Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

७० हजारांचा ऐवज घरफोडीत लंपास

$
0
0

पैठणः शुक्रवारी रात्री चार चोरट्यांनी शहरात दोन ठिकाणी घरफोडी करत सत्तर हजाराचा ऐवज चोरून नेला. चार ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. शहराच्या मध्यभागी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गणेश रामदास माळवदकर हे शहरातील कापड मंडई परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहतात. शुक्रवारी रात्री ते रुममध्ये झोपले होते. चोरट्यांनी त्यांच्या बंद असलेल्या रुमचा दरवाजा खोलून रूममधील ४५ हजाराचा ऐवज चोरून नेला. कापड मंडई येथे चोरी केल्यावर चोरट्यांनी त्यांच्या मोर्चा मेन रोड कडे वळवला, मेन रोडवरील अजीम किराणा, दिनेश माळवे ची रेशन दुकान व उस्मान बागवान यांच्या दुकानं फोडण्याचा चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. या दुकान फोडण्यात अयशस्वी झाल्यावर चोरट्यांनी कुंभारवाडा येथील अलका प्रभाकर पंजावले यांच्या बंद असलेल्या घराचा कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सतरा हजाराचा ऐवज चोरून नेला. लग्ननिमित अलका पंजावले या नातेवाईकाकडे गेल्या होत्या. शहरातील मध्यभागी असलेल्या भागात चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे व भीतीचे वातावरण पसरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अत्याचारप्रकरणी तरुणास अटक

$
0
0

औरंगाबादः मित्राच्या विवाहित बहिणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका तरुणाविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत प्रमोद भांबरे (वय २५, रा. त्रिवेणीनगर, जिन्सी) असे अत्याचार करणाऱ्या तरुणाचे नाव असून, त्यास अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पिडीत २५ वर्षीय तरुणीचा विवाह २०११ मध्ये झाला आहे.

मात्र, पाच ते सहा महिन्यानंतर घरगुती कारणामुळे ती माहेरी राहत होती. या दरम्यान, पिडितेच्या भावासोबत प्रशांत भांबरे याची ओळख झाली. भांबरे एका नर्सिंग कॉलेजात शिक्षण घेत असून, पिडितेचा भाऊ मित्र असल्याने त्याची त्यांच्या घरी ये-जा होती. त्यातूनच संशयित आरोपी व पिडितेची ओळख झाली. दरम्यान, लग्नाचे आमिष दाखवत प्रशांतने तिच्याशी जवळीक निर्माण केली व अत्याचार केला, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रशांत भांबरे यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक शशीकांत तायडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बैठकीनेच आटोपला सेनेचा दौरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

प्रशासनावर सेनेचा अंकुश राहावा याच उद्देशाने सेनेकडून प्रशासकीय कामाची झाडाझडती सुरू करण्यात आली असल्याचे उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी उस्मानाबादेत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्यासोबतच शिवसेनेच्या आमदारांनी प्रत्यक्षात दुष्काळी भागाची पाहणी न करता आढावा बैठकीतच हा दौरा आटोपला.

जिल्हा संपर्कप्रमुख गौरीश शानबाग, सेना जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, तसेच जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांची यावेळी प्रमुक उपस्थिती होती. राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचतात किंवा नाही याचे ऑडीट करण्यासाठी सत्ताधारी शिवसेना पक्षाच्यावतीने आयोजित शासन व प्रशासन यांच्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. दीपक सावंत हे बोलत होते.

दुष्काळग्रस्तांना मदत देण्याचा सक्षमकृती आराखडा तयार करण्याच्या उद्देशानेच सेनामंत्री, खासदार, आमदार आणि प्रशासनातील अधिकारी यांची उस्मानाबाद येथील सर्किट हाऊसवर एका बंद खोलीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. शासन व प्रशासन यातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येऊ नये यासाठी या बैठकीला पत्रकारांना मनाई करण्यात आली होती. सेना खासदार रवींद्र गायकवाड हे या पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या बैठकीलाही अनुपस्थित होते. लोकसभा कामकाजात ते व्यस्त असल्यामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही, अशी सारवासारव यावेळी पक्षाच्यावतीने करण्यात आली. शनिवार व रविवार लोकसभा कामकाज बंद असते याचे भानही त्यांना नव्हते.

शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. त्यांच्यात कसलाही बेबनाव नाही. शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे. सेनेच्यावतीने काही उपक्रम स्वतंत्रपणे राबविण्यात येतात. त्यातूनच सेनाप्रमुखाने प्रशासनावर शिवसेनेचा अकुंश राहावा, या उद्देशानेच या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यातून शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठीच मदत होणार आहे. पिण्याचे पाणी, जनावराला चारा, हाताला काम आणि रेशनिंगचा पुरवठा याबाबतीत शिवसेना सतर्कपणे काम करणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

सेनेचे जिल्हाप्रमुख यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी समवेत जिल्ह्यातील दुष्काळी भागांचा दौरा केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील सर्व कामाची माहिती घेतली आहे. जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा करून प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध कामांची पाहणी केली आहे. त्यामुळे आज जिल्ह्यात पुन्हा नव्याने पाहाणी दौरा करण्याची फारशी गरज नाही, असा डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात एकूण आठ आमदार येणे अपेक्षित होते. ज्ञानराज चौगुले व नारायण पाटील (करमाळा) हे दोन आमदार दौऱ्यात सामील झाले आहेत. काही आमदार परस्पर त्यांना दिलेल्या सुचनानुसार त्या-त्या तालुक्यात जाऊन दौरा करून आपला अहवाल जिल्हाध्यक्षाकडे सादर करतील, अशी सारवासारव डॉ. दीपक सावंत यांनी अनुपस्थित आमदारासंदर्भाने बोलताना केली.

या उपक्रमातून समोर येणारी माहिती व सूचना शासनाला सादर करून त्याचा प्रभावीपणे अंमल करण्यासाठी उपयोग होईल. चाराछावणीची गरज लक्षात घेऊन प्रशासन छावणी उभारण्यास मंजुरी देत आहे, असेही डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

आढावा बैठकीचे घाणेरडे नियोजन

पालकमंत्री आढावा बैठक घेणार आहेत याची कल्पना शुक्रवारी सायंकाळपर्यंत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रशासनाच्यावतीने आणि शिवसेनेच्यावतीने देण्यात आली नाही. यानंतरही सदरील आढावा बैठकीचे निमंत्रण काही जणांना जिल्हाधिकारी कार्यालय, तर काहींना सेंट्रल बिल्डिंगमध्यग देण्यात आले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना धावपळ करावी लागली.

