Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दहा हजारांचा ऑनलाइन गंडा

$
0
0

औरंगाबाद : सायबर भामट्याने एका क्रेडिट कार्डधारकाला दहा हजार रुपयांचा गंडा घातला आहे. बँकेचा मॅसेज (संदेश) प्राप्त होताच वन टाइम पासवर्ड पाठविण्याचे सांगून तो मिळवण्यात आला व ऑनलाइन खरेदी करण्यात आली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकर वाघचौरे (वय ३१, रा. सिडको एन-७) यांच्या मोबाइलवर ७ मार्च रोजी एका सायबर भामट्याने फोन केला. त्याने नवीन युक्ती वापरत वाघचौरे यांना 'तुम्हाला बँकेकडून मॅसेज येईल. तो वन टाइम पासवर्ड पाठवा, तुमच्या क्रेडिट कार्डच्या पॉईंटचे पैसे खात्यात जमा केले जाईल' असे सांगितले. हा व्यक्ती बँक अधिकारी असावा, असे गृहित धरून वाघचौरे यांनी वन टाइम पासवर्ड मॅसेजद्वारे पाठवला. त्यानंतर काही क्षणात वाघचौरे यांच्या क्रेडिट कार्डवरून १० हजार ६०० रुपयांची खरेदी करण्यात आली. हा प्रकार लक्षात येताच वाघचौरे यांनी सिडको पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येणारा काळ मराठवाडा, विदर्भाचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विदर्भ आणि मराठवाड्यातील दुःख सारखे आहे. दोन्हीकडे सोन्यासारखी माणसे आहेत, पण त्यांच्या पाठिशी सोन्यासारखे सरकार असावे लागते. मागासलेपणाचे दुःख आम्ही भोगले आहे. ते दूर करण्यासाठी काय केले पाहिजे, याची जाणी आम्हाला आहे. विकासासाठी यापुढचा काळ विदर्भ आणि मराठवाड्यातील असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

उद्योजक राम भोगले यांच्या षष्ठब्दीपूर्तीनिमित्त स्थानिक उद्योजक मित्रपरिवाराच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फडणवीस बोलत होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे, राम भोगले, श्यामल भोगले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले,'जीवनात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक असणे आवश्यक आहे. राम भोगले हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहेत. ६० वर्षे पूर्ण करताना आपण जीवनात काय मिळविले यासोबत काय दिले याचा ताळेबंद घालणे आवश्यक आहे. त्यातून समाधान मिळाले तर त्यापेक्षा आनंद दुसरा नाही.'

'दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोरमुळे औरंगाबाद शहराच्या विकासाची संधी उपलब्ध झाली आहे. राज्य सरकार प्रकल्पासाठी सर्व मदतीसाठी तयार आहे. मराठवाडा आणि विदर्भात रेल्वेचे जाळे पसरविणे आवश्यक आहे. रेल्वे खात्याच्या धोरणानुसार रेल्वेची कामे पूर्ण करण्यासाठी किमान २५ वर्षांचा कालावधी लागणार आहे, पण तोपर्यंत आपल्याला थांबायला वेळ नाही. निधी उभारण्यासाठी 'स्पेशल पर्पज व्हेइकल'चा उपयोग केला जाणार आहे. त्याद्वारे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरून निधी उपलब्ध होईल. यांदर्भात लवकरच सामंजस्य करार केला जाईल,' असे फडणवीस यांनी नमूद केले.

श्री. बागडे म्हणाले, की भोगले राजकारण्यांना मदत करतात, पण स्वतः राजकारणात येत नाहीत. देवगिरी बँकेच्या उत्कर्षात त्यांचा मोठा वाटा आहे. पंकजा मुंडे यांनी भोगले यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना भोगले यांनी यशस्वी वाटचालीत मित्रांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. सरकारला गरज असेल अशा ठिकाणी काम करण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. उल्हास गवळी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मुनिष शर्मा यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या आराखड्यात जुनीच आरक्षणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जुन्या आरक्षणांमध्ये कोणतीही फेरफार न करता औरंगाबाद शहराचा विस्तारित विकास आराखडा शासन दरबारी प्रकाशनासाठी पाठविण्यात आला. सरकारकडून प्रकाशित झालेला विकास आराखडा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला जाणार आहे. विस्तारित आराखड्यातील आरक्षण बदलाच्या सूचना आराखडा समितीसमोर आल्या नसल्याची माहितीही खात्रीलायक सूत्रांनी दिली.

दर २० वर्षांनी शहर विकास आराखडा तयार केला जातो. मूळ विकास आराखडा तयार असेल, तर तो तसाच ठेवून विस्तारित शहराचा विकास आराखडा तयार केला जातो. गेल्या ३ वर्षांपासून शहराचा विस्तारित विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मुळात हे काम महापालिकेच्या नगररचना विभागाचे, परंतु अपुऱ्या मनुष्यबळामुळे ते शासनाच्या नगररचना विभागाला देण्यात आले. विस्तारित विकास आराखडा तयार करताना पूर्वी असलेली आरक्षणे बदलण्यात आली नाहीत. उद्याने, मैदाने, शॉपिंग कॉम्प्लेक्स, डिव्हिजनल स्पोर्टस् सेंटर आदी आरक्षणे कायम ठेवण्यात शासनाच्या अधिकाऱ्यांना यश आले असल्याचे मानले जात आहे. विकास आराखड्याचे काम सुरू असताना नवीन आरक्षणाबद्दल विशेष सूचना केल्या नाहीत. शहराचा परिसर १३८ चौरस किलोमीटरचा असताना नवीन उद्याने, स्मशानभूमी, क्रीडांगण, शॉपिंग कॉम्प्लेक्स आदींच्या आरक्षणाबद्दल सूचना केल्या नाहीत, त्यामुळे विकास आराखडा तयार करणाऱ्या समितीने जशी सुचतील तशी आरक्षणे प्रस्तावित केली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणकर-जालनेकर भिडले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठणकर आणि जालनेकर रेल्वे मार्गावरून सोमवारी (४ मे) सुभेदारी विश्रागृहात भिडले. यावेळी पैठणचा रेल्वे मार्ग वळविलाच नाही म्हणणारे खासदार रावसाहेब दानवे यांच्यासमोर मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी मार्ग वळविल्याचे पुरावे ठेवले. तेव्हा दानवे क्षणात शांत झाले. 'मी जालनेकरांचाही नाही आणि पैठणकरांचाही नाही,' असे म्हणत सपशेल माघार घेतली.

