Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विद्यार्थ्यांनी केले तरुणाचे अपहरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करून सुटकेसाठी २५ हजार खंडणी मागणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी दोन तासांत जेरबंद केले. हा प्रकार भाग्यनगर भागात घडला. तरुणाला मेसेज पाठविल्यामुळे या तरुणाचे अपहरण करण्यात आले. त्याला खोलीत डांबून मारहाण करण्यात आली व मारहाणीचे व्हिडिओ शुटिंगही केले.

भाऊसाहेब कौतिक शेळके (वय २१, रा. म्हाडा कॉलनी, बन्सीलालनगर, मूळ रा. औरंगपूर, ता. पैठण) हा एका महाविद्यालयात 'बीसीए'च्या तृतीय वर्षात शिक्षण घेतो. मंगळवारी सायंकाळी त्याच्या खोलीवर चार तरुण आले. त्यांनी शेळकेला भाग्यनगर येथे एका खोलीवर नेले. तेथे तीन तरुण होते. या आरोपींनी, 'तू कॉलेजमधील मुलीला मेसेज का पाठवला,' असे म्हणत बेदम मारहाण करून त्याला खंडणी मागितली. काही वेळाने त्याला सोडून दिले. त्यानंतर शेळके याने क्रांतिचौक पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यांनी दोन तासांत आरोपी तुषार राहणे, किरण थोटे, संदीप कुटे, ओम घेवारे, गोपाळ इंगळे, रणजीत तुपेसह एका सतरा वर्षांच्या आरोपीला अटक केली. आरोपींविरुद्ध दरोडा, खंडणी, अपहरण, डांबून ठेवणे, शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुलसचिवांवरून कलगीतुरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कुलसचिवपद कोणाला द्यायचे, यावरून प्रशासकीय अधिकारी आणि कुलगुरूंमध्ये कलगीतुरा रंगला आहे. बुधवारी अधिकाऱ्यांनी कुलगुरूंची भेट घेतली. प्रशासकीय अधिकाऱ्याकडेच कुलसचिवांचा पदभार द्या, अन्यथा सामूहिक रजेवर जाऊ, असा इशारा त्यांनी कुलगुरूंना दिला आहे.

विद्यापीठाची विस्कटलेली प्रशासकीय घडी बसण्याची शक्यता दिसत नाही. ३ सप्टेंबर रोजी प्रभारी कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी राजीनामा दिला. त्यामुळे विद्यापीठातील प्रशासकीय गोंधळ पुन्हा एकदा समोर आला होता. यातच कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे जपानच्या दौऱ्यावर गेल्याने हा पदभार परीक्षा नियंत्रक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. बुधवारी (१६ सप्टेंबर) कुलगुरू विद्यापीठात आल्याने त्यांनी डॉ. मंझा यांचा राजीनामा स्वीकारला तर, डॉ. लुलेकर यांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला.

यामुळे या पदासाठी नावाचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. याच दरम्यान विद्यापीठ अधिकार फोरमच्या सदस्यांची कुलगुरूंनी भेट घेतली. १३ मार्च २०१३च्या आदेशानुसार नवीन नियुक्ती होईपर्यंत पदभार विद्यापीठातीलच अधिकाऱ्याकडे द्या, अशी मागणी केली. यावेळी अधिकारी आणि कुलगुरू यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याची चर्चा विद्यापीठात होती. बाहेरचा कुलसचिव आला तर सामूहिक रजेवर जाऊ, असा पवित्रा अधिकाऱ्यांनी घेतला. तर, अधिकाऱ्यांमधूनच नेमण्यात आलेल्या डॉ. मंझा यांच्या कार्यकाळात काय झाले? असा सवाल कुलगुरूंनी केला. या गोंधळात बुधवारी दिवसभर विद्यापीठात नवनव्या चर्चांना ऊत आला होता. वर्षभरात चार वेळा कुलसचिव शोधण्याची वेळ कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यावर आली आहे.

अनेकांची नावे चर्चेत

कुलसचिव पदासाठी पुन्हा एकदा डॉ. महेंद्र सिरसाठ यांचे नाव चर्चेत आहे. यापूर्वीही त्यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. मात्र, अंतर्गत वादामुळे त्यांनी दोन दिवसांत पदाचा राजीनामा दिला. २१ सप्टेंबर रोजी राज्यपाल सी. विद्यासागर राव विद्यापीठात येत आहेत. त्यांच्या दौऱ्यात रिक्त असलेल्या कुलसचिवपदाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, कुलसचिवपदावर एखादा अधिकारी किंवा प्राध्यापकांची नियुक्ती करण्यासाठी कुलगुरूंच्या निर्णय क्षमतेचा कस लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीओ’त ‘पे अँड पार्क’चा प्रस्ताव

$
0
0

औरंगाबाद : पुण्याप्रमाणे औरंगाबाद येथील आरटीओ कार्यालयात 'पे अँड पार्क'ची सुविधा दिली जाणार आहे. त्याबद्दलचा प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती आरटीओ सर्जेराव शेळके यांनी दिली.

