Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पंतप्रधान पीक विमा योजनेचे स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
शेतकऱ्यांना अश्वस्त करून धैर्य देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने पंतप्रधान पीक विमा योजना घोषीत केली आहे. त्या योजनेच औसा विधानसभा मतदार संघातील गावातून साखर वाटप करून स्वागत करण्यात आले.
औसा तालुक्यातील खुंटेगाव येथे शुक्रवारी सकाळी बँड वाजवत गावातील सर्व मंदिरात नारळ फोडून या योजनेचे स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या सभेत भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पाशा पटेल यांच यावेळी भाषण झाले. यावेळी पाशा पटेल म्हणाले, 'पंतप्रधानांनी निवडणूक जाहिरनाम्यात दिलेल्या अश्वासानाची पुर्ती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून 'अच्छे दिन' येण्यास सुरुवात होत आहे. नव्याने पंतप्रधान पीक विमा योजना घोषीत केली आहे. ती हवामानातील बदलाचा शेती व्यवसायावर होत असलेल्या परिणामाचा संपूर्ण विचार करून केलेली योजना आहे. सध्य परिस्थितीत शेतकऱ्यांना सावरणारी या योजनेपेक्षा चांगली योजना असूच शकत नाही असा दावा ही त्यांनी केला.
यापूर्वीच्या पीक विमा योजनेत समुहाच्या नुकसानाशी नुकसान भरपाई जोडली जात होती. या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीची माहिती अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेतली जाणार असून त्यानुसार त्याला नुकसानभरपाई मिळणार असून पेरणीपूर्व, पीक शेतात उभे असताना आणि काढणीनंतर काही दिवसाच्या आत काही नुकसान झाले. शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळणार आहे. पीक विम्याचा हप्ताही खूपच कमी ठेवला गेला असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. शेतकऱ्यांसाठी 'अच्छे दिन'ची ही सुरुवात असल्यामुळे साखर वाटप करून आनंद व्यक्त करण्याची सुरवात खुंटेगावपासून करण्यात येत असल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले.
यावेळी बोलताना खुंटेगावचे जेष्ठ नागरिक दिलीप कोल्हे म्हणाले, 'नवी पंतप्रधान योजना ही जुन्या योजनेपेक्षा अनेक बाबतीत सुधारणा केलेली आहे. येत्या काळात शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांचे क्वार्टर्सअभावी जगणे असुरक्षित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
गेल्या २० वर्षांपासून सेवेत कार्यरत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी यांच्याशिवाय अधिकारी यांना राहण्यासाठी क्वार्टर्स उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या कर्मचारी व अधिकाऱ्यांना तुळजापूर किंवा उस्मानाबाद येथून दररोज ये-जा करावी लागते. याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होऊ लागला आहे. पोलिस विभाग मात्र, जिल्ह्यातील पोलिसांना व अधिकाऱ्यांना क्वार्टर्स किंवा पोलिस वसाहत उपलब्ध करून देण्याकामी हतबल ठरत असल्याचेच चित्र अहे. परिणामी पोलिस कर्मचाऱ्यांना एकाच खोलीत राहावे लागत आहे.
वाढाता कामाचा ताण आणि मुक्कामाची किंवा राहण्याची सोय नसल्याने होणारी प्रवासाची दगदग यामुळे पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्या कामावर परिणाम होत आहे. गेल्या २० वर्षांपासून तामलवाडी येथील पोलिस वसाहतीचा प्रश्न रखडलेला आहे.
तामलवाडी हे उस्मानाबाद- सोलापूर जिल्ह्याचा सीमेवरील शेवटचे तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्याला जोडणाऱ्या मार्गाचे प्रवेशद्वार आहे.
तामलवाडीसह परिसरातील १७ गावांची कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी या पोलिस ठाण्यावर आहे. त्याचबरोबर सोलापूर-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग येथूनच जातो. तुळजापूरकडे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांची वर्दळ येथूनच सर्वाधिक असते. तामलवाडी येथे औद्योगिक वसाहतही आहे. त्यामुळे येथे काम करणाऱ्या पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना सदैव सतर्क राहावे लागते.
तामलवाडी पोलिस ठाण्याची सुरूवात करुन २० वर्षांचा कालावधी लोटला. येथे सध्या दोन पोलिस अधिकारी, सहा महिला पोलिस कर्मचारी व उर्वरित पोलिस कर्मचारी असा ४१ जणांचा स्टाफ आहे. मात्र, अधिकार व कर्मचारी यांना राहण्यासाठी अद्यापही येथे पोलिस वसाहत राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
तामलवाडी येथील काही पोलिस कर्मचारी येथील एका खोलीतच दाटीवाटीने राहतात. महिला पोलिस कर्मचाऱ्यांसाठी येथे कुठलीही विशेष सुविधा नसल्याने त्या तुळजापूर किंवा उस्मानाबाद येथून ये-जा करतात. तर येथील दोन पोलिस अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्राम कक्ष वापरात आणले आहे.
तामलवाडी येथे औद्योगिक वसाहत उभारण्यात आल्यामुळे शिवाय येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी करणाचे काम चालू असल्यामुळे येथील काही खोल्या या सर्व मंडळींनी अगोदरच व्यापल्या आहेत. त्यामुळे तामलवाडी येथे पोलिसांना किरायाने रूम मिळणेही अवघड झाले आहे. परिणामी येथे पोलिसांच्या मुक्कांमांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील तामलवाडी हे प्रमुख गाव असल्याने येथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सदैव सतर्क राहावे लागते. त्यासाठी त्यांना तामलवाडी येथेच मुक्काम ठोकावा लागतो. परिणामी सध्या ही पोलिस दलातील मंडळे दाटीवाटीतच जीवन जगत आहेत. येथे त्यांच्या सुरक्षिततेची असलीही खात्री नाही.

दोन एकर जमीन द्यावी
तामलवाडी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची दोन एकर जमीन आहे. लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने ही जमीन पोलिस दलाला सुपूर्द करून तेथे पोलिस वसाहत उभा करून पोलिस कर्मचाऱ्यांचे जगणे सुसह्य करावे, एवढीच येथील अधिकारी व कर्मचाऱ्यां

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना ओळखा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
शेतकऱ्यांची तरुण मुले आंदोलन करून, न्यायालयात जाऊन उसाला एफआरपी प्रमाणे भाव मिळवून देतात, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतात मग कारखाना का चालवू शकत नाहीत, असा सवाल आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी केला. कलंबरचा विषय चघळत ठेवून जनतेची दिशाभूल करणाऱ्या मंडळीचा कावा वेळीच ओळखा, असे आवाहनही त्यांनी केले.

माळकौठा, मुदखेड, शेंबोली, कामठा, मालेगाव येथे झालेल्या सभांवेळी ते बोतल होते. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी विद्यमान संचालक मंडळ विरोधात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एकत्र येऊन पॅनल उभे केले आहे. मतदारांमध्ये असलेला प्रचंड रोष मतपेटीतून बाहेर पडेल, अशी या निवडणुकीची सध्याची परिस्थिती आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना आमदार प्रताप पाटील-चिखलीकर, भाजपाचे राम चौधरी, राष्ट्रवादीचे धर्मराज देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रल्हाद इंगोले यांनी संयुक्तरित्या प्रचाराचे रान उठवले आहे. कलंबरचा विषय काढून जनतेची दिशाभूल करणाऱ्या व कारखान्यात शेतकऱ्यांच्या बिलापोटी पिळवणूक करणाऱ्या, तोंड बघून ऊसतोड करणाऱ्या, विरोधातील मंडळीचा ऊस वाळवत ठेवणाऱ्या मंडळींना यावेळी जागा दाखविण्याची वेळ आली असल्याचे चिखलीकर म्हणाले. गतवर्षीचे अंतिम बिल का निघत नाही, शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये कारखान्याकडे जमा आहेत. ते परत का मिळत नाहीत, वजन तपासणीचे गौडबंगाल काय आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कुठल्या कायद्यानुसार पगारी मिळतात. या प्रश्नाची उत्तरे प्रस्थापितांनी द्यावीत, कारखाना चालविता येत नाही, असे म्हणणाऱ्या अशोक चव्हाण यांनी न्यायालयीन प्रक्रियेकडे लक्ष केंद्रीत करावे. शेतकऱ्यांच्या मुलांनी पाठपुरावा करून कायदेशीर लढाई लढून ऊसाला एफआरपीप्रमाणे भाव मिळवून दिला, त्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागला, असेही चिखलीकर यावेळी म्हणाले.
ऊसाला एफआरपीप्रमाणे व नियमाप्रमाणे या मंडळींनी भाव का दिला नाही. आमच्या हातात हा कारखाना दिल्यास वशिलेबाजी न करता प्राधान्यक्रमाने व लागवडीप्रमाणे ऊस घेण्यात येईल. कारखाना क्षेत्रात ठिबक खत, बि-बियाणे व औषधी किसान सेवा केंद्र तसेच ऊस संशोधन केंद्र उभारुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल. कुठल्याच प्रकारची मनमानी आम्ही चालू देणार नाही. शेतकऱ्यांना न्याय हेच आमचे धोरण राहिल, असेही चिखलीकर म्हणाले. याप्रसंगी धर्मराज देशमुख, प्रल्हाद इंगोले, राम चौधरी आदींची भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार जीवांसाठी ५१ तासांचे कष्ट

