Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

चौकांना दानशूरांचे पाठबळ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील चौकांच्या सुशोभीकरणासाठी खासगी संस्था आणि व्यक्तींनी पुढाकार घेतला असून अनेक चौकांच्या कामांना सुरुवात झाली आहे. येत्या काही महिन्यांत बहुतेक चौक चकाचक, सुशोभीत झालेले दिसतील. महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कामासाठी पुढाकार घेतला आहे.
चौक आणि रस्ता दुभाजकांचे खासगी संस्था, व्यक्तींच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्याची कल्पना एक महिन्यापूर्वी मांडली होती. त्यासाठी त्यांनी बँकर्सची बैठक घेण्यात आली. उद्योजकांना आवाहन केले. बांधकाम व्यवसायात असलेल्या व्यावसायिकांना देखील आवाहन केले. त्यानुसार पालिकेला या सर्वांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील प्रमुख पन्नास चौक सुशोभीत करण्याचे पालिकेने ठरवले आहे. त्याशिवाय ५५ किलोमीटरचे दुभाजक सुशोभ‌ित करण्याचे उद्द‌िष्ट पालिकेने ठेवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पन्नास चौकांसाठी पन्नास जणांनी पुढाकार दर्शवला आहे. त्यापैकी ८ ते १० चौकांच्या सुशोभीकरणाचे काम सुरू होण्याच्या मार्गावर आहे. त्यापैकी कामगार चौकाचे काम पूर्ण झाले आहे. त्रिमूर्तीचौकतील काम सुरू करण्यात आले असून उस्मानपुरा येथील चौकाचे कामही सुरू झाले आहे. कॅनॉट प्लेस येथील चौकाच्या सुशोभीकरण करण्याचे काम करण्याची तयारी उद्योजक योगेश जव्हेरी यांनी दाखवली आहे. केसरी टूर्स आणि सीआयआय या संस्थांनी देखील चौक दत्तक घेण्याची तयारी दर्शवली आहे. सीआयआय (कॉन्फ‌िडरेशन आॅफ इंडस्ट्रिज) या संस्थेतर्फे एंड्रेस अँड हाऊझर्स कंपनीने शहानूरवाडी येथील एकता चौक दत्तक घेतला असून, त्याच्या सुशोभीकरणाचे काम आज शुक्रवारी सुरु करण्यात आले. या चौकाच्या सुशोभीकरणासाठी कंपनीतर्ते १८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. चौक सुशाेभीकरणाच्या कामाच्यावेळी कंपनीचे अध्यक्ष व सीआयआचे अध्यक्ष एन. श्रीराम, संदीप नागोरी, श्रीमती कडापे, चारूदत्त मुशरिफ यांच्यासह पालिकेचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली उपस्थित होते. मराठवाडा कोल्ड स्टोअरेज, डॉ. नरेंद्र वैद्य, विप्रो एन्टरप्रायजेस, न्यू डेल्फीन फूड प्रॉडक्स यांनीही चौक दत्तक घेण्याची तयारी पालिकेकडे दर्शवली असल्याची माहिती मिळाली आहे. यासर्वांना त्यांच्या सोयीनुसार चौक दत्तक दिले जात आहेत. सुरुवातीला या संस्थां आणि व्यक्तींकडून चौक सुशोभीकरणाच्या कामाचे डिझाइन मागविले जात आहे.
महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना शहरातील पुतळे धुण्याचे आदेश दिले आहेत. अनेक पुतळ्यांवर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही पुतळ्यांचे चौथरे जाहिरातींच्या पत्रकांनी विद्रुप झालेले आहेत. त्यामुळे पुतळे धुण्याचे व चौथरे स्वच्छ ठेवण्याचे काम नियमित करा, असे केंद्रेकर यांनी म्हटले आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ध्यास’ची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बँकॉक (थायलंड) शहरात झालेल्या पाचव्या कल्चरल ऑलिम्पियाड स्पर्धेत औरंगाबादेतील कलाकारांनी बाजी मारली. 'ध्यास परफॉर्मिंग आर्टस्' संस्थेच्या १४ विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात पारितोषिके पटकावली. या यशस्वी कलाकारांचे शुक्रवारी शहरात आगमन झाले.
संगीत व नृत्य क्षेत्रात कार्यरत 'ध्यास परफॉर्मिंग आर्टस्' संस्थेच्या १४ विद्यार्थ्यांची बँकॉक येथील आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाचव्या कल्चर ऑलिम्पियाड स्पर्धेत निवड झाली होती. स्पर्धा १६ ते ३० डिसेंबर या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत एकूण ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय गायन, उपशास्त्रीय गायन प्रकारात विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. या महोत्सवात 'ध्यास'च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. या विद्यार्थ्यांना 'ध्यास'चे सचिन नेवपूरकर व केतकी नेवपूरकर यांनी मार्गदर्शन केले होते. 'ध्यास'ने ऑलिम्पियाड स्पर्धेत प्रथमच सहभाग घेतला होता. विजेत्या विद्यार्थ्यांचे शुक्रवारी आगमन झाल्यानंतर विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली. प्रत्यक्ष दोन दिवस स्पर्धा झाली. यावेळी मुलांनी आपल्या कलेचे अतिशय उत्तम सादरीकरण केले, असे सचिन नेवपूरकर यांनी सांगितले.
---
शास्त्रीय जोडी नृत्य - प्राजक्ता राजूरकर, स्वराली मुळे (सुवर्णपदक)
शास्त्रीय समूह नृत्य - अंकिता मुळे, श्रेयसी वडगावकर, मृणाल पतंगे, ऋचा देशमुख, आसावरी मोरे (रौप्यपदक)
शास्त्रीय एकल गायन - गीता व्यास (कांस्यपदक)
उपशास्त्रीय एकल गायन - सुरभी कुलकर्णी (कांस्यपदक)
चित्रपट संगीत एकल - रोहन देशपांडे (सुवर्णपदक), वरद कुलकर्णी, स्नेहल देशमुख (कांस्यपदक)
चित्रपट संगीत जोडी - सर्वेश बक्षी, सेजल काळे (सुवर्णपदक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाडगावकरांच्या कवितेची समीक्षा राहिली’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'कवी मंगेश पाडगावकर यांच्या निखळ मध्यमवर्गीय कवितेची नीटपणे दखल घेतली गेली नाही. चांगली मराठी समीक्षा पाडगावकर यांच्या कवितेच्या वाट्याला आली नाही हे मराठी वाड्मयाचे दुर्दैव आहे,' असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. सुधीर रसाळ यांनी केले. मराठवाडा साहित्य परिषदेत शनिवारी सायंकाळी झालेल्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते.
प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांचे बुधवारी निधन झाले. मराठवाडा साहित्य परिषद आणि मराठवाड्याशी नाते असलेले पाडगावकर रसिकांच्या मनात घर करून आहेत. पाडगावकर यांच्या आठवणींना उजाळा देणे आणि शोक व्यक्त करण्यासाठी 'मसाप'मध्ये श्रद्धांजली सभा झाली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. सुधीर रसाळ, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, डॉ. चंद्रदेव कवडे, छाया महाजन, श्रीकांत उमरीकर, प्रा. विद्या पाटील, प्रा. संतोष भूमकर, प्रा. रवी कोरडे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. रसाळ म्हणाले, 'पाडगावकर यांच्या जाण्याने मराठी कवितेची समृद्ध परंपरा संपली. पाडगावकर समजून घेण्यासाठी 'जिप्सी', 'छोरी' हे सुरुवातीचे कवितासंग्रह वाचले पाहिजे. ही कविता जीवनावर प्रेम करायला लावणारी व जीवन समरसून भोगण्यास प्रवृत्त करणारी आहे. दुर्दैवाने या कवितेची नीट समीक्षा केली गेली नाही. पाडगावकर यांच्या निधनाने सशक्त रोमँटिक कवितेची परंपरा लयास गेली आहे'. डॉ. चंद्रकांत पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 'शिक्षण सुरू असताना 'साधना' दिवाळी अंकात माझी कविता छापून आली. अतिशय निवडक व दर्जेदार कविता छापणे हा 'साधना'चा लौकिक होता. या अंकाचे संपादन पाडगावकर यांनी केल्याचे मला दोन वर्षानंतर समजले. ही एक सुखद आठवण सोडल्यास कवितेच्या दर्जावरून पाडगावकर यांच्याशी अनेकदा मतभेद झाले. मध्यमवर्गीयांचे भावजीवन पाडगावकर यांनी समृद्ध केले. मध्यमवर्गीयांच्या भावजीवनात बौद्धिकतेला जागा नसते. त्याप्रमाणे पाडगावकरांच्या कवितेतही बौद्धिकतेला जागा नव्हती. उलट पाडगावकरांनी केलेले अनुवाद सरस होते. कवितेच्या जातकुळीबाबत मतभेद असले तरी पाडगावकरांच्या कवितेने मराठी रसिकांची अभिरूची वाढवली. त्यांचे जाणे म्हणजे अभिरूची कमी होणे आहे,' असे पाटील म्हणाले. यावेळी कौतिकराव ठाले पाटील यांनी शोकप्रस्तावाचे वाचन केले. 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने मिळणार असेल तरच स्वीकारीन असे पाडगावकर म्हणाले होते. त्यामुळे दुबईतील विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद साहित्य महामंडळाने त्यांना सन्मानपूर्वक दिले. या संमेलनात त्यांनी महामंडळाचे कौतुक केले होते,' असे ठाले यांनी सांगितले. यावेळी साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौलताबाद घाट मार्गावरूनआता अवजड वाहतूक बंद

