Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मध्यवर्ती बसस्थानकातून मोबाइल लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मध्यवर्ती बसस्थानकातून संजय शिवसिंग बेडवाल (वय ४० रा. फेरन जळगाव) या शेतकऱ्याचा ५० हजारांचा मोबाइल चोरट्यांनी लांबविला. गुरूवारी दुपारी तीन वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी शनिवारी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉस्पिटलसमोरून दुचाकी पळविली

आनंदा उमाजी साबळे (वय ४९ रा.पंढरपुर) हा दुचाकीस्वार शनिवारी सकाळी पेशंटला पाहण्यासाठी एमजीएम हॉस्पिटलमध्ये आला होता. यावेळी बाहेर उभी केलेली त्याची दुचाकी (क्रमांक एमएच २० जे ८३४९) चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाग्यनगरात मद्यपीची तरुणाला मारहाण

मद्यपीला हॉस्पिटलजवळ थांबू नको, असे सांगितल्याने विजय नागोराव भदरगे या तरुणाला मारहाण करण्यात आली. भाग्यनगर येथील वरद चेस्ट हॉस्पिटलजवळ शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी आरोपी महेश रमेश गडवे (रा.भाग्यनगर) याच्याविरुद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यार्थ्याची सायकल लंपास

योगेश रमेश गडलिक (वय १८, रा. अजिंठा हॉस्टेल) हा शनिवारी दुपारी बसस्टँड जवळील हॉटेल पॅराडाईज येथे आला होता. यावेळी हॉटेलमध्ये चार दिवसांपूर्वी कामाला लागलेल्या योगेश (रा. कोलते टाकळी, फुलंब्री) या नोकराने त्याची सायकल परस्पर पळवून नेली. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरातून सहा हजारांचा ऐवज लंपास

जिन्सी खास गेट येथील घरातून मोबाइल व तीन हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी संशयित आरोपी जैद महमद अय्याज व त्याच्या साथीदाराविरूद्ध घरमालक महिलेने जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

महिलेचा विनयभंग

घरात एकट्या असलेल्या महिलेचा घरात घुसून विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी मिसारवाडी भागात घडला. याप्रकरणी आरोपी सुलेमान व दोन महिलांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेपत्ता तरुणीचा मृतदेह हर्सूल तलावात आढळला

$
0
0

औरंगाबादः दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह सोमवारी सकाळी हर्सूल तलावामध्ये आढळला. या मुलीची ओळख पटली असून दोन दिवसांपूर्वी तिच्या आईने हर्सूल पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद केली होती. जिजा उर्फ लिबोनी सुनील मोरे (वय १९ रा. दीक्षाभूमीनगर, हर्सुल) असे या तरुणीचे नाव आहे.

जिजा ही एका खासगी कंपनीत काम करीत होती. कंपनीत काम करण्याला तिच्या आईचा विरोध होता. शनिवारी या कारणावरून आईसोबत जिजाचा वाद झाला. यानंतर रागाच्या भरात ती घरातून निघून गेली. सायंकाळपर्यंत ती आल्याने तिचा शोध घेण्यात आला, मात्र ती सापडली नाही. त्यामुळे हर्सूल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. सोमवारी सकाळी एका तरुणीचा मृतदेह हर्सूल तलावात तरंगत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. पोलिसांना हा प्रकार कळविण्यात आला. तिची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. जिजाने आत्महत्या केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गळफास घेऊन युवतीची आत्महत्या

$
0
0

औरंगाबादः गळफास घेत तरुणीने आत्महत्या केली. देवळाई परिसरातील ओम गणेशनगरी येथे रविवारी रात्री ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे, मात्र आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. नम्रता भगवान उबाळे (वय २०, रा. देवळाई) असे त्या दुर्देवी तरुणीचे नाव आहे. रविवारी सायंकाळी तिचे पालक सिडकोतील नातेवाईकांच्या घरी तर भाऊ कर्णपुरा यात्रेत गेला होता. घरात नम्रता एकटीच होती. भाऊ रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घरी आला. त्यावेळी नम्रताने गळफास लक्षात आले. दरम्यान, अभ्यासात हुशार असलेल्या नम्रताच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून आत्महत्येमागील कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनधारकांची जीवघेणी घाई!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील प्रत्येक सिग्नल वाहनधारकांच्या बेशिस्तीमुळे अपघाताला निमंत्रण ठरत आहे. हिरवा सिग्नल पडणार या अंदाजानेच लोक आपले वाहन पुढे दामटण्यासाठी इतकी घाई करतात की, अनेकदा त्यापायी हाकनाक जीव जातो. विशेष म्हणजे हा सारा प्रकार डोळ्यांसमोर घडूनही चौकात-चौकात थांबलेले वाहतूक पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत.