$
0
0

मागे काहींनी सेवा केली। धनधान्य राज्येहि अर्पिली॥
शेवटी देह देवोनीहि पूर्ति केली। सेवेची त्यांनी ॥९१॥
अन्नसेवा धनसेवा। श्रमसेवा ज्ञानसेवा॥ शेवटी ते प्राणसेवा। औषधाद‌ि रूपे॥९४॥
संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील या श्लोकांचा (९ वा अध्याय) प्रत्यय शुक्रवारी औरंगाबादमध्ये आला. ब्रेनडेड रुग्णाच्या अवयवांमुळे चार अनोळखी रुग्णांना जीवदान मिळावे यासाठी एमआयटी आणि युनायटेड सिग्मा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली. शर्थीचे प्रयत्न करूनही अपघातग्रस्त तरुणाचे हृदय उपयोगात आणता आले नाही. मात्र, दोन किडनी व यकृत देऊन तीन रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश आले. या तरुणाच्या दोन डोळ्यांचाही उपयोग करण्याचा प्रयत्न झाला, पण डोळ्यांभोवती जखमा असल्यामुळे ते शक्य झाले नाही. या ५१ तासांत घडलेल्या वेगवान घडामोडींचा हा आलेख.
Makrand.Kulkarni
@timesgroup.com
अपघातानंतर अत्यवस्थ झालेला तरुण १३ जानेवारीच्या पहाटे उपचारासाठी सिडकोतील एमआयटी रुग्णालयात आणला जातो. प्रयत्नपूर्वकही त्याचे प्राण वाचणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाइकांचे केलेले प्रबोधन तीन जणांचा जीव वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. अवयव दान प्रक्रियेत एमआयटी हॉस्पिटलचा सिंहाचा वाटा होता.
देऊळगाव मही येथील राम मगर या अपघातग्रस्त रुग्णाला १३ जानेवारी रोजी पहाटे तीन वाजता उपचारासाठी एमआयटी हॉस्पिटलमध्ये आणले. न्यूरोसर्जन डॉ. अन्शूल बगडिया यांनी रुग्णाची तपासणी केली. मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. रुग्ण गंभीर होता. डॉ. बगडिया यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना त्याची कल्पना दिली. शक्य ते चांगल्यात चांगले उपचार करू असा दिलासा त्यांनी दिला. तोवर १३ तारीख उजाडली होती. सहा तासानंतरही प्रकृतित सुधारणा न झाल्याने बगडियांनी रुग्णाचा ब्रेन डेड (मेंदू मृतावस्थेत जाणे) झाल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले. नातेवाईकांनी त्यांना पुढे काय करावे असा सल्ला विचारला. इथे खरी कसोटी होती. कारण अत्यवस्थ असलेल्या रुग्णावर उपचार करताना त्याच्या नातेवाईकांशी कशा पद्धतीने संवाद साधायचा हे कौशल्य असते. वेळेचे भान राखणे ही डॉक्टरांची खरी कसोटी असते. बगडिया यांनी मुंबईत हिंदुजा हॉस्पिटलमध्ये काही काळ काम केले आहे. तिथे ब्रेनडेड पेशंट आल्यानंतर त्यांना अवयवदान प्रक्रियेची माहिती देऊन ही प्रक्रिया यशस्वी केल्याचा अनुभव पाठिशी होता. तो इथे कामाला आला. बगडियांनी रामच्या नातेवाईकांना दोन पर्याय सांगितले. एक तर रुग्णाला घरी घेऊन जाणे कारण असे रुग्ण कृत्रिम श्वसनयंत्रणेवर असतात. अन्यथा अवयवदान हा एक पर्याय आहे. तरुण मुलाचे अवयवदान करण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर नातेवाईकही काही काळ भांबावून गेले. त्यांनी वेळ मागून घेतला. १३ जानेवारी रोजी सायंकाळी रामच्या नातेवाईकांनी अवयवदानास होकार दिला आणि तिथून पुढचे ३० तास विनाखंड सगळी यंत्रणा अक्षरशः सुपरफास्ट पद्धतीने कामाला लागली. यासंदर्भात अधिक माहिती देताना एमआयटीचे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद निकाळजे
म्हणाले, 'ब्रेनडेड मुळे मेंदूचे कार्य बंद होते. हृदय, कृत्रिम श्वसन यंत्रणेद्वारे सुरू होते. रुग्णाच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. आमच्या हॉस्पिटलला पोचेपर्यंत त्यात वाढ झाली होती. आमच्याकडे अॅडमिट झाल्यानंतर आयसीयूमधील डॉ. रोहन कुंडारे आणि डॉ. सुजय सोनवणे वेळेचा कुठलाही विचार न करता आयसीयूमध्ये बसून होते. दरम्यान डॉ. अन्शूल बगडिया यांनी अवयवदान प्रक्रिया सांगितल्यानंतर नातेवाईक तयार झाले आणि यंत्रणेची हालचाल सुरू झाली. युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये सरकारमान्य ब्रेनडेड कमिटी आहे. आम्ही त्यांना संपर्क साधून माहिती दिली.'
योग्य काळजी घेतल्याने
रुग्णाच्या अवयवदानासंदर्भात यंत्रणा कार्यान्वित झाली. १३ जानेवारी रोजी रात्री रुग्णाचा रक्तदाब वाढला. हृदयाचे ठोके अनियमित झाले. तेव्हा डॉ. बगडिया, डॉ. कुंडरे यांनी योग्य ते उपचार केले आणि काही वेळानंतर जीवाचा धोका टळला.
१०८ ची मदत
शासकीय यंत्रणेकडून आरोग्य विभागाच्या तातडीच्या सेवेसाठी १०८ ही अँब्युलन्स सेवा सुरू केली आहे. ग्रामीण भागात कुठेही गरज भासल्यास या क्रमांकावर संपर्क साधला की अँब्युलन्स तिथे पोचले. रामच्या अपघातानंतर त्याच्या भावाने १०८ ला संपर्क साधला आणि अँब्युलन्स तिथे पोचली. त्यामुळे मेहकरला रुग्णालयात नेणे सोपे झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१‌व्या मिनिटाला झेपावले विमान

$
0
0


AbdulWajed.shaikh @ timesgroup.com
सिग्मा हॉस्पिटलमधील ब्रेन डेड रुग्ण राम मगरच्या अवयवाचे तीन बॉक्स घेऊन अॅम्ब्युलन्स अवघ्या सहा मिनिटांत विमानतळावर पोहचली. अन् २१ व्या मिनिटाला विमान मुंबईला जाण्यासाठी आकाशात झेपावले.
सिग्मा हॉस्पिटलसोबतच पोलिस विभाग, विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी गुरुवारपासून तयारीत होते. विमानतळावर रात्री एक वाजता येणारी एअर अॅम्ब्युलन्स रद्द झाल्याने शुक्रवारी पहाटे रुग्णाच्या शरीरातून अवयव काढले. हे जेट वेळेत उडण्यासाठी विमानतळावर विमानतळ प्राधिकरण आणि जेट एअरवेज यांना पूर्वसूचना दिल्या होत्या. त्यानुसार जेट एअरवेजचे अहेमद जलील यांनी पाच विशेष कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक अलोक वार्ष्णेय यांनीही या कामासाठी सीआयएसएफसह अन्य कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याचे आदेश दिले होते. ते स्वतः पहाटे विमानतळावर उपस्थित होते.
विमानतळावर आलेल्या विमान प्रवाशांच्या कागदपत्रांची छाननी करून सुरक्षेची प्रक्रिया राबविण्यात आली. विमानात सामान टाकण्याच्या कामाची पूर्वतयारी झाली होती. जेट एअरवेजचे मुंबई-औरंगाबाद विमान विमानतळावर आल्यानंतर ते अप्रोनवर आणले. विमानातील प्रवाशांना लवकरात लवकर उतरविले. त्यांचे सामान काढले. लगेच या विमानातील सामान चढविले. त्या काळात हॉस्पिटलहून निघालेली अॅम्ब्युलन्स विमानतळावर पोहोचली होती. यातून अवयवांचे तीन बॉक्स काढून, त्यांची अवघ्या पाच मिनिटांच्या आत तपासणी आणि अन्य कागदपत्रींची छाननी करून ते विमानात चढविले. या बॉक्ससोबतच सुजाता नदर, कुमार हर्बट निर्मल, गौरव चौंबस आणि गुरूप्रसाद शेट्टी यांनाही थेट विमानात पाठविण्यात आले. जेट एअरवेजचे विमान टेक ऑफला रेडी करून ठेवले होते. या नियोनजनामुळे अवघ्या २१ मिनिटांला विमान
मुंबईकडे झेपावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थ्रिलिंग अनुभव

