Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पासपोर्टसाठी पावणेतीन कोटींचा भुर्दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पासपोर्ट काढण्यासाठी शहरातून दररोज किमान २५ जण मुंबईला जात आहेत. त्यांच्यासोबत आणखी एक जण असतो. त्यांना एक दिवसासाठी सरासरी ४४०० रुपये खर्च करावे लागत आहेत. या हिशेबाने वर्षाकाठी शहरातील नगारिकांना सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा भुर्दंड पडत आहे.

औरंगाबाद येथील पासपोर्ट कार्यालयाचे मुंबई येथे स्थलांतर करण्यात आले आहे. यामुळे औरंगाबाद येथील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी मुंबईला जावे लागते. पासपोर्ट काढणारी व्यक्ती आणि त्याचा सहकारी यांचा प्रवास, जेवण, कार्यालयीन खर्च, टॅक्सी आदीसाठी सरासरी ४४०० रुपयांचा खर्च होतो. दररोज ५२ जणांचा एक दिवसाचा खर्च एक लाख १४ हजार ४०० रुपये खर्च आहे. वर्षभरातील कार्यालयीन कामकाजाच्या २५१ दिवसात सुमारे दोन कोटी ८७ लाख १४ हजार ४०० रुपये खर्च होत आहे, असा दावा हारूण मुकाती इस्लामिक सेंटरतर्फे करण्यात आला आहे.

शहरात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही केली आहे. त्याचा विचार करून परराष्ट्र मंत्रालयाने या मागणीची पूर्तता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परिवर्तनवादी चळवळीला शाहिरीची साथ

$
0
0

परिवर्तनवादी चळवळीला शाहिरीची साथ

वसुधा कल्याणकर यांची यशोगाथा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तिचा हात डफावर पडतो अन् मर्दानी आवाज वातावरण भारून टाकतो. पुरुषांची मक्तेदारी ठरलेल्या शाहिरी परंपरेत स्वतंत्र ठसा उमटवणारी वसुधा कल्याणकर यांची शाहिरी अशी चाकोरी मोडणारी आहे. चरितार्थासाठी शाहिरी करण्यापेक्षा सामाजिक परिवर्तनासाठी वसुधा शाहिरी करतात. कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सांभाळत त्यांचा शाहिरीच्या माध्यमातून परिवर्तनासाठी लढा सुरू आहे.

'पोवाडा म्हणावा तर मर्दानं' या उक्तीतून पुरुषप्रधान संस्कृतीचे दर्शन घडते. महिलांनी पोवाडा सादर करण्याची शक्यता अत्यंत कमी असताना वसुधा कल्याणकर यांनी परंपरेला छेद दिला. 'एआयएसएफ' चळवळीत त्यांनी निष्ठेने काम केले. कॉलेजात असताना त्यांचा परिवर्तनवादी चळवळीकडे कल वाढला. नवीन प्रयत्नातून चळवळ व्यापक करण्याचा वसुधा यांचा प्रयत्न सुरू होता. या प्रयत्नाला पोवाडा सादरीकरणातून मांडत वसुधा नावारूपाला आल्या. डाव्या चळवळीत महिला शाहिराची उणीव भरून निघाली. सहा वर्षांपूर्वी शहीद भगतसिंग कला मंच स्थापन करून व्यापक काम केले. 'अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शाहिरी करणाऱ्या मीरा उमप यांचे काम पाहिले. या कामातून मला प्रेरणा मिळाली. मोजक्याच महिला शाहिरीत असताना वेगळा प्रयत्न करू असा निर्णय घेतला. यातूनच शाहिरी बहरली' असे वसुधा यांनी सांगितले. एम. एससी. (कॉम्प्युटर) शिक्षण घेतलेल्या वसुधा यांनी जर्मन भाषा अवगत केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात परकीय भाषा विभागात जर्मन भाषा शिकल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी महाराजांचाच पोवाडा म्हणावा असा संकेत आहे; मात्र, वसुधा यांनी शिवरायांसोबतच सावित्रीबाई फुले व शहीद भगतसिंग यांचा पोवाडा सादरीकरणाचा पायंडा पाडला. या पोवाड्यात निश्चित वेगळेपण आहे. या पोवाड्यांना श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. शेवटी विचार सर्वांपर्यंत पोहचवणे हेच ध्येय असल्याने वसुधा यांनी शाहिरीचा चेहरा जाणीवपूर्वक परिवर्तनवादी ठेवला आहे. कॉलेज, शाळा, सार्वजनिक कार्यक्रम, चळवळीचे कार्यक्रम अशा अनेक ठिकाणी वसुधा यांनी शेकडो कार्यक्रम सादर केले आहेत. आपल्या खड्या आवाजाने वसुधा उपस्थितांना भारावून टाकतात. परिवर्तनाचे विचार सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मला व्हायचंय सुनीता विल्यम्स’

