Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘समांतर’ने खुराणांनाहलविले; खान हेड

$
0
0


औरंगाबादः
समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे बिझनेस हेड म्हणून काम करणारे सोनल खुराणा यांना कंपनीने मुंबईला हलविले आहे. त्यांना पदोन्नती देऊन अखिल भारतीय स्तरावर काम करण्यास सांगण्यात आल्याचे कंपनीतर्फे कळविण्यात आले आहे. कंपनीचे नवीन बिझनेस हेड म्हणून तारिक खान यांची नियुक्ती केली आहे. सिडको - हडकोतील विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याच्या अनुशंगाने आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारात सिडको एन ७ येथील जलकुंभाच्या परिसरात कंपनीचे अधिकारी व महापालिकेचे अधिकारी यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. कंपनीच्या दिल्ली येथील अधिकाऱ्यांनाही त्यांनी फोन करून कामात सुधारणा करण्याची तंबी दिली. स्थानिक अधिकारी व्यवस्थित काम करीत नाहीत, असे त्यांनी दिल्ली येथील अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. हे प्रकरण ताजे असतानाच आज खुराणा यांची बदली कंपनीने मुंबईला केली. त्यांच्याजागी तारिक खान यांना बिझनेस हेड म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. खान यांनी एअरटेल, आयडिया, रिलायन्स, हचिसन एस्सार आदी कंपनींमध्ये काम केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कडाक्याच्या थंडीत ‘लिम्का’गिरी

