी मेश्राम यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी चव्हाण यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी माणिक गावंडे, गौरव मेश्राम आणि विजय मेश्राम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंवर्धनाचे दायित्व प्रत्येकाकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'प्रत्येक व्यक्ती प्रदूषणासाठी जबाबदार आहे. मात्र, माझ्यामुळे प्रदूषण होते असे कुणीच म्हणायला तयार नाही. आपण रासायनिक शेती करून जमिनीचा पोत खराब केला. प्रदूषण करून नद्या दूषित केल्या. जंगले तोडून सिमेंटचे जंगल उभे केले आणि तरीही आपण पर्यावरणाची हानी झाली नाही हे म्हणत असू तर ते अत्यंत चुकीचे ठरेल. शेती, वन, जलसंवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे,' असे विचार जलअभ्यासक प्रा. अरविंद कडबे ( नागपूर)यांनी व्यक्त केले.

प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था, रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मिडटाउन आणि स्फूर्ती महिला मंडळ यांच्या वतीने मेघमल्हार व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प प्रा. अरविंद कडबे (नागपूर) यांनी गुंफले. एन पाच येथील गीताभवनच्या वि. वि. चिपळूणकर सभागृहात व्याख्यानमाला सुरू आहे. या वेळी रोटरीच्या सदस्य संगीता मुळे, प्रगतिशीलचे अध्यक्ष प्रा. रमेश कुलकर्णी, स्फूर्तीच्या अध्यक्ष स्मिता कुलकर्णी, उपाध्यक्ष मंगला जोशी, सचिव प्रभाकर सुभेदार उपस्थित होते. यावेळी कडबे म्हणाले, 'आधुनिक जीवनशैलीचे दुष्परिणाम मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर झाले. अतिआधुनिकतेने नैसर्गिक समतोल ढासळू लागला. शुद्धतेच्या नादात आम्ही मूळ विसरलो आणि आणि रासायनिक शेतीमुळे जमिनीचा पोत बिघडला, पण जमीन सच्छिद्र राहिली नाही. त्यामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. घरोघरी पाणी शुद्ध करणारे प्रकल्प आहेत. यातून शुद्ध पाणी मिळत असले तरी, त्याचे प्रमाण ४०% असते. उर्वरित ६०% पाणी इतके निरोपयोगी होते की ते शेतातही वापरता येत नाही. घरोघरी वेस्टेज पाण्याचा पुनर्वापर आणि शोषखड्डे तयार करून पाणी मुरवले पाहिजे,' असे आवाहन त्यांनी केले. या वेळी प्रगतिशीलचे माजी अध्यक्ष आर. पी. दुसे, सहसचिव भरत कुलकर्णी, शिखवकुमार पाडळकर उपस्थित होते. गायत्री कुलकर्णी यांनी स्वागतगीत गायले. पांडुरंग पाथ्रीकर, विश्वास काळे आदींनी परिश्रम घेतले. शुक्रवारी व्याख्यानमालेचा समारोप असून महिला सबलीकरण या विषयावर मीरा कडबे संवाद साधतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांना ‘डीसीपीएस’च्या स्लिप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मागील सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डिफाइन कॉन्ट्रीब्युशन पेन्शन स्कीम (डीसीपीएस) च्या स्लिप तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शिक्षकांना आठ दिवसांत या स्लिप दिल्या जातील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी अप्पासाहेब चाटे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या पगारातून गेल्या सहा वर्षांपासून 'डीसीपीएस' योजनेअंतर्गत दहा टक्के रक्कम कपात केली जात आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून शिक्षकांना एकाही आर्थिक वर्षाच्या कपातीच्या हिशेब स्लिप देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्याभरातील कित्येक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा फरक काढण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. जूनच्या वेतनामध्ये शिक्षकांना देय असलेला सातव्या वेतन आयोगाचा लाखोंचा फरक जुलैची पगार बिले वरिष्ठ स्तरावर पाठवली गेली तरीही ताळमेळ जुळत नाही. त्यामुळे शिक्षकांना गेल्या दोन महिन्यांपासून या फरकाला मुकावे लागल्याची ओरड सुरू आहे. या स्लिप देण्यास वित्त विभाग चालढकलपणा करत असल्याचा आरोप शिक्षक सेनेचे राज्य समन्वयक तथा जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांच्यासह शिष्टमंडळाने केला होता. दरम्यान, यासंदर्भात बोलताना चाटे म्हणाले, 'एक लिपिक असल्याने काम प्रलंबित होते. त्यामुळे सहा कर्मचारी नियुक्त करून गेल्या सहा महिन्यांत स्लिपा तयार करण्याचे काम करून घेण्यात आले आहे. २०१३ -१४ ते २०१७-१८ या पाच वर्षातील हे काम आहे. स्लिप तयार झाल्यानंतर पुन्हा कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, म्हणून पडताळणी केली जात आहे.'