येथील आरटीओ कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांसोबत ग्राहक प्रतिनिधींची वाहनेही उभी असतात. वाहन अधिकाऱ्यांना दाखवणे आवश्यक असलेली वाहनेही कार्यालयाच्या गेटवर थांबतात. यामुळे गेटमध्ये थांबतात. यामुळे रेल्वे स्टेशन रस्त्यावर वाहनांची मोठी रांग लागत आहे. यामुळे कार्यालयात जाण्याकरिताही जागा मिळत नाही, शिवाय मुख्य रस्त्यावरील वाहतुकीलाही अडथळा येत आहे. त्यामुळे कार्यालयातील बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्याकरिता 'पे अँड पार्क' योजना लागू करण्याचे ठरवण्यात आले आहे. 'नागपूर व पुण्यात या पद्धतीची पार्किंग लागू केली आहे. औरंगाबादचा प्रस्ताव पाठवून मंजुरी मिळल्यानंतर निर्णय लागू होईल,' अशी माहिती शेळके यांनी दिली. दरम्यान, पार्किंगची जागा निश्चित करून दोरखंडाच्या साह्याने शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांजणगावात ‘जाणता राजा’चे आकर्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

वाळूज महानगर परिसरात गणेशोत्सवात सर्वाधिक गर्दी खेचणारे रांजणगाव शेणपुंजी येथील श्री संत सावता नवतरूण सार्वजनिक गणेश मंडळ यावर्षी 'जाणता राजा' हा सजीव देखावा सादर करणार आहे. गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अशोक गोरे यांनी दिली.

हे गणेश मंडळ गावच्या मध्यवर्ती भागातील मोकळ्या जागेवर असून सजीव देखावे सादर करण्याची परंपरा आहे. या वर्षी सादर करण्यात येणाऱ्या 'जाणता राजा' या सजीव देखाव्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सादर करण्यात येणार आहेत.

रांजेगावच्या पाटलास केलेली शिक्षा, रयतेची शपथ, किल्लेदाराची परीक्षा, औरंगजेबाचा दरबार, गड आला पण सिंह गेला, आधी लगीन कोंडाण्याचे, कुतूबशहा अणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील धार्मिक सलोखा, शिवराज्यभिषेक आदी प्रसंग सादर करण्यात येणार आहेत.

वीस कलावंत

गणेश मंडळाचे २० कलावंत 'जाणता राजा' चे सजीव देखावे सादर करणार आहेत. एक देखावा सुमारे वीस मिनिटांचा असून तो एका दिवसात चार वेळा सादर होणार आहे. याकरिता मंडळाचे साईनाथ जाधव, सुभाष हिवाळे, प्रदीप सवाई, मनोज ठाकूर, संजय सवाई, दीपक सवाई, दीपक जाधव आदी परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय घनकचरा प्रकल्पात अनेक त्रुटी

$
0
0

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या वतीने पाटोदा शिवारात वॉटर ग्रेस कंपनीतर्फे चालविण्यात येत असलेल्या वैद्यकीय घनकचरा प्रकल्पात अनेक त्रुटी आहेत, असा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला दिला आहे. या प्रकल्पासंदर्भात पालिका काय कारवाई करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वॉटर ग्रेस कंपनीतर्फे २००३ पासून वैद्यकीय घनकचरा प्रकल्प चालवला जातो. या प्रकल्पाला मंगळवारी पालिकेचे सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, शिवसेनेचे गटनेते राजू वैद्य, आयोग्य सभापती विजय औताडे यांनी भेट देत पाहणी केली, तेव्हा या ठिकाणी अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे या प्रकल्पाचा पंचनामा करण्यासाठी त्यांनी पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर, उपायुक्त अय्युब खान व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा अहवाल पालिकेला सादर केला. त्यात त्यांनी वैद्यकीय घनकचरा प्रकल्पातील पाणी शुद्धीकरण युनिट, कचऱ्याच्या विल्हेवाटीची पद्धत, रेकॉर्ड व हाउस किपिंग या बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यात मोठ्या प्रमाणावर सुधारणा करणे गरजेचे आहे, असे मंडळाने अहवालात नमूद केले आहे.

