Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

३५ लाखांची मॅगी बाजारपेठेतून परत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मॅगीच्या उत्पादनावर देशभर बंदी आल्यानंतर कंपनीने औरंगाबादच्या बाजारपेठेतून साठा वापस मागविला आहे. दोन मुख्य वितरकांकडून दोन दिवसांत सुमारे ३५ लाख रुपयांची मॅगी पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेचा अहवाल दोन दिवसांत द्या, अशी नोटीस अन्न व औषध प्रशासनाने संबंधित विक्रेत्यांना बजावली आहे.

जिल्ह्यात मॅगी नूडल्सचे अनेक प्रकार आहेत. मात्र, मॅगी न्यूडल्स, मसाला मॅगी, मॅजिकल मसाला मॅगी, मॅगी हमरू या प्रकारांना जास्त मागणी आहे. शहरात गोमटेश मार्केटजवळ गौरी एंटरप्राइजेस हे मुख्य वितरक आहेत. त्यांच्यामार्फत शहरात आणि जिल्ह्यात मॅगीच्या साठ्याचे वितरण करण्यात येत असे. त्याशिवाय उपवितरक, किरकोळ विक्रेते अशी मोठी साखळी बाजारात आहे. दरम्यान, सध्या मॅगीवर बंदी असल्याने कोणत्याही लहान, मोठ्या दुकानात माल आढळून आल्यास विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषधी प्रशासनाने दिला आहे.

दोन दिवसांत सुमारे ३५ लाखांचा माल परत पाठवण्याची प्रक्र‌िया सुरू झाली आहे. हा आकडा आणखी दोन दिवसात वाढू शकेल.

- अमित मुंदडा, संचालक, गौरी एंटरप्राइजेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कडक नियमांमुळे कंत्राटदारांची पाठ

$
0
0

मकरंद कुलकर्णी, औरंगाबाद

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागात १७ बंधारे मंजूर करण्यात आले. आर्थिक घोटाळ्यांचा अनुभव पाहता राज्य सरकारने या योजनेसाठी अत्यंत कडक नियम केले आहेत. त्यामुळे कंत्राटदारांनी बहुतांश कामांकडे पाठ फिरविली आहे. अनेक कामांसाठी तीनवेळा निविदा काढाव्या लागल्या.

दुष्काळाचा सामना करताना राज्य सरकारने जलयुक्त शिवार ही योजना कार्यान्वित केली. त्या अंतर्गत गावे निवडून सिमेंट बंधारे तसेच जलस्त्रोत निर्मिती आणि पुनरुज्जीवनाची कामे करण्यात येणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात २२८ गावे या योजनेसाठी निवडण्यात आली. पहिल्या टप्प्यात १७ गावांमधून सिमेंट बंधारे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन कोटी २४ लाखांचा निधी मंजूर झाला. योजनेच्या अंमलबजावणीसाठी कडक नियम तयार केल्याने अनेकांची गोची झाली आहे. तीन लाखांच्या वरच्या कामांसाठी इ टेंडरिंग करण्यात आले. एरवी कुठलेही काम घेताना कंत्राटदाराला अनामत रक्कम परत करण्यासाठी पाच वर्षांची अट टाकण्यात आली आहे. पूर्वी अशी अट नव्हती. या पाच वर्षांच्या कालावधीत बंधाऱ्याची दुरुस्ती असेल तर ती कंत्राटदारानेच करून द्यावयाची आहे. या कामांच्या तपासणीसाठी थर्ड पार्टी इन्स्पेक्शन असणार आहे.

कामाच्या तपासणीसाठीची समिती जिल्हा परिषदेच्या बाहेरील कार्यालयातील असणार आहे. त्यामुळे कामाची सूक्ष्म तपासणी होणार आहे. या अटींमुळे कंत्राटदारांना कुठेही कशाची 'सोय' राहिलेली नाही. परिणामी १७ बंधाऱ्यांच्या टेंडरसाठी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. दहा कामांच्या दोन ते तीन वेळा फेरनिविदा काढण्यात आल्या. काही कंत्राटदारांनी टेंडर भरताना मूळ रकमेच्या काही टक्के कमीने निविदा भरल्या. अशांना प्राधान्य देऊन त्यांची अनामत रक्कम डिमांड ड्राफ्टच्या स्वरुपात जमा करण्यात आली आहे. जेणेकरून कामे अर्धवट सोडून जाण्याचा प्रकारांना आळा बसणार आहे. एवढे कडक नियम केल्यामुळे कंत्राटदारांनी जलयुक्त शिवारच्या कामाकडे पाठ फिरविणेच पसंद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत तेजस्विनी सागर विजेती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिंगापूर येथे सुरू असलेल्या आशियाई बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पंधरा वर्षांखालील मुलींच्या गटात औरंगाबादच्या व्हेरॉक उद्योग समूहाच्या तेजस्विनी सागरने सुवर्णपदक पटकावले. याआधी सागरने ब्लिट्झ प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.

क्लासिकल बुद्धिबळपटू असलेल्या तेजस्विनीने आपले कौशल्य सिद्ध करताना ९ पैकी ७.५ गुणांची कमाई करून सुवर्णपदक पटाकावले. गेल्या सहा महिन्यात तेजस्विनीने ५ विजेतेपद पटकावले आहेत. तेजस्विनीने शेवटच्या फेरीत मंगोलियाच्या बटमुंख ओयुदरीला पराभूत केले. तेजस्विनी सोमवारपासून सिंगापूर येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत २० वर्षांखालील गटात खेळणार आहे. तेजस्विनीला रघुनंदन गोखले, विकास पलांडे, विशाल सरीन यांचे मार्गदर्शन मिळत आहे.तेजस्विनीची बहिण सिया हिने नऊ वर्षाखालील गटात सातवे स्थान मिळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनवर असुविधांचा कळस

$
0
0

अब्दुल वाजेद, औरंगाबाद

ऐतिहासिक औरंगाबाद नगरीतील रेल्वे स्टेशनवरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, स्टेशनवरील सुविधांचा बोजवारा उडाला आहे. बंद पडलेली लिफ्ट, अवैध विक्रेत्यांची वाढलेली संख्या, कमी बुकिंग काऊंटर, पाण्याचा गोरखधंदा, कर्मचाऱ्यांना अत्यल्प सुविधा आदी गैरसोयींनी कळस गाठला आहे. प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्याकडे रेल्वे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