$
0
0



औरंगाबाद : 'ओटीमध्ये २५-३० तज्ज्ञ डॉक्टर अथक काम करीत होते. हॉस्पिटलचा स्टाफ परिश्रम घेत होता. एखाद्या ब्रेन डेड रुग्णाचे अवयव प्रत्यारोपणासाठी औरंगाबादबाहेर पाठविण्याची ही पहिलीच वेळ होती. हॉस्पिटलसह पोलिस, विमानतळ या यंत्रणांनी केलेल्या सहकार्याची विशेष नोंद घेतली पाहिजे. गेल्या दीड-दोन दिवसांतील अनुभव थ्रिलिंग होता,' हे सांगताना सिग्मा हॉस्पिटलचे संचालक डॉ. उन्मेष टाकळकर यांच्या चेहऱ्यावर रात्रभर जागल्याचा ताण स्पष्टपणे दिसत होता.
औरंगाबादेतील हॉस्पिटलमध्ये अवयवदानासाठी आवश्यक शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उलपब्ध असल्याचा संदेश यानिमित्ताने गेला आहे. या अनुभवाविषयी डॉ. टाकळकर म्हणाले,'रुग्ण एमआयटीमध्ये होता. त्याला अधिकृतरीत्या ब्रेनडेड घोषित करून पुढची प्रक्रिया पार पाडेपर्यंत एमआयटी हॉस्पिटलने महत्वाची भूमिका पार पाडली. अशी घोषणा करण्यासाठीची अधिकृत समिती आमच्या हॉस्पिटलमध्ये आहे. नियमानुसार ही समिती तिथे गेली आणि ब्रेनडेडची घोषणा केली. त्यानंतर अवयवदान करण्यापूर्वी दर सहा तासांनी रुग्णाची तपासणी करणे गरजेचे आहे. त्यानुसार सहा - सहा तासांनी तपासणी केली गेली. नातेवाईकांनी खूप मोठे औदार्य दाखविले. मुंबई 'झेडटीसीसी'कडून पुढच्या प्रक्रियेसाठी वेगवान हालचाली झाल्या. अवयवदानासाठीचे फॉर्म भरून पाठविले गेले. तोवर देशात कुठे कोणत्या अवयवांची आवश्यकता आहे, याची नोंदणी करणारी यादी असते. त्यातून मुंबईत यकृत आणि किडनी, औरंगाबादेत किडनी आणि चेन्नईला हृदय प्रत्यारोपणाची नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले. हृदय २.५ ते ४ तास, यकृत पाच ते सहा तास, किडनी दोन चार तास प्रत्यारोपण करणे आवश्यक असते. हे करताना योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे. तमिळनाडू, महाराष्ट्र सरकारने त्वरित परवानगी दिली. पोलिस, विमानतळ प्राधिकरणाने तत्काळ सुविधा पुरविल्या. त्यामुळे हे मिशन यशस्वी झाले. २५ डॉक्टरांची टीम गेल्या दोन दिवसांपासून अहोरात्र कार्यरत होती. सगळ्यांच्या प्रयत्नामुळे थ्रिलिंग अनुभव घेता आला.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हेलिकॉप्टर सर्व्हिस हवीच’

$
0
0


औरंगाबाद : 'आज केवळ विमानाअभावी हृदय चेन्नईला पाठविणे शक्य झाले नाही आणि त्यामुळे हृदयाचे प्रत्यारोपण राहून गेले. मात्र, एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध असती, तर शंभर टक्के हृदय प्रत्यारोपण होऊ शकले असते. त्यासाठीच राज्यात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कुठलेही अवयव नेण्यासाठी खास डेडिकेटड हेलिकॉप्टर सर्व्हिस हवी. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन ही सुविधा सर्वसामान्यांना उपलब्ध करण्यासाठी तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे,' असे मत नुकत्याच 'कॅडेव्हर ट्रान्सप्लान्ट' मोहिमेचे समन्वयाचे काम करणारे ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी 'मटा'शी बोलताना आग्रहाने मांडले.
देऊळगाव मही येथील राम सुधाकर मगर या २४ वर्षीय 'ब्रेन डेड' तरुणाच्या विविध अवयवांचे प्रत्यारोपण म्हणजेच 'कॅडेव्हर ट्रान्सप्लान्ट' शुक्रवारी मुंबई व औरंगाबादमध्ये झाले. त्यासाठी सलग २४ तासांपासून प्रयत्न सुरू होते. १२ तासांपेक्षा जास्त काळ संपूर्ण देशभर समन्वयाचे काम सुरू होते. त्यासाठीच्या समन्वयाचे अधिकार ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सुधीर कुलकर्णी यांना 'डीएमईआर' तसेच मुंबई झेडटीसीसीने दिले होते. डॉ. कुलकर्णी यांच्यानुसार, संबंधित ब्रेन डेड रुग्णाचा रक्तगट हा एबी पॉझिटिव्ह होता आणि त्यामुळे ज्या रुग्णाला त्याचे अवयव द्यायचे आहेत, त्यांचाही रक्तगट हा एबी पॉझिटिव्ह हवा होता. त्यामुळे अशा रुग्णाचा शोध संपूर्ण देशभरातील प्रतीक्षा यादीनुसार घेतला. त्यासाठी सलग सहा तासांपेक्षा जास्त काळ शोधकार्य सुरू होते. यामध्ये वरील रक्तगटाचे हृदय केवळ चेन्नईच्या एका रुग्णाला हवे होते. मुंबईच्या एका रुग्णाला यकृत व एकाला किडनी हवी होती. त्यानुसार नियोजन केले. 'डीएमइआर', 'मुंबई झेडटीसीसी'सह राज्यस्तरीय व स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलली. त्याचवेळी तिन्ही रुग्णालयांनीही खूप सकारात्मक प्रतिसाद दिला. एमआयटी हॉस्पिटलने ब्रेन डेड पेशंट ओळखून अवयव दानासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना तयार केले, हे पाऊल सगळ्यात महत्वाचे ठरले. 'एमआयटी', 'सिग्मा'ला ७५ हजार : कॅडेव्हर ट्रान्सप्लान्टसाठी सर्वतोपरी पुढाकार घेऊन सगळी तयारी केल्याबद्दल 'मुंबई झेडटीसीसी'कडून 'सिग्मा' तसेच 'एमआयटी'ला नियमानुसार ७५ हजार रुपये शुल्क मिळेल. या काळामध्ये रुग्णालयाचा जो काही खर्च होतो, तो यातून भागावा, या उद्देशाने ही रक्कम नियमानुसार दिली जाते, असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
'झेडटीसीसी' कार्यरत नसल्याचा फटका : संपूर्ण मराठवाड्यासाठी औरंगाबादला चार-साडेचार वर्षापूर्वीच 'झेडटीसीसी' म्हणजेच अवयव प्रत्यारोपणाचे संपूर्ण नियमन, नियंत्रण व गरजू रुग्णांची अधिकृत प्रतीक्षा यादी तयार करण्याची जबाबदारी असलेली 'झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन कमिटी' मंजूर झाली आहे; परंतु अजूनही ही समिती कार्यरत झालेली नाही. त्यामुळे विविध अवयवांची गरज असलेल्या प्रतिक्षेतील रुग्णांची प्रतीक्षा यादी तयार नाही, अशी खंतही डॉ. कुलकर्णी यांनी बोलून दाखविली. रोजाबागच्या व्यक्तीला मिळाली किडनी : धूत हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलेली किडनी ही शहरातील रोजाबाग परिसरातील रहिवासी व ५८ वर्षीय श्री. पटेल यांच्यावर प्रत्यारोपित केली. पहाटे पावणे पाच ते साडेसातच्या दरम्यान त्यांच्यावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि शस्त्रक्रिया उत्तमरित्या झाल्याची माहिती धूत हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉ. हिमांशू गुप्ता यांनी 'मटा'ला दिली. पोस्टमार्टेमसाठी मृतदेह घाटीत : रामचे तिन्ही अवयव काढण्यात आल्यानंतर त्याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती देण्यात आली व त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) सकाळी दहाच्या सुमारास पाठविण्यात आला. दुपारी बारापर्यंत शवविच्छेदन झाले आणि त्यानंतर तासाभराने त्याचा मृतदेह देऊळगाव मही येथे नेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेलिकॉप्टरसाठी डीएमईआर ठेवणार प्रस्ताव

