Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दानवेंनी केला मुंडे, बागडेंचा गेम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार देण्यावरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा गेम केला. निष्ठावंतांना डावलत बंडखोरी केलेल्या आणि नव्याने प्रवेश केलेल्यांना उमेदवारीची खैरात देण्यात आली. उमेदवारीवरून दुपारी दोन ते सायंकाळी साडेपाचपर्यंत नाट्य रंगले.

महापौरपदाची निवडणूक २९ एप्रिल रोजी आहे. त्यासाठी शनिवारी सायंकाळी पावणेसहापर्यंत अर्ज स्वीकारले जाणार होते. पहिले महापौरपद आम्हाला द्या अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली होती, पण त्यावर मुंबईत झालेल्या युतीच्या बैठकीत काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे शिवसेनेने महापौरपदासाठी अर्ज दाखल केलेला असला तरी, भाजपनेही त्यासाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला.

भगवान घडमोडे आणि राजू शिंदे महापौरपदाच्या शर्यतीत आले. उपमहापौरपदासाठी नितीन चित्ते यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. शिंदेंचे नाव महापौरपदासाठी निश्चित होत असतानाच नगरसेवक राजू तनवाणी यांची एन्ट्री झाली. तोपर्यंत उपमहापौरपदासाठी चित्ते यांचे नाव कायम होते. याचवेळी आमदार अतुल सावे आणि भाजपचे प्रदेश चिटणीस सुजितसिंह ठाकूर महापालिकेत आले. त्यांच्या चर्चेत तनवाणी यांनी माघार घेतली आणि शिंदे यांचे नाव महापौरपदासाठी ठरविण्यात आले. शिंदे आणि चित्ते अर्ज भरणार असे वाटत असताना ठाकूर यांनी चित्ते यांना थांबवले आणि प्रमोद राठोड यांचे नाव उपमहापौरपदासाठी जाहीर केले. त्यामुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क साधून ठाकूर यांनी राठोड यांचे नाव पुढे केले.

अंतर्गत वाद उफाळला

पालिकेतील वाद हरिभाऊ बागडे आणि पंकजा मुंडे यांच्या कानावर गेला. त्यांनी ठाकूरांना फोन करून बदलाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. महापौरपदासाठी भाजपने शिंदे यांना उमेदवारी दिली, त्यांनी यापूर्वी बंडखोरी केली होती, त्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आले होते. राठोड काँग्रेस मधून भाजपमध्ये आले, त्यामुळे निष्ठावंतांना डावलल्याची भावना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एव्हरेस्ट मोहिमेवरील शेख रफिक सुखरुप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नेपाळच्या बाजूने एव्हरेस्ट शिखर मोहिमेवर निघालेला औरंगाबादचा गिर्यारोहक शेख रफिक सुखरुप आहे. पोलिस दलात कार्यरत असलेल्या रफिकने एव्हरेस्ट शिखर चढाईला सुरुवात केली होती. भूकंप झाला तेव्हा तो कँप १ वर होता. या दुर्घटनेतून तो सुखरुपपणे पुन्हा बेस कँपवर पोहचण्यात यशस्वी ठरला. रफिकने डॉ. विलास पाध्ये यांना फोन करुन सुरक्षित असल्याचे कळवले. गेल्या वर्षी आलेल्या हिमस्खलनामुळे १६ शेरपांना जीव गमवावा लागला. नेपाळ सरकारने सर्व मोहिमा रद्द केल्या. रफिकला बेस कॅम्पवरूनच वापस यावे लागले. १५ लाखांचे नुकसान झाले. यावर्षी पुन्हा जिद्दीने एक एक पै जोडत महाराष्ट्र पोलिस दलाच्या या जवानाने मोहिमेची तयारी केली होती. बेस कॅम्पवरून दोन दिवसांपूर्वीच तो कॅम्प-१ वर पोचला होता. एव्हरेस्ट चढाईला सुरवात केल्यानंतर पहिल्याच टप्प्यात ही दुर्घटना घडली. मोहिमेचे काय होते ते अजून नक्की नाही, पण २-३ दिवसांत ते स्पष्ट होईल. रफिकजवळ सध्या अन्नपाण्याचा पुरेसा साठा आहे. बेस कॅम्पवर झालेल्या हिमस्खलनात १८ जण ठार तर ३० जण जखमी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादकर सुखरूप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नेपाळमध्ये गिर्यारोहणाला गेलेले औरंगाबाद शहरातील २ दाम्पत्य सुखरूप असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हिमालयही हादरला. दळणवळणाच्या साधनांवर परिणाम झाल्यामुळे वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. हिमकडा कोसळल्यामुळे मकालू बेसकॅम्पचे पूर्णपणे नुकसान झाले असल्याचे डॉ. पुलकेशी कुलकर्णी यांनी सांगितले. एव्हरेस्ट मोहिमेवर असलेले गिर्यारोहक डॉ. पुलकेशी कुलकर्णी, डॉ.प्रतिभा कुलकर्णी, विद्याधर तागडे, विनया तागडे, त्यांचा मुलगा अभिजित तागडे सुखरुप असल्याचे सांगण्यात आले. हे सर्व शनिवारी बेसकॅम्पला पोहोचणार होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नांमका’मधून पाणी सोडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदुर मधमेश्वर जलदगती कालव्यातून लवकरच पाणी सोडण्यात येणार आहे. या पाण्यामुळे नांमकाच्या लाभक्षेत्रातील पन्नासहून जास्त गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सद्यस्थितीत, गंगापूर, दारणा व मुकणे या तीन धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यात पोहचल्यानंतर कालव्यातून पाणी सोडण्यात येईल असे नाशिक पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

वैजापूर तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे या गावांना पाण्यासाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबुन रहावे लागत असुन प्रशासनाकडे टँकरची मागणी वाढली आहे. नाशिक पाटबंधारे विभागाने यापुर्वी रब्बी व खरीप हंगामासाठी प्रत्येकी अक रोटेशन सोडले होते. मात्र, तीव्र उन्हाळ्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याने कालव्यातुन पाणी सोडण्याच्या मागणीने जोर धरला होता. त्यानुसार येथील नामका विभागाकडून २५ एप्रिल रोजी जलदगती

कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, नियोजनानुसार कालव्यातून पाणी सोडण्यात न आल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. मात्र येत्या दोन दिवसात कालव्यात पाणी सोडण्यात येईल असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

मुकणे धरणात १ हजार ८६३ दशलक्ष घनफुट म्हणजे एकुण क्षमतेच्या २६ टक्के पाणी साठा आहे. दारणा धरणात २ हजार १६७ दशलक्ष घनफुट (२६ टक्के) व गंगापूर धरणात ३ हजार २२९ दशलक्ष घनफुट (५७ टक्के) पाणी आहे. या तिन्ही धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. परंतु, हे पाणी अद्याप बंधाऱ्यात पोहचले नसल्याने कालव्यातून पाणी सोडण्यात आले नाही. बंधाऱ्यात पाणी पोहचल्यानंतर गोदावरी डावा व उजव्या कालव्यासह जलदगती कालव्यातुन पिण्यासाठी पाणी सोडण्यात येईल. साधारणपणे वीस दिवसांच्या आवर्तनातून एक टीएमसी पाणी दोन्ही तालुक्यांना मिळण्याची शक्यता आहे.

बुधवारपर्यंत पाणी वैजापुरात

नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यात मंगळवारी किंवा बुधवारी पाणी पोहचण्याची शक्यता आहे. तेथुन ३०० ते ५०० क्युसेक विसर्गाने कालव्यात पाणी सोडले जाते. त्यामुळे वैजापूर तालुक्याच्या हद्दीत पाणी येण्यास दोन दिवसांचा कालावधी लागतो. त्या अनुषंगाने येत्या बुधवारपर्यंत कालव्याचे पाणी वैजापूर तालुक्यात दाखल होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीतील यंत्रात भूकंपाची नोंद

$
0
0

पैठणः नेपाळ व उत्तर भारतात शनिवारी झालेल्या भूकंपाची पैठण येथील उत्तर जायकवाडी भूकंप मापक केंद्रातील यंत्रातही नोंद झाली. उत्तर जायकवाडी येथील भूकंप मापक यंत्रात बाराच्या दरम्यान ५.३ रिस्टर स्केल एवढी नोंद झाली. शुक्रवारीही, यंत्रात ३.३ रिक्टर स्केल एवढी नोंद झाली होती.

२४ फेब्रुवारी १९७६ बांधून पूर्ण झालेल्या जायकवाडी धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून १४ नोव्हेंबर १९९४ ला अमेरिकन बनावटीचे भूकंप मापक यंत्र एमईक्यू-८०० हे उत्तर जायकवाडी येथे बसविण्यात आले. त्याठिकाणी सहा इंची बोर घेऊन ऐशी फूट खोलीवर खडकावर सिसमोमिटर हे यंत्र बसविण्यात आले व केबल द्वारे हे यंत्र एमईक्यू-८०० या भूकंप मापक यंत्राशी जोडण्यात आले. एमईक्यू-८०० हे भूकंपमापक यंत्रात त्याच्या वीस हजार किलोमीटर परिघात भूगर्भात कुठेही भूकंप अथवा काही हालचाल झाल्याची नोंद होते. अशी माहिती तांत्रिक शौकत शेख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत दोनच मशीनवर डायलिसिस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) हिमो डायलिसिस करण्यासाठी केवळ दोनच मशीन असून, जुने सर्व तीन मशीन बंद पडले आहे. गेल्या आर्थिक वर्षातील यंत्रसामुग्रीच्या खरेदीमध्ये पाच डायलिसिसच्या मशीनचा प्रस्ताव असताना, यापैकी एकही मशीन घाटीच्या पदरात न पडल्याने घाटीतील गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत. रोजच्या १२-१५ रुग्णांच्या डायलिसिससाठी रुग्णांना ताटकळत राहावे लागते आहे.

घाटीच्या मेडिसिन विभागाअंतर्गत दोन्ही मूत्रपिंड (किडनी) निकामी झालेल्या रुग्णांवर हिमो डायलिसिस करण्यात येते. त्यासाठी स्वतंत्र डायलिसिस विभाग अस्तित्वात आहे. अर्थात, या विभागासाठी लागणारा मूत्रपिंडविकारतज्ज्ञ (नेफ्रॉलॉजिस्ट) नसल्याने मेडिसिन विभागाच्या डॉक्टरांकडूनच डायलिसिस करण्यात येते. वर्षानुवर्षे हीच स्थिती असून, घाटीला मूत्रपिंडविकारतज्ज्ञाची प्रतीक्षा कायम आहे. मेडिसिन बिल्डिंगलगतच्या जुन्या व खिळखिळ्या झालेल्या इमारतीमध्ये डायलिसिस विभाग सुरू आहे, मात्र या विभागामध्ये पाचपैकी दोनच मशीन आतापर्यंत कशातरी सुरू होत्या. इतर मशीन कायमस्वरुपी नादुरुस्त झाल्या आहेत. त्यातच अलीकडे वारंवार दुरुस्त्या करून चालणाऱ्या दोन्ही जुन्या मशीनदेखील बंद पडल्या. त्यामुळे तुलनेने नवीन असलेल्या केवळ दोन मशीनवरच विभाग सुरू आहे. मात्र दररोज येणारे १२ ते १५ रुग्ण आणि दोनच मशीन, यामुळे रुग्णांना ताटकळत राहावे लागते. एका रुग्णाचे हिमो डायलिलिस करण्यासाठी सुमारे तीन तास लागत असल्यामुळे इतर रांगेतील रुग्णांना ताटकळत राहावे लागते. दोनच मशीन असल्यामुळे केवळ दोनच रुग्णांचे एकाचवेळी डायलिसिस होऊ शकते. गेल्या आर्थिक वर्षामध्ये पाच नवीन मशीनचा प्रस्ताव 'डीएमईआर'ला पाठविण्यात आला होता, मात्र ऐनवेळी या प्रस्तावाला बगल देण्यात आली आणि एकही नवीन मशीन घाटीच्या पदरात पडले नाही.