\Bत्रुटींसाठी तक्रार नोंदवही

\B' येत्या आठ दिवसांत संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शिक्षकांना स्लिपचे वाटप होईल. स्लिपमध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधितांना अडचणी येऊ नये म्हणून जिल्हा परिषदेत एक तक्रार नोंदवही ठेवण्यात येणार आहे. त्रुटी असेल तर तक्रार करा. सोबत स्लिपची झेरॉक्स प्रतही जोडा. आठ दिवसांच्या आत त्यात दुरुस्ती करून देण्यात येईल,' असे चाटे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकटगावकर शिवसेनेच्या वाटेवर?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियामध्ये रंगत असल्याने राजकीय वातावरणात खळबळ निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी सध्या शिवसेनेकडून तालुकाप्रमुख रमेश पाटील बोरनारे यांच्यासह माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांची नावे चर्चेत आहेत. आता यात विद्यमान आमदारांच्या नावाची भर पडल्याने शिवसेनेची उमेदवारी कुणाला मिळणार, असा प्रश्न मतदार विचारत आहेत. दरम्यान, याबाबत आमदार भाऊसाहेब पाटील यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशानंतर कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील अनेक आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. राज्यात निर्माण झालेल्या भाजप-शिवसेना युतीच्या लाटेवर स्वार होऊन पुन्हा आमदारकी पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. या आमदारांमध्ये वैजापूरच्या विद्यमान आमदारांचा समावेश असून, त्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड: तुल्यतुलाई सौर ऊर्जा प्लांटमध्ये स्फोट; १ ठार

$
0
0

बीड: (धारूर)

बीड जिल्ह्यात धारूर तालुक्यातील तुल्यतुलाई सौर ऊर्जा प्लांटमध्ये आज पहाटे झालेल्या स्फोटात एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर लातूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पहाटे तीन-साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडला. त्यानंतर लागलेल्या आगीत एक कामगार १०० टक्के भाजला. तर, अन्य दोघे गंभीर जखमी झाले. हा स्फोट इतका तीव्र होता की आजूबाजूच्या गावांतही याचे आवाज ऐकू आले. स्फोट नेमका कोणत्या कारणामुळं झाला हे समजू शकलेलं नाही. सध्या कुणालाही घटनास्थळी जाण्यास मनाई असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समस्त ब्राह्मण समाजाचे ३ ऑगस्टला आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने ३ ऑगस्टला धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. राज्य सरकारने ब्राह्मण समाजाच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या आणि समाजाला न्याय मिळवून द्यावा यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय समाजाच्या जालनख येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला. या वेळी दिपक रणनवरे, विजया कुलकर्णी , धनंजय कुलकर्णी, सचिन वाडेपाटील, श्रीकांत जोशी उपस्थित होते. ब्राह्मण समाजाच्या मागण्यांविषयी राज्य सरकारने गांभीर्य दाखवलेे नाही. यासाठी समाजाच्या वतीने २२ जानेवारी २०१९ रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य आंदोलन करण्यात आले. तरीही शासनाने समाजाच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली. यामुळे ब्राह्मण समाज आता आक्रमकपणे आपल्या मागण्या सरकारपुढे मांडणार आहे.
ब्राह्मण समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन करून यासाठी ५०० कोटींची तरतुद करावी. ब्राह्मण समाजावर अर्वाच्य भाषेत बोलणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी अँट्रासिटीसारख्या कायद्याची निर्मिती करावी. संपूर्ण शिक्षण मोफत करावे. ब्राह्मण समाजासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह स्थापन करावे. पुरोहितांना रूपये ५००० मासिक मानधन सुरू करावे, कुळात गेलेल्या जमिनी परत मिळाव्या, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी विलास पाटणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा वकील संघाच्या शुक्रवारी (२६ जुलै) झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक ४१० मते मिळवून विलास पाटणी हे विजयी झाले, तर सचिवपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक ४९२ पदे मिळवत संदीप सिरसाठ हे विजयी झाले. खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या निवडणुकीत १२०० वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला.