सोलापूर-जळगाव रेल्वे मार्ग पैठणला टाळून तो जालन्याहून वळविण्यात आला, असा आरोप पैठणकरांनी केला होता. याबद्दल त्यांनी निदर्शनेही केली. तेव्हा खासदार दानवे यांनी आपण हा मार्ग वळविलाच नाही. पैठणकरांनी या मार्गाबाबत कसलिही मागणी रेल्वेकडे केली नव्हती, असा दावा करत पैठणकरांना खुले चर्चेचे आव्हान दिले होते. हे आव्हान स्वीकारत सोमवारी पैठणकर सुभेदारीवर पोहचले. खासदार दानवे यांच्या आगमनापूर्वी जालनेकरांनी कसा मार्ग वळविला याबाबत चर्चा सुरू होती. त्यावेळी जालन्याहून आलेल्या मंडळींनी आपली बाजू पैठणकरांसमोर आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पैठणकरही आक्रमक झाले. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही कार्यकर्त्यांना सुभेदारी बाहेर काढले.

खासदार रावसाहेब दानवे यांच्यासोबत दुपारी बारा वाजता पैठणकरांची बैठक सुरू झाली. तेव्हा सोलापूर जळगाव रेल्वे मार्ग पैठणहून जालन्याला कसा वळविला, याचे पुरावे मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी ठेवले. तेव्हा हा मार्ग वळविलाच नाही म्हणणाऱ्या दानवे यांनी आपल्या भूमिकेवरून यू टर्न घेतला. बैठकीला पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे, प्रा. संतोष तांबे, मनोहर निकम, किशोर थोरे, साईनाथ कासोळ, महेश बोंबले, दिनेश दुधार, लक्ष्मण वाघमारे आदी उपस्थित होते.

सर्वेक्षणाबाबत गुप्तता

सोलापूर-जळगाव रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाबाबत ठेवलेली गुप्तता संशयास्पद असल्याचे ओमप्रकाश वर्मा यांनी सांगितले. सदर मार्ग तयार करण्याचा निर्णय तत्कालीन रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांनी घेतला होता. हा मार्ग हा पैठणहून व्हावा अशी इच्छा व्यक्त केली होती, अशी माहिती नाना चव्हाण यांनी दिली. माजी आमदार संजय वाघचौरे यांनी 'साहेब तुम्ही भेदभाव करू नका. हा मार्ग पैठणहूनच होईल अशी घोषणा करा,' अशी मागणी केली.

दानवेंचे घुमजाव

पैठणचा रेल्वे मार्ग कसा वळविला, याचे पुरावे ओमप्रकाश वर्मा यांनी ठेवले. तेव्हा कागदपत्रे मिळाली नसल्याचे दानवे यांनी सांगितले. वर्मा यांनी दिल्लीला तुमचे पी.ए. अमित भुसारी यांना कागदपत्रे दिल्याचे सांगताच दानवेंनी आपले शब्द मागे घातले. मार्ग वळविल्याचे पुरावे देताच त्यांनी घुमजाव केले. दानवे म्हणाले, 'जालना आणि पैठण माझाच भाग असल्याने कुणाचीही बाजू घेणार नाही. रेल्वे मंत्र्यांसमोर जालना, पैठणचे प्रत्येकी पाच प्रतिनिधी बोलावून वादाचा सोक्षमोक्ष लावू. कमिट्यांवर मराठवाड्याची बाजू मांडण्यासाठी एखादयाची नियुक्ती करतो.'

मी शपथेवर कुठंही सांगितलं नाही की हा मार्ग जालन्याहून होईल की पैठणहून होईल. मी बजेटवरही बोललो नाही. मी जिवंत राजकारणी आहे. आमचं घर काचेचं असतं. कोणीही येऊन दगड मारू शकतो. जालना जसं माझं तसंच पैठण माझं. तुम्ही माझ्या जागी खासदार असता तर काय केलं असतं?

- रावसाहेब दानवे, खासदार

पैठणहून सोलापूर जळगाव रेल्वे मार्ग झाला पाहिजे, पैठणकरांची भूमिका आहे. मात्र, कारण सांगून लोकप्रतिनिधी पैठणकरांची दिशाभूल करत आहेत. दुःख म्हशीला इंजेक्शन पखालीला या म्हणी प्रमाणे हा कारभार सुरू आहे. पैठणहून रेल्वे मार्ग झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. - नितीन देशमुख,

सरचिटणीस, क्रांतिसेना.