पालिकेचा अहवाल

पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर व वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकरही अहवाल तयार करीत आहेत. याबाबत राजेंद्र जंजाळ व विजय औताडे यांनी डॉ. टाकळीकर व डॉ. पाडळकर यांच्याशी चर्चा केली. पालिकेचा अहवालही लवकर तयार व्हावा, प्रकल्प चालवण्यात कंत्राटदाराची व पालिकेच्या अधिकाऱ्यांची चूक असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिकूल हवामानात लगडले ‘पॅशनफ्रूट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विदेशातील लोकप्रिय पॅशनफ्रूट फळाची यशस्वी प्रायोगिक लागवड सातारा परिसरातील निवृत्त पोलिस कर्मचारी एकनाथ आगे यांनी केली आहे. मुबलक पोषणतत्त्वे असलेल्या या फळाची भारतात अत्यंत कमी लागवड होते. प्रतिकूल हवामानात भरपूर उत्पादन काढण्यात आगे यांना यश आले.

ब्राझिल, पॅराग्वे व अर्जेंटिना देशातील मूळ पॅशनफ्रूट फळ विदेशात अत्यंत लोकप्रिय आहे. औषधी गुणधर्म व पोषकतत्त्वे असलेल्या पॅशनफ्रूटची माहिती मिळाल्यानंतर एकनाथ आगे यांनी घराभोवती लागवड केली. या फळाच्या उंच वेली असतात. सध्या कुंपणाच्या सभोवती पॅशनफ्रूट बहरले आहे. पांढऱ्या फुलांना फळे लगडतात. फळे अत्यंत स्वादिष्ट असून आगे यांनी कृषी शास्त्रज्ञ व अभ्यासकांना फळे दाखवली. लवकरच शेतात मोठ्या प्रमाणात लागवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, हिमायतबाग येथील फळबाग संशोधन केंद्रात पाच वर्षांपूर्वी पॅशनफ्रूटची लागवड केली होती. शहरातील पंचतारांकित हॉटेल्समध्ये फळांना विशेष मागणी होती असे डॉ. संजय पाटील यांनी सांगितले. या फळाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता नाही. अन्यथा, विदेशात निर्यात करण्यासाठी पॅशनफ्रूट फायदेशीर ठरेल असे डॉ. पाटील म्हणाले.

ज्यूस लोकप्रिय

देशातील मोठ्या हॉटेल्समध्ये पॅशनफ्रूट ज्यूसला विशेष मागणी असते. ही फळे विदेशातून आयात केली जातात. पॅशनफ्रूटची उत्पादकता वाढल्यास शेतकऱ्यांना पिकाचा नवा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. सध्यातरी प्रायोगिक तत्त्वावरच ही लागवड सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा रुग्णालयाचे काम रखडलेलेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम अद्याप रखडलेल्या अवस्थेत असून, विविध अंतर्गत कामांसाठी किमान पाच कोटी रुपये लागणार आहेत. अर्थातच, या निधीची कित्येक महिन्यांपासून प्रतीक्षा कायम आहे. हा निधी उपलब्ध झाल्यानंतर रुग्णालयाचे काम पूर्ण होण्यासाठी किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे हे काम कुठल्याही परिस्थितीत या वर्षामध्ये होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावरील (घाटी) ताण कमी करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयाची सातत्याने मागणी होत होती. इतर बहुतेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा रुग्णालय असूनही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये या रुग्णालयाचा कित्येक वर्षांपासून अभाव आहे. त्यामुळेच उशिरा का होईना चिकलठाणा परिसरामध्ये जिल्हा रुग्णालयाचे काम एकदाचे सुरू झाले, मात्र निधीअभावी रुग्णालयाचे काम वारंवार रखडत गेले. दोन वर्षांपूर्वीच रुग्णालयाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना, अजूनही रुग्णालयाचे अंतर्गत काम होणे बाकी आहे. विद्युतीकरणासह सेंट्रल ऑक्सिजन लाइन, सेंट्रल सक्शन लाइनचे काम अजूनही झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभाग वतीने ऑक्सिजन लाइन, सक्शन लाइनच्या कामांसाठी निविदा काढणार आहे. सद्यस्थितीत कंपाउंड वॉल, इंटेरियरचे छोटे-मोठे काम सुरू आहे, मात्र पाच कोटींचा निधी मिळाल्याशिवाय रुग्णालयाचे काम पूर्ण होणे शक्य नाही.

काम पूर्ण झाल्यानंतर पदनिर्मिती

१०० खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाल्याशिवाय रुग्णालयातील मनुष्यबळनिर्मितीला प्रशासकीय मान्यता मिळू शकत नाही. त्यामुळे प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पदनिर्मिती होऊन प्रत्यक्षात डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, कर्मचाऱ्यांची नियुक्ती होऊ शकेल. या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय प्रत्यक्षात कार्यान्वित होण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे. म्हणजेच २०१३मध्ये रुग्णालय कार्यान्वित होणे अपेक्षित असताना २०१६मध्ये कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

रुग्णालयाच्या कामासाठी आणखी पाच कोटींच्या निधीची गरज आहे. राज्य सरकारच्या वतीने लवकरच हा निधी मिळून काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण होऊ शकेल, अशी आशा आहे.