जिल्हा वकील संघाच्या १६ जागांसाठी ३२ जणांनी विविध पदांसाठी अर्ज दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या दोन सभागृहात दुपारी १२ ते ३ वाजेच्या दरम्यान मतदान झाले. यामध्ये १ हजार २०० वकिलांनी मतदानाचा हक्क बजाविला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विलास पाटणी यांना ४१०, तर प्रतिस्पर्धी रज्जाक पटेल रहीम यांना ३५१ मते मिळाली. सचिवपदासाठी अ‍ॅड. संदीप सिरसाठ यांना ४९२ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी शेरखाने अशा दत्तात्रय यांना २७९ मते मिळाली. विजय सुरडकर हे ४३० मते मिळवत सहसचिवपदी निवडून आले. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमलाकर तांदुळजे यांना सर्वाधिक ६३३ मते मिळाले, तर महिलांमधून लता सोलोमन कांबळे यांना सर्वाधिक ५५५ मते मिळाली. वकील संघाच्या सदस्यपदी विकास बनकर, विनोद डोंगरे, अमोल घोडेराव, सुनिता कर्मनकर, महेश काथार, रमेश मोरे, सुनिल पौळ, अस्मा शेख, संभाजी तवार, किशोर वाघ, रितेश वाघमारे आदी निवडून आले. निर्वाचन अधिकारी म्हणून व्ही. एन. बाफना यांनी काम पाहिले. त्यांना तुकाराम जोशी, केदार बर्दापूरकर, स्वप्नील पटेल, प्रशांत निकम, जे. के. वासडीकर यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाजनादेश यात्रा १८ ऑगस्टपासून मराठवाड्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कर्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून एक ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. ही यात्रा नगरहून मराठवाड्यात १८ ऑगस्टला दाखल होत असून, त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते यात्रेचे मराठवाडा प्रमुख शिरीष बोराळकर यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