$
0
0

'मला व्हायचंय सुनीता विल्यम्स'
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'तुम्हाला काय व्हायचंय?', असा प्रश्न त्यांना केला अन् एका सुरात त्यांचं उत्तर आलं, 'आम्हाला सुनीता विल्यम्स होऊन अंतराळात झेप घ्यायची आहे'. सातारा परिसरातील भगवानबाबा अनाथाश्रमातील बालिकांचा हा आत्मविश्वास पाहून परिस्थितीसमोर कधीच शरणागती पत्करायची नसते तर ते एक आव्हान म्हणून स्वीकारायचं असं, असा विचार सर्वांनाच पटला. या मुलींना या वयातच आलेलं शहाणपण व स्वतःच्या क्षमता ओळखण्याच्या प्रयत्नांनी आम्हालाही बळ मिळाले, अशा प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या. निमित्त होते तेजस्विनी समूहाच्या महिला दिन कार्यक्रमाचे.

तेजस्विनी समूहाने जागतिक महिला दिन शनिवारी भगवानबाबा अनाथाश्रमात साजरा केला. महिलांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या तेजस्विनी समुहाच्या मते सर्वच महिला तेजस्विनी असतात. फक्त त्याची जाणीव त्यांना व्हावी व त्याच प्रेरणेतून महिला दिन साजरा व्हावा म्हणून तेजस्विनीने मायेने पोरक्या असलेल्या मुलींच्या सान्निध्यात एक दिवस घालवला. या सरप्राईज भेटीमुळे अनाथाश्रमाचे नभांगणही गोंधळ, गप्पा, आनंद व किलबिलाटाने गजबजले होते. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या मुली मात्र मोठ्या आनंदाने या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. आश्रमाच्या संचालिका कविता वाघ आणि शिक्षक व कर्मचारी यांचे कौतुक करावे अशा शब्दांमध्ये समूहाच्या अध्यक्ष वैशाली लांबे यांनी सुरुवात केली. 'हमको मन की शक्ती देना...' या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तेजस्विनीच्या ज्योती शिराळकर यांनी तुळशीचे रोप देऊन वाघ यांचे स्वागत केले. संस्थेच्या सचिव अंजली अयाचित यांनी सर्व तेजस्विनीचा व संस्थेचा परिचय करून दिला. अनाथाश्रमातील मुलींनीही स्वपरिचय करून दिला. यानंतर तेजस्विनीतर्फे भगवती क्लासेसच्या संचालिका वैशाली करंजीकर यांनी मुलींना 'नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा..' हे गाणे शिकवले. ६ ते ११ वयोगटातील मुलींसाठी गंगा अग्रवाल, ज्योती शिराळकर आणि रेखा बारहाते यांनी खेळ घेतले व गाणी व गोष्टी सांगितल्या. तेजस्विनीच्या सदस्यांसोबत मुलींनी राजस्थानी व मराठी गाण्यांवर ठेका धरला. तर ११ ते १८ वयोगटातील मुलींनींही जिद्द, शिक्षणाची तळमळ व अद्ययावत ज्ञानाचे दर्शन घडवले. सर्व स्पर्धेतील विजेत्यांना तेजस्विनीच्या अध्यक्ष वैशाली लांबे यांनी बक्षिस व खाऊ दिला. तसेच अनाथाश्रमास एका वेळेचे जेवणही देण्यात आले. राजश्री साळुंके व अंजली मुळावेकर या प्रकल्पप्रमुख होत्या. अंजली आयचित, दिपाली मुळे, ज्योती शिराळकर, वैशाली करंजीकर, गंगा अग्रवाल, रेखा बारहाते यांनीही पुढाकार घेतला. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष वैशाली लांबे, अंजली कुलकर्णी, नेहा देशपांडे, रेखा हिवरे, सुलोचना तिवारी, भावना अंतरकर, अरुणा हांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सातशे सीएंचे नेतृत्व करायला मिळणे भाग्य’