'नेफ्रॉलॉजी'चे स्थलांतर रखडले

मूत्ररोग व मूत्रपिंडविकारग्रस्तांसाठी भव्य-दिव्य स्वतंत्र नेफ्रॉलॉजी बिल्डिंग उभी करण्यात आली. ही इमारत उभी करूनही दीड-दोन वर्षे लोटली आहे, मात्र विविध प्रकारचे तज्ज्ञ व कर्मचाऱ्यांची नियुक्ती अद्यापपर्यंत होऊ शकली नाही. मनुष्यबळ नियुक्ती होईपर्यंत डायलिसिस विभागाचे स्थलांतर करण्याचे जाहीर करण्यात आले, मात्र डायलिसिस विभागासाठी आवश्यक असलेल्या 'इलेक्ट्रिक पॅनल'चे काम रखडले आणि आता तर पाइपदेखील गळके असल्याचे समोर आले आहे. डायलिसिस विभागासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते, मात्र गळक्या पाइपमुळे अजून किती दिवस स्थलांतर रखडणार, असा नवीन प्रश्न उभा ठाकला आहे. डायलिसिस विभागाची जुनी इमारत जीर्ण झाली असून, सर्व दृष्टीने लवकरात लवकर स्थलांतर होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

नेफ्रॉलॉजी बिल्डिंगमध्ये डायलिसिस विभागाचे लवकरच स्थलांतर होणार आहे. ही इमारत हस्तांतरित करणार असल्याचे बांधकाम विभागाने सांगितले आहे.

- डॉ. सुहास जेवळीकर, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोलवाडी रस्त्यासाठी ५५ कोटी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या २० वर्षांत अडीचशेहून अधिक लोकांनी अपघातात प्राण गमावल्यानंतर गोलवाडी ते नगर नाका या ३.४ किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा मार्गासाठी व उड्डाण पूल उभारणीसाठी ५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

राज्याच्या अर्थसंकल्पात औरंगाबाद जिल्ह्यासाठी १४५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लष्कराकडून जागा न मिळाल्यामुळे गोलवाडी फाटा ते नगर नाका हा रस्ता चौपदरी करण्यात अडचणी आल्या होत्या. औरंगाबाद-पुणे (राज्य मार्ग क्रमांक-६०) दरम्यान असलेला नगर नाका ते गोलवाडी फाटा या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव गेल्या २० वर्षांपासून पडून होता. लष्कराचे आडमुठे धोरण त्याला कारणीभूत होते. गेल्या २० वर्षांत या महामार्गावर २५०पेक्षा अधिक जणांचे बळी गेले आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणाच्या सामंजस्य करारावर १८ जून २०१३ रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या रस्त्याच्या एका बाजूला छावणी कार्यालय, केंद्रीय विद्यालय आहे. दुसऱ्या बाजूला छावणीचा निवासी परिसर आहे. चौपदरीकरणानंतर रस्ता ओलांडणे अवघड होणार आहे. त्यामुळे ओव्हर ब्रिज किंवा सब-वे करण्याचाही प्रस्ताव होता. ओव्हर ब्रिजऐवजी सब-वे (भुयारी मार्ग) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे कामही राज्य सरकार करून देणार आहे. जमिनीच्या संपादनापोटी निजाम बंगला लष्कराकडे दिल्यानंतर उर्वरित रकमेत रस्ते व संरक्षण भिंतीची कामे करण्यात येणार आहेत. हा खर्च लष्कराच्या जमिनीच्या किमतीएवढा आहे. 'सब वे'चे काम मात्र लष्कराच्या जमिनीच्या संपादनापोटी करण्यात येणाऱ्या कामाशिवाय करण्यात येणार आहे. निधीची कमतरता असल्यामुळे चौपदरीकरण व पूलाचे काम हाती घेण्यात आले नाही, असे सांगून यंदा ५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मे अखेरपर्यंत प्रशासकीय मान्यता दिली जाईल. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सप्टेंबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

हे काम २ वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प आहे. मोंढा नाक्यावरील उड्डाणपूलाचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण होणार आहे. सिडको बसस्थानक उड्डाणपूल फेब्रुवारी २०१६मध्ये पूर्ण होईल, असे कुलकर्णी म्हणाले. यावेळी विभागाचे प्रभारी मुख्य अभियंता एकनाथ उगिले, अधीक्षक अभियंता यू. के. आहेर, कार्यकारी अभियंता विवेक दुबे आदी उपस्थित होते.

जालना रोड-नगरनाका भुयारी मार्ग

जालना रोड ते नगर नाका भुयारी मार्ग करण्याचा विचार आहे. त्यासाठी १५ ते २० कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी आहे. यासंदर्भात अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

हर्सूल उड्डाणपूलासाठी सर्वेक्षण

जळगाव रोडवरील हर्सूल येथे वाहतुकीची कोंडी हे कायमचे दुखणे आहे . हा उड्डाणपूल करण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना आनंद कुलकर्णी यांनी मुख्य अभियंत्यांना दिल्या आहेत. मराठवाड्यातील रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर केला जाणार आहे.

५ कार्यकारी अभियंता निलंबित

सार्वजनिक विभागातील कामचुकारपणा करणाऱ्या राज्यातील ५ कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता भगत, पाटोदा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता एस. डी. पाटील, आष्टीचे उपकार्यकारी अभियंता शेख जिलानी, बुलडाणा येथील तवर, रायगडचे कार्यकारी अभियंता महाले या अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी टँकरने पाण्याची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

दुष्काळी परिस्थिती आणि गंभीर पाणीटंचाईच्या काळात कुंडलिका नदीच्या पात्रातून स्व. बाळासाहेब ठाकरे रामतीर्थ बंधाऱ्याच्या भिंतीपाशी चक्क सहा इंची बोअरवेल खोदून दिवसाढवळ्या पाण्याची चोरी करून खासगी टँकरवाल्याचा धंदा सुरू आहे. याच सोबत नदीच्या पात्रात जोरदार अतिक्रमणे वेगाने वाढत आहेत.