- डॉ. जी. एम. गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वस्त ‘एमआरआय’ अडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींची ७०० रुपयांमध्ये 'एमआरआय' तपासणी व्हावी, यासाठी पालकमंत्र्यांनी घाटीला ५० लाख रुपयांचा निधी दिला. मात्र, हा निधी देऊन महिना उलटला तरी अजूनही 'एमआरआय'साठी बीपीएल रुग्णांना घाटीमध्ये किमान १८०० रुपये मोजावे लागत आहेत.

घाटीमध्ये 'एमआरआय'साठी प्रत्येक रुग्णाकडून किमान १८०० रुपये घेतले जातात. काही दुसऱ्या प्रकारच्या 'एमआरआय' तपासणीसाठी सुमारे अडीच हजारांपर्यंतही शुल्क घेतले जाते आणि त्यामध्ये कुणालाही सूट नाही. गोरगरीब रुग्णांनाही किमान १,८०० रुपये मोजावे लागत असल्याने निदान बीपीएल रुग्णांची तरी पूर्वीप्रमाणे ७०० रुपयांत ही तपासणी व्हावी, अशी मागणी वारंवार होत होती. या मागणीवरून जिल्हा नियोजन मंडळाच्या मागील अनेक बैठकांमध्ये जोरदार चर्चा झाली. शेवटी पालकमंत्री रामदास कदम यांनी त्यासाठी ५० लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आणि महिन्याभरापूर्वी ५० लाखांचा निधी घाटीकडे सुपूर्द केला. त्यावेळी हा निधी शिल्लक असेपर्यंत बीपीएल रुग्णांची ७०० रुपयांत एमआरआय तपासणी होईल, असे घाटी प्रशासनाने जाहीर केले होते, मात्र महिना उलटला तरी 'एमआरआय'साठी बीपीएल रुग्णांना १,८०० रुपये मोजावे लागत आहेत. 'वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालया'च्या (डीएमईआर) परवानगीशिवाय निधी मिळूनही ७०० रुपयांत ही तपासणी होणार नसल्याचे समोर आले आहे. ७०० रुपयांतील 'एमआरआय'साठी अजून किती प्रतीक्षा करावी लागेल, हे घाटी प्रशासनही सांगू शकत नाही, हे विशेष!

या संदर्भातील प्रस्ताव आम्ही १० सप्टेंबर रोजी 'डीएमईआर'ला पाठविला आहे. 'डीएमईआर'ने परवानगी दिल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकेल. -डॉ. सुहास जेवळीकर, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टाकळीचा पूल वाहून गेल्याने ३० गावांचा संपर्क तुटला

$
0
0

येसगाव प्रकल्पात पाणी येण्यास सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

दोन दिवसांपासूच्या पावसामुळे तालुक्यातील सर्व नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यातील जनजीवन ठप्प झाले. येसगाव येथील गिर‌िजा प्रकल्पात २०१० नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओघ येत आहे. दरम्यान टाकळी राजेराय येथील गिरजा नदीवरील पूल वाहून गेल्याने ३० गावांचा संपर्क तुटला आहे.

पावसामुळे तालुक्यातील सुलतानपूर, गोळेगाव, टाकळी राजेराय, विरमगाव, देवळाणा, ताजनापूर येथील सर्वच नद्यांना पूर आला. दौलताबाद घाटात वाहतूक ठप्प होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला होता. टाकळी राजेराय गावाला पाणीपुरवठा करणारे अब्दुलपूर धरण ६० टक्के भरले. जलसिंचन विभागाने पाट सोडणारा दरवाजा बंद न केल्यामुळे मोठ्याप्रमाणावर पाणी वाहून गेले. येथील गिर‌िजा नदीवरील पूल टाकळी राजेराय, धामणगाव, बोडखा, लोणी, गंधेश्वर, चिकलठाण आदी ३० गावांचा संपर्क तुटला. तालुक्यातील अनेक गावांत गुरुवारी रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला. शहरात अली अहेमद शाह यांच्या घराची भिंत कोसळली. तालुक्यातील मंडळनिहाय पाऊसः सुलतानपूर ६० मि.मी., वेरूळ ५६ मि.मी., बाजारसावंगी ७२ मि.मी.