$
0
0

Dhananjay.Kulkarni @timesgroup.com
औरंगाबादः 'मोठेपणी काय व्हायचे हे विचारले की सगळेच इंजिनीअर, डॉक्टर सांगायचे. पण मला काहीतरी वेगळे करायचे होते, मी तसे आवर्जून सांगतही असे. अखेर मी सीए झाले व आज शहरातील ७०० सीएंचे नेतृत्व करत आहे, असे रेणुका देशपांडे यांनी सांगितले.
देशपांडे यांना दहावीपर्यंत गणित विषयाची आवड होतीच, दहावी परीक्षेत ९१ गुण मिळवून गुणवत्ता यादीत आल्यानंतर अनेकांनी डॉक्टर, इंजिनीअर होण्याचा सल्ला दिला. परंतु, त्यांनी ठरवून वाणिज्य शाखा घेतली. त्यानंतर सीए करण्याचे ठरवले. लग्नानंतर सीए पूर्ण केल्याचा आनंद देशपांडे यांना वाटतो. 'बीकॉमनंतर लग्न झाले. त्यानंतर २००७ मध्ये सीए पूर्ण केले. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पती सागर बोरामणीकर, सासू जया बोरामणीकर व सासरे अशोक बोरामणीकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. आई विजयालक्ष्मी देशपांडे व वडील अरूण देशपांडे यांनी केलेले संस्कार, शिक्षण आणि सामाजिक जाणीव करिअर घडवताना खूप मोलाची ठरली,' असे त्यांनी सांगितले. करिअर अगदी ठरवून केले असले तरी त्यांसाठी फार संघर्ष करावा लागला नाही, असे त्यांनी प्रांजळपणे सांगितले.
सुखवस्तू कुटुंबात गेलेले बालपण आणि सासरच्या मंडळींचे एका महिलेला मिळालेले सहकार्य सीएच्या करिअरसाठी पूरक ठरले. २००७ मध्ये सीए पूर्ण करताना आर्टिकलशिप २००३ मध्येच सुरू केली होती. तिथे कस लागला. सीए सुधीर इंदापूरकर यांच्याकडे आर्टिकलशिप करतानाच डिसेंबर २००३ मध्ये लग्न झाले. पण करिअर घडवताना मेहनत करावी लागते, असे त्या म्हणाल्या. त्याकाळी सीए गिरीश कुलकर्णी यांनीही संधी दिल्याचे रेणुका यांनी आवर्जून नोंदवले. 'वेगवेगळ्या सामाजिक संस्था व सीए इन्स्टिट्यूटशी संपर्क आला. तेव्हापासून दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवतच होतो. आज २०१६ मध्ये सीए इन्स्ट‌िट्यूटची अध्यक्ष झाले आहे. या संस्थेतील आजी व माजी सहकाऱ्यांचे सहकार्य व मार्गदर्शन उपयोगी ठरला,'असे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद येथील सीए इन्स्टिट्यूटच्या ७०० सदस्यांपैकी १२० महिला आहेत. देशातील १४४ शाखांमध्ये औरंगाबादची शाखा अव्वलस्थानी आहे. भविष्यात संस्थेत तरूण व महिला सदस्यांचे सक्षमीकरण, सामाजिक जनजागरण या विषयावर काम करायचे आहे. या क्षेत्रासडे महिलांनी वळावे यासाठी काउन्सिलिंग करायचे असल्याचे रेणुका देशपांडे यांनी सांगितले. आजपर्यंत कमिटी मेंबरपर्यंत महिलांना मजल मारता आली. यंदा अध्यक्षपदीही महिला झाल्याने सगळ्यांना आनंद आहे. गतवर्षीच्या उत्कृष्ट कार्याबद्दल औरंगाबाद शाखेला दोन पुरस्कार मिळाले आहेत. ती परंपरा त्यांना कायम ठेवायची आहे. सीएचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि सभासदांसाठी आगामी कालावधीत विविध विषयांवर कार्यशाळा घेणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आप्पावाडीची वाट अजूनही खडतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव
मिटमिटा येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या दोन किलोमिटर अंतरावर असलेले आप्पावाडी औरंगाबाद महापालिकेत समाविष्ट असून अजूनही दुर्लक्षित राहिले आहे. या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. शाळा, आरोग्य केंद्र व कोणत्याही नागरी सुविधा नाहीत.
राष्ट्रीय महामार्गापासून उत्तरेकडे दोन किलोमिटर अंतरावरील औरंगाबाद महापालिकेत समाविष्ट असलेली आप्पावाडी २५ वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. सुमारे अडीचशे लोकवस्ती असलेली ही वाडी वॉर्ड क्रमांक १५ मध्ये समाविष्ट आहे. येथील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती व पशुपालन आहे. दुग्धव्यवसायानिमित्त येथील नागरिकांनी दररोज शहरात यावे लागते. परंतु, रस्ताच नसल्याने त्यांची कुचंबणा होते.
गावात शाळा नसल्याने विद्यार्थ्यांना दगड गोट्यांचा रस्ता तुडवत मिटमिटा येथील महापालिकेच्या शाळेत यावे लागते. यावर्षी स्थानिक नगरसेवकांने पाठपुरावा करून बालवाडी सुरू केली. परंतु, त्यापुढील वर्ग नसल्याने विद्यार्थ्यांना मिटमिटा, दौलताबाद किंवा औरंगाबादला जावे लागते. गावात पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट आहे. ३०० जनावरांकरिता टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागते. खराब रस्ता असल्याने टँकरसाठी जादा रक्कम मोजावी लागते. येथील नागरिकांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय सिरसाठ, नगरसेवक रावसाहेब आमले यांना निवदने दिली. मात्र, कोणताही उपयोग झाला नाही. आप्पावाडीमध्ये नागरी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी देवीदासआप्पा लिंभारे, रमेश लिंभारे, वैशाली लिंभारे, शुभांगी लिंभारे, मनीषा लिंभारे यांनी केली आहे.
आप्पावाडी येथे महापालिकेतर्फे आतापर्यंत फक्त एकच अधिकारी आले, ते म्हणजे सुनील केंद्रेकर ! त्यांच्या भेटीमुळे येथील गावकऱ्यांना अपेक्षा निर्माण झाली होती. परंतु, ते बदलून गेल्याने त्यांची निराशा झाली आहे. महापालिका, विधानसभा, लोकसभा आदी प्रत्येक निवडणुकीला राजकीय नेते, कार्यकर्ते आवर्जून येतात. गावकरी नित्यनेमाने त्यांच्यासमोर समस्या मांडतात. नेतेही आश्वासने देतात, पण पराभूत झालेले सोडाच; निवडून आलेले नेतेही दुसरी निवडणूक येईपर्यंत ढुंकूनही पाहत नाहीत. आप्पावाडी-अब्दीमंडी हा रस्ता मंजूर असूनही अजूनही तयार झालेला नाही. रस्ता तयार करण्यासाठी प्रशासन कोणतीही हालचाल करत नाही. महापालिकेत समाविष्ट होताच्या परिस्थितीत अद्याप कोणताही फरक पडलेला नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखरेचा खिशाला चटका