जालना शहराच्या नशिबात पाणीटंचाई ही पाचवीला पुजलेली समजली जाते. जायकवाडीच्या धरणातून आलेल्या पाणीपुरवठा योजनेतून येणाऱ्या पाण्याचा पुरवठा केवळ जुन्या जालना भागात केला जात आहे. नवा जालना आजही घाणेवाडी जलाशयाच्या पाण्यावरच आपली तहान भागवतो आहे. टँकरची सर्वात मोठी मागणी लोखंड उद्योगात आहे. बारा हजार लिटर पाण्याचा टॅँकर दोन हजार रूपये असा भाव आहे. लोखंड कारखान्यांना रोज लाखो लिटर पाणी लागते. त्यामुळे कुंडलिका नदीच्या पात्रातून पाणी चोरट्यांना हक्काचे आणि जवळ वाहतूक असलेले ग्राहक मिळाली आहेत.

जालन्यातील रामतीर्थ भागात कुंडलिका नदीच्या पात्रात असलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती रामतीर्थ बंधाऱ्यात निम्म्यावर अधिक पाणी साठा उपलब्ध आहे. याच ठिकाणी बंधार्याच्या भिंतीच्या खाली कुंडलिका नदीच्या पात्रात मोठ्या जाहीर प्रमाणावर पाणी चोरी केली जात आहे. या ठिकाणी मोठे-मोठे पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहेत. त्यासोबतच नदीच्या पात्रात अतिक्रमण करून मोटार वाहन दुरूस्ती गॅरेज आणि बोअरवेलवर चक्क २४ तास पाण्याची चोरी होते आहे. राजकीय नेत्यांचा वरदहस्त लाभलेल्या या पाणी माफीयांचा महसूल अधिकारी आणि पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोठा दबाव आहे.

जालना शहरातून जाणाऱ्या कुंडलिका नदीच्या पात्रात सर्वच ठिकाणी मोठे-मोठे अतिक्रमण झाल्याचे दिसून येते आहे. लक्कडकोट देहेडकरवाडी येथे कुंडलिका नदीच्या पात्रात पक्के व्यवसायिक बांधकामे झाली आहेत. मोटार सायकल वाहने धुण्यासाठी नदीच्या पात्रात बोअरवेल घेऊन येथेही गॅरेजचे मोठ-मोठे धंदे सुरू करण्यात आले आहेत. लोखंडी पुलाच्या दोन्ही बाजूला जुन्या घरांच्या पाडलेल्या मटेरियलचा भराव टाकून नदीचे पात्र अरूंद करून जागा तयार करण्यात आली आहे. याच जागांवर छोटे -छोटे गॅरेज व अन्य काही धंदे सुरू झाली आहेत.

काम रखडलेलेच

जिल्हाधिकारी रंगा नायक यांनी कुंडलिका नदीच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून कामे करण्यात येणार असल्याचे सहा महिन्यांपूर्वी जाहीर केले. प्रत्यक्ष काम काहीही झालेले दिसत नाही. जिल्हाधिकारी नायक हे या विषयावर काहीही बोलायला तयार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामसेवक संवर्गाचे प्रलंबित प्रश्न सोडवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामसेवक संवर्गाचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने सरकारकडे केली आहे. ग्रामसेवक तळगाळात काम करणारा प्रशासनाचा घटक आहे. केंद्र, राज्याच्या विविध योजना राबविणे, अभियान राबविणे, करवसुली करणे, पाणीटंचाई संदर्भात कामे करणे आदी कामे करावी लागतात. गावातील गटातटाच्या राजकारणाला सामोरे जावे लागे. अशा प्रसंगी प्रशासनाने ग्रामसेवकांच्या पाठीशी खंबीरपणे असणे आवश्यक असताना प्रशासन तक्रारदारांना अभय देऊन ग्रामसेवकांवर कार्यवाही करत आहे. हे चुकीचे आहे. ग्रामसेवक संवर्गाचे खालील प्रश्न प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील १३ लोकांना दिलेल्या कठोर शिक्षा शिथिल करणे, आपेगाव प्रकरणातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना कामावर घ्यावे, जिल्ह्यातील निलंबित सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना कामावर घ्यावे, विभागीय चौकशीची सर्व प्रकरणे निकाली काढावीत, अनुकंपा तत्वावर ग्रामसेवक पाल्यांची नियुक्ती करावी, वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम संस्थेमार्फत केल्यास सदरील संस्थेस बांधकामाचे पैसे परस्पर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद स्तरावरून देण्यात यावेत तो निधी ग्रामपंचायतीकडे देण्यात येऊ नये, पेन्शन मंजूर करणे आदी मागण्या मांडण्यात आल्या, असे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे प्रदेशाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी निवेदनात म्हटले.

५ मेपासून आंदोलन

ग्रामसेवकांच्या अडचणी सुटल्या नाहीत तर पाच मेपासून आंदोलन सुरू करण्यात येईल. पाच टप्प्यात हे आंदोलन केले जाईल. त्यातूनही मार्ग निघाला नाही तर सर्व ग्रामपंचायतींना कुलूप लावून चाव्या गटविकास अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात येतील, अशा इशाही देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रेनेजलाइन फुटली; दूषित पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हडकोमध्ये रविवारी (२६ एप्रिल) ड्रेनेजलाइन फुटली. त्यामुळे परिसरात दूषित पाणीपुरवठा झाला. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. यापूर्वी नागरिकांनी स्वखर्चातून ड्रेनेजलाइन दुरुस्त केली होती. ड्रेनेजलाइन जुनी झाल्यामुळे हा प्रकार वारंवार घडतो, याकडे पालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातल्या नागरिकांनी केली आहे.