सर्किट हाऊसला छावणीचे स्वरूप

पालकमंत्र्यासह सेनेचे आमदार दुष्काळस्थितीबाबत आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी लोकप्रतिनिधींना दुष्काळग्रस्तांपासून रोखण्यासाठी म्हणून सर्किट हाऊसवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एवढेच नव्हे तर दंगल नियंत्रण पथकही बोलाविण्यात आले होते.

पाहणी दौऱ्यात काहीकाळ तणाव

कळंब तालुक्यातील इटकूरमध्ये शेतकरी आणि जिल्हाधिकाऱ्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. जलयुक्त शिवारमध्ये बोगस कामे झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. हा प्रकार सावंत यांच्यासमोर घडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योजनांचा २५ टक्के पैसा पडून राहतो!

$
0
0

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची खंत

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'विविध योजनांसाठी देण्यात येणाऱ्या निधीपैकी २५ टक्के निधी पडून राहतो. त्यामुळे तो परत जातो. याला जेवढे अधिकारी जबाबदार, तेवढेच नागरिकही,' अशी खंत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केली. ते कनिष्ठ अभियंता संघटनेच्या ६१ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलत होते.

श्रीहरी पव्हेलियनमध्ये आयोजित मेळाव्याच्या उदघाटनासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार अतुल सावे, सतीश चव्हाण, संघटनेचे मारोती तेलंग, सत्तार खान यांची उपस्थिती होती. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, 'निधी दिला जातो. मात्र, तो अनेदा खर्च होत नाही. २५ टक्के निधी परत जातो. यामागे अधिकारी आहेत. तर नागरिकही याबाबत जाब विचारत नाहीत. कनिष्ठ अभियंत्यांनी सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत. कनिष्ठ अभियंता हा सर्वच क्षेत्रासाठी महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या पदोन्नतीचा तसेच इतर प्रश्न येत्या मार्चपर्यंत सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.' राज्यमंत्री शिवतारे म्हणाले, 'जलसंधारणाच्या कामात आजपर्यंत शेकडो कोटी रुपये खर्च केले गेले. मात्र, त्याचा योग्य लाभ मिळू शकला नाही. आपले हक्क मिळत राहतीलच, पण आपली भूमिकाही योग्य रितीने पाळली पाहिजे, याकडे अभियंत्यांनी लक्ष द्यावे.' बागडे म्हणाले, 'निधी परत जातो, लॅप्स होतो. ही गोष्ट टाळण्यासाठी शासनाने ट्रेंडर प्रक्रियेची जाहिरात काढण्याच्या वेळापत्रकाबाबतची नियमावली तयार करावी. अभियंत्यांच्या कामाबाबत अनेक उणिवा आहेत. तर, मराठवाड्यातील इंग्रजांच्या काळातील बांधकामे आजही चांगली आहेत. याचा विचार करत हक्कासह कर्तव्याचीही जाण असू द्या.' या अधिवेशनात दुष्काळासाठी एक दिवसाचा पगार देण्याचे कनिष्ठ अभियंत्यांनी जाहीर केले.

दोन पक्ष नावालाच

'शिवसेना-भाजप एका अर्थाने नावालाच दोन पक्ष आहेत. दोन्ही मिळून आम्ही एकच आहोत,' असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. कनिष्ठ अभियंता संघटनेचे अध्यक्ष तेलंग यांच्या भाषणाचा धागा पकडत त्यांनी त्यांच्या प्रश्नांची उकल करण्याच्या पद्धतीला दाद देत, राजकारणात येण्याचा सल्ला दिला.

ब्लॅकमेल केले जाते

'सगळेचे अभियंते चुकीचे काम करतात असे नाही. चांगले काम करूनही आम्हाला अनेकदा ब्लॅकमेलिंग केले जाते,' असे स्वागताध्यक्ष सत्तार खान आपल्या भाषणात म्हणाले. 'आम्हाला सरंक्षण द्या, त्याबाबत निर्णय घ्या, त्याला कायद्याच स्वरुप द्या,' अशी मागणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रीनफिल्डवरून रस्सीखेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी अभियानातले ग्रीनफिल्डचे काम चिकलठाण्यात करायचे की नक्षत्रवाडीत, यावरून महापालिका पदाधिकारी व प्रशासनात रस्सीखेच सुरू आहे. राज्य सरकारकडे स्मार्ट सिटीचा प्रस्ताव पाठवण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे. त्यामुळे पालिकेने प्रस्तावासाठी ४ दिवसांची मुदतवाढ मागून घेतली आहे. तर राज्य शासन १५ डिसेंबर पर्यंत हा प्रस्ताव केंद्राला सादर करणार आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात राज्यातील ज्या १० शहरांचा समावेश करण्यात आला आहे त्यात औरंगाबाद शहर आहे. स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषानुसार काम करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेला सविस्तर प्रस्ताव तयार करावा लागणार आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या १० टक्के नागरिकांचे मत जाणून घेऊन महापालिकेने स्मार्ट सिटीसाठीचा प्रस्ताव तयार करणे गरजेचे आहे. शहराची लोकसंख्या १५ लाख गृहीत धरली तर, किमान दीडलाख नागरिकांच्या मतांचे प्रतिबिंब स्मार्ट सिटीच्या प्रस्तावात पडणे गरजेचे आहे. आता पर्यंत ८० हजार नागरिकांपर्यंतच महापालिका आणि पीएमसी पोचली आहे, त्यामुळे प्रस्ताव तयार करण्यात अडचणी येत आहेत. राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी ४ दिवसांची मुदत वाढवून द्या, अशी विनंती महापालिकेने राज्य सरकारकडे केली आहे. स्मार्ट सिटी अभियानाचे महापालिकेचे नोडल ऑफिसर सिकंदर अली यांनी ही माहिती दिली.

स्मार्ट सिटीअंतर्गत ग्रीन फिल्डचा प्रकल्प विकसित करण्याचे महापालिकेने ठरवले आहे. त्यासाठी नक्षत्रवाडी व चिकलठाणा अशा दोन जागा सुचविण्यात आल्या आहेत. नक्षत्रवाडी भागात शासकीय जमीन असल्यामुळे त्या जमिनीचा ताबा मिळणे सहज शक्य आहे, असे प्रशासनाचे मत असून ग्रीन फिल्डसाठी नक्षत्रवाडीच्या जागेचा प्रस्ताव पाठवावा, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

चिकलठाणा आवाक्याबाहेर

पदाधिकारी व नगरसेवक मात्र चिकलठाणाच्या जागेसाठी आग्रही आहेत. चिकलठाणा परिसरात शासकीय जागा नाही, खासगी जागांचे भूसंपादन करून त्या ठिकाणी ग्रीन फिल्डचा प्रकल्प राबवावा लागणार आहे. चिकलठाणा भागातील जमिनीच्या किंमती लक्षात घेता भूसंपादनाची प्रक्रिया करणे पालिकेच्या आवाक्याच्या बाहेर असल्याचे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहानूरवाडीत व्हॉल्व्ह फुटला

$
0
0

औरंगाबादः दोनशे मिलिमीटर व्यासाच्या पाइप लाइनचा व्हॉल्व्ह निखळल्याने शहानूरमियॉ दर्गा परिसरातील नागरिकांना शनिवारी निर्जळीला समोरे जावे लागले. पाइप लाइन मधून लाखो लिटर पाणी वाया गेले.

