Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मध्ययुगीन काळावर ‘मोडी’तून प्रकाश

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मध्ययुगीन काळातील सामाजिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकणारे मोडी कागदपत्रांचे प्रदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास वस्तूसंग्रहालयात सुरू झाले आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी पहिल्या दिवशी इतिहास अभ्यासकांनी गर्दी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास वस्तूसंग्रहालयात मोडी कागदपत्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन शनिवारी दुपारी राज्यशास्त्र विभागाचे डॉ. बी. एस. वाघमारे यांनी केले. यावेळी इतिहास विभागप्रमुख डॉ. उमेश बगाडे, अभिलेखाकार प्रमुख डॉ. कुमार भवर, सुधीर बलखांडे व लिप्यंतरकार मच्छिंद्र चौधरी उपस्थित होते. या प्रदर्शनात पेशवे दप्तर, होळकर दप्तर, मराठा दप्तर, सातारा दप्तर आणि इंग्रज दप्तरातील पत्रे आहेत. १७७८ ते १८३० या काळातील कागदपत्रातून तत्कालीन सामाजिक, राजकीय व धार्मिक परिस्थिती लक्षात येते. सातारा दप्तरातील कागदपत्रे न्यायनिवाड्याशी संबंधित आहेत. शिवाय दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्याबाबतची इंग्रज अधिकाऱ्यांना संस्थानिकांनी लिहिलेली पत्रे प्रदर्शनात आहेत. पैठणचे बापूजी नाईक भाकरे यांच्यासह हरी भक्ती, आबाजी नाईक वानवल, अप्पाजी शंकर भिडे हे सावकार पेशव्यांना कर्ज देत असत. या कर्जाबाबतची काही पत्रे प्रदर्शनात मांडली आहेत. या प्रदर्शनाला अभ्यासकांनी भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लग्नाचे आमिष; ७ लाखांचा गंडा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लग्नाचे अमिष दाखवून एका महिलेस पावणे सात लाखांचा गंडा घालणाऱ्या बहीण-भावाविरुध्द शनिवारी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपकार व अमिता ग्रोवर अशी संशयितांची नावे आहेत.
श्रेयनगरमधील झांबड इस्टेट येथे राहणाऱ्या शीतल अशोक ब्रह्मेचा या महिलेने डिसेंबर २०१५ मध्ये एका इंग्रजी दैनिकात लग्नाची जाहिरात दिली होती. त्यावरून उपकार ग्रोवर व अमिता ग्रोवर यांनी शीतल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी वेळोवेळी गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. भावनिक नाते निर्माण करण्याचे नाटक करत उपकार याने लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर ग्रोवर बहीण भावाने आपल्या आईची प्रकृती बिघडल्याचे सांगितले. तसेच आपल्याला पूजा करायची आहे, म्हणत शीतल यांच्याकडून ६ लाख ८५ हजार रुपये रोख व एक सोन्याची अंगठी काही दिवसांच्या बोलीवर घेतली. फिर्यादीच्या बॅँक खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, नंतर मागणी करूनही हे भाऊ-बहीण पैसे देण्यास टाळाटाळ करू लागले होते. त्यामुळे शीतल यांनी गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५१ लाखांचा घातला गंडा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घराची बनावट कागदपत्रे बनवून एकास ५१ लाखांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तुलसीदास परसवाणी, प्रवीणसिंग सुरेंद्रसिंग, जे. जे. जैन, अभिजित अर्जून मेलगर, अझर अब्बास कुरेशी अशी संशयितांची नाव नावे आहेत.
गुरूमुखदास मोटवाणी (रा. प्लॉट क्र. १६९) असे फिर्यादीचे नाव आहे. मोटवाणी यांचा सिंधी कॉलनीत ४२० स्क्वेअर मीटर क्षेत्रफळाचा प्लॉट आहे. तुळसीदास परसवाणी याने आधार कार्ड काढण्याच्या बहाण्याने मोटवाणी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात नेले. त्यांचा कोऱ्या कागदपत्रांवर आणि मुद्रांकावर अंगठा घेतला आणि त्यांच्या नावाची बनावट कागदपत्रे तयार केली. त्याआधारे खोटे कागदपत्र बनवत प्लॉट विकत घेतल्याचे सांगितले, असे मोटवाणी यांनी तक्रारीत नमूद केले आहे. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच मोटवाणी यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार नोंदवली. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे यांनी अधिक तपास करून परसवाणीसह पाच जणांविरुध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दोषी असेल तर, फाशी द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

मी क्रांतीकाराचा मुलगा आहे, मी जे बोललो त्यात पंतप्रधानाचा गौरव केला आहे किंवा नाही हे संपूर्ण भाषण वाचून ठरवा, दोषी असेल तर, मंत्रालयात फाशी द्या, परंतु मी कोणताही गुन्हा केला नाही, त्यामुळे माफी मागणार नाही, असे प्रतिआव्हान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी शनिवारी येथे दिला. त्यांचा सत्कार कार्यक्रम उधळण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. बंदोबस्तात कार्यक्रम झाला.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीने सबनीस यांचा सत्कार होता. माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे अध्यक्षस्थानी होते. पुणे येथील एका कार्यक्रमात सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करून, माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. लातूरात कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यानी दयानंद सभागृहात लावलेले व्यासपीठावरील बॅनर फाडून टाकले आणि सबनीस यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. पोलिसांनी निडवदे यांच्यासह तीस ते चाळीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात केली.

सभागृहात दबा धरुन बसलेल्या भाजपच्या तीन कार्यकर्त्यानी सबनीस बोलण्यास उभे राहिले असताना निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना सभागृहाबाहेर काढले.

भाषणात सबनीस म्हणाले की, पंतप्रधानांविषयी आत्मीयतेने एकेरी उल्लेख केला आहे. आईला अहो आई म्हणत नाहीत असा दाखला त्यांनी दिला. जिवे मारण्याच्या धमक्या येत असून राज्य सरकारने दखल घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येनंतर सबनीसांच्या हत्येची वाट पाहणार आहात का? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थितांना केला.