टी.व्ही. सेंटर एन बारा परिसरातली मुख्य ड्रेनेजलाइन जुनी झाल्याने उतारावरच्या घरांना खूप त्रास होतो. या परिसरातली ड्रेनेजलाइन वारंवार चोकअप होते. गेल्या सहा महिन्यांपासून हा त्रास खूपच वाढला आहे. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही माजी नगरसेवकाने मदत केली नव्हती. त्यामुळे नागरिकांनीच स्वखर्चातून ड्रेनेजची स्वच्छता करून घेतली. तरी नळाच्या पाण्यात सुरुवातीला ड्रेनज मिश्रीत पाणी येतेच. रविवारी पुन्हा तोच प्रकार घडला व ड्रेनेजचे पाणी बाहेर आले. संपूर्ण रस्त्यावर दुर्गंधी पसरली. त्यातच दुपारी नळाला पाणी आले. फक्त पंचवीस मिनिटे पाणीपुरवठा झाला आणि त्यातले शेवटचे पाच मिनिटे शुद्ध पाणी आले. बाहेर रस्त्यावर तर दुर्गंध होताच, पण घरात आलेल्या नळांमधूनही दुर्गंधी पसरली होती. विस्कळित पाणीपुरवठ्याला भरीस भर आलेले हे दुर्गंधीयुक्त पाणी. यामुळे नागरिकांच्या समस्या कमी व्हायला तयार नाहीत. त्यामुळे आजही पिण्याच्या पाण्याकरता नागरिकांना टँकर मागवावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छतावर झोपणे महागात पडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुरूधानोरा येथे छतावर झोपण्यासाठी गेलेल्या नागरिकाचे घर फोडून चोरट्यांनी ९८ हजारांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्ञानेश्वर चिडे (वय ४५, रा. गुरूधानोरा) हे बुधवारी रात्री साडेअकरा वाजता कुटुंबासह घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी घराला कुलूप न लावता फक्त कडी लावली होती. अज्ञात चोरट्यांनी या संधीचा फायदा घेऊन कडी उघडून आत प्रवेश केला. कपाटातील रोख ७० हजार रुपये व २८ हजार रुपयांचे दागिने असा ९८ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. पहाटे चिडे कुटुंबीय उठल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी चिडे यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हद्दपार गुन्हेगार गजाआड

वडगाव कोल्हाटी येथील कुख्यात गुन्हेगार संदीप तुकाराम प्रधान (वय २४) याला शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. शुक्रवारी प्रधान हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून पैठण रोडवरील बेस्टप्राइज मॉलसमोर आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

११ हजारांचे पाकिट पळविले

अनिरुद्ध देशमुख (रा. कॅनॉट गार्डन, सिडको) हे गेल्या गुरुवारी कॅनाट येथून जवाहर कॉलनीकडे अॅटो रिक्षाने येत होती. जवाहर कॉलनीजवळ रिक्षाचालकाने त्यांना पेट्रोल भरायचे आहे, असे सांगत रिक्षातून उतरविले. रिक्षातून उतरल्यानंतर काही अंतर गेल्यावर देशमुख यांनी त्यांचा खिसा तपासला असता ११ हजार रुपये असलेले त्यांचे पाकिट नसल्याचे त्यांना आढळून आले. अज्ञात आरोपींनी पाकिट चोरल्याप्रकरणी त्यांनी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

घरफोडीत सात हजार लंपास

वाळूज महानगर परिसरातील पांडूरंग मोरे यांचे घर चोरांनी गेल्या सोमवारी रात्री फोडले. घराचा कडीकोंडा तोडून कपाटातील रोख सात हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गारखेड्यातून दुचाकी चोरी

तुर्काबाद खराडी येथील पांडूरंग प्रेमभरे (वय २७) यांची दुचाकी (एम.एच. २०, बी.डब्ल्यु. ०८४५) गारखेड्यातील माणिक हॉस्पिटल समोरून चोरीस गेली आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोड्या अटकेत; गुन्हे शाखेची कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड बायपास रोडवरील रहिवाशाचे घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लांबविणाऱ्या एका घरफोड्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. अनिल सुधाकर पवार (२०, रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी) असे त्याचे नाव आहे.

बायपास रोडवरील संतोष मोहन राठोड (वय ३०, रा. हरिरामबन कॉलनी) हे २ एप्रिल रोजी त्यांच्या मुळ गावी, कन्नड येथे गेले होते. मध्यरात्री अनिल पवार याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्याने सहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळ्या, हातातील कडे आणि आठ हजारांची रोकड लांबवली होती. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अनिल पवार याचा हात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्याआधारे आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, सहायक फौजदार गौतम गंगावणे, अयुब पठाण, किशोर काळे, प्रकाश गायकवाड, विलास काळे आणि नवनाथ परदेशी यांनी कारवाई करून पवार याच्या मुसक्या आवळल्या. त्याला मुकुंदवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, घरफोडीतील दागिने हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सापडलेला मोबाइल, पर्स पोलिसांत जमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगबाद

सिद्धार्थ उद्यानाजवळ उतरलेल्या एका तरुणीचा तब्बल ४८ हजार रुपयांचा मोबाइल व पर्स रिक्षात विसरली. या वस्तू एका सहप्रवासी वृद्ध महिलेलेन ताब्यात घेतल्या. पण त्यांना त्या वस्तू ठेऊन घेण्याचा मोह झाली नाही. या महिलेने या वस्तू रविवारी सकाळी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात जमा केल्या आहेत. या महिलेचे नाव शेख अमिनाबी शेख जाकीर मस्तान (वय ६० रा. भोईवाडा) असे आहे.

सातारा परिसरातील अश्विनी विलास शेळके या शनिवारी सायंकाळी मैत्रिणीसोबत रिक्षामध्ये सिद्धार्थ गार्डन मध्ये आली होती. त्यांच्या रिक्षात अदालत रोडवर शेख अमिनाबी बसल्या. रिक्षा गार्डनजवळ थांबल्यानंतर अश्विनी व तिच्या मैत्रिणी रिक्षाचालकाला पैसे देऊन निघून गेल्या. मात्र अश्विनीचा ४८ हजाराचा मोबाइल व पर्स रिक्षामध्ये विसरली. काही अंतरावर गेल्यानंतर अमिनाबीच्या नजरेस या वस्तू पडल्या, त्यांनी त्या वस्तू ताब्यात घेतल्या.