$
0
0



औरंगाबाद : 'राज्यात-राज्याबाहेर अवयव घेऊन जाण्यासाठी किंवा आणण्यासाठी हेलिकॉप्टर सर्व्हिस मानवतावादी दृष्टिकोनातून मिळावी आणि त्यासाठी हेलिकॉप्टर चालकांना सरकार पातळीवरून विनंती करण्यात यावी, त्यांच्याशी संवाद साधला जावा, अशा प्रकारचा प्रस्ताव 'डीएमईआर'कडून वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांपुढे लवकरच ठेवला जाणार आहे,' असे वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.
विमानाअभावी हृदयाचे चेन्नईमध्ये प्रत्यारोपण होऊ शकले नाही, ही बाब जरा उशिराच काळाली. जर लवकर कळाली असती, तर हेलिकॉप्टर सेवा मिळविण्याच्या दृष्टीने काही हालचाल करता आली असती. मात्र, यापुढे कुठलाही अवयव वाया जाऊ न देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी राज्यामध्ये हेलिकॉप्टर सर्व्हिस मानवतावादी दृष्टिकोनातून उपलब्ध व्हावी आणि वेळ-प्रसंगी कुठलाही अवयव तात्काळ कुठेही नेता किंवा आणता यावा, या हेतुने हेलिकॉप्टर चालकांना विनंती करता येऊ शकते का, त्यांना एकत्रित आणून तशा प्रकारचा संवाद साधता येऊ शकतो का, या दृष्टीने डीएमइआर नक्कीच प्रयत्न करणार आहे. अर्थात, अशा प्रकारचा प्रयत्न शासकीय पातळीवरून होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी डीएमईआर वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना नक्कीच प्रस्ताव सादर करणार आहे. असे जर होऊ शकले तर त्याचा 'कॅडेव्हर ट्रान्सप्लान्ट'साठी मोठा उपयोग होऊ शकेल, असेही डॉ. शिनगारे म्हणाले. अर्थात, त्यासाठी केंद्राच्या वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागू शकतात आणि अनेक नियम-अटी-शर्थी पाळाव्या लागतात. मात्र, केंद्राच्या पुढाकारातून ही सुविधा मिळू शकेल, अशी आशाही त्यांनी बोलून दाखविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एमआयएम पदाधिकाऱ्यांचा धुडगूस

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
न्यायालयाच्या आदेशानंतरही वक्फ बोर्डाची जागा ताब्यात दिली जात नाही, या ठिकाणचे अतिक्रमण काढले जात नाही म्हणत एमआयएमचे पदाधिकारी, कार्यकर्ते शुक्रवारी आक्रमक झाले. आमदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत त्यांनी क्रांतिचौकात धुडगूस घातला. या जागेवर लावलेला बोर्ड, जाळ्या उखडून फेकल्या. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
क्रांतिचौकात वक्फ बोर्डाची जागा आहे. या जागेवर हरप्रीतसिंग नि-ह यांनी अतिक्रमण केले आहे. त्यांनी बोर्ड, जाळ्या लावल्या आहेत. विशेषतः न्यायालयाने ही जागा वक्फ बोर्डाला द्यावी, असे आदेश दिले आहेत. असा एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी दावा केला आहे. आमदार इम्तियाज जलील यांच्या गाडीसह त्यांच्या कार्यकर्त्यांची एक गाडी दुपारी चारच्या सुमारास क्रांतिचौक उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या खुल्या जागे जवळ आली. काही मिनिटांत या कार्यकर्त्यांनी सिल्कमिल सेंटरच्या बाजूला असलेल्या जागेवर लावण्यात आलेल्या जाळ्या हटविण्यास सुरुवात केली. अनेकांनी या लोखंडी जाळ्या लाथा मारून तोडल्या. दहा मिनिटांत कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता. ही घटना घडल्यानंतर क्रांतिचौक पोलिस दाखल झाले. पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी आमदार इम्तियाज जलील यांच्यासोबत चर्चा केली. तसेच अतिक्रमण हटविण्यासाठी कायदा हातात घेतल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. यावेळी एमआयएमचे नगरसेवक, वक्फ कार्यालयाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेख अजीज आणि वक्फ अधिकारी सय्यद फैज यांची उपस्थिती होती. घटनेनंतर वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जागेवर पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी चौकशी करून पुढील कारवाई करू, अशी माहिती क्रांतिचौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी दिली.

थेट कायदा हातात
एमआयएमच्या दाव्यानुसार ही जागा वक्फ बोर्डाची असली आणि त्यावर अतिक्रमण झाले असले तरी, शुक्रवारी आमदार इम्तियाज जलील, नगरसेवक यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी घातलेला धुडगूस कितपत योग्य होता, असा सवाल आता केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात नाहक तणाव निर्माण झाला होता. हे अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांचीही मदत घेता आली असती. मात्र, आमदारांना हे कसे सुचले नाही. कुठल्याही गोष्टीसाठी थेट कायदा हातात घेणे कितपत योग्य, अशा प्रतिक्रिया उपस्थितांमधून व्यक्त होत होत्या.

अतिक्रमण काढू : इम्तियाज जलील
'मागील अनेक वर्षांपासून वक्फ बोर्डाच्या जागेवर अतिक्रमण केले जात आहे. खोटे कागदपत्रे तयार करून जागा नावावर करण्यात आली आहे. वक्फ बोर्डाचे अधिकारी, कर्मचारी याबाबत काहीच करू शकत नाहीत. त्यांना काही कारवाई करण्याची इच्छाही नाही. यामुळे बेकायदेशीर जागा बळकावल्याप्रकरणी आम्ही आक्रमक होत आज कारवाई केली. जिथे-जिथे वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न केला जाईल, तिथे वक्फ प्रशासन, महसूलने कारवाई केली नाही तर आम्ही आक्रमक होत विरोध करू. आम्ही कायदा हातात घेतलेला नाही. उलट न्यायलयाने दिलेल्या आदेश लागू करण्यास बोर्डाची मदत केली आहे. वेळेप्रसंगी वक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आम्ही मागे पुढे पाहणार नाही,' अशी प्रतिक्रिया आमदार इम्तियाज जलील यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हेंटिलेटरअभावी बालकाचा मृत्यू

$
0
0



औरंगाबाद : दोन महिन्यांच्या अत्यवस्थ बच्चूचा व्हेंटिलेटरअभावी घाटीत मृत्यू झाल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. बहादूरपुरा परिसरातील स्वाती व बाळू राजाळे यांच्या दोन महिन्यांच्या बाळाला श्वास घेण्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्याला गुरुवारी (१४ जानेवारी) रात्री नऊच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) वॉर्ड क्रमांक २५ मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, बाळाची प्रकृती गंभीर असताना आणि व्हेंटिलेटरची गरज असताना बाळाला व्हेंटिलेटर मिळाले नाही. वॉर्डामध्ये केवळ तीन व्हेंटिलेटर असून त्यावेळी तिन्ही व्हेंटिलेटर इतर बालरुग्णांना लावण्यात आले होते. त्यामुळे या बाळाला व्हेंटिलेटर मिळालेच नाही. डॉक्टरांनी प्रयत्न केले; पण व्हेंटिलेटरची गरज असताना ते त्याला मिळाले नाही आणि त्यामुळे दोन महिन्यांच्या बालकाचा मध्यरात्री एकच्या सुमारास मृत्यू झाल्याचा आरोप भाकपचे जिल्हा सहसचिव अभय टाकसाळ यांनी 'मटा'शी बोलताना केला. तर, संबंधित बाळाला सेप्टिसेमिया हा गंभीर आजार होता आणि त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. तिन्ही व्हेंटिलेटर दुसऱ्या बालरुग्णांना लावण्यात आले होते. त्यामुळे या बाळाला लावता आले नाही; तरीही त्याला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिघांमध्ये अवतरला ‘राम’!