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दोन आठवड्यांपूर्वी २७ ते २८ रुपये किलो मिळणारी साखर ३४ ते ३६ रुपये देऊन खरेदी करावी लागत आहे. व्यापाऱ्यांनी या भाववाढीला सरकारचे धोरण जबाबादार असल्याचे सांगितले.
यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यानंतरही साखरेचे भाव कमी झालेले नाहीत. संपूर्ण एक वर्षात या आठवड्यात पहिल्यांदाच साखरेचे दर वाढले असले तरी, अचानक झालेल्या भाववाढीने सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणींचे 'बजेट' कोलमडले आहे. सध्या ठोक बाजारात प्रतिक्विंटल २९०० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल या दराने साखर विकली जात आहे. किरकोळ बाजारातील हा दर प्रतिकिलो ३४ ते ३५ रुपये आहे. केंद्र सरकारने ४० लाख टन साखर निर्यात करणे अनिवार्य केल्यामुळे साखरेचे भाव वाढल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. साखरेची वाढती मागणी व पुरवठा कमी, यामुळे या आठवड्यात साखरेचे भाव वाढले आहेत.
-
साखरेचे दर वाढण्यास कारखान्यांनी घेतलेला आखडता हात जबाबदार आहे. कारखान्यातून साखरेची विक्री घटली. उत्पादन चांगले आहे, पण भाव अधिक मिळेल या आशेने अधिक विक्रीच होत नाही. याशिवाय व्यापारीदेखील भाववाढ करताना फार साठवणूक करू शकत नाहीत. यामुळे साखर २८-२९ वरून ३४ ते ३६ रुपयांपर्यंत गेली आहे.
- राजेश कासलीवाल, संचालक श्रेणिक शुगर एजन्सी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औद्योगिक सुरक्षेचा वाळूजमध्ये जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त सोमवारी वाळूज एमआयडीसीमध्ये औद्योगिक सुरक्षा फेरीचे आयोजन करण्यात आले. या फेरीमध्ये सुमारे दहा हजार कामगार, उद्योजक सामील झाले.
कारखाने अधिनियमला १३५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही फेरी आयोजित करण्यात आली होती. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय आणि म्युचअल एँड रिस्पॉन्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. जॉन्सन्स अँड जॉन्सन्स कंपनीच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे होते. याप्रसंगी आमदार अतुल सावे, आरोग्य सुरक्षा विभागाचे सहायक संचालक एस. के. देशमुख, सहसंचालक ए. बी. कांबळे, उपसंचालक विलास घोगरे, एस. एस. जोशी, एस. के. देशमुख, एल. के. गोराने, अमित दगडे, जयेंद्र भिरूड, अनिल नलावडे, सुदर्शन सांगळे, संदीप इंगळे, मंगेश धुव्रे, संजय खडसे हे प्रमुखपाहुणे म्हणून उपस्थित होते. 'कामगारांनी कामाच्या ठिकाणी जीविताची सुरक्षा केली पाहिजे. यंत्रावर काम करताना सुरक्षा साधनाचा योग्य वापर केला तर, अपघात टळू शकतात. उद्योजक व कामगारांनी सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करावी,' असे आवाहन विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी केले. या उपक्रमाचे आयोजन बजाज ऑटो, एन्ड्युरन्स, व्हेरॉक, जॉन्सन अँड जॉन्सन, स्टरलाइट, व्हिडिओकॉन, एण्ड्रेस हाउझर, सिमेन्स, इप्का, वोक्खार्ड, विप्रो आदी कंपन्यांनी केले होते. फेरीमध्ये सुरक्षा विषयावर भजन, भारूड, घोषणा, पोस्टर आदींद्वारे जनजागरण करण्यात आले. यासाठी ऑटो क्लस्टरचे राम भोगले, मसिआचे अध्यक्ष बालाजी शिंदे, प्रदीप अग्रवाल, विकास मगर, किशोर मते, संदिप जोशी, विठ्ठल शेळके, भारतीय कामगार संघटनेचे प्रभाकर मते आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिक्रांतीवादी शक्ती म्हणजे विपश्यना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुनरुज्जिवित केलेल्या बुद्धप्रणित क्रांतीचा पाडाव करण्यासाठी प्रतिक्रांतीवादी शक्तीने आधुनिक भारतात विविध षडयंत्रे रचली. यामध्ये विपश्यना शिबिराचा समावेश होतो,' असे मत डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी अच्युत सुरडकरलिखित 'विपश्यना शिबिरः एक षडयंत्र' या पुस्तक प्रकाशनावेळी व्यक्त केले.
डॉ. आंबेडकर संशोधन केंद्रामध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बँकेचे अध्यक्ष आत्माराम बोराडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान पारखे, के. एस. अतकरे, बी. एस. निकम, हेमलता भालेराव, अच्युतराव सुरडकर आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी पारखे यांनी समाजामध्ये वाचन खूप कमी असल्याबद्दल खंत व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आत्माराम बोराडे यांनी, बुद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारामध्ये खिंडार पाडण्याचे काम सुरू असून, सावध राहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. भालेराव, निकम, अतकरे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय वाघ यांनी केले, तर सुभाष दांडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रवीण म्हस्के, सुरेश बोरडे, श्याम भारसाकळे, प्रभाकर मगरे, विजय जाधव, सुभाष पंडुरे, दिपक जगताप, प्रकाश नरवडे, किशोर वाघ, विजय साळवे, विशाल सुरडकर, प्रवीण हिवराळे, अभिजित बोर्डे आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