रविवारी सकाळीच क्रांतिचौक पोलिस गाठून त्यांनी पोलिस उपनिरीक्षक विलास कुलकर्णी यांच्याकडे मोबाइल व पर्स दिली. हा ऐवज अश्विनी शेळके यांना परत करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी अमिनाबी यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोंगररांगावर स्थानिक झाडेच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शोभेच्या झाडांचा सावलीसाठी आणि पक्ष्यांसाठी उपयोग नाही. ग्लिरीशिडिया, निलगिरी, सुबाभूळ ही शोभेची झाडे लावणे टाळा. जैवविविधता टिकविण्यासाठी स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड करा, अशा सूचना विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी केल्या आहेत. पर्यटन विकास प्रारुप आराखडा ठरविण्यासाठी शनिवारी म्हैसमाळ येथे झालेल्या बैठकीत दांगट यांनी वन विभागाला सूचना केल्या.

मागील काही वर्षांत जिल्ह्यातील समृद्ध डोंगररांगांना 'ग्लिरीशिडीया' या विदेशी झाडांचा वेढा पडला आहे. कमी कालावधीत लवकर वाढणारे झाड असल्यामुळे वन विभागाने 'ग्लिरीशिडीया'ची भरमसाठ लागवड केली आहे. मागील तीन वर्षांत फुलंब्री, दौलताबाद, सातारा, देवळाई या डोंगररांगांना 'ग्लिरीशिडीया'ने गिळंकृत केले आहे. विशेष म्हणजे या झाडांवर पक्षी बसत नाही.

या झाडाची दाट सावली पडत नाही. कडवट वासामुळे फुलपाखरे, पशू, पक्षी या झाडांच्या जंगलात वास्तव्य करीत नाही; मात्र वृक्ष लागवडीचे टार्गेट झटपट गाठण्यासाठी वन विभागाने 'ग्लिरीशिडीया'ला पसंती दिली आहे. जैवविविधतेला बाधा पोचवणारी विदेशी झाडे वाढत असून स्थानिक प्रजातींची झाडे कमी झाली आहेत. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'समृद्ध डोंगररांना ग्लिरीशिडीयाचा वेढा' हे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची वन विभागाच्या उदासीन प्रशासनाने दखल घेतली नाही; पण विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी या वृत्ताची गांभीर्याने दखल घेतली. म्हैसमाळ, शूलीभंजन, खुल्ताबाद आणि वेरूळ या पर्यनटस्थळांच्या विकासासाठी शनिवारी म्हैसमाळ येथे बैठक झाली. पर्यटन विकास प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी बैठकीत सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्यातील वनसंपदा वाढविण्याबाबत बोलताना विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी स्थानिक प्रजातींच्या झाडांवर भर दिला. ग्लिरीशिडीया, सूबाभूळ आणि निलगिरी या विदेशी झाडांचा फारसा उपयोग नाही. पक्षी बसतील आणि फळे खातील अशी झाडे लावण्यावर वन विभागाने भर द्यावा अशी स्पष्ट सूचना केली. वड, पिंपळ, कडूनिंब, जांभूळ, साग या स्थानिक झाडांना प्राधान्य देण्यासही त्यांनी सांगितले. या बैठकीला उपवनसरंक्षक अशोक गिऱ्हेपुजे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. गवंडर आदी उपस्थित होते.

पर्यावरणप्रेमींकडून स्वागत

जिल्ह्यात स्थानिक प्रजातींची झाडे लावण्याबाबत विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे. पर्यावरणाला उपयुक्त ठरणारी झाडे नामशेष होत आहेत. तर ग्लिरीशिडीयासारखी विदेशी झाडे पर्यावरणासाठी फारशी उपयोगी नाही. त्यामुळे आयुक्तांचा निर्णय निश्चितच उपयुक्त असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरपीएफ’ सेवेवर टांगती तलवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,नांदेड

देशातील कोट्यावधी रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ज्यांच्या खांद्यावर आहे तेच रेल्वे सुरक्षा बल बरखास्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयास रेल्वेच्या आरपीएफ असोसिएशनने तीव्र विरोध दर्शविला आहे. ही समिती बरखास्त करावी, अन्यथा आमच्यावर उपासमारीची वेळ येईल, अशी मागणी करण्यात आली आहे. या शासन निर्णयामुळे देशातील जवळपास ७० हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आली आहे. या संदर्भात रविवारी नांदेड येथे संघटनेचे अध्यक्ष बी. सदानंदा यांच्या नेतृत्वाखाली ‌विभागीय बैठक पार पडली.

१९८५ पासून प्रामाणिकपणे देशात व विविध राज्यात हजारो रेल्वे गाड्यांमधून लाखो प्रवाशांची तसेच कोट्यावधी रुपयांच्या मालांची ने-आण होते. प्रवाशांची सुरक्षा तसेच रेल्वेमधून वाहणाऱ्या मालांची सुरक्षा याची सर्वस्वी जबाबदारी रेल्वे सुरक्षा बल करत आले आहे. हे रेल्वे कर्मचारी रेल्वेमधून प्रवाशांसोबत आपले कर्तव्य बजावतात. प्रवाशांना आलेली अडचण ते सोडवितात. चोऱ्या करणाऱ्या मंडळींना पायबंद घालतात. परंतु, त्यांच्याकडे आयपीसी हे गुन्हेगारावर वचक घालण्याचा कायदा नसल्याने आरपीएफ जवान हतबल होत असतात. एखाद्या गुन्हेगाराला पकडून त्यांना लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करावे लागते. लोहमार्ग पोलिसांसारखे अधिकार द्यावेत, अशी मागणी रविवारी झालेल्या विभागीय बैठकीत केली.