पर्यटकांची गर्दी

खुलताबाद ते वेरूळ परिसरात कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी शुक्रवारी पर्यटकांची गर्दी झाली. वेरूळ येथील सीता न्हाणी धबधबा प्रथमच कोसळत आहे. येळगंगा नदी ओसंडून वाहिली. वेरूळ लेणीमध्ये पावसात भिजत पर्यटकांनी आनंद लुटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीत आवक सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व ऊर्ध्व भागातही चांगला पाऊस पडल्याने धरणात ३७६४ क्युसेक प्रतितास प्रमाणे पाण्याची आवक सुरू झाली आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात जवळपास नऊ दशलक्ष घनमीटरने वाढ झाली आहे. सध्या जायकवाडी धरणात ८३८.७६८ दलघमी पाणीसाठा असून यापैकी २९.६१७ दलघमी उपयुक्त (४. ६३ टक्के) साठा आहे. शुक्रवारी धरणाची पाणीपातळी ४५६.१५२ मीटर नोंदण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यानंतर सकाळी सहापासून बंधाऱ्यातून गोदावरी नदीच्या पात्रात ७०० क्युसेस पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आठ वाजता पाणी सोडण्याचे प्रमाण साडेचार हजार क्युसेसपर्यंत वाढविले होते. दुपारी ते साडेसात हजार क्युसेसपर्यंत वाढविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्रीतील अनेक दुकानांत पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

शहरातील येथील फुलमस्ता नदी भरून वाहिली. शिवाय खुलताबाद रस्त्यावरीस टी पॉइंटवरील अनेक दुकानांत पावसाचे पाणी शिरले. यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.

पावसामुळे अनेक वर्षांनंतर फुलमस्ता नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नदीलगतच्या सर्व घरांमध्ये पाणी शिरले. बाजारपट्टी परिसर, जमालशाह दर्गा परिसर, महिला बाल विकास तालुका कार्यालय परिसर पाण्याखाली गेल्याने दिसेनासा झाला. गोल अंबा वस्ती लगत कोल्हापुरी बंधाऱ्यातून पाणी वाहून नागरे वस्तीत शिरले. मोईन चाँद सय्यद याच्या घरावर बाभळीचे झाड पडले. टी पॉइंटवर खुलताबाद रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. जैन क्लाथ, चिंतामणी प्रोव्हिजन, हिंदुस्थान ऑटो यासह अनेक दुकानात कमरेच्यावर पाणी साचले. अनेक दुकानांत पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटार बोटीतून आठ जणांची सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

पावसामुळे तालुक्यातील गिर‌िजा, फुलमस्ता आदी सर्व नद्या ओसंडून वाहत आहेत. बोरगाव अर्ज येथे गिर‌िजा नदीच्या पुरात अडकलेल्या मंदिरातील दहा जणांना प्रशासनाने बोटीतून बाहेर काढले. तालुक्यातील दहा गावांत पाणी शिरले. प्रशासनाने तेथूनही गावकऱ्यांची सुटका केली.

बोरगाव अर्ज येथील गणपती मंदिर व उमामहेश्वर मंदिरात शुक्रवारी सकाळी काही जण अडकले. ग्रामपंचायत कार्यालयाला वळसा देऊन पाणी मारोती मंदिरापर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली. पंचायत समिती उपसभापती किशोर बलांडे यांनी प्रशासनाला माहिती दिल्यानंतर दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने मोटार बोटीतून सुनील देशपांडे, (रा. पैठण), हरीदास काशीनाथ बलांडे, पद्मा विष्णु बलांडे, विकास व बाळू ही मुले, चंद्रकांत हरीदास बलांडे, दादाराव भीमराव खरात, मंदाबाई एकनाथ चित्रक, प्रभात गिरी महाराज, पंडित विठ्ठल कलग, यांची सुटका केली.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक जिल्हाधिकारी विपीन इटनकर, पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी याच्यासह अधिकाऱ्यांनी धाव घेतली होती.

पिंपळगांव गांगदेव, बिल्डा, नरला, भावडी, निमखेडा, बोंधेगांव या गावात नदीचे पाणी घुसल्याने अनेकांचे नुकसान झाले. भोयगांव येथील नदीलगतच्या नागरिकांना नायब तहसीलदार प्रवीण पांडे यांनी एका शाळेत हलवले. पावसाने जानेफळ येथील मारोती मंदिर पडले आहे. सांजूळ धरण पूर्ण भरले असून धरणाच्या वरील भागातील चिंचोली पाझर तलावाला भगदाड पडल्याने घबराट निर्माण झाली. तालुक्यातील मंडळनिहाय पाऊसः फुलंब्री ९० मि.मी., आळंद ९५ मि.मी., वडोदबाजार ९० मि.मी., पिरबावडा ८५ मि.मी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघूर नदीला आला तब्बल दशकानंतर पूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फर्दापूरसहित संपूर्ण सोयगाव तालुक्यात गुरुवारी दुपारी साडेतीनपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दोन दिवसांपासूनच्या पावसामुळे तालुक्यातील सर्वात मोठ्या वाघूर नदीला दहा वर्षांतील सर्वात मोठा पूर आला आहे.

