Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘समांतर’वर पालिका आयुक्तांचा लगाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील नागरिकांना २४ अब्जांचा गंडा घालणाऱ्या समांतर जलवाहिनी योजनेवर अखेर कोर्टाने निर्बंध लादले आहेत. या योजनेच्या एकूणच कारभाराबद्दल अनेक आक्षेप घेतले जात असल्यामुळे महापालिकेचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही समांतर जलवाहिनी योजनेचा कासरा कसला आहे. त्यामुळे या योजनेच्या कर्त्याधर्त्यांसह योजनेची अंमलबजावणी करणाऱ्यांवर अंकुश निर्माण झाला आहे.

समांतर जलवाहिनी प्रकल्पामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक कसा भरडला जाणार आहे, ही योजना नागरिकांसाठी कशी ओझे ठरणार आहे या संदर्भात 'मटा' ने पहिल्या अंकापासून वेळोवेळी बातम्या प्रसिध्द केल्या आहेत. समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून २० वर्षांत नागरिकांच्या खिशातून २४ अब्ज रुपयांवर डल्ला मारला जाणार आहे हे 'मटा' ने उघड केले होते. त्यानंतर छुप्या पध्दतीने वाढवलेली पाणीपट्टी, मीटरसाठी आकारली जाणारी अव्वाच्यासव्वा रक्कम, तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा करून पाणीपट्टीची पूर्णपणे केली जाणारी वसुली, पाणीपट्टी वसुलीसंदर्भात औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडून नागरिकांची केली जाणारी गळचेपी या व याच अनुशंगाने विविध बातम्या 'मटा' ने वेळोवेळी प्रसिध्द केल्या. त्याची दखल विविध सामाजिक संघटना व व्यक्तींनी घेतली. मुबंई उच्चन्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात समांतर जलवाहिनीच्या विरोधात तीन याचिका दाखल झाल्या. त्यांची सुनावणी सध्या सुरू आहे. सुनावणीदरम्यान गेल्याच आठवड्यात हायकोर्टाने समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीवर काही बंधने टाकली.कोर्टाच्या या बडग्याच्या पाठोपाठ महापालिकेचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी महापालिकेचे अधिकारी व कंपनीचे अधिकारी यांची बैठक घेऊन त्यांना समांतर जलवाहिनीच्या योजनेची किंमत कमी करण्यात सांगितले. किंमत कमी केल्यावर त्याचा परिणाम योजनेवर होणार नाही, याची ग्वाही द्या, असे त्यांनी बजावले. सर्वसामान्य नागरिकांवर बोजा पडला तर ते सहन करणार नाही असे स्पष्ट केले.

कंपनीची गुंतवणूक स्पष्ट होणार

समांतर जलवाहिनीच्या योजनेसाठी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे फायनांशियल मॉडेल काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महापालिकेकडून दर महिन्याला मिळणाऱ्या सव्वापाच कोटी रुपयांवरच कंपनीचे काम सुरू आहे. त्यामुळे कंपनीने फायनांशियल मॉडेलचे बुधवारी सादरीकरण करावे व आपल्या कामात पारदर्शकता ठेवावी असे आदेश त्यांनी दिले. या प्रकारामुळे समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पातील कंपनीची आर्थिक गुंतवणूक स्पष्ट होईल. कंपनीने या प्रकल्पात काहीच गुंतवणूक केलेली नाही हे 'मटा' ने उघड केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मल्टिप्लेक्सच्या मुजोरीला पायबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील मल्टिप्लेक्समधील अनागोंदीवर 'महाराष्ट्र टाइम्स'ने नेहमी प्रकाश टाकला. प्रेक्षकांना सक्तीने फूड कुपन देणे, तिकिटावर खाडाखोड करणे आणि प्रेक्षकांना सुविधा नाकारण्याचे प्रकार वारंवार घडले. या गैरप्रकारांवर प्रकाश टाकताच करमणूक कर विभागाने तातडीने कारवाई केली. 'पीव्हीआर' मल्टिप्लेक्सला दंड ठोठावण्यात आला आणि 'अंजली कार्निव्हल'मधील सक्तीची कूपन विक्री बंद करण्यात आली.

अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल वाढला आहे. प्रेक्षकांची गर्दी पाहून मल्टिप्लेक्सचालकांनी लूट सुरू केली. 'अंजली कार्निव्हल' मल्टिप्लेक्समध्ये तिकिटासह सक्तीने फूड कुपन दिले जात होते. या प्रकारामुळे ८० रुपयांचे तिकीट १४५ रुपयांना मिळत होते. प्रेक्षकांनी कुपनला नकार दिल्यास पुढील रांगेतील तिकीट घ्या असा पर्याय दिला जात होता. नाईलाजाने प्रेक्षक तिकीट खरेदी करीत असत. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने सर्वप्रथम आवाज उठवला. करमणूक कर विभागापर्यंत तक्रार गेल्यानंतर काही दिवस 'अंजली कार्निव्हल'मधील गैरप्रकार थांबला होता. मात्र, दिवाळी सिझनमध्ये पुन्हा 'कॉम्बो ऑफर'च्या नावाखाली लूट सुरू झाली. 'प्रेक्षकांच्या खिशावर दरोडा' या बातमीतून (२० नोव्हेंबर) मल्टिप्लेक्समधील लूट चव्हाट्यावर आणली. या बातमीचे सर्वस्तरातील प्रेक्षकांनी भरभरून स्वागत केले. करमणूक कर विभागाने बातमीची दखल घेऊन मल्टिप्लेक्समधील गैरप्रकार थांबवला.

प्रेक्षकांना जबरदस्तीने कॉम्बो ऑफर घ्यायला लावत नाही, असा दावा व्यवस्थापक संतोष लोखंडे यांनी केला, पण ऑफर नाकारल्यास सिक्युरिटी गार्ड दमदाटी करून बाजूला करतात असा अनुभव शेकडो प्रेक्षकांनी सांगितला. प्रेक्षकांची लूट रोखण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'मधून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या माध्यमातून शेकडो प्रेक्षक एकजुटीने गैरप्रकारांना रोखत आहेत.

'पीव्हीआर'ला दंड

कॉलेजमधील विद्यार्थी मल्टिप्लेक्समध्ये मॉर्निंग शो पाहतात. या विद्यार्थ्यांना ७० रुपयांचे तिकीट १४० रुपयांना विकण्याचा प्रकार 'पीव्हीआर' मल्टिप्लेक्समध्ये घडत होता. कॉर्नर सीटसाठी २५० रुपये दर होता. हा प्रकार 'मटा'ने पुराव्यासह मांडला. याबाबत 'पीव्हीआर' व्यवस्थापनाने सारवासारव केली. मात्र, 'प्रेक्षकांची दुप्पट लूट' या बातमीतून फसवणूक उघड करण्यात आली. या प्रकरणात करमणूक कर विभागाने कारवाई करीत 'पीव्हीआर'ला दंड ठोठावला. सध्या योग्य दरात तिकीट मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळामुळे मराठवाड्यामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्यांचा आकडा दुप्पट झाला आहे. हातचे पीकही गेले आणि घरातील कर्ता माणूसही गेला असल्याची परिस्थिती अनेक घरांमध्ये झाली असून गेल्यावर्षी ४५४ तर यंदा १०२४ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल्याच्या घटना घडल्या आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यातही उन्हाळ्यासारखीच परिस्थिती होती. अत्यंत कमी पर्जन्यमानामुळे खरिप आणि रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. यंदा जून महिन्यात झालेल्या पावसामुळे खरिपाच्या मोठ्या प्रमाणावर पेरण्या झाल्या. मात्र, त्यानंतर गायब झालेल्या पावसामुळे संपूर्ण पीक वाया गेले. रब्बीचीही यंदा अशीच अवस्था आहे. पेरण्यांसाठी झालेला खर्च, शेतीसाठी काढलेले कर्ज यामुळे त्रस्त शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे चित्र मराठवाड्यात आहे. ही परिस्थिती गेल्यावर्षीपेक्षा भयंकर असून गेल्या दोन महिन्यात २४६ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद सरकार दरबारी करण्यात आली आहे. वर्ष २०१४ व २०१५ मध्ये बीड, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