किडनीदानात महिला आघाडीवर

$
0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com

औरंगाबाद ः किडनीदानातील दातृत्वात महिलाच पुरुषांच्या पुढे आहेत. शहरामध्ये झालेल्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी किडनीदान देणारे ८० ते ९० टक्के दाते या महिला आहेत.

१९८८ पासून आतापर्यंत शहरामध्ये मराठवाड्यातील रुग्णांवर सुमारे दोन हजार मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया झाल्या. यात महिला दात्यांमुळेच दीड-पावणेदोन हजार रुग्णांना संजीवनी मिळाल्याचे वैद्यकतज्ज्ञांनी स्पष्ट केले. महिला दात्यांमध्ये आई, पत्नी, बहीण, सासू, आजी यांचा समावेश होतो आणि पुन्हा महिला दात्यांमध्येही ५० टक्के दातृत्व हे मातांचे आहे, हे विशेष. अल‌िकडे काही आजींनीही आपल्या नातवंडांना किडनी दिली आहे आणि हे प्रत्यारोपण यशस्वी झाले. शहरातील माणिक हॉस्पिटलमध्ये गेल्या पाच वर्षांत ८१ मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया झाल्या, यामध्ये ६२ दाते हे महिला आहेत; म्हणजेच महिला दात्यांचे प्रमाण हे ७६ टक्क्यांवर असल्याचे स्पष्ट होते.

'महिलांचा भावनांक जास्त असल्यामुळे जेव्हा किडनीदानाची गरच असते, तेव्हा त्या स्वतः समोर येतात.' - डॉ. शेखर शिराढोणकर, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ

'किडनीविकार महिलांत जास्त आहे, पण प्रत्यारोपणासाठी पुरुष सर्वाधिक संख्येने दाखल होतात आणि किडनी देण्यासाठी महिलाच पुढे येतात.' - डॉ. रवींद्र भट्टू,मूत्रपिंडविकारतज्ज्ञ

'१००% किडनी दाते महिलाच असतात. डोनर म्हणून महिलांनीच पुढे येणे हे भूषणावह नसले, तरी परिस्थिती अशी असते की किडनी देण्यासाठी महिलाच पुढे येतात.' - डॉ. सुधीर कुलकर्णी, प्रभारी अध्यक्ष, झेडटीसीसी

''ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लान्ट अॅक्ट'नुसार किडनीदानासाठी पात्र असलेल्या जवळच्या नातेवाईकांमध्ये आजी-आजोबांचा अलीकडेच समावेश झाला आहे.' - डॉ. सचिन सोनी, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला कंडक्टरला प्रवाशांचा घोर; कार्यालयात बिनघोर

$
0
0


Abdulwajed.Shaikh
@timesgroup.com
औरंगाबाद ः एसटी कंडक्टर म्हणूनही महिला सर्रास दिसतात. मात्र, ज्यांच्यासाठी आम्ही काम करतो, त्याच प्रवाशांत आम्हाला जास्त असुरक्षितता वाटते, अशी खंत या महिला कंडक्टरनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केली. तर लिप‌िक म्हणून एसटी कार्यालय सुरक्षित वाटते, अशी प्रतिक्रियाही या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
एसटीच्या सिडको आगारात सध्या ४० पेक्षा जास्त महिला कर्मचारी आहेत. यातील अनेक महिला या सिटीबसवर कंडक्टर म्हणून सेवा बजावतात. हे काम करताना त्यांना अनेकदा वात्रट कर्मचाऱ्यांचा सामना करावा लागतो.
सिटीबसमध्ये चिल्लरवरून भांडण नित्याचे झाले आहे. १२ रुपयांच्या तिकिटासाठी पाचशेची नोट काढून देणारे काही प्रवासी असतात. चिल्लर नाही, यामुळे हे प्रवासी महिला कंडक्टरांशी वाद घालतात. नियमित प्रवास करणारे अनेक ग्राहक मात्र आपल्यासोबत सुटे पैसे घेऊन प्रवास करतात. प्रवाशांची वारंवार होणाऱ्या वादामुळे महिला कंडक्टरांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, महिला कंडक्टर आणि प्रवाशांत वाद झाल्यास ड्रायव्हराने गाडी थेट पोलिस ठाण्यात नेऊन लावावी, असे निर्देश आहेत. याशिवाय १०३ क्रमांकावर थेट संपर्क करण्याची सूचना दिली आहे. मात्र, या हेल्पलाइनचा उपयोग केला जात नसल्याची माहिती समोर आली आहे.
-
सहा वर्षांपासून एसटीत आहे. सिटीबसमध्ये अनेक प्रवासी जाणीवपूर्वक महिला कंडक्टर असल्याने त्रास देण्याच्या उद्देश्याने कोणत्याही मुद्द्यावरून वाद घालतात.
- पी. एस. एंडोले, कंडक्टर
एमए बीएडचे झाल्यानंतर कंडक्टर झाले. आम्ही सौजन्याने वागलो तरी चिल्लरवरून अनेक जण आमच्याशी भांडतात. कंडक्टरच्याबाबत लोकांनी दृष्टिकोन बदलावा.
- दीपाली डोंगरे, कंडक्टर
एसटीच्या लेखा विभागात काम करते. कार्यालयात महिलांसाठी सुरक्षित वातावरण आहे. मात्र, कार्यालयात काम करणाऱ्या महिलांसाठी सुविधा वाढविण्याची गरज आहे.
- अंजली राऊत, लिपीक, लेखा विभाग
सिडकोत सर्वाधिक महिला कंडक्टर, कर्मचारी काम करतात. अनेकजणी त्यांच्यासोबत घडलेल्या घटना मांडततात. त्यांना आधार देऊन परत कामावर पाठवितो.
- स्वाती घोडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अर्थ’सत्तेतून महिलांना डावलले