शहानूरमियॉ दर्गा परिसरात ३५० मिलिमीटर व्यासाची पाइप लाइन टाकण्यात आली आहे. या पाइप लाइन मधून तेथील जलकुंभाला जोडणी देण्यात आली असून, जोडणीसाठी २०० मिलिमीटर व्यासाची स्वतंत्र पाइप लाइन टाकली आहे. या पाइप लाइनवर बसवण्यात आलेल्या व्हॉल्व्हला आज सकाळी गळती लागली. त्यामुळे पाणी वाया गेले. जलकुंभही भरला नाही. या जलकुंभातून राजनगर, शिवराजनगर, मयूरबन कॉलनी, केशवनगरी, गुरुकृपा हौसिंग सोसायटी, चाणक्यपुरी या परिसराला पाणीपुरवठा होणार होता, पण तो झाला नाही. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीतर्फे सायंकाळी व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या आमिषाने दोन युवकांना लाखोंचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन युवकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी क्रांतिचौक तसेच हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

नंदनवन कॉलनीतील सुधाकर यशवंत साठे या युवकास नोकरीचे आमिष दाखवत शेख हदी शेख मजहर (रा. जुना पोस्ट) याने ५ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातली. तशी तक्रार हर्सूल पोलिस ठाण्यात शुक्रवारी दाखल झाली. साठे काही वर्षांपासून नोकरीच्या शोधात होता. तो शेख हदी याच्या संपर्कात आला. एका खासगी शैक्षणिक संस्थेत नोकरीस असलेल्या शेखने चांगल्या पगाराची नोकरी लावून देतो, अशी थाप मारली. त्यावर फिर्यादीने विश्वास ठेवला आणि २६ ऑक्टोबर २०१३ पासून ते मार्च २०१५ या कालवधीत टप्प्याटप्याने शेख हदीला ५ लाख ५० हजार रुपये दिले. मात्र, पैसे दिल्यानंतरही नोकरी मिळाली नाही. त्यात शेख हदी हा टाळाटाळ करत असल्याचे लक्षात येताच फिर्यादी साठे याने पैशांची मागणी करत त्यासाठी पाठपुरावा केला. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साठे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. सुरुवातीला आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास केला. नंतर शुक्रवारी आरोपी शेख हदी शेख मजहरच्या विरोधात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शेख गेल्या काही दिवसांपासून पसार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक हाश्मी यांनी सांगितले. दुसऱ्या घटनेत जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील रहिवासी जालिंदर शेषराव शहाणे या बेरोजगार युवकाचीही फसवणूक झाली. संशयित आरोपी भरत दिनानाथ वाहुळ याने कंपनीत शिपाई म्हणून कायमस्वरुपी नोकरी लावून देतो, अशी थाप मारत त्यास १ लाख २० हजार रुपयांना गंडवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्धव ठाकरे आज जालना दौऱ्यावर

$
0
0

औरंगाबादः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी (ता. २९) जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यात दौऱ्यात उद्धव यांच्या हस्ते दुष्काळपीडित शेतकऱ्यांना रोख आर्थिक मदत करण्यात येईल. जिल्ह्यातील केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने चाललेल्या विविध लोकोपयोगी कामांची झाडाझडतीही ते स्वतः दौरा करून घेणार आहेत. शिवसेनेचे सर्व दहा मंत्री आणि साठ आमदार तसेच पक्ष संघटनेतील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. यातील तालुकानिहाय आमदार आणि शिवसेना पदाधिकारी यांचे पथक दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करून विशेष अहवाल तयार करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुकानासमोर कचरा टाकल्यास परवाना रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुकानासमोर कचरा टाकल्यास सुरुवातीला जबर दंड आकारला जाईल. त्यानंतरही कचरा टाकणे सुरू राहिल्यास दुकानाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशाने सोमवारपासून ही कारवाई केली जाईल.

स्वच्छ शहरासाठी केंद्रेकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सुरुवातीला अधिकारी, कर्मचाऱ्यांना साफसफाईच्या कामाला लावले. महापालिका परिसर स्वच्छ केला. आता शहरातील व्यावसायिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख शिवाजी झनझन यांना दिले आहेत. सुरुवातीचे दोन-तीन दिवस सर्व व्यावसायिकांना तोंडी सूचना केली जाईल. त्यांनी आपल्या दुकानातील ओला आणि सुका कचरा दुकानातच वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये जमा करावा, महापालिकेची गाडी आल्यावर त्या गाडीच्या स्वाधीन करावा, असे आवाहन केले जाईल. त्यानंतरही दुकानदारांनी कचरा रस्त्यावर टाकणे सुरूच ठेवले तर त्यांना जबर दंड आकारला जाणार आहे. दंड आकारणीनंतरही दुकानदारांमध्ये सुधारणा झाली नाही तर दुकानाचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे. यापुढे शहरात कोणत्याही ठिकाणी ४ ते ६ तासांपेक्षा जास्त काळ कचरा साचलेला दिसून येणार नाही. कचरा तत्काळ उचलण्याची कार्यवाही केली जाईल. ओला कचरा महापालिकेच्या उद्यानांमध्ये जमा करून त्याचे खत करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. शहर पूर्णतः स्वच्छ राहील याकडे येत्या काळात कटाक्षाने लक्ष दिले जाणार असून, त्यात नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

नारेगावात लाइट सुरू

नारेगावात पथदिवे नव्हते, त्यामुळे अंधाराचे साम्राज्य परसलेले होते. या बद्दल शुक्रवारी तेथील नागरिकांनी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे तक्रार केली होती. उद्या सायंकाळ पर्यंत ५० खांब उभे करून त्यावर दिवे बसवले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार आज खांब लावून दिवे बसवण्यात आले. एखादे काम एवढ्या तत्परतेने होण्याची पालिकेच्या इतिहासातही ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अयोध्येत राम मंदिर उभारा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्याचा निर्णय संसदेने त्वरित घ्यावा. या मंदिराची उभारणी हीच अशोक सिंघल यांना खरी श्रध्दांजली ठरेल,' असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी रविवारी केले.

