Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उद्योजक व्हा... : अपयशानंतरही फिनिक्स भरारी

$
0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com
गायकवाड कुटुंबीय हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जळगाव गावचे. वडील (कै.) नानासाहेब गायकवाड हे शेती करीत होते. संदीप यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण हे गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर श्रीरामपूर येथे बीएसस्सीपर्यंत मावशीकडे राहून शिक्षण झाले. त्यानंतर सिन्नर येथील 'सारडा पेपर्स लिमिटेड' येथे केमिस्ट म्हणून काम करण्याची संधी मिळाली, मात्र त्यांचे तेथे मन लागत नव्हते. पेपर कंपनीमध्ये आपले भविष्य घडू शकत नाही, अशी धारणा झाल्यामुळे अवघ्या दोन महिन्यांमध्ये ते गावाकडे परतले. नोकरी सोडल्यामुळे कुटुंबीय नाराज झाले. नोकरी करायची नाही तर निदान घरची शेती कर, असे घरच्यांनी सुनावले. काही महिने शेतीही करून बघितली; पण शेतीमध्येही मन रमेना. शेतीपेक्षा औषधी कंपनीमध्ये नोकरी करावी, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे कुटुंबीयांचे न ऐकता आणि मित्रांकडून भाड्याचे पैसे घेऊन अंगावरच्या कपड्यानिशी औरंगाबाद गाठले, मात्र त्याकाळी मार्केड थंड होते, मंदी होती. शोधूनही औषधी कंपन्यांमध्ये काम मिळत नव्हते. कुठेही जा 'नो व्हॅकन्सी'शी सामना करावा लागत होता. त्याचवेळी वाळूज एमआयडीसी येथील 'संग्राम ऑटो कंपोनन्टस प्रा. लि.'मध्ये लिपिकाची नोकरी मिळाली आणि १९९८मध्ये ८०० रुपये वेतनावर काम सुरू केले.

'ऑटो कंपोनन्टस'ची निर्मिती करणाऱ्या या छोटेखानी कंपनीमध्ये काम करताना आवड निर्माण झाली आणि यापूर्वी कुठेच न रमणारे मन येथे चांगलेच रमू लागले. केवळ लिपिकाचे नव्हे तर ऑटो कंपोनन्टसच्या मॅन्युफॅक्चरिंग, डिसपॅच, डिलिव्हरी, स्टोअरपर्यंतचे सगळे काम ते मनोभावे करु लागले आणि काहीही न मागता ८०० रुपयांचे वेतन 'संग्राम ऑटो'चे मालक मनोज कंक यांनी १२०० रुपये केले. अल्पावधीतच संदीप यांच्यावर डिपार्टमेंट हेडची जबाबदारी सोपवण्यात आली आणि मॅन्युफॅक्चरिंगमधील प्रत्येक बारीक-सारीक कामाच्या अनुभवामुळे आपणही उद्योजक होऊ शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला. मोठी हिंम्मत करत स्वबळावर त्यांनी भागीदारीमध्ये वाळूजमध्ये छोटेखानी युनिट सुरू केले. एक-एक लाखाची गुंतवणूक केली आणि रिक्षा-दुचाकीचे छोटे भाग तयार करण्याचे काम युनिटमनध्ये सुरू केले. एकीकडे नोकरी सुरू होती. काम मिळत गेले आणि युनिटची प्रगती होत होती. दरम्यान, १९९८ ते २००२पर्यंत 'संग्राम ऑटो'मध्ये काम केल्यानंतर उद्योजक श्रीकांत जोशी यांच्या 'श्री इंजिनिअरिंग'मध्ये प्लँट हेड म्हणून संधी मिळाली. झोकून देऊन काम करण्याच्या प्रवृत्तीमुळेच जोशी यांचा विश्वास संदीप यांनी कमावला. नोकरीमध्ये प्रगती होत गेली; पण स्वतःच्या युनिटमध्ये वेळ देणे शक्य होत नसल्याची खंत त्यांना होती आणि त्यामुळे स्वतःच्या युनिटची फारशी प्रगती होत नसल्याचा विचार मनात येऊ लागला. युनिटमध्ये पूर्णवेळ लक्ष घालण्यासाठी २००८मध्ये नोकरी सोडली. युनिट वाढवण्याचा प्रयत्न सुरू होता; पण त्यातून योग्य रिटर्स मिळत नव्हते, नुकसान वाढत गेले, लोकांची देणी-कर्ज वाढत गेले. अनेक प्रयत्न करूनही युनिट तोट्यात गेले आणि कुठलाच पर्याय शिल्लक राहिला नाही म्हणून शेवटी युनिट बंद करुन बाहेर पडण्याचा निर्णय जड अंतःकरणाने घेतला. स्वतःच्या युनिटवर तब्बल ३०-३५ लाखांचा खर्च केला होता. संपूर्ण युनिट विकण्यासाठी तब्बल एक वर्ष लागले आणि त्यानंतरही काही प्रमाणातील कर्ज डोक्यावर शिल्लक होतेच. या काळात नोकरी नव्हतीच; शिवाय देणी शिल्लक होती, घराचे-कारचे हप्ते होते, मुलांच्या शिक्षणाचा व घर खर्चाचा प्रश्न होताच. सगळीकडून कोंडी झाली होती. याच कोंडीमुळे कार विकून टाकली; पण त्यामुळे फारसा काहीही उपयोग झाला नाही. आता नोकरी करण्याशिवाय गत्यंतर नाही, असे वाटून उद्योजक जोशी यांना सगळी हकिकत सांगितली आणि तिथून त्यांच्या आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट मिळाला.

पुन्हा स्वबळावर भरारी
उद्योजक जोशींकडे नोकरी करण्यासाठी संदीप गेले; पण त्यांनी नोकरीबरोबरच उद्योग-व्यवयाय करण्याचाही पर्याय संदीप यांच्यासमोर ठेवला. उद्योगामध्ये सगळीकडून कोंडी झाली होती, पण तरीही उद्योग करण्याची दुर्दम्य इच्छा होतीच. त्यामुळे जोशींनी संदीप यांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन देत काम देण्याचा शब्द दिला आणि संदीप यांनी पत्नीचे सोने बँकेत ठेऊन मिळालेल्या ८० हजारांमध्ये रजिस्ट्रेशन केले व शेड डिपॉझिटचे पैसे दिले. दोन मित्रांकडून दोन प्रेस मशीन आणल्या आणि 'निरंजन मेटल प्रेसिंग' नावाने छोटे युनिट कसेबसे सुरू केले. जोशींनी सुरुवातीलाच ४ पार्ट तयार करण्याचे काम दिलेच; शिवाय दोन नवीन मशीन खरेदीसाठी पैसे देऊन एका वर्षानंतर कामातून पैसे वळते करून घेतले. संदीप यांच्या चोख कामामुळेच काम मिळत गेले, वाढत गेले आणि मशीन कमी पडू लागल्या म्हणून संदीप यांनी पुन्हा ४ नवीन मशीन खरेदी केल्या. 'सिद्धी इंजिनिअरिंग' व 'समीक्षा प्रेसिंग'कडून पार्ट तयार करण्याचे काम मिळाले. पहिल्याच महिन्यात ७०-८० हजारांची उलाढाल झाली आणि अवघ्या चार वर्षांतील वार्षिक उलाढाल ७०-८० लाखांवर गेली. जोशींसारखा गॉडफादर मिळाला आणि नोकरी देण्यापेक्षा त्यांनी मला उद्योजक म्हणून घडविले, असे संदीप म्हणत असले तरी त्यामागे संदीप यांची अखंड मेहनत, धोका पत्करण्याची हिम्मत, अथक संघर्ष करण्याचे गुण लपून राहात नाही. संबंधित क्षेत्राच्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीचे ज्ञान मिळवा, किमान २-३ वर्षे नोकरी करुन समृद्ध अनुभव मिळवा आणि त्यानंतरच उद्योजक होण्यासाठी झोकून द्या, असे संदीप आवर्जून सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘तुम्हाला मराठी समजते का’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
यंदा माझ्या शेतात पिकं चांगलं आलं आहे, त्यांची उंची जास्त आहे, याचे हिंदीत भाषांतर करता येते का. तुम्हाला मराठी येते का, तुम्हाला मराठी समजते का? असे विविध प्रश्न रिक्षा परमिट मिळविण्यासाठी आलेल्या उमेदवारांना मंगळवारी विचारण्यात आले. परमीट देण्यासाठी मराठी मौखिक चाचणी घेण्यात येत आहे. दोन दिवसांत ४००पैकी फक्त ८ उमेदवार नापास झाले. ३६७ रिक्षा चालकांनी मराठी भाषेची चाचणी उत्तीर्ण केली.