दक्षिण मध्य रेल्वेने ग्राहकांच्या सुविधेबाबत पंधरवाडा जाहीर केला. या काळात विविध सुविधा वाढविण्याबाबत, स्वच्छतेकडे, अभियान यशस्वी करण्याकडे लक्ष देण्यात येत आहे. मात्र, औरंगाबादमधील 'अ' दार्जाच्या रेल्वे स्टेशनवर यातला एकही प्रयोग होताना दिसत नाही. येथून दररोज १७ रेल्वे धावतात. आठवड्याच्या विशेष रेल्वेसह मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेची संख्या ३० झाली आहे. दररोज धावणाऱ्या सचखंड, तपोवन, नंदीग्राम, देवगिरी, अजिंठा, जनशताब्दी गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. नगरसोल नरसापूर, काकीनाडा, विजयवाडा, शिर्डी-साईनगरच्या गाड्या फुल्ल असतात. रामेश्वर ओखा, हैदराबाद अजमेर, नांदेड मनमाड पॅसेंजर, औरंगाबाद हैदराबाद पॅसेंजरमधून जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. रेल्वेची संख्या वाढवली गेली. मात्र, सुविधांचा विकास झाला नाही. मॉडेल रेल्वे स्टेशन करण्याची घोषणा सरकारने केली. या अंतर्गत मुख्य इमारतीचे काम करण्यात आले. त्या ठिकाणी पाच बुकिंग कॉऊंटर, फूड प्लाझा आदी सुविधा दिल्या. मात्र, इतर सुविधांकडे दुर्लक्ष झाले. एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाताना वृद्ध, महिला आणि अपंगांना त्रास होऊ नये म्हणून लिफ्ट सुरू करण्यात आली, पण वारंवारच्या तांत्रिक अडचणीमुळे ही लिफ्ट बंद असते. रेल्वे स्टेशनवर एकूण २०० कर्मचारी काम करतात. मात्र, त्यांना बसण्यासाठी ना धड खुर्च्या आहेत. ना शौचालयाची सोय. त्यामुळे हे कर्मचारी प्रवाशांच्या सुविधांचा वापर करतात.

महिला कर्मचारी त्रस्त

सध्या रेल्वे स्टेशनवर जवळपास बारा महिला कर्मचारी आहेत. यातील काही महिला कर्मचारी चौकशी केंद्रावर, तर काही इतर ठिकाणी काम करतात. या कर्मचाऱ्यांना पाणी, शौचालयाची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनाही या साऱ्या सोयीसाठी प्रवाशांसाठी असलेल्या सार्वजनिक सुविधांचा वापर करावा लागतो.

पिट लाइनचे भिजत धोंगडे

रेल्वे स्टेशनवरून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्याची मागणी स्थानिक रेल्वे संघटनेने केली. मात्र, औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर पिट लाइन नसल्याचे कारण दाखवून या गाड्या नाकारल्या जातात. स्टेशनवर पिट लाइनसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या जागेवर पिट लाइन करण्याच्या कामाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

सुट्यांत विशेष रेल्वे नाही

यंदाच्या उन्हाळी सुटीत दक्षिण मध्य रेल्वेने काचिगुडा, शिर्डी विशेष रेल्वेसह अन्य रेल्वे दक्षिणेत सोडल्या. मात्र, औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून यंदा एकही नवीन विशेष रेल्वे सेवा सुरू केली नाही. उलट मराठवाडा एक्सप्रेसचा एसी कोच बंद केला. तसेच मुंबई जनशताब्दीचे दोन कोच एक जूनपासून बंद करण्यात आले.

१५ वर्षापूर्वींची कर्मचारी संख्या

रेल्वे विभागाने औरंगाबाद रेल्वे स्टेशनसाठी १५ वर्षांपूर्वी कर्मचारी संख्या मंजूर करण्यात आली. या १५ वर्षांत रेल्वेची संख्या वाढली, प्रवासी वाढले. मात्र, कर्मचाऱ्यांची संख्या वाढली नाही. स्टेशनवरील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांपासून ते सर्व विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. २०१५ नुसार या कर्मचारी संख्येत ५० टक्के वाढ होण्याची गरज आहे. मात्र, ती वाढ झाली नाही. त्यामुळे सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण दुपटीने वाढला आहे.

बुकिंग काऊंटरची संख्या कमी

रेल्वे स्टेशनवरून दररोज साडेदहा हजार तिकिटांचे बुकिंग केले जाते. १६ कर्मचारी हे काम करतात. तीन शिफ्टमध्ये तिकीट बुकिंग सुरू असते. त्यासाठी सहा बुकिंग काऊंटर आहेत. सध्या एका बुकिंग काऊंटरवरील खुर्ची तुटली आहे. त्यामुळे पाच बुकिंग काऊंटरवरून तिकीट बुकिंग सुरू असते. रेल्वेच्या नियमानुसार एका बुकिंग काऊंटरने ८०० तिकिटांची बुकिंग करावी. मात्र, या‌ ठिकाणी कामाचे लोड वाढल्यामुळे जास्त बुकिंग करावे लागते. सध्या रेल्वे स्टेशनवर वाढलेल्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता १४ तिकीट काऊंटरची गरज आहे, पण काऊंटर कमी असल्यामुळे स्टेशनवर तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांचा भल्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसतात. नांदेड, मनमाड, पूर्णा येथे असलेली रनिंग रूमची सुविधा औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर नाही. त्यामुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी विश्रांती करायची कुठे, असा प्रश्न असतो.