महर्षी चौकातील सिग्नलवर रविवारी एका दुचाकीस्वाराचा टँकरखाली बळी गेला. सिग्नल सुटल्यानंतर टॅँकरचालकाला पुढे जाण्याची इतकी घाई होती की, त्यात दुचाकीवरील दोघे चिरडले गेले. या अपघातात चूक कोणाची याचा तपास सुरू आहे. मात्र, शहरातील प्रत्येक सिग्नल वाहनधारकांच्या बेशिस्तीमुळे अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. वाहतुकीचे सुरळीत नियमन व्हावे यासाठी शहरात विविध चौकात सिग्नल उभारण्यात आले आहेत. मात्र, शहरातील सध्याची वाहतूक परिस्थिती पाहता हे सिग्नल नावापुरते असल्याचे दिसते. सिग्नलला एक मिनिटाचा कालावधी देण्यात आला आहे. यामध्ये लाल दिवा लागल्यानंतर वाहनधारक थांबतात. यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये दहा सेकंदात पिवळा दिवा लागतो व नंतर हिरवा दिवा लागल्यानंतर वाहनधारक वाहने काढू शकतात. शहरातील काही प्रमुख सिग्नलची परिस्थिती जाणून घेतली असता वाहनधारक या नियमांचा पुरता खेळखंडोबा करित असल्याचे दिसून आले. कालच्याच अपघात घडलेल्या महर्षी चौकातील सिग्नलवर सोमवारी बेशिस्तपणे वाहतूक सुरू होती. आकाशवाणी चौकात कोणताही वाहनधारक हिरवा दिवा लागण्याची वाट पाहत नव्हता. पिवळा दिवा लागताच वाहनधारक वाहने पुढे काढत होते. याच वेळी लगतच्या सिग्नलचा हिरवा दिवा बंद होऊन पिवळा दिवा लागतो. तेथील वाहनधारकही पिवळ्या दिवा चालू असतानाच सिग्नल पार करण्याची घाई करत होते. त्यामुळे अपघाताच्या शक्यता वाढल्या आहेत.

शहरातील सिग्नलवर वाहनधारक बेशिस्तपणे वाहन चालवून नियमाचे उल्लंघन करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या अनुषंगाने नवरात्रोत्सव संपल्यानंतर प्रत्येक सिग्नलवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांनो, विद्यार्थ्यांशी आत्मीयतेने वागा !

$
0
0

Ashish.Choudhari@timesgroup.com

औरंगाबादः बालकांना शारीरिक शिक्षा केल्याची, मानसिक त्रास किंवा कठोर वागणूक दिल्याच्या तक्रारी अनेकदा समोर येतात. यावरून आता शिक्षण आयुक्तांनी थेट, 'शिक्षकांनो आत्मीयतेने वागा,' अशा आशयाचे पत्र काढले आहे. 'विद्यार्थ्याला आनंददायी शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करा,' असे सांगताना शिक्षेबाबत तक्रार आल्यानंतर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचनाही शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

शाळांमध्ये उपक्रमशील, आनंददायी शिक्षणासाठी विविध उपक्रम घेतले जातात. काहीवेळा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा, मानसिक त्रास दिल्याबद्दल शिक्षकांच्या विरोधात तक्रारी केल्या जातात. असे प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने आता शिक्षकांना उपदेश करणारे पत्र धाडले आहे. शिक्षण आयुक्तांचे हे पत्र शाळांना नुकतेच प्राप्त झाले. 'पुढील तीन वर्षांत शैक्षणिक गुणवत्तेत महाराष्ट्राला देशात पहिल्या तीन राज्यामध्ये आणण्याचे उद्देश ठरविण्यात आला अाहे. त्यामुळे विद्यार्थ्यांशी आत्मीयतेने वागावे. त्यांना स्नेहपूर्ण वागणूक द्यावी,' असे पत्रात म्हटले आहे.

राज्यात राबविण्यात येत असलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाचाही दाखला पत्रात देण्यात आला आहे. प्रत्येक शाळा अप्रगत विद्यार्थीविहीन करण्यासाठी शाळेतील वातावरण मुलांना शाळेची ओढ लावणारे आणि आनंददायी असले पाहिजे. यासाठी मुलांना आत्मीयतेने वागविणे आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे. आयुक्तांच्या या पत्राबाबत शिक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे.

कारवाईचेही निर्देश

विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षेच्या, मानसिक त्रास किंवा कठोर वागणूक दिल्याच्या तक्रारी आल्यास त्यांची प्रशासकीय पातळीवर तत्काळ दखल घेतली जावी. त्याचा अहवाल शासनास व आयुक्त कार्यालयास त्वरित सादर करावा. त्याचप्रमाणे अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश उपसंचालक, शिक्षणाधीकारी यांना देण्यात आले आहेत. बालकांना शारीरिक शिक्षा व मानसिक त्रासाबद्दल शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) नियम १७ (२)नुसार शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आनंददायी शिक्षण हे कागदावरच राहू नये. शिक्षक, प्रशासन आणि शासन यांच्या प्रामाणिकतेवर हे अवलंबून आहे. शिक्षकांनीही पत्राला अनुसरून आनंददायी शिक्षणावर अधिकाधिक भर द्यायला हवा. शाळेत आलेल्या मुलाला शिक्षण हे अवघड न वाटता आनंददायीच वाटले पाहिजे.

- राजेंद्र वाणी, अध्यक्ष, राज्य शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक समिती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अविश्वासावर आज फैसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत आयुक्त प्रकाश महाजन यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी दिवसभर महापालिकेच्या वर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला. शिवसेना-भाजप नगरसेवकांच्या स्वतंत्र बैठका झाल्या. गटनेत्यांचीही एकत्रित बैठक झाली. दुसरीकडे आयुक्त महाजन यांनी मुंबई गाठले तर, अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

आयुक्त महाजन यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावावरून भाजपमध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे. दुपारी उस्मानपुरा येथील भाजपच्या कार्यालयात नगरसेवकांची बैठक झाली. अविश्वास प्रस्तावाबद्दल भूमिका स्पष्ट करण्यास भाजप पदाधिकाऱ्यांनी नकार दिला. 'उद्या सगळे स्पष्ट होईल,' असे सूचक विधान डॉ. भागवत कराड यांनी केले. मिळालेल्या माहितीनुसार; अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी भाजपा उद्या आपल्या नगरसेवकांना व्हीप बजावणार आहे.