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दौलताबाद टी पॉइंट ते दौलताबाद घाट मार्ग नवीन वर्षात अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी हे आदेश काढले. घाटात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दौलताबाद टी पॉइंट ते दौलताबाद घाटाचा मार्ग अरूंद आहे. घाटाच्या लहान असलेल्या गेटमध्ये अवजड वाहन अडकून वाहतूक कोंडीच्या अनेक घटना घडल्या आहेत. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी १ जानेवारीपासून या मार्गावरू अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बंदोबस्तावरील पोलिस, शास‌कीय अधिकारी व अत्यावश्यक सेवा असणाऱ्या वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. अवजड वाहनांसाठीचा बंद मार्ग व पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे-
औरंगाबादकडून कन्नड, धुळ्याकडे जाणारी सर्व अवजड वाहने दौलताबाद टी पॉइंटपासून माळीवाडा, आनंद ढाबा, कसाबखेडा फाट्यामार्गे वेरूळ व कन्नडकडे जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारीखांच्या आठवणीने डबडबले डोळे!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रमणभाई पारीख यांना शुक्रवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. सरस्वती भुवन शिक्षणसंस्थेच्या मध्यवर्ती सभागृहात ही शोकसभा झाली. यावेळी व्यासपीठावर दिनकर बोरीकर, दिनेश वकील, ना. वि. देशपांडे, रामकृष्ण जोशी यांची उपस्थिती होती. या मान्यवरांनी रमणभाई पारीख यांच्या अनेक आठवणी जागवल्या.
---
गोविंदभाईंना सावलीसारखी सोबत करणारा आमचा एक जाणता मित्र आज गेला. मी, ना. वि. देशपांडे आणि रमणभाई यांना गोविंदभाईंच्या टोळीतले तिघे असे संबोधले जायचे. त्यातल्यात रमणभाई हे भाईंच्या जवळ आणि त्यांना हवे नको ते पाहणारा सच्चा कार्यकर्ता होता.
- दिनकर बोरीकर
---
पत्रकारिता करताना आणि संपल्यानंतरही कायम साथ देणारा जाणता नेता आणि सामाजिक भान असलेला माणूस आज गेला.
- नागनाथ फटाले
---
गोविंदभाईंच्या चळवळीत जर नेहमी गोविंदभाई 'राम' राहिले असतील, तर रमणभाई नेहमी 'संकटमोचन हनुमान' राहिले आहेत.
- शैलेश पारीख
---
मराठवाडा मुक्तीसंग्रमासह विविध चळवळीत पारीख यांनी गोविंदभाईंसोबत साथ दिली. त्यांनी ज्येष्ठांसोबत असलेले मतभेद कधीही बोलून दाखवले नाहीत. चळवळीत व लढा महिला, मुलींची जपणुकीकडे त्यांचे सदैव लक्ष असायचे.
- ताराबाई लढ्ढा
---
रमणभाईंसारखा मित्र होणे नाही. त्यांच्या मुलांची नावे काय ठेवायची, कधी काय व कोणता निर्णय घ्यायचा, हे ते आमच्याशी सल्लामसलत करून ठरवायचे. आज खूप आठवणी दाटून आल्या आहेत.
- ना. वि. देशपांडे
---
मला चळवळीत आणि लढायात रमणभाईंनी आणले. ‌रेल्वे रुंदीकरणाच्या लढ्यात माझा सहभाग त्यांनीच घडवून आणला. या शिवाय माझ्या कौटुंबिक आ‌ठवणीही खूप आहेत.- डॉ. शरद अदवंत
---
त्यांच्या अनेक सामाजिक लढ्यात वकील म्हणून समोर गेलो. मला सामाजिक जाण आणि सामंजस्यपणा त्यांनीच शिकविला. त्यांनी अनेक न्यायालयीन लढायाही जिंकल्या, लढल्या आहेत. त्यात मनपाच्या करवाढीविरोधातील याचिका अधिक गाजली.
- दिनेश वकील
---
निवडणुकीत पैसे वाटण्याची वेळ त्यांच्या विरोधकांवर आली होती. पैसे वाटणाऱ्या अनेकांविरोधात आम्ही तरुण जेव्हा हाणामारी करू लागलो, तेव्हा आम्हाला भानावर आणून समजावण्याचे काम त्यांनी मोठ्या शिताफीने केले. आज अशा अनेक आठवणी आहेत ज्यात रमणभाई एक लढवय्या, सच्चा आणि सामाजिक जाण असलेला नेता म्हणून समोर आला आहे. त्या प्रसंगाची आज आठवण येत आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामासह पारीख यांनी अनेक चळवळीत मोठ्या हिरारीने भाग घेतला.
- प्रतापराव बोराडे
---
आंदोलनात जेव्हा 'जोश'मुळे 'होश' गमावून बसण्याची वेळ येत होती, तेव्हा भानावर आणण्याचे काम त्यांनी केले. मला नेहमी आंदोलन करताना जेव्हा जेलमधून परत यायची वेळ असायची, ते नेहमीच समजावून सांगत. मी गोविंदभाई, कॉ. चौधरी असो किंवा आता रमणभाई. या सर्वांना खांदा दिला. आज खरोखरच या खांद्यावर त्याअर्थाने खूप मोठे ओझे आहे.- बुद्धीनाथ बराळ
---
नामांतर चळवळीत मतभेद असतानाही वैयक्तिक पातळीवर त्यांनी माझ्याशी असलेले संबंध कधीही तोडले नाहीत. कार्यकर्ता वेगळा आणि नातेसंबंध वेगळे असे मानणारे रमणभाई कार्पोरेटर म्हणून महान होते. उत्तम शहर व्हावे ही त्यांची तळमळ असायची. तसे शहर निर्माण करणे हीच त्यांना श्रद्धांजली असेल.- सुभाष लोमटे