सत्कार समितीचे समन्वयक फ. म. शहाजिंदे यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर सत्कार समितीचे सदस्य डॉ. भास्कर बडे, जयप्रकाश दगडे, डॉ. शेषराव मोहिते, प्रकाश काळे उपस्थित होते. योगीराज वाघमारे यांनी परिचय करुन दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चक्कर येण्याची ८० टक्के कारणे कानात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चक्कर येणे, ही डोकेदुखीनंतरची सगळ्यात सामान्य तक्रार असून, नेमके उपचार कुठे करावे हे माहीत नसल्यामुळे बहुतांश रुग्णांचा मेंदूविकारतज्ज्ञांपासून सगळीकडेच फेरफटका मारून होतो. मात्र, चक्कर येण्यामागील ८० टक्के कारणे ही कानाशी संबंधित असतात आणि हेच जनसामान्यांना माहीत नसल्यामुळे बहुतांश रुग्णांचा घोळ होतो व रुग्ण वेगवेगळ्या तज्ज्ञांकडे फिरत राहतो. या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी व डॉक्टरांना मार्गदर्शन होण्याच्या हेतुने याच विषयावर रविवारी (तीन जानेवारी) पहिलीच वैद्यकीय कार्यशाळा शहरात होणार आहे.

चक्कर येणे, याला आधुनिक वैद्यकशास्त्रात (अॅलोपॅथी) 'व्हर्टिगो' असे म्हटले जाते. रक्तशर्करा कमी झाली तर चक्कर येते, रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाले तर चक्कर येते, हे जनसामान्यांमध्ये सर्वश्रुत आहे. 'सर्व्हायकल स्पॉन्डेलिसिस'ने आणि मेंदूविकारामुळेही चक्क येते, असेही मानले जाते. अर्थात, मेंदूविकारामुळे चक्क येऊ शकते; परंतु 'सर्व्हायकल स्पॉन्डेसिसमुळे चक्कर येऊ शकत नाही आणि हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाल्याचा दावा कान-नाक-घसा विशेषज्ज्ञ डॉ. रमेश रोहिवाल यांनी केला. मुळात चक्कर येण्यामागे ८० टक्के कारणे कानाशी संबंधित आजारांमध्ये असतात आणि कानाशी संबंधित १० ते १२ प्रकारच्या आजारांमुळे चक्कर येऊ शकते; म्हणजेच कानाच्या विविध आजारांचे चक्कर येणे हे एक प्रकारचे लक्षण आहे. यामध्ये कानाच्या नेमक्या कोणत्या कारणामुळे व आजारामुळे चक्कर येत आहे, याचा शोध विविध प्रकारच्या चाचण्यांनी केला जातो. आंतर कर्णातील 'लॅबिरिन्थ' किंवा 'कॉकलिया' या भागातील विविध दोषांमुळे चक्कर येण्याचे कारण सर्वाधिक आहे. कानाच्या आजाराचे नेमके कारण शोधावे लागते आणि आजाराचे अचूक निदान झाल्यानंतर उपचार केले जातात. काही आजार व स्थितीमध्ये शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, अचूक निदानानंतर खात्रीशीर उपचार होऊ शकतात व आजार बरा होऊ शकतो. यासाठीच्या चाचण्यांसाठी तीन ते सहा-सात हजारांपर्यंतचा खर्च येतो, असेही डॉ. रोहिवाल यांनी सांगितले.



डोके गोलाकार फिरवून उपचार

'मॅन्युवर्स' या कानाच्या आजारामध्ये केवळ डोके हाताने वेगवेगळ्या कोनांमधून शास्त्रशुद्ध पद्धतीने फिरवण्याचा उपचार केला जातो आणि त्यामुळे हा आजार बरा होतो. त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या औषधांची गरज नसते, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालना काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर, जालना जिल्ह्यातील काँग्रेसची संघटना पुरती खिळखिळीत झाली आहे. त्यातच नगरपंचायतींच्या निवडणुकीतील राजकारणानंतर जिल्ह्यातील नेत्यांकडून परस्परांवर कुरघोडी सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे अस्तित्व कितपत प्रभावशाली राहील, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात भाजपच्या रावसाहेब दानवे यांनी जागा कायम राखली, मात्र काँग्रेसच्या पराभवातील अंतर निश्चित वाढले होते. विधानसभा निवडणुकीमध्ये गेल्या वेळी काँग्रेसकडे असणारी जालन्याची एकमेव जागाही त्यांना राखता आली नाही. जिल्ह्यात या घडीला भाजपच्या तीन, शिवसेना एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक जागा आहे. त्यानंतर काँग्रेस पराभवातून सावरलीच नाही आणि आता गटबाजी चव्हाट्यावर येऊ लागली आहे. जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या बदनापूर आणि मंठा नगरपंचायतीच्या निकालानंतरच्या राजकारणातून या गटबाजीचा नवा अंक जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. मंठा नगरपंचायतीच्या पहिल्यांदा झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने नऊ जागा जिंकल्या. तर, भाजपने तीन आणि काँग्रेसने पाच जागांवर विजय मिळविला. वास्तविक, मंठ्यात काँग्रेस स्वबळावर जिंकण्यासारखी परिस्थिती होती. मात्र, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया विरुद्ध तालुकाध्यक्ष संदीप गोरे यांच्यामध्ये गटबाजी आहे. त्यांच्यातील राजकारणामुळे काँग्रेसला पाच जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्येही आणखी नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेनेने 'एकला चलो रे...'चा नारा दिला. त्यांच्याविरोधात भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांची छुपी आघाडी झाली. सभागृहात ऐनवेळच्या घडामोडीत राजकारण उघडकीस आले. यात शिवसेनेचा 'गेम' होऊ शकला नाही, भाजपच्याही गोटात काहीही चलबिचल झाली नाही. मात्र काँग्रेसमध्ये वादळ निर्माण झाले.

माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया मंठ्यात आले. त्यांनी या सर्व घडामोडींसाठी तालुकाध्यक्ष संदीप गोरे यांना जबाबदार धरत, त्यांच्यावर कारवाई केली. पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात विरोधी गटाला यश मिळाल्यानंतर गोरे यांनी माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भिमराव डोंगरे यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. या पार्श्वभूमीवर, राजेश राठोड आणि नागेश टाले यांनी आपल्या पराभवास जेथलिया यांना जबाबदार धरले असल्याचा आरोप केला आहे. तसेच, तालुकाध्यक्ष संदीप गोरे यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी मी बाहेरगावी असल्याने नगरसेवकांनी सभागृहात ऐनवेळी काय आणि कसा निर्णय घेतला, हे मला माहीत नाही. मात्र, या निवडणुकीत पक्षादेश बजावण्याची जिल्हाध्यक्षांनी तसदीही घेतली नाही. त्यामुळे मी एकटाच कसा काय दोषी? जिल्हाध्यक्षपदाची मुदत संपल्याने मला स्पर्धेतून बाहेर काढण्याचे हे षङ्यंत्र आहे

- संदीप गोरे, मंठा

संदीप गोरे यांच्यावर प्रदेशातील नेत्यांनी कारवाई केली आहे. त्यामुळे माझा त्याच्याशी काहीही व्यक्तिगत संबंध नाही. मात्र त्यांनी काँग्रेसच्या ध्येय धोरणाविरुद्ध वर्तन केले आहे, याची प्रदेश स्तरावरील नेत्यांनी खात्री केली आहे.