पंतप्रधान रेल्वे योजनेत, मागासलेले शहरे जोडण्यासाठी रेल्वे मार्ग तयार करण्याचे नियोजन आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी हा रेल्वे मार्ग जालन्याहून मंजूर केला आहे. पैठणकरांनी विरोध करण्याचे काहीही कारण नाही. या रेल्वे मार्गामुळे जालन्याचा विकास होईल.- फिरोज अली,

रेल्वे संघर्ष समिती, जालना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप-सेनेची युती तुटेल!: पवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या स्थापनेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बिनशर्त पाठिंबा जाहीर करणारे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी, 'मुंबई महापालिकेच्या आागामी निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती तुटेल', असे भाकीत सोमवारी वर्तविले.

पत्रकारांशी बोलताना पवार यांनी विविध विषयांवर मतप्रदर्शन केले. राज्यातील सत्ताधारी युतीमध्ये सातत्याने कुरबुरी सुरू असतात. त्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता, 'मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण होऊन युती तुटेल. सत्ताधारी पक्षातील एका व्यक्तीनेच ही माहिती मला दिली आहे', अशी पुस्तीही पवार यांनी जोडली. या व्यक्तीचे नाव मात्र त्यांनी अर्थातच सांगितले नाही!

'महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य वैयक्तिक स्वरूपाचे आहे. त्याच्या मतांशी पक्षाचा काहीही संबंध नाही. पुरंदरे हा विषय काही पक्षाच्या ध्येयधोरणाचा भाग नाही. कोणाला पुरस्कार द्यायचा हा राज्य सरकारचा अधिकार आहे,' असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. 'बाबासाहेब पुरंदेर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणे म्हणजे इतिहासाची टिंगल आहे', असे वक्तव्य आव्हाड यांनी केले होते.

'मराठवाड्यात तसेच विदर्भात शेतकऱ्यांंच्या आत्महत्येचे प्रमाण वाढते आहे. याबाबत प्रशासन व राज्यकर्त्यांनी संवेदनशील व्हावे,' असे आवाहनही पवार यांनी केले. पवार म्हणाले, 'शेतकऱ्यांंच्या आत्महत्येबाबत संसदेत चुकीची माहिती सादर करणे हे अत्यंत घृणास्पद आहे. खरी माहिती कळवली तर मदत मिळवण्याच्यादृष्टीने प्रयत्न केला जाऊ शकतो. राज्याने केंद्राला खरी माहिती द्यायला हवी. जे घडले आहे ते स्वीकारले पाहिजे आणि त्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.'

पवारांच्या भूमिकेमुळे तटकरेंची अडचण

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासकार नाहीत, या विधानाशी आपण सहमत आहोत, तथापि, यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी केलेले भाष्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबादमध्ये स्पष्ट केल्याने, त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची अडचण झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

​शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एकमताने गेल्या आठवड्यात जाहीर केला होता. त्या निर्णयावर राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती. पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणे म्हणजे इतिहासाची टिंगल आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला होता. आव्हाड यांचे व्यक्तिगत मत असल्याचे सांगून तटकरे यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले होते.

या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या पत्रकार परिषदेत पवार यांनी आव्हाड हे स्पष्टवक्ते आहेत. पुरंदरे हे इतिहासकार नाहीत या एकाच विधानाशी मी सहमत आहे. तथापि, शिवशाहीच्या विचारांसाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर काम केले. याविषयी सातत्याने भूमिका मांडली. त्यामुळे पुरंदरे यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय हा राज्य सरकारचा अधिकार आहे असे पवार म्हणाले. पवारांच्या त्या वक्तव्याबाबत तटकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी अनेकवेळा संपर्क साधला. पण ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवा मोंढ्यातील चोरटे बेपत्ताच

$
0
0

नांदेडः पिस्तुलसारख्या वस्तूचा धाक दाखवून दोन हेल्मेटधारी चोरट्यांनी नवा मोंढा भागातील एका दुकानातून लूट केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. परंतु अद्याप तरी त्या चोरट्यांचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण आहे.

नवा मोंढा भागातील गजबजलेल्या मार्केटमध्ये लक्ष्मीकांत रुद्रावार यांची लक्ष्मीकांत ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान आहे. शनिवारी रात्री त्या दुकानात त्यांचे मुनीम मारोती भीमराव बोकारे (वय ६२) हे एकटे बसलेले होते. तेव्हा दोन चोरटे मोटार सायकलवर बसून आले. त्यांनी मारोती बोकारे यांना पिस्तुलसारख्या दिसणाऱ्या वस्तूचा धाक दाखवून गल्ल्याच्या चाव्या घेतल्या. गल्ल्यातील ९० हजार रुपये एवढी रक्कम चोरट्यांनी घेऊन मोटरसायकलवर बसून पळ काढला. हे दोन्ही चोरटे दुकानात घुसले तेव्हा त्यांनी हेल्मेट घातलेले होते. हे चोरटे पळत असतांनाचे छायाचित्र माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या घरासमोरील सीसीटीव्हीत कैद झाले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिरंगाई केल्यास सेवामुक्त करणार

$
0
0

जालनाः सध्या जिल्ह्यात दृष्काळसदृष्य परिस्थती असल्यामुळे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या समवेत जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी जलयुक्त शिवार अभियान (नदी खोलीकरण), स्वच्छता अभियान, तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाची पाहणी केली. परतूर आणि घनसावंगी तालुक्यातील काही गावांतील कामांची पाहणी केली. कामात कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नायक यांनी दिल्या आहेत.