$
0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com
'ब्रेन डेड' झालेला २४ वर्षांचा राम पुन्हा एकदा जीवित झाला, गरजू, अनोळखी रुग्णांवर प्रत्यारोपित झालेल्या त्याच्या यकृत व दोन मूत्रपिंडांच्या माध्यमातून. अवघे शहर साखर झोपेत असतानाच रामची एक किडनी व लिव्हर विमानातून मुंबईत पोहोचवून तातडीने त्यांचे दोन गरजूंवर प्रत्यारोपण झाले. एका किडनीचे शहरातील सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये प्रतिक्षेत असलेल्या एका रुग्णावर प्रत्यारोपण झाले. त्यासाठी युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये गुरुवारी (१४ जानेवारी) मध्यरात्री विविध अवयव काढण्याची शस्त्रक्रिया होऊन, शुक्रवारी पहाटे साडेपाचला अॅब्युलन्सद्वारे चिकलठाणा विमानतळ गाठण्यात आले व तेथून विमानातून मुंबई आणि मुंबईतून पुन्हा 'ग्रीन कॉरिडॉर'द्वारे ग्लोबल हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल गाठण्यात आले.

देऊळगाव मही (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील 'ब्रेन डेड' झालेल्या राम सुधाकर मगर या तरुणाच्या अवयव दानाचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. दोन स्वतंत्र एअर अॅब्युलन्स उपलब्ध न झाल्याने त्याच्या हृदयाचे प्रत्यारोपण शक्य झाले नाही.

शुक्रवारी पहाटे साडेपाचला जेट एअरवेजने मुंबईला यकृत व एक मूत्रपिंड पाठविण्याचा निर्णय झाला. त्याशिवाय एका मूत्रपिंडाचे धूत हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात येणार होते. त्याअनुषंगाने गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अवयव काढण्याची शस्त्रक्रिया सुरू झाली. साडेचारच्या सुमारास अत्याधुनिक रुग्णवाहिका 'सिग्मा'च्या पोर्चमध्ये दाखल झाली आणि त्याबरोबरच पोलिसांचे पथक व वाहन सज्ज झाले, आसपासच्या रुग्णांचे नातेवाईक गाढ निद्रेत होते. बरोबर ४ वाजून ४० वाजता हॉस्पिटलच्या कॉरिडॉरचे सर्व दिवे लावण्यात आले. पावणेपाचच्या सुमारास अवयव काढण्यात आल्याचे संकेत हॉस्पिटलचे डॉ. आनंद देवधर यांनी सीईओ डॉ. अजय रोटे यांना दिले. 'सिग्मा'चे डॉ. उन्मेष टाकळकर, 'धूत'चे डॉ. हिमांशू गुप्ता यांच्यासह विविध डॉक्टरांची लगबग वेगात सुरू झाली आणि पाचच्या ठोक्याला अवयव नेण्याच्या मोठ्या बॉक्ससह तंत्रज्ञ बाहेर पडले. ही होती रामची किडनी लिफ्टमधून थेट रुग्णवाहिकेमध्ये आणि रुग्णवाहिकेतून धूत हॉस्पिटलच्या 'ओटी'मध्ये पोहोचली. त्यानंतर ३० मिनिटांनी, म्हणजेच साडेपाचला दोन मोठे बॉक्स आणि मुंबई-चेन्नईहून आलेली डॉक्टरांची टीम हे रुग्णवाहिकेतून थेट विमानतळाकडे निघाले. लगोलग पुढे पोलिसांची जीप व रुग्णवाहिकेचा सायरन वाजत ताफा निघाला. सर्व पूर्तता पूर्ण करीत 'जेट एअरवेज'च्या विमानात अवयव घेऊन जाणारे बॉक्स ठेवण्यात आले.

तिघांवर प्रत्यारोपण
मुंबई येथील ग्लोबल हॉस्प‌िटल येथे यकृताचे, जसलोकमध्ये किडनीचे तर औरंगाबादेतील धूत हॉस्प‌िटलमध्ये एका किडनीचे रुग्णांवर यशस्वीरित्या प्रत्यारोपण करण्यात आले.

मटा भूमिका ः झेटडीसीसी स्थापन करा
अपघाती मृत्यू धक्कादायकच, पण त्यातून सावरून ब्रेन डेड रुग्णाचे अवयव गरजू रुग्णांना देण्याची इच्छा बाळगण्यास धैर्य लागते. देउळगाव मही येथील राम सुधाकर मगर या तरुणाच्या कुटुंबीयांनी ते दाखविले. त्याच्या दोन किडनी आणि लिव्हर दान करून तीन रुग्णांना जीवदान देण्यात आले, मात्र त्याच्या रक्तगटाचे हृदय कोणालाही देता आले नाही. ब्रेन डेड रुग्णाच्या अवयवांचे प्रत्यारोपण करण्याची कायदेशीर प्रक्रिया 'झोनल ट्रान्स्प्लान्ट को-ऑर्डिनेशन कमिटी' म्हणजे झेडटीसीसीमार्फत पूर्ण केली जाते. ही कमिटीच औरंगाबादेत अस्तित्वात नाही. 'मटा'ने वारंवार या कमिटीच्या स्थापनेत सरकार व आरोग्य खात्याकडून होत असलेल्या दिरंगाईवर प्रकाशझोत टाकला. कालच्या घटनेत मुंबईच्या झेडटीसीसीने समन्वय साधला म्हणून मुंबईतील दोन रुग्णांना जीवदान मिळाले. औरंगाबादेत ही कमिटी असती, तर मराठवाड्यातील रुग्णांनाही लाभ झाला असता. राम मगरचे हृदयदेखील एखाद्या रुग्णाला देता आले असते. एकट्या औरंगाबाद शहरात रस्ते अपघातात गेल्यावर्षी १५३ तर, २०१४मध्ये १६४ जणांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यातील अपघाती मृत्यूचे प्रमाण २४२ एवढे होते. झेडटीसीसी असती तर यापैकी 'ब्रेन डेड' अपघातग्रस्तांचे अवयव वेळीच गरजू रुग्णांना देऊन त्यांना जीवदान देता आले असते. औरंगाबाद वगळता सर्व विभागीय मुख्यालयांमध्ये झेडटीसीसी कार्यरत आहे. औरंगाबादसाठी ती चार वर्षांपूर्वीच मंजूर झाली, पण कोणीही याबद्दल गंभीर नसल्यामुळे आजतागायत कमिटी स्थापन होऊ शकलेली नाही. आरोग्य विभागाने आता तरी या कमिटीचे महत्त्व ओळखून ती कार्यांन्वित करावी आणि मराठवाड्यातील रुग्णांना जीवदान देण्याची संवेदनशीलता दाखवावी.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजकल्याणला बट्टा; ५ कोटी पडून