रिक्षा परमिट वाटपासाठी सोमवारपासून प्रत्येक दिवशी २०० रिक्षा चालकांच्या मौखिक परिक्षा आरटीओकडून घेण्यात येत आहे. मंगळवारी २०० रिक्षाचालकांची परीक्षा घेण्यात आली. दोन टेबलांवर मोटार वाहन निरीक्षक व पत्रकार यांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात येत आहे. या चाचणीत रिक्षाचालकांना आठवीच्या बालभारती पुस्तकातील परिच्छेद; तसेच नागरिकशास्त्र विषयातील 'आमची राज्यघटना' यातील परिच्छेद वाचून दा‌खवावा लागत आहे.

सोमवारी २०० आणि मंगळवारी २०० रिक्षा चालकांसाठी तोंडी चाचणी ‌घेण्यात आली. पुष्पक मंगल कार्यालयात ही चाचणी घेण्यात आली. सोमवारी घेतलेल्या चाचणीत सात जण अनुत्तीर्ण आणि १७७ जण उत्तीर्ण झाले. मंगळवारी २०० पैकी १९० जण चाचणीला उपस्थित होते. मंगळवारी केवळ एक रिक्षा चालक अनुत्तीर्ण झाला.

ऊर्दू माध्यमातून शिक्षण घेतलेल्या अनेक उमेदवारांनी मराठीचे चांगल्या पद्धतीने वाचन केले. काही उमेदवारांना, 'तुम्हाला मराठी समजते का,' असा प्रश्न विचारण्यात आला. 'मराटी समजती,' असे हिंदीत उत्तर दिले. त्यावर मोटार वाहन निरीक्षकाने, 'माझ्या शेतात पीक चांगलं आलं आहे,' याचे हिंदीत भाषांतर करण्यास सांगितले. त्यावर उमेदवाराने इकडे-तिकडे पाहून, 'पीक अच्छा आया... खेत मे पीक अच्छा आया,' अशी उत्तरे दिली.

तिने घडाघडा वाचले मराठी
सोमवारी एक मुस्लिम महिला चाचणी देण्यासाठी आली होती. 'तिला काहीच वाचता येणार नाही,' असेच अन्य उमेदवारांना वाटले. मोटारवाहन निरीक्षकाने महिलेला पुस्तकातील एक पान काढून वाचायला सांगितले. या महिलेने मराठी बालभारतीचा पुस्तकातील परिच्छेद घडाघडा वाचून दाखविला. त्यामुळे उपस्थितांना आश्चर्यच वाटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय अर्थसंकल्पातून विषमता उघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अर्थसंकल्पात आर्थिक स्थैर्य देताना सर्व क्षेत्रांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी 'डायरेक्ट टॅक्स रेव्हेन्यू', 'ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू' यात तफावत आहे. अनुदान वाढले आहे. यामुळेच आर्थिक विषमता स्वाभाविकपणे वाढल्याचे या अर्थसंकल्पातून दिसते, असे मत अर्थशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक डॉ. बी. एस. म्हस्के यांनी व्यक्त केले.

'बेट्रा'च्या (बँकिंग एज्युकेशन ट्रेनिंग अँड ‌रिसर्च अॅकॅडमी) मुख्य सभागृहात मंगळवारी 'अर्थसंकल्प-२०१६' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. म्हस्के बोलत होते. यावेळी 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक धनंजय लांबे, मराठवाडा जनता विकास परिषदेचे सचिव सारंग टाकळकर, 'बेट्रा'चे अध्यक्ष व महाबँकेचे माजी संचालक देविदास तुळजापूरकर आदींची उपस्थिती होती.

डॉ. म्हस्के म्हणाले, 'यंदाच्या अर्थसंकल्पातून वित्तीय तूट, आर्थिक विषमता दर्शवली जात आहे, पण तरीही यंदा परिवहन, वीज, कृषी, शिक्षणावरही भर दिला आहे. आर्थिक स्थैर्य आणि राजकीय स्थैर्य या दोन बाबी अर्थसंकल्पातून स्पष्टपणे अधोरेखित होत आहेत. वस्तुंच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यात अर्थमंत्री यशस्वी झालेले नाहीत. कृषी, शिक्षण, नोकरदार वर्गाकडून थेट आणि अप्रत्यक्ष कर वसुलीचा प्रयत्न केला गेला आहे. टॅक्स रेव्हेन्यू, टॅक्स डिफिशिएट आणि नॉन एक्सपेंडिचर यांचा ताळमेळ बसवण्यात हा अर्थसंकल्प अयशस्वी ठरतो.

'मटा'चे निवासी संपादक धनंजय लांबे म्हणाले, 'भारताने १९९०मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. त्या वर्षानंतर प्रत्येक सरकारने ते कायम ठेवले. ग्रामीण भागाला कमी महत्त्व आणि शहरी भागाला सवलती सोयीसुविधा देण्याचा नेहमीच प्रयत्न झाला, पण जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणामुळे नेहमीच विसंगती वाढत गेली. तीच विसंगती या बजेटमध्येही दिसते. एकीकडे रेल्वेचे डब्बे तुटलेले, डबल लाइन नाही आणि दुसरीकडे बुलेट ट्रेन प्रयत्न केला जात आहे. देशात कशाची गरज आहे आणि कशाची नाही, याचा विचार बजेटमध्ये केला गेला नाही. बजेट वरकरणी कृषी, पायाभूत सुविधा देणारे वाटत आहे, परंतु याबाबत अधिक सखोल तपशील अजून आलेला नाही. एकीकडे आपल्याच राज्यात ४० हजार कोटींचा स‌िंचन घोटाळा होतो आणि देशासाठी फक्त २० हजार कोटींची तरतूद सिंचनावर होते हे काय आहे?'

गरिबी निर्मूलनासाठी काहीच झालेले नाही. अर्थसंकल्प शहरी नागरिकांना समोर ठेवून सादर करायचा हाच यामागे उद्देश दिसतो. एकीकडे महात्मा गांधींचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे स्मार्ट सिटींसाठी तरतूदी करायच्या यात नक्कीच विसंगती असल्याचेही लांबे म्हणाले.