जिल्ह्यात परतूर आणि घनसावंगी तालुक्यात मनरेगातंर्गत झालेल्या विहिरीच्या कामाचे पंचायत समिती अंतर्गत कामाचे पेमेंट देण्यासाठी रविवारी जिल्ह्यातील पंचायत समिती नरेगा सबंधित विहिरीचे पेमेंट संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीसुद्धा संबंधित कर्मचारी कार्यालयात काही अधिकारी व कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले. नरेगा अंतर्गत विहिरीच्या कामाचे पेमेंट तात्काळ होणे जरुरीचे आहे. या कामात दिरंगाई केल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नायक यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबाद भाजपची भूमिका आडमुठेपणाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

ज्यांनी राज्यातील सहकार उद्ध्स्त केला अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून जर उस्मानाबादमधील भाजप जिल्हा बँकेची निवडणूक लढवित असेल तर भाजपची ही दुटप्पी भूमिका उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी आडमुठेपणाची ठरणार आहे, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला.

उस्मानाबाद येथे ते पत्रकारांशी बोलत होते. उस्मानाबाद येथील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची गफलत करून उस्मानाबाद जिल्हा बँक निवडणुकीत राश्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळावणी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

ज्यांनी उस्मानाबाद जिल्ळ्यातील सहकार संपविला. साखर कारखाने, दूधसंघ, जिल्हा सहकारी बँक डबाघाईस आणून शेतकऱ्यांचे जीवन जगणे असहय केले, अशा जिल्ह्यातील सहकारी संस्थाना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून शिवसेना व काँग्रेसने स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. जिल्हा बँकेच्या सर्व मतदारंनी या पॅनेलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या पॅनेलाला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळी शेतकऱ्यांचा अथवा दीनदुबळयाचा कधीच विचार करीत नाहीत. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून केवळ आपला विकास करणे हा त्यांचा उद्योग आहे. शिवसेनेने सुद्धा या बँक निवडणुकीत काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेतेमंडळीना उस्मानाबादचा विकास हवा आहे. तेरणा, तुळजाभवानी कारखान्याचे धुराडे त्यांना जोमाने पेटवलेले पहावयाचे आहे. ही कामे करणारी शिवाय जिल्ह्याला विकासाची दिशा देणारी मंडळी शिवसेनेकडे आहे. मात्र, मित्रपक्ष असलेल्या भाजपने याठिकाणी स्वार्थासाठी राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली आहे. ही बाब युतीच्या दृष्टीने लाभकारक नाही, असे मत जानकर यांनी व्यक्त केले. यावेळी सेनेचे सहजिल्हा संपर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, तानाजी सावंत, धनजंय सावंत यांची उपस्थिती होती.

उस्मानाबाद जिल्हा दत्तक घेणार

उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाकडे आता आपण जातीने लक्ष देणार असून विकासासाठी आपण उस्मानाबाद जिल्हा दत्तक घेणार असल्याची घोषणा यावेळी आमदार जानकर यांनी व्यक्त ‌केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंग्रजीसाठी एक झाला गाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

सध्या इंग्रजीचे वाढलेले महत्व ग्रामीण भागातील नागरिकांनी चांगलेच लक्षात आले आहे. त्यामुळे उन्हाळी सुटीच्या काळात मुर्शिदाबादवाडी येथे गावकऱ्यांनी एकत्र येऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्लीशचे वर्ग सुरू केले आहेत. वर्गणी करून तज्ज्ञ शिक्षकाची मानधनावर नियुक्ती केली आहे. सध्या शाळेत खिचडी शिजेपर्यंत विद्यार्थी इंग्रजीचे धडे गिरवत आहेत.

आजच्या परिस्थितीत इंग्रजी शिकणे आवश्यक आहे, ही धारणा बळावली आहे. त्याला ग्रामीण जनताही अपवाद नाही. फुलंब्री तालुका टंचाईग्रस्त असल्याने शासन निर्णयानुसार तालुक्यातील विद्यार्थ्यांना उन्हळ्याच्या सुटीत शाळेत खिचडी शिजवली खाण्यास द्यावी, असे आदेश आहेत. विद्यार्थी शाळेत खिचडी खाण्यासाठी जातात व दिवसभर गावात भटकतात. त्यामुळे इंग्रजीचे कौशल्य शिकवण्याचा विचार पुढे आला. खिचडीसोबत स्पोकन इंग्लीशचे वर्ग सुरू करण्याची कल्पना उपसरपंच सदाशिव विटेकर व काही पालकांनी मांडली. त्यास इतर पालकांनी दुजोरा दिला.

ग्रामीण भागातील मुलांना हे शिक्षण घेण्यासाठी शहरात जावे लागते. त्यासाठी महागड्या क्लासचे प्रति विद्यार्थी पाच ते सहा हजार रुपये शुल्क, दररोजचा प्रवास हे अत्यंत अडचणीचे आहे. त्यामुळे या कल्पनेला गावकऱ्यांनी प्रतिसाद दिल्यानंतर सुमारे ४० विद्यार्थी नाममात्र शुल्क देण्यास तयार झाले.

विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी फुलंब्री येथील क्लासमधील एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या येथील जिल्हा परिषद शाळेत सकाळी नऊ ते बारा यावेळेत वर्ग चालविले जातात. या तीन तासात खिचडी शिजेपर्यंत मुलांचे शिक्षण होते. या उपक्रमामुळे विद्यार्थांना पुढील शिक्षणास मदत होईल, असा हेतू आहे. या उपक्रमाला मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण मदत करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नतिथीमुळे फुलंब्रीत वाहनांच्या लांब रांगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

फुलंब्री शहरातील औरंगाबाद-जळगाव महामार्गावर गेल्या काही वर्षांपासून वाहनचालकांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. लग्नसराईमुळे वाहनांची गर्दी वाढल्याने मंगळवारी सकाळपासून (५ मे ) या रस्त्यावर दिवसभर कोंडी होत होती.

औरंगाबाद-जळगाव हा महत्त्वाचा रस्ता असून दररोज शेकडो वाहनांनी वर्दळ असते. मंगळवारी खूप लग्न असल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी होती. अजिंठा, वेरूळ लेणीला जाण्यासाठी फुलंब्री शहरातून जावे लागते. फुलंब्रीतील फूलमस्ता नदीवर नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले. पण पुलासमोरील रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. हा पूल वाहतुकीसाठी मोकळा झाल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या सुटू शकते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला खड़ी टाकून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या महामार्गावरील रस्त्याचे काम लवकर पूर्ण करून वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलताबादेत गुन्हा दाखल

$
0
0

खुलताबाद : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदाराला मतदान केंद्रात जाण्यास अडथळा केल्याने अशोक गुलाब खोसरे व दीपक खोसरे या दोघांसह इतर १० ते १५ जणांविरुद्ध खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदार संतराम फकीरराव खोसरे मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या परिसरात आल्यानंतर अशोक गुलाब खोसरे व दीपक पोपट खोसरे यांच्यासह १० ते १५ जणांनी त्यांना केंद्राच्या जाऊ दिले नाही. त्यांच्या मर्जीतील उमेदवारास मतदान करण्यासाठी दडपण आणले. त्यामुळे संताराम खोसरे मतदान करायचे नाही, असे सांगून निघून गेले, अशी फिर्याद निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशिक्षणापासून वंचित उमेदवारांची कोर्टात धाव

$
0
0

म . टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही निवड झालेल्या उमेदवारांच्या वैध जात प्रमाणपत्रावर शंका घेऊन त्यांना प्रशिक्षणापासून वंचित करण्यात आले. या उमेदवारांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

अमोल कांबळे, रमेश जशवंत, दीपक शिरगुरवार, समीर कांतीवार, मनीषा गंपले, अमोलकुमार अन्डेलवाड, आनंद ऐनवाड, ऋषिकेश वाघमारे, विशाल शिरसाट, विनोद मेढे, मुकुल तोटावार, प्रिया बेम्ब्रे, निखिल जाधव, श्रीकांत निरावार, संतोष अड्मुलवाड, किरण जावडवाड व अनिकेत सोनवणे, योगिता ठाकूर या याचिकाकर्त्यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या गट अ अधिकारी परिक्षेतून निवड झाली. त्यांना प्रक्षणाशिसाठी यशदा, पुणे येथे बोलावण्यात आले. या सर्वांकडे आदिवासी संशोधन आयुक्त हे सचिव असलेल्या जातपडताळणी समितीने अनुसूचित जमातीची वैधता प्रमाणपत्र आहे. त्यांच्याकडे कोळी महादेव, मन्नेवारलू, टोकरे कोळी या जातीची वैध प्रमाणपत्र आहेत. तरीही या निवडक उमेदवारांना का डावलले, असा सवाल या याचिकाकर्त्यांनी केला आहे. यातील काही याचिकाकर्ते राज्य व केंद्र शासनाच्या विविध पदावर कार्यरत होते, पण ही नवीन निवड झाल्याने ते या पदावरून दूर झाले आहेत.

सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवाने याचिकाकर्त्यांच्या वैध जात प्रमाणपत्रावर शंका उपस्थित करून त्यांच्या निवडीला आक्षेप घेतला. त्यांना प्रशिक्षणापासून रोखण्यात आले. २८ एप्रिलच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. उपसचिवांच्या अधिकारात ही बाब येत नाही. वैधता प्रमाणपत्राला हायकोर्टातच आव्हान देता येते. नियमानुसार समितीने दिलेले प्रमाणपत्र अंतिम असते, असे सुप्रीम कोर्टाच्या माधुरी पाटील या खटल्याच्या निकालात स्पष्ट करण्यात आले आहे, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे उमेदवारांना मिळालेल्या वैध प्रमाणपत्रावर शंका घेण्याचा अधिकार राज्य शासनाच्या आदिवासी सचिव व उपसचिवांना नाही, असेही याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे २८ एप्रिलचा आदेश कायद्याला धरून नाही व बेकायदेशीर आहे. हा आदेश रद्द करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंब्याचा गोडवा वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रत्नागिरीहून हापूस आंब्याची आवक वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत कच्च्या पेटीमागे ४०० ते ५०० रुपयांनी तो स्वस्त झाला आहे. कर्नाटकाहून येणाऱ्या आंब्याच्या दरातही २०० ते ३०० रुपयांची घट झाली आहे. परिणामी, आंबा सामान्यांच्या आवाक्यात येऊ लागला आहे, असा दावा कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी प्रभाकर पवार आणि इतर व्यापाऱ्यांनी केला आहे. सर्व प्रकारचे आंबे ग्राहकांना आता किलोमागे ४० ते ८० रुपयांच्या दरात मिळू लागले आहेत.