शिवसेनेच्या नगरसेवकांची सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांच्या दालनात जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या उपस्थिती बैठक झाली. प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्याचा व्हीप दानवे यांनी यावेळी नगरसेवकांना बजावला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना जंजाळ म्हणाले, 'प्रस्ताव मंजूर होण्यासाठी ७१ मतांची गरज आहे. आमच्याकडे सध्या ७५ मते आहेत.'

माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहनसिंग ओबेरॉय, एमआयएमचे शहराध्यक्ष जावेद कुरैशी, गटनेते नासेर सिद्दिकी, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप, अफसर खान यांनी महापालिकेत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्याचे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांना ठेंगा

$
0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com

औरंगाबादः राज्यातील तीव्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या राज्यातील सुमारे ३०० खासगी वैद्यकीय, दंत व सर्व पॅथींच्या महाविद्यालयांनी, नर्सिंग कॉलेजांनी प्रत्येकी पाच लाख रुपये द्यावेत, असे लेखी आवाहन विद्यापीठाने तीन आठवड्यांपूर्वीच केले होते. या उपक्रमाद्वारे जमा होणाऱ्या एकूण १५ कोटी रुपयांच्या निधीमध्ये स्वतः एखाद्या कोटी रुपयांची भर घालून दुष्काळग्रस्त भागातील जनता व विद्यार्थ्यांना मदतीचे विद्यापीठाचे नियोजन होते, मात्र आजपर्यंत एकाही महाविद्यालयाने कुठलाच निधी दिलेला नाही किंवा त्यासंबंधी कुठलाही पुढाकार घेतला नसल्याचे समोर आले आहे.

यंदाचा दुष्काळ अत्यंत भीषण समजण्यात येत असून, राज्यातील १४ हजारांपेक्षा जास्त गावे दुष्काळग्रस्त असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळेच असंख्य विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण सोडून मिळेत तेथे आणि मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली आहे. अनेक विद्यार्थी पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे-मुंबई-नाशिकसह आसपासच्या राज्यांमध्येही जात आहेत.

दुसरीकडे विविध संस्था, संघटनांकडून जमेल तशी मदत दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने दुष्काळानिधी देण्याचा आणि त्यासाठी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व ३०० खासगी महाविद्यालयांना सहभागी करून निर्णय घेतला. त्यासाठीच विद्यापीठाने तीन आठवड्यांपूर्वी सर्व खासगी महाविद्यालयांना पत्र पाठवून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आवाहन केले. या महाविद्यालयांमध्ये राज्यातील सर्व खासगी वैद्यकीय महाविद्यालये, सर्व खासगी दंत महाविद्यालये, आयुर्वेद-होमिओपॅथी-युनानी आदी सर्व पॅथींच्या खासगी महाविद्यालयांचा, सर्व खासगी नर्सिंग कॉलेजांचा समावेश आहे. प्रत्येक महाविद्यालयातून पाच लाख रुपये म्हणजेच एकूण १५ कोटींची रक्कम जमा होणे अपेक्षित होते आणि या रकमेमध्ये विद्यापीठाने स्वतः एक कोटी रुपयांची भर घालून दुष्काळग्रस्तांना हातभार लावण्याचे नियोजन केले होते, मात्र अद्याप एकाही महाविद्यालयाने दुष्काळनिधी विद्यापीठाकडे पाठविलेला नाही.

अब्जावधींच्या उत्पन्नानंतरही...

खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे पदवीस्तरावरील एका विद्यार्थ्याचे प्रत्येक वर्षीचे शुल्क हे पाच ते दहा लाखांपर्यंत आहे; म्हणजेच एका विद्यार्थ्याकडून किमान २५ लाख ते ४५ लाखांपर्यंतचे शुल्क घेतले जाते. पदव्युत्तर पदविका व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येक वर्षी १५ ते २० लाख रुपये घेतले जातात; म्हणजेच पदव्युत्तर विद्यार्थ्याकडून किमान ३० ते ६० लाखांचे शुल्क घेतले जाते. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये साधारणतः १००पेक्षा जास्त विद्यार्थीसंख्या आहे व पदव्युत्तर विद्यार्थीसंख्याही सुमारे ४०-५०च्या पुढे आहे. थोड्याबहुत फरकाने हीच परिस्थिती खासगी दंत महाविद्यालयांची आहे. इतर पॅथींचे शुल्कही लाखांमध्येच आहे. खासगी नर्सिंग महाविद्यालयांचे शुल्क प्रत्येक वर्षी प्रत्येकी २० ते ३० हजारांपुढेच आहे. असे असतानाही केवळ पाच लाख रुपयांचा दुष्काळनिधी देण्यासाठी महाविद्यालयांनी हात आखडता घेतला आहे.

विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या ३०० खासगी महाविद्यालयांना प्रत्येकी पाच लाख रुपये दुष्काळनिधी देण्याचे आवाहन तीन आठवड्यापूर्वी केले होते. संपूर्ण निधी दुष्काळग्रस्तांनाच दिला जाणार आहे, मात्र अद्याप एकाही महाविद्यालयाने दुष्काळनिधी दिलेला नाही.

- डॉ. काशिनाथ गर्कळ, रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठ (नाशिक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

MIT व्यवस्थापनाच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना हेल्मेटचे कवच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अपघातात डोक्याला मार लागतो आणि मृत्यू ओढावतो. एखादा तरूण विद्यार्थी आयुष्याचा डाव अर्ध्यावर सोडून जातो. कुटुंबाच्या वाट्याला आलेला हा अनपेक्षित व धक्कादायक क्षण. शहरात गेल्या पाच दिवसांत दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला. यापार्श्वभूमीवर एमआयटी कॉलेजने, प्रत्येक विद्यार्थ्यांनी हेल्मेट वापरावेत, असा नियम केला आहे.

शहरात अपघाताचे प्रमाण वाढते आहे. डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नसल्यामुळे मृत्यू ओढावल्याची उदाहरणे अधिक आहेत. शहरात हेल्मेटची सक्ती नसली तरी, अशा घटनांमधून एमआयटी इंजिनीअरिंग कॉलेजने धडा घेतला आहे. दुचाकी वापरणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्या दिशेने कॉलेजने पाऊल टाकले आहे.

विभागप्रमुखांची बैठक घेऊन याबाबत आराखडा तयार करण्यात येत जात आहे. दुचाकीस्वार विद्यार्थ्याला हेल्मेट असेल तरच कॉलेजमध्ये गाडी पार्क करता येणार आहे. हेल्मेट नसल्यास त्याला दुचाकीसह कॉलेजच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. एमआयटीमध्ये इंजिनीअरिंग, बीटेक, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांचे सुमारे ८,५०० विद्यार्थी आहेत. यापैकी सुमारे ४,२०० विद्यार्थी दुचाकीवरून कॉलेजला येतात. त्यांच्या जीवाची काळजी म्हणून हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

शहरात अपघात वाढले आहेत. डोक्याला मार लागल्यामुळेच अनेकांचा मृत्यू झाला. यामुळे हेल्मेटबाबत जागृती होणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही यावर काम करीत आहोत. शिक्षक, विद्यार्थी, पालकांमध्ये जागृती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हेल्मेटशिवाय आम्ही विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये दुचाकी पार्किंग करू देणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे.

- प्रा. मुनीष शर्मा, महासंचालक, एमआयटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्त हटावमागे आर्थिक गणित?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका आयुक्त प्रकाश महाजन यांना हटवण्यामागे काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या अर्थकारणाचा वास असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. महाजन यांनी काही आक्षेपार्ह फाइल मंजूर करणे टाळले. त्यामुळे अविश्वासाचा भडका उडाल्याची चर्चा आहे.

महापालिकेत आयुक्त, पदाधिकारी-नगरसेवक हा संघर्ष नवा नाही. प्रत्येक आयुक्तांच्या कार्यकाळात किमान एकवेळा तरी हा संघर्ष उदभवतोच. मात्र, आजवर तो अविश्वास प्रस्ताव आणण्यापर्यंत गेला नाही.

महाजन अकार्यक्षम आहेत, नगरसेवकांचा ते अपमान करतात, विकास कामांच्या फाइल त्यांनी निकाली काढल्या नाहीत, मालमत्ता कर वसुलीत विशेष लक्ष देत नाहीत. त्यामुळे स्मार्ट सिटी अभियानात शहराचा टिकाव लागणार नाही, असे आक्षेप अविश्वास प्रस्तावात आहेत. हे आक्षेप फक्त दिखावा असल्याची चर्चा आहे. काही नगरसेवक व काही पदाधिकाऱ्यांच्या वॉर्डातील कामांच्या फाइल आयुक्तांकडे बिल काढण्यासाठी प्रलंबित होत्या. त्याबद्दल आयुक्तांनी त्रुटी काढल्या. या कामांचा दर्जा तपासला पाहिजे, असे मत मांडले. त्यामुळे त्या फाइलमध्ये 'इंटरेस्ट' असलेल्यांचे इगो दुखावले. त्यातून अविश्वास प्रस्तावाला पाय फुटल्याची वार्ता आहे. स्मार्ट सिटी अभियानाच्या निमित्याने मालमत्ता कर वसुलीचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. त्यासाठी महापौरांच्या उपस्थितीत दोन ते तीन वेळा अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. कर वसुलीचे प्रमाण वाढवण्याचा निर्णयही झाला.

अधिकाऱ्यांना वसुलीचे टार्गेट दिले, पण त्यात अधिकाऱ्यांना यश आले नाही. १८ ते २० टक्केच मालमत्ता कराची वसुली झाली. एवढ्या कमी वसुलीबद्दल पालकमंत्री रामदास कदम यांनीही नाराजी व्यक्त केली. कर वसुलीच्या कामाचे खासगीकरण करून, त्या वसुलीचे काम मिळवण्यासाठी एक पदाधिकारी इच्छुक आहे. त्यालाही आयुक्तांचा विरोध आहे. हा विरोध मोडून काढण्यासाठी अविश्वास प्रस्तावाचे हत्यार उगारले असल्याची चर्चा आहे.