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
वंचित घटकांना लाभ देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या उपकरातून समाजकल्याण विभागाला विशेष निधी देण्यात येतो, पण त्यातही गैरप्रकार करण्याचा पराक्रम दोन वर्षांपूर्वी झाला. त्यामुळे प्रशासनाने योजना राबविताना विशेष काळजी घेतली. परिणामी तीन वर्षांचा तब्बल पाच कोटी ११ लाखांचा निधी अखर्चित राहिला आहे.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण खात्यामार्फत उपकरातून २० योजना राबविल्या जातात. मागासवर्गीय आणि अपंगांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजनांचा यात समावेश आहे. त्यात मागासवर्गीयांना इलेक्ट्रिक मोटार, स्प्रेपंप, ऑईल इंजिन, केरोसिन पंप, पीव्हीसी पाईप, लोखंडी स्टील, ताडपत्री, संगणक, मिरची कांडप यंत्र, पाण्याचे फिल्टर, मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन, मोफत ग्रंथालय, कचराकुंडी, कडबा कुट्टी, झेरॉक्स मशीन, स्प्रिंकलर, पिको फॉल मशीन, अपंगांना सायकल, अपंगांना झेरॉक्स मशीन पुरविणे आदी योजना राबविल्या जातात. या योजना राबविताना गरजूंना मदत होणे अपेक्षित आहे, पण बहुतांश जिल्हा परिषद सदस्य आपापल्या भागातील निवडक लाभार्थ्यांना याचा लाभ देतात. अनेक योजनांमध्ये बोगस लाभार्थी निवडले जातात आणि प्रत्यक्षात लाभ दुसऱ्याला मिळतो. गेल्या वर्षी काही काळ प्रभारी म्हणून जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकाऱ्याचा कारभार सांभाळणाऱ्या डॉ. सचिन मडावी यांना ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी सर्वसाधारण सभेत समाजकल्याण विभागासाठी असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनेत कसा गैरप्रकार चालतो हे सर्वांसमोर सांगून खळबळ उडवून दिली. मुळात अनेक योजनांचा लाभ घेताना अर्जासोबत जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. काही योजनांमधून अर्ज करताना जात प्रमाणपत्राच्या नावावर कागद लावून झेरॉक्स केल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. एकेका तालुक्यातून अशी किमान २० प्रकरणे आहेत. विविध योजनांसाठी जी यादी तयार केली तिचे क्रॉस चेकिंग करण्याची सूचना अतिरिक्त सीइओ सुरेश बेदमुथा यांनी केली होती. त्यावरून अनेक सदस्यांचे पापड मोडले. बोगस नावे उघडी पडण्याची भीती या गैरप्रकारातील वाटेकऱ्यांना होती. त्यामुळे हा वाद फार लांबला नाही. नव्याने याद्या करण्याची सूचना तालुका पातळीवर दिली गेली. दोन वर्षांपूर्वी वैयक्तिक लाभाच्या योजनेत सौर कंदिल देण्यावरून रणकंदन माजले होते. सुमार दर्जाचे सौर कंदिल खरेदी केल्याची तक्रार मनसे सदस्यांनी केली होती. त्याची चौकशीही झाली, पण पुढे काही निष्पन्न झाले नाही. असाच प्रकार यंदा होऊ नये यासाठी खबरदारी घेतली गेली. त्यामुळे २०१३ पासून या योजनेसाठी मंजूर निधी खर्चच केला गेला नाही.

परस्पर लाभ लाटण्याचा फटका
वर्ष २०१३ -१४, २०१४ -१५ आणि २०१५ -१६ साठी उपकरातून केलेल्या तरतुदीचे तब्बल पाच कोटी ११ लाख रुपये शिल्लक राहिले आहेत. त्याचे नियोजन करण्याची लगीनघाई आता सुरू झाली आहे. काही योजनांच्या ई-निविदा प्रसिद्ध झाल्या असून, उर्वरित प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे. परस्पर लाभ लाटण्याच्या वृत्तीचा गेल्या तीन वर्षांपासून खऱ्या लाभार्थ्यांना मोठा फटका बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीळाइतकी माया; गुळाइतकी गोडी!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'तीळ-गूळ घ्या गोड-गोड बोला' म्हणत, गुरुवारी मकरसंक्रातीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. अंगणातल्या सुंदर रांगोळ्या, पुरणपोळी, तीळगुळाच्या पोळीचा सुगंध घरोघरी दरवळत होता.शहरात संक्रात मोठ्या उत्साहात साजरी झाली.
वाण लुटण्याकरता सकाळी अकरा, दुपारी तीन, सायंकाळी सात असे वेगवेगळे मुहूर्त होते. या संभ्रमात अचूक मुहूर्त हातचा जाऊ नये म्हणून महिलांनी पहाटेच पूजा आटोपली व पहिले वाण देवाला अर्पण केले. त्यामुळे पहाटेपासूनच मंदिरातली वर्दळ सुरू होती. मातीच्या सुगड्यातले वाण देवाला दिल्यानंतर लगेच सुगड्याचे वाण महिला एकमेकांना देतात. मानाच्या वाणाची देवाणघेवाण मंदिरातच सुरू होते. बोर, ऊस, गाजर, पेरू, गव्हाच्या ओंब्या या सुगड्याच्या वाणात टाकलेली असतात.शहरीकरणात पूजेच्या पद्धतीत खूप बदल झाले आहेत. पाच सवाष्ण नाही मिळाल्यास अंगणातल्या तुळशीलाच सवाष्ण म्हणून वाण देण्याची पद्धत आहे. त्यामुळे सोसायटी, अर्पाटमेंटमध्ये महिलांनी तुळशीलाच सवाष्ण केले. पहिली पाच वर्ष नवविवाहितांना सुगड्यांचे वाण देता येत नाही. त्यामुळे नवविवाहितांनीही जिरे, मिरे, धणे, कापूस, तूप, हलवा, हळदी-कुंकू असे वाण तुळशीला दिले. प्रत्येकांनी आपापल्या पद्धतीने पूजा केल्या. काही ठिकाणी केळीच्या पानावर त्रिकोण काढून, पाटावर सूर्यनारायण काढून पूजा करण्यात आली. इथे सुगडीचे वाण लुटण्याऐवजी लाडू व मानाचे पाच वाण देण्यात आले. काही समाजातातल्या महिलांनी एकमेकींच्या घरी जाऊन वाण दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फूडकॉर्नर : आगळावेगळा ब्रेकफास्ट

$
0
0

Shripad.Kulkarni@timesgroup.com
इडली, वडा-सांबर, दोसा, पोहे, उपमा, सँडविच अादींची ओळख ब्रेकफास्टचे पदार्थ म्हणून आहे, पण वडा राइस, समोसा राइस, पालक राइस आणि झणझणीत रस्सा या आगळ्या वेगळ्या ब्रेकफास्टमुळे सिडकोतील त्रिमूर्ती अप्पा नाश्ता सेंटरची ओळख आहे. घोडे बंधुंनी गेल्या पंधरा वर्षांपासून या आगळ्या पदार्थांची चव जपली आहे. त्यामुळे सिडको परिसरासह औरंगाबाद शहरातील खवय्यांची तेथे कायम गर्दी असते.

सिडकोत हायकोर्टाशेजारी असलेले त्रिमूर्ती अप्पा नाश्ता सेंटर हे खवय्यांचे आवडते ठिकाण. सुमारे १५ वर्षांपूर्वी दादासाहेब घोडे यांनी सिडकोत या नाश्ता सेंटरची सुरुवात केली. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. आता अादिनाथ घोडे आणि अप्पासाहेब घोडे हे सेंटर चालवितात. घरी बनविलेल्या गरम मसाल्याचा झणझणीत रस्सा ही तेथील पदार्थांची खास ओळख. समोसा रस्सा, समोसा राइस, वडा राइस, पालक राइस मिक्स पालक राइस, वडा रस्सा हे पदार्थ खवय्यांच्या पसंतीला उतरले आहेत.

गरम मसाल्याचे पदार्थ आणि आलं, लसूण आदींपासून रोज मसाला तयार केला जातो. या मसाल्यात गोट्याची गोडंबी वापरली जाते. मसाल्यातील सर्व पदार्थांचे प्रमाण ठरलेले आहे. त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास होत नाही. भातही विशिष्ट पद्धतीने तयार केला जातो. भातात गाजर, बीट, कोबी, सिमला मिरची आदी भाज्या टाकल्या जातात. बीटचा रंग भाताला येतो. त्यामुळे भातात कोणतेही रंग टाकले जात नाहीत. भात मोकळा शिजविला जातो. भातामध्ये भाज्यांची चव उतरते. पालक राइसही वैशिष्ट्यपूर्ण आहे. रस्स्याबरोबर हा राइस खाताना रस्स्यातील मसाला आणि पालकाची चव जाणवते. मसाल्याची वैशिष्ट्यपूर्ण चव दीर्घ काळासाठी जिभेवर रेंगाळते.

पहाटे चारपासून घरी मसाला तयार करण्यास सुरुवात केली जाते. ग्राइंडरमधून बारीक केलेला मसाला रस्स्यात एकजीव होतो. रस्सा झणझणीत असला तरी जळजळ, अॅसिडिटी हे त्रास होत नाहीत. त्यामुळे हे पदार्थ खवय्यांच्या पसंतीस उतरले आहेत. शहरातील डॉक्टर, विद्यार्थी, वकील यांचे अनेक ग्रुप नियमितपणे येथे येतात. काहीजण अलूवडा, समोसा आणि रस्सा असे थ्री मिक्सही आवडीने खातात, असे अादिनाथ घोडे यांनी सांगितले.