सुरक्षेचे तीनतेरा

रेल्वे स्टेशनवर सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहेत. स्टेशनच्या नवीन इमारतीत अजूनही सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नाहीत. मेटल डिटेक्टर आणि स्कॅनरची सुविधा नाही. जीआरपी आणि आरपीएफ कर्मचारी संख्या कमी आहे. त्यामुळे स्टेशनवर चोरींच्या घटनेत वाढ झाली आहे. दक्षिणेतून येणाऱ्या गाड्यांमध्ये तिकीट तपासणी अधिकारी असतात. मात्र, औरंगाबाद येथून जाणाऱ्या गाड्यांत हे अधिकारी नसतात. त्यामुळे अनेक प्रवासी रिझर्व्हेशन नसतानाही आरक्षित डब्यातून प्रवास करतात. त्यामुळे अजमेर, तपोवन, नंदीग्राम, देवगिरी सारख्या गाड्यांमध्ये प्रवाशांना सुरक्षा मिळत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजपुरवठा खंडित; शहरात निर्जळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फारोळा, नक्षत्रवाडी येथील वीजपुरवठा रविवारी सायंकाळी खंडित झाला. त्याचा फटका पाणीपुरवठ्यास बसला आहे. रविवारी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे अनेक वसाहतींना पाणीपुरवठा झाला नाही. दरम्यान सोमवारीही शहरवासीयांना निर्जळी घडणार आहे. त्यामुळे अर्ध्या औरंगाबादमध्ये सलग पाचव्या दिवशी पाण्यावाचून हाल सहन करावे लागणार आहेत.

रविवारी दुपारी चार वाजून २० मिनिटांनी फारोळा आणि नक्षत्रवाडी येथे वादळी वारे आणि पाऊस झाला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. एक तासानंतर फारोळा येथील वीजपुरवठा पूर्ववत झाला. त्यानंतर फारोळा येथील नवीन व जुने पंप सुरू झाले. मात्र, नक्षत्रवाडी येथील दोन्ही फिडर (हर्सूल आणि वाळूज ) बंद असल्यामुळे नक्षत्रवाडीचा वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. परिणामी शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी ५६ एमएलडी पंपिग बंद आहे. १०० एमएलडीने पाणीपुरवठा सुरू आहे, असे औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. फारोळा येथे एक तासाचा खंड पडल्यामुळे आणि नक्षत्रवाडी येथील दोन्ही फिडर बंद असल्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर परिमाण झाला आहे. रविवारी सायंकाळी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा करण्यात येणार होता. तो झाला नाही. सोमवारीही बहुतांश भागात पाणीपुरवठा होणार नाही. आधीच तीन दिवसांआड म्हणजे पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक गेल्या महिनाभरापासून त्रस्त आहेत.

अर्ध्या शहराला फटका

शहागंज, दिल्लीगेट, विश्वभारती कॉलनी, सिडको एन पाच आणि सिडको एन सात या जलकुंभावरून अर्ध्या शहरात पाणीपुरवठा होतो. रविवारी पावसामुळे वीज गुल झाल्याचा फटका या जलकुंभाअंतर्गत येणाऱ्या सर्व वसाहतींना बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक दाखवा; मग प्रवेश द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातंर्गत पूर्णवेळ पात्र शिक्षक नसलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या कॉलेजांमध्ये यंदा प्रवेश रोखण्यात येणार आहेत. 'पूर्णवेळ पात्र शिक्षक दाखवा अन् मग प्रवेश द्या,' असे पत्र विद्यापीठाने कॉलेजांना पाठविले आहेत.

विद्यापीठातंर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा अक्षरशः बाजार मांडला गेला आहे. विद्यापीठाशी सलंग्न पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या कॉलेजांची संख्या तब्बल १५२ आहे. शिक्षकाविना ही कॉलेज सुरू आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या कॉलेजांमध्ये पात्र शिक्षकांची संख्या केवळ १५ एवढी आहे.

विद्यार्थी अन् प्राध्यापकांचे समिकरण कोणत्याच नियमात बसत नाहीत. एम.ए. , एम.एस्सी., एम.कॉम., एम.ई., एम.टेक. आदी विषयांना पात्र शिक्षकांची नेमणूकच करण्यात आली नाही. नियमानुसार पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एका विषयासाठी सहा पूर्णवेळ शिक्षकांची आवश्यकता असते. परंतु अशा कॉलेजामध्ये पूर्णवेळ पात्र शिक्षक केवळ बोटावर मोजण्याएवढे आहेत. या कॉलेजांवर कारवाईबाबत विद्यापीठाने संकेत दिले असून पात्र शिक्षक नसलेल्या कॉलेजांचे २०१५-१६ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश थांबविले जाणार आहेत. कॉलेजांना तशा प्रकारचे पत्र विद्यापीठाने पाठविले आहे.

'एमकेसीएल'ची बैठक

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी यंदा विद्यापीठ क्रेडिट बेस ग्रेडिंग सिस्टीम राबविणार आहे. पण कॉलेजांत पात्र शिक्षक नसल्याने 'क्रेडिट बेस ग्रेडिंग सिस्टीम' कशी राबविणार, असा प्रश्न आहे. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने कॉलेजांना पूर्णवेळ शिक्षक भरण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवेश प्रक्रियेबद्दल एमकेसीलएलच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पात्र शिक्षक नसलेल्या कॉलेजांचे अर्ज स्वीकारू नयेत, अशी सूचना देण्यात आल्या आहेत.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या कॉलेजांमध्ये पात्र शिक्षक नाहीत, ही बाब गंभीर आहे. जेथे आवश्यक शिक्षक नाहीत, अशा कॉलेजांमधील प्रवेश अर्ज स्विकारले जाणार नाही. कॉलेजांनी पात्र शिक्षक भरल्यानंतरच प्रवेश द्यावेत अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

डॉ. बी.ए. चोपडे, कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट पेपर १५ लाखांना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) बनावट पेपर १५ लाखांना विकणाऱ्या टोळीतल्या १४ जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. कर सहायक परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती रविवारी गुन्हेशाखेला मिळाली होती. त्यानुसार सिडको एन. ४ भागातील प्लॅटवर पहाटे धाड टाकून कारवाई करण्यात आली. यात प्रश्नपत्रिका पाठविणारा सोलापूरचा आरोपी पसार आहे.