अशोक सिंघल यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे खडकेश्वर मंदिर परिसरात श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मार्गदर्शक शिवाजीराव शेरकर, देवगिरी प्रांत अध्यक्ष संजय बारगजे, प्रांत मंत्री अनंत पांडे यांच्यासह विविध धर्माचे धर्मगुरू उपस्थित होते.

डॉ. प्रवीण तोगडिया म्हणाले, 'सोमनाथ मंदिराच्या निर्माणाबद्दल त्यावेळच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. त्याच प्रकारे सध्याच्या संसदेने व केंद्रीय मंत्रिमंडळाने अयोध्येत राममंदिर उभारण्याचा निर्णय घ्यावा. आता यापुढे देश हिंदू मुल्यांच्या आधारावरच चालेल. त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. अशोक सिंघलांसाठीची ही शोकसभा नाही, तर हिंदूंच्या विजयी यात्रेच्या संकल्पाची सभा आहे. सिंघल यांचे निधन ही दुखःद घटना असली तरी या घटनेला हिंदू विजय अभियानात आपल्याला परिवर्तीत करायचे आहे. समृध्द भारत, सुरक्षित भारत, स्वाभिमानयुक्त भारत आम्हाला पाहिजे. सिंघल राम जन्मभूमी आंदोलनाचे सेनापती आणि संत देखील होते. एकच व्यक्ती संत आणि सेनापती असू शकत नाही, पण हे दोन्हीही गुण त्यांच्यात होते. हेच त्यांचे वैशिष्ट्य.'

आमिरला टोला

आमिर खानच्या नावाचा उल्लेख न करता डॉ. तोगडिया म्हणाले, 'दुसरे लोक हा देश सोडून जाऊ शकतात, पण हा देश कुणाचा आहे हे कर्नल महाडिक यांच्या परिवाराने स्पष्टपणे आपल्या कृतीतून आणि उक्तीतून सांगितले आहे. कर्नल महाडिक यांचा परिवार या देशाची ओळख आहे,' असा उल्लेख करत त्यांनी आमिर खानला टोला लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील सर्व रस्त्यांवर अंधारयात्रा; पथदिवे बंदच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील कोणत्याही मूलभूत सुविधा नागरिकांना व्यवस्थितपणे द्यायच्याच नाहीत, असा जणू महानगरपालिकेने निर्धारच केला असल्याचे पालिकेच्या कारभारावरून दिसते. रस्ते चांगले नाहीत, पाण्याची दररोज शहरात कुठे ना कुठे ओरड असतेच. त्यात भरीसभर म्हणून आता रस्त्यावरील पथदिवे रात्रीच्याच वेळी बंद असतात. शहरातील सुमारे २० हजार पथदिवे रात्रभरात एकदाही लुकलुकत नाहीत.

तब्बल ३० कोटी रुपये खर्चून तयार केलेला रेल्वेस्टेशन ते क्रांतिचौक हा बाळासाहेब ठाकरे, व्हिआयपी रोडवरील पथदिवे सध्या बंद आहेत. रोपळेकर चौक ते चेतक घोडा मार्ग, चेतक घोडा ते जवाहर कॉलनी चौक, शहानूर मियाँ दर्गा ते विभागीय क्रीडा संकुलासमोरील रस्ता, जकात नाका, आझाद चौक ते पोलिस मेस चौकाकडे जाणारा रस्ता या सर्वच रस्त्यांवरील पथदिवे सध्या बंद आहेत.

शहराच्या मुख्य रस्त्यासह पुंडलिकनगरचा रस्ता, रेल्वे स्टेशन भागातील रस्ते, याशिवाय जालना रोडवरील उड्डाणपुलावर लावण्यात आलेले पथदिवे वगळता अन्य सर्वत्र पथदिवे बंद आहेत. या पथदिव्यांची मागील काही वर्षात देखभाल दुरूस्ती करण्याचे काम महापालिकेचे आर्शिवाद लाभलेल्या कंत्राटदारांनी केलेलेच नाही. शहरातील पथदिव्यांचे काम तत्कालीन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी जाता जाता बीओटी तत्त्वावर एका कंपनीला देऊन टाकले होते. डॉ. कांबळे यांनी नवीन कंपनीला काम देण्यापूर्वी, शहरातील पथदिव्यांच्या देखभाल ‌दुरूस्तीची कामे बीओटी तत्त्वावर विनवॉक या कंपनीला देण्यात आले होते. पथदिव्यांचा करार संपुष्टात येणार असल्याने सदर कंपनीने बंद पथदिवे सोडून निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंद असलेले पथदिवे दुरुस्त केल्याशिवाय बिले मिळणार नाहीत अशी भूमिका तत्कालीन आयुक्तांनी घेतली होती. यानंतरही सदर काम पूर्ण करण्यात आलेले नाही. यामुळे पूर्वीच्याच कंपनीला तसेच स्थानिक कंत्राटदारांना पथदिव्यांच्या कामासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि, अद्यापही ही कामे पूर्ण झालेली नाहीत.

शहरातील अनेक चौकात तसेच मुख्य मार्गावरील पथदिवे बंद आहेत. याशिवाय शहरातील अनेक वॉर्डातही पथदिवे बंद आहेत. अंधारातच शहरातील लोकांना खड्ड्यातून मार्ग काढत जावे लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे, छोटे-मोठे अपघात वारंवार घडत आहे.

अशी आहे महापालिकेच्या पथदिव्यांची व्यवस्था

महापालिकेच्या मुख्य रस्त्यांवरील पथदिव्यांचे काम कॉम्प्रिहेन्सिव्ह कंपनीकडून करण्यात येत होते. याशिवाय अंतर्गत रस्त्यावरील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम सहा कंत्राटदारांना देण्यात आलेले आहे. मागील दोन वर्षांपासून एलइडी वाद न्यायप्रविष्ट असल्यामुळे या कंपन्यांना सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली होती, मात्र ‌व‌ीज बील दुरुस्तीची कामे केल्यानंतर बील मिळत नाही, असं सागून कंत्राटदारांनी हात वर केले आहेत. यामुळे अंतर्गत रस्त्यांसह मुख्य रस्त्यांवर पथदिवे बंद आहेत.

कारणीभूत कोण?

शहराच्या मुख्य रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. याशिवाय वॉर्डातही प‌थदिवे बंद आहेत. या रस्त्यांवर बंद पथदिव्यांमुळे एखादा अपघात घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे. याशिवाय अनेक वॉर्डातील पथदिवे बंद असल्यामुळे या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्यास त्यालाही जबाबदार महापालिकेचे संबंधित विभाग राहतील का, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.