गेल्या आठवड्यात रत्नागिरीहून हापूस आंब्याची अडीच हजार पेट्यांची आवक झाली होती. त्यावेळी तयार आंब्याची ग्राहकांकडून मागणी केली जात होती. त्यामुळे दर वाढले होते. परंतु रविवारी सुमारे पाच हजार पेट्यांची आवक झाली आहे. त्यामुळे आंब्याच्या पेटीच्या दरात पेटीमागे ४०० ते ५०० रुपयांची घसरण झाली आहे. पुण्याच्या गुलटेकडी सह 'भद्रावती, बेंगळुरू तसेच कर्नाटकाच्या विविध भागातून कर्नाटक हापूससह अन्य जातीच्या आंब्यांची रविवारपासून बाजारात आवक झाली आहे. सुमारे ४० हजार पेटींची आवक बाजारात झाली. सात हजार करंड्यांची आवक झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून करंड्यामधून येणारी आवक कमी होऊ लागल्याने पेट्यांमधून होणारी आवक वाढली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा कर्नाटकाचा आंबा ४०० ते ५०० रुपयांनी महाग आहे, मात्र गेल्या आठवड्यापासून आवक वाढल्याने पेटीमागे २०० ते ३०० रुपयांनी आंबा स्वस्त झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळाने जंगल कोरडेठाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळाने प्राण्यांच्या तोंडचे पाणी पळवले, जंगल कोरडेठाक पडले त्यामुळे मंगळवारी दुपारी चारपर्यंत झालेल्या वन्यप्राणी गणनेतही मोजकेच प्राणी आढळले. वैशाख पौर्णिमेला वन्यजीव संरक्षक विभाग व वन विभागाने वन्यप्राणी गणना केली. गौताळा अभयारण्यात ३३ ठिकाणी आणि सारोळा येथे नीलगाय, रानडुक्कर, मोर या प्राण्यांची सर्वाधिक नोंद झाली. गौताळा अभयारण्यात बिबट्या आढळल्याचे निरीक्षकांनी सांगितले. या गणनेचा अहवाल बुधवारी (६ मे) मुख्य कार्यालयात सादर केला जाणार आहे.

पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रखर प्रकाशात वन्यप्राणी गणना करण्यात आली. वन्यजीव संरक्षक विभागाने गौताळा अभयारण्यात प्रगणना केली. गौताळ्यात १३ आणि नागद परिसरात २२ पाणवठ्याजवळ प्रगणना झाली. या कामात ४८ जण सहभागी झाले. रात्रीच्या प्रगणनेत रानडुक्कर, मोर, नीलगायी आणि इतर वन्यप्राणी आढळले. काही पाणवठ्यात पाणी नसल्यामुळे रात्री प्राणी फिरकले नाही. वन विभागाने सारोळा, देवळाई आणि सातारा परिसरात वन्यप्राणी मोजणी केली.

सातारा परिसरात एकमेव पाणवठा असल्यामुळे मोजकेच प्राणी दिसले, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी आर. ए. नागापूरकर यांनी दिली. सारोळा परिसरात जास्त प्राणी दिसले. या मोहिमेत एस. के. साबळे, वाय. एम. शिंदे, सुधीर धवन, के. व्ही. राजगे, जी. ए. वैद्य, ए. डी. तागड, पी. डी. सूर्यवंशी आणि एस. बी. पुंड यांनी सहभाग घेतला होता. गौताळा अभयारण्यात बिबट्याचे ठसे दिसले. काही पाणवठ्यावर बिबट्याची नोंद झाल्याची माहिती निरीक्षकांनी दिली.

पाणी टंचाईची झळ

गौताळा अभयारण्यात अनेक पाणवठे कोरडे आहेत. काही पाणवठ्यात वन्यजीव संरक्षक विभागाने पाणी टाकले. मात्र, पाणवठ्याकडे वन्यप्राणी दिसले नाही. मे महिन्यात टंचाई तीव्र होते. सर्व प्राण्यांच्या संरक्षणासाठी पाण्याची गरज असल्याचे वन्यप्रेमींनी सांगितले.

वेगवेगळ्या ठिकाणी वन्यप्राणी गणना करण्यात आली. साधारणपणे प्राण्यांची संख्या स्थिर आहे किंवा वाढली याबाबत अहवाल आल्यानंतरच माहिती होईल. प्राणी उत्तम स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

- आर. ए. नागापूरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासनाला कोर्टाची चपराक

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील हायकोर्ट आणि जिल्हा कोर्टातून सरकारी वकील व सहायक सरकारी वकिलांचा कार्यकाळ अपूर्ण असतानाही राज्य सरकारने जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीतील अटींच्या विरोधात याचिका करण्यात आली होती. या अटी रद्द करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. व्ही. एच. जाधव यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे नव्याने सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांना चपराक बसली आहे.

सरकारी व सहायक सरकारी वकीलपदासाठीची जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. ७ वर्षे वकिली पूर्ण करणाऱ्यांना ३१ मार्च पर्यंत अर्ज भरायचे होते. या जाहिरातीतील अटीला के. जी. पाटील, प्रदीप नाथा जाधव, अनंत अर्जून पाटील, गणेश खरसाडे व श्रीकृष्ण पवार या हायकोर्ट आणि जिल्हा कोर्टातील अतिरिक्त व सहाय्यक सरकारी वकिलांनी आव्हान दिले. नवीन नियुक्त्या ज्या दिनांकाला अंमलात येतील त्या दिनांकापासून सध्या या पदावर कार्यरत असलेल्या सरकारी वकिलांच्या नियुक्त्या आपोआप संपुष्टात येतील, अशी ही अट होती. ही अट महाराष्ट्र विधी अधिकारी (नियुक्ती, सेवेच्या शर्ती व मोबदला) नियम १९८४ च्या विरोधात आहे. नवीन अट बेकायदेशीर आहे. कायद्याचे पालन न करता राज्य शासनाने बेकायदेशीर प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. नेमणुकीचा कालावधी शिल्लक असतानाही ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. नव्याने सत्तेत आलेल्या युती सरकारने आपल्या पसंतीच्या नियुक्त्या करण्यासाठी जाहिरातीतील अट टाकली होती, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचे वकील व्ही.डी. सपकाळ यांनी केला. कोर्टाने महाराष्ट्र विधी अधिकारी नियमाची प्रक्रिया राबवूनच सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, असे कोर्टाने सांगून जाचक अट रद्द करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे व्ही.डी. साळुंके व अश्विन होन, तर सरकारतर्फे ज्येष्ठ विधीज्ञ विनायक दीक्षित यांनी बाजू मांडली.