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळामुळे रजिस्ट्रीचे प्रमाण घटले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या दुष्काळाचा सरकारी तिजोरीलाही फटका बसला आहे. मुद्रांक शुल्कापोटी ३४९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना जिल्ह्यात डिसेंबर २०१५अखेरपर्यंत केवळ २२५ कोटी रुपयांपर्यंत पोचला आहे. विषेश म्हणजे गेल्यावर्षी जिल्ह्यात टार्गेटपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले होते.
अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात यंदाही दुष्काळ आहे. वेगाने विकसित होणाऱ्या शहरांच्या यादीत असलेल्या औरंगाबाद शहरामध्ये स्थावर मालमत्तांचे व्यवहार गेल्या काही दिवसांपासून थंडावले असून, परिणामी मुद्रांक शुल्कापोटी शासकीय तिजोरीत जमा होणाऱ्या महसुलात घट झाली आहे. औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी असून, विभागाच्या विविध भागांतून औरंगाबाद येथे स्थायिक होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यंदाही मराठवाड्यात दुष्काळ असल्यामुळे शहर, परिसरामध्ये जमीन, प्लॉट व फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार काही दिवसांपासून थंडावले आहेत. नोव्हेंबर २०१५पर्यंत १८६ कोटी ६१ लाख तर, डिसेंबर महिन्यामध्ये यामध्ये ३४ कोटी ३२ लाख आणि ट्रेझरीचे सुमारे ४ कोटी असे २२५ कोटी रुपये ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कापोटी सरकारी तिजोरीत जमा झाले. गेल्या वर्षी 'डीएमआयसी'मुळे शहर परिसरामध्ये जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाले होते. जिल्ह्याला गेल्यावर्षी २८९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत सरकारी तिजोरीत २३० कोटी ७२ लाख तर, मार्च अखेरपर्यंत उद्दिष्ट पार करत ३०५ कोटी रुपयांचा (१०५.६१ टक्के) महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला होता.
---
डिसेंबर २०१५अखेरपर्यंत जमा ः २२५ कोटी रुपये
डिसेंबर २०१४पर्यंत जमा ः २३० कोटी ७५ लाख रुपये
महसुलाचे चालू वर्षाचे उद्दिष्ट ः ३४९ कोटी रुपये
गेल्या वर्षीचे उद्दिष्ट ः २८९ कोटी रुपये
गेल्या वर्षीचे महसूल संकलन ः ३०५ कोटी रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीसीआर वाहनांना जीपीएस ट्रॅकींग सिस्टीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस आयुक्तालयातील पोलिस कंट्रोल रूमच्या बारा वाहनांना जीपीएस ट्रॅकींग सिस्टीम बसविण्यात आली आहे. पोलिस दलाचे अत्याधुनिककरण करण्यासाठी तसेच नागरिकांना तात्काळ मदत मिळण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. सेफ सोल्युशन, मिरॅकल आईटीईस व चेंबर ऑफ अॅथॉराईड अॅटो डिलर्स असोसिएशन यांच्या सौजन्याने ही सिस्टीम बसविण्यात आली. यामध्ये लाईव्ह ट्रॅकिंग, हिस्ट्री ट्रॅकिंग, डिटेल फ्युल ‌ट्रॅकिंग, ट्रॅव्हल रिपोर्ट, इग्निशन ऑन ऑफबाबत माहिती मिळणार आहे. याबाबतचे अॅप पोलिस नियंत्रण कक्ष व पोलिस अधिकारी यांच्या मोबाइलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सिस्टीममुळे वाहनांचे नेमके लोकेशन कळण्यास मदत होणार असून गरजू नागरिकांना तात्काळ मदत पाठविण्यास उपयुक्त ठरणार आहे. खाजगी शाळांच्या बसेस, खाजगी वाहतूक बसेस यांना देखील या अॅपचा फायदा होऊ शकतो. ही सुविधा सेफ सोल्युशनचे राजेश डोगरा यांच्याकडे उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवेत गोळीबार केल्याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एन १ भागात लघुशंकेच्या वादातून झालेल्या हाणामारीत हवेत गोळीबार करीत प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. माजी नगरसेवक भगवान रगडे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

बुधवारी रात्री अकरा वाजता कारवर लघुशंका केल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला होता. यावेळी रतनसिंग बिस्ट याने एयरगनने हवेत गोळीबार केला होता. या घटनेत माजी नगरसेवक भगवान रगडे गंभीर जखमी झाले होते. त्यांनी पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. यामध्ये प्रोझोन मॉल चौकाकडे चार ते पाच जण उभे होते.

यापैकी एकाने हवेत एयरगनने गोळीबार केला. रगडे यांनी त्याला फायरिंगचे कारण विचारले. यावेळी तेथे उभ्या असलेल्या स्कोडा कारमधून तीन तरुण व एक महिला खाली उतरली. तुला काय करायचे असे म्हणत त्यांनी तलवार, हॉकीस्टिक व फायटरने रगडेवर हल्ला चढविला. यामध्ये रगडे जखमी झाले. त्यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरमालकाने केला तरुणीचा विनयभंग