- भीमराव डोंगरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीतील बिले उस्मानाबादमध्ये प्रलंबित

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

लोकसभा निवडणुकीला दीड वर्षे आणि विधानसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनही, निवडणुकीच्या प्रशासकीय कामांसाठी सेवा पुरविणाऱ्यांची बिले अद्यापही प्रलंबित आहेत. या बिलांचा आकडा ४० कोटी रुपयांपर्यंत असल्याचे सांगण्यात येते.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाबरोबरच उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा आणि भूम-परांडा या चार विधानसभा मतदारसंघातील विविध खर्चांचा समावेश आहे. या बिलाचा निपटारा करण्यासाठी रक्कम एप्रिल आणि डिसेंबर २०१५मध्येच जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाली आहे. मात्र, बिल चुकते करण्यात आलेली नाहीत. यामध्ये २०१५-१६ या आर्थिक वर्षात निवडणूक खर्चासाठी वेळोवेळी अनुदान वितरित करण्यात आले आहे. परंतु बीडीएस प्रणालीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील खात्यावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्याखात्यावर शिल्लक अनुदान दिसून येत आहे. ही रक्कम ३० डिसेंबरपर्यंत उपशीर्षाखालील रक्कम आवश्यकतेप्रमाणे खर्च करण्यात यावी. ३१ डिसेंबर रोजी बीडीएस खात्यावर अनुदान शिल्लक दिसून आल्यास, अनुदानाची आवश्यकता नाही, असे समजून येईल व त्यानंतर २०१५-१६ या आर्थिक वर्षात संबंधित उप‌शीर्षाखाली अनुदान वितरित करण्यात येणार नाही, अशी तंबी देणारे एक पत्रक राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून देण्यात आले आहे. हे पत्र १९ डिसेंबर रोजी देण्यात आले असून, कार्यासन अधिकारी शुभा बोरकर यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना पाठविले आहे.

काही पुरवठाधारकांनी या प्रलंबित बिलासंदर्भात मुंबई गाठून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तसेच कार्यासन अधिकारी यांचे दरवाजे ठोठावले आहेत. सध्या पेमेंटसाठी जिल्हा प्रशासनाकडे सुमारे ४ कोटी रुपये उपलब्ध आहेत. मात्र, शिल्लक रक्कम परत जाते की काय, अशी भीती ठेकेदार व व्यापाऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.

उस्मानाबाद विधानसभा निवडणुकीसाठी २ कोटी ४१ लाख ६९ हजार रुपये इतका खर्च झाला. या पोटी जिल्हा प्रशासनाकडून केवळ ८६ लाख ६४ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. अद्याप ठेकेदारांचे ‌व विविध सेवा पुरविणाऱ्यांचे पेमेंट करण्यासाठी १ कोटी ५५ लाख रुपयांची नितांत गरज आहे, अशा स्वरुपाचे पत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद यांची जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना नोव्हेंबरमध्ये पाठविले आहे. परंतु अद्याप हा निधी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांचेकडून संबंधितांना उपलब्ध करून दिला जात नाही‌.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुपनलिकांचा कायदा बदलण्यासाठी प्रयत्न

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, लातूर

भीषण दुष्काळात होरपळत असलेल्या लातूरसारख्या भागात कुपनलिका घेण्यासाठी २०० फूट खोलीच्या मर्यादेचा कायदा बदलून, तो ४०० फुटांपर्यंत संसेदत आवाज उठविण्याचे आश्वासन खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी महापालिका अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.

खासदार गायकवाड यांनी रविवारी महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी महापौर अख्तर शेख, आयुक्त सुधाकर तेलंग, विरोधी पक्षनेते मकरंद सावे यांच्यासह नगरसेवक मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव नरहरे, अॅड. प्रदीप आकनगिरे, अॅड. शेखर हविले, हरिभाऊ गायकवाड यांची उपस्थिती होती. या वेळी पाण्यासह विविध विषयांवर आयुक्त तेलंग व महापौर अख्तर शेख यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 'शहराची पाण्याची अवस्था बिकट आहे. मार्चनंतर टँकरने पाणी देण्याशिवाय दुसरा पर्याय होऊ शकत नाही. निम्न तेरणाचे काम लवकरच सुरू व्हावे, यासाठी निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. विविध योजनांसाठी निधी मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा.' त्यावर डॉ. गायकवाड म्हणाले, मराठवाड्यातील लातूर हा जिल्हा अवर्षणप्रवण भागात येतो. मागील चार वर्षांपासून या भागात अत्यल्प पाऊस झाल्याने भूगर्भातील पाणीपातळी कमालीची खालावली आहे. यामुळे शहरासह जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरी भागात कुपनलिका घेतली तरी शासन नियमाप्रमाणे २०० फुटांपर्यंत पाणीच लागत नाही. शासन नियम लोकहितासाठी असल्यामुळे या नियमांमध्ये बदल करण्यासाठी संसदेत आवाज उठवू.'

शहरातील अनधिकृत डिजीटल बॅनरमुळे मोठे अपघात होण्याची भीती आहे. अशा विनापरवाना होर्डिंगधारकांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. ते म्हणाले, 'मागच्या बैठकीत मी केलेल्या सूचनांचे पालन झालेले दिसून येत नाही. लातूरच्या पाण्यासाठी मी व आमदार अमित देशमुख हे एकत्र मिळून पाठपुरावा करू, यामध्ये कोणतेही राजकारण आणणार नाही.'

नव्या पाइपलाइनसाठी प्रयत्न

शहराच्या पाणीपुरवठ्याविषयीही बैठकीमध्ये चर्चा करताना, पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेवरही चर्चा करण्यात आली. लातूर शहराला पाणीपुरवठा करणार्या पाइपलाइनला १८ हजार ठिकाणी गळती आहे. ती दुरुस्त करण्याऐवजी नवीन टाकण्यासाठी महानगरपालिकेने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा, या संदर्भात केंद्रीय नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू, राज्यमंत्री बाबुल सुप्रिमो यांच्याशी चर्चा झाली असून, या प्रस्तावाचा पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. तसेच, लातूरला उजनी धरणातून कायमस्वरुपी पाणीपुरवठ्यासाठी निधी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘साई’च्या वाटचालीतील महत्त्वाचा काळ

$
0
0

Sudhir.Bhalerao@timesgroup.com
साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे विभागीय केंद्र औरंगाबादऐवजी नागपूर होणार आहे. या निर्णयाचा विकासावर कितपत परिणाम होऊ शकतो?

साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे विभागीय केंद्र औरंगाबादऐवजी नागपूरला होणार आहे ही गोष्ट प्रसिद्धी माध्यमातूनच मला समजली आहे. याविषयी अधिकृत कोणतीही माहिती मला मिळालेली नाही. विभागीय केंद्र नागपूरला झाले तरी औरंगाबादच्या साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राचा विकासावर त्याचा फार परिणाम होणार नाही. २०१६ या नव्या वर्षात अनेक आधुनिक सुविधा या केंद्रात होणार असल्याने मराठवाड्यातील क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. देशातील सर्वोत्तम केंद्र बनवणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे आणि त्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल.

डिप्लोमा इन स्पोर्टस् कोचिंग (एनआयएस) अभ्यासक्रमाची रुपरेषा कशी असणार आहे. हा अभ्यासक्रम कधीपासून सुरु होणार आहे?

एनआयएस अभ्यासक्रम औरंगाबादच्या साई क्रीडा केंद्रात सुरू होणे ही अतिशय मोठी गोष्ट आहे. एनआयएस अभ्यासक्रम सुरू होणारे साई केंद्र हे देशातील केवळ चौथेच आहे. पतियाळा, बेंगळुरू अशा मोठ्या केंद्राच्या ठिकाणी एनआयएस अभ्यासक्रम करण्यासाठी महाराष्ट्रातील खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटकांना जाणे अनिवार्य होते. पहिल्या वर्षी एनआयएस अभ्यासक्रमासाठी कबड्डी, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि हँडबॉल अशा चार क्रीडा प्रकारांची नावे सूचवण्यात आलेली आहेत. यापैकी तीन क्रीडा प्रकारांना मंजूरी मिळेल. पहिलेच वर्ष असल्याने साठ जणांना यात प्रवेश दिला जाईल. वर्षभराचा हा अभ्यासक्रम असल्याने अनेक नव्या गोष्टी साई केंद्रात होतील. एनआयएस अभ्यासक्रमामुळे शाळा, कॉलेज, क्लब या ठिकाणी खेळाडू, प्रशिक्षकांना नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. क्रीडा क्षेत्रात नोकरीसाठी एनआयएस असलेल्यांना प्राधान्यक्रम दिला जातो. येत्या जून महिन्यापासून हा अभ्यासक्रम सुरु होणार आहे. या अभ्यासक्रमामुळे साई केंद्राच्या प्रतिमेचा आलेख नक्कीच उंचावला जाणार आहे.

अॅस्टोटर्फ हॉकी मैदान आणि जलतरण तलावाच्या सुविधांचा मराठवाड्यातील खेळाडूंना कितपत होणार आहे आणि या सुविधा कधीपासून उपलब्ध होणार आहेत?

विदर्भ-मराठवाड्यात अॅस्टोटर्फ हॉकीचे एकही मैदान नाही. महाराष्ट्रातच मुंबई आणि पुणे येथे दोन टर्फ हॉकी मैदाने आहेत. त्यानंतर साई केंद्रातच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील हॉकीपटूंना याचा खूप लाभ होणार आहे. खेळाडू घडतानाच आधुनिक दर्जाच्या सुविधा मिळाल्यास त्याचा खूप फायदा होतो. या सुविधेमुळे मराठवाड्यातील गुणवान हॉकीपटू पुढे आलेले आपल्याला नक्की दिसतील. औरंगाबाद शहरात तीन-चार जलतरण तलाव आहेत, परंतु साई केंद्रातील जलतरण तलाव हा यापेक्षा निश्चितच वेगळा असणार आहे. ऑलिंपिक दर्जाचा जलतरण तलाव उभारुन केवळ चालणार नाही तर या सुविधेचा अधिक चांगला उपयोग करुन घेण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. ज्या खेळाडूंना जलतरणात करिअर करावयाचे आहे, त्यांना या सुविधेचा खूप लाभ होणार आहे. अॅस्टो टर्फ हॉकी व जलतरण तलावाच्या सुविधांमुळे आगामी कालावधीत प्रशिक्षकही घडतील. त्याचा दुरगामी चांगले परिणाम होईल.

'कम अँड प्ले' योजना कितपत यशस्वी ठरली आहे?

साई क्रीडा केंद्रातील विविध सुविधांचा लाभ स्थानिक खेळाडूंना अधिक व्हावा यासाठी 'कम अँड प्ले' ही योजना सुरू करण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांपासून ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेतील खेळाडूंकडून अगदी नाममात्र शुल्क घेण्यात येते. शंभरपेक्षा अधिक खेळाडू या योजनेचा नियमित लाभ घेत आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू घडवणे हीच संकल्पना यामागे आहे. त्यातून उत्पन्न मिळवणे हा हेतू अजिबात नाही. शहरात विविध ठिकाणी क्लबमधून कोचिंग दिले जाते. घराशेजारील परिसरात असलेल्या क्लब, केंद्रात जाण्याकडे खेळाडू तसेच पालकांचा ओढा अधिक असतो. आगामी काळात या योजनेतील खेळाडूंची संख्या लक्षणीय वाढण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने केंद्रातील सर्व प्रशिक्षक प्रयत्न करीत आहेत.

'साई'मध्ये आणखी कोणत्या नव्या सुविधा अपेक्षित आहेत?

अॅस्टोटर्फ हॉकी मैदान व जलतरण तलाव या सुविधा येत्या सहा ते आठ महिन्यांत पूर्ण होणार आहेत. त्यापाठोपाठ शुटिंग रेंज, सायकलिंग ट्रॅक या सुविधाही निर्माण होणार आहेत. या सुविधांनाही मंजुरी मिळालेली आहे. २०१६ हे वर्ष साई क्रीडा केंद्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचे वर्ष ठरणार आहे. एनआयएस अभ्यासक्रमाबरोबरच अनेक नव्या सुविधा निर्माण होणार असल्याने या केंद्राची देशातील सर्वोत्तम केंद्रात नाव आवर्जून घेतले जाईल. सद्यस्थितीत एसटीसी सेंटरमध्ये औरंगाबादचे केंद्र हे नंबर वन केंद्र मानले जाते ही औरंगाबादकरांच्यादृष्टीने नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातोड्याची टांगती तलवार

$
0
0

Ramchandra.Vaybhat@timesgroup.com
सातारा-देवळाईचा कारभार आता पुन्हा एकदा नगर पालिकेकडे आला. गेल्या काही महिन्यांपासून या भागात कोणतेही विकासकामे नगर पालिका आणि महापालिका प्रशासनने केली नाही, मात्र येत्या काही दिवसात नगर पालिकेची वसुली सुरू करणार असून, रस्ते मोकळे करून अतिक्रमणे हटवण्याची मोहिम येत्या १५ दिवसांत हाती घेण्यात येणार असल्याचे प्रशासक रमेश मुंडलोड यांनी सांगितले.