रविवारी एमपीएससीची परीक्षा होती. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा संच फुटल्याची माहिती पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांना मिळाली. पहाटे एन ४, समृध्दीनगर येथील पौर्णिक अपार्टमेंटमध्ये छापा टाकला. यावेळी पोलिसांना १४ जण प्रश्नपत्रिका संचासह प्रश्नपत्रिका सोडविताना आढळले. पोलिसांनी प्रमुख आरोपी प्रतापसिंग महाजन काकरवालसह (तळेगाववाडी ता. भोकरदन) इतरांना अटक केली. आरोपीच्या ताब्यातून मोबाइल, संगणक, लॅपटॉप, कार्डरिडर, पुस्तके, प्रश्नपत्रिका संच, कार आदी साहित्य जप्त केले. आरोपीविरुध्द मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक ‌अविनाश आघाव, मधुकर सावंत, गौतम पातारे, सहायक पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उन्मेश ‌थिटे, अनिल वाघ यांनी केली.

खरी प्रश्नपत्रिका म्हणून विक्री

सोलापूर येथील श्रीनिवास नागनाथ बनसोडे याने व्हॉटस अॅपवर प्रश्नपत्रिका पाठवल्याचे समोर आले आहे. काकरवाल व साथीदारांनी ही प्रश्नपत्रीका खरी असल्याचे परीक्षार्थींना भासवले. यामध्ये १२ ते १५ लाख रुपये रेट ठरविला. एन ४ येथे त्यांना शनिवारी बोलावून घेतले. प्रश्नपत्रिकेचा संच परीक्षार्थींना दिला. त्यांचे मोबाइल काढून घेतले. प्रश्नपत्रिका दिल्यानंतर बाऊंसर म्हणून असलेले गणेश मैंद व रामेश्वर पवार यांना बाहेर जाण्यासही मनाई केली.

...हे अटकेत

प्रतापसिंग काकरवाल (तळेगाववाडी ता. भोकरदन), मिर्झा मोहसीन मंजूर अहेमद (वानखेडेनगर), अर्जुन भरत बमनावत (जटवाडा रोड) यांच्यासह परीक्षा‌र्थी कृष्णा चैनसिंग मारक (सह्याद्री हिल्स, शिवाजीनगर), ओमनाथ उर्फ किशोर काशिनाथ राठोड (जटवाडा रोड), संदीप कचरू मातेरे (सिल्लोड), दत्तात्रय भुजंगराव गोराडे (म्हसला ता. सिल्लोड), संदीप रामराव शिंदे,( सिल्लोड), भानुदास पुंडलिक बोर्डे (टी.व्ही. सेंटर), रोहित पुंजाराम गिरी (नारेगाव), नीलेश चिंतामन वाघ (हनुमाननगर), भोलेशंकर सुधाकर साबळे (शिवाजीनगर) यांच्यासह बाऊंसर गणेश पूनमचंद मैंद (जयभवानीनगर) व रामेश्वर अण्णा पवार (हर्सूल) यांचा समावेश आहे.

लोकसभेचा उमेदवार

टोळीचा सूत्रधार प्रतापसिंग काकरवाल याने गेल्या वर्षी जालना लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, यामध्ये त्याचा पराभव झाला होता. महासम्राट शेतकरी बळीराजा संघटनेचा तो जिल्हाध्यक्ष असल्याचे व्हिजिटिंग कार्ड देखील पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केले.

तीन सदस्यांच्या तपासणीत पोलिसांनी हस्तगत केलेली प्रश्नपत्रिका व परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांमध्ये कोणतेही साम्य आढळले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला याबाबतचा अहवाल आणि हस्तगत केलेल्या प्रश्नपत्रिकेचा संच पाठविला आहे.

- वीरेंद्रसिंह, जिल्हाधिकारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सूनपूर्व तडाख्यात ७ ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाची चातकासारखी वाट पाहत असलेल्या मराठवाड्याला रविवारी मान्सूनपूर्व पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून लातूरमध्ये ३, बीडमध्ये २ आणि औरंगाबाद, नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एक असे एकूण ७ जण ठार झाले. या तडाख्याने अनेक घरांची पडझड झाली असून म्हैस, शेळ्या, बैलांचाही मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सिल्लोड तालुक्यातील बाळापूर सजामधील पिंपळदरी वडगाव गावात वीज पडून १ जण ठार झाला, तर घारदोन परिसरामध्ये एका घरावर विजेचा खांब कोसळल्याने घराची पडझड झाली. अनेक शाळेवरील पत्रे उडाल्याची घटना घडली. पैठण तालुक्यात वरवंडी गावामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे १० ते १२ घरांवरील पत्रे उडाली. खुलताबाद, कन्नड, फुलंब्री, वैजापूर, वाळूज आणि गंगापूर या भागात सायंकाळी चार ते सहा दरम्यान पावसाने हजेरी लावली. जालना जिल्ह्यालाही मान्सूनपूर्व पावसाने झोडपले. लातूर जिल्ह्यात दुपारी चारनंतर पावसाला सुरुवात झाली. विविध ठिकाणी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'महादू सटवा नामवाड (रा. हळद वाढवणा), अमोल अप्पाराव नागरगोजे (ता. जळकोट) गोपीनाथ नागोराव गायकवाड (रा. डाउळ हिप्परगा ता. उदगीर) या तिघांचा शेतात जनावरे चारायला गेल्यानंतर वीज पडून मृत्यू झाला. मदन मद्देवाड (रा. तिरुका) यांची म्हैस वीज पडल्यामुळे दगावली.

बीड जिल्ह्यातील नांदगावतांडा (ता. अंबाजोगाई) येथे दुपारी चारच्या सुमारास वीज पडल्याने शेतात काम करताना लिंबदेव दगडू राठोड हा शेतकरी मृत्यूमुखी पडला. गेवराई तालुक्यातील रामनगर येथे घराची भिंत पडल्याने संगीता रघुनाथ सानप ही महिला ठार झाली. केज तालुक्यातील हांगेवाडी येथे पांडुरंग आंधळे आणि आष्टी येथील सतीश गुंजाळ या शेतकऱ्याचा बैल, लोणी शाहजनपूर येथे बाबूराव माटे या शेतकऱ्याची म्हैस, शिरूर येथील सवासे वस्तीवर वीज पडल्याने दोन शेळ्या दगावल्या.