दिवसभर खवय्यांची गर्दी असते. अनेकजण हे पदार्थ घरी नेतात. वाढदिवस किंवा छोट्या घरगुती कार्यक्रमांसाठीही हे पदार्थ नेले जातात. सकाळी पोहेही तयार केले जातात. अनेक जण पोह्यावर रस्सा टाकून खातात. कोणत्याही पदार्थासाठी ग्राहकाला हवा तेवढा रस्सा दिला जातो, असे त्यांनी सांगितले.

मोठ्या भावाने जालना रोडवर नाश्ता सेंटर सुरू केले त्यावेळी सकाळी कामासाठी घराबाहेर पडणारे कामगार, कॉलेजांत जाणारे विद्यार्थी यांना डोळ्यासमोर ठेवले होते. सकाळी त्यांना हलक्या स्वरुपाचा, पण चविष्ट ब्रेकफास्ट आवश्यक असतो. मसालेदार पदार्थ खाल्ल्याचाही त्यांना त्रास होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक होते. त्यामुळे घरी तयार केलेला ताजा मसाला वापरण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसापासून हा मसाला वापरला जात आहे. मसाला तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांचे प्रमाण ठरलेले आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून रस्स्याची चव बदललेली नाही. अनेक खवय्यांच्या जिभेवर या रस्स्याची चव राज्य करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नादमय विश्वाची अनुभूती !

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नादमय विश्व निर्मिती करणारे 'तालवाद्य कचेरी' व पदन्यासातून मन मोहित करणारा भावोत्कट आविष्कार. महागामी संस्था आयोजित शारंगदेव महोत्सवाचा पहिला दिवस या कला प्रकारांनी संस्मरणीय ठरला. विशेषतः कर्नाटकी संगीताचे व्यापक दर्शन घडवणाऱ्या वादनाने रसिकांना खिळवून ठेवले.
महागामी संस्थेचा तीन दिवसीय शारंगदेव महोत्सव शुक्रवारी दिमाखात सुरू झाला. एमजीएम कॅम्पसमधील रूक्मिणी सभागृहात कर्नाटकी संगीतातील प्रसिद्ध कलावंत सतीश कृष्णमूर्ती व सहकाऱ्यांच्या सादरीकरणाने पहिल्या सत्राची सुरुवात झाली. दक्षिण भारतीय धाटणीचा हा कलाविष्कार विशेष ठरला. मृदंग, घटम, धाविल, व्हायोलिन व खंजिरी या वाद्यातून कलावंतांनी नादमय विश्व उभे केले. गणेश वंदनेने ही 'तालवाद्य कचेरी' रंगली. श्लोक पठण व वादन अशा संगमातून सभागृह भारावून गेले. कृष्णमूर्ती यांना हरिहरन सुब्रमण्यम, आदिती देवराजन व मीनाक्षी सुंदरम् यांनी साथसंगत केली. दुसऱ्या सत्रात कोलकाता येथील मालविका मित्रा यांच्या शिष्यांनी कथक नृत्य सादर केले. 'अर्धनारेश्वर स्तुती'ने या भावोत्कट आविष्काराची सुरुवात झाली. नृत्यातून अवघी कथा उलगडून दाखवणारे नृत्य रसिकांना विशेष भावले. त्यानंतर 'ताल धमाल' व द्रुत तीन तालातील तुकडे, परण, परमेलू नृत्य प्रकार सादर करण्यात आले. सौरभ राय व तपश्नी पाल मुजूमदार यांनी नृत्य सादर केले. या कलावंतांना पं. दीनानाथ मिश्रा, आनंद गुप्ता व संदीप मिश्रा यांनी संगीत साथसंगत केली. सर्व कलावंतांचा 'एमजीएम'चे सचिव अंकुशराव कदम यांनी सत्कार केला. यावेळी 'महागामी'च्या संचालिका पार्वती दत्ता उपस्थित होत्या. महोत्सवाला रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती.
महोत्सव रसिकांच्या घरी
मागील अनेक वर्षांपासून शारंगदेव महोत्सव सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी राजस्थानातील लोककलावंत लुणा खान मांगनियार यांनी सादरीकरण केले होते. या गाण्यांची ऑडियो सीडी महागामीने प्रकाशित केली. दिल्ली येथील कला अभ्यासक व लेखिका मंजिरी सिन्हा यांनी या सीडीचे प्रकाशन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्वार्टर्सअभावी जगणे असुरक्षित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

गेल्या २० वर्षांपासून सेवेत कार्यरत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी यांच्याशिवाय अधिकारी यांना राहण्यासाठी क्वार्टर्स उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या कर्मचारी व अधिकाऱ्यांना तुळजापूर किंवा उस्मानाबाद येथून दररोज ये-जा करावी लागते. याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होऊ लागला आहे. पोलिस विभाग मात्र, जिल्ह्यातील पो‌लिसांना व अधिकाऱ्यांना क्वार्टर्स किंवा पोलिस वसाहत उपलब्ध करून देण्याकामी हतबल ठरत असल्याचेच चित्र अहे. परिणामी पोलिस कर्मचाऱ्यांना एकाच खोलीत राहावे लागत आहे.

वाढाता कामाचा ताण आणि मुक्कामाची किंवा राहण्याची सोय नसल्याने होणारी प्रवासाची दगदग यामुळे पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्या कामावर परिणाम होत आहे. गेल्या २० वर्षांपासून तामलवाडी येथील पोलिस वसाहतीचा प्रश्न रखडलेला आहे. तामलवाडी हे उस्मानाबाद- सोलापूर जिल्ह्याचा सीमेवरील शेवटचे तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्याला जोडणाऱ्या मार्गाचे प्रवेशद्वार आहे.

तामलवाडीसह परिसरातील १७ गावांची कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी या पोलिस ठाण्यावर आहे. त्याचबरोबर सोलापूर-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग येथूनच जातो. तुळजापूरकडे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांची वर्दळ येथूनच सर्वाधिक असते. तामलवाडी येथे औद्योगिक वसाहतही आहे. त्यामुळे येथे काम करणाऱ्या पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना सदैव सतर्क राहावे लागते.

तामलवाडी पोलिस ठाण्याची सुरूवात करुन २० वर्षांचा कालावधी लोटला. येथे सध्या दोन पोलिस अधिकारी, सहा महिला पोलिस कर्मचारी व उर्वरित पोलिस कर्मचारी असा ४१ जणांचा स्टाफ आहे. मात्र, अधिकार व कर्मचारी यांना राहण्यासाठी अद्यापही येथे पोलिस वसाहत राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

तामलवाडी येथील काही पोलिस कर्मचारी येथील एका खोलीतच दाटीवाटीने राहतात. महिला पोलिस कर्मचाऱ्यांसाठी येथे कुठलीही विशेष सुविधा नसल्याने त्या तुळजापूर किंवा उस्मानाबाद येथून ये-जा करतात. तर येथील दोन पोलिस अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्राम कक्ष वापरात आणले आहे.

तामलवाडी येथे औद्योगिक वसाहत उभारण्यात आल्यामुळे शिवाय येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी करणाचे काम चालू असल्यामुळे येथील काही खोल्या या सर्व मंडळींनी अगोदरच व्यापल्या आहेत. त्यामुळे तामलवाडी येथे पोलिसांना किरायाने रूम मिळणेही अवघड झाले आहे. परिणामी येथे पोलिसांच्या मुक्कांमांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील तामलवाडी हे प्रमुख गाव असल्याने येथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सदैव सतर्क राहावे लागते. त्यासाठी त्यांना तामलवाडी येथेच मुक्काम ठोकावा लागतो. परिणामी सध्या ही पोलिस दलातील मंडळे दाटीवाटीतच जीवन जगत आहेत. येथे त्यांच्या सुरक्षिततेची असलीही खात्री नाही.

दोन एकर जमीन द्यावी

तामलवाडी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची दोन एकर जमीन आहे. लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने ही जमीन पोलिस दलाला सुपूर्द करून तेथे पोलिस वसाहत उभा करून पोलिस कर्मचाऱ्यांचे जगणे सुसह्य करावे, एवढीच येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडल अधिकाऱ्यांवर भूखंड हडपल्याचा आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

कळंब येथील शासकीय गायरान जमिनीतील १९२५ चौरस फुटाचे दोन भूखंड कळंब येथील मंडल अधिकारी नितीन मंडाळे यांनी अधिकाराचा गैरवापर करीत बेकायदेशीररित्या हडप केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या प्रकरणाची चौकशी करून संबंधिताविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोहा (ता. कळंब) येथील सुधाकर झोरी यांनी महसूल मंत्री यांच्याकडे केली आहे.