$
0
0


giridhar.pande@timesgroup.com
औरंगाबादः
उत्तर भारताततील कडाक्याची थंडी... तापमान अवघे ५ अंश सेल्सिअस अशात सलग २४ तास बाइक चालवायची... १६०० किलोमीटर्सचे अंतर पार करायचे... ही अत्यंत अवघड अशी कामगिरी औरंगाबादच्या राहुल औसेकर यांनी यशस्वीरित्या पार पाडत भारतभरातून आलेल्या रायडर्समध्ये प्रथम क्रमांक पटकावला. औरंगाबादकरांसाठी अभिमानाची कामगिरी करणाऱ्या राहुल यांनी ही कामगिरी करीत लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसला गवसणी घातली आहे.
दिल्लीच्या असोसिएशन ऑफ बोअर (ब्रदरहूड ऑफ अॅडिक्टेड रायडर) संस्थेने बायकर्ससाठी २४ तासांत १६०० किलोमीटर अंतर पार पाडण्याची स्पर्धा आयोजित केली होती. अवघड परिस्थितीत बाइक रायडिंगला प्रोत्साहन मिळण्यासाठी अशा प्रकारचे आयोजन केले जाते. अमेरिकेच्या बाइक रायडिंग संस्थेशी संलग्न अशी ही दिल्लीची संस्था आहे. २४ तासांत १६०० किलोमीटर अंतर पार पाडण्याचे हे आव्हान औरंगाबादच्या राहुल औसेकर यांनी २२ तास ३२ मिनिटांत पूर्ण करीत औरंगाबादचे नाव उंचावले आहे. या स्पर्धेत देशभरातून निवडक १३ बाइक रायडर्सना प्रवेश मिळाला होता. यात औसेकर यांच्यासोबत औरंगाबादचेच अमोल वाघ देखील सहभागी झाले होते. ही स्पर्धा दोन प्रकारांत घेतली जाते. इझी रायडर आणि फूल थ्रोटल असे हे दोन प्रकार. इझी रायडर प्रकारात ८०० कि.मी. अंतर पार करायचे होते. अमोल वाघ यांनी हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केले. फूल थ्रोटल प्रकार त्यापेक्षा अवघड होता. दिल्ली ते गुजरात (हिम्मतनगर) आणि पुन्हा परत दिल्ली असे हे अंतर २४ तासांत पूर्ण करावयाचे होते. या स्पर्धेत १३ बाइकर्सपैकी ३ जणांनी प्रकृती आणि वातावरणाच्या कारणावरून ही स्पर्धा पूर्ण केली नाही. १० जणांनी २४ तासांत स्पर्धा पूर्ण केली. आतापर्यंत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रथमच देशातील १० जणांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे, हा ही एक विक्रमच नोंदविला जाणार आहे. राहुल औसेकर यांनी या सर्वांमध्ये सर्वात कमी वेळ नोंदविला. २२ तास ३२ मिनिटांत हे अंतर पूर्ण करीत राहुल यांनी भारतातून प्रथम क्रमांक मिळविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी उघडणार आज आठ कोटींच्या निविदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेमध्ये समाजकल्याण, कृषी व पशुसंवर्धन विभागातील विविध योजनांच्या तब्बल आठ कोटी १६ लाख रुपयांच्या निविदा सोमवारी उघडण्यात येणार आहेत. योजना व साहित्य पुरविण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया दोन ते १६ जानेवारीदरम्यान राबविण्यात आली. या निविदा सोमवारी उघडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नियमानुसार तीन लाख रुपयांच्या वरील साहित्याची खरेदी करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविली जाते. जिल्हा परिषदेमध्ये समाजकल्याण, कृषी आणि पशूसंवर्धन विभागाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांचे साहित्य खरेदी या रकमेच्या वर असल्याने ई-टेंडरिंग प्रक्रिया राबविली गेली. त्यात डिझेल इंजिन १ कोटी २८ लाख, बैलगाडी १ कोटी, पीव्हीसी पाइप १ कोटी ६० लाख रुपये, कडबा कटर १ कोटी ४९ लाख रुपये, ताडपत्री ९० लाख रुपये, सबमर्सिबल पंप १ कोटी २० लाख रुपये, स्प्रे-पंप ३२ लाख रुपये, वखर १५ लाख रुपये, सारा यंत्र ११ लाख रुपये, कोळपणी यंत्र ११ लाख रुपये, अशा आठ कोटी १६ लाख रुपयांच्या या योजना आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृत्य-गायनातील अनवट पैलूंवर प्रकाश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'नृत्य करण्यासाठी शक्ती टिकली पाहिजे आणि शक्ती टिकवण्यासाठी ऊर्जा आवश्यक असते. कलाकाराची कलेवर श्रद्धा असावी. दृष्टी व वाणी व्यवस्थित असलेला कलाकार कलाक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतो' असे प्रतिपादन ज्येष्ठ भरतनाट्यम नर्तक पद्मभूषण सी. व्ही. चंद्रशेखर यांनी केले. 'शारंगदेव प्रसंग' या उपक्रमात ते बोलत होते.
शारंगदेव महोत्सवातील 'शारंगदेव प्रसंग' उपक्रमात रविवारी सकाळी ज्येष्ठ नर्तक व अभ्यासक सी. व्ही. चंद्रशेखर यांचे व्याख्यान झाले. या व्याख्यानात चंद्रशेखर यांनी भरतनाट्यम नृत्य परंपरेचा सविस्तर आढावा घेतला. नृत्य कलाकारातील गुणांवर सविस्तर विवेचन केले. 'नृत्य गिरकी नीट घेण्यासाठी कलाकारात स्थिरत्व आवश्यक असते. नृत्य करण्यासाठीही शक्ती पाहिजे आणि शक्ती टिकवण्यासाठी ऊर्जा पाहिजे. नृत्य करण्यासाठी गायन व वादन यांचेही पुरेपूर ज्ञान हवे. दृष्टी व वाणी व्यवस्थित असलेला कलाकार निश्चित यश मिळवतो' असे चंद्रशेखर म्हणाले. यावेळी नृत्यातील 'दशप्राण' सांगताना त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच रियाज नियमित करण्याचा सल्ला दिला. दरम्यान, या व्याख्यानापूर्वी 'धृपद' परंपरेतील ज्येष्ठ गायक उस्ताद वसिफुद्दीन डागर यांचे व्याख्यान झाले. 'प्रत्येक स्वराचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. संगीतामध्ये राग बहुरूपी असतात. एखादा स्वर वर्ज्य, एखादा महत्त्वाचा असे धृपद गायकी मानत नाही' असे डागर यांनी सांगितले. पाण्याच्या थेंबाचा आवाज आणि पाण्यात मिसळताना होणारा आवाज यातील फरक त्यांनी 'पंचम' स्वरातून दाखवला. स्वरांची उत्पत्ती दंत्य, ओष्ठ्य, अनुनासिक अशी असली तरी प्रत्येक स्वराला सर्व स्थानांपासून निर्माण करावे लागते असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी धृपद गायकीतील काही जागा सादर केल्या. 'संगीत रत्नाकरमधील रसविचार' या विषयावर भरतनाट्यम कलावंत डॉ. सुचेता चापेकर यांनी विचार मांडले. 'संगीतामधील गायन, वादन व नृत्य सर्व रसप्रधान आहे. रस निर्मिती कलाकारांच्या नृत्याने रसिकात निर्माण होते. रस ही मनाची अवस्था आहे. कलाकार रस निर्माण करून रसिकांपर्यंत घेऊन जातात. सृष्टीतील रसाच्या अनेक छटा असतात, तशा रसाच्या अनेक छटा असतात. श्रृंगाररस, हास्यरस, बिभस्त, कारूण्य अशा नऊ रसांचा प्रत्यय संबंधित पात्रावर अवलंबून असतो' असे चापेकर म्हणाल्या. यावेळी विद्यार्थिनी, रसिक व जाणकार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी देशात नावलौकिक करावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शालेय जीवनापासूनच शिक्षक करत असतात. डॉ. बद्रीनारायण बारवाले यांनी ग्रामीण भागात उभारलेल्या या शाळेमधून विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळून या विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचा देशात नावलौकिक करावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.