७०० पेक्षा अधिक सरकारी वकील

मुंबई हायकोर्टासह नागपूर, औरंगाबाद खंडपीठात सव्वाशेहून अधिक सरकारी व सहायक सरकारी वकील आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर येथील कोर्टांमध्ये सर्वाधिक सरकारी वकील कार्यरत आहेत. राज्यात एकूण ७०० पेक्षा अधिक सरकारी वकील आहेत. कोर्टाच्या या निर्णयाचा फायदा याचिकाकर्त्यांपुरताच मर्यादित नसून राज्यातील सर्वच सरकारी व सहायक सरकारी वकिलांना मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आतबट्टयातून खो-याने पैसा

$
0
0

धनंजय कुलकर्णी, औरंगाबाद

ज्याला जीवन म्हणतो त्या पाण्याचाही आतबट्ट्याचा धंदा करत अनेकजण खोऱ्यांनी पैसा ओढत स्वतःची तुंबडी भरत आहेत. सध्या औरंगाबादमध्ये फक्त ९ परवानाधारक आरओ वॉटर प्लॅंट असून अवैधरित्या चालण्याऱ्या प्लॅंटची संख्या ५० वर गेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे यापूर्वी अवैधरित्या चालण्याऱ्या जवळपास ४० कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

शहरात २० लिटर पाण्याचा जार फक्त ३० रुपयात आणि १ लिटर बाटलीबंद पाणी २० रुपयात विकले जात आहे. यावरून पाण्याचा धंदा कसा होत असेल याची कल्पना येते. २० लिटर पाण्याच्या जारमधील पाणी हे मिनरलवॉटर किंवा प्रक्र‌िया केलेले नसते. या शिवाय बीआयएस ( ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड) आणि एफडीए (अन्न व औषध प्रशासन) यांचे सर्वच नियम धाब्यावर बसवून बाटलीबंद पाणी, पाऊच व जार आदींची विक्री सर्रास सुरू आहे. शहरात फक्त ९ परवानाधारक आरओ वॉटर कंपन्या आहेत, तर रोज २० लिटरचे ४० हजारहून अधिक जार विकले जातात. त्यामुळे यात मोठा काळाबाजार सुरू आहे.

जारची मागणी कुठे?

बँका, विविध कार्यालये, खासगी दुकाने तसेच व्यापारी संस्थांध्येही आता २० लिटरच्या पाण्याच्या जारला मागणी वाढली आहे. मोठ्या व्यापारी संस्थांमध्येही असे पाणी विकत घेणे प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे. या व्यवसायाची व्याप्ती पाहता आधी लग्न सोहळे व समारंभावर अवलंबून असलेल्या मिनरल वॉटर कंपन्यांना आता दररोजचे हक्काचे ग्राहक मिळाले आहेत. तसेच हवे तेथे पाणी पोहोचवण्याची यंत्रणा उपलब्ध असल्याने ग्राहक वर्गात वाढ झाली आहे. एकूणच या उद्योगातून आर्थिक उलाढालीचे एक नवे दालन खुले झाले आहे.

कारवाईचा बडगा का?

शहरातील नव्याने वस्ती थाटलेल्या नारेगाव, ब्रिजवाडी, जाधववाडी, हिनानगरच्या परिसरात गटारी नाहीत. शोषखड्डा हाच पर्याय स्थानिक नागरिक पाणी निचऱ्यासाठी वापरतात. त्यामुळे या भागातील पाणी दूषित असून, हे पाणी चिकट व खारट आहे. स्थानिक नागरिक पिण्यासाठी तर नव्हेच, परंतु आंघोळीलाही हे पाणी वापरत नाहीत. अशाच ठिकाणी काही 'आरओ' प्लांट असून, येथील पाणी ठिकठिकाणची कार्यालये, आस्थापना तसेच लग्न समारंभांध्ये वॉटर जारच्या माध्यमातून बिनधास्त विकले जात आहे. हे लक्षात घेऊनच अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

एफडीएकडून सुमारे ४० कंपन्यांवर दीड वर्षांत कारवाई करण्यात आली. गेल्या महिन्यात ९ ठिकाणी वाळूज व चिकलठाणा ‌परिसरात छापे टाकून प्लँट सील केले. सर्वसामान्य नागरिकांनी पाण्याची बाटली विकत घेताना ती बाटली सीलबंद किंवा बीआयएसचे सर्व नियमांचे पालन केलेल्या कंपन्यांचीच असल्याची खात्री करावी.

