Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नूतनीकरणासाठी वर्षानुवर्षे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नेत्रपेढीच्या परवाना नूतनीकरणासाठी चक्क वर्षानुवर्षे लागत असून, लालफितीच्या कारभाराचा फटका शहरातील नेत्रदानाला बसतो आहे. शहरातील 'दृष्टी आय बँके'ला तब्बल दीड वर्षानंतर परवाना मिळाला आहे, तर काही नेत्रपेढ्यांच्या परवाना नूतनीकरणाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. विशेष म्हणजे घाटीच्या नेत्रपेढीच्या परवान्याचे नूतनीकरणही झालेले नाही.

नेत्रदान आणि नेत्ररोपणासाठी नेत्रपेढीला परवाना लागतो आणि दर तीन वर्षांनी परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. मात्र गेल्या काही वर्षांपासून नेत्रपेढ्यांच्या परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया रखडली असून, नेत्रपेढी चालकांना वारंवार खेटे मारूनही आरोग्य विभागाकडून दाद मिळत नसल्याचे दुर्दैवी चित्र कायम आहे. विविध कागदपत्रांच्या नावाखाली टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही अनेक नेत्रपेढी चालकांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना केला. विशेष म्हणजे आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतरही प्रत्येक वेळी नवनवीन कागदपत्रे मागितली जातात आणि त्यामुळेच नेत्रपेढीचालक पुरते वैतागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे जोपर्यंत परवान्याचे नूतनीकरण होत नाही, तोपर्यंत नियमानुसार नेत्रदान व नेत्ररोपण केले जाऊ शकत नाही. याचा थेट परिणाम नेत्रदान चळवळीला बसला असून, शहरातील इच्छुकांना नेत्रदानासाठी शहरामध्ये फार कमी पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळेच अनेकजण जालन्यातील गणपती नेत्रालयाच्या माध्यमातून नेत्रदान करताना दिसून येत आहेत.

टोलवाटोलवी, अपमानास्पद वागणूक

शहरातील 'दृष्टी आय बँके'ने सप्टेंबर २०१३ मध्ये परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केला होता, तर मार्च २०१५ मध्ये परवाना प्राप्त झाला. परवान्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे मागितल्यानंतर त्या त्या वेळी देण्यात आली होती. मात्र तरीही आरोग्य विभागाकडून अपेक्षित सहकार्य कधीच मिळाले नसल्याचे समजते. या संदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी केली जाते, अपमानास्पद वागळूक दिली जात असल्याचेही काही नेत्रपेढी चालकांनी 'मटा' सांगितले.

माझ्या नेत्रपेढीचा परवाना नूतनीकरण दीड वर्षानंतर झाले. सतत पाठपुरावा करूनही दाद मिळत नाही. त्यामुळे नेत्रदान व नेत्ररोपण करता येत नाही. अनेक नातेवाईकांची इच्छा असून परत पाठवावे लागते.

डॉ. सुनील कसबेकर, दृष्टी आय बँक.

परवाना नूतनीकरणाचे काम आरोग्य सचिवांकडून होते. शहरातील नेत्रपेढी चालकांचे अर्ज मुंबईला पाठवण्यात आले आहे. काहीवेळी कागदपत्रांची कमी राहिल्यास विलंब होऊ शकतो.

- डॉ. जी. एम. गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक

मी परवाना नूतनीकरणासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा करतो आहे. मात्र नूतनीकरण न झाल्यामुळे आता माझा उत्साह पूर्णपणे मावळला आहे.

- डॉ. संतोष अग्रवाल, नेत्रपेढीचालक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मार्च एंडला बँकांना सुट्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मार्च महिन्याचे शेवटचे चार दिवस आणि एप्रिल महिन्याचा पहिल्या आठवडयातील पाच दिवस, या १० दिवसांच्या काळात केवळ अडीच दिवस बँकांचे कामकाज होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना २७ मार्चपूर्वी बँकांतील कामे करावी लागतील. राष्ट्रीय व साप्ताहिक सुट्या, आर्थिक वर्षाचे क्लोजिंग यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

शनिवारी (२८ मार्च) श्रीरामनवमीची सुटी, तर २९ मार्च रोजी रविवारची साप्ताहिक सुटी आहे. त्यानंतर ३० व ३१ मार्चला बँका सुरू राहतील. १ एप्रिलला बँका सुरू असल्या तरी वार्षिक लेखापरीक्षणामुळे ग्राहकांची कामे मात्र होणार नाहीत. २ एप्रिल रोजी महावीर जयंतीची सुटी आणि ३ एप्रिलला गुड फ्रायडेची सलग सुटी आहे. शनिवारी (४ एप्रिल) बँकेचे कामकाज अर्धा दिवस, तर ५ एप्रिलला रविवारच्या साप्ताहिक सुटीमुळे बँका बंद असतील.

बँका सलग बंद राहणार असल्याने मार्च महिन्याचा शेवटचा व एप्रिलचा पहिला आठवडाही याच कालावधीत येत असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन जमा होण्यासही विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारांसाठी ग्राहकांची सारी भिस्त प्लास्टिक मनीवरच असेल. त्यामुळे विविध दुकानांपासून ते मॉल पेट्रोल पंपांपर्यंत ऑनलाइन व्यवहार करावे लागणार आहेत. त्यासाठी एटीएम कार्ड, डेबिट कार्डचा वापर वाढणार असून, सुट्यांमध्ये बँका सुरू राहणार असल्याने एटीएमची सेवा सुरळीत राहणार असल्याचे बँकांनी स्पष्ट केले.

२७ पूर्वी करा व्यवहार

आर्थिक वर्षअखेर असल्यामुळे बँकांमध्ये शेवटच्या आठवड्यात प्रचंड गर्दी असते. यावर्षी याकाळात केवळ दोनच दिवस बँका सुरू राहणार असल्याने गैरसोय टाळण्यासाठी करदाते किंवा विमा पॉलिसीधारकांनी २७ मार्च व्यवहार करणे योग्य ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’चे ८ मृत्यू कबूल!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरामध्ये ''स्वाइन फ्लू'ने एकही मृत्यू झालेला नाही' असे सांगणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर शहरामध्ये ८ मृत्यू झाल्याचे कबूल केले. याच बैठकीत खुद्द खासदारांनीही जिल्हाभरात २१ मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्याचवेळी 'स्वाइन फ्लू'च्या रुग्णांची स्क्रिनिंग करण्यासाठी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेपर्यंत महापालिकेचे पाच सेंटर सुरू ठेवावे, असे आदेशही खासदारांनी याच बैठकीत देऊन टाकले.