घरमालकाने लग्नाची मागणी घालत तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी शहाबाजार येथे घडला. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नवाब (पूर्ण नाव माहित नाही) याच्याविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पार्किंग स्थलांतरामुळे अनेक प्रश्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
पर्यटन केंद्रात पार्किंग स्थलांतरित केल्यानंतर वेरूळ लेणीने मोकळा श्वास घेतला आहे, मात्र पर्यटकांना नीट सूचना दिल्या जात नसल्याने पहिल्याच दिवशी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पर्यटक, पोलिस व सुरक्षारक्षकांमध्ये वारंवार खटके उडत होते.
लेणीची सुरक्षा व प्रदूषण टाळण्यासाठी पार्किंग बंद करण्यात आली आहे. पर्यटकांची वाहनने पर्यटन केंद्राच्या पार्किंगमध्ये थांबवण्यात येत असून तेथून एसटी बसमधून लेणीमध्ये प्रवेश करावा लागत आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भर पडणार असली तरी काही प्रश्नही निर्माण झाले आहेत. पार्किंगची जागा बदलल्यामुळे वाहनधारकांनी वाहने पर्यटन केंद्रातील पार्किंगमध्ये न नेता ती रस्त्याच्याकडेला उभी केली. यामुळे राष्ट्रीय महामार्ग २११ वर वाहतूक कोंडी होत आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना धाव घ्यावी लागली.
पार्किंग बंद झाल्याने रस्त्यावरील हॉटेलमध्ये ग्राहक वाढले आहेत. शैक्षणिक सहलीसाठी आलेले विद्यार्थ्यांनी बसमधून लेणीत प्रवेश करण्याऐवजी पर्यटक केंद्र ते लेणीपर्यंत पायपीट करताना दिसले. हे अंतर साधारणतः ४०० मीटर (सुमारे अर्धा किलोमिटर) आहे. काही पर्यटक व विद्यार्थी लेणीच्या प्रवेशद्वाराजवळ वाहनातून उतरून लेणीत प्रवेश करण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे त्यांचे सुरक्षारक्षक व पोलिसांशी खटके उडत आहेत.
एस. टी. महामंडळाच्या बसशिवाय सर्व वाहनांना लेणी परिसरात बंदी घालण्यात आली आहे. मात्र पहिल्याच दिवशी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता लाल दिवा लावलेल्या दोन व्हीव्हीआयपी वाहनांना लेणीपर्यंत प्रवेश देण्यात आला. या वाहनांचा नंबर एम. पी. ०४ सी. एम. ७९८९ व एम. पी. ०२ ए. व्ही. ५४२६, असा असून त्यामध्ये मध्य प्रदेशचे दोन मंत्री असल्याची माहिती मिळाली. या लाल दिव्याच्या मोटारी लेणी क्रमांक १६ जवळ येताच बसमधील पर्यटकांनी खाली उतरून आमच्या वाहनांना प्रवेशबंदी आणि व्हीआयपींच्या वाहनांना प्रवेश कसा?, असा सवाल उपस्थित केला, मात्र त्यांना कोणीही उत्तर दिले नाही.
पर्यटन केंद्रात पार्किंग स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती देणारे फलक लावण्यात आले नसल्याने वाहन कोठे उभे करावे, असा प्रश्न पर्यटकांना पडत आहे. शिवाय लेणीत जाण्यासाठी बस कोठून मिळते, बसचे तिकीट दर, लेणीचे तिकीट मिळण्याची व्यवस्था, बस संपूर्ण लेणीपर्यंत जाते काय, गाईड कोठून उपलब्ध होईल, अपंग पर्यटकांसाठी व्यवस्था आदी प्रश्न पर्यटकांना पडत आहेत.
दरम्यान, वाहतूक कोंडीबद्दल विचारणा केली असता कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर नो पार्किंग झोन तयार करण्यात येतील, असे पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी सांगितले. नवीन व्यवस्थेमुळे एमटीडीसीमधील उपाहारगृहाचा व्यवसाय वाढेल, अशी अपेक्षा व्यवस्थापक एस. टी. नागमोडे यांनी दिली. येथील जुन्या पार्किंगचे कंत्राटदार कुणाल दांडगे यांनी ३१ मार्चची मुदत संपण्यापूर्वीच नवीन व्यवस्था करण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाडेकरार आता ऑनलाइन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घर, फ्लॅट, जमिनीसाठीचा नोंदणीकृत भाडेकरार लवकरच ऑनलाइन करता येणार आहे. मुद्रांक शुल्क विभाग येत्या काही दिवसांत शहराच्या विविध भागात यासाठी केंद्र सुरू करणार आहे, अशी माहिती नोंदणी उप निबंधक जी. एस. कोळेकर यांनी दिली.
भाड्याने दिलेले घर, फ्लॅट बळकावण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सुरक्षिततेसाठी शहरात दरवर्षी मोठ्याप्रमाणावर भाडेकरार करण्यात येतात. सध्या लहान, मोठा भाडेकरार करण्यासाठी १०० रुपयांच्या बॉंड करण्यात येऊन या कराराचा कागद दोन्ही व्यक्तींकडे ठेवण्यात येतो. मात्र, जोपर्यंत या कराराची मुद्रांक शुल्क विभागाकडे अधिकृत नोंद होत नाही, तोपर्यंत हा करार अधिकृत समजला जात नाही. रजिस्ट्री कार्यालयात या कराराची नोंद झाली, तर करारातील अटींचा भंग झाल्यास मालकाला भाडेकरूवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी हा नोंदणीकृत कराराचा उपयोग होणार आहे. ही सुविधा ऑनलाइन उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना लहान मोठ्या करारासाठी रजिस्ट्री कार्यालयाची पायरी चढावी लागणार नाही. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये ऑनलाइन भाडेकरार करण्याची पद्धत सुरू झाली आहे. या शहरांमध्ये या करारपद्धतीच्या नोंदींना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. औरंगाबादमध्येही अशा पद्धतीने कराराच्या नोंदणी केल्यास कार्यालयातील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये रजिस्ट्री कार्यालय ही नवीन सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देणार आहे.
ऑनलाइन भाडेकरारासाठी शहरात विविध ठिकाणी खासगी संस्थांना केंद्र चालवण्यास देण्यात येणार आहे. नागरिकांना या केंद्रावरून नोंदणी करता येईल. कराराची संपूर्ण कागदपत्रे रजिस्ट्री कार्यालयाकडे ऑनलाइन येतील. भाडेकरारासाठीची कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर व्यवहार योग्य असल्यास नोंदणी केलेल्या अधिकृत कराराची प्रत देण्यात येईल. करार कसा करायचा, यातील अटी व शर्थी ठरवण्याचा अधिकार हा करार लिहून घेणारा व लिहून देणारा अशा दोघांचा राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजारोंच्या गर्दीतून आरोपीला हेरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरोपींची माहिती नाही, मोबाइल लोकेशनवरून मुंबईतील सायनसारख्या गजबजलेल्या भागात आरोपी असल्याचे ‌निष्पन्न होत होते. साडेसात तासाच्या परिश्रमानंतर ३५ लाखांची फसवणूक करणारे दोन मुख्य आरोपी आर्थिक गुन्हेशाखेच्या जाळ्यात सापडले. शुक्रवारी या दोघांना कोर्टात हजर करण्यात आले असता आठ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या रिलीज फंडात रक्कम गुंतविण्याचे आमिष दाखवित अभिजित कुलकर्णी या व्यवसायिकाला गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून आरोपी आरोपी निवेदिता कुलकर्णी, विश्वनाथ अवचट, बाळासाहेब दैठणकर, कमलाकर कुलकर्णी, सुरेश चव्हाण व अशोक जंगम यांच्याविरुद्ध अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निवेदिता कुलकर्णी व विश्वनाथ अवचट हे मुंबईला सायनमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. पसार आरोपी अशोक जंगम याच्यासोबत त्यांची बैठक होणार होती. आ‌र्थिक गुन्हेशाखेचे पथक बुधवारी रात्रीपासून सायन परिसरात ठाण मांडून होते. तक्रारदार अभिजित कुलकर्णी देखील त्यांच्यासोबत होते. आरोपीची नेमकी माहिती नसल्याने त्यांना पकडायचे कसे तसेच मोबाइलचे टॉवर लोकेशन माहित असले तरी हजारोच्या गर्दीमध्ये त्यांना ओळखायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला होता. पीएसआय सुभाष खंडागळे यांनी प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून रस्ते वाटून दिले. आरोपींच्या वयाची अंदाजे माहिती होती. सकाळी नऊ वाजेपासून पुन्हा शोध मोहीम राबविण्यात आली. सायन सर्कलजवळ संशयित जोडी पोलिसांना आढळली. तक्रारदाराला दाखविल्यानंतर त्याने त्याला दुजोरा दिला. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुभाष खंडागळे, विलास कुलकर्णी, प्रकाश काळे, सचिन सकंपाळ, मनोज उईके, दादासाहेब झारगड आदींनी ही कारवाई केली.