पालकमंत्री दाखल

आयुक्तांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ते सोमवारी सायंकाळी शहरात दाखल झाले. सुभेदारी विश्रामगृहात त्यांनी नेते-पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांच्याशी चर्चा केली. अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्याचा व्हीप शिवसेनेने काढला. त्यामुळे खासदार चंद्रकांत खैरे समर्थक नगरसेवकांची कोंडी झाली आहे. खैरे यांचा आयुक्त हटावला विरोध आहे, पण व्हीप काढल्यामुळे खैरे यांचे पुत्र नगरसेवक ऋषिकेश खैरे, नंदकुमार घोडेले, स्वाती नागरे, शितल गादगे यांनाही खैरे यांचा विरोध झुगारून अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करावे लागेल. अविश्वास ठरावावर मतदान घेण्याची वेळ येईल असे गृहीत धरून हर्सूल तुरुंगात असलेले भाजप नगरसेवक राजू तनवाणी यांनाही विशेष परवानगी घेऊन सर्वसाधारण सभेत हजर केले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणपूल बनला धोकादायक

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे बांधण्यात आलेला क्रांतिचौक येथील उड्डाणपूल कमालीचा धोकादायक बनला आहे. या उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्याऐवजी महापालिका आणि रस्ते विकास महामंडळात कलगीतुरा रंगला आहे. उड्डाणपूल महापालिकेकडे हस्तांतरित करण्यापूर्वी महामंडळाने त्याची दुरुस्ती करून द्यावी किंवा दुरुस्तीचा खर्च महापालिकेला द्यावा, अशी मागणी महापालिकेने केली आहे, पण या मागणीला महामंडळाने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.

क्रांतिचौक उड्डाणपूल आणि महर्षी दयानंद चौक ते शहानूरमियॉ दर्गा चौक या रस्त्याचे काम रस्ते विकास महामंडळातर्फे करण्यात आले आहे. उड्डाणपूल आणि हा रस्ता महामंडळाने अद्याप महापालिकेकडे हस्तांतरित केला नाही. हस्तांतरणसंदर्भात महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली २ डिसेंबर २०१४ रोजी मुंबई येथे सुकाणू समितीची बैठक झाली होती. या बैठकीत महामंडळाने क्रांतिचौक उड्डाणपूल आणि महर्षी दयानंद चौक ते शहानूरमियॉ दर्गा चौक हा रस्ता महापालिकेने हस्तांतरित करून घ्यावा, असे आवाहन केले होते, परंतु महापालिकेने याबद्दल त्यावेळी असमर्थता दर्शविली. महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता उड्डाणपूल व तो रस्ता हस्तांतरित करून घेतल्यावर त्यावर काम करावे लागणार आहे. या कामाचा व देखभाल दुरुस्तीचा खर्च रस्ते विकास महामंडळाने द्यावा, असे आवाहन पालिकेने केले होते.

महामंडळ देखभाल दुरुस्तीचा खर्च देणार नसेल तर महामंडळाने स्वतः देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण करून त्यानंतर उड्डाणपूल आणि रस्ता महापालिकेकडे हस्तांतरीत करावा, असेही महापालिकेने म्हटले होते. त्यानंतर यासंदर्भात २५ फेब्रुवारी २०१५ रोजी महापालिकेच्या आयुक्तांनी रस्ते विकास महामंडळाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र पाठवून सुकाणू समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्याची विनंती केली, पण अद्याप महामंडळाने उड्डाणपूल व रस्त्याची देखभाल दुरूस्ती केली नाही व देखभाल दुरूस्तीपोटी महापालिकेला खर्चही दिला नाही. त्यामुळे देखभाल दुरुस्तीचे काम रखडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मला निवेदन देऊ नकाः कुलगुरू

$
0
0

औरंगाबादः 'मला यापुढे कसलेही निवेदन देऊ नका,' असा विद्यार्थी घातकी अजब फतवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुंनी काढला आहे. त्यामुळे समस्या निवारणासाठी दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

विविध प्रश्नांसदर्भात किंवा ते प्रश्न सोडविण्यासाठी विद्यापीठाचे प्रमुख म्हणून कुलगुरुंना विद्यार्थी, प्राचार्य, संघटना विविध निवेदने व पत्र देतात. यापुढे हे पत्र, निवेदन कुलगुरू सचिवालयातील उपकुलसचिव डॉ. जी. आर. मंझा यांच्याकडेच द्यावेत, अथवा तेथील निर्देशित कर्मचाऱ्यांकडेच पोहचते करावे. इतर कार्यालयात अथवा कक्षात कोणतेही निवेदन, पत्रव्यवहार करू नये असे पत्र विद्यापीठाने काढले आहे. प्रभारी कुलसचिव डॉ. एम. डी. शिरसाट यांच्या या पत्राने विद्यापीठात खळबळ उडाली आहे. कुलगुरूंना निवेदन न देता उपकुलसचिवांना निवेदन कसे द्यायचे असा प्रश्न उभा राहिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवेदनामध्ये कुलगुरुंचा वेळ जात असल्याने अन् संघटनांचा वाढता दबाव हे परिपत्रक काढण्यामागचे गणित आहे. आधीच कुलगुरूंना भेटण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते. अनेकदा भेट दिली जात नसल्याचे विद्यार्थी सांगतात. त्यात या पत्रामुळे विद्यार्थ्यांत नाराजीचा सूर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुमाल गॅँगशी नवदुर्गांचा निकराने लढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घराचा दरवाजा तोडला, महिला-मुलांना चाकूचा धाक दाखवत जबर मारहाण केली. आरडाओरडा करू नये म्हणून तोंड दाबले. तरीही नवदुर्गा सासू-सुना शेवटपर्यंत चोरट्यांशी निकराने लढल्या. या पराकोटीच्या झुंजीपुढे शेवटी चोरट्यांनी नांगी टाकली. आणि मिळेल तितकी रोकड घेऊन त्यांना नाईलाजास्तव धूम ठोकावी लागली. हुबेहुब चित्रपटासारखा हा थरार पडेगावमध्ये सोमवारी पहाटे रंगला.