टाकळकर म्हणाले, अर्थसंकल्प शेती, व्यापार आणि नोकरदार यांना दिलासा देणारा असला तरी पर्यटन, संरक्षण आणि महिलांसाठी यात काहीही विशेष दिले नाही. डायरेक्ट टॅक्स १ हजार कोटींनी तर इनडायरेक्ट टॅक्स १९ हजार कोटींनी वाढला आहे. अर्थसंकल्प 'अॅग्री' होईल की नाही, पण 'अॅग्र‌ि'कल्चरला दिलासा मिळेल, असे वाटते.

तुळजापूरकर यांनी समारोप केला. ते म्हणाले, 'नवीन आर्थिक धोरण स्वीकारण्याला आता २५ वर्षे होत आहेत. 'जरा कळ काढा, थोडे सोसा आगामी काळ चांगला असेल,' असे तत्कालिन अर्थमंत्री मनमोहन सिंग म्हणाले होते. त्या कळ सोसायलाही आता २५ वर्षे होत आहे. सरकारे बदलली, पण शासनात असलेल्या सचिवांनी सरकारमध्ये कोण माणसं आहेत, हे पाहून फक्त आकडेवारी बदलली असल्याचा आरोपही तुळजापूरकर यांनी केला. जगदीश भावठाणकर यांनी सूत्रसंचालन केले. के. एन. थिगळे यांनी स्वागत केले. रवी धामणगावकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अप्पासाहेब गायकवाडच्या तीन मिनिटांत २०६ बैठका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चित्तेगाव येथील कुस्तीपटू अप्पासाहेब गायकवाडने अवघ्या तीन मिनिटांत २०६ बैठका घालून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या विक्रमाची 'गिनिज बुक ऑफ रेकॉर्डस'मध्ये नोंद लवकरच होणार आहे. 'आर्थिक अडचणींमुळे मला राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू होता आले नाही. परंतु दंड बैठका मारण्याची सवय कायम ठेवली. मित्रांच्या प्रोत्साहनामुळे दंड बैठकात विक्रम नोंदवण्याची प्रेरणा मिळाली. तीन मिनिटांत २०६ बैठका मारण्याचा विश्वविक्रम नोंदवला याचा मला खूप आनंद आहे. भविष्यात पुशअपचा नवा विक्रम नोंदवायचा आहे,' असे सूतोवाच अप्पासाहेब गायकवाड यांनी 'मटा'शी संवाद साधताना केले.

मंगळवारी सकाळी सव्वासहा वाजता अप्पासाहेबांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर तासभर सराव केला. सकाळी ८.३८ वाजता बैठका घालण्यास सुरुवात केली. तीन मिनिटात त्यांनी २०६ बैठका घातल्यानंतर एक नवा विक्रम नोंदवल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर झळकत होता. अप्पासाहेबही या आनंदात सहभागी झाले. या विक्रमाची गिनिज बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये लवकरच नोंद होईल. गिनिज बुकच्या नियमानूसार हा विक्रम नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी अप्पासाहेब गायकवाडने एक सात ४९ मिनिटांत ४ हजार ४ बैठकांचा विक्रम आजही कायम आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् व युनिक वर्ल्ड रेकॉर्डसने त्यांच्या विक्रमाची नोंद घेतली आहे. त्यांच्या विक्रमाची दखल घेऊन व्हिएतनामच्या वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीतर्फे डॉक्टरेट बहाल करण्यात आली आहे

अप्पासाहेब गायकवाड हे मूळचे चित्तेगावचे. त्यांना वडील व माजी कुस्तीपटू लक्ष्मण गायकवाड यांच्याकडून कुस्तीचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला. लहानपणापासूनच कुस्तीची आवड जोपासूनही आर्थिक अडचणींमुळे अप्पासाहेब स्पर्धात्मक कुस्ती खेळू शकले नाहीत. मात्र, दशकभर यात्रेतील कुस्ती आखाडा त्यांनी गाजवला. कुस्तीमुळे दंड बैठका मारण्याची सवय कायम राहिली. कुस्तीबरोबरच कराटे व कबड्डी या खेळांतही त्यांचा हातखंडा आहे. कुस्तीमुळे त्यांची शारीरिक क्षमता वाढल्याने दंड बैठकात नवे काही करण्याची कल्पना पुढे आली. डॉ. मकरंद जोशी यांच्या मार्गदर्शनामुळे यात विक्रम करण्याचे त्यांनी निश्चित केले. वयाच्या ४२व्या वर्षीही ते नियमित एक तास व्यायाम करतात. अर्धा लिटर दुध, दोन अंडी, उडदाचे लाडू हा आपला आहार असल्याचे त्यांनी सांगितले.

विक्रमाने प्रेरणा
१६ जुलै २०१३ रोजी अप्पासाहेब गायकवाड यांनी १ तास ४९ मिनिटांत ४,००४ बैठकांचा विक्रम नोंदवला. या विक्रमाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् व युनिक वर्ल्ड रेकॉर्डस् यांनी घेतली. काही तांत्रिक अडचणींमुळे गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद होऊ शकली नाही. तीन मिनिटांत २०० बैठकांचा विक्रम इंग्लंडच्या आँद्रे कुरीन यांच्या नावावर होता. हा विक्रम मोडण्याचे आव्हान अप्पासाहेबांनी स्वीकारले. गेले वर्षभर त्यांनी या विक्रमासाठी कसून तयारी केली. तीन मिनिटांत दोनशेपेक्षा अधिक बैठका मारण्याची सवय झाल्यानंतर मंगळवारी (१ मार्च) अप्पासाहेबांनी तीन मिनिटांत २०६ बैठका मारून नवा विक्रम नोंदवला.

रात्रभर झोप नाही
आईच्या आजारपणामुळे अप्पासाहेबांचा सोमवारचा दिवस दवाखान्यात गेला. त्यामुळे त्यांना व्यवस्थित जेवताही आले नाही. त्यामुळे मंगळवारी विश्वविक्रम नोंदवण्याचे दडपण आल्याने रात्रभर झोपच लागली नाही, असे अप्पासाहेबांनी सांगितले. अप्पासाहेब गायकवाड यांच्याकडे चार म्हशी असून दुग्ध व्यवसाय हाच त्यांचा आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत आहे. घरीच दुधाची सोय असल्याचा पौष्टिक आहारासाठी फायदा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. मकरंद जोशी म्हणाले, 'अप्पासाहेब यांचे शरीर कसलेले आहे. दंड बैठका घालण्याची त्यांची क्षमता मोठी आहे. त्यामुळे दंड बैठकात नवा विक्रम स्थापन करता येऊ शकतो याची कल्पना आली. नियमित सरावामुळेच त्यांना हा विक्रम करता आला. गिनिज बुकमध्ये या विक्रमाची नोंद निश्चितच होईल.'

बैठकांच्या विक्रमामुळे पुशअपचा विक्रम नोंदवण्याची प्रेरणा मिळाली आहे. एक मिनिटात ८२ पुशअपचा विक्रम आहे. हा विक्रम आगामी काळात मोडण्याची इच्छा आहे.
- अप्पासाहेब गायकवाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही ‘ग्रेस गुण’

$
0
0

Sudhir.Bhalerao@timesgroup.com
औरंगाबाद ः दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांबरोबरच आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा क्रीडा गुण सवलत (ग्रेस गुण) मिळणार आहेत. त्याचप्रमाणे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धांमधील कामगिरीनुसार गुण देण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे.

राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या दहावी आणि बारावीच्या खेळाडूंना ग्रेस गुण देण्याबाबत सुधारित आदेश शिक्षण व क्रीडा विभागाने काढला आहे. क्रीडा धोरण समितीच्या नवीन शिफारशींनुसार आता क्रीडा गुण सवलतीचा लाभ नापास आणि पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. त्याचप्रमाणे, क्रीडा गुणांची सवलत ही फक्त दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित राहणार नाही. आता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही ग्रेस गुणांचा लाभ होणार आहे. याविषयीचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने प्रमाणित करून शाळेकडे पाठवायचा आहे. तसेच पहिली ते आठवी इयत्तेत शिकत असलेल्या व जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंना अनुक्रमे २५, ५०, ७५, १०० अधिक गुण देण्यात यावे अशी शिफारस करण्यात आलेली आहे. हे गुण विषयाच्या एकूण गुणाच्या बेरजेत धरावेत. तथापि गुणांची सरासरी शंभर टक्क्यांपेक्षा अधिक होऊ नये, असे शिफारशीत नमूद करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी भारतीय शालेय क्रीडा महासंघ पुरुस्कृत ४२ शालेय क्रीडा स्पर्धांमधील खेळाडूंना ग्रेस गुणांचा लाभ मिळणार आहे.


ग्रेस गुणांबाबतच्या शिफारशी
- १ जून ते २८/२९ फेब्रुवारी हा कालावधी ग्राह्य धरण्यात यावा.
- परीक्षा संपल्यानंतर आयोजित कोणत्याही क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना ग्रेस गुणांची सवलत देण्यात येऊ नये.
- एकापेक्षा अधिक खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे एकाच क्रीडा प्रकारातील प्रमाणपत्राचे गुण ग्राह्य धरावे.
- खुल्या गटातील क्रीडा स्पर्धा वाढीव क्रीडा गुणासाठी ग्राह्य धरण्यात येऊ नयेत.
- जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सांघिक क्रीडा प्रकारात कमीत कमी आठ संघ, तर वैयक्तिक क्रीडा प्रकारात कमीत कमी आठ खेळाडू सहभागी होणे आवश्यक आहे.
- राज्य संघटनांनी जिल्हा, विभाग व राज्यस्तर स्पर्धांचे प्रमाणपत्र वाटप करताना प्रमाणपत्रांची नोंद करणे आवश्यक आहे.
- निमंत्रित क्रीडा स्पर्धा ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
- प्रमाणपत्रावर कितवी राज्य स्पर्धा, स्पर्धेचा कालावधी, स्थळ, खेळाडूंच्या वयोगटाचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
- राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांच्या प्रमाणपत्रावर अध्यक्ष व सचिव यांच्यापैकी एकाची शाईची स्वाक्षरी असणे अनिवार्य आहे.
- राज्य संघटनेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धा या जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय अशा क्रमाने झाल्या असतील, तरच क्रीडा गुण सवलत देण्यात यावी.
- शालेय, ग्रामीण, महिला व इतर क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतलेल्या, प्राविण्य मिळवलेल्या व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक मिळवलेल्या खेळाडूंना वाढीव २५ गुण देण्यात यावेत.
- शालेय, ग्रामीण, महिला व इतर क्रीडा प्रकारांच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या व राज्य क्रीडा स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवलेल्या खेळाडूंना वाढीव २० गुण देण्यात यावेत.
- शालेय, ग्रामीण, महिला व इतर क्रीडा प्रकारांच्या राज्य क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंना वाढीव १५ गुण देण्यात यावेत.

दहावी व बारावी परीक्षेमुळे अनेक गुणवान खेळाडू हे खेळ सोडून देतात. त्याचा मोठा परिणाम क्रीडा क्षेत्रावर होतो. आता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही ग्रेस गुण मिळणार असल्याने खेळाडूंची संख्या घटणार नाही. या निर्णयाचे चांगले परिणाम हे आगामी काळात दिसू लागतील.
- राजकुमार महादावाड, क्रीडा उपसंचालक, औरंगाबाद विभाग.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभा अध्यक्षांकडून कामाची अचानक पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
गणोरी फाटा ते गणोरी रस्त्याच्या कामाची विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी बुधवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्याचे काम दर्जेदार करण्यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
गणोरी फाटा ते गणोरी या साडेचार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे दोन पुलासहित काम २०१५-१६ च्या अर्थसंकल्पातून मंजूर झालेले आहे. या कामाला अडीच कोटी रुपयांची मंजुरी आहे. मंजुरीनंतर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ९ नोव्हेंबर २०१५ रोजी भूमिपूजन करण्यात आले. फेब्रुवारीअखेपर्यंत दोन किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी बुधवारी औरंगाबादहून फुलंब्रीकडे जाताना अचानक गणोरी रस्त्याच्या कामाची पाहणी करण्याचे ठरविले व ताफा गणोरीच्या दिशेने वळविला. रस्त्याच्या कामाची पाहणी करून काम दर्जेदार व उत्तम झाले पाहिजे, दर्जेदार सामुग्रीचा वापर करावा, लांबी रुंदी इस्टिमेंट प्रमाणेच करा, आदी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदाराला दिल्या. यावेळी अधिक्षक अभियंता ए. बी. सूर्यवंशी, उपअभियंता अशोक ससाणे, उपअभियंता के. टी. वाघ, कनिष्ठ अभियंता संजय चौधरी, कंत्राटदार आशिष आनंद यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाला सरळीकरणास ताजनापुरात प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील ताजनापूर येथील नदीवरील नाला सरळीकरण व खोलीकरणाचे काम आमदार प्रशांत बंब यांनी स्वतः पोकलेन चालवून सुरू केले. येथे अडीच किलोमीटर अंतराचे सरळीकरण, खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी आमदार बंब यांनी पोकलेन मशीन उपलब्ध करून दिले आहे.
परंपरागत ओढे, नाले यांचे रुंदीकरण, सरळीकरण व खोलीकरणाचे कामे करण्यात येत असून पुढील टप्प्यात या सर्व नाल्यांवर सिमेंट बंधारे उभारून पावसाचे पाणी अडवले जाणार आहे. कमी पर्जन्यमानाच्या अवस्थेत सुद्धा आठ महिने पुरेल एवढे पाणी साठवले गेल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. नाल्याचे पाणी मुरल्यामुळे आजूबाजूच्या बोअर व विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाल्याचा यापूर्वीचा अनुभव आहे.
या कामामध्ये लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन आमदार बंब यांनी केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर, तालुका कृषी अधिकारी वैजीनाथ हांगे, लघुसिंचन सहायक अभियंता वसंत गालफडे, पंचायत समिती सदस्य डी. डी. काळे, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे, किशोर नलावडे, रज्जाक पठाण, किशोर काळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता बांधकाम चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
डॉ. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नाथसमाधी मंदिर कमान या रस्त्याचे त्रयस्थ संस्थेकडून तपासणी केल्याशिवाय कंत्राटदाराला देयक देऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या रस्त्याच्या कामाबद्दल शहरातील नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.
बसस्थानकाकडून नाथ समाधी मंदिराकडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता नगरपालिकेच्या माध्यमातून सिमेंटमध्ये बांधण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामासाठी तेरावा वित्त आयोग निधीतून ४१ लाख रुपये खर्च केला असून माऊली कन्ट्रक्शनला कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, कंत्राटदाराने अंदाजपत्रकानुसार रस्ता केल्या नसल्याबद्दल भूमिपूत्र विकास परिषदेचे हरीपंडित नवथर, बंडेराव जोशी, जयाजीराव सूर्यवंशी आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. काही तक्रारी मंत्रालय स्तरावरसुद्धा पाठवण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी राहूल सूर्यवंशी यांना त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लेणापूरमध्ये पहिल्यांदाच मिळाले रेशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सोयगाव तालुक्यातील लेणापूर येथे स्वस्त धान्य दुकान स्थापन करण्यात आले आहे. येथील नागरिकांना देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावातच रेशन मिळले. हे दुकान सुरू करण्यासाठी नागरिकांनी तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
लेणापूर येथे सुरू झालेल्या स्वत धान्य दुकानाचे उदघाटन माजी सरपंच दादाराव झोंड यांच्या हस्ते करण्यात आले. लेणापूर हे गाव जगप्रसिद्ध अजिंठा जवळ आहे. खोल दरीत असल्यामुळे या गावाला जाण्यासाठी रस्ता नव्हता. खासदार रावसाहेब दानवे यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात लेणापूर गावाला पिंपळदरी वाडा मार्गे रस्ता मंजूर करून घेतला.
ते केंद्रात मंत्री झाल्यानंतर येथील नागरिकांनी स्वत धान्य दुकानासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा केला. झोंड यांनी पाठपुरावा केल्यानंतर महिला बचत गटाला स्वत धान्य दुकान मंजूर करण्यात आले. दुकान मंजूर करण्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे, जयप्रकाश चव्हाण, इद्रिस मुलतानी, सुरेश बनकर यांनी साह्य केल्याचे झोंड यांनी सांगितले. उदघाटन कार्यक्रमाला सरपंच उषाबाई लांडगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७० टक्के संस्था हिशेबच देत नाहीत