१२७ कोटींच्या निविदा कोर्टात?

औरंगाबाद शहरातील रस्त्यांवर एलइडी लाईट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. या निविदेतून १२७ कोटींचे एलईडी बसविण्याच्या कंत्राटाचा विषय सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता. ही निविदा इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टिम कंपनीला मिळाली आहे. या निविदा प्रक्रियेत शहा इन्व्हेस्टमेंट फायनान्शियल डेव्हलपमेंट्स अँड कन्सल्टंट्स, पॉलिकॅम कंपन्यांनीही भाग घेतला होता, मात्र ही प्रक्रिया कोर्टात प्रलंबित होती. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर निकाल दिल्याने शहरात एलइडी दिव्यांचा झगमगाट होणार आहे.

कारभार कायमच चर्चेत

महानगर पालिकेतील विद्युत विभागाच्या कारभारावर अनेकदा गंभीर आरोप करण्यात आले आहे. दुरुस्तीच्या नावाखाली या विभागातून मोठी बिले उचलण्यात येतात. वीज दुरुस्ती न करता लाइन बदलण्याची कामे झाल्याचा आरोपाही अनेक लोकप्रतिनिधींकडून या विभागावर करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळात तेरावा महिना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहराची तहान भागविण्यासाठी जायकवाडी धरणातून दररोज उपसल्या जाणाऱ्या पाण्याचे अजब गणित पाहायला मिळत आहे. उचलले जाणारे पाणी आणि प्रत्यक्षात वितरित होणारे पाणी यात रोज तब्बल ४० ते ५० दशलक्ष लिटर (एमएलडी ) तफावत येते. लाखो लिटर पाण्याची नासाडी रोखण्यासाठी महापालिका आणि औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या यंत्रणेला आजवर यश आलेले नाही. त्याचा फटका लाखो शहरवासियांना बसत आहे.

औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जायकवाडी धरणातून यंत्रणा कार्यान्वित आहे. सर्वसाधारणपणे शहराची लोकसंख्या १२ लाख गृहित धरली तर दररोज १८० एमएलडी पाणी लागते, पण पालिकेकडे दैनंदिन वितरणाची यंत्रणा सक्षम नसल्याने दहा वर्षांपूर्वीच सिडकोत एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेण्यात आला. कालांतराने शहरात याची अंमलबजावणी झाली. पुढे पावसाचे कमी प्रमाण आणि जायकवाडीतील कमी पाणीसाठा यामुळे दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला. तरीही शहराच्या पाण्याची घडी बसलेली नाही.

चोरी, नासाडी आणि गळती

५० एमएलडी पाण्याचा हिशेब लागत नसल्याने पालिका तसेच नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. पैठण ते औरंगाबाद ठिकठिकाणी पाण्याची चोरी होते. जीर्ण झालेल्या जलवाहिन्या, व्हॉल्व्ह फुटण्याचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. शनिवारी दुपारी शहानूरमिआँ दर्गा चौकात जलवाहिनीचे काम सुरू असताना तिथे व्हॉल्व्ह फुटला आणि लाखो लिटर पाणी वाया गेले. हाकेच्या अंतरावर मंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू होता. त्या भागातील रस्त्याचे काम सुरू आहे. परिणामी एकाच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे. त्याचा फटका जलवाहिनीला बसला. बऱ्याच वेळाने ही गळती थांबविण्याचे प्रयत्न सुरू झाले. रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाच्या खाली १२ महिने गळती सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होते. या भागातील नागरी वसाहती, हॉटेल्स, गॅरेजेस या ठिकाणाहून पाणी भरतात. एरव्ही शहरातील गळती रोखल्याचा दावा करणाऱ्या यंत्रणा एवढ्या मोठ्या गळतीकडे कसे काय दुर्लक्ष करतात असा प्रश्न आहे.

चेलीपुरा ते चंपा चौक रस्त्यावर पाण्याची नासाडी पाहावयास मिळाली. क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रस्त्याचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. एसएससी बोर्डाच्या बाजूला सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेल्या जलवाहिनीतून दोन महिन्यांपासून गळती सुरू आहे. ती रोखण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित झाली नाही. पीर बाजार चौकातही असाच प्रकार पाहावयास मिळाला. सिडकोतील बळीराम पाटील चौकातील व्हॉल्व्ह रस्त्याच्या मधोमध आहे. एन -नऊ, एन - सात भागातील वसाहतींना पाणीपुरवठा सुरू झाला की या व्हॉल्व्हमधून गळती सुरू होते. त्याकडेही दुर्लक्ष आहे.

पालिकेकडून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. आपला साठा भरून ठेवण्यासाठी प्रत्येकाची धडपड असते. अनेक वसाहतींमध्ये नळाला तोट्या नाहीत. पाण्याचे प्रेशर जास्त असेल तर नियोजित वेळेच्या आधीच पाणी भरून येते. उर्वरित पाणी रस्त्यावर सोडले जाते. अनेक भागात तब्बल अर्धा अर्धा तास पाणी रस्त्यावर सोडणे, घरे धुवून घेणे, गाड्या धुवून घेणे असे प्रकार चालतात. यंदा गंभीर दुष्काळ आहे. नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती केली तर पाण्याची नासाडी थांबविण्यास थोडी फार तरी मदत मिळू शकेल. अन्यथा उन्हाळ्यात औरंगाबादकरांचे हाल होणार हे निश्चित.

अनधिकृत कनेक्शन

दीड वर्षांपूर्वी शहराची पाणीपुरवठा वितरण व्यवस्था औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनीने ताब्यात घेतली. या काळात त्यांनी सर्वेक्षण करून अनधिकृत (बोगस) नळ कनेक्शनची माहिती मिळविली. नागरिकांना नळ कनेक्शन अधिकृत करून घेण्यासाठी अनेक वेळा आवाहन करण्यात आले. योजना राबविण्यात आल्या. पण त्याला फार कमी प्रतिसाद मिळाला. कंपनीच्या लेखी शहरात तब्बल एक लाख अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. याचा फटका नियमितपणे पाणीपट्टी भरणाऱ्यांना बसतो. बोगस नळ कनेक्शनच्या बाबतीत पालिकेने नगरसेवकांना सोबत घेऊन वॉर्डावॉर्डात तपासणी मोहीम राबविली पाहिजे. ज्यामुळे बोगसगिरीला आळा बसेल आणि पालिकेचा अधिकृत महसूलही वाढेल. पण त्यादृष्टीने आजवर कुठे विचारच झाल्याचे दिसले नाही.