मांडवा (ता. बदनापूर) येथे डॉ. ब्रदीनारायण बारवाले विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, खासदार रावसाहेब दानवे-पाटील, आमदार अर्जुनराव खोतकर, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश टोपे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार अरविंद चव्हाण, माजी आमदार संतोष सांबरे, डॉ. बद्रीनारायण बारवाले, राजेंद्र बारवाले, रामेश्वर भांदरगे, नानासाहेब देशमुख, गोपाळ बोराडे, ठोंबरे, किसन सोलाट, नानासाहेब देशमुख आदींची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण खूप जास्त आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय विद्यार्थ्यांना पर्याय नाही. डॉ. बारवाले यांनी मांडवासारख्या ग्रामीण भागात सर्व सुविधांनीयुक्त व सुसज्ज अशी शाळा उभारली असून या शाळेचा फायदा परिसरातील विद्यार्थ्यांना होणार आहे. डॉ. बारवाले यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे बागडे यांनी यावेळी सांगितले.
राज्यात नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवित असले तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या गावात, परिसरात, शेतात पडणाऱ्या प्रत्येक पावसाचा थेंब मुरविणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या विहिरींचे पुनर्भरण केल्यास भविष्यात त्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, 'आपला पाल्यांने उच्चशिक्षण घेऊन वरिष्ठ अधिकारी म्हणून प्रशासनात काम करावे अशी ग्रामीण भागातील पालकांची इच्छा असते. मांडवा येथे उभारण्यात आलेल्या शाळेमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण प्राप्त होणार असून विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व परिश्रम करण्याची तयारी ठेवावी. शिक्षण हे वाघिणीचे दूध असून शिक्षणाच्या जोरावर संपूर्ण जग पादाक्रांत करता येते.'
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी गत वर्षात शासनाने जलयुक्त शिवार अभियान संपूर्ण राज्यात राबविले असून या अभियानास मोठ्या प्रमाणात लोकसहभाग प्राप्त झाला आहे. जालना जिल्ह्यातही हे अभियान २१२ गावात राबविल्याचे सांगून डॉ. बारवाले यांनी शासनाच्या या उपक्रमास हातभार लावावा, असे आवाहन लोणीकर यांनी यावेळी केले.
डॉ. ब्रदीनारायण बारवाले म्हणाले, 'ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे अशी बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती. आज मांडवा या गावात सर्व सुविधांनी युक्त शैक्षणिक इमारत उभारण्यात आली असल्याचे सांगून या माध्यमातून ग्रामीण भागातील निश्चितच घडेल.'
याप्रसंगी खासदार रावसाहेब दानवे-पाटील, आमदार अर्जुन खोतकर, आमदार राजेश टोपे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात कोनशिला अनावरण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सूत्रसंचालन व आभार घुले यांनी मानले. कार्यक्रमास पालक, विद्यार्थी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसहभागातून बदलले शाळेचे अंतरंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
तालुक्यातील शिवराई येथील जिल्हा परिषदेचा चेहरामोहरा लोकसहभागातून बदलत आहे. आयएसओ मानांकनासाठी लोकसहभागातून पावणेदोन लाख रुपये खर्च करून 'व्हर्च्युअल क्लासरूम' उभारण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेतर्फे आयएसओ मानांकनासाठी सध्या लोकसहभागावर भर देण्यात आलेला आहे. त्यामुळे शिवराई येथील जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने निधी उभारून शाळेचा चेहरा बदलला आहे. रंगरंगोटी करून शाळा सुशोभित करण्यात आली आहे. यातून शाळेचे वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांमुळे सध्या गावकरी मुलांना येथेच प्रवेश देण्यास प्राधान्य देत आहेत. शाळेतर्फे आदर्श परिपाठ, इंग्रजी शब्द पाठांतर, कविता पाठांतर, सामान्य ज्ञानावर अधारित प्रश्न, एक मुलगा एक झाड, विद्यार्थी संचालित बॅंक, निसर्ग सहल, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, कवायत, विद्यार्थी वाढदिवस, स्वयंशासन दिन, योग दिन, सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ, आरोग्य तपासणी, ज्ञान रचनावादावर अधारित प्रश्नमंजुषा, पालक मेळावे, रांगोळी स्पर्धा घेण्यात येत आहेत. शाळाच्या आयएसओ मानांकनासाठी गटविकास अधिकारी के. एस. सानप, गटशिक्षण अधिकारी ए. ए. लाठकर यांनी शाळेला नुकतीच भेट देऊन मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी यांनीही शाळेला नुकतीच भेट देऊन आढावा घेतला. मानांकन प्राप्त करण्यासाठी मुख्याध्यापक लक्ष्मण जैस्वाल, एस. ए. पवार, एच. एफ. सुखदेवे, व्ही. एम. नवघडे, श्रीमती जे. जे. शिंदे हे परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढगाळ वातावरणाचा रब्बीला फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. उत्पादनात ६० टक्के घट अपेक्षित असून हवामान कायम राहिल्यास आणखी घट होण्याची भीती आहे. मध्य महाराष्ट्रासह सर्वत्र ढगाळ वातावरण असून दोन दिवसात वातावरण निवळण्याची शक्यता आहे.
परतीच्या पावसाचा आधार मिळाला नसल्याने रब्बी पिकांची वाढ खुंटली आहे. काही भागात रब्बी पिकांची वाढ झाली. मात्र, जमिनीत ओल नसल्यामुळे कणीस भरण्याच्या अवस्थेत नुकसान झाले. जिल्ह्यात ज्वारी मुख्य रब्बी पीक आहे. हरभरा व गहू पिकांची काही प्रमाणात पेरणी झाली. प्रतिकूल हवामानाचा पिकांना फटका बसला आहे. खरीप हंगामात उत्पादनात निम्मी घट झाली. रब्बी हंगामात किमान ६० टक्के घट अपेक्षित आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. पिकांच्या वाढीसाठी थंडी गरजेची आहे. ढगाळ वातावरण वाढल्यामुळे थंडी गायब झाली आहे. या वातावरणाने हरभरा व गहू पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवसात महाराष्ट्राच्या काही भागात गारपिटीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 'मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे.
मराठवाड्यात तुरळक पाऊस होईल. पण, गारपीट होण्याची शक्यता नाही' असे हवामान शास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. विभागातील अनेक तालुक्यात पाणी व पिकांची बिकट अवस्था आहे. पाणी टंचाई व उत्पादनातील घट ग्रामीण भागात चिंताजनक विषय ठरला आहे. ज्वारीच्या उत्पादनात घट असली तरी चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला आहे. पुरेशा प्रमाणात कडबा उपलब्ध होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सिल्लोड व फुलंब्री तालुक्यात पिकांची समाधानकारक स्थिती आहे. तर इतर तालुक्यात रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिस्थितीमुळे यावर्षी कृषी क्षेत्रातील अर्थकारण मोडीत निघणार आहे.