नांदेड जिल्ह्यातही पावसामुळे दाणादाण उडाली. देगलूर तालुक्यात वीज पडून एक जण ठार झाला, तर दरेगाव येथे एका बैलाचा मृत्यू झाला. परभणीमध्येही दिवसभर ढगाळ वातावरण होते. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी, आखाडा बाळापूर, वसमत तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावली.

मान्सून स्थिर

नैऋत्य मोसमी पाऊस सध्या ईशान्य भारतातच स्थिर आहे. येत्या ४८ तासात मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात व कर्नाटकच्या आणखी काही भागात, उर्वरित तमिळनाडू, रायलसीमा व आंध्र प्रदेशाची किनारपट्टीचा काही भाग आणि मध्य बंगालच्या उपसागाराचा काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांच्या जाहीर आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, यवतमाळ

सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे संकटात सापडलेला शेतकरी आत्महत्या करायला लागला आहे. आपल्या प्रश्नांचा गुंता सोडविण्यासाठी विष प्राशन आणि गळफास घेऊ लागला आहे. आजवर निर्जनस्थळी जावून आत्महत्या करणारा जिल्ह्यातील शेतकरी आता जाहीरपणे, सर्वांना सांगून आत्महत्या करायला लागल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसातील घटनांवरून हे स्पष्ट होत आहे. त्यातच शेतकरी आत्महत्यांमागे नापिकी किंवा शेतमालाला मिळणारे अत्यल्प भाव हे कारण नसल्याचा निष्कर्ष प्रधान सचिवांनी मांडल्याने संताप व्यक्त होत आहे.

आर्णी तालुक्यातील अंबोडा येथील बळीराम रामचंद्र चव्हाण (५८) यांनी घरावरून रस्त्यावर उडी मारली. डांबरी रस्त्या असल्याने डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले. लोणबेहळ, आर्णी व नंतर यवतमाळच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बळीराम यांनी आत्महत्या करीत असल्याचे साऱ्यांना सांगितले होते. पण, हा गमतीचा भाग वाटल्याने कुणीही गांभीर्याने घेतले नाही. त्यांचा बळी गेला. माजी सरपंच असलेल्या बळीराम यांनी जिल्हा बँकेतून ५० हजार रुपयांचे कर्ज 'गोटफार्म'साठी घेतले होते. व्यवसाय चालला नाही. कर्ज वाढून तीन लाख ६० हजारांवर गेले. खासगी कर्जही वाढत गेले. आता कुठलाही मार्ग दिसून येत नसल्याने त्यांनी आत्महत्या केली.

दुसरी घटना यवतमाळ तालुक्यातील घाटाणा येथे घडली. शेतकरी बाबूलाल राठोड (६०) यांनी न्यायालयाच्या आदेशाने शेतीचा ताबा घेण्यासाठी आलेल्या महसूल व ठाणेदारासमोरच विष प्राशन केले. त्यांचा शुक्रवारी यवतमाळच्या सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. काही वर्षांपूर्वी बाबुलाल यांनी जमीन विकत घेतली होती. ही जमीन सिलींगची असल्याची बाब जमीन मालकाने दडवून ठेवली होती. पुढे या जमिनीचे वाटप दुसऱ्या भूमिहीन शेतकऱ्याला झाले. त्यांनी जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. पण, बाबुलाल यांनी विरोध केला. प्रकरण न्यायालयात गेले. अनेक वर्षे खटला चालला. अखेर बाबुलाल यांच्याविरोधात निकाल लागला. महसूल अधिकारी, ठाणेदार बाबुलाल यांच्या शेतावर धडकले. हा धक्का सहन न झाल्याने बाबुलाल यांनी आत्महत्या केली. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. गावकऱ्यांनी बाबुलाल यांचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवून आत्महत्येसाठी जबाबदार असलेले जमीनमालक, महसूल अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

पांढरकवडा तालुक्यातील घोडदरा येथील शेतकरी माधव तुकाराम गोडे यांनी 'मी आत्महत्या करीत आहे, पण इतर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी,' अशी चिट्ठी त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली होती. सततच्या नापिकीने कर्ज वाढत होते. यावर्षी निश्चित कर्जमाफी होईल, अशी आशा त्यांना होती. पण, कर्जमाफी न झाल्याने ते हादरले होते.

६० टक्के शेत पडीक राहणार

विदर्भातील ५० लाखांपैकी केवळ २० टक्केच मागील वर्षीच्या थकीत शेतकऱ्यांना पीक कर्ज पुनर्वसन योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून सतत नापिकी, दुष्काळ व अतिवृष्टीचा मार सहन करणारे ४० लाख तणावग्रस्त शेतकरी सावकारांच्या दारावर जातील. त्याचा परिणाम म्हणून ६० टक्के शेतात पेरणीच होणार नाही, असा धोका विदर्भ जनांदोलन समितीचे शेतकरी नेते किशोर तिवारी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार अट्टल आरोपी जेरबंद

$
0
0

जालनाः चोरी, घरफोडी आणि दुचाकी चोरी प्रकरणात जालन्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार अट्टल आरोपींना अटक केली. या आरोपींकडून चोरीच्या आठ दुचाकीसह सुमारे पाच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. जिल्ह्यातील चोऱ्या, घरफोड्या आणि दुचाकी चोऱ्यांसह इतर गुह्यांचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खबऱ्यांकडून मिळालेल्या महितीवरुन पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. राजसिंग शामसिंग कलानी(वय २२), शाहरुख जदगुल पठाण(वय २५), शेख माबूद शेख महेबूब (वय २५), कैलास राठोड (वय २२) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोरी आणि घरफोडी केल्याची कबूली दिली. यापैकी कैलास राठोड याने मंठा व रामनगर परिसरात चोरी आणि घरफोडीसह जिल्ह्यात आठ ठिकाणी मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले. अटक केलेल्या या सर्व आरोपींच्या ताब्यातून सोन्या-चांदीचे दगिने, किराणा सामान, मोबाइल आणि आठ दुचाकीसह एकूण चार लाख ९४ हजारांचा ऐवज जप्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रेल्वेच्या समस्या सोडविणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

आपण कोणत्याही घोषणा करत नाही, शिकार टप्प्यात आली की बिलकूल सोडत नाही. रेल्वेच्या प्रश्नावर पत्रकबाजी, उपोषणे रेल्वे संघर्ष समितिने करू नयेत. दुर्दैवाने नेहमीच उपोषण करण्याची वेळ तुमच्यावर अन् काम करण्याची माझ्यावर वेळ आली आहे. प्रश्न अनेक असून एक-एक करून सोडवण्याचा प्रयत्न करू असे मत खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.