बोराळकर म्हणाले, महाजनादेश यात्रेत १८ ऑगस्ट रोजी १२ वाजता पाथर्डीला जाहीर सभा, दुपारी अडीच वाजता आष्टी येथे सभा होईल. साडेचार वाजता जामखेड, रात्री साडेसात वाजता बीड येथे जाहीरसभा होणार आहे. १९ ऑगस्ट रोजी बीड येथे सकाळी पत्रकार परिषद, त्यानंतर गेवराई येथे जाहीरसभा, दुपारी साडेतीन वाजता अंबडला सभा, औरंगाबाद सिडको येथे सायंकाळी सहा वाजता यात्रेचे स्वागत आणि रात्री सात वाजता जाहीर सभा होईल. २० ऑगस्ट रोजी सकाळी औरंगाबादेत पत्रकार परिषद, दुपारी १२ वाजता फुलंब्रीत सभा, दुपारी दोन वाजता सिल्लोड येथे स्वागत, दुपारी साडेतीन वाजता भोकरदन येथे व त्यानंतर जालन्यात रात्री सात वाजता जाहीर सभा. २१ ऑगस्टला सकाळी दहा वाजता जालन्यात पत्रकार परिषद, त्यानंतर १२ वाजता मंठा, दुपारी दोन वाजता सेलू, साडेतीन वाजता पाथरी व सायंकाळी परभणी येथे जाहीरसभा. २२ ऑगस्टला परभणी येथे पत्रकार परिषद. दुपारी साडेबारा वाजता औंढा नागनाथ येथे स्वागत, दुपारी दोन वाजता हिंगोली येथे जाहीर सभा, कळमनपरी येथे स्वागत, सायंकाळी सहा वाजता अर्धापुर व त्यानंतर नांदेड येथे जाहीरसभा. २३ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नांदेड येथे पत्रकार परिषद. दुपारी १२ वाजता लोहा येथे जाहीरसभा, दुपारी दोन वाजता अहमदपूर, सायंकाळी पाच वाजता उदगीर व त्यानंतर लातूर येथे जाहीरसभा. २४ ऑगस्टला सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार परिषद. दुपारी १२ वाजता निलंगा, दुपारी दोन वाजता औसा, सायंकाळी साडेचार वाजता उस्मानबाद, त्यानंतर तुळजापूर येथे सायंकाळी साडेसहा वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीरसभा होईल व त्यानंतर ही यात्रा सोलापूर दिशेने मार्गस्थ होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'मटा हेल्पलाइन'च्या बळावर साकारले स्वप्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या सोनल मसुरेला घरातली आर्थिक परिस्थिती शिक्षणात मोठा अडसर ठरत होती. त्यामुळे दहावीनंतर शिक्षण होणार कसे, असा मोठा प्रश्न होता. या कठीण समयी सोनलला 'मटा हेल्पलाइन'च्या मदतीचा हात मिळाला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिचे बी. फार्मसीचे स्वप्नही आता सत्यात उतरते आहे.

२०१३मध्ये शिवशंकर कॉलनीच्या पत्र्याच्या लहानशा घरात राहणाऱ्या सोनलने दहावीमध्ये चिकाटीने अभ्यास करत ९२.४० टक्के गुण घेतले. वडील नारायण मसुरे भाजी विक्री करण्याचा व्यवसाय करतात. कुटुंबामध्ये सोनलसह तीन मुली. कुटुंबाचे दरमहा जेमतेम आठ हजार रुपये उत्पन्न. त्यातून सोनलला कुटुंबाने दहावीपर्यंत शिक्षण दिले. यातही परिचित व नातेवाईकांनी केलेली मदत मोलाची होती. दहावीला असताना साधी शिकवणी लावणेही सोनलला आर्थिक अडचणीमुळे शक्य झाले नाही. मात्र, शाळेतील शिक्षकांनी तिला विनामोबदला शिकवणी वर्गात प्रवेश दिला. पुस्तक नसल्याने वर्गशिक्षकाने पुस्तकांची मदत केली. या सर्वांच्या हातभारामुळे सोनल दहावी पूर्ण करू शकली. मात्र, मुलीच्या पुढील शिक्षणासाठी काय करायचे, असा मोठा प्रश्न कुटुंबासमोर होता. त्याच वेळी 'मटा हेल्पलाइन'ने सोनलला मदतीचा हात दिला. 'मटा'च्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो दात्यांनी तिच्या पुढील शिक्षणासाठी मोठी रक्कम उभी केली. या बळावर सोनलने बारावीमध्ये शिक्षणाचा आलेख कायम ठेवत नेटाने मेहनत करून ७२ टक्के तर, सीईटीमध्ये १२० गुण मिळवले. बारावीनंतर तिने ऑइस्टर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये प्रवेश घेतला आणि सध्या बी.फार्मसीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे.