वाघूर नदीच्या पाण्यामुळे फर्दापूर येथे नदीतटावरील स्मशानभूमीची संरक्षक भिंत पूर्ण कोसळली आहे. नदीचे पाणी शेतात घुसल्याने कापूस, अद्रकचे शेत वाहून वाहून गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे फर्दापूर गावातील सुभाष दामोदर, रामभाऊ शिरसाठ, मेहबूब खाँ पठाण यांच्या घराच्या भिंती पडून नुकसान झाले. तहसीलदार नरसिंह सोनवणे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी करून पंचनामे केले.

वाघूर नदीवर ३० लाख रुपये खर्च करून बांधलेला पूलाच्या पश्चिमेकडे टाकलेला भराव पहिल्याच पावसात वाहून गेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हा पूल शेतकऱ्यांच्या वाहतुकीकरिता याच वर्षी बांधून पूर्ण करण्यात आला. वाघूर नदीला १५ सप्टेंबर रोजी आलेल्या पुरात हा प्रकार घडला. त्यानंतर गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे पुलाच्या पूर्वेकडील बाजुचेही नुकसान झाले असून संपूर्ण पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, या पावसामुळे अजिंठा लेणीतील धबधबा कोसळण्यास सुरुवात झाली आहे. लेणी पाहण्यासाठी पर्यटक येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला

$
0
0

सिल्लोड : तालुक्यात गुरुवारी सायंकाळापासून सुरू झालेल्या पावसामुळे पूर्णा नदीला पूर आला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा खेळणा प्रकल्प पूर्ण भरला आहे. वांगीमध्ये नदीचे पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. भराडी, कन्नड, घाटनांद्रा, गोळेगाव, अंभई आदी रस्त्यांवरील वाहतूक थांबली होती. मांडला येथे पावासमुळे मरीआईच मंदिर कोसळले. याच गावातील हनुमान मंदिरावर वीज कोसळल्याने कळसाला भेगा पडल्या आहेत. पांगरी येथील पूल नाल्याच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे गोळेगाव-अंभई वाहतूक थांबली आहे. निल्लोड परिसरात पाझर तलाव फुटण्यासारखी परिस्थिती होती. त्यामुळे ग्रामस्थांनी सांडवा फोडून पाण्याला वाट मोकळी करून दिली. निल्लोड येथील मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. तहसीलदार राहूल गायकवाड यांनी तालुक्याचा दौरा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाडसांवगी, सय्यदपूर, सेलूद, औरंगपूरला तडाखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

करमाड पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या लाडसावंगी, सय्यदपूर, सेलूद आणि औरंगपूर गावांना दुधना नदीला आलेल्या पुराचा जबरदस्त तडखा बसला. पुरात अडकलेल्या तीसपेक्षा जास्त लोकांना शुक्रवारी सायंकाळी सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या भागातील सूमारे दीड हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. नदीच्या पूरात वीस जनावरे वाहून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दुधना नदीला गुरुवार सायंकाळपासूनच्या पावसामुळे पूर आला. शुक्रवार सकाळपासून नदीपात्राने धोक्याची पातळी ओलांडली. पुरात नागरिक अडकल्याची माहिती मिळल्यानंतर पोलिस, महसूल विभाग व अग्निशमन पथक या भागात दाखल झाले. त्यांनी चारही गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या चारही गावात पूर परिस्थिताची पाहणी करत मदतकार्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या. औरंगपूर येथील तीन ग्रामस्थ जीव वाचविण्यासाठी दोन तास झाडावर बसले. येथील जिल्हा परिषद शाळाची संरक्षक भिंत वाहून गेली. औरंगपूर गाव परिसरातील आईचा माळा येथे नामदेव पाटील दिडोरे व कुटुंबीय, कमळाची माळ येथे जयाजी दिडोरे आदी तीस ग्रामस्थ अडकले होते. दरम्यान, लाडसावंगी, आजगाव सरक, हातमाळी, चारठाण, सय्यदपूर, औरंगपूर गाव, सेलूद, नायगव्हाण आदी गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे करमाडचे सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, पोलिस उपअधीक्षक एस. के. लांजेवार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनीही भेट दिली.