आपल्याकडे लोकांना पाणी मिळत नाही. त्यात अनेक ठिकाणी नासाडी व गळती दिसून येते. यासंदर्भात पालिका यंत्रणा तसेच समांतरला मी वेळोवेळी सूचना दिली आहे. गळती थांबविणे आवश्यक आहे. याबाबत लवकरच एक बैठक घेऊन उपाययोजना केल्या जातील. नागरिकांनीही पाणी जपून वापरण्यावर भर दिला पाहिजे.

- दिलीप थोरात, स्थायी समिती सभापती, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समाजाच्या अस्मितेची ओळख म्हणजे संविधान’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

'समाजाच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची ओळख म्हणजे भारतीय संविधान आहे. भारताचे संविधान हे समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे आहे,' असे प्रतिपादन प्रा. सूर्यकांत सांभाळकर यांनी केले.

येथील श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयातील आजीवन शिक्षण आणि विस्तार सेवा, राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. आर. टकले हे होते. 'समाजातील वंचित घटकांना न्याय व स्वातंत्र्य बहाल करणारे संविधान आहे. त्याच बरोबर देश माझा असल्याची जाणीव करून देण्याच काम भारतीय संविधानाकडून होताना दिसते.

संविधानाने बंधुता, समानतेची संधी लोकांना दिली. त्यामुळे समाजातील सर्वांनी संविधानाचा आदर करावा,' असे आवाहन प्रा. सांभाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. पांडुरंग कल्याणकर यांनी केले, तर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन प्रा. डॉ. रामकिसन लोमटे यांनी केले.

याप्रसंगी प्रा. डॉ. राजश्री पवार, प्रा. डॉ. मंजुषा नळगीरकर, प्रा. विजय पांडे, प्रा. दत्तात्रय येडले, प्रा. सुरेश मुंढे, प्रा. डॉ. संजीवकुमार पांचाळ, प्रा. डॉ. अश्विन रांजणीकर, प्रा. डॉ. गणेश कुलकर्णी, प्रा. राजेंद्र आंबवणे, प्रा. प्रभाकर जगताप, प्रा. विष्णु वहाटुळे,

प्रा. अनिल जाधव यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा डवणे यांनी केले तर, प्रा. नितीन माळेगावकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांच्या पथकाची खुलताबादकडे पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांच्या पथकाने शनिवारी खुलताबाद तालुक्याकडे पाठ फिरवल्याने तालुक्यातील जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनातर्फे सर्व विभागप्रमुखांना पत्र देऊन दौऱ्याची माहिती देण्यात आलेली होती. दुष्काळी पाहणीसाठी आमदारांचे पथक येणार असल्याने ग्रामस्थांना ताटकळत वाट पहात बसावे लागले. शेवटी माजी आमदार अण्णासाहेब माने यांनी तालुक्यातील ताजनापूर, विरमगाव, गदाना, ममनापूर येथील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या प्रश्नी सरकारला गांभीर्य नसून आर्थिकदृष्ट्या शेतकरी मोठ्याप्रमाणात अडचणीत सापडला आहे. संपूर्ण कर्जमुक्ती हाच त्यावर पर्याय असल्याचे माजी आमदार माने यांना सांगितले. दुपारी तहसील कार्यालयात अण्णासाहेब माने यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. खुलताबाद तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा अहवाल शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर केला जाणार असल्याचे माजी आमदार अण्णासाहेब माने यांनी सांगितले. यावेळी प्रभारी तालुकाप्रमुख किशोर कुकलारे, युवा सेना तालुका अधिकारी विजय शिंदे आदी उपस्थित होते.

महात्मा फुलेंना अभिवादन

सातारा:

महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त देवळाईतील हरिप्रसादनगर येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब गायकवाड, संभाजी गुठे, आनंद जोशी, प्रकाश सावंत, जीत पाटील, विजय जयवाळ आदींची उपस्थ‌िती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक सुरक्षेवर विद्यार्थ्यांचा जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

हायटेक कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कम्प्युटर सायन्सतर्फे बजाजनगरमध्ये वाहतूक सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. वाहतूक सुरक्षेबद्दल विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रके तयार केली असून त्यांचे प्रदर्शन भरवण्यात येत आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये बाईक चालवण्याची क्रेझ आहे. मात्र वाहन चालवताना ते हेल्मेट वापरत नाहीत व वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अपघात होऊन वेळप्रसंगी तरुणांना जीव गमवावा लागतो. हे अपघात टाळण्याकरिता वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, यावर भित्तीपत्रकांमध्ये भर देण्यात आला आहे. वाळूज परिसरातून गेलेल्या दोन महामार्गामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः दुचाकी चालक हेल्मेट वापरत नाहीत, यामुळे जीवाला मुकावे लागते.

या प्रदर्शनाचे उदघाटन राजा शिवाजी उच्च माध्यामिक महाविद्यालयाचे प्राचार्य इलियास पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विजय शिराळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. पवन कांबळे, प्रा. मुनवर सय्यद प्रा. भावना तायडे, प्रा. सोनम सोनाजे, प्रा. सचिन बोर्डे, अंकुश वरपे आदींची उपस्थिती होती.

वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने गर्दीतून वाट काढण्याचा वाहनचालकांचा प्रयत्न असतो. यामुळे अपघाताची शक्यता वाढते. अपघात टाळण्यासाठी त्यापासून इतरांना प्रवृत्त करण्याच गरज आहे.

-स्वाती जाधव, विद्यार्थिनी

वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मोठ्या वाहनांची की लहान वाहनांची चूक ही चर्चा निरर्थक आहे. सर्व वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे.-अश्विनी खंदवे, विद्यार्थिनी

कॉलेजतर्फे वाहतूक सुरक्षा नियम या विषयावर भित्तीपत्रक स्पर्धा घेतल्यानंतर हा ज्वलंत प्रश्न समोर आला. नियम डावरून वाहतूक करणे धोकादायक आहे.

-काजल राजपूत,

विद्यार्थिनी

वाहन चालवतांना हेल्मेट वापरणे अत्यंत गरजेचे आहे. हेल्मेटमुळे अपघात झाला तरी जीव सुरक्षित राहतो. दुचाकीचालकांनी हेल्मेट वापरणे अनिवार्य असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

-शाम विधाते, विद्यार्थी

रस्त्यावरील प्रत्येक वाहनधारक व पादचाऱ्यांना सुरक्षेला प्राधान्य देण्याची गरज आहे. वाहनधारकांच्या पुढे जाण्याच्या जिवघेण्या स्पर्धेमुळे अनेक पादचारी बळी पडतात. रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर करावा.