\B... तर साधी पदवीही शक्य नव्हती

\B'मटा'शी बोलताना सोनल म्हणाली, 'फार्मसी'च्या पहिल्या वर्षाचे मोठे शुल्क केवळ मटा हेल्पलाइनमुळेच भरणे शक्य झाले. प्रोफेशनला पदवी घेण्याचे माझे स्वप्न केवळ 'मटा'मुळेच पूर्ण होत आहे. मला वेळेवर मदत झाली नसती तर काय करावे, असा मोठा प्रश्न माझ्यासह कुटुंबासमोर होता. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे साधी पदवीही घेणे अवघड होते. आता स्वप्न पूर्ण होत आहे. त्याचा आनंद खूप मोठा आहे.'

खरे तर माझे वडील भाजीपाला विकतात. घरची परिस्थिती अत्यंत बिकट. त्यात 'मटा हेल्पलाइन'ने मदतीचा हात मिळाला नसता तर, माझे पुढचे शिक्षण इतके सोपे झालेच नसते. नोकरी मिळताच स्वत: मी सुद्धा 'मटा हेल्पलाइन' नव्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणार आहे.

- सोनल मसुरे, गुणवंत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीचे डोळे पाण्याकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाचे जवळपास दीड महिना उलटून गेला तरी जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यातून उपसा सुरू आहे. गोदावरीच्या ऊर्ध्व भागातही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे धरणाच्या मृतसाठ्यातील पाणीसाठाही खोल गेला असून, गेल्यावर्षीपेक्षा परिस्थिती गंभीर आहे. २०१६मध्ये जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवाड्यामध्ये धरणामध्ये आवक सुरू झाली होती. सध्या त्याउलट पाण्याचा उपसा सुरू असून, आता जायकवाडीचे डोळे पाण्याकडे लागले आहेत.

अत्यल्प पर्जन्यमानामुळे यंदा मे महिन्यापासून जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यातून पाणी उपसणे सुरू करावे लागले आहे. धरणाची पाणीपातळी ४५३.६७६ मीटरपर्यंत खाली आली आहे. यापूर्वी तीन जुलै २०१६ रोजी धरण सर्वात कमी पातळीपर्यंत आले होते त्यानंतर मात्र धरणात आवक सुरू झाली होती. मृतसाठ्यातून पाणी काढल्याची ही पंधरावी वेळ असल्याचे सिंचन विभागाचे अधिकारी सांगतात. साधारणपणे २५ जुलैपर्यंत नगर, नाशिक जिल्ह्यांतून जायकवाडी धरणात पाणी येण्यास सुरुवात होते. यंदा मात्र नाशिकमध्ये पडलेल्या दमदार पावसानंतर काहीसे पाणी जायकवाडीमध्ये आले धरणाची पाणीपातळी वाढेल इतके पाणी त्यावेळी आले नाही. धरणात एकूण सुमारे २६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी आहे. यातील २५ जुलैपर्यंत मृतसाठ्यातून शहरासाठी सुमारे आठ 'टीएमसी' पाणीउपसा करण्यात आला आहे.

\B१४ वर्षे मृतसाठ्यातून उपसा\B

जायकवाडी धरणामधून यापूर्वी १९७६, १९८१, १९८६ ते ८८, १९९६, २००२ ते २००४, २०१०, २०१२, २०१३, २०१५ व २०१६ या १४ वर्षामध्ये जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यातून उपसा करण्यात आला होता. यंदा उपसा करणारे हे पंधरावे वर्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल हिसकावणाऱ्या आरोपीस पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निराला बाजार परिसरात मोबाइलवर बोलत असताना मोबाइल हिसकावून धूम ठोकल्याप्रकरणातील आरोपी शेख फैज उर्फ राजू शेख युनूस याला गुरुवारी (२५ जुलै) अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, आरोपीला सोमवारपर्यंत (२९ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. मोटे यांनी दिले.