जालना रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरण केलेल्या इमारतीचे उद‍्घाटन आणि नियोजित लिफ्टचे भूमिपूजन सोमवारी करण्यातआले. या कार्यक्रमप्रसंगी खासदार दानवे हे बोलत होते. जालनेकरांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी सोमवारी पूर्ण झाली आहे. जुने सगळे बदलले आणि नवीन रेल्वे स्थानक निर्माण झाले आहे. आता लवकरच जनशताब्दी एक्स्प्रेस जालन्यातून धावणार आहे. गेल्या ६५ वर्षांत केंद्र सरकारकडून जालन्याला एकही प्रकल्प मिळालेला नाही. आता चाळीस हजार कोटी रूपयांचा ड्रायपोर्ट मंजूर झाला असल्याचे दानवे यांनी सांगितले. रेल्वे स्थानकाच्याविरूद्ध दिशेला असलेल्या नागरी वसाहतीमध्ये जाण्याचा भूयारी मार्ग उभारणीसाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा केली आहे. केंद्र सरकार ५० लाख रुपये देण्यास तयार आहे. राज्य सरकारकडून ५० लाख रुपये मंजूर करून घेण्यात येतील. त्यानंतर ह्या भूयारी मार्गाचे काम लवकरच सुरू केले जाईल, असे दानवे यांनी सांगितले. प्रास्ताविक रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पी. सी. शर्मा यांनी केले. दक्षिण मध्य रेल्वे चे जनरल मॅनेजर पी. के. श्रीवास्तव यांनी स्वागत केले. सोलापूर ते जळगाव ह्या रेल्वे मार्गाचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे आहे. हा रेल्वे मार्ग होणार आहे. याच शब्दात खासदार दानवे यांनी माहिती दिली. हा मार्ग जालन्याहून जाणार की नाही? या प्रश्नाचे सरळ उत्तर त्यांनी चक्क टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडीमध्ये दागिने लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

येथील सहयोग नगरातील एका घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेल्या सोन्याचे दागिन्यासह ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

सहयोग नगर येथील माधव दुधमल हे त्यांच्या मुलाबाळासह घराचे छतावर झोपले होते. यावेळी चोरटयाने त्यांच्या घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश केला.त्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व एक मोबाइल असा ६२ हजार ५०० रुपयांचा माल चोरुन नेला. हा प्रकार सोमवारी सकाळी उठल्यानंतर दुधमल यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी माधव दुधमल यांनी दिलेल्या फिर्यादवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नोंद झाला आहे. या चोरीचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेणा नदीत २४ कोटी लिटर पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

रेणापूर तालुक्यातील रेणा नदीच पुनरुज्जीवन आर्ट ऑफ लिव्हिंग आणि शेतकऱ्यांच्या लोकसहभागातून करण्यात आले आहे. या नदीच्या पात्राची लांबी तब्बल तीन किलोमिटर इतकी आहे. आता ‌हे पात्र ३५ फुट खोल १३५ फुट रुंद करण्यात आले आहे. याकामासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि रेणापूरातील शेतकऱ्यांचा लोकसहभाग महत्वाचा ठरला. रविवारी एकाच दिवसात या नदीच्या पात्रात सात फूट पाणी साठले आहे. या पात्रात २४ कोटी लिटर पाणी साठले असल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगचे मकरंद जाधव यांनी दिली.

रेणा नदीच्या या कामासाठी आतापर्यंत सत्तर लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यामध्ये रेणापूरातील शेतकऱ्यांनी ३५ लाख रुपये एकत्र केले आहेत. नदीच्या खोलीकरणातून निघालेल्या गाळातून पडीक असलेली ४० एकर जमीन लागवडी योग्य झाली आहे. त्यामुळे पाणी सोबतच जमीन ही नव्याने तयार झाल्याचा शेतकऱ्यांना आनंद आहे. या नदीच्या पात्रात पाणी कायमस्वरुपी टिकून राहण्यासाठी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी विशेष बाबा म्हणून गॅबीयन पद्धतीचे दोन बंधारे मंजूर केले आहेत. त्याच भूमिपूजन जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

रविवारी झालेल्या पहिल्याच पावसात रेणा नदीला पाणी आले आहे. नदीच खोलीकरण केले असल्यामुळे नदीच्या पात्रात सात फूट पाणी साठले आहे. हे एकूण २४ कोटी लिटर असल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगचे मकरंद जाधव यांनी दिली. नदी पात्रातील पाणी पाहून शेतकरी आनंदून गेले आहेत. आगामी काळात अशाच प्रमाणात पाणी टिकले तर कायमस्वरुपी दुष्काळग्रस्त असलेला रेणापूर परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीच्या निकालात मुलींचाच वरचष्मा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. लातूर बोर्डात उस्मानाबाद जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आला. लातूर जिल्ह्याचा निकाल ८६.३८ टक्के इतका लागला. यामध्ये लातूर जिल्ह्याचा निकाल ९०.४८ टक्के, उस्मानाबाद जिल्ह्याचा ८८.४७ टक्के तर नांदेड जिल्ह्याचा निकाल ८१.१३ टक्के इतका लागला आहे.