महिला आरोपीचा थयथयाट

आरोपी निवेदिता कुलकर्णीला ताब्यात घेतल्यानंतर तिने स्वतःचे वय ६५ वर्षे आहे, असे पोलिसांना सांगितले. नियमानुसार ६० पेक्षा जास्त वय असलेल्या नोटीस देणे आवश्यक आहे, असा नियमही तिने सांगितला. पोलिसांनी दोघांना जवळच्या पोलिस चौकीत नेले. या ठिकाणी त्यांच्याकडे असलेल्या सामानाची तपासणी करण्यात आली. यावेळी निवेदिता कुलकर्णी यांचे पॅन कार्ड आढळून आले. त्यावरील जन्म तारखेनुसार त्यांचे सध्याचे वय ५६ असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीटी पोलिसांचे अॅप आता मोबाइलवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद पोलिस दलाचे स्वतःचे अॅप आता अँड्राईड मोबाइलवर आले आहे. शुक्रवारी एका कार्यक्रमात या अॅपचे उद्घाटन करण्यात आले. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अॅप उपयुक्त ठरणार असून यासोबतच इतर महत्वपूर्ण माहिती देखील या अॅपमध्ये उपलब्ध आहे.

'औरंगाबाद सीटी पोलिस' या नावाने हे अॅप गुगल प्ले स्टोअर्सवर उपलब्ध आहे. तरुणी, महिलांच्या आपत्कालीन सुरक्षिततेसाठी यामध्ये हेल्प नावाचे बटन आहे. यासोबतच विविध सतरा फोल्डरमध्ये वेगवेगळ्या हेडखाली माहिती देण्यात आली आहे. महिला हेल्पलाईन क्रमांक, ‌कंट्रोल रूम क्रमांक, पोलिस ठाण्याचे प्रभारी व लँडलाईन क्रमांक, अॅपच्या माध्यमातून तक्रार दाखल करण्याची सुविधा, सायबर क्राइम सुरक्षितता, हरविलेल्या व्यक्ती व वाहनांची माहिती, वाहतूक नियम व दंड, वाँटेड गुन्हेगाराची यादी, अनोळखी मृत व्यक्तीची माहिती, प्रेस नोट, शहर पोलिसांच्या यशस्वी कामगिरीची माहिती, सर्व पोलिस अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक तसेच दक्ष नागरिक फोल्डरमध्ये नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यायच्या सूचना तसेच दहशतवाद रोखण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना आदींचा समावेश आहे. हे अॅप टेक बिटस् सॉफ्टवेअर प्रायवेट लिमीटेड कंपनीने तयार केले आहे. या अॅपच्या उद्घाटनप्रसंगी पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटोळे, एसीपी खुशालचंद बाहेती, सुखदेव चौगुले, रविकांत बुवा, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव आदींची उपस्थीती होती.

हेल्प बटन दाबताच अशी मिळणार मदत

हे अॅप जीपीएस प्रणालीवर आधारित आहे. तरुणीने हेल्पचे बटन दाबल्यानंतर पोलिस कंट्रोलरूममध्ये या तरुणीचे नेमके ठिकाण व मोबाइल क्रमांक कळणार आहे. त्यामुळे त्या पीडित महिला, तरुणीच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या पेट्रोलिंग पथक, चार्ली, दामिनी, टुरिस्ट मोबाइल तसेच स्थानिक पोलिसांना ही माहिती कळवून तात्काळ घटनास्थळी पाठविण्यात येणार आहे.

हे अॅप महिला मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त आहे. हे अॅप डाऊनलोड करून त्याचा फायदा शहरवासियांनी घ्यावा

अमितेशकुमार - पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एप्रिलपर्यंत गुणवत्ता सुधारा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'दत्तक शाळांकडे विशेष लक्ष द्या, एप्रिलपर्यंत शाळांमधील गुणवत्ता सिद्ध करा,' अशा आदेशवजा सूचना शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी शिक्षण विभागाला दिल्या. त्यांनी शनिवारी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमचा विभागीय आढावा घेतला.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासनाने जूनमध्ये 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम' जाहीर केला. त्यानुसार शिक्षण विभागातील महत्त्वांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येकी २०० शाळांचे पालकत्व घेत तेथे ज्ञानरचनावाद पद्धतीवर आधारित शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देणे अपेक्षित आहे. त्यानुसार औरंगाबाद विभागातील या कार्यक्रमाचा आढावा शनिवारी शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी घेतला. शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या आढाव्यासाठी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, उपसंचालक सुधाकर बानाटे, भाऊसाहेब तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण आयुक्तांनी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना 'एज्युकेशन गॅरंटी कार्ड' बाबत विचारले. मात्र, एकाच अधिकाऱ्याला याबाबत उत्तर देता आले. त्यातही गफलत असल्याचे आयुक्तांनी निदर्शनास आणून दिले. तर कोणत्या अधिकाऱ्याने किती शाळा दत्तक घेतल्या याबाबतही संभ्रमच असल्याचे समोर आले आहे. त्याची आकडेवारी जमा करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी भापकर म्हणाले, 'राज्यातील एकही शाळा, एकही मूल अप्रगत राहणार नाही याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. शिक्षक बदलत आहेत. आता अधिकाऱ्यांनी बदलणे गरजेचे आहे. शाळांचा चेहरामोहरा बदलायचा असेल, तर ग्रामस्थांना सहभागी करून घ्या, लोकचळवळ उभी करा. जिल्ह्यातील शाळांची स्वच्छता आणि रंगरंगोटी एक महिन्यात पूर्ण करू असा संकल्प औरंगाबादने करावा. ज्यात शाळेचा परिसर स्वच्छता, रंगरंगोटीचा समावेश आहे. ग्रामस्थांची, उद्योगांची यासाठी मदत घ्या,' असे आवाहन भापकरांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चौधरी यांनीही मार्गदर्शन केले.
---
ऐकायलाच बोलावले का?
विभागातील २०० पेक्षा जास्त अधिकारी उपस्थित होते. मात्र, त्यातील फक्त तीन जणांनाच आपल्या सादरीकरणाची संधी मिळाली. त्यामुळेही विविध जिल्ह्यातून आलेल्या अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत फक्त ऐकायलाच बोलावले का, असा प्रश्न करत काढता पाय घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारवाडी मंचाचे मंगलाष्टक वन्समोअर