$
0
0


Unmesh.Deshpande
@timesgroup.com
औरंगाबाद ः शिवसेना-भाजपची तीन दशकांपासून सत्ता असलेल्या महापालिकेच्या स्थायी समिती सभापती व सभागृहनेतेपदापासून महिलांना दूर ठेवण्यात आले आहे. आर्थिक सत्ता असलेली 'स्थायी' आणि सभागृहाचे नियंत्रण असणारे 'सभागृहनेते'पद महिलांना का दिले नाही, याबद्दल दोन्हीही पक्षांच्या स्थानिक प्रमुखांकडे गोलमाल उत्तरांशिवाय ठोस काही नाही.
महापालिकेच्या स्थापनेपासून चार वर्षांचा अपवाद वगळता शिवसेना - भाजपचीच सत्ता पालिकेत आहे. या काळात या १९ महापौर झाले. विद्यमान महापौर त्र्यंबक तुपे २० वे महापौर. १९ महापौरांपैकी शिवसेनेने सहा महिलांना महापौरपदाची संधी दिली, तर भाजपने एका महिलेला या पदाचा मान दिला. महिलांना मिळालेले महापौरपद केवळ आरक्षणामुळेच मिळाले. खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या महापौरपदावर शिवसेना आणि भाजपने मनाने संधी दिली नाही. कायद्याने मिळालेल्या आरक्षणाचा लाभ या दोन्ही पक्षाच्या नगरसेविकांना मिळाला. शिवसेनेने उपमहापौरपद मात्र महिलेच्या पदरात टाकले. या पदासाठी कोणत्याही प्रकारचे आरक्षण नसते. महापौरपदाखालोखाल स्थायीचे सभापतिपद पालिकेच्या रचनेत महत्त्वाचे असते. आर्थिकबाबतीतील सर्व निर्णय सभापतींच्या अधिपत्याखाली असलेल्या 'स्थायी'ला असतात. असे हे 'स्थायी'चे सभापतिपद पालिकेच्या स्थापनेपासून महिलेला मिळालेले नाही. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी या पदापासून महिलांना दूरच ठेवले. पालिकेतील सभागृहनेतेपदही पालिकेच्या स्थापनेपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. पालिकेच्या सभागृहात महापौरांनंतर सभागृह योग्य पध्दतीने चालवण्याची जबाबदारी सभागृहनेत्यांची. सभागृहातील सर्वपक्षीय नगरसेवकांशी समन्वय राखत सत्ताधारीपक्षाचा झेंडाच फडकला पाहिजे, याची जबाबदारी सभागृहनेत्यांवर असते. शिवसेनेने आतापर्यंत या पदाची जबाबदारी महिलांवर सोपवली नाही.
मुंबईतही संधी दिली नाही
मुंबई महापालिकेला शंभर वर्षाहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. तिथेही वर्षानुवर्षे शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, तीन दशकांत शिवसेनेने महिलेला स्थायीच्या सभापतिपदी संधी दिली नाही. सभागृहनेतेपदी यंदा तृष्णा विश्वासराव यांना संधी दिली. नाशिक पालिकेतही आतापर्यंत सभापतिपद किंवा सभागृहनेतेपद महिलेला दिलेले नाही. कल्याण-डोंबिवलीत स्थायीचे सभापतिपद आतापर्यंत महिलेला दिलेले नाही.
-
महापौरपदी शिवसेनेने सहा महिलांना आतापर्यंत संधी दिली आहे. उपमहापौरपदावरही एका महिलेला संधी दिली. आगामी काळात सभापती, सभागृहनेतेपदी महिलांना संधी देऊ.
- अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख,शिवसेना
सभापतिपद महिलेला दिले नसले तरी स्थायी समितीत महिलांना भाजपने संधी दिली आहे. येत्या काळात महिलांना या दोन्हीही पैकी एक पद देण्याचा विचार केला जाईल.