प्रियदर्शनी कॉलनीत शिवदास पवार यांचे तीन मजली घर आहे. दुसऱ्या मजल्यावर पवार आपली आई, पत्नी लक्ष्मीबाई व तीन मुलांसह राहतात. ‌शिवदास पवार रविवारी बाहेरगावी गेले होते. घरी पत्नी, आई व मुले होती. रात्री अकरा वाजता सर्वजण जेवण करून झोपी गेले. तेव्हा रात्री दोनच्या सुमारास त्यांच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून दरवाजाला धक्का देत चारजण घरात शिरले. या चौघांनी तोंडाला रुमाल बांधले होते. लक्ष्मीबाई व इतरांना जाग आल्यानंतर यातील दोघांनी चाकूचा धाक दाखवत दोघींची तोंडे दाबून ठेवली. त्यानंतर लक्ष्मीबाई व त्यांच्या सासूच्या अंगावरील दागिने काढून घेतले. उर्वरित दोघांनी कपाटातील दागिने रोख पाच हजार रुपये, दोन मोबाइल असा जवळपास एक लाख ५७ हजारांचा ऐवज काढून घेतला. या चोरट्यांनी तोंडाला गुलाबी रंगाचे रुमाल बांधले होते. त्यांच्या अंगात लाल, गुलाबी, व पांढऱ्या रंगाचे टी शर्ट होते. दोघांनी फूल पँट तर दोघांनी हाफ पँट घातली होती. अंदाजे पंधरा ते तीस वयोगटातील हे चोरटे मराठीतून बोलत होते.

आठवड्यातील तिसरी घटना

गेल्या आठ दिवसांत घरात शिरून लुबाडण्याची ही तिसरी घटना आहे. बुधवारी दशमेशनगर येथील शांतगंगा कॉम्पलेक्समध्ये दीपेंदू मुखर्जी या आर्किटेक्चरला घरात घुसून चाकूचा धाक दाखवत साडेतीन लाखांचे दागिने पळविले होते. यानंतर त्याच परिसरात गुरुवारी पहाटे मिश्रीलाल बरडिया या वयोवृध्दाच्या घरात घुसून चार चोरट्यानी लाखोंचा ऐवज पळवला होता. पडेगावात हीच पुनरावृत्ती घडली.

रणरागिणींनी केला प्रतिकार

चोरट्यानी चाकूचा धाक दाखवत आवाज केला तर, मुलांना व तुम्हाला गोळ्या घालू अशी धमकी दिली. दोघींचे तोंड दाबून ठेवले. यावेळी लक्ष्मीबाई यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी त्यांना मारहाण करीत त्यांचा हात पिरगाळला. यामध्ये त्यांची दोन बोटे फ्रॅक्चर झाली. ही संधी साधून त्यांच्या सासूने देखील चोरट्याचा तोंडावरील हात बाजूला करीत आरडाओरड केली. हा वाढता प्रतिकार पाहून मिळेल तो ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. वरती राहणारे भाडेकरू खाली धावत आले. त्यांनी तत्काळ नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. घटनास्थळी पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, पोलिस निरीक्षक चंद्रकांत सावळे, विजय घेरडे, अनिल कुरुंदकर आदींनी भेट दिली. छावणी पोलिस ठाण्यात या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीचोराला जालन्यामध्ये अटक

$
0
0

जालना : औरंगाबाद जिल्ह्यासह जालना, भोकरदन भागामध्ये दुचाकी चोरणाऱ्या एका अट्टल दुचाकीचोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीच्या १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

स्वप्नील दशरथ सागळे (रा. सिंदखेडराजा जि. बुलडाणा) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली होती. स्वप्नीलकडे चोरीच्या दुचाकी असल्याचे सांगण्यात आले होते. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी स्वप्नीलला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच त्याने मोटारसायकल चोरी करत असल्याची कबुली दिली. पोलिस अधीक्षक राहुल माकनिकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हमी भावाने शेतकऱ्यांची बोळवण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

राज्य सरकारने १४,७०८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करताना, अनेक सवलती जाहीर केल्या. मात्र, सरकारकडून जाहीर करण्यात आलेला हमी भाव बाजारभावापेक्षा कितीतरी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

दुष्काळामध्ये शासनाकडून सवलत मिळावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, शासनाने जाहीर केलेला हमी भाव आणि बाजार पेठेतील शेतीमालाचे भाव यामध्ये यंदा दुपटीहून जास्त फरक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हमी भाव जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केल्याची भावना शेतकऱ्यांतून बळावत चालली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार अशा प्रकारचे हमी भाव खरेदी केंद्र सुरू करतात. अशा खरेदी केंद्रातील हमीभाव हे बाजार पेठेतील दरापेक्षा सुमारे दहा वीस टक्के अधिक असतात. परंतु, यंदा हमी भाव व बाजार भाव यात कमालीची तफावत असल्यामुळे हमी भाव खरेदी केंद्राची वाट ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर नाही. त्यामुळे आजच्या स्थितीत आतुन बाजारात शेतीमालाचे दरहे हमी भावापेक्षा दुप्पटीने अधिक आहेत.