याप्रकरणी विद्यार्थी चिंतामणी अनिरुद्ध भोसले (२८, मूळ रा. घनसावंगी, जि. जालना, ह. मु. समर्थनगर) याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा ३० मे २०१९ रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास निराला बाजार परिसरातून जात होता व आपल्या मोबाइलवर बोलत होता. त्याचवेळी समोरून आलेल्या आरोपीने फिर्यादीचा मोबाईल हिसकावून घेत धूम ठोकली. फिर्यादी त्याच्या मागे धावला असता, आरोपी साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेला. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी शेख फैज उर्फ राजू शेख युनूस (२१, रा. शिवाजी हायस्कूल रोड, शेवाळे हॉस्पिटलजवळ, औरंगाबाद) याला गुरुवारी अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारगिल दिनानिमित्त शहिदांना आदरांजली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना शुक्रवारी (२६ जुलै) आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्त उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत माजी सैनिक व विद्यार्थ्यांसमवेत शहीद जवानांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. देशभक्तीचे आदर्श प्रतिक असलेल्या सैनिकांचे उदाहरण विद्यार्थ्यांसमोर ठेवणे, हाच देशभक्तीच्या ऊर्जेचा खरा स्त्रोत आहे, असे मत या वेळी राज्यमंत्री सावे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला श्री. केंद्रे, मंगलमूर्ती शास्त्री, विमल केंद्रे, कॅप्टन सुर्वे, अशोक हंगे, सुदाम साळुंखे, श्री. नागरे, दत्तू थोरात, श्री. जाधव, गजानन पिवळे, शिवाजी शिरसे, अर्जून गवारे, विवेक राठोड, संजय बोराडे, स्वाती कुलकर्णी, नितीन खरात, श्रीकांत घुले, अशोक गोटे, ज्ञानेश्वर लुटे, डॉ. संजय गाडे, नंदकुमार कुलकर्णी, बाळू वाघमारे, रामेश्वर ठेहरे, श्री. जाधव, नितीन राजगुरू तसेच विद्यार्थी व माजी सैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवछत्रपती विजेत्याला सव्वा कोटीचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवछत्रपती पुरस्कार विजेते, आशियाई शरीर सौष्ठव संघटनेचे पदाधिकारी आणि शहरातील उद्योजक डॉ. संजय मोरे यांना बँकेच्या संचालक मंडळाने एक कोटी २८ लाख रुपयांना गंडा घातला आहे. जून २०१६ ते जुलै २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी जी. एस. महानगर बँकेच्या संचालक मंडळाविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी डॉ. संजय चंद्रकांत मोरे (वय ५९ रा. गुलमोहर कॉलनी, एन पाच) यांनी तक्रार दाखल केली. मोरे यांनी १९९४मध्ये गुलमोहर कॉलनी येथे व्यायामशाळा उभारली होती. अर्ध्या कोटीपेक्षा जास्त किंमतीची साधने या व्यायाम शाळेत होती. महिन्याकाठी या व्यायाम शाळेचे उत्पन्न दोन ते अडीच लाख रुपये होते. मोरे यांचे ज्योतीनगर येथील जी. एस. महानगर बँकेत खाते होते. बँकेने त्यांना व्यायामशाळा आधुनिक करण्याचा सल्ला देत बांधकामासाठी सव्वा कोटी, साहित्य खरेदीसाठी एक कोटी आणि खेळते भांडवल म्हणून एक कोटी अशी सव्वातीन कोटींची कर्जे मंजूर केली होती. मोरे यांनी कर्ज मंजूर झाल्यामुळे व्यायामशाळा पाडून नवीन बांधकाम सुरू केले होते. यासाठी बँकेने त्यांना प्रथम ५० लाख रुपये वितरित केले होते. मोरे हे नवीन व्यायाम शाळेच्या कामात व्यस्त असताना बँकेने त्यांना अंधारात ठेवत एक कोटी २८ लाख रुपये परस्पर वळते केले. यापैकी ३७ लाख २३ हजार रुपये साई दत्त इन्फ्राच्या खात्यात आणि ९१ लाख ४५ हजार रुपये साई दत्त इन्फ्रास्टक्चरच्या खात्यात वितरित करण्यात आले. या दोन्ही फर्मशी मोरे यांचा काही संबंध नसताना बँकेने बनावट नोंदी करीत ही रक्कम वळती केली.