सातारा-देवळाई नगर पालिकेचा समावेश महापालिकेत करण्यासाठी अंतिम अधिसूचना निघण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने सातारा-देवळाई महापालिकेकडे हस्तांतरित केले, मात्र पालिकेने हे क्षेत्र आमच्या कार्यक्षेत्रात नसल्याचे सांगून सुविधा देण्यास नकार दिला. आता सातारा देवळाईचा कारभार पुन्हा नगर पालिकेकडे आला आहे.

सातारा व देवळाई हा भाग महापालिकेत की नगर पालिकेत या अवस्थेमुळे शहरालगत असलेल्या महत्त्वाच्या‌ रहिवाशी भागांपैकी एक असलेल्या सातारा आणि देवळाई भागातील ७५ हजार रहिवाशांची अवस्था दोलकासारखी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून या भागात कोणतेही कामे झालेली नाहीत. ही कामे प्रशासन येत्या काही दिवसांत हाती घेणार आहे. सध्या प्रशासनाकडून विविध भांगांमध्ये १० टँकर सुरू करण्यात आली आहे, मात्र हे टँकर अपुरे पडत आहेत. नगर पालिका स्थापन झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यांत हा भाग महापालिकेत समाविष्ट करण्यात येणार असल्याची अधिसूचना निघाली. जिल्हा प्रशासनाने घाईघाईने नगर पालिकेचे महापालिकेकडे हस्तांतर केले. महापालिकेनेही जिल्हा प्रशासनाकडून हस्तांतर करून घेऊन तेथे वॉर्ड कार्यालय सुरू केले. या भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे १२ टँकर सुरू करण्यात आले. आता या टँकरधारकांचे एक कोटी रुपयांहून अधिक बिल थकल्याने हा भाग महापालिकेत समावेश झाला नसल्याने येथे सुविधा देऊ शकत नाही, असा साक्षात्कार महापालिका प्रशासनाला झाला होता. यावेळी महापालिकेकडून सातारा-देवळाईचा समावेश करून घेण्यात चूक झाल्याची कबुली शहर अभियंतांनी विभागीय आयुक्तांना दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ वॉर्डांचे काय होणार?

$
0
0

Ashish.Choudhari@timesgroup.com
औरंगाबाद ः सातारा-देवळाई परिसराचा कारभार नगर पालिकेकडे आला आहे. महापालिका की नगर पालिका या गोंधळात साताऱ्यातील सोयीसुविधांकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. नागरी समस्यांनी त्रासलेल्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यातच आता वॉर्ड रचना बदलेला का, त्या २५ वॉर्डांचे काय होणारस असा प्रश्नही अनेकांना सतावत आहे.

महापालिकेने आपल्याकडील सातारा-वेदळाई परिसराचा कारभार पुन्हा नगर पालिकेला दिला आहे. काही महिने महापालिका आता नगर पालिका यामुळे फुटबॉलसारखी अवस्था झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. नव्या बदलानंतर पुढे काय, असा प्रश्न तेथील नागरिकांसमोर उभा आहे. बदल झाले तरी सुविधांकडे मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होते आहे. महापालिकेने आपल्या कार्यकाळात येथील सुविधांकडे पुरते दुर्लक्ष केले. त्यामुळे येथील नागरी समस्यांचे चित्र बदलले नाही. वेगाने वाढणाऱ्या या परिसरात रचनात्मक पायाभूत सुविधांची बोंब आहे. यासह नवीन प्रश्नही येथे उपस्थित केला जात आहे. तो म्हणजे, त्या वॉर्डाचे काय होणार. दोन ग्रामपंचायतींची एकत्र करत नगर पालिका घोषित करण्यात आली. सातारा- देवळाई नगर पालिकेत २५ वॉर्डांची रचना करण्यात आली होती. त्याचे आरक्षणही जाहीर करण्यात आले होते. आता ही रचना तशीच राहणार की वॉर्ड रचना बदलेल, त्याचे आरक्षण कसे असेल, सुनावणीनंतर लगेच निवडणुकीची तारीख घोषित होतील का, असे प्रश्न नागरिकांच्या मनात आहे.

नागरिकांची फरफटच
महापालिकेने सातारा-देवळाई आपल्याकडे असताना आपले कार्यलय थाटले होते. या कार्यालयातून आरोग्य साफसफाई आणि पाणीपुरवठा अशा सुविधांवर लक्ष देण्याबाबत सांगण्यात आले, परंतु या सुविधांबाबत नागरिकांची फरफटच झाली. आता नगर पालिका प्रशासनाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सातारा-देवळाई पालिकेच्या वॉर्डांची संख्या : २५
सातारा-देवळाई पालिकेची लोकसंख्या : ५२,९१६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाले अडविले, कचरा संकलन बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
साताऱ्यातील चेंबर व पाइप लाइन फुटण्याची समस्या गंभीर आहे. नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अडवल्याने पाण्याचे श्रीविहारजवळ पाण्याचे तळे साचले आहे. महापालिकेने चार महिने कचरा उचलण्याचे काम केले, परंतु आता ते बंद झाले आहे. नगर पालिकेकडे सध्या तरी कचरा उचलण्यासाठी सक्षम अशी यंत्रणा नाही. सातारा गावजवळील पुलाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असून, मागील दोन महिन्यांपासून ते बंदच पडले आहे.

सातारा-देवळाई शिवेजवळ गट क्रमांक ९४मधून जाणाऱ्या नाल्याचा प्रवाह अडल्यामुळे गट क्रमांक ९५मध्ये पाण्याचे तळे साचले आहे. श्रीनिवासनगर (गट क्रमांक ९०) या भागातही पाणी साचलेले आहे. नाईकनगरमध्ये चेंबर फुटल्याची समस्या आहे. खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाच्या बाजूला आठ दिवसांपूर्वी पाइप फुटला. परिसरातील नागरिकांनी वर्गणी जमा करून तात्पुरती दुरस्ती केली.