$
0
0

म. टा. प्रतिपादन, औरंगाबाद
शहरातील सत्तर टक्के संस्था, न्यास हिशेब सादर करत नाहीत यामुळे आम्हाला त्यांच्यावर वारंवार कारवाई करावीच लागते. शिवाय सध्या न्यास, संस्थांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीत होत नसल्याने शिबिर घऊन विश्वस्तांना मार्गदर्शन करण्याची वेळ आली आहे, अशी खंत धर्मादाय सहआयुक्त व्ही. एस. पाडळकर यांनी व्यक्त केली.
समर्थनगर येथील वरद गणेश मंदिरात बुधवारी (२ मार्च) मंदिर व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी पाडळकर बोलत होते. या शिबिराला धर्मादाय उपायुक्त व्ही. आर. सोनुने, सहायक धर्मादाय आयुक्त एम. एस. कोचर, सहायक धर्मादाय एस. व्ही. एच. कादरी, गणेश सभेचे अध्यक्ष चंद्रकांत मुये, उपाध्यक्ष प्रकाश राशीनकर आदींची उपस्थिती होती.
'मंदिर व्यवस्थापन व्यवस्थित कसे करावे, त्यासाठी काय केले पाहिजे, काय न केले पाहिजे यावर उहापोह व्हावा यासाठी हे शिबिर आहे. न्यास, संस्था यांचा हिशेब ते अगदी विश्वस्तांनी घ्यावयाच्या दक्षता आदींबाबत सखोल मार्गदर्शन घ्यावे. तुळजापूर, माहूर आदी देवस्थांनाचा कायापालट करून धर्मादाय आयुक्त काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे, असे पाडळकर यांनी सांगितले. न्यासाची हिशेबपत्रके, अंदाजपत्रके याबाबत लेखापाल व्ही. आर. जाधव यांनी मार्गदर्शन केले. न्यासाचे निरीक्षण आणि चौकशी याबाबत निरीक्षक ए. पी. पाटील यांनी विवेचन केले. धार्मिक उत्सवाच्या वेळी विश्वस्तांनी घ्यावयाच्या दक्षता यावर निरीक्षक टी. डी. तायडे यांनी भाष्य केले. यावेळी सूत्रसंचालन के. डी. शिंदे यांनी केले. आभार पी. बी. जोशी यांनी मानले. यावेळी शहरातील विविध मंदिरांचे विश्वस्त, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीतील डॉक्टरांचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यात प्रथमच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) झालेल्या अवयवदानाने तब्बल चारजणांना जीवनदान, तर दोघांना नेत्रदान मिळाले. यानिमित्त अवयवदान यशस्वी करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा सत्कार युवा सेनेच्या वतीने मंगळवारी (एक मार्च) घाटीमध्ये करण्यात आला.
या वेळी युवा सेनेचे नगरसेवक ऋषिकेश खैरे, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, गनू पांडे, अभ्यागत समितीचे नारायण कानकाटे, संजय वाहुल, हिरा सलामपुरे, किरण तुपे, सतीश पवार, नारायण सुरे, राजू भैरव आदींची उपस्थिती होती. वैजापूर येथे फर्निचरचे काम करणाऱ्या गणेश शंकर घोडके हा २७ वर्षांचा तरुण ब्रेन डेड झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. ही अवयवदानाची शस्त्रक्रिया घाटीत शुक्रवारी झाली. लवकरच गणेश याच्या नातेवाईकांचाही सत्कार करणार असल्याचे ऋषिकेष खैरे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्यासह डॉ. सरोजिनी जाधव, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. सुहास जेवळीकर, डॉ. कानन येळीकर, डॉ. मंगला बोरकर, डॉ. वर्षा रोटे, डॉ. सुधीर चौधरी, डॉ. गायत्री तडवळकर, डॉ. जीवन राजपूत, डॉ. जिरवणकर, डॉ. कैलास चिंतने, डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. मनोज अपसिंगेकर, डॉ. ज्योती कुलकर्णी, डॉ. कैलास झिने, डॉ. आनंद थोरात, डॉ. राजन बिंदु, डॉ. अजित दामले, डॉ. पर्सी जिल्ला, डॉ. अनिल पुंगळे, डॉ. संजय वाकुडकर, डॉ. विनायक नाणेकर, डॉ. वैशाली उने, डॉ. आफरीन, डॉ. राजश्री वीरशैव, डॉ. आशिष राऊत, डॉ. विश्राम पांडे, डॉ. कडू, डॉ. रोहिणी, डॉ. खंडेलवाल आदींसह वैद्यकीय विद्यार्थी, निवासी डॉक्टर, परिचारिका-कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जपानी भाषेचे वर्ग पालिकेने सुरू करावेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेने जपानी भाषेचे वर्ग सुरू करावेत, अशी अपेक्षा जपानचे काउंन्सिल जनरल योशियाकी इटो यांनी व्यक्त केली. त्यांनी बुधवारी महापालिकेला भेट देऊन महापौर त्र्यंबक तुपे, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याशी चर्चा केली. यावेळी स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, पॉलिटिकल अँड जनरल अफेअर्सचे प्रमुख आर. के. शर्मा उपस्थित होते.
जपानचे पर्यटक औरंगाबादमध्ये मोठ्या संख्येने येतात. त्यांना औरंगाबाद परिसराची माहिती जाणून घेण्यासाठी गाइडची आवश्यकता असते. जपानी भाषा शिकून युवक गाइडचे काम करून रोजगार मिळवू शकतील, अशी सूचना योशियाकी इटो यांनी व्यक्त केली. त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत महापौरांनी जपानी भाषेचे वर्ग पालिकेतर्फे सुरू करता येतील का याची चाचपणी करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. अजिंठा, वेरुळकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, सौरउर्जेवर आधारित उपक्रमांची सुरुवात करणे आदी विषयांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्त शिवारसाठी साडेचार कोटींचा निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेची कामे प्रभावीपणे व्हावीत, यासाठी जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने राज्य सरकारकडे अतिरिक्त निधीची मागणी केली होती. तीन कोटी आणि एक कोटी ६३ लाख रुपये, असे दोन प्रस्ताव मंजूर झाले आहेत.
सिंचन विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या वाट्याला आलेली जलयुक्त शिवार योजनेची कामे केली जातात. चालू आर्थिक वर्षात या अंतर्गत अनेक कामे झाली. दुष्काळी परिस्थिती आणि आगामी सिंचन क्षमता वाढविण्यासाठी सिंचन विभागाकडे राज्य सरकारकडे तीन कोटी आणि एक कोटी ६३ लाख, अशा दोन प्रस्तावांद्वारे निधीची मागणी केली होती. तो निधी प्राप्त झाला असून त्यातून जलयुक्त शिवारची कामे होणार आहेत. ई-निविदा पद्धतीनेच ही कामे मंजूर केली जाणार आहेत. गेल्या वर्षभरात ४३ कामे याच पद्धतीने मंजूर झाली आणि पूर्ण झाली. त्यातून एक कोटी रुपयांची बचत झाली. मूळ निविदेपेक्षा कमी दराने भरली गेलेली ही कामे दर्जात्मक झाल्याचा दावा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांनी दिला आहे.
जलयुक्त शिवार योजनेतून निवडलेल्या गावांमधून नव्याने सिमेंट नाला बंधारे उभारण्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करून गावे व कामांची निवड, निविदा प्रक्रिया या महिनाअखेर पूर्ण करावी लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातून ३० नवीन कामे होणे अपेक्षित आहे. वर्ष २०१३-१४ च्या नवीन दरसूचीप्रमाणे ही कामे होतील. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाची मान्यता घेण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रात्यक्षिकासाठी मागितले पैसे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. परीक्षा केंद्रावर कॉपी करण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार भोकरदन तालुक्यातील एका मुलीने काही दिवसांपूर्वी केली होती. हा प्रकार ताजा असताना पैठण तालुक्यातील एका पालकाने बारावीच्या परीक्षेेत प्रात्यक्षिकासाठी पाल्याकडून पैसे घेतल्याची लेखी तक्रार मंडळाकडे केली आहे. या निनावी पत्रात किती तथ्य आहे, याचा शोध मंडळाकडून घेण्यात येत आहे. प्राथमिक स्तरावर यात तथ्य नसल्याचा दावा मंडळाचे अधिकाऱ्यांनी केला आहे.

शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावी परीक्षांना १८ फेब्रुवारीपासून तर, दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू झाली आहे. परीक्षेत कॉपी करू देण्यासाठी पैसे मागितले, उत्तीर्ण करण्यासाठी पैसे मागितले जातात, अशी चर्चा होत असते, परंतु यावर्षी अशा प्रकारांबाबत मंडळाकडे लेखी तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे मंडळ खडबडून जागे झाले आहे. 'तुला परीक्षेत कॉपी करायची असेल तर, दोन हजार रुपये द्यावे लागतील. ते केंद्रप्रमुखांना द्यायचे आहेत,' अशी मागणी कॉलेजमधून होत असल्याची तक्रार भोकरदन तालुक्यातील विद्यार्थिनीने केली. या तक्रारीची शहानिशा होत नाही तोच अशा प्रकारचे आणखी एक पत्र मंडळाकडे आले आहे. एका पालकाचे हे निनावी पत्र पाठविले आहे. परीक्षा केंद्रावरील एका शिक्षकाने प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी प्रत्येकी हजार रुपये घेतल्याचे पालकाने तक्रारीत म्हटले आहे. आपल्यापाल्यासह इतरा दहा जणांकडे पैसै मागितल्याचे पालकाने पत्रात म्हटले आहे. मंडळाने या पत्राबाबत चौकशी करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पत्र निनावी असल्याने त्यात तथ्य नसल्याचा दावा मंडळाकडून केला जात आहे.

'त्या' पत्राची चौकशी गुलदस्त्यात
भोकरदन तालुक्यातील विद्यार्थिनीने पाठविलेल्या पत्रातील तक्रारीची मंडळाने भरारी पथकाला पाठवून चौकशी केली. त्याचा अहवाल गुलदस्त्यात आहे. याबाबतही मंडळाला कोणता ठोस पुरावा मिळालेला नाही. त्यानंतर नव्याने आलेल्या पत्रातही तथ्य नसल्याचा दावा मंडळाचे अधिकारी करत आहेत.

परीक्षेदरम्यान आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल मंडळ घेते. कॉपीबाबतही तक्रारी आल्या होत्या. त्याचप्रमाणे या लेखी तक्रारीचीही आम्ही चौकशी केली, परंतु त्यात तथ्य नसल्याचे समोर आले आहे. तरीही बैठी पथके, भररी पथकांना अशा केंद्रावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- सुखदेव डेरे,
विभागीय अध्यक्ष, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडूळचे प्रवासी वाढल्याचा साक्षात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना शहरापासून दूर असलेल्या बीड रस्त्यावरील आडूळ येथून शहरात येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याचा 'दिव्य संकेत' मिळाला आहे. शिवाय आडूळ येथील काही जणांनी मागणीही केली होती. यावरून औरंगपुरा ते आडूळ, अशी सिटीबस सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.
शहरात सध्या ४६ सिटीबसद्वारे सेवा दिली जात आहे. काही नवीन मार्गावर लोकांच्या मागणीवरून बस सुरू करण्यात आली मात्र, प्रवासी मिळत नसल्याचे कारण दाखवून बस बंद करण्यात आल्या. पण, औरंगपूरा ते आडून या मार्गावर बस सुरू करण्यात आली आहे. आडूळ येथून येणाऱ्या प्रवाशांमध्ये विद्यार्थ्यांची मोठी आहे. आडूळपर्यंतच्या मार्गावरील गावे व सातारा परिसरातील प्रवाशांना या बसचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे सिटीबस सुरू करावी, जेणेकरून उत्पन्न वाढले, असा प्रस्ताव आडूळ येथील काही जणांनी एस. टी. महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाला दिला. या मागणीच्या आधारे प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाने विभाग नियंत्रकांना औरंगपुरा ते आडूळ सिटीबस सुरू करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. त्यावरून ही सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान, सिटीबसचा तोटा साडेसात कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तोटा वाढत असला तरी, महामंडळाने सिटीबसचे प्रयोग बंद केलेले नाहीत, हे या वरून दिसते.
औरंगपुरा ते आडूळ सिटीबस शहानूरमियॉ दर्गा, संग्रामनगर उड्डाणपूल, सातारा परिसर, देवळाई चौक यामार्गे जाणार आहे. या मार्गाचे सर्वेक्षण केल्यानंतर बस सुरू केली जाणार आहे. या मार्गावरील प्रवासी वाढले आहेत व मागणी वाढल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरटीओतर्फे एस. टी. महामंडळाला सिटीबस चालवण्यासाठी विशेष परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिका हद्दीबाहेर १५ किलोमिटरपर्यंत सिटीबस चालवता येते. हा नियम डावलून आडूळपर्यंत बस चालवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बारावीत कॉपीचे द्विशतक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दहावी, बारावी परीक्षेत यंदा 'कॉपीमुक्त परीक्षा उपक्रम' बारगळल्याचे समोर आले आहे. बारावीच्या परीक्षेत कॉपीने द्विशतक पूर्ण केले आहे. त्यात सर्वाधिक, ११९ कॉपीबहाद्दर औरंगाबाद जिल्ह्यात अाहेत.

माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या दहावी, बारावी परीक्षेत कॉपीमुक्तीचा उपक्रम मागे पडल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यातील कॉपी प्रकरणांमुळेच राज्यात २००९पासून महसूल विभागाच्या मदतीने कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची सुरुवात झाली. औरंगाबाद विभागात यंदा परभणी, हिंगोली वगळता इतर जिल्ह्यांत अभियान कागदावरच असल्याचे समोर येत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील केंद्रांवर कॉपी करण्याचे प्रमाण वाढल्याचे पथकांच्या कारवाईवरून समोर आले आहे. २ मार्चपर्यंत बारावीच्याच कॉपी प्रकरणांनी द्विशतकांचा आकडा पार केला आहे. आजपर्यंत बारावीच्या परीक्षेत विभागात २०९ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. सर्वाधिक विद्यार्थी हे औरंगाबाद जिल्ह्यातील आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ने पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला ग्रामीण भागातील केंद्रांवर खुलेआम कॉपी सुरू असल्याचे प्रकाशात आणले. यानंतर मंडळाने जिल्हाधिकऱ्यांना पत्र पाठवूत लक्ष देण्याची विनंती केली.

मागील वर्षी १०८
मागील वर्षी बारावी परीक्षेत कॉपी प्रकरणी १०८ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली होती. यंदा दहा पेपरलाच २०९ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. यातही दोन भरारी पथकांकडूनच सर्वाधिक कारवाई करण्यात आली. परीक्षा संपेपर्यंत आकडा किती वाढतो याकडे लक्ष लागले आहे.

परभणी, हिंगोलीत तालुका बदली
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा यासाठी तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी भरारी, तालुका पथक सदस्यांची नेमणूका तालुका बदलून केल्या. तालुका बदली केल्यामुळे कॉपीबहाद्दरांवर वचक बसला. ही परंपरा यंदाही सुरू आहे.

कॉपीची प्रकरणे
औरंगाबाद..........११९
बीड..................२६
जालना...............६२
परभणी...............२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेशनवर प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू

$
0
0

औरंगाबाद : रेल्वे स्टेशनवरील दुचाकी पार्किंगशेजारील मोकळ्या मैदानावर एका भिकारी महिलेने बुधवारी उघड्यावर मुलाला जन्म दिला. त्यानंतर ती मरण पावली. मात्र, चार्ली पथकामुळे बाळ वाचले. या महिलेच्या मृतदेहासोबत घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवलेले तिचे नातेवाईक बाळाला घेऊन पसार झाले.
क्रांतिचौक पोलिस ठाण्याच्या चार्ली पथकासा गस्त घालताना पार्किंगशेजारच्या रेल्वे युनियन कार्यालयासमोर एका महिलेला पुरुष मांडीवर घेऊन बसल्याचे दिसले. पथकातील नितीन घोडके, दिनेश भुरेवाल, शुभम भालेराव व कल्याण निकम यांनी चौकशी केल्यानंतर महिला हालचाल करत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी अॅम्बुलन्स मागवून घेतली. त्यातील डॉक्टरांने तपासून महिलेला मृत घोषित केले. या महिलेचे नाव शाहीन असून तिने पहाटे मुलाला जन्म दिला, त्यानंतर ती बेशुद्ध पडल्याचे तिच्यासोबतच्या पुरुषाने सांगितले. महिलेचा मृतदेह, तिचा पती, बहिणी, सासरा आणि इतर नातेवाइकांना अॅम्बुलन्समधून घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. तेथे शवविच्छेदन गृहात मृतदेह सोडून नातेवाईकांना बाळाला घेऊन पळ काढला. याप्रकरणी घाटी चौकीत नोंद घेण्यात आली आहे.
पार्किंगच्या कामासाठी काही खासगी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडे याप्रकाराबद्दल विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पार्सल विभागासमोर अज्ञात व्यक्तीने काही बॉक्स ठेवले आहेत, त्याबद्दलरी कंत्राटदार व त्याच्या कर्मचाऱ्याकडे माहिती नाही. त्यांनी याबद्दलची माहिती लोहमार्ग पोलिस, आरपीएफ किंवा पोलिसांना दिली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयटीआय’मध्ये भरती मेळावे सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांसाठी शिकाऊ उमेदवार म्हणून विविध कंपन्यांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विभागातील विविध आयटीआयमधील ६ एप्रिलपर्यंत हे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. दहावी अनुत्तीर्ण आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही मेळाव्यात संधी मिळणार आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातर्फे वर्षभरात दोन वेळा भरती मेळाव्याचे आयोजन केले जाते. यंदा २६ फेब्रुवारी ते ६ एप्रिल यादरम्यान मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. विभागातील विविध आयटीआयमध्ये हे मेळावे होत आहेत. मंगळवार (१ मार्च) रोजी जालना येथील शासकीय आयटीआयमध्ये हा मेळाव्या घेण्यात आला. औरंगाबादमध्ये अप्रशिक्षित उमेदवारांसाठी विभागीय पातळीवरील भरती मेळावा १४ मार्च रोजी तर प्रशिक्षित उमेदवारांसाठी ५ व ६ मार्च रोजी मेळावा होणार आहे. मेळाव्यातून विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारम्हणून पहिल्यांदा नोकरीची संधी मिळते. त्यासाठी विविध शंभरपेक्षा अधिक कंपन्या मेळाव्यात सहभाग घेणार असल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले. या मेळाव्याच्या माध्यमातून २ हजार २४४ जागांवर भरती करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

विभागीय पातळीवर झालेल्या बैठकीत सहसंचालक डॉ. रवींद्र बाळापुरे यांनी याबाबतचा आढावा घेतला. यावेळी अशोक रंगारी, पूजा राऊत, मंगला पवार यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वासावर उभा गृहोद्योग

$
0
0

Unmesh.Deshpande@timesgroup.com
बीड बायपास रोडवर असलेल्या नाईकनगरातील रामकृष्ण हाउसिंग सोसायटीमध्ये जया साब्दे राहतात. त्या, त्यांचे पती, दीर आणि जाऊ असा त्यांचा परिवार. त्यांना एक मुलगा, एक मुलगी. त्यांचे दीर पंधरा वर्षांपासून अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यांना अचानक अपंगत्व आले आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी जया आणि जगदीश साब्दे यांच्यावर आली. जया यांच्या जाऊ नोकरी करतात. त्यांनाही अपंगत्व आले आहे. या दोघांनाही सांभाळून नेत साब्दे यांनी आपला व्यवसाय उभारला. आता तो वाढीच्या मार्गावर आहे.