लातूर बोर्डात उस्मानाबाद जिल्ह्यातील ४१२ शाळातून २१ हजार ९२० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये ११९०३ मुले तर १० हजार १७ मुली होत्या. यापैकी २१ हजार ७९६ जणांनी परीक्षेला हजेरी लावली. यामध्ये ११ हजार ८१८ मुले तर ९ हजार ९७८ मुली होत्या. यापैकी १९ हजार २८४ जण उत्तीर्ण झाले. उत्तीर्णमध्ये १० हजार १७६ मुले तर ९ हजार १०६ मुली आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८६.१२ टक्के तर मुलींचे प्रमाण ९१.२६ टक्के इतके आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात उत्तीर्ण झालेल्या २१ हजार ७९६ विद्यार्थ्यांमध्ये ४ हजार ५६५ विद्यार्थी हे विशेष प्राविण्य मिळवित उत्तीर्ण झाले आहेत. तर सात हजार विद्यार्थी हे उस्मानाबाद शहरातील तेरणा पब्लिक स्कूल आणि विद्यामाता या इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. तर उद्ध्वराव पाटील कन्या प्रशाला ९६.८८ टक्के, श्रीपतराव भोसले हायस्कूल ९३.२९ टक्के, छत्रपती शिवाजी हायस्कूल ९३.१८ टक्के, जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूलचा ६३.२८ जिल्हा परिषद हायस्कूल उस्मानाबादचा ४१.८६ टक्के इतका निकाल लागला. सर्वात कमी निकाल उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचा २१.४३ टक्के इतका लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूर विभागाची घसरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा लातूर विभागाचा निकाल ८६.३८ टक्के लागला. लातूर विभागात लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्याचा निकाल अवघा ८१ टक्के लागल्यामुळे विभागाच्या सरासरी निकालावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे यावेळेस लातूर विभागाची घसरण झाली आहे.

लातूर विभागात एकूण एक लाख १६ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. प्रत्यक्षात ९९ हजार ३९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या मध्ये उत्तीर्ण झालेल्याची संख्या ८५ हजार ८८६ आहे. या मध्ये मुलीचे प्रमाण हे ८८.१५ टक्के असून मुलांचे प्रमाण हे ८४.९७ टक्के आहे. लातूर विभागाच्या निकालच वैशिष्ट म्हणजे उत्तीर्ण या वर्गवारीतील मुलांची संख्या कमी असून विशेष गुणवत्ता प्राप्त मुलांची संख्या अधिक आहे.

लातूर विभागातील जिल्हानिहाय निकाल पुढील प्रमाणे आहे. लातूर जिल्ह्यातील३८ हजार ७४३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३५ हजार ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी दहा हजार ६ इतके आहेत. ग्रेड एकमध्ये १३ हजार ३०, ग्रेड दोन मध्ये नऊ हजार ५९८ तर पास ग्रेडमध्ये अवघे दोन हजार ३८८ विद्यार्थी आहेत. जिल्ह्याचा सरासरी निकाल ९०.४८ टक्के आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील २१ हजार ७९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १९ हजार २८४ विद्यार्थी यशस्वी झाले. त्यामध्ये विशेष प्राविण्यासह चार हजार ५५६, ग्रेड एकमध्ये सात हजार, ग्रेड दोन मध्ये एक हजार ६३८, पास ग्रेडमध्ये मात्र तब्बल १९ हजार २८४ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

जिल्ह्याचा सरासरी निकाल ८८.४७ टक्के लागला आहे.

नांदेड जिल्ह्यातील ३८ हजार ८५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३१ हजार ५२५ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. त्यामध्ये अवघे सहा हजार ४३९ विद्यार्थ्यी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.

अनुदान बंद करण्याची सूचना करणार

लातूर विभातील नऊ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. ज्या शाळांचा निकाल शून्य टक्के लागतो त्या शाळेतील शिक्षकांसाठी प्रबोधन वर्ग मंडळातर्फे घेतले जातात. या ही वर्षी वर्ग घेतले जातील. परंतु या शाळाचे अनुदान बंद करण्याविषयीची सूचना शिक्षण उपसंचालकांना करण्यात येणार असल्याची माहिती लातूर विभागीय मंडळाचे सचिव सचिन जगताप यांनी पत्रकारांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१५ वर्षांपूर्वींच्या कर्जाची वसुली करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २००० मध्ये जिल्हा परिषदेच्या पतसंस्थेला कलर टिव्हीच्या वाटपासाठी कर्ज दिले होते. या कर्जप्रकरणी नांदेड येथील सहकार न्यायालयाच्यावतीने अपेट कोर्टाने सहकारी बँकेचा दावा फेटाळला आहे. व्याजासह तीन कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम परत भरण्याचे आदेश जारी केले आहेत. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वाटप समितीने सहकारी पतपेढी शिक्षण विभाग, व जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडून मागणी केलेली नसताना सुद्धा संस्थेच्या दोन पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन दीड कोटी रुपयाचे कर्ज मंजूर केले होते. तत्कालीन अध्यक्ष नारायण कदम व उपाध्यक्ष विक्रम कांबळे यांनी बँकेच्या कर्ज वाटप समितीशी संगनमत करुन हे कर्ज सभासदांसाठी मंजूर केले होते. मात्र, त्याच दिवशी पतसंस्थेच्या नावे वेगळे खाते उघडून कर्जाची रक्कम नविन खात्यात वर्ग करण्याचा अनोखा डावही रचला. कर्ज वाटप समितीमध्ये असलेल्या चेअरमन मोहनराव पाटील-टाकळीकर, भगवानराव पाटील, गंगाराम पोशट्टी ठक्करवाड, नामदेवराव केशवे, गंगादेवी केसराळे यांनी हा ठराव मंजूर केला होता. विशेष म्हणजे सभासदांना कलर टिव्ही मिळाले नसताना पतसंस्थेने मात्र, सभासदाकडून सदरच्या कर्जाची वसुली सुरू केली.

बँकेने व पतसंस्थेने अनेक सदस्यांना नोटीसा पाठविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बँक बचाव समितीचे डॉ. डी. आर. देशमुख, प्रकाश पोफळे, नागोराव जाधव, शामराव सुनेगावकर यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. या प्रकरणात अॅड. किशनराव शिप्परकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलास डबा देऊन परतणाऱ्या पित्याचा मृत्यू