'स्वाइन फ्लू'ची माहिती देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने पत्रकारांना घाटीतून रुग्णांची माहिती मिळू नये, यासाठी पूर्ण प्रयत्न तडीस नेले आणि त्याचवेळी पालिकेच्या आरोग्य विभागातूनही चुकीचे माहिती दिल्याचे स्पष्ट झाले. घाटीमध्ये शनिवारी दोन स्वाइन फ्लूचे रुग्ण दगावल्याची माहिती मिळाल्यानंतर 'महाराष्ट्र टाइ्म्स'ने खात्री करण्यासाठी घाटीमध्ये संपर्क साधला असता, माहिती न देण्याचे आदेश असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांना विचारले असता, 'एकही स्वाइन फ्लूने मृत्यू नाही' असे त्यांनी छातीठोकपणे सांगितले. दुसऱ्या बाजूला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गायकवाड यांनी शनिवारी 'स्वाइन फ्लू'ने दोन रुग्ण दगावले असून, यातील एक रुग्ण शहरातील असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शासकीय यंत्रणांमुळे संभ्रमावस्था दिसून आली आणि माहिती दडवण्याचे पालिकेचे प्रयत्न स्पष्ट झाले. या विषयी खासदार खैरे यांनी रविवारी (१५ मार्च) सायंकाळी सुभेदारी विश्रामगृहावर बोलावलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत पालिकेच्या आरोग्य विभागाचे पितळ उघडले पडले. खासदारांनी सर्व माहिती घाटीच्या प्रशासनाकडून समोरासमोर घेतली आणि जिल्हाभरात दगावलेल्या २१ रुग्णांपैकी ८ रुग्ण शहरातील असल्याचे डॉ. जयश्री कुलकर्णी यांना खासदारांसमोर कबूल करावे लागले. त्याशिवाय आतापर्यंत जिल्हाभरात ५५ पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी जाहीर केले.

आठ ते आठ स्क्रिनिंग करा

महापालिकेच्या केवळ पाच स्क्रिनिंग सेंटरवर दुपारी बारा-एकपर्यंतच 'स्वाइन फ्लू'च्या रुग्णांचे स्क्रिनिंग केले जाते, असे खासदारांसमोर उघड झाल्यानंतर खैरे यांनी, सकाळी आठ ते रात्री आठ असे रुग्णांचे स्क्रिनिंग करावे, असे आदेश डॉ. कुलकर्णी यांना तातडीने बैठकीत दिले. विशेष म्हणजे सर्व संबंधित रुग्णांची माहिती माध्यमांना उशिरापर्यंत द्या, असे आदेशही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गायकवाड यांना खैरे यांनी दिले.

पाच मॉनिटरसाठी २० लाख

घाटीमध्ये 'स्वाइन फ्लू'च्या रुग्णांसाठी ६ व्हेंटिलेटर आहेत, पण १० मॉनिटरची गरज असल्याचे सांगितल्यानंतर डीपीसीतून ५ मॉनिटरसाठी २० लाख लवकरच देण्यात येतील आणि आठ दिवसांत ५ मॉनिटर घाटीला उपलब्ध होऊ शकतील, असेही आश्वासन बैठकीत दिले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. छाया दिवाण, घाटीच्या मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूषित पाण्यावर भाजीपाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खाम नदीच्या बेसुमार प्रदूषणाने पिण्याच्या पाण्यासोबतच औरंगाबाद शहरात पोहचणाऱ्या भाजीपाल्यालाही बाधा पोहचली आहे. दूषित पाण्यावर पिकवलेला भाजीपाला आरोग्याला अपायकारक ठरला असून नागरिकांना गंभीर आजारांनी घेरले आहे. त्वचारोग, अकाली केस पिकणे, पोटाचे विकार या आजारांचे सर्वाधिक प्रमाण असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

औरंगाबाद शहरातील सांडपाणी आणि वाळूज औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांच्या घातक रसायनांनी खाम नदी दूषित झाली आहे. या पाण्यात घातक रसायनांचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे ऑक्सीजनचे प्रमाण संपुष्टात आले आहे. सध्या खाम नदीकाठावरील शेतीत दूषित पाण्याचा सर्रास वापर सुरू आहे. अनेकदा केमिकलयुक्त पाणी खतासारखे लागू होत असल्यामुळे शेतकरी उत्पादन वाढीसाठी दूषित पाणी वापरतात, असे वळदगावच्या ग्रामस्थांनी सांगितले. उत्पादनात वाढ झाली असली तरी पाणी आरोग्याला अपायकारक असल्याने आजारांना निमंत्रण मिळत आहे. खाम नदीकाठावरील गोलवाडी, वळदगाव, पंढरपूर, वाळूज, लांझी, रांजणगाव, सावखेडा या गावांतील शेतकरी दूषित पाणी वापरतात. पाण्याचा वापर भाजीपाला पिकासाठी होत असल्यामुळे चिंताजनक परिस्थिती आहे. नदी आणि परिसराची पाहणी केल्यानंतर डॉ. किशोर पाठक यांनी निष्कर्ष मांडले आहेत. 'उगमापासून वाहणारी नदी विलीन होईपर्यंत शुद्ध होते असे म्हटले जात होते. कारण पाण्यात जलचर होते. सद्यस्थितीत खाम नदीत मासे, झिंगे, खेकडे नाहीत. तसेच शेवाळ, अल्गी, स्पायरोलीना या जलवनस्पतीही नाहीत. त्यामुळे पाणी शुद्ध होण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. दूषित पाणी शेतीत वापरल्यामुळे बेचव भाजीपाला पिकतो. या भाजीपाल्यात आरोग्यासाठी आवश्यक सत्त्व नसतात' असे डॉ. पाठक यांनी सांगितले. पाण्यात किटकनाशक आणि रसायनांचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. दूषित पाण्यात जस्त, कॅडमियम, कोबाल्ट या घातक घटकांचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे. या पाण्यावर निघणारा भाजीपाला शहरात विक्रीसाठी आणला जातो. जिल्हाभरातून भाजीपाला उपलब्ध होतो; मात्र दूषित पाण्यावरील भाजीपाला ओळखणे शक्य नसल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते.

दूषित भाजीपाल्यामुळे आजार बळावले

दूषित पाण्यातील भाजीपाला आहारात घेतल्यामुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. शहरातील अनेक रुग्ण तज्ज्ञांचा आरोग्यविषयक सल्ला घेत आहेत. प्रतिकारशक्ती कमी होणे हा मुख्य आजार आहे. केस अकाली पांढरे होणे, केस गळणे, त्वचारोग, खाज येणे, भूक मंदावणे आणि पचनाच्या आजारांचाही यात समावेश आहे. खाम नदीचे प्रदूषण नागरिकांच्या जीवावरही बेतले आहे.