$
0
0


Sudhir.Bhalerao
@timesgroup.com
औरंगाबाद : लग्न हा प्रत्येक घराघरात जिव्हाळ्याचा, चर्चेचा विषय. वय वाढले, लग्न लांबले की तो चिंतेचा होतो. प्रत्येक समाजातील या समस्येवरचे उत्तर शोधण्यासाठी औरंगाबादमध्ये नव्यानेच स्थापन झालेल्या सकल मारवाडी युवा मंचने पुढाकार घेतला आहे. परिचय संमेलनच्या माध्यमातून विधवा, विधुर, विकलांग, घटस्फोटित आणि वय झालेल्या विवाहोत्सुकांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आजवर या मंचने तब्बल १७ समाज घटकांना एकत्रित आणण्याचे आव्हान यशस्वीपणे पेलले. देशातील अशा प्रकारे झालेले हे पहिलेच संमेलन म्हणावे लागेल.
सकल मारवाडी युवा मंचच्या देशभरात ७०० शाखा. शहरातील पहिल्या शाखेची स्थापना गेल्या ऑगस्ट महिन्यात झाली. स्थापनेनंतर विवाहत्सुकांचे परिचय संमेलन घेण्याचे ठरले. एका समाजापुरतेच संमेलन न घेता १७ समाज घटकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा विडा पदाधिकाऱ्यांनी उचलला. नव्याने लग्न जुळवणे सोपे जाते. मात्र, विधवा, विधुर, विकलांग, घटस्फोटीत अशा वर्गातील विवाह शक्यतो लवकर जुळत नाहीत. त्यांच्यासाठी परिचय संमेलन घेण्याचे अवघड आव्हान मंचाने स्वीकारले. या संमेलनाची तीन महिने तयारी केली. अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असल्याने लोक कितपत सहकार्य करतील, ही शंका पदाधिकाऱ्यांच्या मनात होती. आपण चांगले काम हाती घेतले आहे, त्यात नक्की यश मिळेल हा त्यांचा विश्वासही होता. २७ डिसेंबर रोजी झालेल्या या परिचय संमेलनात देशभरातून ४५० विवाहत्सुकांनी सहभाग घेतला. त्यात घटस्फोटीत आणि वाढत्या वयातील मंडळींची संख्या लक्षणीय होती हे विशेष. सकल मारवाडी युव मंचच्या परिचय संमेलनात माहेश्वरी, सोनार, जैन, ओसवाल, खंडेलवाल, अग्रवाल, ब्राह्मण, सेन, जाट, चौधरी, जांगिड, राजपूत, गुर्जर, पुरोहित, प्रजापत, जिनगर, खत्री या समाज घटकांनी सहभाग घेतला. १७ समाज घटकांसाठीचे हे पहिेलेच परिचय संमेलन ठरले.

मुले झाली पालक
विधवा, विधूर, विकलांग, घटस्फोटीत आणि वय वाढलेल्या विवाहत्सुकांसाठी हे परिचय संमेलन असल्याने मुले-मुली हे पालकांच्या भूमिकेत दिसत होती. हेच या संमेलनाचे खास वैशिष्ट्य ठरले. या संमेलनात महाराष्ट्रातूनच नव्हे तर हैदराबाद, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, चेन्नई, दिल्ली, रायपूर, कोलकाता अशा विविध ठिकाणांहून विवाहत्सुक आले होते. मुलगी, मुलगा, जावई यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी पुढाकार घेतला होता.

व्हिडिओच्या माध्यमातून परिचय
परिचय संमेलन एका दिवसाचे असल्याने अधिकाधिक लोकांना यात सहभाग घेता यावा म्हणून संयोजकांनी व्हिडिओ क्लिपिंग माध्यमाचा उपयोग करण्याचे ठरवले. हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. संमेलनात सहभागी झालेल्यांनी २०-३० सेकंदाचा आपला परिचय स्वतः तयार करून पाठवला. त्यानंतर मंचच्या एका टीमने व्हिडिओ क्लिपिंगवर काम करून त्याचे प्रेझेटेंशन तयार केले. या प्रेझेंटेशनचा चांगला परिणाम झाला. विविध समाजातील विवाहत्सुक असूनही आंतरजातीय विवाह करण्यासाठी अनेक जण तयार झाले. या संमेलनातून पन्नासपेक्षा अधिक विवाह जमण्याची चिन्हे आहेत. पहिल्यांदाच घेतलेल्या या संमेलनाचे यापेक्षा मोठे यश असू शकत नाही, असे सकल मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष संजय मंत्री यांनी सांगितले.

बिझनेस एक्स्पो, कॅन्सर डिटेक्टर व्हॅन
सकल मारवाडी युवा मंचच्या माध्यमातून आगामी काळात अनेक उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने बिझनेस एक्स्पो, स्किल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम, मेडिकल क्लेम, कॅन्सर डिरेक्टर व्हॅन अशा उपक्रमांचा समावेश आहे. व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तसेच व्यवसाय असलेल्यांसाठी बिझनेस एक्स्पो घेण्यात येणार आहे. त्यातून अनेकांना आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी दिशा मिळेल. तसेच युवक-युवतींसाठी स्किल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम उपयुक्त ठरणारा आहे. कॅन्सर डिरेक्टर व्हॅनच्या मदतीने 'ऑन द स्पॉट' कॅन्सरचे निदान करण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे, असे मंचचे अध्यक्ष संजय मंत्री यांनी सांगितले.

परिचय संमेलन समिती
संजय मंत्री, अनिल बाहेती, अमित काला, नरेश मोर, आशिष कासलीवाल, विक्की खंडेलवाल, संतोष तिवारी, मुकेश तिवारी, गोविंद शर्मा, अमोल लड्डा, महेश सोकिया, महेश दागडिया, पंकज कलंत्री, पंकेश अग्रवाल, संदेश देसरडा, उमेश शर्मा, संदीप खंडेलवाल, राजेश शर्मा, अमित भोमा, आतिष रुहाटिया, सुदर्शन जाजू, मयूर बंब, प्रवीण भोमा, प्रतिक वर्मा, विकास पाटणी, आशिष अग्रवाल, सावन चुडीवाल, रवी भट्टड, विशाल दुग्गड, आशिष सोमाणी, अंशुल मंत्री, रवी रांदड, निखिल खंडेलवाल, निमेश अग्रवाल, विक्रम बजाज, अमित मालानी, गणेश हेडा, गोपाल जाजू, श्रीकांत उपाध्याय, महेश लाहोटी, नरेश मंत्री, नीलेश चितलांगी, पंकज बजाज, रामेश्वर करवा, रवी खटोड, सुरेंद्र डागा, मुकुंद गट्टाणी, भगतसिंग दरख, स्वप्नील बाहेती, नीलेश पहाडे, डॉ. राजेंद्र चोपडा, प्रेमसिंग परमार, सचिन चितलांगी, विवेक अग्रवाल, संजय दरख, आशिष मेहता, सागर खंडेलवाल, विशाल पाराशर, महावीर लोहाडे, दीपक अग्रवाल, स्वप्नील खंडेलवाल, प्रतिक अग्रवाल, सूरज बाहेती, निखिल मित्तल, निशांत काला, कपिल टिबडीवाला, संजय भारुका, नंदकिशोर मालपानी, नितीन भक्कड, सुधीर खटोड, नितीन तोतला.

महिला समितीः
मालती गुप्ता, रेखा राठी, चंदा कासलीवाल, आशादेवी काला, ललिता करवा, निर्मला चितलांगी, अनिता खंडेलवाल, मनीषा भंसाली, नंदा मुथा, प्रमिला दुसाद, मंजू खंडेलवाल, नीता ठोले, शारदा लोहाडे, राजश्री मालानी, सविता भंडारी, सायर संचेती, स्मिता सोनी, सुनीता अग्रवाल, राखी संचेती, उषा तांबी, भारती बगरेचा, मीरा टावरी, डॉ. निर्मला मुथा, राजश्री बाहेती, विजया शर्मा, राजकुंवर ठोले, शारदा धानुका, कांता खंडेलवाल, उर्मिला खंडेलवाल, स्मिता मुंदडा, राजकुमारी कोठारी, चंदा वर्मा, ममता तिवारी, पुष्पा जोशी, वर्षा मंत्री, भारती वर्मा, उमा वर्मा, रेखा मालपानी,

उमा अग्रवाल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संच मान्यतेनंतर शिक्षक भरती