- महेश कुभार, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेना गटनेत्यावर पैठणमध्ये गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

एका क्लिनरला मारहाण केल्याप्रकरणी पैठण पंचायत समितीचे शिवसेनेचे गटनेते प्रल्हाद औटे व त्यांच्या दोन्ही मुलांच्या विरोधात पैठण पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

राजेश दादाराव भिसे हा वाहनचालक शनिवारी कुरणपिंप्रीच्या पुलावरून वाहन घेऊन जात असताना त्यांचा क्लिनर नागेश पंडितराव विठोरे (रा. वाडीलासुरा, ता. अंबड) यांची पंचायत समितीतील शिवसेनेचे गटनेते प्रल्हाद औटे यांचा मुलगा नागेश प्रल्हाद औटे यांच्यासोबत बाचाबाची झाली. काही वेळातच प्रल्हाद औटे हे सहा ते सात जणांसोबत घटनास्थळी पोहचले व त्या सर्वांनी क्लिनर नागेश विठोरे यांना बेदम मारहाण केली.

या मारहाणीत नागेश विठोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या मारहाण प्रकरणी वाहनचालक राजेश भिसे याच्या फिर्यादीवरून प्रल्हाद औटे, नागेश प्रल्हाद औटे, मयुर प्रल्हाद औटे, अक्षय औटे, अमित अशोक औटे व दादा अशोक औटे यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी पैठण पोलिसांनी अक्षय अशोक औटे याला अटक केली असून त्याला पैठण न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणातील प्रल्हाद औटे सह इतरांचा पैठण पोलिस शोध घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडगाव कोल्हाटीत भाऊगर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज

वाळूज परिसरातील सर्वाधिक लोकसंख्या व कामगार वसाहत असलेल्या बजाजनगर-वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय पक्ष पुरस्कृत पॅनलकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. ही ग्रामपंचायत अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. मात्र यावेळी पक्षांतर करून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांमुळे शिवसेनेसमोर आव्हान राहणार आहे. सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने सर्वांचेच लक्ष उमेदवारीकडे लागले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा नुकताच कार्यक्रम जाहीर केला. त्यात वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर-वडगाव कोल्हाटी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीमध्ये १७ सदस्य असून १९ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी २१ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने विद्यमान सरपंचाच्या कारर्कीर्द तीन महिने बाकी असताना निवडणूक घोषित केल्याने इच्छुकांची धांदल उडाली आहे.

दरम्यान, गेल्या निवडणुकीत शिवसेनेतील गटबाजी चांगलीच उफाळून आली होती, मात्र त्यात शिवसेनेच्याच उमेदवारांचा विजय झाला होता. त्यात आमदार संजय शिरसाठ पुरस्कृत सदस्यांमुळे सरपंचपदी छाया

कारले, उपसरपंचपदी सुनील काळे यांची निवड झाली. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेसमोर भाजपचे आव्हान राहणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी उमेदवारांची निवड महत्वाची ठरणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षांकडून नव्या दमाच्या तरुणांनी निवडणूक रिंगणात उडी मारण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, त्यास पक्षांकडून किती प्रतिसाद मिळणार यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. त्यामुळे ही लढत आता विद्यमान लोकप्रतिनिधींच्या अस्तित्वाची ठरणारी आहे.

कामगार, शिक्षक इच्छूक

वाळूज एमआयडीसीतील विविध कंपन्यात काम करणारे कामगार, खासगी शाळेवर शिक्षक निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. अनेकांनी पक्षांकडे उमेदवारीसाठी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीत उमेदवारांची संख्यांही मोठी राहण्याची शक्यता आहे.



निवडणूक कार्यक्रम

निवडणूक कार्यक्रम

३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर उमेदवारी अर्ज स्वीकृती

५ डिसेंबर उमेदवारी अर्जांची छाननी

८ डिसेंबर अर्ज मागे घेणे, चिन्ह वाटप

१९ डिसेंबर मतदान

२१ डिसेंबर मतमोजणी



विकास प्रश्नांकडे काणाडोळा...

मुलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर असतांना बजाजनगरमधील विकासाचा मुद्दा आतापर्यंत एकाही पक्षाने प्रभावीपणे मांडलेला नाही. एमआयडीसीने धार्मिक स्थळ हटवण्याची कारवाई केल्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. मात्र, ही भूमिका कारवाईनंतर घेतल्याने प्रसिद्धीसाठी घेतल्याची टीका इतर पक्षांकडून करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करा

$
0
0

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा ३ डिसेंबरला मोर्चा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती चिंताजनक आहे. याचा सर्वाधिक परिणाम शिक्षण क्षेत्रावर होत असून याची दखल घेत शासनाने सर्व अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली केली आहे.

३ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढत राज्यशासनाचे याप्रश्नी लक्ष वेधणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी सांगितले. धडक मोर्चाबाबत पत्रकारांना माहिती देताना संग्राम कोते म्हणाले, सतत चार वर्षांपासून मराठवाडा आणि राज्यात दुष्काळाने थैमान घातले आहे. मराठवाड्यात तर परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. ही स्थिती लक्षात घेत शासनाने तात्काळ दुष्काळग्रस्त भागातील शैक्षणिक शुल्कमाफ करावे. परीक्षा शुल्कामाफीबाबतही गोंधळ कायम आहे, असे कोते पाटील यांनी सांगितले. ३ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर सकाळी ११.३० वाजता धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. औरंगपुरा येथील महात्मा फुले पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार आहे.

गुलमंडी, किलेआर्क मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा धडकेल. तसेच या प्रश्नावर मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांची भेट घेत निवेदनही देण्यात येईल असेही कोते यांनी सांगितले. प्राथमिकपासून पदव्युत्तरपर्यंतच्या वर्गांचे संपूर्ण शिक्षण शुल्क माफ करा, अशी मागणी आहे. एकाचवेळी एवढे शुल्क माफ करणे शक्य नसेल, तर काही प्रमाणात यात शुल्कमाफ करत विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी राविकाँ शासनाकडे मांडेल असेही स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य उल्हास उढाण, प्रदेश सचिव गणेश घुले, शहराध्यक्ष राहुल तायडे, अमोल दांडगे, फिरोज पठाण, संदिप फाजगे, अक्षय पाटील यांचीही उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुदानापासून ४० हजार शेतकरी वंचित