अपात्रांची संख्याही अधिक

आत्महत्या केलेल्या काही शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वीच पीक कर्ज घेतले आहे. काहींचा शवविच्छेदन अहवाल समितीला प्राप्त झाला नाही. काही शेतकऱ्यांच्या नावावर पीक कर्ज नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. काही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे पूर्ण नसल्याने त्यांच्या वारसांना मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. वर्ष २०१५ मध्ये गेल्या ११ महिन्यांत १९७ प्रकरणांना अपात्र ठरवण्यात आले असून १९७ प्रकरणांमध्ये अद्यापही चौकशी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजयचे तिसरे लग्न असल्याचा पत्नीचा दावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिसारवाडी प्रकरणातील पीडित पत्नीने संजय अग्रवालचे हे तिसरे लग्न असल्याचा दावा केला आहे. त्याच्या पहिल्या दोन्ही पत्नींनी लग्नानंतर काही दिवसातच पलायन केल्याची माहिती तिने दिली. दरम्यान, आपल्या मुलीला विकण्यासंदर्भात काही माहिती नसल्याचे तिच्या आईने स्पष्ट केले.

मिसारवाडी प्रकरणातील पीडित विवाहिता सध्या घाटीत वॉर्ड क्रमांक २१ मध्ये उपचार घेत आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच तिला डिसचार्ज मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी तिची भेट घेतली. यावेळी आपबिती कथन करताना तिने पती संजयाचा आपल्यासोबत झालेला हा तिसरा विवाह असल्याची माहिती दिली. त्याची पहिली पत्नी पंधरा दिवसांत तर दुसरी पत्नी तीन दिवसांत पळून गेली असल्याची माहिती तिने दिली. या विवाहितेची आई तिला भेटण्यासाठी शहरात दाखल झाली आहे. मुलीच्या खरेदी-विक्री संदर्भात त्यांना विचारणा केली असता तिने या प्रकाराबाबत कानावर हात ठेवले. उलट माझ्या मुलीला मी का विकू, असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे. एकीकडे अग्रवाल कुटुंब मुलीची खरेदी केल्याची माहिती देत असून माहेरची मंडळी नकार देत असल्याने पोलिस देखील चक्रावून गेले आहेत.

पीड‌ितेला विवाह झाल्यानंतर अग्रवाल कुटुंबाने सहा महिने घरात डांबून ठेवत अमानुष अत्याचार केला होता. हे प्रकरण उघड झाल्यावर अग्रवाल कुटुंबाने तिला आपण विकत घेतल्याचा दावा पोलिसांसमोरच केला होता. सध्या हे सर्व अग्रवाल कुटुंब पोलिस कोठडीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला पोलिस कर्मचाऱ्याची छेड काढून मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

उस्मानपुरा पोलिस ठाण्यात महिला पोलिस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणीचा पाठलाग करत भरदिवसा छेड काढत मारहाण करणाऱ्या २ रोडरोमिओंना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस शिपाई अंबिका तुळशीराम दारुंटे (२६ वर्ष, रा. मिलकॉर्नर, मूळगाव गंगापूर) उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून कार्यरत आहेत. त्या आज (८ डिसेंबर) रोजी साप्ताहिक सुट्टी असल्याने आपल्या मूळगावी असलेल्या आईस भेटण्यासाठी औरंगाबाद येथून अॅक्टिव्हावरून (एम एच २० - डी बी ८८६६) जात होत्या. औरंगाबाद-नगर रोडवरील छावणी हद्दीतील रेल्वे पूल ओलांडल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या दुचाकी (एम एच २० सीएम ३८९६) वरील इरफान मुसा शेख (वय २०) व सय्यद माजीद अली (वय २३, दोघेही रा. चिस्तिया कॉलनी एन-६ सिडको औरंगाबाद) यांनी त्यांचा पाठलाग केला. पाठीमागे बसलेल्याने त्यांच्याकडे बघून हातवारे केले. त्यामुळे घाबरलेल्या दारुंटे यांनी गाडीचा वेग वाढवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. दोघांनी पुन्हा त्यांचा पाठलाग करून साऊथ सिटी ते लिंकरोड सिग्नल दरम्यान असलेल्या पेट्रोल पंपासमोर तिच्या दुचाकीसमोर आपली दुचाकी आडवी लावली. 'तू खूपच जोरात गाडी चालविते', असे ते दोघे त्यांना म्हणाले. त्यावर महिला पो‌िलसाने 'समोर वाहतूक पोलिस आहे, तिथे चला. मी देखील पोलिस आहे', असे सांगितल्यावर त्या दोघांनी उलट उत्तर देत 'कुठे जायचे तिथे चल. पोलिस आहेस म्हणून काय झाले, काय करायचे ते कर', असे म्हणत त्यांचा हात धरला. दारुंटे यांनी आरडाओरड करताच इरफान शेख याने त्यांना झापड मारली. हा प्रकार काही नागरिकांनी पाहिला. सिग्नलपाशी उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांनीही तातडीने धाव घेत एका आरोपीस पकडले. दुसरा आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी दुचाकीसह त्यालाही ताब्यात घेतले. या प्रकरणी फिर्यादी अंबिका दारुंटे यांनी दिलेल्या तक्रारारीवरुन दोन्ही आरोपींविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माहेरून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करीत विवाहितेचा छळ करण्यात आल्याचा प्रकार येरवडा पुणे येथे घडला. जिन्सी येथे माहेरी आलेल्या महिलेने जिन्सी पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी रविंद्र कोते, सुमन, सारिका, प्रकाश व संतोष यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्या वादातून तरुणाला मारहाण

जुन्या वादातून एजाज कुरेशी कासीम कुरेशी (वय २४ रा. शहागंज) याला तिघांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी आरोपी रऊफ कुरेशी, सलीम कुरेशी व कलीम कुरेशी (सर्व रा. शहागंज) यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी

दुचाकीच्या धडकेत गणेश चंदवाडे (वय २५ रा. मुकुंदवाडी) हा पादचारी तरुण जखमी झाला. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता विमानतळाच्या भिंतीजवळ हा प्रकार घडला. या प्रकरणी पसार दुचाकीचालकाविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हातातून मोबाइल हिसकावला

एन २ ठाकरेनगर येथील पार्थ मदन शिंदे या बालकाच्या हातातील मोबाइल दोन तरुणांनी हिसकावून पलायन केले. रविवारी रात्री साडेदहा वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जोडप्यास मारहाण

जालना रोडवरील गायत्री लॉन्स येथे एका महिलेचा विनयभंग करीत तिच्या पतीला मारहाण करण्यात आली. रविवारी दुपारी बारा वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी आरोपी दीपक निवृत्ती काकडे (रा. संजयनगर) याच्याविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