दोन तरुणांना कळसाचा आधार

लाडसावंगी येथे दुधना नदीपात्रातील हनुमानाचे पुरातन मंदिरात सार्वजनिक गणपतीची स्थापन करण्यात आली आहे. येथे आरतीच्या तयारीकरिता गेलेले अनिल पडूळ (वय २५) व सोनाजी पडूळ (वय २१) हे दोघे अडकले. जीव वाचवण्याकरिता ते मंदिराच्या छतावर चढून बसले. सायकांळी सहा वाजता पूर ओसरल्यानंतर एका तरूण पोहत मंदिरात गेला व दोरखंडाच्या साह्याने त्यांना बाहेर काढण्यात आले, असे पोलिस पाटील गणेश नाईक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संततधार पावसाने नारंगीमध्ये पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

शहरासह ग्रामीण भागात गुरुवारी (१७ सप्टेंबर) मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू राहिल्याने जनजीवन पूर्ण विस्कळ‌ित झाले. शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने सूर्यदर्शन झाले नाही.

शहराजवळील नारंगी प्रकल्पासह तालुक्यातील बोरदहेगाव, जरूळ येथील प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढली आहे. नारंगीच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू राहिल्यास येत्या २४ तासात दीड मीटरपर्यंत मृतसाठा वाढून जिवंतसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तालुक्यात ३७ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसामुळे लासूरगावजवळील शिवना नदी दुथडी भरून वाहत आहे. लासूरगाव व गारज या सर्कलमध्ये सर्वाधिक पाऊस पडला. गोदावरी नदीतून ७५०० क्युसेक पाण्याच विसर्ग सुरू आहे. परंतु, नदीकाठच्या १७ गावांना सध्या कुठलाही धोका नसल्याची माहिती पुरणगाव व बाभूळगाव येथे भेट दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली. दरम्यान या पावसामुळे कापूस, मका या खरीप पिकांना फायदा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा वर्षांतील मोठ्ठा पाऊस

$
0
0

R‍amchandra.Vaybhat@timesmail.com

दुष्काळाच्या झळा सहन करत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याला दमदार पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव व कन्नड तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.

सिल्लोड तालुक्यामध्ये सर्वाधिक १५७ मिलिमीटर पाऊस झाला असून, तालुक्यातील सिल्लोड मंडळामध्ये २६२ मिलिमीटर असा जोरदार पाऊस झाला. गुरूवारी रात्री सुरू झालेला पाऊस दुसऱ्या दिवशीही सुरूच होता. औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड, तालुक्यातील सर्वच मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. औरंगाबाद शहरासह फुलंब्री, आळंद, वडोदबाजार, पिरबावडा, बिडकीन, पाचोड, आडूळ, बालानगर, सोयगाव, बनोटी, शिवूर, सिद्धनाथ वडगाव, कन्नड, पिशोर, करंजखेडा, नाचनवेल, चिंचोली लिंबाजी, वेरूळ, बाजार सावंगी येथे जोरदार पाऊस झाला.

औरंगाबाद शहरामध्ये गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत गुरुवारी दिवसभरातील सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. ९ सप्टेंबर २००५ रोजी शहरामध्ये ८४.४ मिलिमीटर पाऊस बरसला होता. १ सप्टेबर १९८३ रोजी आतापर्यंतचा सर्वाधिक १२६.५ मिलिमीटर पावसाने शहराला झोडपले होते.

सिल्लोडमध्ये सर्वाधिक

सिल्लोड तालुक्याला पावसाने अक्षरशः धुवून काढले. सिल्लोड तालुक्यातील आठपैकी सात मंडळांमध्ये शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. सिल्लोड मंडळामध्ये २६२ मिलिमीटर पावसाने झोडपून काढले. यात अजिंठा १६०, अंभई ६९, अमठाणा १८०, भराडी १८०, गोळेगाव १३१, निल्लोड १२० तर बोरगाव बाजार मंडळामध्ये १६० ‌मंडळामध्ये जोरदार पाऊस झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पप्पी महाराजला शहरप्रवेश बंदी

$
0
0

औरंगाबादः आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात अट‌क केलेल्या नरेंद्रसिंग छतवाल उर्फ पप्पी महाराजला हायकोर्टाच्या आदेशाने शहरात चार्जशीट दाखल होईपर्यंत प्रवेश बंदी केली आहे. पप्पी महाराजची बुधवारी हर्सूल कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आली. पप्पी महाराज याच्यावर १ जुलै रोजी अवैध सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानपुरा येथील सुखवीरसिंग चंडोक यांना एक लाख रुपये व्याजाने देत त्यांची चितेगाव येथील दोन एकर जमीन पप्पी महाराजाने नावावर करून घेतली होती. कर्जाची रक्कम परतकेल्यानंतरही त्याने चंडोक यांची जमीन परत देण्यात नकार दिला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजाजनगरात पाणी पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

वाळूज महानगर परिसरातील वळदगाव येथून खाम नदीच्या पात्रात एकाला वाहून जाणाऱ्या एका तरुणाला दुसऱ्या नागरिकाने वाचवले, पण एक जण वाहून गेल्याची चर्चा आहे. दरम्यान, पावसामुळे बजाजनगर व परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