सातारा गावातील पुलाचेही धिम्या गतीने सुरू आहे. मंजुरी मिळाल्यावर दीड वर्ष कामाला सुरुवातच झाली नव्हती. आता कशीबशी सुरुवात झाली तर, दोन महिन्यांपासून ते बंद आहे. त्यामुळे सातारा तांडा, भारत बटालिअन, कॉलेजला जाणारे नागरिक व गावकऱ्यांची गैरसोय होत आहे.

महापालिकेने १ टिप्प्पर व ५ छोट्या गाड्यांद्वारे कचरा उचलण्याचे काम केले, परंतु तेव्हाही संपूर्ण कचरा उचलला जात नव्हता. आता तेही बंद झाले आहे. नगर पालिकेने कचरा संकलन सुरू केल्यानंतर या परिसरातील संपूर्ण भागातील कचरा उचलण्याचे काम करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड वर्षापासून पथदिवे बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
गेल्या दीड वर्षापासून सातारा-देवळाईच्या नागरिकांना काळोखाचा सामना करावा लागत आहे. या परिसरात एकूण ४ हजारापेक्षा जास्त पथदिवे आहेत. त्यातील बहुतांश पथदिवे बंदच आहेत.

सातारा, देवळाई गाव व परिसर या ठिकाणी असलेल्या खांब्यांवर ३६ व १२५ वॅटचे बल्ब व ६५ वॅटचे सीएफएल लावण्यात आलेले आहे. दोन्ही ठिकाणी ग्रामपंचायत असताना त्याची देखभाल व दुरुस्ती नियमित केली जात होती. कुठल्याही भागातून तक्रार आली की लाइनमन तात्काळ धाव घेऊन गरजेचा असेल तेथे नवीन बल्ब लावला जात असे. पथदिव्यांची दुरुस्ती केली जात असे.

नगर पालिका स्थापनेपासून पथदिव्यांच्या दुरुस्तीची कामे झाली नाहीत. महापालिकेने जून महिन्यात केलेल्या पाहणीत १०४८ पथदिवे बंद असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्या दुरुस्तीविषयी मात्र कोणतेही पावले उचलले नाहीत. आता त्याच्या संख्येत वाढच झाली असून, ७० टक्क्यांपेक्षा जास्त जास्त पथदिवे बंद झाले आहेत. आता तरी हा अंधार दूर व्हावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

बंद पथदिवे
१२५ वॅट : ४३४
३६ वॅट : २०७
६५ वॅट : ४०७ (सीएफएल)


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौका-चौकांत वाहतूक कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या क्रांतिचौक - रेल्वे स्टेशन रस्त्याच्या व्यथा तीन वर्षे उलटून गेली तरी संपलेल्या नाहीत. रस्ता रुंदीकरण, दुभाजक करून पूर्णपणे तयार झालेल्या रस्त्यावरील अडथळे मात्र अजून हटलेले नाहीत. वाहतुकीच्या सोयीसाठी दुभाजक बंद करण्यात आले, पण नको त्या ठिकाणी गतीरोधक अजूनही ठेवण्यात आलेले आहेत. शिवाय प्रमुख चौकांमध्ये सिग्नल नसल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.

क्रांतिचौक ते रेल्वे स्टेशन रस्त्यावर उस्मानपुऱ्याचा चौक आहे. रस्ता रुंदीकरणानंतर हा चौक मोठा झाला आहे. महावीर चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाळूजकडे जाणारी जडवाहतूक या रस्त्यावरून महिनाभरापासून वळविण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी असते. क्रांतिचौकाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणारी वाहने सुसाट वेगाने धावतात. त्याचवेळी उलट दिशेकडून येणारी वाहनेही वेगात येतात. चौकात सिग्नल, वाहतूक पोलिस दोन्ही नसल्याने पुढे जाण्यासाठी स्पर्धा लागलेली असते. अगदी सकाळी नऊपासून या चौकात वाहतुकीची कोंडी होते. अशीच परिस्थिती पद्मपुरा चौकात असते. देवगिरी कॉलेजकडून; तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय आणि कोकणवाडी अशा तीन रस्त्यांवरून येणारी वाहने त्यात क्रांतिचौक, रेल्वे स्टेशन मार्गावरील वाहतुकीची या चौकात कोंडी होते. या चौकातील सिग्नलही गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस कर्मचारीही नाहीत. त्यामुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे.

या रस्त्यावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चेलीपुरा हायस्कूल आणि पद्मपुरा चौक, बन्सीलाल नगर या चार ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले होते. या भागातील गर्दी पाहून त्यावेळी गतिरोधकाचा निर्णय झाला, पण आता या रस्त्यावरील सर्व दुभाजक बंद करण्यात आले. उस्मानपुरा चौकातून थेट पदमपुरा चौकापर्यंत सलग दुभाजक आहेत. त्यामुळे वाहनधारक वेगाने जातात. पण रस्त्यातील गतिरोधक न हटविल्याने अनेक ठिकाणी छोटे-मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. नियोजन करताना आवश्यक त्या ठिकाणी सिग्नल करणे आवश्यक आहे, पण तूर्तास तरी नको त्या ठिकाणी गतिरोधक आणि चौकाचौकात वाहतूक कोंडी असे चित्र क्रांतिचौक - रेल्वे स्टेशन रस्त्यावर दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना धान्य वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय अडचणीत आहेत. त्यांना समजून घेणे आवश्यक आहे. मराठवाड्यात आज आपण ५०० कुटुंबीयांना अन्नधान्यवाटप करून दिलासा देत आहोत. कृषीप्रधान देशात शेतकरी अडचणीत राहू नयेत, यासाठी चारही शक्तीपीठांना चांगल्या पावसासाठी आपण साकडे घालणार आहोत. ही शक्तीपीठे नक्कीच तारतील, असे प्रतिपादन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी रविवारी येथे केले.

स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गचे (दिंडोरीप्रणीत) प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचा रविवारी शहरात महासत्संग मेळावा आयोजित करण्यात आला होता. या महासत्संग मेळाव्याला गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलात नागरिकांनी मोठी गर्दी केली. प्रारंभी मराठवाड्यातील ५०० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना व दुष्काळग्रस्तांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यानंतर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर मराठवाडा मुख्य विलासराव देशमुख, केंद्रातील पदाधिकारी, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांची उपस्थिती होती.