बंगालच्या उपसागरातील बदलत्या वातावरणाचा परिणाम जाणवत आहे. मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे. पाऊस पडण्याची शक्यता आहे; मात्र गारपीट होणार नाही. दोन दिवसात ढगाळ वातावरण निवळेल.
- डॉ. श्रीनिवास औंधकर, हवामान शास्त्रज्ञ

विभागातील बहुतेक तालुक्यात पिकांची वाईट स्थिती आहे. प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात घट होईल. ज्वारीचे उत्पादन घटणार असले तरी किमान चारा मिळणार आहे. इतर पिकांपासून हा फायदाही नाही.
- पी. डी. लोणारे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी

उत्पादनातील संभाव्य घट
ज्वारी
६७.८९
बाजरी
५६.४५
मका
६७.९५
कापूस
६०.७१
सोयाबीन
६९.६१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या हिस्सा शिवसेनेतर्फे भरणा

$
0
0

सिल्लोड ः विशेष घटक योजनेतून शेळी पालन योजनकरिता शिवसेनेतर्फे लाभार्थ्यांच्या हिस्याचे अडीच लाख रुपये नुकतेच भरण्यात आले. या योजनेतून १४ शेतकऱ्यांना शेळ्यांचे वाटप करण्यात आले. 'दुष्काळाने हताश झालेल्या शेतकऱ्यांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी शिवसेना पूर्णपणे पाठिशी उभी आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार करू नये,' असे आवाहन नगर पालिकेचे गटनेते सुनील मिरकर यांनी केले. या कार्यक्रमात ते बोलत होते. या योजनेत शेतकऱ्यांचा प्रत्येकी १७,८१० रुपयांचा हिस्सा आहे. 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेतून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह लावण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या निवडीसाठी तालुक्यातील पदाधिकारी दौरा करणार आहे,' असे मिरकर यांनी सांगितले. यावेळी तलवाड्याच्या सुनबाई नवगीरे, मोढा येथील महानंदा साळवे, मांडणा येथील कोंडुबा अंभोरे, भवन येथील सुपडू उंबरे, सावखेडा येथील चंदन दांडगे, धोत्रा येथील रुपाबाई बोहरे, टाकळी खूर्द येथील सुभद्राबाई दांडगे, डकला येथील शेनफड गायकवाड, अन्वी येथील भिकन कांबळे, दीग्रस येथील फकिरा पाठक यांना शेळ्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला नगरसेवक सुदर्शन अग्रवाल, राजेंद्र सिरसाठ, पंचायत समिती सदस्या वृषाली मिरकर यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


७५ टक्के कुटुंबे शौचालयाविना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
तालुक्यातील ७५ टक्के कुटुंबांकडे अद्याप वैयक्तिक शौचालये नाही. त्यांना शौचालय बांधण्याकरिता स्वच्छ भारत मिशनतर्फे प्रवृत्त केले जात आहे, अशी माहिती तालुका समन्वयक देविदास सांगळे यांनी दिली. ४५ हजार ४२९ कुटुंबांना वैयक्तिक शौचालाये बांधकामासाठी प्रवृत्त करण्याचे आव्हान तालुक्यात आहे.
तालुक्यातील १२८ गावांत ५७ हजार ३०९ कुटुंबे राहतात. त्यांच्यापैकी फक्त ११ हजार ८८० कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालये बांधलेली आहेत. उर्वरित ४५ हजार ४२९ कुटुंबांनी अद्याप वैयक्तिक शौचालये बांधलेली नाही. ही कुटुंबे उघड्यावरच शौचास जातात. एप्रिल ते डिसेंबरपर्यंत तालुक्यातील वांगी पिरोळा, पांगरी, सराटी बोदवड या गावातील शंभर टक्के कुटुंबीयांनी शौचालयाचे महत्त्व ओळखले. जानेवारीअखेरपर्यंत बोरगाव कासारी, दिग्रस, कोटनांद्रा, बनकिन्होळा, दीडगाव, धारला आदी गावे शंभर टक्के पाणंदमूक्त होण्याच्या मार्गावर आहेत. बोरगावबाजार, अन्वी, खुल्लोड, गव्हाली, भराडी, लोणवाडी, मादणी, गेवराईसेमी, दहीगाव, चिंचपूर, लिहाखेडी या गावात नागरिकांनी शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. यासाठी शासनाने पंचायत समिती स्तरावर संपूर्ण स्वच्छता अभियान कक्षाची स्थापना केली आहे. वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी शासनाकडून निधीची तरतूद करण्यात आली आहे. कलापथक, गृहभेटी, ग्रामसभा, प्रचार रथा या माध्यमातून जनजागृती केली जात असल्याचे सांगळे यांनी सांगितले. तालुका ग्रामसेवक संघटना शौचालयाच्या जनजागृतीसाठी सरसावली आहे. बोरगावबाजार मध्ये संघटनेने शौचालयासाठी जनजागृती केली. तालुक्यातील सर्व ग्रामसेवक या गावात गेले. ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांच्या दारासमोर हलगी वाजविण्यात आली. त्यानंतर कुटुंब प्रमुखांचे पाय धरून त्याला होत जोडून शौचालय बांधण्याची विनंती करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाराई येथे शंकरपटाचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
शंकरपटावरील सर्वोच्च न्यायालयाची बंदी झुगारल्याची घटना तालुक्यातील शिवराई येथे घडली. येथे यात्रेनिमित्त शंकरपटाची स्पर्धा आयोजित करण्यात आली. विशेष म्हणजे शंकरपट बंद करण्यासाठी पोलिस गावात पोहोचले खरे परंतु, कोणीच आढळले नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे.
सध्या तालुक्यातील शिवराई येथे विरभद्र व खंडोबा महाराजांची यात्रा सुरू आहे. या यात्रेनिमित्त गावात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेचे औचित्य साधून शनिवारी शिवराई शिवारातील डांगे वस्ती परिसरात दुपारी ३.३० च्या सुमारास बैलांची शर्यत आयोजित करण्यात आली. यामध्ये शिवराई गावासह येवला, निफाड, विंचूर, गंगापूर तालुक्यातील जवळपास २०० टांगे सहभागी झाले होते. या घटनेची माहिती गावातील काही ग्रामस्थांनी वैजापूर पोलिसांना दिली. त्यामुळे काही टांगेवाल्यांनी येथून पोबारा केला.
वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास भिकाने, हवालदार नंदकुमार नरोटे व गवळी यांनी शिवराईकडे धाव घेतली. परंतु, तोपर्यंत टांगवाले पसार झाले होते, असा दावा पोलिसांनी केला. यात्रेनिमित्त या बैलांच्या शर्यतीमध्ये जवळपास २०० टांगे सहभागी झाले होते. वास्तविक पाहता २०० टांग्यापैकी पोलिसांना एकही टांगा आढळू नये हे पोलिसांचे अपयश म्हणायचे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तयार आहे लढायला, बाबा, जहर खाऊ नका’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
'घोर मनाला लावून
पाठ जगाला दावू नका
तुमच्यासाठी आम्ही आहोत ना बाबा
जहर खाऊ नका
आली लग्नाला लाडाची ताई
हुंड्यावाचून जमना काही
असे नाठाळ होऊन
टोपी गहाण ठेवू नका
ताई तयार आहे लढायला,
जहर खाऊ नका
असे हृदयस्पर्शी गाणे म्हणत, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींनी पथनाट्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केले.
नाशिक जिल्ह्यातील त्रिंबकेश्वर तालुक्यातील तुपादेवी येथील आधारतीर्थ आधारश्रम संस्थेतर्फे राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे संगोपन केले जाते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या यासाठी या आश्रमसंस्थेकडून 'बळीराजा वाचवा' प्रबोधन दिंडी काढण्यात आली आहे. या संस्थेकडून राज्यातील आत्महत्याग्रस्त ठिकाणी जावून पथनाट्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले-मुलीच या पथनाट्यात अभिनय करत आहे.
शहरातील शिवाजी चौक व महाराणा प्रताप चौकात रविवारी सकाळी साठ विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. शहर व तालुक्यातील नागरिकांनी या पथनाट्यास चांगला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, पटनाट्य सुरू असताना उपस्थित बहुतांशी नागरिकांचे डोळे पाणावले. अशोक पाटील, प्रिया पाटील, सनी शिंपी, प्रिया चव्हाण, प्रणय मिटले, आकाश पाटील आदींनी पथनाट्यात अभिनय केला. संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गणेश पवार व भगवान निवारे, सचिन गवळी, सचिन देशमुख यांनी त्यांना सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणोरीत स्वच्छतेचे वाण