केंद्र सरकारने रेल्वे विभाग डबघाईस येत असल्याने तसेच रेल्वेचे खाजगीकरण करण्याच्या हेतूने रेल्वेतील ७० हजार कर्मचाऱ्यांना, रेल्वे रुग्णालय व केंद्रीय रेल्वे शाळा यासह आदी महत्वाच्या विभागातील कर्मचाऱ्यांना कमी करण्यासाठी निती आयोगाचे अध्यक्ष तथा केंद्रीय समितीचे विवेक देवराय यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नेमली. ही समिती सप्टेंबर २०१४ मध्ये गठीत करण्यात आली. सर्वप्रथम प्राथमिक अंदाज या समितीने रेल्वे बोर्डाकडे तसेच केंद्र सरकारकडे पाठविला आहे. अंतरीम अहवाल पाठविण्यासाठी अजून सहा महिने त्यांना या विषयावर अभ्यास करावयाचा आहे.

या समितीच्या विरोधात देशात वेगवेगळ्या रेल्वे विभागातंर्गत आरपीएफच्या जवानांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. रविवारी झालेल्या बैठकीमध्ये संघटनेचे अध्यक्ष बी. सदानंदा, टी. वाराप्रसाद रेड्डी, एस. उत्तम मनोहर, बी. के. मिना, जी. व्ही. रामण्णा रेड्डी, जी. सिमाचलन, डी. डी. बैनवाड, विनोदकुमार औराळे, मध्य विभागातील आरपीएफचे कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बलात्कार : चार दिवसाची कोठडी

$
0
0

जालना : रुई (ता. अंबड) येथील विवाहितेवरील अत्याचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नराधमास श‌‌निवारी अंबड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रुई येथील एक ३५ वर्षीय विवाहितेवर अर्जुन राजगुरु याने बलात्कार केला. यावेळी पतीने आरोपीस विचारणा करून मारहाण केल्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेथे अर्जुन राजगुरु याचा भाऊ विजय श्रीहरी राजगुरु यांनी पीडित महिलेच्या पतीस लाठीने त्याच्या नाकावर मारुन गंभीर जखमी केले. विवाहितेने गोंदी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर उपरोक्त नराधमासह त्याच्या भावाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना काल रात्री पोलीसांनी अटक करुन आज अर्जुन राजगुरु यास अंबड येथील न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता त्यास न्यायालयाने चार दिवसाची कोठडी सुनावली. दरम्यान, दुसरा आरोपी विजय राजगुरु हा जखमी असल्यामुळे उपचार घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लव्ह जिहाद’ : नांदेडमध्ये २ गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

धर्मांतरासाठी हिंदू मुलीला डांबून ठेवणाऱ्या मुस्लिम समाजातील आरोपीविरुद्ध अखेर भाग्यनगर पोलिस ठाण्यात शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्या दबावामुळे भाग्यनगर पोलिसांना गुन्हा दाखल करणे भाग पडले. याच ठाण्यात दुसराही गुन्हा आरोपीविरुध्द दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, भाग्यनगर पोल‌िस ठाण्याचे पोल‌िस निरीक्षक प्रदीप पालीवाल यांनी मुलीचे वडील फिर्याद दाखल करण्यास गेले असता त्यांनी तक्रार दाखल करून घेतली नव्हती. शनिवारी त्यांच्या हद्दीत राहणाऱ्या एका हिंदू मुलीला मुस्लिम समाजातील आरोपी शेख आदील अब्दुल खादर, शेख अब्दुल खादर शेख महेबूब व त्याची पत्नी, यासीन अब्दुल बारी अब्दुल खादर व त्याची पत्नी, अब्दुल बाशीद अब्दुल खादर, तनवीर अहेमद अब्दुल खादर यांनी धर्मांतरासाठी डांबून ठेवले अशी तक्रार घेऊन पीडित मुलीच्या वडिलाने भाग्यनगर पोल‌िस ठाणे गाठले. परंतु, पोल‌िस निरीक्षक पालीवाल यांनी पीडित मुलीच्या वडिलानांच उलटसुलट प्रश्न विचारुन माघारी पाठविले होते. रविवारी पीडित मुलीचे वडिल शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्याकडे गेले. त्यांनी घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यानंतर पाटील यांनी पोलिस निरीक्षकांना याचा जाब विचारल्यानंतर या प्रकरणात त्यांना गुन्हा दाखल करुन घ्यावा लागला.

याच पोल‌िस ठाण्याच्या हद्दीत भगिरथनगरमधून शनिवारी सायंकाळच्या सुमारास शेख शकील या मुस्लिम समाजातील तरुणाने हिंदू मुलीला पळविले. विशेष म्हणजे या मुलीचे लग्न पुढच्या महिन्यात ठरले असून लग्नाची सर्व तयारी करण्यात आल्याचे समजते. तिच्या मामाच्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोल‌िस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनाही भाग्यनगर पोलिसांनी वेगवेगळी प्रश्न विचारुन हैराण केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. आंबेडकरांचे स्मारक उभारणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

खासदार अमर साबळे यांनी उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे हे गाव दत्तक घेतले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेले हे गाव म्हणून या गावाची ओळख आहे. त्यामुळे या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होणार असल्याची घोषणा खासदार अमर साबळे यांनी रविवारी उस्मानाबाद येथे केली.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे तसेच अॅड. मिलिंद पाटील, संजय निंबाळकर, संजय दुधगावकर, अॅड. खंडेराव चौरे, धनंजय शिंगाडे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. कसबे तडवळे येथे ५१ एकर जमीन ही रेल्वेच्या मालकीची आहे. येथे समर्थांचे शिष्य कल्याणस्वामी (डोमगाव) यांचे शिष्य जगन्नाथ स्वामी यांची समाधी व राममंदिर आहे. या राममंदिर ट्रस्टची अठराशे एकर जमीन आहे. त्याच बरोबर या गावात भैरीसाहेबाची समाधी असून, दर्गाह आहे. मुस्लीम व हिंदूबांधव याला जागृतदेवस्थान मानतात. येथील मानकरी असलेल्या पाच पाटलांना या दर्ग्यात उत्सवाच्या वेळी विशेष मान असतो.