यंदा शेतीमालाला जाहीर करण्यात आलेला हमीभाव हा शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. हमीभावापेक्षा बाजारपेठेतील दर फारच चढे आहेत. केंद्र सरकारने यंदा जाहीर केलेला हमी भाव हा शेतकऱ्यांना कंगाल करणारा, तर व्यापाऱ्यांना मालेमाल करणारा आहे.

- ताराचंद डुंगरवाल, शेतकरी, पारगाव मोट्याचे ता. वाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-नगरकरांनो, जालन्यातील टंचाई पाहा

$
0
0

सुरेश कुलकर्णी, जालना

जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यावरून मोठा वादंग माजला असताना, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मात्र पाण्यासाठी दाहीदिशा कराव्या लागत आहेत. पाणी सोडण्यावरून नगर-नाशिकमधून प्रतिक्रिया उमटल्यानंतर, जालना जिल्ह्यामध्येही हक्काच्या पाणी सोडण्याविषयीचे पडसाद उमटू लागले आहेत. जालना जिल्ह्यातील पाण्याची परिस्थिती विदारक असून, हक्काचे पाणी मिळायलाच हवे, यावर जिल्ह्यातील जनता ठाम असल्याचे दिसून येते. त्यामुळे मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध करणाऱ्या नगर, नाशिकच्या नेत्यांनी जालन्यामध्ये येऊन टंचाईचा अनुभव घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

जायकवाडी धरणापासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जालना जिल्ह्यासाठी पाणीटंचाई नवीन नाही. मात्र, गेल्या चार वर्षांमध्ये जिल्ह्यात अभूतपूर्व पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या जालना शहरामध्येही तीन-चार आठवड्यांमध्ये एकदा पाणी येत असल्याचा अनुभव जनतेने घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये शेतीसाठी विशेषत: द्राक्षे आणि ऊसासाठी पाणी सोडले जात असताना, मराठवाड्यामध्ये पिण्यासाठीही पाणी मिळत नसल्याकडे अनेकांनी लक्ष वेधले आहे. जिल्ह्यातील सरासरी भूजल पातळी सहा मीटरपेक्षा खाली गेली आहे. ही परिस्थिती गंभीर असल्याचे मानण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


५ मुख्याध्यापकांच्या वेतनवाढी रोखल्या?

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

पंचायत राज समितीसमोर सादर करावयाची कागदपत्रे मागूनही न दिल्यावरून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पैठण तालुक्यातील तत्कालीन मुख्याध्यापकांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी रोखली आहे. ऑडिटरने मागणी करूनही संबंधितांनी कागदपत्रे दिली नव्हती. याची गंभीर दखल घेऊन पीआरसीने या तत्कालीन मुख्याध्यापकांच्या वेतनवाढी रोखल्याचे कळते.

पीआरसी येण्यापूर्वी ऑडिट पॅरातील त्रुटी दूर करण्याची कार्यवाही सुरू होती. पैठण तालुक्यातील पाच शाळांमधील विद्यमान मुख्याध्यापकांकडे रेकॉर्ड मागितले गेले. कारण तत्कालीन मुख्याध्यापक केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी आणि काहीजण सेवानिवृत्त झाले होते. पाच शाळांमधून कुठलीच माहिती मिळाली नाही. ऑडिटरने मागणी करूनही पुरविली गेली नाही. उलट तत्कालीन मुख्याध्यापकांनी आमच्याकडे कुठे रेकॉर्ड आहे, ती आमची जबाबदारी नाही. शाळेतूनच तपासून घ्या, अशी उत्तरे दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याची दखल घेऊन कारवाई प्रस्तावित केली गेली. पीआरसीने त्यावर शिक्कामोर्तब केले आणि वेतनवाढ रोखली तसेच त्यांच्या सर्व्हिसबुकावर नोंद केली जाणार आहे.

३ केंद्रप्रमुखांवर गंडांतर

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील तीन केंद्रप्रमुखांवरही कारवाई प्रस्तावित केली आहे. यावेळी पैठण तालुका रडारवर असल्याचे संकेत यानिमित्ताने मिळाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरवाजा न बसवल्याने बंधाऱ्यात पाणी थांबेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

गणोरी येथील नदीवर बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याला दरवाजे बसवले नसल्याने पाणी वाहून जात आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना या बंधाऱ्याचा काहीच उपयोग होणार नाही.
तालुक्यातील गणोरी येथे २०१२-१३ आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे जुन्या शाळेजवळ सिमेंट बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे शेजारच्या शेतकऱ्याची वाट बंद झाली. पण पाणी साचल्यास उपयोग होईल, या भावनेतून शेतकऱ्यांनी गैरसोय सहन करून बंधाऱ्यासाठी पुढाकार घेतला. बंधारा बांधल्यानंतर परिसरात गेल्या सप्टेंबरमध्येच मोठा पाऊस झाला. त्यामुळे सात वर्षानंतर गणोरी नदीला पाणी खळखळुन वाहत आहे. पण नदीवरील बंधाऱ्याला दार न बसवल्याने ते वाहून जात आहे. येथे दार बसवावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेमध्ये चोरीचा हतनूरमध्ये प्रयत्न