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सुटेल आणि भरतीची मोहिम सुरू होईल,' असे संकेत शिक्षण आयुक्तांनी शनिवारी दिले. संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या प्रक्रियेला गती येण्याची शक्यता आहे.
राज्यात डीटीएड, बीएडधारक बेरोजगारांची संख्या १० लाखांच्या घरात आहे. ही संख्या वाढत असताना शासकीय पातळीवर मात्र, पाच वर्षांपासून नवीन शिक्षक भरतीची प्रक्रिया झालेली नाही. आता ही भरती प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत शनिवारी शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी औरंगाबादमध्ये दिले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत उपक्रमांचा त्यांनी विभागीय पातळीवरील आढावा घेतला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 'राज्यात सरल प्रणालीमुळे शाळांमधील १२० प्रकारची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. ज्यात विद्यार्थी, शिक्षकांच्या माहितीचा समावेश आहे. यासह सर्वात मोठा अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागत असून, संच मान्यतेनंतर हा प्रश्न दूर होणार आहे. अनेक ठिकाणी शिक्षकांची संख्या कमी आहे. संच मान्यतेनंतर हेही समोर येईल. त्यानंतर शिक्षक भरतीच्या मोहिमेची प्रक्रिया सुरू होईल,' असे डॉ. भापकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विमानतळ चौकात रणगाडा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहर सुशोभीकरणाच्या कामाला आता वेग आला असून त्याचाच एक भाग म्हणून विमानतळासमोरच्या चौकात रणगाडा बसविला जाणार आहे. याशिवाय महर्षी दयानंद चौक आणि विभागीय आयुक्त कार्यालयासमोर रणगाडे बसवण्याची योजना महापालिकेने आखली आहे.
शहरातील प्रमुख चौक आणि रस्ता दुभाजकांच्या सुशोभीकरणासाठी पालिकेचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी खासगी संस्था, व्यक्ती आणि उद्योगांची मदत घेण्याचे ठरविले आहे. त्यादृष्टीने त्यांनी आवाहन केले आणि त्याला प्रतिसादही मिळाला. पन्नास चौक सुशोभीकरणासाठी दत्तक दिले जाणार आहेत. त्यापैकी काही चौकांचे कामही सुरू झाले आहे. छावणी परिषदेने तीन प्रमुख चौकांमध्ये ठेवण्यासाठी महापालिकेला तीन रणगाडे देऊ केले आहेत. पालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांच्या पुढाकाराने पालिकेला हे रणगाडे मिळाले आहेत. त्यापैकी एक रणगाडा विमानतळाच्या समोरच्या रस्त्यावर असलेल्या चौकात बसवण्याची योजना महापालिकेने आखली आहे. यासाठी विमानतळ प्राधिकरणाला पालिकेने ना हरकत प्रमाणपत्र दिले असून सार्वजनिक बांधकाम खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यावर रणगाडा बसवण्याचे काम केले जाणार आहे. येत्या दहा पंधरा दिवसांत त्या चौकात रणगाडा बसलेला असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्याशिवाय महर्षी दयानंद चौकात आणि विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोरच्या चौकात रणगाडा बसवण्याची योजना पालिकेने तयार केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्क्या घरांवर खुल्या जागांचे आरक्षण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करताना महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी केलेले एक-एक महाप्रताप आता उघड होत आहेत. पक्क्या घरांवर खुल्या जागांचे आरक्षण टाकल्यामुळे हजारो नागरिकांना बेघर होण्याची चिंता सतावते आहे, तर देवस्थानच्या इनामी जमिनींवर देखील आरक्षणाची मोहर लावल्याने मोठा पेच निर्माण होणार आहे.
राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने औरंगाबादचा सुधारित विकास आराखडा तयार केला. तो २८ डिसेंबर रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. महापौर त्र्यंबक तुपे यांनी तो आराखडा स्वीकारला आणि नगरसेवकांना आराखड्याचा अभ्यास करता यावा यासाठी आठ ते दहा दिवसांचा अवधी दिल्याचे त्यांनी जाहीर केले. नगरसेवकांनी केलेल्या अभ्यासानंतर पुन्हा सर्वसाधारण सभा आयोजित केली जाणार असून त्यात सुधारित विकास आराखड्याला मंजुरी दिली जाईल. दरम्यानच्या काळात विकास आराखड्यात करण्यात आलेल्या गडबडी व करामती उघड होत आहेत.
ज्या परिसरात पक्की घरे बांधली आहेत त्या परिसरावर विकास आराखड्यात क्रीडांगण, उद्याने, व्यावसायिक व्यापारी संकुल अशी आरक्षणे टाकली आहेत. या परिसराला लागूनच असलेल्या खुल्या जागा मात्र आरक्षणातून मुक्त केल्या आहेत. या जागांना येलो बेल्टचा दर्जा देण्यात आल्यामुळे येत्या काळात या जागांवर इमारती उभ्या राहिलेल्या दिसून येतील, तर ज्या ठिकाणी सध्या पक्की घरे आहेत त्या घरांवर बुलडोजर फिरवण्याची वेळ येईल, असे मानले जात आहे. हर्सूल - पिसादेवी रस्त्यावर राजे संभाजी कॉलनी, भगतसिंह नगर परिसरातील गट क्रमांक २१/११ मध्ये सुमारे शंभरावर पक्की घरे निर्माण झाली आहेत. गेल्या काही वर्षांपासून किमान पाचशे ते हजार नागरिक येथे राहतात. सुधारित विकास आराखड्यात या संपूर्ण परिसरावर उद्यानाचे आरक्षण टाकले आहे. या भागातील रहिवासी संदीप माईड यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी शनिवारी महापौरांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. मयूरपार्क, जाधववाडी, हर्सूल परिसरातील मारोतीनगर, छत्रपतीनगर, रामेश्वरनगर, म्हसोबा मंदिर परिसर या ठिकाणच्या गट क्रमांक १८०,१८८,२१,१४९,१६१,१६२,१६३,१४७,१६० वर काही वर्षांपासून घरांचे बांधकाम झाले आहे. या संपूर्ण परिसरावर सुधारित विकास आराखड्यात उद्यान, स्मशानभूमी, रस्ता, पाण्याच्या टाकीचे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची झोप उडाली आहे. पक्क्या घरांवर आरक्षण पडल्यामुळे येत्या काळात आपली घरे पडतील, अशी धारणा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या वसाहतीला जोडूनच शासनाची व खासगी खुली जागा आहे. ही जागा मात्र विकास आराखड्यात यलो ठेवली आहे. रुस्तम व्यवहारे, सुरेश थोरात, रामेश्वर तागरे यांच्यासह अनेक नागरिकांनी आज महापौर त्र्यंबक तुपे व आरोग्य सभापती विजय औताडे यांची भेट घेतली. या दोघांनीही दुपारी या परिसराला भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. घरे पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. पहाडसिंगपुरा भागातही पक्क्या घरांवर आरक्षण टाकले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याठिकाणी म्हाडासाठी आरक्षण सोडले आहे. बीडबायपास रस्त्यावर श्रीराम मंदिर देवस्थानची जागा आहे. या जागेवर उद्यान, क्रीडांगण व व्यावसायिक कॉम्पलेक्सचे आरक्षण टाकल्याचे मंदिराचे विश्वस्त उत्तमराव मनसुटे यांनी सांगितले. ही संपूर्ण जागा इनामी आहे. या जागेवर आरक्षण टाकता येत नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
---
चौकट
---
अर्थपूर्ण व्यवहार; चौकशीची मागणी
सुधारित विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असताना काही अधिकारी व बड्या नगरसेवकांनी विशिष्ट बांधकाम व्यावसायिकांचा लाभ करून देण्याच्या हेतूने पक्क्या घरांवर आरक्षणे टाकली आहेत. बांधकाम व्यावसायिकांसह खासगी जमीन मालकांशी हातमिळवणी करून त्यांच्या जमिनी यलो बेल्टमध्ये समाविष्ट केल्याची चर्चा पालिका वर्तुळात उघड - उघड केली जात आहे. यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणीही होत आहे.
---
ज्या ठिकाणी वसाहती आहेत त्याच ठिकाणी सुधारित विकास आराखड्यात आरक्षणे टाकली आहेत. या वसाहती शेजारच्या मोकळ्या जागांचा आरक्षणासाठी विचार करण्यात आला नाही. याचा अर्थ स्थळ पाहणी न करताच विकास आराखडा तयार केला आहे. विकास आराखडा मंजूर करताना गोरगरिबांवर अन्याय होणार नाही, त्यांची घरे पडणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. त्यादृष्टीने विकास आराखड्यात दुरुस्ती करू.
- त्र्यंबक तुपे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीडब्ल्यूडी’ दुर्लक्षामुळे ३५ कोटी जाणार परत?