जया यांच्या माहेरी किंवा सासरी कुणीही गृहोद्योग सुरू केला नव्हता. त्यांच्या वडीलांनी एक पतसंस्था स्थापन केली. त्यांनी आपले संपूर्ण घर या पतसंस्थेला देऊन टाकले. पतसंस्थेचा लाभ घेऊन आपल्या मुला-मुलींना उभे करण्याचे काम त्यांनी केले नाही. तुम्हाला जे काही करायचे असेल ते स्वतःच्या कष्टाने करा, असे त्यांनी मुलांना सांगितले. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे आणि नोकरी करायची नाही, असा पक्का निश्चय केल्यामुळे त्यांनी घरातल्या घरातच काहीतरी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी उद्योग सुरू करण्याचे ठरविले. त्यातून त्यांनी तीन वर्षांपूर्वी सिद्धी फ्लोअर मील हा उपक्रम सुरू केला. विविध प्रकारचे पीठ तयार करून त्याची विक्री करण्याचा व्यवसाय यातून सुरू झाला. सातारा-देवळाईसह आडगाव, बाळापूर, गांधेली या गावातील महिलाही सिद्धी फ्लोअर मीलमधून विविध प्रकारचे दळण नेऊ लागल्या. महिलांच्या झालेल्या ओळखीचा फायदा करून घेण्याचे जया साब्दे यांनी ठरविले आणि त्यांनी फ्लोअर मीलच्या जोडीला सहा महिन्यांपूर्वी गृहोद्योग सुरू केला. त्यांचे पती जगदीश यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. या व्यवसायात तेजी कमीच आहे. त्यामुळे त्यांनी जयांच्या गृहोद्योगात हातभार लावण्याचे काम सुरू केले. महागाईच्या काळात एकट्या दुकट्यावर घर चालणे कठीण आहे. त्यामुळे आपण स्वतःच गृहोद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला सासरच्या, माहेरच्यांनी साथ दिली, असे जया साब्दे सांगतात.

पारंपारिक पदार्थ तयार करून त्या त्यांची विक्री करतात. त्यात बाजरीच्या खारोड्या, कुरडया, तांदळाचे पापड, पोह्याचे पापड, मुगाचे-मटकीचे पापड, सोयाबीन, नाचणीच्या शेवया असे विविध पदार्थ तयार करून त्या त्यांची विक्री करतात. शेवया तयार करताना त्यात रवा-मैदा आपण वापरत नाही. शेवयात रवा-मैदा वापरणे योग्य नाही, असे त्या सांगतात. गव्हाची सुजी तयार करून त्यापासून शेवया तयार करण्यात येतात. अशा शेवया फार कमी ठिकाणी मिळतात आणि त्या आम्ही मुद्याम तयार करतो, अशी माहिती त्यांनी दिली.

आम्ही तयार केलेल्या दाळबट्टीच्या पिठाला अधिक मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे पती मुळचे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याच्या पालखेडचे. पालखेडला त्यांच्या घरी पिठाच्या तीन-चार गिरण्या आहेत. त्याच प्रकारच्या गिरण्या औरंगाबादेत घेण्याची त्यांची कल्पना होती. त्यांनी ही कल्पना जया यांना बोलून दाखवली. जया यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता त्यांनी पिठाची गिरणी सुरू केली. तीन वर्षांत त्यांच्या कामाची प्रसिद्धी झाली. औरंगाबाद शहराच्या विविध भागातील नागरिक पीठ दळूण घेण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. नवरात्रीच्या काळात २० प्रकारच्या उपासाच्या भाजण्या तयार करून साब्दे त्यांची विक्री करतात. सध्या मर्यादित स्वरूप असलेल्या गृहोद्योगाला मोठे आकाश प्राप्त करून देण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी 'मुद्रा लोन'चा मार्ग स्वीकारण्याच्या विचार त्यांच्या मनात आहे. अपंग दीर, त्यांची पत्नी आणि आपला परिवार या सर्वांना सांभाळण्याची जबाबदारी जया यांच्यावरच आहे. 'प्रामाणिकपणा आणि विश्वास याच्या बळावर आपण इथपर्यंत पोचलो. दोन पैसे कमी द्या, पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी कोणत्याही पदार्थात तुम्हाला फसवणार नाही,' असे त्यांचे प्रत्येक ग्राहकाला सांगणे असते. हाच विश्वास आणि प्रामाणिकपणा आपल्याला एक दिवस मोठे व्हायला मदत करेल, असा त्यांना विश्वास आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार म्हणजे बोलका पोपट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यात गंभीर दुष्काळ पडला आहे. वाड्या, वस्त्यांमधील नागरिक हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. राज्य सरकार मात्र त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. हे सरकार म्हणजे बोलका पोपट आहे. अपयश झाकण्यासाठी सरकार लक्ष वेधू पाहत आहे. या विरोधात भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे शुक्रवारी विभागीय आयुक्तालयावर मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जनतेचा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.
आमदार पाटील म्हणाले,'औरंगाबाद जिल्ह्यातील काही गावांना मी भेट दिली. तेथील परिस्थिती अतिशय विदारक आहे. पिण्यासाठी पाणी नाही, शेतात पीक नाही, हाताला काम नाही, जनावरांचे हाल आहेत. अशा परिस्थितीत सरकारने नागरिकांना दिलासा देण्याऐवजी दुसऱ्याच उपाययोजनांचा धडाका लावला आहे. प्रत्यक्षात शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कारागीर यांना स्थायी असे काहीतरी दिले गेले पाहिजे. पुढचे तीन महिने कसे जाणार ?, असा प्रश्न आहे. भयानक दुष्काळामुळे पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा याचा प्रश्न बिकट आहे. खरीप व रबी हाती न लागल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या खूपच पिचलेला आहे. विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. बँका व खासगी सावकारांच्या कर्जामुळे शेतकऱ्यांचे कर्जबळी जात आहेत. भाजप-शिवसेना पांढरपेशा प्रवृत्तीचे धनिक धार्जिणे सरकार दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांची गंभीर दखल घेत नाही, अशा या बेफिकिर प्रवृत्तीविरुद्ध संघटित चळवळ करण्याशिवाय पर्याय नाही. भारतीय शेतकरी कामगार पक्षाने दुष्काळाच्या भयाण संकटात सापडलेल्या जनतेला संघटित करून सरकारविरोधी प्रभावी जनचळवळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी चार मार्च रोजी दुपारी तीन वाजता विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषद मैदानावरून मोर्चाची सुरवात होईल, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विवेक पाटील, विकास शिंदे, राजू कोरडे आदी उपस्थित होते.
खरीप व रबी पिकांची १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी, शहरे व गावांत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कारागिरांना कर्जमाफी व वीजबिल माफ करावे, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी दोन वेळच्या जेवणाची विनामूल्य व्यवस्था करावी, रेशन दुकानातून जीवनावश्यक वस्तूंचा स्वस्त दरात पुरवठा करावा, दुष्काळाचे कायमस्वरुपी निर्मूलन करण्यासाठी समन्यायी वाटप धोरणाची अंमलबजावणी करावी, स्वामीनाथन अहवाल १०० टक्के स्वीकारावा, मध्यान्ह भोजन योजना सलग जुलैपर्यंत सुरू ठेवावी या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images