$
0
0

फुलंब्री : तालुक्यातील गणोरी येथील ग्रामसंसदेतर्फे आगळी वेगळी संक्रांत शुक्रवारी साजरी करण्यात आली. संक्रातीनिमित्त शौचालय नसलेल्या कुटुंबातील महिला सदस्यांना सरपंच पद्मा जाधव यांच्या हस्ते वाण म्हणून शौचालयाचे भांडे भेट देण्यात आले.
गणोरीची लोकसंख्या सुमारे १० हजार असून ग्रामसंसदेने पाणंदमुक्तीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गावातील ६०० पेक्षा जास्त कुटुंब शौचालय बांधून वापर करीत आहेच. उर्वरित सुमारे २५० ते ३०० कुटुंबाच्या घरी शौचालय बांधकाम करण्याचे उद्दिष्ट आहे. यानंतर गाव शंभर टक्के पाणंदमूक्त होणार आहे. यापूर्वी गणोरीत असाच आगळा वेगळा भाऊबिजेचा कार्यक्रम घेऊन त्या कार्यक्रमात देखील ग्रामसंसदेतर्फे गावातील महिलांची ओवाळणी स्वीकारून शौचालयाचे भांडे भेट म्हणून देण्यात आले होते. ग्रामपंचायतमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या विजया न्यायाधीश, रंजना जाधव, सखुबाई उबाळे, स्वाती पेहेरकर, निलोफर सय्यद, ग्रामविकास अधिकारी रमेश मुळे, दीपक चव्हाण, रामू भादवे, आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंजली महाजन यांनी केले तर, आभार ग्रामविकास अधिकारी रमेश मुळे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिंचन’ने घालवली झेडपीची शान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेतील सर्वात बदनाम झालेले खाते म्हणजे सिंचन. राज्यस्तरावर औरंगाबाद जिल्हा परिषदेतील सिंचन विभागाच्या घोटाळ्याची ख्याती पसरली आहे. पंचायत राज समितीने (पीआरसी) ही त्यावर शिक्कामोर्तब केले होते. नियम धाब्यावर बसवून दोन वर्षांपूर्वी कामे मंजूर करून बिले उचलली गेली. त्यात तब्बल ११ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. त्यावर अद्याप कुठलीच कार्यवाही केलेली नाही. खात्याची जास्त चर्चा झाल्याने यंदा मात्र, सात कोटी रुपये अखर्चित राहिले आहेत.
राज्य सरकारकडून लघुपाटबंधारे, कोल्हापुरी बंधारे या दोन योजनांसाठी राज्य सरकारकडून निधी प्राप्त होतो. दोन वर्षांपासून जलयुक्त शिवार योजनेसाठी स्वतंत्र निधी दिला जातो. या विभागातील योजनांची बहुतांश अंमलबजावणी गुपचुपच होते. मर्जीतील अधिकारी, पदाधिकारी, सदस्य आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने कामे मंजूर करून बिले उचलली जातात. ही कामे प्रत्यक्षात किती होतात हा संशोधनाचा विषय आहे. आघाडी सरकारच्या काळात २०११ मध्ये दुष्काळ पडला होता. त्यावेळी गाळ काढण्यासाठी जिल्ह्याला मोठा निधी मिळाला होता. या निधीचाही सिंचन विभागात गैरवापर केला गेला. त्यापूर्वी कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या सु-सुधारित प्रस्तावांचे प्रकरण राज्यभर गाजले होते. एवढे होऊनही गैरप्रकारांची मालिका सुरूच होती. काही सदस्यांच्या आक्षेपानंतर धक्कादायक माहिती समोर आली. तब्बल ११ कोटींचे दायित्व विभागावर वाढले होते. ही कामे अर्थ विभागाच्या संमतीशिवायच मंजूर केली गेली. जिल्हा परिषद प्रशासनाने अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली त्यांच्याच अहवालातून हे समोर आले होते. या गैरप्रकारामुळे गेल्या वर्षी प्राप्त झालेला बहुतांश निधी जानेवारी संपत आला तरी अद्याप अखर्चित आहे.
लघु पाटबंधारेच्या कामासाठी वर्ष २०१४ -१५ मध्ये ९४ लाख रुपये अखर्चित राहिले होते. २०१५ - १६ साठी तीन कोटी ३४ लाख रुपये मिळाले. या एकूण चार कोटी २८ लाखातून आतापर्यंत केवळ एक कोटी तीन लाख रुपये खर्च झाले आहेत.
याच विभागांतर्गत जलयुक्त शिवार योजनेसाठी एक कोटी २० लाख रुपये खर्च झाले हे पैसे मागच्या वर्षी प्राप्त झाले होते. यंदा एक रुपयाही सरकारकडून मिळालेला नाही. कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी वर्ष २०१४ -१५ मध्ये ९८ लाख अखर्चित होते. २०१५ -१६ मधील चार कोटी ५२ लाख असे साडेपाच कोटी रुपये सिंचन विभागाच्या तिजोरीत होते. पण गेल्या दहा महिन्यांत केवळ एक कोटी ७१ लाख रुपये खर्च झाले. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मात्र यंदा मिळालेल्या एक कोटी ५८ लाख ६१ हजार रुपयांमधून ४८ लाख रुपये खर्च केले गेले. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाकडून गेल्यावर्षी एक कोटी २३ लाख रुपये मिळाले होते. त्यापैकी ४६ लाख रुपयेच जिल्हा परिषदेचा सिंचन विभाग खर्च करू शकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद - अजिंठा रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी तसेच मराठवाडा खान्देशाला जोडणारा सर्वात महत्वाचा औरंगाबाद - अजिंठा रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. चीनच्या उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यावर रस्त्याच्या दर्जाबद्दल नाराजी व्यक्त केली गेली. त्यानंतर तातडीने दुरुस्तीचा निर्णय घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने घाईगडबडीत कामाचे उद्घाटन उरकले. त्याला महिना उलटून गेला तरी काम सुरू झालेले नाही. याकडे मुंबईतील अधिकारी आणि मंत्र्यांचे दुर्लक्ष झाले आहे.
औरंगाबाद-जळगाव हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येतो. काही महिन्यांपूर्वी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा, असा प्रस्ताव धाडण्यात आला होता. त्यास मंजुरी मिळाली पण केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याकडून त्याची अधिकृत प्रक्रिया पार पाडण्यास वेळ लागणार आहे. दरम्यान दोन महिन्यांपूर्वी चीनच्या उपराष्ट्रपतींचा औरंगाबाद दौरा झाला. या दौऱ्यात रस्त्यावरून जाताना त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. औरंगाबाद-अजिंठा हेलिकॉप्टरसेवा सुरू करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. वास्तविक गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. जागतिक बँकेने दिलेल्या अनुदानातून रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. पण अलिकडच्या काळात डागडुजी न झाल्याने रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले होते. हा त्रास थोड्याफार प्रमाणात कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने डागडुजीसाठी २३ कोटींची तरतूद केली. ई-निविदा काढली गेली. सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांनी डिसेंबर अखेर रस्त्याचे काम सुरू होईल अशी घोषणा केली होती. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात फुलंब्रीजवळ या रस्त्याच्या कामाचे उद्घाटनही करण्यात आले. त्यास महिना उलटून गेला. तरीही अजून कामाला सुरुवात झालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कामासाठी १८ कोटींची निविदा भरण्यात आली. मूळ रकमेच्या सहा कोटी कमीने निविदा भरली गेली पण त्यातून काम कधी सुरू होणार, असा प्रश्न होता. तांत्रिकदृष्ट्या रस्त्याची लांबी त्यासाठी लागणारा वेळ आणि रक्कम याचे गणित जमणे अवघड आहे. निविदेतील अटी, शर्तीनुसार मे अखेरपर्यंत हे काम पूर्ण करावे लागणार आहे. साडेचार महिन्यांत १०० किलोमीटरच्या रस्त्याची दुरुस्ती नेमकी कधी सुरू होणार ? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपमधील गटांना धक्का