६९ हजारांची पर्स पळविली

बीड बायपासवरील एका लॉन्समधे स्वागत समारंभात स्टेजवरून ६९ हजार रूपयांचे दागिने व मोबाइल असलेली वधूच्या आईची पर्स पळविण्यात आली. सातारा पोलिस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

ज्योती प्रवीणराव हर्सूलकर (५९ रा. एन ९, रंजनवन हौसिंग सोसायटी प्लॉट क्र. ४६, सिडको) यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त ५ डिसेंबर रोजी बीड बायपासवरील रेशम लॉन्स येथे स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. स्वागत समारंभ सुरू असताना रात्री ७.३० ते ८ च्या दरम्यान त्यांनी स्टेजच्या सोफ्यावर ठेवलेली पर्स चोरट्यांनी पळविली. त्यात सोन्याचे दागिने व मोबाइल असा ६९ हजार ६०० रूपयांचा ऐवज होता. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास फौजदार सानप हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालगृहातून दोन मुलांचे पलायन

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हडको येथील शासकीय बालगृहातून खुनाच्या गुन्ह्यातील १५ वर्षांच्या मुलासह १३ वर्षांच्या बालकाने धूम ठोकली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज हॉटेलच्या मागे असलेल्या बाल निरीक्षणगृहामध्ये म्हारोळा (ता.पैठण) येथील एक १५ वर्षाचा मुलाला न्यायालयाच्या आदेशाने ठेवण्यात आले होते. खुनाच्या गुन्ह्यात तो आरोपी आहे. सोमवारी सकाळी त्यांच्या संस्थेच्या खोलीचा गज वाकवून त्याने धूम ठोकली. त्याच्यासोबत १३ वर्षांच्या बालकाने देखील पलायन केले आहे. सकाळी हा प्रकार सुरक्षारक्षकाच्या लक्षात आला. या प्रकरणी शेख फय्याजोद्दीन शेख गौसोद्दीन (रा. शरीफ कॉलनी, किराडपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जमादार लाठे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिथेंटिक हॉकी टर्फ’ मैदानासाठी ७ कोटींची तरतूद

$
0
0

साई क्रीडा केंद्रात लवकरच उभारणी

Sudhir.Bhalerao @timesgroup.com

औरंगाबाद : मराठवाड्यासह औरंगाबादच्या आसपास असलेल्या शहरांतील खेळाडूंसाठी साई क्रीडा प्रशिक्षण केंद्र खेळात करिअर घडवण्याचे मुख्य केंद्र बनले आहे. या केंद्रात हॉकीपटूंसाठी 'सिथेंटिक हॉकी टर्फ'ची सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी ७ कोटींची तरतूद केली आहे.

साई क्रीडा केंद्रातील आधुनिक सुविधांबाबत क्रीडा क्षेत्रात सतत चर्चा होते. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेले क्रीडा सुविधांबाबतचे प्रस्ताव भारतीय क्रीडा प्राधिकरणाने मंजूर केले आहेत. त्यामुळे आगामी कालावधीत नवनवीन क्रीडा सुविधांचे निर्माण केंद्रात होणार आहे. क्रीडा सुविधांमध्ये सिथेंटिक हॉकी टर्फ, सिथेंटिक अॅथलेटिक्स ट्रॅक, जलतरण तलाव, सायकलिंग ट्रॅक, इनडोअर शूटिंग रेंज, मल्टीपर्पज हॉलचा समावेश आहे.

मराठवाड्यात हॉकी लोकप्रिय खेळ असला तरी हॉकीचे सामने खेळण्याकरिता 'सिथेंटिक हॉकी टर्फ' मैदानाची सुविधा उपलब्ध नव्हती. हॉकी संघटना, हॉकीपटू तसेच विविध क्रीडा संघटनांची हॉकीचे मराठवाड्यात सिथेंटिक हॉकी टर्फ मैदान असावे अशी मागणी होत होती. साई केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी या मागणीची दखल घेऊन सिथेंटिक हॉकी टर्फचा प्रस्ताव तयार केला आणि तो मंजुरीसाठी पाठवला. साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राला महासंचालकांनी भेट दिल्यानंतर अनेक प्रस्तावांना चालना मिळाली. त्यामुळे सिथेंटिक हॉकी टर्फचा प्रस्तावही मंजूर झाला. त्यामुळे या सुविधेसाठी ७ कोटींचा निधी मिळणार आहे. साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या पश्चिमेकडील बाजूस हॉकीचे नवे मैदान तयार करण्यात येणार आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने होऊ शकतील असे हे मैदान १०१.४ मीटर लांबीचे आणि ६३ मीटर रुंदीचे असेल. नॅशनल प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन कंपनीचे अभियंता राकेश मेहता यांनी काही दिवसांपूर्वीच साई केंद्राला भेट देऊन सिथेंटिक हॉकी टर्फ मैदान तयार करण्याची चाचपणी केली होती. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. मैदानाबरोबरच प्रेक्षकांना सामने पाहण्याकरिता प्रेक्षक गॅलरीही उभारण्यात येणार आहे. मैदानाची निगा राखण्याकरिता अनेक सुविधा निर्माण करण्यात येणार आहे, अशी माहिती उपसंचालक भांडारकर यांनी दिली. भांडारकर म्हणाले, 'सिथेंटिक हॉकी टर्फ मैदानाबरोबरच सिथेंटिक अॅथलेटिक्स ट्रॅक, जलतरण तलाव, सायकलिंग ट्रॅक, इनडोअर शूटिंग रेंज, मल्टिपर्पज हॉल या कामांनाही सुरुवात करण्यात येणार आहे. या सुविधांच्या उभारणीसाठी सुमारे ३३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे नव्या वर्षात या कामांना निश्चितच वेग येईल. नव्या वर्षांत अनेक नव्या क्रीडा सुविधा खेळाडूंना उपलब्ध झालेल्या असतील. या सुविधांचा खेळाडूंना निश्चितच मोठा लाभ होणार आहे.'

सिथेंटिक हॉकी टर्फची सुविधा मराठवाड्यात कुठेही नाही. त्यामुळे ही सुविधा हॉकीपटूंसाठी मैलाचा दगड ठरणारी असेल. हॉकी हा खेळ मराठवाड्यात लोकप्रिय आहे. हे लक्षात घेऊनच साई केंद्रात ही सुविधा निर्माण करण्यात येत आहे.

- वीरेंद्र भांडारकर, साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उपसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिकेत पुन्हा एक टीडीआर घोटाळा

$
0
0

Unmesh.Deshpande@timesgroup.com

औरंगाबादः महापालिकेतले 'कर्तव्यदक्ष' कर्मचारी, अधिकारी काहीही पराक्रम करू शकतात. त्यांच्या कोषात जणू अशक्य हा शब्दच नाही. एका टीडीआर घोटाळ्याची धग अजून धगधगत असताना, आता दुसऱ्या एका घोटाळ्याने डोके वर काढले आहे. नारेगावातील गट क्रमांक २६ मध्ये विकास आराखड्यातील १२ मीटर रस्त्यासाठी पालिकेने चक्क २४ मीटरचा टीडीआर दिला आहे. विशेष म्हणजे हे प्रमाणपत्र ज्या तुषार चौधरी यांच्या नावे दिले, आता त्यांचा ठावठिकाणा लागत नाही. अन् ज्या व्यक्तीच्या मालकी प्लॉटमधून टीडीआर दिला, त्यांना या व्यवहाराची सुतराम कल्पना नाही.