$
0
0

वाळूज : पावसापासून बचाव करण्यासाठी घाणेगाव येथील जलकुंभाच्या आडोशाला थांबलेल्या एकाचा हौदात पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (८ जून) उघडकीस आली. वाळूज येथील एका कारखान्यात काम करणाऱ्या मुलाची रात्रपाळी असल्याने घाणेगाव येथील पोपट देवराम कोरडे (वय ४२) हे त्याला रविवारी जेवणाचा डबा देण्यासाठी गेले होते. डब्बा देऊत परत येत असताना पाऊस वाढल्याने ते घाणेगाव येथील एका जलकुंभावरील शेडच्या आडोशाला थांबले. त्यांना अधांरात तेथील हौदाचे झाकल लक्षात अाले नाही. त्यात पडून कोरडे यांचा मृत्यू झाला. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. घाणेगाव येथील पोलिस पाटलांने ही माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कोरडे यांचा मृतदेह बाहेर काढून घाटी हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टेमसाठी पाठविला. या घटनेची नोंद एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अक्समात मृत्यू म्हणून घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विना परवाना लकी ड्रॉ चालवणारे चौघे गजाआड

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विना परवाना लकी ड्रॉ चालवणाऱ्या चौघांना जिन्सी पोलिसांनी अटक केली. बारी कॉलनी येथे रविवारी ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र लॉटरी कायद्यानुसार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारी कॉलनी येथील हमीद हॉल येथे तीन जण लोकसेवा मल्टी कार्ड छापून लोकांना वाटत होते. यांच्याकडून महिन्याला ठराविक रक्कम घेऊन दर महिन्याला विना परवाना लकी ड्रॉ काढण्यात येत होता. यासाठी कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. रविवारी हा लकी ड्रॉ काढण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीआधारे रात्री या ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी शेख महेमुद अब्दुल, शेख अन्वर शेख चांद, शेख सईद शेख वाहेद व फारूख अस्कर काजी यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून जमादार पठाण तपास करीत आहेत.

दुचाकीस्वार ठार

वाळूज ते औरंगाबाद रोडवर मुंबई चौफुलीजवळ दुचाकीला (क्रमांक एम एच २०-डीएल ३११९) अज्ञात वाहनाने धडक दिली. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनाचालकाविरूद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी पळवली

जोहरीवाडा येथील दीपक पाऊआ यांनी त्यांची दुचाकी (एमएच २० बीजे ५१६७) जैन मंदिरासमोर शनिवारी रात्री उभी केली होती. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी पळवून नेली. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीच्या समस्यांकडे पोलिस आयुक्तांचे लक्ष

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा तसेच ‌जवळपासच्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी घाटी हे सर्वात मोठे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये नेहमी होणारे डॉक्टर-पेशंट वाद तसेच पार्किंग व पोलिस चौकीची समस्या सोडवण्याकडे लक्ष देणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. तसेच विद्यार्थी वाहतुकीवर कडक उपाययोजना करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

घाटीमध्ये डॉक्टर व पेशंट यांच्यात वाद निर्माण होण्याच्या घटना घडतात. पोलिसांवरही याचा ताण पडतो. घाटी प्रशासनासोबत याबाबत एक बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये घाटीतील पोलिस चौकी, पार्किंग आदी समस्यावर उपाय योजना करण्यात येतील. तसेच चौकीमध्ये एमएलसी नोंदविल्यावर त्याची माहिती पोलिस ठाण्याला पाठवण्याची प्रक्रिया बंद करण्यात येणार असून इमेलवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळा लवकरच सुरू होणार आहे. विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आहे. यासाठी धोकादायक वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर केवळ किरकोळ दंडाची कारवाई न करता ठोस कारवाई करण्याचा इशारा आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला आहे. मुलांचे दप्तर, वॉटरबॅग देखील रिक्षामध्ये असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मास्टरमाईंड बनसोडे ताब्यात

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमपीएससीच्या ‌बनावट प्रश्नपत्रिका विक्री प्रकरणी वॉट्सअवर प्रश्नपत्रिका पाठवणाऱ्या सोलापूरच्या श्रीनिवास बनसोडेला गुन्हेशाखेने अटक केली. या संशयित आरोपीच्या मोबाइलमध्ये विविध प्रश्नपत्रिका, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉलतिकीटे आढळली आहेत. मंत्रालयात बनसोडेची उठबस असून त्याच्याकडे गेल्यावर्षी झालेल्या एमपीएससीच्या काही विद्यार्थ्यांची हॉलतीकीटे आढळली आहेत. या विद्यार्थ्यांची देखील चौकशी होणार आहे.

गुन्हेशाखेने रविवारी पहाटे एमपीएससीचा बनावट पेपर विकणाऱ्या टोळीला अटक केली होती. प्रमुख आरोपी प्रतापसिंग काकरवाल याच्यासह तेरा जणांना ताब्यात घेतले होते. हे आरोपी रविवारी होणाऱ्या कर सहायक परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत होते. पोलिसांनी या प्रश्नपत्रिकेची तपासणी केली असता ती बनावट असल्याचे आढळून आले.

दरम्यान, ही प्रश्नपत्रिका सोलापूर येथील श्रीनिवास नागनाथ बनसोडे याने वॉट्सअप वर पाठवल्याची स्पष्ट झाले. पोलिसांनी तात्काळ प‌थक रवाना करीत बनसोडेला ताब्यात घेतले. त्याच्या मोबाइलची पोलिसांनी तपासणी केली. यामध्ये त्याने पाठविलेल्या प्रश्नपत्रिकेसोबतच इतर स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, विविध विद्यार्थ्यांची हॉलतिकीटे तसेच मंत्री मंडळातील मंत्र्याच्या सहायकांचे मोबाइल क्रमांक आढळले.

बनसोडे याची मंत्रालयात ओळख असून त्याच्या सोलापूर येथील बँकखात्यामध्ये मोठ्या रक्कमेचे व्यवहार झाल्याची नोंद आहे. या प्रकरणी बनसोडे याची चौकशी करण्यात येणार आहे. एमपीएससीच्या पॅटर्नप्रमाणे त्याने ही प्रश्नपत्रिका कुठे तयार केली. यामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे याचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरिक्षक अविनाश आघाव यांनी दिली.

मागील वर्षीचे हॉलतिकीट आढळले

बनसोडे याच्या मोबाइलमध्ये गेल्यावर्षी एमपीएससी परीक्षा दिलेल्या परीक्षार्थींची हॉल तिकीटे आढळली आहेत. हे परीक्षार्थी सध्या कुठे आहेत. त्यांनी दिलेल्या परीक्षेमध्ये बनसोडेचा काही सहभाग आहे का याचादेखील तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरिक्षक आघाव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images