$
0
0

शेतकरी म्हणतात पैसे नको; प्रशासनाचे उत्तर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत गेल्या वर्षी शासनाने खरीप अनुदानापोटी औरंगाबाद जिल्ह्याला २८८ कोटी रुपये दिले. मोठा गाजावाजा करून यातील बहुतांश रक्कम वाटप झाली असल्याचे प्रशासनाने सांगितले असले तरी अद्याप जिल्ह्यातील तब्बल ४० हजार शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटपच झाले नसल्याचे उघड झाले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळ उपाययोजनासंदर्भात राज्याचे सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी आढावा घेतला. वर्ष २०१४-१५ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खरीप अनुदानापोटी २८८ कोटी रुपयांची मदत शासनाकडून मिळाली होती. यानुसार जिल्ह्यातील ६ लाख १३ हजार लाभार्थींपैकी अद्यापही ४० हजार शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचे पुढे आले आहे. आता दुसऱ्या खरीप अनुदानाची मागणी होत असतांना अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्यामुळे राज्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत २७२.१७ कोटी वाटप झाले असून प्रशासनाकडे अद्यापही १४ कोटी ८५ लाख रुपये शिल्लक आहेत. खरीप अनुदानापोटीची रक्कम अनेक गावांमधील शेतकऱ्यांपर्यंत पोचली नसल्याचा विषय बैठकीसमोर आला. बैठकीत जिल्ह्यातील मदत वाटपाची स्थितीबाबत माहिती विचारली असता नेहमीप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना माहिती देण्यास सांगितले. यावर शशिकांत हदगल यांनी औरंगाबाद-फुलंब्रीची मदत वाटपा‌ची स्थिती सांगितली. मात्र इतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्याची माहिती सांगण्यापूर्वीच भुसे यांनी मदतवाटपासंदर्भात जिल्ह्याभरात वंचित शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मदत वाटप अभियान सुरू करण्याचे आदेश दिले.

म्हणे अनुदान नाकारले

बैठकीमध्ये शिल्लक अनुदानाबाबत चर्चा सुरू असताना हे अनुदान शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक नाही तसेच काही शेतकऱ्यांनी अनुदान नाकारल्यामुळे वाटप झाली नसल्याचे प्रशासनाकडून सागण्यात आले. मात्र पैसे नको असे शेतकरी कसे म्हणू शकेल, अशी विचारणा करत राज्यमंत्री भुसे यांनी अधिकाऱ्यांचे हे म्हणणे चुकीचे असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४० हजारांचा गंडा

$
0
0

सायबर भामट्यांनी केली तिघांची ऑनलाइन फसवणूक

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

बँक खात्याची माहिती, एटीएम कार्डचा क्रमांक विचारून ऑनलाइन गंडा घालण्याचे प्रकार कमी होत नाहीत. वेगवेगळी कारणे सांगून फसवणूक सुरूच आहे. शहरातील तिघांना याचप्रकारे फसवून सायबर भामट्यांनी ४० हजार ३७९ रुपयांची लूट केली आहे.

घटना क्रमांक एक ः बेगमपुरा येथे छोटी मशीद येथे राहणाऱ्या सय्यद हाफिज सय्यद हमीद यांचे एएटीएम कार्ड चुकीचा पासवर्ड टाकल्यामुळे ३० ऑगस्ट रोजी लॉक करण्यात आले होते. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी एटीएममधून सय्यद हाफिज यांनी ५०० रुपये काढले. त्यानंतर त्यांना ७७३९८९९४९६ या मोबाइलवरून कॉल आला. त्यांनी तुमचे कार्ड बंद झाले आहे, ते सुरू करण्यासाठी कार्ड नंबर विचारला. काही वेळानंतर ९९५५२०५९६७ या मोबाइल क्रमांकावरून फोन करून ओटीपी क्रमांकाचा मॅसेज आला आहे का, अशी विचारणा करत, तो क्रमांक विचारला.

फिर्यादीने हा क्रमांक सांगताच त्यांच्या खात्यातून दोन वेळेस पाच हजार रुपये काढल्याचा मेसेज प्राप्त झाला. बँकेतून बोलत असल्याचे सांगून सय्यद हाफिज यांची दहा हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिस निरीक्षक शिनगारे तपास करत आहेत.

घटना क्रमांक दोन ः पद्मपुरा पार्वती अपार्टमेंट येथील रहिवासी चंद्रशेखर वसंतराव तिळवणकर यांना १० ऑगस्ट रोजी ११.१५ च्या सुमारास ९१७७५०९२५६४४ या क्रमांकावरून बँक अधिकारी बोलत असल्याची बतावणी करत फोन आला. तुमचे एटीएम कार्ड बंद झाले असून कार्ड चालू करण्यासाठी एटीएम कार्डचा क्रमांक द्या, असे सांगण्यात आले. त्या व्यक्तीने तिळवणकर यांना विश्वासात घेऊन नंबरसह कोड काढून बँक खात्यातून १५ हजार ३७९ रूपये परस्पर काढून घेतले. या प्रकरणी तिळवणकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक गोविंद कोळेकर करत आहेत.

घटना क्रमांक तीन ः बन्सीलालनगर येथील रहिवासी संतोष हनुमान अग्रवाल यांना १४ सप्टेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास ९६६१७२७४५७ या मोबाइल क्रमांकावरून फोन आला. 'मी बँकेतून बोलत असून डेबिट कार्डचा ओटीपी नंबर काय आहे,' अशी विचारणा केली. अग्रवाल यांनी गडबडीत ओटीपी नंबर सांगितला. त्यानंतर पाच हजार रुपये काढल्याचा मेसेज मिळाला. आपल्या कुटुंबातील कोणीही पैसे घेतले नसल्याचे विचारणा केल्यानंतर लक्षात आले. अग्रवाल यांनी कोटक महिंद्रा बँकेत जाऊन विचारणा केल्यानंतर फसवणूक झाल्याचे सांगण्यात आले. अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलि‌स निरीक्षक जहारवाल तपास करीत आहेत.

कर्जाचे आमिष; ४६ हजारांचा गंडा

भवानीनगर येथील रहिवासी पद्मनाथ परशुराम दातार यांना १ मार्च २०१५ ते ५ जून २०१५ या काळात ८४५९३१४५६८, ९६५०५११२५९, ७८३५९३९७८४ आणि ९६४३४८१८४७ या क्रमांकावरून कर्ज पाहिजे का, अशी विचारणा करण्यात आली. चार लाख रुपये लोन पाहिजे असेल, तर वीस हजार रुपये चेकव्दारे जमा करण्याचे सांगण्यात आले. चेक जमा केल्यानंतर काही दिवसांनी चार लाखांऐवजी पाच लाख रुपये पाहिजे असतील तर, २६ हजार रुपये पाठवा, असा निरोप देण्यात आला. यानंतर पद्मनाथ दातार यांनी २६ हजार रुपये पाठवून दिले. यानंतर कर्जासाठी तगादा लावल्यानंतर संबंधितांनी बोलण्याचे टाळले. काही दिवसानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दातार यांच्या फिर्यादीवरून क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>