नारेगाव येथील गट क्रमांक २६ मधील विकास योजनेच्या रस्त्यासाठी टीडीर देण्याचे प्रकरण महापालिकेत ४ एप्रिल २०१४ रोजी घडले. याच दिवशी तुषार चौधरी यांची टीडीआर देण्याची फाइल तयार करण्यात आली आणि अवघ्या २ महिन्यांत ५ जुलै २०१४ रोजी त्यांना टीडीआर देण्यात आला. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, चौधरी यांनी गट क्रमांक २६ मधून जाणाऱ्या १२ मीटर रुंद रस्त्यासाठी टीडीआरची मागणी केली होती. त्यांनी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे केलेल्या दोन्ही अर्जात तसा स्पष्ट उल्लेख आहे. त्यातल्या एका अर्जावर त्यांची स्वाक्षरी आहे, तर एका अर्जावर स्वाक्षरी नाही. विशेष म्हणजे ज्या अर्जावर स्वाक्षरी नाही, त्यावरच हा टीडीआर मंजूर करण्यात आला. चौधरी यांची १२ मीटर रस्त्याचा टीडीआर द्या, अशी मागणी असताना, वकिलांचा त्या जागेबद्दलचा सर्च रिपोर्ट १२ मीटर जागेचा टीडीआर द्या असा असताना, नगररचना विभागाने मात्र २४ मीटर जागेचा टीडीआर देण्याची फाइल तयार केली. कोणत्याही जागेचा टीडीआर देण्यापूर्वी त्या जागेबद्दल काही वाद आहे का, हे तपासून घेण्यासाठी त्या जागेसंबंधी जास्त खपाच्या दैनिकात जाहिरात देणे आवश्यक असते. जाहिरातीत त्या जागेच्या चतुःसीमेचाही उल्लेख करावा लागतो. नगररचना विभागाने महापालिकेच्याच जनसंपर्क विभागातर्फे या जागेची जाहिरात एका छोट्या तालुकास्तरीय वृत्तपत्रात दिली. त्यामुळे आक्षेप घेणाऱ्यांपर्यंत ही जाहिरात पोचली की नाही, या बद्दल शंकाच आहे. या जाहिरातीत देखील २४ मीटर रस्त्याचा टीडीआर देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे, पण मागणीपेक्षा दुप्पट टीडीआर देण्याची जाहिरात कशी काय प्रसिद्ध केली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अर्जदाराचे फक्त नाव; पत्त्याचा पत्ता नाही

टीडीआर मागणाऱ्या अर्जावर तुषार अरविंद चौधरी यांचे फक्त नाव आहे. त्यांनी पत्ता बाणेर, पुणे असा दिला आहे. ज्या जागेच्या संबंधी टीडीआर हवा आहे, त्या जागेच्या संबंधी सहाय्यक दुय्यम निबंधकांकडे ३ मार्च २०१४ रोजी केलेल्या नोंदणीच्या कागदपत्रातही चौधरी यांचा पत्ता बाणेर, पुणे असाच आहे. प्लॉट क्रमांक, फ्लॅट क्रमांक, वसाहतीचे संपूर्ण नाव, चौधरी यांचा मोबाइल क्रमांक याचा उल्लेख नाही. पॅन कार्डचा क्रमांक दिला आहे. या क्रमांकाची पडताळणी केली तर, त्यांचा पत्ता पुणे येथील नसल्याचे दाखवण्यात येते. जागेचा व्यवहार करणाऱ्या व्यक्तीचा पूर्ण पत्ता व दूरध्वनी क्रमांक नसताना, निबंधक कार्यालयाने जागेच्या व्यवहाराची नोंदणी कशी करून घेतली, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीएम’च्या कोर्टात ‘झेडटीसीसी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ब्रेनडेड रुग्णांच्या विविध अवयव दानासाठी आवश्यक असलेल्या 'झेडटीसीसी' कमिटीला मान्यता मिळून ४ वर्षे लोटली तरी समिती कार्यान्वित न झायामुळे 'मटा'ने त्यासाठी मागच्या दीड वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच्या मुख्यमंत्र्यांपुढे ही व्यथा मांडण्याची संधी लवकरच मिळणार आहे. तसेच 'मटा'च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आरोग्य सेवांसंदर्भातील जनहित याचिकेमध्ये घाटीअंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील पहिल्याच स्वतंत्र विभागीय शासकीय कॅन्सर हॉस्पिटलच्या पाण्याच्या प्रश्नाचा समावेश करण्यात आला. त्याचाच परिणाम म्हणून कॅन्सर हॉस्पिटलसाठी स्वतंत्र जलवाहिनी तयार करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले.

मूत्रपिंड निकामी झालेल्या कित्येकांना विविध कारणांसाठी रक्ताच्या नातेवाईकांकडून मूत्रपिंड मिळू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होऊ शकत नाही व अशांचा कालांतराने मृत्यू होतो. त्यासाठीच कॅडेव्हर ट्रान्सप्लान्ट अर्थात ब्रेनडेड रुग्णांच्या विविध अवयव दानाची सार्वत्रिक गरज व्यक्त केली जाते. मात्र, कॅडेव्हर ट्रान्सप्लान्ट होण्यासाठी त्या त्या शहरामध्ये-विभागामध्ये झोनल को-ऑर्डिनेशन ट्रान्सप्लान्ट कमिटी (झेडटीसीसी) कार्यान्वित असणे व या कमिटीनुसार

प्रत्यारोपणाची गरज असणाऱ्यांची प्रतीक्षा यादी तयार असणे आवश्यक आहे. मात्र, या कमिटीला मान्यता मिळून चार वर्षे लोटली; परंतु ही कमिटी अजूनही कार्यान्वित झालेली नाही. या पार्श्वभूमीवर 'ऑर्गन डोनेशन डे'निमित्त दीड वर्षापूर्वी 'मटा'च्या शहर कार्यालयात आयोजित 'राऊंड टेबल कॉन्फरन्स'मध्ये विविध मूत्रपिंडविकारतज्ज्ञांच्या उपस्थितीत घाटीचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे यांनी ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सुधीर कुलकर्णी यांच्या नावाची सर्वांच्या संमतीने घोषणा केली.

तसेच तसा अहवाल घाटी प्रशासनाकडून 'डीएमइआर'ला पाठविला. त्यानंतर 'डीएमइआर'चे प्रभारी सहसंचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांनीदेखील 'मटा'ला दिलेल्या सदिच्छा भेटीत डॉ. कुलकर्णी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मात्र, अजूनही 'डीएमइआर'कडून आदेश प्राप्त झालेला नाही. या संदर्भात 'मटा'ने वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक ओमप्रकाश शेटे यांनी वृत्तपत्रांमधील कात्रणे मागवली असून, हा विषय मुख्यमंत्र्यांकडे मांडण्याचे आश्वासन दिले आहे. शहरातील शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांमार्फत 'झेडटीसीसी'चा प्रश्न मार्गी लागण्याची सुचिन्हे आहेत.