हा प्रकार समजल्यानंतर मोरे यांना धक्का बसला. त्यांनी बँकेशी संपर्क साधला असता बँकेने माफी मागत मोरे यांना तुमचे नुकसान होणार नाही, असे सांगितले. मोरे यांनी आपले 'सी बील' खराब होऊ नये म्हणून बँकेला सहकार्य केले, मात्र बँकेने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी मोरे यांच्या तक्रारीवरून बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, व्यवस्थापकीय संचालक मंजुनाथ कांचन, सहा व्यवस्थापक मते, कर्ज वितरण अधिकारी काळे, तत्कालीन व्यवस्थापक धुड,सख्ये भाऊ कुमार मुरलीधर नरवडे, शरद मुरलीधर नरवडे (दोघेही रा. सविंदणे, ता. शिरूर, जि. पुणे), सध्याचे संचालक मंडळ व तत्कालीन लेखापाल यांच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोराला बुलडाण्यात पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तरुणाला मारहाण करूत मोबाइल पळवणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. आरोपीला बुलडाणा येथून अटक करण्यात आली. हा गुन्हा २४ जुलै रोजी क्रांतीचौक परिसरात घडला होता.

क्रांतीचौक परिसरात बुधवारी तरुणाला मारहाण करीत त्याचा मोबाइल पळवण्यात आला होता. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक माहितीआधारे हा मोबाइल लोणार (जि. बुलडाणा) येथील वेणी गावी असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पथकाने संशयित आरोपी विठ्ठल जनार्धन काकडे याला वेणी गावावरून मोबाइलसह ताब्यात घेतले. आरोपी काकडेला क्रांतीचौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त मीना मकवाना, निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख, फारूख देशमुख, अमर चौधरी, जायभाय, धर्मराज गायकवाड आणि शेख बाबर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटदारांना आयुक्तांचा पुन्हा दोन दिवसांचा वायदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केलेल्या कामाचे थकित पेमेंट मिळावे या मागणीसाठी महापालिका कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी शुक्रवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची भेट घेतली. आयुक्तांनी कंत्राटदारांना पेमेंट करण्यासाठी पुन्हा दोन दिवसांचा वायदा केला. यापूर्वीही दोन ते तीन वेळा असा वायदा करण्यात आला होता.

कंत्राटदारांनी केलेल्या कामांची बिले सुमारे दीड वर्षांपासून प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करून देखील बिल मिळत नसल्यामुळे कंत्राटदारांनी वेळोवेळी आंदोलन केले आहे. शुक्रवारी त्यांनी आयुक्तांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात भेट घेतली. आयुक्त आणि कंत्राटदार यांच्यात यावेळी बैठक झाली. ज्या कंत्राटदारांच्या बिलांची रक्कम एक कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्या कंत्राटदारांना थकित बिलाच्या ४० ते ५० टक्के पमेंट करा, एक कोटी रुपयांपर्यंत ज्या कंत्राटदारांचे पेमेंट थकलेले असेल त्यांना ६० टक्क्यांपर्यंत पेमेंट करा, ५० लाखांपर्यंत ज्या कंत्राटदारांचे बिल थकलेले आहे त्यांना ७० ते ८० टक्के पेमेंट करा, अशी सूचना कंत्राटदारांनी आयुक्तांना केली. आयुक्तांनी कंत्राटदारांचे म्हणणे ऐकून घेतले. दोन दिवसांत पेमेंट बद्दल निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागण्यांसाठी शिक्षकांचे महापौरांना साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'माध्यमिक शिक्षक असे पदनाम द्या,' या मागणीसाठी महापालिका शाळेतील तासिकातत्वावरील शिक्षकांनी शुक्रवारी महापौरांची भेट घेतली व निवेदन सादर केले. या मागणीचा सहानुभूतीने विचार करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.