दूषित पाणी जमिनीत पाझरत असल्यामुळे अनेक ठिकाणी विहीरीचे पाणीसुद्धा दूषित झाले आहे. या पाण्याला वास आणि वेगळा रंग असून आरोग्यासाठी अपायकारक आहे. या पाण्यावर पिकणारा भाजीपाला खाणे धोकादायक आहे.

- डॉ. किशोर पाठक, पर्यावरण अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिलाला खंडणी मागितली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील प्रसिद्ध वकील नीलेश घाणेकर यांना २५ हजारांची खंडणी मागणाऱ्या एका महिला वकिलाला, मुकुंदवाडी पोलिसांनी रविवारी (१५ मार्च) अटक केली. अॅड. स्मिता पाटील असे आरोपीचे नाव आहे.

अॅड. घाणेकर यांच्याकडे स्मिता पाटील या सहायक म्हणून काम करत होत्या. काही महिन्यापूर्वी त्यांनी काम सोडले. काम सोडल्यानंतरही अॅड. पाटील यांनी वारंवार अॅड. घाणेकर यांच्याकडे पैशांचा तगादा लावला. वारंवार पैसे वसूल केले. 'तुम्ही मला नोकरीवरून काढले. दुसरीकडे नोकरी मिळत नाही. तुम्ही माझे आयुष्य बरबाद केले. मी ३५ लाखांचा नवी फ्लॅट घेतला आहे. यासाठी तुम्ही पैसे द्या,' अशी मागणी अॅड. स्मिता करत होत्या. अॅड. घाणेकर यांना मोबाइलवर असे मेसेज त्या वारंवार पाठवत असत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुन्हा २५ हजारांची मागणी केली. या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अॅड. घाणेकर यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. तेव्हा अॅड. स्मिता पाटील यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करत, पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी कल्याण शेळके हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुखना’तही विषवल्ली

$
0
0

आशिष चौधरी, औरंगाबाद

सुखना नदीही कंपन्यांमधील रसायनयुक्त पाण्यामुळे मरणपंथाला टेकली आहे. 'खाम' प्रमाणेच या नदीचे पाणी मनुष्यासह, प्राण्यांच्या जीवाला अत्यंत घातक आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या पात्रात कंपन्यांतील रसायन मिश्रीत पाणी सोडले जाते. प्रदूषण मंडळाचे दुर्लक्ष आणि बेफिकीरी शहरवासीयांच्या जीवावर उठते आहे.

महाराष्ट्र टाइम्सने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या मदतीने सुखना नदीपात्रातील पाण्याची तपासणी केली. तेव्हा हे पाणी दूषितच असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा अहवाल शनिवारी मिळाला. विविध कंपन्यांमधून प्रचंड प्रमाणात रसायनमिश्रीत पाणी पात्रात सोडले जात असल्यामुळे नदीचे आयुष्य संपले आहे. पाण्यात केमिकल ऑक्सिजनचे प्रमाण लिटरमागे १०० मिलिग्रॅम असते, ते सुखनात ८०० मिलिग्रॅम आहे. बॅक्टेरियाचे प्रमाण तब्बल २,४०० मिलिग्रॅम आहे. जे अत्यंत घातक आहे. आम्लाचे प्रमाण लिटरमागे ७.७७ मिलिग्रॅम एवढे आहे. कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण लिटरमागे १२१ मिलिग्रॅम आहे. पाण्यातील गढूळता १,००० मिलिग्रॅम आहे. तर पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण शून्य आहे. सुखनाच्या पाण्यात अत्यंत दूषित घटक सोडले जातात. हेच पाणी जमिनीत मुरते व परिसरातील बोअर, विहिरींमध्ये मिसळते.

आजार वाढले : सुखनातील दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पोटाचे गंभीर आजार, फुफ्फुस, त्वचारोग, संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो आहे.

पाण्याचा निर्देशांक खामपेक्षा कमीच

खामपेक्षाही सुखनाच्या पाण्याचा निर्देशांक कमी आहे. बॅक्टेरिया, कार्बनडाय ऑक्साइड, ऑक्सिजन, गढूळता या निकषावर पाण्याचा निर्देशांक काढला जातो. ० ते २५च्या आत निर्देशांक असेल, तर पाणी सर्वात खराब समजले जाते. सुखनाच्या पाण्याचा निर्देशांक १५.९० एवढा आहे. त्यामुळे हे पाणी अत्यंत घातक आहे.

सुखना नदीतील पाण्याचा निर्देशांक खाम नदीपेक्षा कमी आहे. सुखनाही प्रचंड प्रमाणात दूषित आहे. यामध्ये प्राणी जिवंत राहतील ही शक्यताच नाही. माणसाच्या शरीरालाही अतिशय घातक असे रसायनिक द्रव्य या पाण्यात आहेत.

- डॉ. सतीश पाटील, पर्यावरणशास्त्र विभाग,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

नदीतील विषारी घटक

ऑक्सिजन ०

आम्ल ७.७७

बॅक्टेरिया २,४००

गढूळता १,०००

केमिकल ऑक्सिजन ८००

कार्बनडाय ऑक्साइड १२१

एक लिटरमधील प्रमाण मिलिग्रॅममध्ये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूर तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्याने तालुक्यातील बहुतांश गावांत पाणीटंचाईचे संकट गहिरे झाले आहे. गावांनी टँकरच्या मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीमध्ये दाखल केले आहेत. दरम्यान, सध्या तालुक्यातील २९ गावांना ३५ टँकरद्वारे पाणी पुरवले जात असून ४२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी पावसाळ्यात वैजापूर तालुक्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे मन्याड धरण वगळता अन्य धरणात पाणीसाठा झाला नाही. शहराजवळील नारंगी मध्यम प्रकल्प, कोल्ही, जरूळ, खंडाळा, बिलोणी, सटाणा, गाढेपिंपळगाव, बोरदहेगाव लघू व मध्यम प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याखाली आहे. काही प्रकल्प कोरडे पडले आहेत.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम झालेल्या गावांतील पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्याने गावकऱ्यांचे हाल होत आहेत. काही गावातील हातपंप बंद अवस्थेत आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या पथकामार्फत हातपंप दुरुस्ती केली जात आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता के. पी. कड यांनी दिली.