- एम. डी. शहा, सहायक उपायुक्त अन्न व औषध प्रशासन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाडेकरूच्या कुटुंबावर घरमालकाचा हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाडेकरूच्या घरातील साहित्य बाहेर फेकून देत चौघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. शिवाजीनगर (बारावी योजना) परिसरात सोमवारी सकाळी साडेआठ वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी दहा आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर भागातील संजय डबरे यांच्या घरामध्ये सरोजनी लाड या कुटुंबासह भाड्याने राहतात. घर रिकामे करण्यावरून त्यांचा व घरमालकांचा कोर्टात वाद सुरू आहे. सोमवारी घरमालक डबरे नातेवाईकांसह लाड यांच्या घरात जबरदस्तीने शिरले. सरोजनी लाड, त्यांचे पती व दोन मुलांना शिवीगाळ करीत लाठ्याकाठ्यानी मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर घरातील टीव्ही, फ्रिज, टेबल, रॅक, पाण्याच्या टाक्या, हंडे, डब्बे आदी साहित्य रस्त्यावर फेण्यात आले. याप्रकरणी लाड यांच्या तक्रारीवरून आरोपी संजय डबरे, मीना, शाम, राजू, भिगन, बेबी, छाया, गंगुबाई डबरे व संतोष चिकसे यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे, घरात घुसणे, दंगल करणे आदी कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दुचाकीचोर अटकेत

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुंडलिकनगर येथून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने मंगळवारी (५ मे) अटक केली. त्यांच्या ताब्यातून एक दुचाकी हस्तगत करण्यात करून त्यांना मुकुंदवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
गारखेडा परिसरातील मेहरसिंग नाईक कॉलेजसमोर दोन तरुण चोरीची दुचाकी घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून मंगळवारी दुपारी अडीच वाजता सापळा लावण्यात आला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दोन संशयीत तरूण दुचाकीसह पोलिसांना सापडले. पोलिसांनी आरोपी श्याम सुर्वानंद प्रसाद (वय २०) व आकाश उर्फ संतोष माणिक नाथ (वय २१, दोघेही रा. भारतनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी ही दुचाकी पुंडलिकनगर गल्ली क्रमांक १ येथून एक मे रोजी चोरल्याची कबुली दिली. दुचाकी चोरीचा मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना दुचाकीसह मुकुंदवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, विलास वाघ, अशोक नागरगोजे, देविदास इंदोरे, फेरोज पठाण, सुनेश कुसाळे, प्रभाकर राऊत आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमिनाबीचा मारेकरी पोलिसांना सापडेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिटमिटा जंगलात मेंढपाळ महिला अमिनाबीच्या खूनप्रकरणाला तब्बल आठ महिने उलटले आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी अद्याप पोलिसांच्या जाळ्यात सापडला नाही. त्यामुळे हे प्रकरण थंड्या बस्त्यात पडल्याचे दिसत आहे.

२९ ऑगस्ट २०१४ रोजी मिटमिटा येथील जंगलामध्ये अमिनाबी शेख मुश्ताक या मेंढपाळ महिलेची हत्या करण्यात आली होती. बलात्कारानंतर त्यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीवरून गणेश गायकवाड या तरूणावर संशय व्यक्त करण्यात आला होता. घटना घडल्यापासून गणेश गायकवाड हा पसार झाला आहे. तो वीटभट्टीवर मजुरी काम करत होता. पोलिसांनी औरंगाबादसह जवळच्या जिल्ह्यांत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. या प्रकरणाला आठ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. पोलिसांच्या तपासावरून आता हे प्रकरण थंड्या बस्त्यात पडल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नंबर प्लेट करताना मालकाची खात्री करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुन्हे शाखेने पकडलेल्या दोन दुचाकीचोरांनी रेडियमच्या दुकानातून बनावट नंबर टाकून घेतल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी नंबर प्लेट तयार करणाऱ्या दुकानदारांना मूळ वाहनमालक असल्याची शहानिशा करूनच नंबर टाकून देण्याची सूचना केली आहे.
गुन्हे शाखेने पाच दिवसांपूर्वी दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांनी ही दुचाकी सिडकोतून चोरल्याची कबुली दिली आहे. सौरभ नाना वानखेडे (वय १९, रा. त्रिवेणीनगर, एन ७) याने सुनील दिगंबर दवणे (वय २१, रा. एम २, सिडको) याच्या मदतीने गुन्हा केला. या दोघांनी कटकटगेट येथील विनोद रेडियम आर्ट या दुकानात जुना नंबर (एम. एच. २५, व्ही. ५५८२) बदलून नवीन नंबर (एम. एच. २०, बी. एम. १६८५) टाकून घेतला. पोलिसांच्या चौकशीत ही माहिती उघड झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून पोलिसांनी वाहनांवर नंबर टाकून देणाऱ्या व रेडियम नंबर प्लेट तयार करणाऱ्या दुकानदारांना सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

दुकानदारांनी ही दक्षता घ्यावी

वाहनमालकाचे नाव, वाहनांच्या मूळ कागदपत्रांची खात्री करणे

वाहनमालकाचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांकांची रजिस्टरला नोंद करावी

वाहनमालकाच्या ओळखीचा पुरावा, वाहनाच्या कागदपत्राची एक प्रत दुकानदारांने घ्यावी

चित्र- विचित्र नंबर प्लेट तयार करणाऱ्या तसेच मालकांची माहिती न घेता नंबर प्लेट तयार करून देणाऱ्यांवर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यापुढे नियमांचे पालन न करता नंबर प्लेट तयार करून दिल्यास दुकानदारावर थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे.

- अविनाश आघाव, पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>