$
0
0

कन्नडः तालुक्यातील हतनूर येथील प्राथमिक शाळेतील शालेय पोषण आहाराच्या खोलीची भिंत फोडून पत्रे उचकटण्याचा प्रयत्न सोमवारी (१९ ऑक्टोबर) मध्यरात्री घडला. सिमेंट-विटांचे तुकडे खोलीत पसरल्याने शाळेतील ३०० विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन दिले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपासमार झाली. यापूर्वी १२ सप्टेंबर रोजी ध्वजारोहणाचा खांब पाडून भिंतींना भगदाड पाडले होते. त्यावेळी शाळा व्यवस्थापनाने काळजी न घेतल्याने पुन्हा हा प्रकार घडल्याची टीका गावकरी व पालकांनी केली आहे. शाळेतील बहुतांश विद्यार्थी शेतवस्तीवरून येणारे असल्याने त्यांना उपाशी पोटी राहावे लागले. यामुळे काही पालक संतप्त झाले होते. याप्रकरणी पोलिसात तक्रार दिल्याचे मुख्याध्यापक पुंडलिकराव शेळके यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वालाखाचा ऐवज लंपास

$
0
0

शहरात दिवसाढवळ्या तीन घरफोड्या

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात तीन घरफोड्यात चोरट्यांनी सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला आहे. उस्मानपुरा, टिळकनगर व पद‍््मपुरा भागात या घटना घडल्या. यापैकी सोमवारी दिवसाढवळ्या दोन घरफोड्या घडल्या. या प्रकरणी उस्मानपुरा, जवाहरनगर व क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दर्गा रोड, दीपनगर येथील गोदावरी कॉम्प्लेक्समधील रहिवासी शलाका राजेश निलंगेकर (वय ४५) या सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता भाजी खरेदी करण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. काही वेळातच त्या घरी परतल्या. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचा कडीकोंडा तोडून प्रवेश केला. कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ८० हजारांचा ऐवज यावेळी लंपास करण्यात आला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत टिळकनगर येथे १८ हजाराचा ऐवज चोरून नेण्यात आला. दीपाली शिरीष गोडबोले (रा. विष्णू अपार्टमेंट) यांचे घर चोरट्यांनी सोमवारी सकाळी नऊ ते एकच्या दरम्यान फोडले. त्यांच्या घरातून १८ हजार रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम पळवण्यात आली. जवाहरनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पद‍््मपुरा परिसरात बुधवार ते रविवार या दरम्यान गणेश बेडवाल यांच्या घरी घरफोडी झाल्याची घटना घडली. यामध्ये चोरट्यांनी त्यांच्या कपाटातील रोख बारा हजार व दागिने असा १९ हजार रुपयाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी त्यांनी सोमवारी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. हरि नरके यांची नियुक्ती बेकायदा

$
0
0

औरंगाबाद : राज्य मागासवर्ग आयोगाचे अपात्र सदस्य प्रा. हरि नरके यांची बेकायद व घटनाबाह्य नियुक्ती त्वरित रद्द करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी प्रबोधिनीने केली आहे. याबाबत औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देण्यात आले.

राज्य मागासवर्ग आयोग कायदा, २००५ च्या कलम ३ (२ क) अन्वये आयोगाच्या सदस्यात इतर मागासवर्गाचा एक सदस्य नियुक्त करणे अनिवार्य आहे. इतर मागासवर्गातील व्यक्तीसाठी आरक्षण आहे. मात्र, राज्य शासनाचे नियम व निर्णय आणि घटनात्मक तरतुदीनुसार ती व्यक्ती इतर मागासवर्गातील जातीत जन्मलेला असणे आणि उत्पन्न व दर्जा क्रिमिलेअरच्या मर्यादेपेक्षा कमी असणे या दोन अटी आहेत. या नियमांची पूर्तता नसल्यास व्यक्ती खुल्या प्रवर्गातील मानली जाते. आरक्षित जागी इतर मागासवर्गातील सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी त्यांचे नॉन क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. या तरतुदीनुसार प्रा. हरि नरके यांची इतर मागासवर्गातील व्यक्ती म्हणून २००९ पासून आजपर्यंत राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती केलेली आहे. मात्र प्रा. नरके पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नियमित सेवेत वरिष्ठ प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांचे उत्पन्न व दर्जा (प्रथम श्रेणीचे पद) क्रिमिलेयरच्या मर्यादेपेक्षा अधिक आहे. नियुक्तीच्या दिवशीही त्यांचे उत्पन्न व दर्जा मर्यादेपेक्षा अधिकच होते. त्यामुळे सदस्य पदासाठी इतर मागासवर्गातील व्यक्ती म्हणून प्रा. नरके पूर्णपणे अपात्र आहेत. परिणामी, त्यांची नियुक्ती बेकायदेशीर व घटनाबाह्य आहे. पात्र नसताना आरक्षित जागी नियुक्ती करून घेणे ही शासनाची फसवणूक असून घटनेतील तरतुदीनुसार गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी छत्रपती शिवाजी प्रबोधिनीने केली आहे. याबाबत प्रबोधिनीचे संचालक बाळासाहेब सराटे यांनी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images