सद्यस्थितीत वैजापूर ग्रामीण एक व दोन, घायगाव, धोंदलगाव, परसोडा, पालखेड, माळीसागज, बल्लाळीसागज, टाकळीसागज, सावखेडगंगा, पेंडेफळ आदींसह २९ गावांना टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

या गावांचे प्रस्ताव

खंडाळा, लासूरगाव, दसकुली, टुणकी, पोखरी, राहेगाव या गावांनी टँकरसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. हे प्रस्ताव मंजुरीसाठी तहसीलदारांकडे पाठवण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला वक‌िलास एक दिवसाची कोठडी

$
0
0

औरंगाबादः २५ हजाराची खंडणी घेणाऱ्या महिला वकील स्मीता पाटील यांना सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. डोईफोडे यांनी एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. त्यांच्या घराच्या झडतीमध्ये पोलिसांनी मोबाईलचे दोन सीमकार्ड जप्त केले.

प्रसिद्ध वकील निलेश घाणेकर यांच्याकडून २५ हजाराची खंडणी स्विकारणाऱ्या महिला वकील स्मीता पाटील यांना रविवारी अटक करण्यात आली होती. घर घेण्यासाठी त्यांनी या पैशांची मागणी केली होती. स्मीता पाटील या काही वर्षांपूर्वी घाणेकर यांच्या सहायक म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या वागणुकीमुळे त्यांना घाणेकर यांनी कामावरून कमी केले होते. तुम्ही काढल्यामुळे माझी बदनामी झाली. मला कोणी कामावर घेत नाही, असे त्यांना धमकावत या खंडणीची मागणी करण्यात येत होती. सोमवारी तपास अधिकारी कल्याण शेळके यांनी स्मीता पाटील यांना कोर्टात हजर केले. या प्रकरणात अजून कोणाचा सहभाग आहे का, मोबाइलबाबतचे तांत्रिक मुद्दे जमा करणे आदी कारणासाठी त्यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. ही मागणी कोटाने ग्राह्य धरत त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच सोमवारी दुपारी पाटील यांच्या एन-३ येथील एमआयटी हॉस्पिटलजवळ असलेल्या घराची झडती पोलिसांनी घेतली. यामध्ये त्यांना दोन सीमकार्ड मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैद्यकीय अधिष्ठातांचे सेवानिवृत्ती वय वाढविले

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत तसेच आयुर्वेद महाविद्यालयातील अधिष्ठातांचे सेवानिवृत्ती वय वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण खात्याने नुकतेच वैद्यकीय शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविले होते. त्यापाठोपाठ अधिष्ठातांचे सेवानिवृत्ती वय वाढविल्याने नव्याने रुजू झालेल्या तसेच सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.

राज्यात एकूण १४ शासकीय वैद्यकीय, ३ शासकीय दंत तर चार शासकीय आयुर्वेद महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमधून शिक्षकांच्या रिक्त असलेल्या पदांची संख्या मोठी आहे. मात्र भरतीप्रक्रिया वेळेवर होत नसल्याचा प्रतिकुल परिणाम विद्यार्थीहित व रुग्णसेवेवर होत आहे. हे विचारात घेऊन २०१० मध्ये वैद्यकीय शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६२ वर्षे करण्यात आले. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने शिक्षकांची वयोमर्यादा ६५ वरून ७० करण्याची तरतूद केली. २०१४ व २०१५ मध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक मोठ्या संख्येने सेवानिवृत्त होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरवर परिणाम होऊ नये असे कारण पुढे करून राज्य सरकारने २८ जुलै २०१४ रोजी सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६३ केले. वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अभ्यासानुसार जुलै २०१५ ते डिसेंबर २०१६ पर्यंत २९ प्राध्यापक १७ सहयोगी प्राध्यापक सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे पुन्हा अध्यापनावर परिणाम होईल, असा खात्याचा दावा आहे. अधिष्ठाता, सहसंचालक, संचालक यांच्या सेवानिवृत्ती वयोमर्यादेत वाढ केली नाही, तर अडचणी निर्माण होतील असे कारण पुढे घेऊन दोन महिन्यांपूर्वी अधिष्ठातांचे शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय ६३ वरून ६४ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र याचा लाभ घ्यायचा क नाही याचा निर्णय सर्वस्वी शिक्षकांवर सोडण्यात आला होता. या निर्णयानंतर सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक संवर्गातील शिक्षकांना नाराजी व्यक्त केली होती.

कायमस्वरुपी तेच पद

पाच मार्च रोजी सरकारने शासननिर्णय काढून अधिष्ठातांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६४ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता सहायक प्राध्यापक म्हणून रूजू झालेल्या शिक्षकाला त्याच पदावरून सेवानिवृत्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळसूत्र चोर गजाआड

$
0
0

औरंगाबादः एका वृद्ध महिलेचे मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपीला अवघ्या सात तासांत पोलिसांनी जेरबंद केले. रविवारी (१५ मार्च) हा प्रकार घडला. राहूल गजानन शेळके असे आरोपीचे नाव आहे. सुराणा नगर येथील मंगलबाई कुलकर्णी (वय ७२) या सकाळी रिक्षातून उतरून घराकडे जात होत्या. यावेळी एका पल्सर दुचाकीवर एक तरुण त्यांच्या जवळ आला. त्याने अॅपेक्स हॉस्पिटलचा पत्ता विचारला. मंगलबाई पत्ता सांगत असतानाच त्याने त्यांच्या गळ्यातील वीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. मात्र घाबरल्यामुळे काही अंतरावर गेल्यानंतर त्याचा तोल घसरून त्याची दुचाकी घसरली. या गडबडीत त्याचा मोबाइल खाली पडला. त्याने तत्काळ दुचाकी उचलून पलायन केले. हा प्रकार तेथील एका जागरुक नागरिकाने पाहिला होता. त्याने दुचाकीचा क्रमांक टिपून घेतला. जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचा मोबाइल व दुचाकीच्या क्रमांकावरून त्याचा शोध सुरू करण्यात आला. हा आरोपी गारखेड्यातील राहुल गजानन शेळके असल्याचे निष्पन्न झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या वादातून तरुणाला लुबाडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जुन्या वादातून तरुणाला मारहाण करीत त्याचे पाच हजार लुबाडल्याप्रकरणी सात जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी (१४ मार्च) रात्री पावणेनऊ वाजता प्रकाशनगर (मुकुंदवाडी) येथे हा प्रकार घडला होता. नंदू चौथमल (रा. संजयनगर, मुकुंदवाडी) हा तरुण शनिवारी सायंकाळी प्रकाशनगर भागात घरभरणीच्या कार्यक्रमाला गेला होता. नंदू कार्यक्रमावरून मित्रासोबत दुचाकीवर घरी परतत होता. यावेळी दोन कारमधून आलेल्या सात जणांनी त्याना अडवले. त्यात त्याच्या परिचयाचे विशाल सदावर्ते, बॉबी सदावर्ते व काही अनोळखी व्यक्तींचा समावेश होता. या आरोपींनी 'आमच्या नादी लागू नको. तुला किती वेळा सांगितले,' असे म्हणत नंदूला मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील पाच हजार रुपये काढून घेत त्याला ठार मारण्याची धमकी देत पसार झाले. या प्रकरणी नंदूने पोलिस ठाणे गाठून आरोपींविरुध्द दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पीएसआय सूर्यवंशी या प्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच वर्षांपासून पसार असलेला गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या पाच वर्षांपासून मारहाणीच्या गुन्ह्यात पसार असलेल्या संजय हिरामण शिंदे (रा. ‌शिवशंकर कॉलनी) याला गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली. रविवारी दुपारी अमरप्रीत चौकात ही कारवाई करण्यात आली. त्याला क्रांती चौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