महापौरांना दिलेल्या निवेदनात शिक्षकांनी म्हटले आहे की, पालिका प्रशासनाने शासनाच्या मंजुरीनंतर २२ जणांची निवड तासिकातत्वावरचे शिक्षक म्हणून केली. त्यानंतर गरजेनुसार आयुक्त व शिक्षणाधिकारी यांच्या संमतीने २१ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ४३ शिक्षक तासिकातत्वावर २०१३पासून काम करीत आहेत. अगोदर नियुक्त केलेल्या २२ शिक्षकांनी हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाच्या आदेशानुसार त्या शिक्षकांना माध्यमिक शिक्षक असे पदनाम देवून त्यांची सेवा कायम करण्यात आली. उर्वरित २१ शिक्षकांना देखील त्यांच्याप्रमाणेच न्याय द्या. माध्यमिक शिक्षक असे पदनाम देवून शासनाकडे वेतन अनुदानाचा प्रस्ताव पाठवा. पालिका आयुक्तांसह सर्व पदाधिकारी, सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाच्या प्रती शिक्षकांनी दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला मंडळांनी वस्त्यात जावून शिकवावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महिलांनीही सामाजिक दायित्व पूर्ण केले पाहिजे. महिला मंडळांनी वस्त्यांमध्ये जावून शिकवायला हवे. सकारात्मक मनाने केलेले कार्य कायम ऊर्जादायी असते,' असे आवाहन शुक्रवारी सामाजिक कार्यकर्त्या मीरा कडबे (चंद्रपूर) यांनी केले.

प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था, रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मिडटाउन आणि स्फूर्ती महिला मंडळ यांच्या वतीने मेघमल्हार

व्याख्यानमालेचा शुक्रवारी समारोप झाला. एन पाच येथील गीताभवनच्या वि. वि. चिपळूणकर सभागृहात व्याख्यानमालेचे तिसरे व अंतिम पुष्प मीरा कडबे यांनी गुंफले. अध्यक्षस्थानी स्फूर्ती महिला मंडळाच्या अध्यक्ष स्मिता कुलकर्णी होत्या. या वेळी स्फूर्तीच्या उपाध्यक्ष आरती कुलकर्णी, सचिव मंजूषा कोरंगळीकर, प्रगतिशीलचे अध्यक्ष प्रा. रमेश कुलकर्णी, सचिव प्रभाकर सुभेदार उपस्थित होते. यावेळी कडबे म्हणाल्या, 'आजची पिढी फास्ट आहे. तिला बंधन नको असते. नातेसंबंध, कुटुंबव्यवस्थेला कुठेतरी तडा जात असल्याने पालकांनी आता मजबूत होणे आवश्यक आहे. प्रेम आणि विश्वासाने मुलांशी सुसंवाद साधा. कारण मुलांचे खरे सुरक्षा कवच कुटुंब हेच असते. मुलांना खरे शिक्षण, संस्कार कुटुंबातून मिळतात. कुटुंबव्यवस्थेचा खरा कणा आई असते. आई कणखर असली तर मुलांना दिशा देऊ शकते. म्हणूनच आईची जबाबदारी मोठी आहे. आपल्या मुलांना संयम शिकवण्याचे कसब प्रत्येक पालकांना आवश्यक असून मुलांची निर्णयक्षमता विकसित करण्याचे काम पालकांचे आहे. महिलांनीही सामाजिक दायित्व पूर्ण केले पाहिजे. महिला मंडळांनी वस्त्यांमध्ये जावून शिकवायला हवे. सकारात्मक मनाने केलेले कार्य कायम ऊर्जादायी असते. उद्याचा गौरवशाली भारत उभा करण्यासाठी आपल्याला मार्गस्थ व्हावे लागेल. 'मंजिल को राह बुलाती है...' असे आवाहन त्यांनी केले. या वेळी उपसचिव वैशाली ठाकूर, कोषाध्यक्ष उर्मिला मगर सहकोषाध्यक्ष निशी अग्रवाल, स्मिता गिरी, स्मिता कुलकर्णी, विभा श्रीवास्तव, नलिनी कुलकर्णी, मीना देशपांडे, अलका अमृतकर, नीला रानडे यांच्यासह कार्यकारिणी उपस्थित होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images