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा नियोजन मंडळातून (डीपीडीसी) ग्रामीण रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी मंजूर केलेले ३५ कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन न केल्यामुळे अद्याप पडून आहेत. या महिन्यात यासंदर्भात कार्यवाही झाली नाही तर हा निधी परत जाण्याची भीती आहे.
पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी ३५ कोटी रुपये मंजूर केले. या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दाखल करावे लागतात. जिल्हा परिषद स्थायी समितीने यासंदर्भातील प्रस्तावांना हिरवा कंदिल दर्शविला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ३५० प्रस्ताव दाखल झाले. त्याला दोन महिने उलटून गेले तरी यासंदर्भातील निर्णय झालेला नाही. प्राप्त प्रस्तावांमधून १०० प्रस्ताव मंजूर केले आहेत, पण त्याचा अंतिम आराखडा अद्याप तयार झालेला नाही. जानेवारी महिना आला तरी नियोजन न झाल्याने या निधीचा विनियोग कसा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यकारी अभियंता एच. ई. सुखदेवे यांची गेल्या महिन्यात तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांच्या काळातच हे प्रस्ताव कार्यालयात जमा झाले होते. पण योग्य वेळी निर्णय न झाल्याने ग्रामीण भागातील रस्ते अजूनही खड्ड्यातच आहेत.
---
चौकट
---
१५ दिवसांत निर्णय आवश्यक
निधीच्या प्रस्तावाबाबत पुढील पंधरा दिवसांत निर्णय घेणे आवश्यक आहे. कारण तीन लाखांच्या वरच्या कामासाठी इ टेंडरिंग पद्धतीने निविदा काढण्यात येतील. मोठ्या कामांच्या बाबतीत निविदा फायनल होणे, कंत्राटदारासाठी प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश या प्रक्रियेला किमान दीड महिना लागणार आहे. तोवर मार्च महिना उलटण्याची शक्यता आहे. या कालावधीत कामांचे नियोजन झाले नाही तर ३५ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक९ जानेवारीपासून कोलमडणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराच्या पाणीपुरवठ्यात ९ जानेवारी रोजी तब्बल बारा तासांचे शटडाउन घेण्याचा निर्णय औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने घेतला आहे. या दिवशी सकाळी आठ ते रात्री आठच्या दरम्यान संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसांनी पुढे ढकलले जाणार असल्याचे कंपनीने कळविले आहे.
शटडाउनच्या काळात १२०० आणि ७०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनींवर दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. १२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर फारोळा नाला येथे स्कोर व्हॉल्व्ह बदलण्यात येणार आहे. जायकवाडी येथे जुन्या व नव्या पंपहाउसला जोडणाऱ्या ३०० मिलिमीटर व्यासाच्या वाहिनीचे वेल्डींग केले जाणार आहे. फारोळा पंपहाउस येथे व्हॉल्व्ह बदलण्याचे काम केले जाणार आहे. वाल्मीच्या पाठीमागे १२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील गळती बंद केली जाणार आहे. नक्षत्रवाडी एमबीआर येथे नेटवर्क मोडीफीकेशनवर क्रॉस कनेक्शन करण्याचे काम केले जाणार आहे. जुन्या, नव्या पाणीपुरवठा योजनेवर फ्लो मीटर बसवण्याचे कामही याच काळात केले जाणार आहे, असे कंपनीने कळविले आहे. यासर्व कामांमुळे ९ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या नंतर संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. या दिवशी टँकर सेवाही बंद राहील असे कंपनीने कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदीतली नव्हे; दगडी वाळू!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाळूपट्ट्यांच्या दिवसेंदिवस महागणाऱ्या किमती, वाळूची कमतरता या साऱ्या पार्श्वभूमीवर दगडी वाळूकडे (स्टोन क्रश) एक सशक्त पर्याय म्हणून पाहिले जात आहे. ब्रास मागे किंमत कमी असल्याने याची मागणीही वाढली आहे. मात्र, व्यावसायिक दगडी वाळूच्या दर्जाबद्दल खात्री करूनच खरेदी करा, अशी सूचना देत आहेत.
नदीच्या वाळूला पर्याय म्हणून दगडापासून तयार केलेली कृत्रिम वाळू वापरासंबंधी शासनाने नुसती अनुकूलता दाखवली असली तरी प्रत्यक्षात ही वाळू शासकीय कामासाठी वापरणे सक्तीचे केले नाही. त्यामुळे शासकीय कामासाठी कृत्रिम वाळू वापराण्यासंबंधी अध्यादेश काढावा, अशी मागणी काही व्यावसायिक आणि पर्यायवरणवादी करत आहेत. सध्या औरंगाबादमधील पदमपुरा, अमरप्रीत चौक, एमजीएम-जकातनाका परिसर, आझाद चौक परिसर आणि बीडबायपास रस्त्यावरील विविध वाळू व्यावसायिकांच्या मते वाळूची सध्या ७ हजार ते ८ हजार ब्रासने विक्री सुरू आहे. तर दगडी वाळू वाळू सुमारे २ हजार ८०० ते ३ हजार रुपये ब्रासने विकली जात आहे.
खरेदीदार, व्यावसायिक दगडी वाळू आणि नदीतील वाळूची तुलना करत आहे. अनेकजण दगडी वाळूच्या दर्जाविषयी साशंकता व्यक्त करत आहेत. पण ही शंका घेण्याचे कारण नाही वाळूला पर्याय म्हणून क्रश सँडकडे आता पाहणे गरजेचे असून वाळूवरील शासनाने घातलेली बंदी, त्याला येत असलेल्या मर्यादा हे मुद्दे महत्वाचे आहेत असे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
---
वाळूला पर्याय म्हणून कृत्र‌िम वाळूला विविध ठिकाणी मागणी वाढत आहे. याचे दरही स्वस्त आहेत, पण याविषयी अजून अधिक जागरुकतेची गरज आहे.
- गोविंद तुगावकर, बांधकाम व्यावसायिक
---
दगडी वाळू हा पर्यावरणपूरक पर्याय आहे. सध्या बांधकाम व्यावसायिकांसह ग्राहकांनीही त्याला‌ स्वीकारले आहे. फक्त ही वाळू घेताना मशीनचीच असावी. तिचा दर्जा तपासून घेण्याची खबरदारी घ्यावी.
- विकास चौधरी, सचिव, क्रेडाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images