प्रवाशाला मारहाण

स्वराज नगर, मुकुंदवाडी येथील सुदाम औटी हा तरुण रविवारी सायंकाळी रिक्षामध्ये जयभवानीनगरातून सिडको बसस्टँड चौकाकडे येत होता. रिक्षातून उतरल्यानंतर त्याचा भाडे देण्याच्या कारणावरून रिक्षाचालकासोबत वाद झाला. या वादातून त्याला रिक्षाचालकाने लाकडी दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत हातावर फटका बसल्याने सुदामचा हात फ्रॅक्चर झाला. त्याने दिलेल्या तक्रारीवरून रिक्षाचालकाविरुध्द मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लेबर आणले नसल्याने तरुणाला मारहाण

उत्तम कर्णिके (रा. मुकुंदवाडी, राजनगर) या तरुणाला शनिवारी सायंकाळी ज्योतीनगर भागात तिघांनी मारहाण केली. आमच्या कामावर लेबर का आणले नाहीस, या कारणावरून ही मारहाण करण्यात आली. यावेळी आरोपींनी ब्लेडने त्याच्या गालावर वार केल्याने उत्तम जखमी झाला. त्याने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी किरण खरात, सिध्दार्थ व किरणच्या मित्रा विरूध्द उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्थिक व्यवहारातून तरुणाला शिवीगाळ

म्हाडा कॉलनी येथील अशोक साखरे या व्यक्तीला रविवारी सकाळी संदीप तरटे (रा. गारखेडा परिसर) याने धूत हॉस्पिटलसमोर शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. वाळूच्या जुन्या व्यवहारातील पैसे परत करण्यावरून हा वाद झाला. या प्रकरणी साखरे यांच्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवेशासाठी होर्डिंग लावणाऱ्या शाळांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नियमाचे उल्लंघन करून शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी अनेक शाळांमध्ये प्रवेश सुरू असल्याची तक्रार पालकांनी जिल्हा परिषदेत केली होती. अशा शाळांचा शोध घेण्यासाठी भरारी पथकांनी तीन दिवसांपूर्वी व्यापक मोहीम राबविली. त्यापुढे जाऊन प्रवेशप्रक्रियेसाठी होर्डिंग्ज लावलेल्या शाळांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी सोमवारी (१६ मार्च) दिले.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा आज झाली. शिक्षण विभागाने राबविलेल्या मोहिमेचा आढावा शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी सादर केला. त्यावर तांबे समाधानी झाले नाहीत. अनेक शाळांनी प्रवेशाची जाहिरातबाजी करणारे होर्डिंग्ज लावले आहेत. काही शाळांमध्ये प्रवेशप्रक्रियाही पूर्ण झाली. आरटीई कायद्याचा भंग करत या शाळांनी प्रवेश केले आहेत. अशांची यादी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली असून, या शाळांविरुद्ध कुठल्याही दबावाला बळी न पडता कडक कारवाई करण्यात येईल, असे तांबे यांनी जाहीर केले. कारवाईची दिशा मंगळवारी दुपारी निश्चित होणार आहे. पैठण तालुक्यात तीन शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. त्यात दैनंदिन हजेरी तीन ते चार विद्यार्थ्यांची असते. शिक्षक मात्र दोन आहेत. एकीकडे शिक्षक कमी आहेत, तर दुसरीकडे विद्यार्थी कमी असूनही शिक्षकांची संख्या जास्त आहे. अशा शाळांची तपासणी करून तातडीने एकेक शिक्षक गरजेनुसार दुसऱ्या शाळेत पाठवावा, असे आदेशही सभापती तांबे यांनी दिले.

नियमानुसार प्रवेश प्रक्रिया जूनपासून राबवणे आवश्यक आहे. शहरातील काही शाळांनी त्याचा भंग केल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचे पुरावेही हाती आले असून, या शाळांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. पालकांनी यासंदर्भात शिक्षण विभागाकडे तक्रारी कराव्यात.

- विनोद तांबे, सभापती शिक्षण, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भंगार, रद्दीच्या पैशातून विद्यार्थ्यांना मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

देणाऱ्याने देत जावे म्हणतात...ते काही खोटे नाही. मादणी (ता. सिल्लोड) येथील जिल्हा परिषद प्रशालेत गरीब विद्यार्थ्थांना मोफत गणवेश व वह्यांचे वाटप करण्यात आले. त्यासाठी न्यू मिशन मानव कल्याण समितीने पुढाकार घेतला. भंगार, रद्दीच्या पैशातून विद्यार्थ्यांना ही मदत करण्यात आली. त्यासाठी आता गावातील गावकरीही सहकार्य करत आहेत.