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भाजप शहराध्यक्षपदी माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची केलेली निवड म्हणजे पक्षांतर्गत गटातटांना मोठा धक्का देण्यात आला आहे. त्यापुढे जाऊन शहरातील शिवसेनेसमोरही मोठे आव्हान उभे राहणार आहे. प्रदेशाध्यक्ष दानवेंनी शहरात यानिमित्ताने आपली पाळेमुळे आणखी घट्ट केल्याचे मानले जात आहेत.
गेल्या १५ दिवसांपासून शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होती. शिरीष बोराळकर, आमदार अतुल सावे, दिलीप थोरात, संजय केणेकर, संजय जोशी, अनिल मकरिये यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत होती. या सर्वांच्या तुलनेत तनवाणी पक्षाला नवीन आहेत. त्यामुळे जुन्या गटातून अध्यक्ष होणार की नवीन याची सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्याला उत्सुकता होती. दीड वर्षांपूर्वी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये आलेल्या तनवाणींनी विधानसभेची निवडणूक लढविली. शिवसेना आणि भाजप समोरासमोर उभे राहिल्याने एमआयएमचा आमदार निवडून आला. पण तनवाणींनी ४० हजारांहून अधिक मते मिळविली. नंतरच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. प्रदेशाध्यक्षपदाची धुरा दानवेंकडे आल्यानंतर तनवाणी त्यांच्या जवळचे झाले. त्यामुळे भाजपमधील गटतटांची अडचण झाली. अनेकांनी भुवया उंचावल्या. पक्षाच्या निर्णयप्रक्रियेतही तनवाणींचे महत्व वाढले. शहराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या यादीत सुरवातीला त्यांचे नावही चर्चिले गेले नाही. पण भविष्यातील समीकरणांचा विचार करून श्रेष्ठींनी त्यांना अध्यक्ष केले. त्यात अनेक राजकीय गणिते जुळविण्यात आली. शहरात शिवसेनेचा जोर आहे. तनवाणी पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे भविष्यात शहरात भाजपला वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग होईल असा तर्क श्रेष्ठींना लढविला. शिवाय पक्षांतर्गत धुसफूस ही शहरातील भाजपच सर्वात मोठी डोकेदुखी आहे.
सगळ्यांच्या वादात तिसराच अध्यक्ष केल्यामुळे पक्षातील स्थानिक मंडळींनाही इशारा देण्यात आला आहे. पुढची तीन वर्षे तनवाणींना पक्षांतर्गत विरोधक, शिवसेना यांच्यासोबत विरोधकांनाही तोंड देण्याचे आव्हान असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुटलेल्या माकडामुळे ‘सिद्धार्थ’मध्ये धावपळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात असलेल्या माकडाने संरक्षक जाळी तोडून बाहेर उडी मारली आणि एकच धावपळ उडाली. दीड तासांच्या प्रयत्नानंतर या माकडाला पकडण्यात यश आले.
सिद्धार्थ गार्डनमधील प्राणिसंग्रहालयात रविवारी सकाळी सुटीमुळे गर्दी होती. प्राण्यांसाठी असलेल्या जाळ्या आता जीर्ण झाल्या आहेत. सुदैवाने आजवर कुठलीच गंभीर घटना घडली नाही. साडेअकराच्या सुमारास जाळी वाकवून एक माकड पिंजऱ्याबाहेर आले. माकड सुटल्याचे पाहून संग्रहालयात जमलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि धावपळ सुरू झाली. ड्यूटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि तत्काळ प्राणिसंग्रहालयाचा प्रवेश बंद करण्यात आला. आत असलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले आणि कर्मचारी माकडाला पकडण्यासाठी धावले. संग्रहालयात पाच माकडे आहेत. पिंजऱ्याबाहेर पडलेल्या माकडाला पकडण्यासाठी तब्बल दीड तास लागले. यावेळी झटापटीत माकडाने एका कर्मचाऱ्याला जखमी केले. दीड तासांनंतर माकडाला पकडून पिंजऱ्यात सोडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीए परीक्षेचा निकाल जाहीर