घाटीत 'ब्रेन डेथ' समिती स्थापन

'मटा'च्या पाठपुराव्याचाच भाग म्हणूनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) 'ब्रेन डेथ' समिती स्थापन झाली आहे. या समितीमार्फत शहरातील रुग्णालयांमधील 'ब्रेन डेड' रुग्णाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. प्रत्येक रुग्णालयाला 'ब्रेन डेड' रुग्णाची माहिती या समितीला कळविणे बंधनकारक असून, यामुळे वेळीच 'ब्रेन डेड' रुग्ण जाहीर केला जाऊन त्याच्या विविध अवयव दानाचा मार्ग मोकळा होणार आहे. अर्थात, 'झेडटीसीसी'च्या प्रतीक्षा यादीनुसारच हे प्रत्यारोपण होऊ शकते. त्यामुळे 'झेडटीसीसी' कार्यान्वित होणे आवश्यक असून, निदान नवीन वर्षात तरी ती कार्यान्वित होईल, अशी आशा आहे.

प्रतीक्षा 'कॅन्सर'च्या जलवाहिनीची

'मटा'ने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच हायकोर्टात दाखल झालेल्या जनहित याचिकेमध्ये कॅन्सर हॉस्पिटलच्या जलवाहिनीच्या प्रश्नाचा समावेश केला. महाराष्ट्रातील पहिलेच शासकीय विभागीय कॅन्सर हॉस्पिटल हे स्थापन झाल्यापासून म्हणजेच तीन वर्षांपासून खासगी टँकरवर सुरू आहे. हॉस्पिटमध्ये पालिकेचा ८ इंची नळ असून दर तिसऱ्या दिवशी हॉस्पिटलला १०-२० हजार लिटरपेक्षा जास्त पाणी मिळत नाही. मात्र, हॉस्पिटलची रोजची गरज ही एक ते दीड लाख लिटर आहे. त्यामुळेच तीन वर्षांपासून हॉस्पिटल हे खासगी टँकरवर अवलंबून आहे. आता 'मटा'च्या पाठपुराव्यानंतर आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार थेट ज्युबली पार्कच्या जलकुंभापासून हॉस्पिटलपर्यंत स्वतंत्र जलवाहिनी केली जाणार आहे. त्यासाठी पालिकेने तीन महिन्यात जलवाहिनी तयार करण्याचे शपथपत्र हायकोर्टात सादर केले असून, कॅन्सर हॉस्पिटलने पालिकेकडे ४५ लाखांचा धनादेश सुपूर्द केला आहे.

मुख्यमंत्र्यांचे पीए ओमप्रकाश शेटे यांनी स्वतःहून 'झेडटीसीसी' बाबत सर्व माहिती, स्थिती व वृत्तपत्रातील कात्रणे मागविली आहेत. मुख्यमंत्र्यांपुढे हा विषय मांडण्याचे व शिष्यमंडळाची भेट घालून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे संधी मिळताच मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न असेल.

- डॉ. सुधीर कुलकर्णी, ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोरूग्ण महिलेची आत्महत्या नव्हे खून

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल परिसरातील मनोरूग्ण नवविवाहितेचा गळफास घेऊन संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला होता. या प्रकरणाचे गूढ उलगडले असून तिच्या जन्मदात्या मातेने वेडसरपणाला कंटाळून गळा आवळून तिचा खून केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

हर्सूल परिसरातील मोनिका नरवडे हिचा विवाह एक महिन्यापूर्वी झाल्टा येथील भाऊसाहेब साबळे याच्यासोबत झाला होता. मात्र, मोनिका मनोरूग्ण असल्यामुळे तिला माहेरी पाठविण्यात आले होते. यापूर्वी देखील मोनिका एकदा घरातून निघून गेल्याने तिच्या कुटुंबाला मनस्तापाला सामोरे जावे लागले होते. सोमवारी सकाळी मोनिकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. तिची आई अनिता नरवडे हिने सर्वात प्रथम मृतदेह पाहिला होता.

हर्सूल पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्यांना हा प्रकार सुरुवातीपासून संशयास्पद वाटत होता. दरम्यान, मंगळवारी तिच्या आईकडे सखोल चौकशी केल्यानंतर तिने मोनिकाचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. तिच्या वेडसरपणाला कंटाळून घरी कोणी नसल्याची संधी साधत झोपेत असताना गळा आवळून खून केल्याची माहिती तिने दिली. अनिता महेंद्र नरवडे (वय ३६) हिला अटक करण्यात आली असून तिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांनी दिली.

असा झाला प्रकार उघड

अनिताने मोनिका हिने छताच्या पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, या पंख्यावरची धूळ जशीच्या तशी होती. यावरून पोलिसांना अनितावर संशय होता. तसेच पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये देखील गळा आवळून तिचा खून केल्याचे नमूद करण्यात आले होते. यामुळे अनिताची चौकशी केल्यानंतर तिने हा प्रकार कबुल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस रिफिलिंग अड्डा उद‍्ध्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवाणदेवडी प‌रिसरात सुरू असलेल्या गॅस रिफीलिंगच्या अड्ड्यावर मंगळवारी विशेष पथकाने छापा मारून तिघांना अटक केली. गॅस सिलिंडरच्या दुकानामागे हा गोरखधंदा सुरू होता. ३९ गॅस सिलिंडरसह दोन मोटारी वजनकाटा आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवाणदेवडीमध्ये एका धार्मिक स्थळाच्या बाजूला साई सेल्स अँड सर्व्हिस हे गॅस सिलिंडरच्या एजंसीचे दुकान आहे. या दुकानाच्या मागे दुकान मालक हा अनाधिकृतरित्या मोठ्या गॅस सिलेंडरमधून लहान गॅस सिलिंडरमध्ये गॅस रिफिलिंग करून देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीआधारे मंगळवारी दुपारी तीन वाजता या ठिकाणी छापा टाकला. यावेळी गॅस रिफिलिंगचा सुरू असलेला हा धंदा उघडकीस आला. दोन मोठ्या व्यवसायिक व एका घरगुती गॅस सिलिंडरमधून लहान तीन किलोच्या टाक्यांमध्ये दोन मोटारींच्या आधारे गॅस‌ भरण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी दुकानमालक जावेद बाबुलाल पठाण (वय ३६ रा. प्रियदर्शनी कॉलनी, पडेगाव), दुकानात गॅस रिपेअर करण्याचे काम करणारे सहआरोपी मोईजखान साहेबखान (वय २५ रा. आरेफ कॉलनी) आणि सय्यद उस्मान सय्यद गुलाब (वय ३५ रा. उस्मानपुरा) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून तीन मोठे गॅस सिलेंडर, ३६ तीन किलोचे सिलिंडर, दोन विद्युत मोटारी, वजनकाटा आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक भारत काकडे, एपीआय ए. ए. सय्यद, सिटीचौक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक देविदास राठोड, गणेश शिंदे, आरेफ अली, एन. के. पठाण, सुनील धुळे, किशोर महाजन, विनोद पवार व मच्छिंद्र सोनवणे यांनी ही कारवाई केली.

तीनशे रुपयात तीन किलो विक्री

मोठ्या टाक्यांमधून तीन किलोच्या छोट्या टाक्यांमध्ये हा गॅस भरला जात होता. एका मोठ्या टाकीमधून साधारण सात ते आठ छोटे सिलेंडर भरण्यात येत होते. ३०० रुपये प्रमाणे याची विक्री करण्यात येत होती. वेल्डिंग व्यवसायिक व विद्यार्थ्यांना हे सिलिंडर देण्यात येत होते. मोठ्या गॅस सिलेंडरमधून छोटे सिलेंडर भरून एका सिलेंडरमागे अंदाजे हजार ते बाराशे रुपयांचा फायदा आरोपींना होत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेतीन कोटी दुर्लक्षामुळे पडून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेचे रस्ते व पूल दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून पाच महिन्यांपूर्वी प्राप्त झालेले तीन कोटी ५२ लाख रुपये बांधकाम विभागाच्या गलथानपणामुळे आणि पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पडून आहेत. नवीन कार्यकारी अभियंता आर. आर. पवार आल्यानंतर आता या कार्यक्रमाच्या मंजुरीची धावपळ सुरू झाली आहे.