सुमारे १५ हजार लोकवस्ती असलेल्या या गावात २२ व २३ फेब्रुवारी १९४१ रोजी एका परिषदेच्या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन दिवस वास्तव्य होते. त्यामुळे दलित समाजबांधवाच्या दृष्टीने या कसबे तडवळा गावाच्या भूमीला विशेष महत्त्व आहे. खासदार साबळे यांनी खासदार दत्तक योजनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव असलेल्या आंबडवे (जि. रत्नागिरी) गावाला प्राधान्य देत या गावाचा विकास करण्याचे जाहीर केले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असलेल्या कसबे तडवळे या गावाचा दत्तक योजनेंतर्गत ते विकास करणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कसबे तडवळे येथील ज्या शाळेत दोन दिवस वास्तव्य केले ही शाळा राष्ट्रीय स्मारक ठरावी, अशा दृष्टीकोनातून साबळे हे प्रयत्न करणार आहेत. या शाळेत एक भव्य ग्रंथालय उभारण्याचाही त्यांचा मानस आहे. रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवर रेल्वेसाठीचे वर्कशॉप, रेल्वे हॉस्पिटल, रेल्वेचे रॅक पॉईंट उभारण्यासाठीही साबळे प्रयत्न करणार आहेत.

पत्रकारांच्या पेन्शनसाठी प्रयत्न करणार

अधिस्वीकृतीधारक व ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन योजना लागू करावी, या पत्रकारांच्या प्रलंबित मागणीकडे आपण जातीने लक्ष देत ही योजना राज्य शासनाने विनालिंब लागू करावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी उस्मानाबाद येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिंचनवाढीने जिल्हा टंचाईमुक्त करणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जालना जिल्हा सिंचनाच्या बाबतीत अतिमागासलेला आहे. जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढून जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी शिरपूर पद्धतीचे बंधारे अतिशय उपयुक्त ठरणार असून या माध्यमातून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

कुडंलिका नदीवर घाणेवाडी जलाशयाच्या खालील बाजुस शिरपूर पद्धतीचे साखळी बंधारे बांधण्याच्या कार्यक्रमाचे भूमिपुजन लोणीकर यांच्या हस्ते करण्यात झाले. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. लोणीकर म्हणाले, 'मराठवाड्यात एक हजार फुटापर्यंत पाणी पातळी खोल गेलेली आहे. जनतेला टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात नद्यांची संख्या आहे. परंतू पाणी न अडवल्यामुळे हे पाणी ईतर राज्यात वाहून जाते. पडणाऱ्या पावसाचे पाणी या नद्यांमध्ये अडविल्यास राज्यात पाण्याची टंचाई जाणवणार नाही. संपूर्ण राज्य टंचाईमुक्त करण्यासाठी राज्य शासन जलयुक्त शिवार अभियान राबवित आहे. जालना जिल्ह्यातील जवळपास २१२ गावांमधून या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात आली आहेत. लोकसहभागातून हे अभियान राबवून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवून यावर्षात पाचशे गावे टंचाईमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला.'

शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळाले नाही तर त्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. तसेच उद्योग धंद्यांना पाणी मिळाले तरच उद्योग धंदे वाढीस लागून बेरोजगारांच्या हाताला काम मिळून जिल्ह्याच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमास देण्याचे आवाहन करून उद्योगपतींनी सुद्धा एक एक गाव दत्तक घेण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर आमदार अर्जुन खोतकर, आमदार विक्रम काळे, नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, नरेंद्र राणे, शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानापूरकर, रमेशभाई पटेल, हरीष ससन, प्रवीण नाईक, मंगेश शिंदे, सुनीलभाई रायठठ्ठा, भाऊसाहेब घुगे, अरविंद चव्हाण यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वातानुकूलित तंबू लवकरच पर्यटकांच्या सेवेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

निसर्ग पर्यटनाची आवड असणाऱ्यांना येत्या मे महिन्यांपासून म्हैसमाळ येथे मुक्कामासाठी वातानुकूलित तंबू उपलब्ध होणार आहेत. दूरदर्शन सहप्रक्षेपण केंद्राच्या परिसरात ११ तंबू उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले.

निसर्ग पर्यटनस्थळ विकास योजनेंतर्गत मराठवाड्यातील म्हैसमाळ येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. येथे साहसी पर्यटनाची सोयही करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी पुढाकार घेऊन या योजनेला गती दिली आहे. म्हैसमाळ वनपरिक्षेत्रात निसर्ग पर्यटनासाठी सुमारे दोन हजार हेक्टर वनक्षेत्र आहे. येथे दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. परंतु, त्यांना सुविधा उपलब्ध नाहीत. पर्यटकांना सुविधा, निवास, जंगल भ्रमण, साहसी क्रीडा, स्वच्छता, पिण्याचे पाणी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २०१३-१४ मध्ये ९५ लाख ३६ हजार रुपये आणि २०१४- १५ मध्ये ३७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

या निधीतून दूरदर्शन सहप्रक्षेपण केंद्राच्या परिसरात सध्या ११ तंबुंची उभारणी केली जात आहे. येथे चार व्यक्तींसाठी सहा तंबू व दोन व्यक्तींसाठी पाच तंबू उभारण्यात येत आहेत. सहा व्यक्तिंच्या तंबुसाठी २७ लाख ४, ५०० रुपये व दोन व्यक्तिंच्या तंबुसाठी १९ लाख ८६,५०० रुपये खर्च होत आहे. ११ तंबू, फर्निचर व इतर साहित्य खरेदीवर ६६ लाख ५३,५०० रुपये खर्च करण्यात आले आहेत.

पर्यटनवाढीसाठी पॅराग्लायडिंग आणि ट्रेकिंगसाठी म्हैसमाळ परिसरात डोंगररांगा आहेत. त्यामुळे वनविभागाने साहसी पर्यटन प्रकल्प हाती घेतला आहे. साहसी पर्यटनातून मोठी आर्थिक उलाढाल होऊन स्थानिकांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, असे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images