$
0
0


औरंगाबाद : द ‌इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंट्स ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या चार्टड अकाऊंट्सच्या (सीए) मुख्य परीक्षेचा निकाल रविवारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. काहीवेळ संकेतस्थळ हँग असल्याने निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा वेळ गेला. औरंगाबादमधून सीए फायनलमध्ये ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या या परीक्षेसाठी शहरातून एक हजार विद्यार्थी बसले होते. निकालात औरंगाबादची घसरण झाल्याचे बोलले जात आहे. शहरातूनग्रुप एक मधून २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर, ग्रुप दोनमध्ये २७ विद्यार्थी उत्तर्णी झाले. सीए फायनलमध्ये ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्य परीक्षेच्या निकालाबरोबर सीपीटी परीक्षेत मिळालेले एकूण गुणही विद्यार्थ्यांना पाहता आले. प्रारंभी निकाल पाहण्यासाठी गर्दी झाल्याने संकेतस्थळ हँग होते. यामुळे निकाल पाहण्यात विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्या. संकेतस्थळ सुरळीत झाल्यानंतर निकाल पाहता आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉस्पिटलसाठी शोधा १५ दिवसांत जागा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
शहरात २०० खाटांच्या महिला आणि बाल रुग्णालयासाठी ५ एकर जागेचा येत्या १५ दिवसात शोध घेण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा नियोजन समिती रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत आमदार संजय शिरसाठ यांनी रुग्णालयासाठी सातारा परिसरात जागा देण्याची मागणी केली. यावर औरंगाबाद मध्यचे आमदार इम्तियाज जलील यांनी रुग्णालयासाठी जालना रोडवरील शासकीय डेअरी शेजारी जागा उपलब्ध असल्याने तेथे रुग्णालाय करावे, अशी मागणी केली. यावर खासदार खैरे यांनी ही जागा स्मारकाची असल्याचे सांगितले. हा विषय लांबत असल्याचे पाहून पालकमंत्री कदम यांनी मागणी होत असलेल्या जागेची पाहणी करून, जागेचा आढावा घ्यावा व १५ दिवसात जागा निवडा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. शहरात महिला व बाल रुग्णालयाची तीन वर्षांपासून मागणी होत आहे. परंतु, जागेबद्दल संभ्रम आहे. आमदार इम्तियाज जलील व आमदार संजय शिरसाठ यांनी आपापल्या मतदारसंघात रुग्णालयाची मागणी करत असल्यामुळे जागेचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
महापालिकेचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर हे तीन वर्षांसाठी औरंगाबादमध्येच रहावेत, अशी चर्चा सभेत झाली. त्यावर बोलताना पालकमंत्र्यांनी, केंद्रकर हे चांगले अधिकारी आहेत; त्यांना नागपूरला पाठवणे दूरच मी कोकणातही नेणार नाही, असे सांगितले. अनुपालन अहवालावर चर्चा सुरू असतांना वनविभागाकडून लावण्यात आलेले किती झाडे दुष्काळात जिवंत राहिली असा विषय पुढे आला. यावर केवळ तपासणी केली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यावर येत्या पावसाळ्यात सर्व फळझाडे लावण्यात यावे, असे पालकमंत्र्यांनी सूचवले.
शहर परिसरातील सातारा-देवळाई परिसर महापालिकेत असावा की नगर पालिका घोषित करावी याबाबत पालकमंत्री रामदास कदम यांनी खासदारांचे मत ते आमचे मत, असे म्हणत खासदार खैरेंकडे बोट दाखवले. यावर खैरे यांनी हा भाग महापालिकेत समाविष्ट झाला पाहिजे, असे सांगितले सातारा-देवळाईच्या विकासाऐवजी काही लोक राजकारण करत आहेत, असेही खैरे यांनी सांगितले
पैठण येथील संत एकनाथ उद्यानात काही वर्षांपूर्वी दररोज २५ हजार पर्यटक भेट देत होते. मात्र सध्या उद्यानाची दुरावस्था झाल्याने पर्यटकांची संख्या घसरली असल्याचे खासदार खैरे यांनी बैठकीत सांगितले. त्यांनी उद्यानाची डागडुजी करण्यासाठी निधीची मागणी केली. यावर उद्यानाच्या नुतनीकरणासाठी ७० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्हा वार्षिक योजना सन २०१६-१७ साठी २१२ कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. दरम्यान,२०१५-१६चा एकही पैसा परत जाणार नाही, असा दावा पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
जिल्हा वार्षिक योजनेसाठीचा निधी ३०० कोटी रुपये करावेत, असे सर्वानुमते ठरवण्यात आले. यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींकडून प्रस्ताव घेण्यात येणार आहेत. जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी १ कोटी ८९ लाख रुपये निधी प्रस्तावित आहे. डिसेंबर २०१५ अखेर १०४ कोटी म्हणजे ७५ टक्के झाला आहे. तसेच विशेष घटक योजनेत २५ कोटी ३९ लाख रुपये खर्च झाला आहे. मूळ मंजूर आराखड्यामधील साडेतीन कोटी रुपये इतर विभागांना वर्ग करण्यात येणार आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. बैठकीमध्ये आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील निकाल घसरल्याची तक्रार केली. आपण ११० शाळांना भेटी दिल्या मात्र, पाचवी, सहावीच्या मुलांनाही लिहिता-वाचता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. वनपर्यटनासाठी देण्यात आलेल्या २ कोटी ७० लाख रुपयांचा हिशोब मागण्यात आला. त्यापैकी ७० लाख शिल्लक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते इतर विभागांना वर्ग करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन पुलांसाठी २७ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मकई दरवाजा, मेहमूद दरवाजा आणि बारापुल्ला दरवाजा या ऐति‌‌हासिक दरवाजांशेजारी, खाम नदीवरील पुलांसाठी येत्या चार दिवसांत २७ कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा पालकमंत्री रामदास कदम यांनी रविवारी (१७ जानेवारी) जिल्हा नियोजन समिती बैठकीत केली.