राज्य सरकारच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने चार जुलै रोजी कक्ष अधिकारी रेखा काळसेकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविले. त्यात म्हटले आहे, की रस्ते व पूल दुरुस्ती साठी २०१५ -१६ या आर्थिक वर्षासाठी गट अ, ब, क आणि ड साठी नवीन प्रस्ताव कार्यक्रम मंजुरीसाठी मान्यता देण्यात आली. गट अ मध्ये ५२.८८ लाख, गट ब दोन कोटी ४६ लाख, गट क ३५.२५ लाख, गट ड १७.६३ असे एकूण ३ कोटी ५२ लाख ५१ हजार रुपये निश्चित करण्यात आले. मंजूर रकमेपेक्षा दीडपट अधिकचे नियोजन करता येते. म्हणजे पाच कोटी रुपयांपर्यंतची कामे घेता येणे प्रशासनाला शक्य होते.

गटनिहाय निश्चित केलेल्या आर्थिक मर्यादेच्या ८५ टक्क्यांपर्यंत कार्यक्रम तयार करण्याची सूचना होती. गट ब आणि गट क मधून बहुतांश कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारित अपेक्षित आहेत. त्यात दोन किलोमीटरचा रस्ता, अथवा एक किलोमीटरचे डांबरीकरण अपेक्षित आहे. या सर्व निकषांना पात्र ठरूनही बांधकाम विभागाने डिसेंबर उजाडली तरी नियोजन केलेले नाही. राज्य सरकारकडून निधी प्राप्त होऊनही केवळ बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा गलथानपणा, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि पदाधिकाऱ्यांचे अज्ञान याचा फटका ग्रामीण जनतेला बसला आहे.

बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांच्या जागेवर आलेल्या आर.आर. पवार यांनी दोन दिवसांपासून विभागाचा आढावा घेणे सुरू केले आहे. बुधवारी दुपारी त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना बोलाविले होते. त्यावेळी अपूर्ण कामांच्या यादीत ही फाइल तपासण्यात आली. या कामांचे नियोजन अद्याप का झाले नाही, अशी विचारणा पवार यांनी उपअभियंत्यांना विचारली. २२ डिसेंबर रोजी सर्वसाधारण सभा आहे, त्यापूर्वी या योजनेचे नियोजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

एका सर्कलला चार लाख

तीन कोटी ५२ लाखांतून ६० गटांसाठी कामे निश्चित केली गेली तर प्रति सर्कल चार लाख रुपये मिळणार आहेत. यातून कोणत्या रस्त्यांचे मजबुतीकरण होणार किंवा डांबरीकरण करणार, असा प्रश्न आहे. तीन लाखांच्या वरची कामे इ टेंडिरंग ने करण्याचा शासन आदेश आहे. त्यामुळे मिळालेल्या निधीचा सदस्यांपुरताच विनियोग करावयाचा झाल्यास अडचणी येणार आहेत. चार लाखांची कामे तोडून दिली जाण्याचीही भीती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजाजनगरमध्ये भरदिवसा घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज

घराला कुलूप लावून देवदर्शनाला जाणे एक कुटुंबाला चांगलेच महाग पडले. अज्ञात चोरांनी घरफोडी करून बुधवारी (९ डिसेंबर) दुपारी साडेबारा वाजता सुमारे २४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सागरकुमार पटेलिया (रा. आरएक्स-१७ सरस्वती हाउसिंग सोसायटी,त्रिमूर्ती चौक) हे बजाजनगरमध्ये भाड्याच्या घरात राहतात. ते नेहमीप्रमाणे सकाळी दुकानवर कामासाठी गेले. दुपारची कामे झाल्यानंतर त्यांची आई मालतीबाई दुपारी १२ वाजता जवळच्या गणपती मंदिरात दर्शनासाठी गेल्या. त्या एक वाजता परत आल्यानंतर चोरी झाल्याचे उघड झाले. या अर्ध्या तासात कुलूप तोडून अज्ञात चोरांनी घरातील एलईडी टीव्ही व रोख रक्कम १४ हजार रुपये असा २४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. घटनेची माहिती मिळल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी सागरकुमार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर. के. कुंटेवाड करीत आहेत.

कमी ऐवजाची नोंद

चांदीच्या दोन अंगठ्या, लग्नात देण्यात येणाऱ्या चांदीच्या नोटा, सोन्याचे झुमके, एलईडी टीव्ही व रोख १४ हजार, असा ५० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे मालतीबाई यांनी सांगितले. मात्र पोलिसांत २४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेत जाण्यासाठी निघाल्या आणि वसमतला पोहचल्या

$
0
0

पैठण रोडवरील वसतिगृहातील घटना

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घराची आठवण येत असल्यामुळे पैठणरोडवरील रोहिणी मागासवर्गीय वसतिगृहातील तीन अल्पवयीन मुलींनी मंगळवारी सकाळी पलायन केले. त्या वसमत येथे नातेवाईकांकडे सुखरूप आढळल्या आहेत. दरम्यान या प्रकरणी वसतिगृह प्रशासनातर्फे सातारा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पैठण रोडवरील मुलींच्या रोहिणी मागासवर्गीय वसतिगृहात पाच वर्षांपासून हिंगोली येथील तीन अल्पवयीन नातेवाईक विद्यार्थिनी राहतात. त्या वसतिगृहापासून दोन किलोमीटर अंतरावरील संत कबीर शाळेत शिक्षण घेतात. या मुली मंगळवारी सकाळी शाळेसाठी बाहेर पडल्या, त्या दुपारी नियोजित वेळी परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यात आला. वसतिगृहाच्या कर्मचारी भगवती नामदेव वानखेडे यांनी सातारा पोलिस ठाण्यात तीन अल्पवयीन विद्यार्थिनींचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. दरम्यान त्या वसमत येथे पोहोचल्याचा फोन त्यांच्या नातेवाइकांकडून अधीक्षकांना करण्यात आला. या मुली नुकतीच दिवाळीची सुटी संपवून आल्या होत्या. त्यांनी करमत नसून घरची आठवण येत होती, अधीक्षक परवानगी देणार नाहीत, असे वाटल्याने त्यांनी न विचारता वसमत गाठले. याची माहिती मिळेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जलयुक्त’चा थंड कारभार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने मोठा गाजावाजा करून जलयुक्त‌ शिवार योजना जाहीर केली, मात्र मराठवाड्यात या योजनेची कामे संथगतीने सुरू आहेत. विभागात अद्यापही १९ हजार ८१८ कामे सरकारी भाषेत 'प्रगतीपथा'वर आहेत तर, सीएनबीच्या २३४ कामांना अद्यापही मुहूर्त लागला नाही.

दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानामध्ये निवडण्यात आलेल्या १६८२ गावांमध्ये ५८ हजार कामांपैकी ३८ हजार १८४ कामे पूर्ण झाली असल्याची नोंद सरकारी दप्तरात आहे. अद्याप १९ हजार ८१८ कामे अपूर्ण आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात १३३६, जालना ८९०, बीड २५३, परभणी ८७७, हिंगोली २७, नांदेड २६१, लातूर ३९३ तर उस्मानाबाद जिल्ह्यामधील १५ हजार ८०४ कामे सरकारी भाषेत 'प्रगतीपथा'वर आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने सुरू केलेल्या या अभियानाचा येणाऱ्या काळात दुष्काळ निवारणासाठी उपयोग होईल, या आशेने अनेक गावांमध्ये कामे सुरू करण्याचा आग्र‌ह आहे. पुढील महिन्यात पुन्हा नव्याने गावे निवडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षीची कामे येणाऱ्या वर्षात पूर्ण करता येत असली तरी नव्याने निवडलेल्या गावांमुळे कामाचा दबाव वाढणार आहे, पर्यायाने नवीन कामांनाही विलंब होण्याची शक्यता आहे.

१७०० कोटींची गरज

एकूण २२०० कोटींपैकी मराठवाड्यात आतापर्यंत ४८४ कोटी ७४ लाख रुपये खर्च करण्यात आले असून उर्वरीत कामांसाठी १७०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. शासनाच्या या महत्त्वपूर्ण अभियानाला निधीची कमतरता नाही. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत निवडण्यात आलेल्या गावांमध्ये माती बांध तयार करणे, शेततळे तयार करणे, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, वृक्ष लागवड, नाला खोलीकरण व सरळीकरण, ग्रेडेडे बंडिंग व गाळ काढणे आदी कामे करण्यात येतात. ही कामे करण्यासाठी सीएसआर फंडातील १४ कोटींपैकी केवळ २ कोटी रुपयेच खर्च करण्यात आले आहेत.

सीएनबीच्या २३४ कामांना मुहूर्तच नाही

मराठवाड्यात जलयुक्त शिवार अंतर्गत सिमेंट नाला बांधच्या (सीएनबी) २३४ कामांना अद्यापही मुहूर्त लागला नाही. विभागामध्ये १३६६ कामांपैकी १३४७ कामांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरी घेण्यात आली आहे. यापैकी १३३६ कामांसाठी वर्कऑर्डर देण्यात आली आहे. यापैकी ११०२ कामे सुरू करण्यात आली असून ८९२ सीएनबीची कामे पूर्ण झाली आहेत. या संपूर्ण कामांसाठी ८४ कोटी ४२ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआयएम’मध्ये नाराजांची घरवापसी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीत मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनकडून (एमआयएम) तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत नुकतीच पुन्हा घरवापसी केली. आगामी काळात अन्य नाराजांनाही पक्षात पुन्हा सामावून घेण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.

महापालिका निवडणुकीत एमआयएमला २५ जागांवर यश मिळाले. मात्र, तिकीट वाटपामुळे अनेकजण नाराज होते. दोन दिवसांपूर्वी ओवेसी यांनी आपल्या दौऱ्यात नाराज असलेल्या बिन हैदरा, फिरोज खान, मौलाना अहद यांची नाराजी कमी केली. तसेच एमआययएम नगरसेविका सरिता वाघुले यांच्याकडे आयोजित एका कार्यक्रमात खासदार ओवेसी आणि आमदार इम्तियाज जलील यांच्यासोबत बारी कॉलनी वॉर्डात एमआयएम उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढविणारे फिरोज खान ही उपस्थित होते. यावरून एमआयएममध्ये नाराज कार्यकर्त्यांनी पुन्हा घरवापसी करावे, असे प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत.

दुसरीकडे बहिष्कार

खासदार ओवेसी शहरात आले असता डॉ. गफ्फार कादरी यांच्या कॉलेजवर नगरसेवक आणि खासदार यांच्यासाठी रात्रीच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याच्या प्रकरणावरून नाराज पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. याशिवाय ओवेसी यांच्या आगमनापूर्वी झालेल्या नियोजन बैठकीतही काही पदाधिकारी गैरहजर होते. ओवेसीच्या आमखास सभेच्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये अखेरच्या काही तासांपूर्वी काही पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले होते. यावरून पदाधिकाऱ्यांत पुन्हा असंतोष निर्माण झाल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार सतीश चव्हाण यांची हक्कभंग नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'औरंगाबाद-अजिंठा-बऱ्हाणपूर महामार्गाच्या कामाच्या उदघाटन सोहळ्यास आमंत्रित करण्यात आले नाही. लोकप्रतिनिधी म्हणून निमंत्रण पत्रिकेवरही नाव छापण्यात आले नाही. एकप्रकारे हा सभागृहाचा अपमान आहे,' अशी भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी हिवाळी अधिवेशनात हक्कभंगाची नोटीस बजावली आहे.

औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागांतंर्गत औरंगाबाद-अजिंठा-बऱ्हाणपूर महामार्गाचे काम करण्यात येणार आहे. शासकीय कार्यक्रम असूनही या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर लोकप्रतिनिधी म्हणून नाव छापण्यात आले नाही. कार्यक्रमाची चौकशी केल्यानंतर एका शिपाई पाठवून निमंत्रण देण्यात आले. एक प्रकारे हा माझा व सभागृहाचा अवमान असल्याचे आमदार चव्हाण यांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे. शासकीय कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींना प्राधान्याने बोलवून त्यांना योग्य सन्मान द्यावा, असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काढलेले असतानाही हा प्रकार घडला आहे. विरोधी पक्षाचा आमदार असल्याने जाणीवपूर्वक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी निमंत्रण दिले नाही. त्यामुळेच मी हे प्रकरण विशेष हक्क भंग समितीकडे पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना न्याय!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षण आणि रेल्वेतील विविध प्रश्नांवर महाराष्ट्र टाइम्सने वर्षभरात प्रकाश टाकला. समस्यांना वाचा फोडली. त्याचे परिणाम लगेच दिसून आले. तंत्रशिक्षणच्या विद्यार्थ्यांसाठी ईबीसी सवलत, क्रीडा महोत्सवासाठी विद्यार्थ्यांना वसतिगृह रिकामे करण्याचे आदेश विद्यापीठाला मागे घ्यावे लागणे असेल, परवानगी न देता प्रवेश देणाऱ्या कॉलेजांना मंडळाने ठोठावलेला दंड, जमिनीवर बसून परीक्षा देण्याची वेळ आणणाऱ्या शाळेची चौकशी, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क परत करणे, पदव्युत्तर कॉलेजांना शिक्षकांची वाणवा यात 'मटा'ने उठविलेल्या आवाजाची भूमिका महत्त्वाची ठरली.

बारावी परीक्षेत बोर्ड 'फेल', जमिनीवर बसून परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांवर वेळ आली अशी बातमी २४ फेब्रुवारी रोजी प्रकाशित केली. त्यानंतर मंडळाने दखल घेत संबंधित शाळेची चौकशी करत कार्यवाही केली. शाळांच्या बनवेगिरी बाबत ६ फेब्रुवारीपासून हे प्रकरण लावून धरले. यावर शिक्षण विभागने ८३ शाळांना नोटीसा दिल्या. तर राउंड टेबलच्या माध्यमातूनही यावर प्रकाश टाकला. शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न १९ डिसेंबर २०१४ रोजी मांडला. मंडळाची परवानगी न घेता प्रवेश देणाऱ्या संस्थांचा कारभार ९ जानेवारीला समोर आणला. यानंतर मंडळाने अशा शाळांवर कारवाई करत दंड आकारला. खासदारांच्या शाळेवर आकडा टाकून वीज पुरवठा होत असल्याचे वृत्ताने खळबळ उडाली. क्रीडा महोत्सवासाठी विद्यार्थ्यांना वसतिगृह रिकामे, या आदेशाबाबत विद्यापीठाला माघार घ्यावी लागली. उत्तरपत्रिका तपासणी योग्य न झाल्याने शेकडो विद्यार्थी नापास झाल्याचा मुद्दाही लावून धरण्यात आला. त्याचा पाठपुरावा केल्यामुळे ८० विद्यार्थ्यांना न्याय मिळाला. तंत्रशिक्षणच्या ईबीसी सवलतीचा प्रश्न वारंवार लावून धरल्याने मराठवाड्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. अशा अनेक प्रश्नांसह आयआयएमसाठी 'मटा'ने लोकचळवळ उभारण्यात महत्त्वाचा भूमिका पार पाडली. यासह विधी विद्यापीठासारख्या प्रश्नांवर सातत्याने लक्ष वेधले.

रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही

औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर जुन्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर केला जात होता. हे प्रकरण महाराष्ट्र टाइम्सने लावून धरले. प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत रेल्वे प्रशासनाकडून कशी डोळेझाक होते याच्या बातम्या वेळोवेळी प्रसिद्ध केल्या. महाराष्ट्र टाइम्सच्या आग्रही भूमिकेमुळे अखेर रेल्वे स्टेशन येथे नवीन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले.

बोगस भरती प्रकरण

एसटी विभागात अनुकंपा बोगस भरती झाल्या प्रकरणाचा अहवाल महाराष्ट्र टाइम्सने प्रकाशित केला होता. या अहवालानंतर एसटी विभागाने बोगस अनुकंपा भरती प्रकरणातील कर्मचाऱ्यांना निलंबित केले. मात्र, सदर प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नव्हती. याबाबत मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्याह अन्य आठ आमदारांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न विचारले. यानंतर आता दोषी अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पाण्याचा काळाबाजार

रेल्वे प्रवाशांना कमी ‌किमतीमध्ये पाणी मिळावे यासाठी विशेष कंपन्यांकडून पाण्याच्या बाटल्या कमी किमतीत प्रवाशांना दिल्या जातात. फक्त रेल्वे प्रवाशांसाठी आलेल्या या पाण्याचा काळाबाजार सुरू होता. याची विक्री विविध हॉटेलमध्ये सुरू होती. हे वृत्त महाराष्ट्र ट्राइम्सने प्रसिद्ध केले. या प्रकरणी पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतर गुन्हे शाखेने त्या हॉटेलवर धाडी टाकल्या. शहरातील एका एजन्सी चालकांवर गुन्हे दाखल केले. रेल्वेमध्ये विक्रीसाठी असलेला मालही क्रांतिचौक पोलिसांनी जप्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रेकरांनी केली ‘समांतर’च्या कंपनीची चिरफाड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बुधवारी समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने आजपर्यंत केलेल्या कामाची अक्षरशः चिरफाड केली. कराराच्या अनुशंगाने त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरे देताना अधिकाऱ्यांची फ्यां-फ्यां उडाली. बैठकीला महापालिका, कंपनीच्या लेखा विभागाचे अधिकारी, पीएमसीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महापालिकेने कंपनीला आतापर्यंत किती पैसे दिले, असा प्रश्न केंद्रेकरांनी पालिकेचे मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांना विचारला. तेव्हा आतापर्यंत १०२ कोटी रुपये देण्यात आल्याचे थोरात यांनी सांगितले. यापैकी २० कोटी रुपये शासकीय अनुदानातून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समांतर जलवाहिनीसाठी २४० कोटी रुपयांचे शासकीय अनुदान प्राप्त झाले आहे, असा खुलासा त्यांनी केला. कंपनीने आतापर्यंत किती खर्च केला, याची माहिती केंद्रेकरांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारली. जायकवाडी धरणार कॉफर्ड डँप बांधण्यात आला. त्यासाठी ९ कोटी रुपये खर्च केले, १८ कोटी रुपये प्रशासकीय खर्च झाला, १०० कोटी रुपये अन्य कंपनीला देण्यात आले, १० कोटी रुपये देखभाल दुरुस्तीवर खर्च झाले, ७ कोटी रुपये टाटा कंपनीला आग्रीम रक्कम म्हणून दिले असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. एकूण १२६ कोटी ५६ लाख रुपये खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. १२६ कोटी ५६ लाखांपैकी १०० कोटी रुपये अन्य कंपनीला दिल्यामुळे आता पर्यंत कंपनीने प्रत्यक्षात फक्त २६ कोटी ५० लाख रुपयेच खर्च केल्याचे यावेळी उघड झाले.

देखभाल दुरुस्तीवर झालेल्या खर्चाचा तपशील देखील केंद्रेकरांनी महापालिका व कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारला. महापालिकेने २०१४ यावर्षी २ कोटी ३३ लाख रुपये खर्च केल्याचे यावेळी सांगण्यात आले. कंपनीने याच कामांसाठी २०१५ यावर्षी ९ कोटी २७ लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले. एवढा जास्तीचा खर्च कसा झाला, असा प्रश्न केंद्रेकरांनी विचारला. त्यावर कंपनीचे अधिकारी निरुत्तर झाले. जास्तीचा खर्च करून नागरिकांना वेठीस धरू नका, असे केंद्रेकर कंपनीच्या अधिकाऱ्यांना म्हणाले. आतापर्यंत केलेल्या खर्चाचा तपशील लेखी स्वरुपात सादर करा, असे आदेश त्यांनी दिले. कंपनीच्या फायनांशियल मॉडेल बद्दल केंद्रेकर यांनी नाराजी व्यक्त केली.

शहरातील अनेक भागांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. टँकरसाठी केल्या जाणाऱ्या पेमेंटबद्दल केंद्रेकरांनी आक्षेप घेतला. औरंगाबाद, जालना व बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टँकरचे दर मागवा व त्यानुसार टँकरचे पेमेंट करा, असे आदेश त्यांनी दिले. शासकीय दराच्या दुप्पट सध्या टँकरवर खर्च केला जात आहे, हे सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला. केंद्रेकरांनी पीएमसीच्या अधिकाऱ्यांवरही प्रश्नांची सरबत्ती केली. योजनेत सर्वप्रथम कोणते काम करायला हवे होते, असे त्यांनी या अधिकाऱ्यांना विचारले तेव्हा हेडवर्कचे (मुख्य पंपहाऊसचे) काम सर्वप्रथम करणे गरजेचे होते, असे त्यांनी सांगितले. मग हे काम का केले नाही, असे केंद्रेकरांनी विचारले. तेव्हा कंपनीचे अधिकारी ऐकत नाहीत, असे उत्तर त्यांनी केंद्रेकरांना दिले. शहरात आतापर्यंत टाकलेली २६ किलोमीटरची पाइप लाइन कुणाच्या आदेशाने टाकली, असा प्रश्न केंद्रेकरांनी विचारला. तेव्हा त्याचे उत्तर कंपनी व पीएमसीच्या अधिकाऱ्यांना देता आले नाही. समांतर जलवाहिनीच्या कामासाठी ठरवून दिलेले १२ माइलस्टोन व त्यानुसार झालेले काम याचा आढावाही त्यांनी घेतला आणि सरतेशेवटी कंपनी व पीएमसीला टर्मिनेशनची नोटीस द्या, असे आदेश केंद्रेकर यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीची अधिकाऱ्यांची केंद्रेकरांनी घेतलेल्या झाडाझडतीची समांतर जलवाहिनीचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी स्वागत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images