शिवना येथे मागील दोन वर्षापूर्वी शिक्षक कृष्णा जेठे, डॉ. जयदीप गोसावी, कमलाकर धनवई या तीन सामाजिक बांधिलकीच्या नात्याने १ जानेवारी२०१३ रोजी न्यू मिशन मानव कल्याण समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून दर रविवारी हातात रिकामे पोते घेऊन टाकाऊ भंगार वस्तू, रद्दी, जुने कपडे, घेऊन हा उपक्रम सुरू केला. हे तीन तरुण लाज न बळगता हे कार्य करीत राहिले. जमा केलेले साहित्य, भंगार सिल्लोड सारख्या शहरात विक्री करून या पैशातून निराधार मुलांना लागणाऱ्या हॉस्पिटलचा खर्च न्यू मानव कल्याण समिती उचलत आहे. त्यामुळे गावातील दुकानदार रद्दी व भंगार जमा झाल्यानंतर या समितीला आवर्जुन फोन करतात. या उपक्रमामुळे समाजसेवेसोबत पर्यावरणाचे संतुलनही राखले जात आहे. समितीच्या कार्याची दखल घेत अजिंठा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला आहे. या तीन युवकांकडून प्रेरणा घेऊन समाज बांधणीचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आम्ही हे काम अजून नेटाने करणार आहोत. सध्या या समितीत नऊ जण सहभागी आहेत. त्यात डॉ. जयदीप गोसावी, राजेंद्र फरकाडे, कमलाकर धनवई, संतोष कानडजे, गजानन काळे, नाना काळे, दादाराव राऊत साहित्य जमा करण्यासाठी मदत करीत आहेत. समितीमध्ये शिक्षक, डॉक्टर, व्यापारी, मेडिकल दुकानदार आदी प्रतिष्ठीत नागरिकांचा सहभाग आहे. गावात जमा झालेले साहित्य सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गावकरीही समितीला सढळ हाताने देत आहेत.

- राधाकृष्ण जेठे, शिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजाजनगरात पोलिसांची मोगलाई

$
0
0

म.टा. प्रतिनिधी वाळूज

बजाजनगरात दुचाकी जाळण्याच्या प्रकाराने त्रस्त असलेल्या पोलिसांनी आता नागरिकांनाच विनाकारण त्रास देणे सुरू केले आहे. त्यात संशयित म्हणून आतापर्यंत ५ जणांना ताब्यात घेतले तर एका वयोवृद्ध नागरिकास विनाकारण मारहाण केली. याशिवाय या प्रकरणी अनेकांना धमक्या देण्याचा उद्योगही पोलिसांनी सुरू केला आहे.

वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या पाच वर्षापासून दुचाकी जाळण्याचे सत्र सुरू आहे. हे लोण गेल्या महिन्यात शहरातही पसरले. शहरातील विविध भागात झालेल्या जाळपोळीनंतर संबंधित पोलिस ठाण्यातील पोलिसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून आठ दिवसांच्या आत आरोपींच्या मुस्क्या बांधल्या आहेत. याउलट गेल्या पाच वर्षापासून हे सत्र सुरू असूनही बजाजनगरात मात्र पोलिस आरोपीला पकडू शकलेले नाहीत.

दरम्यान, बजाजनगर परिसरात वाहने जाळण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने तसेच वाहन जाळणारा पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पोलिसांचा नाकर्तेपणा उघड झाला आहे. काही नागरिकांनी तर चक्क पोलिसांच्या विरोधात मोर्चे, निदर्शने करून पोलिसांनाच टार्गेट केले. त्यामुळे आपले अपयश झाकण्यासाठी पोलिसांनी बजाजनगर परिसरात मिळेल त्या इसमास संशयाच्या भोवऱ्यात अडकवून मोगलाई सुरू केली आहे. मागील अठवड्यात एका तरूणास दुचाकी जाळण्याच्या संशयावरून अटक केली. तो पोलिसांच्या ताब्यात असतानाही तब्बल पाच दुचाकी जळाल्या होत्या. तरीदेखील ताब्यात घेतलेल्या संशयित तरुणावर पोलिसांनी खापर फोडून गुन्हा दाखल केला. त्यामुळे त्या संशयितास हर्सूल जेलची हवा खावी लागली. आज त्यांनी (१६ मार्च) रोजी पुन्हा ४ जणांना ताब्यात घेतले. तसेच दररोज कंपनीमध्ये ये-जा करणाऱ्या कामगारांनाही विचारपूस करून दमबाजी करण्यात येते. कामगारांना हा प्रकार नित्याचा झाला आहे, मात्र काल रात्री बजाजनगरातील जयभवानी चौकात एक (६५) वर्षीय वृद्ध व्यक्ती पानटपरीच्या रक्षणार्थ टपरीजवळ झोपला असता त्यास पोलिसांनी मारहाण मारहाण केली. विशेष म्हणजे याच टपरीवर गस्तीच्या पोलिसांचा थांबा असतो व त्यासाठी याच टपरीचालकाची खुर्ची, पाण्यासह सर्वच मदत होते. त्यामुळे गुन्हेगाराच्या शोधात बजाजनगर परिसरात पोलिसांनी मोगलाई सुरू केली की काय आशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

चोर सोडून संन्याशाला फाशी

वाळूजमध्ये गाड्या जाळण्याचे प्रकार थांबत नसून वैतागलेल्या पोलिसांनी नागरिकांनाच धमक्या देणे, मारणे सुरू केल्याने नागरिक भयभित झाले आहेत. पोलिसांचा हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असल्याची चर्चा बजाजनगरात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘गिरिजा’तील विहिरींनी गाठला तळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

खुलताबाद शहराला यंदा तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सध्या शहरात सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असून दर महिन्यातून एक दिवस पुढे; असा पाणीपुरवठा केला जात आहे.
सात दिवसाआड केला जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात पाण्याची टाकी भरायलाच पाच दिवस लागतात. चर खोदूनही पाणी लागले नाही, तर खुलताबादकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ येणार आहे. गेले दोन-तीन दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तलावातील, विहिरीच्या पाण्याची पातळी झपाट्याने खोल-खोल चालली आहे. खुलताबाद व फुलंब्री तालुक्यातील १८ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या गिरिजा प्रकल्पातील पाणी मृतसाठ्यातील पाणीही संपले असून धरणांतील विहिरींनीही तळ गाठला आहे. मार्च महिनाअखेरपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिल, मे, जून महिन्यात तालुक्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. जूनमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने पाणीपातळीत वाढ होऊ शकली नाही. परिणामी तालुक्यातील गावशिवारातील नदी, नाले, विहिरी कोरड्या पडत आहेत. भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा वाढू लागल्यामुळे पाणीपातळीत घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करायचा कोठून असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान खुलताबादचे तहसीलदार सचिन घागरे, नायब तहसीलदार प्रशांत काळे यांनी येसगाव येथील गिरजा प्रकल्पातील विहिरींची पाहणी केली.

६०० रुपयांना टॅँकर

बहुतांश विहिरींनी तळ गाठला असून अनेक विहिरी आताच कोरड्याठाक पडल्या आहेत. सध्या खासगी पाणी विक्रेते मजेत असून ५० रुपयाला ड्रम, तर संपूर्ण टँकर ६०० रुपयांना विकले जात आहे. गोरगरीब जनतेने विकत पाणी घेण्यासाठी कोठून पैसा आणावा, असा सवाल उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिलर्स, आरटीओ आमने-सामने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहन नोंदणी आणि वाहन विमा प्रकरणी खूप कालावधी लागत असल्याने दंडात्मक कारवाईचा बडगा आरटीओकडून उगारला गेल्याने वाहन वितरकांची पाचावर धारण बसली आहे. मात्र, आरटीओ कार्यालयात कामास उशीर लागत असल्याबद्दल डिलर्सनीही आरटीओच्या कामाचे वाभाडे काढले आहेत.