कळंब शहराला लागून असलेल्या तहसील कार्यालयालगत ही शासकीय गायरान जमीन असून, येथील दोन भुखंड नितीन मंडाळे यांनी हडप केल्याची झोरी यांची तक्रार आहे. सध्या या परिसरात भुखंडाचा दर हा ७०० ते ८०० रुपये चौरस फुट असा आहे. कळंब येथील भूमापन क्रमांक १११/१ मध्ये शासकीय मालकीचे ४६.२१ हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यापैकी १ हेक्टर २० आर इतके क्षेत्र शासनाने श्रीदत्त शासकीय कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्था यांना दिले.

यागृह निर्माण संस्थेतील १९२५ चौरस फुटाचा एक भूखंड नितिन मंडाळे यांनी जून २००१ मध्ये खरेदी केला. आणखीन एक भूखंड नितिन मंडाळे यांनी पत्नी जयश्री मंडाळे यांच्या नावे १० नोव्हेंबर खरेदी केला. २०१० मध्ये कळंब सज्जाच्या तलाठी पदाचा अतिरिक्त कार्यभार नितिन मंडाळे यांच्याकडे व पत्नीच्या नावे नोंद घेतली. हीच नोंद बेकायदेशीर व अधिकाराचा गैरवापर करीत केला असल्याची सुधाकर झोरी यांची तक्रार आहे. मात्र, ही नोंद घेत असताना त्यांनी गृहनिर्माण सोसायटीमधून हे दोन भुखंड वगळणे गरजेचे असताना तसे केलेले नाही. गृहनिर्माण सोयायटीची १ हेक्टर २० आर ही जागा कायमच ठेवली.

एवढेच नव्हे तर या दोन पैकी एका भूखंडावर मंडाळे यांनी एका फायनान्स कंपनीकडून दहा लाखाचे कर्ज उचलले असून तशी नोंदही सात-बारावर घेतली आहे. शासकीय जमिनीवर कसल्याही प्रकारचा बोजा चढविता येत नसताना मंडल अधिकारी यांनी हे कृत्य केल्याचा झोरी यांचा आरोप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालक, वाहकामुळे विद्यार्थ्यांचे हाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

एस. टी. महामंडळाच्या एका वाहकाने सुरक्षित वाहतूक पंधरवड्यात शाळकरी विद्यार्थ्यांना बोरगाव येथे न उतरवता बस पुढे दामटली. यामुळे विद्यार्थ्यांना कन्नड बस स्थानकात गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत ताटकळावे लागले. याप्रकरणी चालक व वाहकावर कारवाई करावी, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांनी केली आहे.

शहादा आगाराची औरंगाबादहून शहादा येथे जाणारी बस (एम एच २०, बी एल १९५६) सायंकाळी पाचच्या सुमाराला वेरूळ येथे आली. तेथील गुरुदेव समंतभद्र विद्यामंदिर येथे शिकणारे ११ ते १७ वर्ष वयोगटातील सुमारे ३० ते ३५ विद्यार्थी बसमध्ये चढले. हे विद्यार्थी गल्ले बोरगाव येथे उतरणार होते. मात्र एवढ्या संख्येने विद्यार्थी बसल्याचा राग वाहक व चालकाला आला. मात्र वाहक संपत्ती महादेव थोरात यांनी घंटी वाजवूनही चालक भूषण विठ्ठल चौधरी यांनी गल्ले बोरगाव येथे बस थांबवली नाही.

त्यांनी ही बस गावापासून सुमारे दोन किलोमीटर पुढे नेऊन थांबवली, पण विद्यार्थ्यांनी एवढ्या पुढे बस आल्याने तेथे उतरण्यास नकार दिला. या विद्यार्थ्यांना परत गल्ले बोरगावमध्ये नेऊन सोडण्याऐवजी वाहकाने बस पुढे कन्नडकडे नेली. दरम्यान, ही माहिती समजल्यानंतर काही पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी बसचा पाठलाग करून ती मक्रणपूर जवळ थांबवली. तेव्हा चालक भूषण विठ्ठल चौधरी यांनी पालकांसोबत हुज्जत घालून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या गडबडीत विद्यार्थी व प्रवासी सुमारे दोन ते तीन तास बसस्थानकात ताटकळले. याबाबत पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग व अंतापूर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुदाम बोडखे, सुभाष बोरसे, सुनील बोडखे यांनी पालक व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या विद्यार्थ्यांना रात्री नऊ वाजता दुसऱ्या बसमधून त्यांचा गावापर्यंत सोडण्याची सोय करण्यात आली. या बसमध्ये बोरगाव, केसापूर, अंतापूर, टाकळी, टापरगाव येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता. दरम्यान, पालक व विद्यार्थ्यांनी या बसचा चालक व वाहकावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डांबराचे बनावट चलन; कंत्राटदारावर गुन्हा दाखल

$
0
0

सिल्लोड: अजिंठा-बुलडाणा राज्य मार्गावर तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या कामासाठी वापरलेल्या डांबराच्या बनावट पावत्या प्रकरणी अजिंठा येथील रेणुका कन्सट्रक्शन कंपनीविरुद्ध अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मधुसुदन कांडलीकर यांनी याची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार रेणुका कन्सट्रक्शन कंपनीला सार्वजनिक बांधकाम विभागाने बुलडाणा-मादणी रस्त्याचे १२ किलोमीटर कामाचे आदेश दिले होते. या कामाचा कार्यादेश ३१ मार्च २०११ रोजी देण्यात आला. राज्यमार्ग क्रमांक २४च्या रुंदीकरण व मजबुतीकरणाच्या कामासाठी ८९.०२ टन डांबर आणले होते. हे डांबर विभागीय प्रयोगशाळेकडे पाठविले असता ते योग्य असल्याने वापरले. दरम्यान वापरण्यात आलेल्या डांबराचे चलन संबंधित कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दाखल केले. त्या विषयी सत्यता पडताळणीसाठी दक्षता व गुणनियंत्रण मंडळाने त्यांचे पत्र क्रमांक एलएक्यू ०७०४३५-१७६१ (४ एप्रिल २०१२) अन्वये पुणे येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या शाखेच्या मुख्य व्यवस्थापकाकडे पाठविण्यात आले. याप्रकरणी कंपनीने चलन क्रमांक ००४४९३९, ००४४९४९, ००४४९५४, ००२४१८४, ००२४२७७ व ००२४३४४ हे बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून रेणुका कन्स्ट्रक्शन कंपनीने शासनाची फसवणूक केली आहे. यावरून अजिंठा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिस्तूल दाखवून वैजापुरात वाटमारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

पिस्तुलाचा धाक दाखवून तीन दुचाकीस्वारांनी रोख रक्कम व मोबाइल, असा १८ हजार २०० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नागपूर-मुंबई महामार्गावरील भग्गाव शिवारात घडली.

तालुक्यातील नगिनापिंपळगाव येथील रहिवासी व शिवसेनेचे विभागप्रमुख रमेश पाटील सावंत हे दुचाकीवरून कोपरगाव येथून वैजापूरकडे येत होते. त्यावेळी भग्गाव शिवारात पाठीमागून विनापासिंग दुचाकीवर तिघे जण आले. त्यांनी दुचाकी आडवी लावून पिस्तुलचा धाक दाखवून सावंत यांना मारहाण केली. त्यांच्याकडील रोख ८ हजार २०० व साडे दहा हजार रुपये किंमतीचा मोबाइल हिसकावून कोपरगावच्या दिशेने पोबारा केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, फौजदार श्रीनिवास भिकाणे, संजय खिल्लारेे व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या प्रकाराचा पंचनामा करण्यात आला असून, पोलिसांनी कोपरगाव-शिर्डी परिसरात आरोपींचा शोध घेतला. स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक विभागाची पथकेही आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती नांदेडकर यांनी दिली. दरम्यान याप्रकरणी सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार खिल्लारे करीत आहेत.

महिला वाहकास शिवीगाळ

महिला वाहकास शिवीगाळ व मारहाण केल्याच्या आरोपावरून तालुक्यातील चोरवाघलगाव येथील विक्रम आप्पासाहेब मोईन याच्याविरुद्ध गुरुवारी गुन्हा नोंदवण्यात आला. वैजापूर बाजाठाण या बसमध्ये ही घटना घडली. मोईन याने वाहक सुनंदा तोगे यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद घातला व त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सरकारी कामात अडथळा आणला, अशी तक्रार आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विशाल पडळकर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images