यावेळी अण्णासाहेब मोरे म्हणाले, 'सध्या वातावरण फारसे चांगले नाही. यासाठी आपण शाकंभरी नवरात्रोत्सवात माहूरची रेणुकादेवी, नाशिकजवळील सप्तश्रृंगगडवरील सप्तश्रृंगी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि कोल्हापूरची अंबाबाई येथे पर्जन्यासाठी साकडे घालावे. अनुयायांनी या ठिकाणी जाऊन चांगल्या पावसासाठी साकडे घातले तर, ही शक्तीपीठे नक्कीच ऐकतील व आत्महत्याग्रस्त शेतकरीवर्गाला दिलासा मिळेल. शाकंभरी नवरात्रोत्सव १७ जानेवारी ते २३ जानेवारीदरम्यान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यानंतर त्यांनी सिंहस्थपर्व ऑगस्ट २०१५पर्यंत असल्याचे सांगून नाशिक येथे अनुयायांनी यावे, असे आवाहनही केले. त्यांनी शेतीशास्त्र, आयुर्वेद, बालसंस्कार, अध्यात्म व विज्ञान, वास्तुशास्त्र, ग्रामअभियान, स्वयंरोजगार, सेंद्रीय शेती, शेतीचे वास्तुशास्त्र, दुष्काळ निर्मूलनासाठी स्वामी समर्थ केंद्राच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजना आदी विषयांवर संवाद साधला. यावेळी आमदार अतुल सावे, शिवसेना जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, महापौर त्रंबक तुपे, स्थायी समिती अध्यक्ष दिलीप थोरात, विवेकानंद शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र शिसोदे, नगरसेवक राजू वैद्य, माजी आमदार कल्याण काळे यांच्यासह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. सुरुवातीला अकोल्याहून खास सत्संगासाठी आलेले अहमदभाई यांनीही अनुयायांशी संवाद साधला. मानवता आणि मानवीय दृष्टिकोन यांत धर्म, जात असा भेदभाव करू नये आणि सर्वजण एक माणूस म्हणून जगू, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शहरातील विविध उपनगरांसह मराठवाड्यातील विविध स्वामी समर्थ केंद्रातील पदाधिकारी, अनुयायी आणि भाविक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छावणीत हजार घरांचे अतिक्रमण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद छावणी परिसरात सुमारे एक हजार घरांचे आणि दुकानांचे अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण करणाऱ्यांत सातही नगरसेवकांचाही समावेश असून, आता छावणी परिषद याबाबत काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

छावणी युवा विकास मंचचे अध्यक्ष मयंक पांडे यांनी सांगितले की, औरंगाबाद छावणी बोर्डाच्या स्थापनेला सुमारे साठ वर्षे झाली आहेत. या काळात छावणीची लोकसंख्याही तिपटीने वाढली. दुकान, घर, हॉस्पिटल, रेस्तराँ, हॉटेल्स अशी विविध अतिक्रमणे वाढली असून, त्यांची संख्या आता हजारापर्यंत पोहचली आहे. गेल्या २५ वर्षांत सत्तेत असलेल्यांचीच अतिक्रमणे अधिक असून, त्यांना विविध ठिकाणी बांधकामांच्या परवानग्याही देण्यात आल्या. आज छावणीत सात नगरसेवक अाहेत. त्यांच्या अतिक्रमणांना अभय देण्यात आले आहे.
अतिक्रमणात सर्वाधिक अतिक्रमणे वॉर्ड १ आणि ४मध्ये आहेत. ५ आणि ६ नंबरच्या वॉर्डांतील पेन्शनपुरा आणि गड्डीगुडम येथेही अतिक्रमण अधिक असून, त्यांनाही छावणी परिषदेने अभय दिले आहे. शांतीपुरा, गवळीपुरा या भागातील अतिक्रमणांमध्ये घरांची अतिक्रमणांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. कर्णपुरा वॉर्ड नंबर ७मध्ये नगरसेवकांच्याच शेतीवरील अतिक्रमण असल्याचे मयंक पांडे यांनी सांगितले.
छावणीत रहिवाशांना एक एफएसआय देण्यात आला आहे. याअंतर्गत तीन-चार मजली इमारती बांधण्याची परवानगी नाही. असे असताना हे बेकायदा बांधकामे करण्यात आली असून, उपाध्यक्ष किशोर कच्छवाह यांच्यासह सातही नगरसेवक यात सामील असल्याचा दावा मयंक पांडे यांनी केला.
२००७मध्ये छावणीत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. यानंतर ही मोहीम राबवण्यातच आली नाही. यामुळे अतिक्रमण वाढले आहे. छावणी युवा मंच आणि छावणी परिषदेसह नगरसेवकांचे आपसातील वाद चव्हाट्यावर येत आहेत. अतिक्रमणच्या नावाखाली येथे चिखलफेक सुरू आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. युवामंच आणि नगरसेवक एकमेकांवर आरोप करत असून, त्यामुळे छावणीचे वातावरण बिघडत आहे.

छावणीतील अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही विशेष मोहीम राबविणार असून, कोणालाही अभय दिले जाणार नाही. याकामी गरज पडल्यास पोलिस आयुक्तांची मदतही घेतली जाईल. या कारवाईदरम्यान वाहतुकीला अडथळा ठरणारी सर्व अनधिकृत बांधकामे हटविण्यात येणार आहेत. त्यासाठी
पोलिस प्रशासनाची मदत घेण्यात येईल.
- पूजा पलिचा, सीईओ छावणी.

आमची अतिक्रमणे नाहीत हॉटेल्स व दुकानांची अतिक्रमणे आम्ही स्वत:हून काढली आहेत. छावणी परिषदेला आम्ही तसे कळवलेही आहे. घरांचे अतिक्रमणे नाहीत. मंचाचे पदाधिकारी आमच्याविरोधात बोलताय, पण त्यांचे स्वत:चे अतिक्रमण मोठे आहे. त्याविषयी ते का बोलत नाहीत.
- किशोर कच्छवाह, उपाध्यक्ष छावणी परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ए. बी. बर्धन यांना भाकपतर्फे श्रद्धांजली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ए. बी. बर्धन यांना शहर भाकपच्या वतीने रविवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. पक्ष ध्वज अर्ध्यावर घेऊन व मिरवणूक काढून श्रद्धांजली वाहण्यात आली.