आरटीओ कार्यालयात वाहन नोंदणीसाठी येणारी वाहनांची कागदपत्रे सहा महिने किंवा त्यापेक्षा उशीराने दाखल केली जात आहेत. वाहनविक्रीचे पत्र आणि विम्यावरील तारखेचे पत्र वेगळे असल्याकारणाने तुमच्याकडून दंड का आकारू नये, असा प्रश्न आरटीओ गोविंद सैंदाणे यांनी शहरातील वाहन डिलर्संना केला आहे. वाहनांची नोंदणी उशीरा केली जात असल्याने आरटीओ कार्यालया दंडात्मक कारवाई करीत आहे. त्यामुळे वाहन डिलर्सनी आरटीओंची भेट घेतली. यावेळी डिलर्सनी आरटीओ कार्यालयात उशीर होत असलेल्या कामकाजाबाबतही नाराजी व्यक्त केली.

शहरात विनानोंदणी वाहने मोठया प्रमाणात चालवली जात आहेत. आरटीओ कार्यालयाने उशीरा दाखल झालेल्या किंवा नियमापेक्षा जास्त किलोमीटर चालविण्यात आलेल्या वाहनांना आरटीओ कार्यालयाने दंड लावण्यास सुरवात केली. या कारवाईबाबत डिलर्सनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये शहरातील पंधरा ते वीस वाहन वितरकांचा समावेश होता. यावेळी त्यांनी सांगितले की, 'वाहन विक्री झाल्यानंतर सर्व कागदपत्रे आरटीओ कार्यालयात नियमानुसार सात दिवसांच्या आत कार्यालयात दाखल केली जातात. कागदपत्रे दाखल करूनही सात दिवसानंतर किंवा वाहनाचे किलोमीटर वाढल्यास, याचा दंड डिलर्सलाच आकारला जात आहे. वाहनांची नोंदणी प्रक्रिया आरटीओ कार्यालयाकडून होत नाही यात डिलर्सचा दोष आहे का? आरटीओ कार्यालयालयाने अनावश्यक दंडाची कारवाई बंद करावी तसेच वाहननोंदणीच्या वेळीच कराचा भरणा करून घ्यावा. वाहनाचा विमा काढल्याची तारीख वैध मानून दंड आकारू नये, अशीही मागणी त्यांनी केली. यासंदर्भातील काम करणाऱ्या सहाय्यक प्रादेशिक अधिकारी किरण मोरे यांना बोलावून घेण्यात आली. उशीरा वाहन नोंदणीच्या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर डिलर्सने माघार घेतली.

नियमानुसार कारवाई

वाहनांच्या नोंदणीत होत असलेल्या उशीरामुळे दंडाची कारवाई योग्य नियमानुसार सुरू असल्याचा खुलासा आरटीओ गोविंद सैंदाणे यांनी केला. अनेक गाड्यांची नोंदणी उशीरा केली जात आहे. वारंवार ‌डिलर्सला नोटीस देण्यात आल्या आहेत. डिलर्सकडून प्रतिसाद न मिळाल्याने तसेच वाहनांचे रजिस्ट्रेशन उशीरा होत असल्याने इन्श्युरन्स कंपनीकडून वाहनांचा विमा ज्या दिवशी काढण्यात आला त्या दिवसापासूनच नोंदणी कर आकारला जाणार असल्याचेही सैंदाणे यांनी सांगितले.

चाळीस लाखांचा महसूल

शहरात धावणाऱ्या अनेक वाहनांची कागदपत्रे वेळेच्या आत नोंदणीसाठी दाखल झालेली नाहीत. यामुळे अशा वाहनांच्या इन्शुरन्सच्या आधारे दंडाची वसुली केली जाणार आहे. याबाबत डिलर्सच्या बैठकीतही चर्चा करण्यात आली. सध्या साडे पाचशेच्या वर वाहनांची नोंदणी प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आरटीओने चाळीस लाखांचा महसूल जमा केला आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

SSC बोर्डाचे सदस्य हायकोर्टात

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे राज्य मंडळ व सर्व विभागीय मंडळावरील अशासकीय सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. या राज्य शासनाच्या निर्णयाला औरंगाबाद विभागाच्या सदस्यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. प्रतिवादींना नोटीस देण्याचे आदेश न्या. रवींद्र बोर्डे व न्या. पी. आर. बोरा यांनी दिले आहेत.

बडतर्फ झालेले एस. पी. जवळकर, किरण पाटील, प्रवीण शेळके, गुलाब भोयर, महम्मद इरफानखान महम्मद सुभानखान, आनंद खरात, उद्धव म्हस्के या सदस्यांनी याचिका केली आहे. राज्य व विभागीय मंडळावर शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येते. राजकीय नेत्यांच्या शिफारशीनेच या सदस्यांच्या नियुक्त्या सरकारकडून करण्यात येतात. गेल्या वर्षीच आघाडी सरकारने जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर २०१४ या तीन महिन्यांत टप्प्याटप्प्याने नवीन सदस्यांची नियुक्ती केली. या सदस्यांची कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात नियुक्ती झाली होती. राज्यात सत्तांतर होऊन भाजप व शिवसेनेची युती सत्तारूढ झाली. या नव्या सरकारने सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. त्याची अधिसूचना पाच मार्च रोजीच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याने सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे आदेश राज्य मंडळाने १० मार्चला काढले आहेत. या निर्णयाला या सदस्यांनी आव्हान दिले आहे. या सदस्यांचा कार्यकाल ४ वर्षांचा आहे. राज्य सरकारला त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार आहे. ऐन १०वी आणि १२ वी परीक्षेच्या काळात युती सरकारने कारवाई केली आहे. ५ मार्चची अधिसूचना रद्दबातल करण्यात यावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेत शालेय शिक्षण सचिव ,शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या प्रतिवादींना नोटीस देण्याचे आदेश कोर्टाने दिले. राज्य शासनातर्फे एस. के. कदम तर मंडळातर्फे अनुप निकम यांनी नोटीस स्वीकारली. याचिकाकर्त्यातर्फे व्ही. डी. सपकाळ, ए. एम. काकडे ,डी. जे. चौधरी हे काम पाहत आहेत. या याचिकेची सुनावणी २७ मार्चला होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजाजनगरात जळ‌ितकांड सुरूच