वाळूज महानगर परिसरातील गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कालपासून जोरदार पाऊस पडला आहे. गुरुवारी सायंकाळी पडणाऱ्या रिमझिम पावसाचा जोर काही तासातच चांगलाच वाढला. पावसाचा जोर कायम राहिल्याने परिसरातील नागरीकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. कामगार वसाहत असलेल्या बजाजनगरातील अनेक भागात पाणी शिरले. वडगाव कोल्हाटी येथील विजयनगर, फुलेनगर, आयोध्यानगर, पंढरपूर परिसरातील गिरीराज हाउसिंग सोसायटी आदी ठिकाणी घरांमध्ये शिरले. हा भाग जलमय झाला. सखल जागेवरील नागरी वसाहतीमधील घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यात आण्णाभाऊ साठेनगर, भरत नगर नायगाव बकवालनगर तसेच वाळूज गावातील काही भागांमधील घरांमध्ये देखील पाणी शिरले होते. पावसाचा जोर एमआयडीसी परिसरात कायम राहिल्याने सी सेक्टरमधील काही कंपन्यांमध्ये देखील पाणी शिरल्याने तेथील कामकाज काही काळ थांबविण्यात आले होते. परिसरातील छोटे मोठे नाले तुडुंब भरून वाहत होते. रांजणगाव शेंणपुंजी, साजापूर, तिसगाव, पंढरपूर, सिडको, वळदगाव, वाळूज आदी परिसरातील शेतकरी सुखवला आहे.

एका तरुणाला वाचवले

अनिल शिवाजी पवार (वय २१ रा. पंढरपूर) हा शुक्रवारी सायंकाळी चार वाजता वळगावकडे जात होता. पण तो खाम नदीच्या पाण्यात पडून वाहून जात होता. नदीच्या काठावर असलेल्या गुलाब संतू माळी यांनी त्याचा आवाज ऐकून तत्काळ पाण्यात उडी मारून पवार याला वाचवले. ही घटना चार वाजेच्या सुमारास घडली. मात्र यापूर्वी दुपारी बारावाजेच्या सुमारास एक बिहारी नागरिक वाहून गेल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेणी भागातील धबधबे वाहू लागले धबाबा

$
0
0

औरंगाबाद : तब्बल १२ तासांपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर विद्यापीठ परिसरासह औरंगाबाद लेणी भागातील अनेक धबधबे जोरदार वाहू लागले. विशेष म्हणजे विद्यापीठ परिसरातील सर्वच तलाव भरून वाहात असल्याचे सुखद चित्र शुक्रवारी दिसून आले.

संपूर्ण विद्यापीठ व औरंगाबाद लेणी परिसर छोट्या-मोठ्या टेकड्यांनी वेढलेला आहे. दाट वनराई आणि निसर्ग सौंदर्यामुळे असंख्य औरंगाबादकर पहाटे-सकाळी-संध्याकाळी विद्यापीठ व लेणी परिसरात फिरायला येतात. केवळ गोगाबाबा टेकडी चढण्यासाठी हमखास येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्याचवेळी बुद्ध लेणीमुळे येणाऱ्या भाविकांची संख्या नेहमीच जास्त असते. लेणी परिसर, गोगाबाबा टेकडी आणि विद्यापीठाला लागून असलेल्या अनेक टेकड्यांवरून छोटे-मोठे धबधबे पावसाळ्यात वाहताना दिसून येतात. मात्र, आजपर्यंत पुरेसा पाऊस न झाल्यामुळे बहुतांश धबधबे यंदा दृष्टीस पडलेच नाही किंवा फार कमी दिवस धबधब्यांचे दर्शन घडले. गुरुवारी संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरू होता आणि पुन्हा शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस सुरूच होता. त्यामुळे सगळेच धबधबे अतिशय जोरात कोसळत असल्याचे सुखद चित्र विद्यापीठ व लेणी परिसरात होते.

सगळ्याच टेकड्यांवरून खालपर्यंत पाणी वाहात येऊ लागल्यामुळे आणि वरतून जोरदार पाऊस सुरूच असल्यामुळे विद्यापीठ भागातील सगळेच तलाव भरून वाहात होते. तुडूंब भरलेले तलाव, धबाबा वाहणारे धबधबे, चिंब भिजलेली वृक्षवल्ली, यामुळे संपूर्ण विद्यापीठ परिसर नयनरम्य दृश्याने नटला होता. तसेच सातारा भागातील टेकड्यांनी लांबून धुक्याची शाल पांघरल्याची मोहक अनुभूती औरंगाबादकर घेत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images