भाकवच्या विविध शाखांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दुखवटा पाळला. खोकडपुरा येथील जिल्हा मुख्यालयात रविवारी सकाळी पक्षाचा लालध्वज मनोहर टाकसाळ यांच्या हस्ते अर्ध्यावर घेण्यात आला. त्यांच्याच हस्ते बर्धन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शोकसभा घेण्यात आली. खोकडपुरा ते गुलमंडी व तेथून पैठणगेट अशी श्रद्धांजलीपर मिरवणूक काढण्यात आली. गुलमंडी व पैठणगेट येथे बर्धन यांच्या प्रतिमेस जिल्हा सचिव राम बाहेती यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी भाकपचे जिल्हा सहसचिव अभय टाकसाळ, शहर सहसचिव डॉ. एस. एम. नईम, शहर सहसचिव मधुकर खिल्लारे, जयश्री गायकवाड, सी. एम. रिंगे, पोपट गायकवाड, प्रकाश बनसोड, आतिश गवळे, मानसी बाहेती, मनिषा भोळे, राजू हिवाळे, अनिता पावडे, सागर घाटे, माधुरी जमदाडे, अमरजीत बाहेती, संगाम कोरडे, ज्ञानोबा नाईकवाडे, तारा बनसोडे, सय्यद बुढन, समाधान इंगळे, प्रीतम घनगावे, विकास गायकवाड, पंचशीला खोब्रागडे आदींसह विविध शाखांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याची विक्रमी आवक

$
0
0

वैजापूर : नाशिक जिल्ह्यातील प्रमुख कांदा मार्केटमधील भाव गडगडल्याने येवल्यासह तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घायगाव शिवारातील कांदा मार्केटमध्ये मास कांदा आणत आहेत. या मार्केटमध्ये शनिवारी एका दिवसात विक्रमी १० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. यावेळी चांगल्या प्रतिच्या उन्हाळी कांद्याला १६०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला.

काही दिवसांपासून कांद्याच्या भावात चढउतार सुरू आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी भाव मिळेल तेथे कांदा लिलावासाठी नेत आहेत. येवला, अंदरसूलसह जिल्ह्यातील प्रमुख कांदा मार्केटचे भाव कमी झाले आहेत. यामुळे येवला, पाटोदा, अंदरसूल तसेच मराठवाड्यातील फुलंब्री, कन्नड येथील शेतकऱ्यांनी शनिवारी वैजापूरच्या मार्केटमध्ये कांदा आणला. लिलावात ९०० ते १६०० रुपये क्विंटल असा भाव मिळाला. त्यामुळे एका दिवसात या मार्केमध्ये जवळपास सव्वाकोटी रुपयांची उलाढाल झाली व त्यातून बाजार समितीला सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना कांद्याचे पेमेंट त्वरित मिळत असल्याने त्यांनी या मार्केटला पसंती दिल्याचे दिसून आले. लिलावाच्या वेळी माजी आमदार आर. एम. वाणी, मार्केट कमिटी सभापती अॅड. आसाराम रोठे, संचालक भाऊसाहेब गलांडे, सचिव विजय सिनगर, पंजाबराव थोरात, रमेश सावंत, चंचल मते, सुरेश तांबे, प्रवीण संचेती यांच्यासह व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेताच्या वादातून उभा ऊस जाळला

$
0
0

वाळूज पोलिस ठाण्यात पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

गंगापूर तालुक्यातील पांढरा ओहळ येथील एका शेतकऱ्याचा तब्बल दीड एकरवरील ऊस जाळून टाकण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजता घडली. ही आग शेताच्या वादातून लावण्यात आल्याचा संशय शेतकऱ्याने व्यक्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढराओहळ येथील रामदास कैलास वल्ले यांचे शेत गटनंबर ९३ मध्ये आहे. येथील ४ एकार ४ गुंठे शेतीपैकी ३ एकरावर उसाची लागवड करण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे ते शनिवारी सांयकाळी साडेसहा वाजता घरी येऊन जेवण केले. त्यानंतर सात वाजता वीज येणार असल्याने उसाला पाणी भरण्यासाठी शेतात गेले. तेव्हा त्यांना तब्बल दीड एकरच्या आसपास शेतातील उसाला आग लागल्याचे दिसून आले. ही आग शेताच्या वादातून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त करीत संजय केशव वल्ले (वय ४५) व आकाश उर्फ बंडू संजय वल्ले (वय २५, दोघे रा. पांढराओहळ) यांनी पेटवून दिल्याची तक्रार रामदास वल्ले यांनी दिली. या तक्रारीवरून वाळूज पोलिस ठाण्यात पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळाच्या झळा तीव्र!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्याला दुष्काळाचे चटके जाणवू लागले असून बाष्पीभवनामुळे लहान मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठी वेगाने कमी होत आहे. सध्या विभागातील ८४१ प्रकल्पांमध्ये फक्त १० टक्के (८१२.८६ दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा शिल्लक आहे.

अत्यंत कमी पर्जन्यमानामुळे यंदाही दुष्काळाचे चटके मराठवाडा सहन करावे लागत आहेत. सप्टेंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे काही जिल्ह्यातील लहान-मोठे बंधारे भरले मात्र, यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. १ जानेवारी रोजी विभागातील पाणीसाठा ८१२.८६ दशलक्ष घनमीटर (१० टक्के) होता. सध्या मराठवाड्यातील माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, निम्न मनार व सीना-कोळेगाव या पाच मोठ्या प्रकल्पांमधील पाणी जोत्याखाली गेले आहे. मराठवाड्यातील ११ मोठे, ७५ मध्यम, ७२३ लघु प्रकल्प, गोदावरी नदीवरील ११ व मांजरा नदीवरील १८ बंधारे अशा ८४१ प्रकल्पांत सध्या ८१२.८६ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा आहे. हा साठा वेगाने कमी होत असल्याने येत्या काही दिवसामध्ये प्रशासनाला पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

जायकवाडीत ९ टक्के साठा

केवळ जायवाडी धरणावर अवलंबून असलेल्या असलेल्या शहर तसेच उद्योगांवरही येणाऱ्या काळामध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. वरच्या धरणातून जायकवाडीला पाणी आले मात्र, रोजचा वापर व बाष्पीभवनामुळे पाण्यात घट होत असून सध्या जायकवाडी धरणामध्ये १९२ दशलक्ष घनमीटर (९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. पैठण येथील नाथसागरामधून औरंगाबाद, जालना, अंबड शहर तसेच काही गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असून उद्योगांसाठीही पाणीपुरवठा सुरू आहे. औरंगाबाद व जालना शहराला १७० एमएलडी (०.१७ दलघमी), उद्योगांसाठी ५२ एमएलडी (०.५ दलघमी) पाणीपुरवठा करण्यात येतो. धरण उशाला असलेल्या पैठण तालुक्यालाच सध्या टंचाईच्या झळा बसत असून पैठण तालुक्यात ७२ तर, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये टँकरची संख्या १४१ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images