पुलाच्या कामासाठी तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार वर्षांपूर्वी विधीमंडळामध्ये ११ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. या दरवाजांशेजारील पुलांचे बांधकाम, भूसंपादनासाठी हा निधी अपुरा आहे. त्यामुळे त्यात वाढ करण्याची मागणी शासनाकडे केली, मात्र त्यानंतर त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. दरम्यानच्या काळात हे काम महापालिकेऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले, परंतु बांधकाम विभागाला या पुलांच्या कामासाठी कुठलेही आदेश व अनुदान देण्यात आले नाही. महापालिकेचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या पुलांच्या कामासाठी पाठपुरावा केल्याचे पालकमंत्र्यांनीही यावेळी सांगितले.

पर्यटन जिल्हा असलेल्या औरंगाबाद शहरामध्ये दररोज पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मेहमूद दरवाजा, मकई गेट आणि बारापुल्ला दरवाजाच्या परिसरातच पाणचक्की, बीबी का मकबरा ही शहरातील पर्यटनस्थळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छावणी परिसर अाहे. त्यामुळे या पुलांवर कायम रहदारी असते. दरवाजांमधून जाणारा रस्ता अत्यंत अरूंद अाहे. त्यामुळे कायम वाहनांची कोंडी होते. पर्यटकांच्या गाड्याही अनेकदा या दरवाजांमध्ये तासंतास उभ्या असतात.

शहरातील अनेक वसाहतीही या दरवाजांच्या बाहेर आहेत. त्यांना जोडण्यासाठी मोठ्या रस्त्याची सातत्याने मागणी करण्यात येत होती. हे पूल सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचे आहेत. त्यामुळे पुलांवरून जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या घोषणेमुळे शहरातील महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडी अभयारण्याच्या सौंदर्यात भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तब्बल ३४ हजार हेक्टरवरील जायकवाडी पक्षी अभयारण्याच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरात सव्वादोन कोटी रुपये निधीतून बहिःस्थ निसर्ग निरीक्षण केंद्र उभारले जाणार आहे. या प्रकल्पाला तांत्रिक मान्यता मिळाली असून, लवकर काम सुरू होणार आहे. या माध्यमातून पर्यटकांसाठी नवे दालन खुले होणार आहे.

जायकवाडी पक्षी अभयारण्यात पक्षी निरीक्षण करण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढत आहे. जायकवाडी अभयारण्य पक्षीप्रेमींचे आवडते ठिकाण आहे. या अभयारण्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी वन्यजीव संरक्षक विभागाने बहिःस्थ निसर्ग निरीक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निरीक्षण केंद्रासाठी १० हेक्टर जमीन मिळाली आहे. या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली असून, लवकरच काम सुरू होणार आहे. पैठण शहरातील संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरातीस या नियोजित प्रकल्पाचा पर्यटनवाढीला फायदा होणार आहे. निसर्गाचा 'फिल' देणारा हा प्रकल्प अत्यंत आधुनिक आहे. निरीक्षण केंद्रात १४०० मीटर निसर्ग पाऊलवाट असून, दुतर्फा झाडी व लॉन राहणार आहे. शिवाय पक्ष्यांच्या अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी 'लपनगृह' तयार करणार आहेत. या लपनगृहामुळे पर्यटकांना पक्षी दिसतील पण, पक्ष्यांना पर्यटक दिसणार नाहीत अशी योजना आहे; तसेच जायकवाडी पक्षी अभयारण्याशी संबंधित म्युरल्सची निर्मिती केली जाणार आहे. एकाचवेळी ७६० पर्यटक बसू शकतील असे आधुनिक सभागृह बांधले जाणार आहे अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज कापुरे यांनी दिली. पक्षी निरीक्षक पर्यटकांना स्थानिक ग्रामसंस्कृतीची ओळख करून देण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे. सध्या पिंपळवाडी येथील ग्रामस्थांना पर्यटन प्रकल्पात सहभागी करण्यात आले आहे. बैलगाडी सफर, ग्रामीण खाद्यसंस्कृती असा प्रकल्पाचा उद्देश असून, याद्वारे ग्रामस्थांना रोजगार मिळणार आहे. जायकवाडी अभयारण्याचे क्षेत्र ३४ हजार हेक्टर असून दोन जिल्हे व चार तालुक्यांचा समावेश आहे. अभयारण्यासाठी फक्त सात कर्मचारी नियुक्त केले आहेत. कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे अवैध मासेमारी व अनधिकृत प्रकार रोखण्यात अडचणी येत आहेत.

लेझर शो
सध्या पर्यटन क्षेत्रात लेझर शो महत्त्वाचा ठरत आहे. निसर्ग निर्वाचन केंद्रात जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून थ्री-डी इफेक्टचा लेझर शो सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्याचा वन्यजीव संरक्षक विभागाचा प्रयत्न आहे. पैठण शहराचे पर्यटनदृष्ट्या वेगळे महत्त्व आहे. आता निसर्ग निरीक्षण केंद्राची भर पडणार असल्यामुळे पर्यटकांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे.

निसर्ग निरीक्षण केंद्राच्या प्रकल्पाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या सहा महिन्यांत काम सुरू होईल. पक्ष्यांचा अधिवास सुरक्षित ठेवणे आणि निसर्ग पर्यटनाकडे पर्यटकांना वळवणे हा केंद्राचा उद्देश आहे.
- मनोज कापुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पैठण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>