$
0
0

म.टा.प्रतिनिधी वाळूज

बजाजनगरात अज्ञात माथेफिरून पुन्हा पाच दुचाकी जाळून हैदास घातला. पंधरा दिवसात कोणतीही घटना न घडल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकलेला असतानाच पुन्हा हा प्रकार घडल्याने जनतेच्या काळजात धस्स झाले आहे. एकाच दिवसात ५ दुचाक्या जाळून आपणच पोलिसांपेक्षा वरचढ असल्याचे दाखवत माथेफिरून पोलिसांनाच आव्हान दिले आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

बजाजनगरात दुचाकी जाळण्याचे सत्र गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. माथेफिरुच्या या कारवायांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या माथेफिरूला पकडण्यासाठी आयुक्तालयाच्या सर्वच शाखेच्या पोलिसांनी रात्रंदिवस एक केला असला तरी त्यात ते अपयशीच ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बजाजनगरातील इंद्रप्रस्थ कॉलनीतील संतोष कुलकर्णी यांची दुचाकी जळाल्याचे रात्री ११ वाजता उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी परिसरातील नागरिकांनी दुचाकी जाळणारा संशयित लाल रंगाचा टीर्शट घातलेला असून तो सोसायटीतून पळाल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत परिसरातील सर्व भाडेकरूंच्या खोल्यांची झडती घेत लाल रंगाचे टीर्शट घातलेल्या दोघांना ताब्यात घेतले, मात्र त्यानंतर पहाटे पाच वाजेच्या सुमारास जयभवानी चौकात तब्बल चार दुचाकी जाळल्या गेल्या. त्यात महादेव अनिल अटवे या कामगारची आठच दिवसांपूर्वी घेतलेली स्प्लेंडर दुचाकी जळाली. याच परिसरातील भूषण कोल्हे (एमएच-२०-एसी१२२२), तुळशीराम साळुंके यांची (एमएच २० डीके ९५२८), बट्टू भामरे (एमएच २० सीडी ८०४) या कामगारांच्या दुचाकी जाळल्यात आल्या. दरम्यान, पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिलर्स, आरटीओ आमने-सामने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहन नोंदणी आणि वाहन विमा प्रकरणी खूप कालावधी लागत असल्याने दंडात्मक कारवाईचा बडगा आरटीओकडून उगारला गेल्याने वाहन वितरकांची पाचावर धारण बसली आहे. मात्र, आरटीओ कार्यालयात कामास उशीर लागत असल्याबद्दल डिलर्सनीही आरटीओच्या कामाचे वाभाडे काढले आहेत.

आरटीओ कार्यालयात वाहन नोंदणीसाठी येणारी वाहनांची कागदपत्रे सहा महिने किंवा त्यापेक्षा उशीराने दाखल केली जात आहेत. वाहनविक्रीचे पत्र आणि विम्यावरील तारखेचे पत्र वेगळे असल्याकारणाने तुमच्याकडून दंड का आकारू नये, असा प्रश्न आरटीओ गोविंद सैंदाणे यांनी शहरातील वाहन डिलर्संना केला आहे. वाहनांची नोंदणी उशीरा केली जात असल्याने आरटीओ कार्यालया दंडात्मक कारवाई करीत आहे. त्यामुळे वाहन डिलर्सनी आरटीओंची भेट घेतली. यावेळी डिलर्सनी आरटीओ कार्यालयात उशीर होत असलेल्या कामकाजाबाबतही नाराजी व्यक्त केली.

शहरात विनानोंदणी वाहने मोठया प्रमाणात चालवली जात आहेत. आरटीओ कार्यालयाने उशीरा दाखल झालेल्या किंवा नियमापेक्षा जास्त किलोमीटर चालविण्यात आलेल्या वाहनांना आरटीओ कार्यालयाने दंड लावण्यास सुरवात केली. या कारवाईबाबत डिलर्सनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये शहरातील पंधरा ते वीस वाहन वितरकांचा समावेश होता. यावेळी त्यांनी सांगितले की, 'वाहन विक्री झाल्यानंतर सर्व कागदपत्रे आरटीओ कार्यालयात नियमानुसार सात दिवसांच्या आत कार्यालयात दाखल केली जातात. कागदपत्रे दाखल करूनही सात दिवसानंतर किंवा वाहनाचे किलोमीटर वाढल्यास, याचा दंड डिलर्सलाच आकारला जात आहे. वाहनांची नोंदणी प्रक्रिया आरटीओ कार्यालयाकडून होत नाही यात डिलर्सचा दोष आहे का? आरटीओ कार्यालयालयाने अनावश्यक दंडाची कारवाई बंद करावी तसेच वाहननोंदणीच्या वेळीच कराचा भरणा करून घ्यावा. वाहनाचा विमा काढल्याची तारीख वैध मानून दंड आकारू नये, अशीही मागणी त्यांनी केली. यासंदर्भातील काम करणाऱ्या सहाय्यक प्रादेशिक अधिकारी किरण मोरे यांना बोलावून घेण्यात आली. उशीरा वाहन नोंदणीच्या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर डिलर्सने माघार घेतली.

नियमानुसार कारवाई

वाहनांच्या नोंदणीत होत असलेल्या उशीरामुळे दंडाची कारवाई योग्य नियमानुसार सुरू असल्याचा खुलासा आरटीओ गोविंद सैंदाणे यांनी केला. अनेक गाड्यांची नोंदणी उशीरा केली जात आहे. वारंवार ‌डिलर्सला नोटीस देण्यात आल्या आहेत. डिलर्सकडून प्रतिसाद न मिळाल्याने तसेच वाहनांचे रजिस्ट्रेशन उशीरा होत असल्याने इन्श्युरन्स कंपनीकडून वाहनांचा विमा ज्या दिवशी काढण्यात आला त्या दिवसापासूनच नोंदणी कर आकारला जाणार असल्याचेही सैंदाणे यांनी सांगितले.

चाळीस लाखांचा महसूल

शहरात धावणाऱ्या अनेक वाहनांची कागदपत्रे वेळेच्या आत नोंदणीसाठी दाखल झालेली नाहीत. यामुळे अशा वाहनांच्या इन्शुरन्सच्या आधारे दंडाची वसुली केली जाणार आहे. याबाबत डिलर्सच्या बैठकीतही चर्चा करण्यात आली. सध्या साडे पाचशेच्या वर वाहनांची नोंदणी प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आरटीओने चाळीस लाखांचा महसूल जमा केला आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images