- किशनचंद तनवाणी, शहराध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांच्या जबाबदारीमुळे स्वीकारले कुलीचे काम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वे स्टेशनवर सचखंड आणि तपोवन एक्स्प्रेस आल्यानंतर एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर प्रवाशांचे ओझे उचलून पोट भरण्यासाठी सर्वच कुलींना धावपळ करावी लागते. पण, पुरुषांच्या या क्षेत्रात औरंगाबाद स्टेशनवर एक महिलने पाय रोवले आहेत. त्यांचे नाव मीरा कल्याणसिंग मेवाड. पतीच्या निधनानंतर कुटुंबाला सावरण्यासाठी त्यांना हे काम पत्करावे लागले. त्या नांदेड विभागातील एकमेव महिला कुली आहेत.
साधारणतः तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर पती कल्याणसिंह यांचे निधन झाले. त्यानंतर पतीचा कुलीचा बिल्ला मीरा यांनी स्वीकरला. कुली म्हणून काम स्वीकारल्यानंतर पहिल्या प्रथम मनात भीती होती. परंतु, दोन म‌ुलांच्या शिक्षणाची जबाबदारी होती. यामुळे मनावर दगड ठेवून त्यांनी या कामाला सुरुवात केली. रेल्वे स्टेशनवर सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत त्या ओझे उचलत असतात. लोकांचे ओझे उचलून कुटुंबाचे पोट भरण्यासाठी त्यांनी एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर धावपळ करावी लागते. 'अनेक प्रवासी महिला म्हणून ओझे देण्यास नकार देतात. त्यामुळे प्रवाशांना ओझे उचलू शकते, हे पटवून द्यावे लागते. त्यांचा विश्वास बसला तरच, काम मिळते,' असे त्यांनी सांगितले. एवढी धावपळ करूनही त्यांना महिनाअखेर कसेबसे तीन ते साडेतीन हजार रुपये मिळतात. अवघ्या तीन ते साडेतीन हजार रुपयांत कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलाचे बीकॉम व मुलीच्या बारावीच्या शिक्षणाचा खर्च त्यांना भागवावा लागतो. ही ओढाताण करण्यात त्या थकून जातात. परंतु, पतीच्या निधनानंतर कुटुंब कबिला चालवण्यासाठी त्यांना ओढग्रस्त परिस्थितीला तोंड द्यावेच लागते. दक्षिण मध्य रेल्वेत एकमेव महिला कुली म्हणून काम करित असलेल्या मीरा कल्याणसिंह मेवाड यांनी रेल्वे महाव्यवस्‍थापकांना निवेदन देऊन ग्रुप डीमध्ये काम देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांच्या मागणीची रेल्वे प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही.
मध्यम व मोठ्या आकाराच्या बॅगांना चाक लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवासी कुलीला काम देण्याऐवजी स्वतःच बॅगा ओढतात. फलाट क्रमांक दोन वरूनच कुलींना ग्राहक मिळत असतात. फलाट क्रमांक एक वरून प्रवासी सहज बाहेर पडू शकतात. यामुळे फलाट क्रमांक एक वरून ग्राहक कमी मिळत आहेत. यामुळे मीरा यांना भवितव्याची चिंता सतावत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्ली-मुंबई विमानसेवेला टाटांचे बळ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहवासीयांसाठी एक गूड न्यूज. औरंगाबादमधून दिल्ली आणि मुंबईला 'एअर एशिया' आणि 'विस्तारा' कंपनीची विमानसेवा सुरू करण्यास टाटा उद्योग समूहाचे प्रमुख सायरस मिस्त्री यांनी अनुकलता दर्शविली आहे. याबाबत प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यांनी विमानतळ संचालक आलोक वार्ष्णेय यांना दिल्या. मिस्त्री एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सोमवारी शहरात आले होते. वार्ष्णेय यांनी मिस्त्री यांच्याशी संवाद साधला.
कार्यक्रम आटोपून मिस्त्री औरंगाबाद विमानतळावरून मुंबईला रवाना झाले. यावेळी विमानतळ संचालक आलोक वार्ष्णेय यांनी त्यांची भेट घेतली. मिस्त्री यांनी 'औरंगाबाद विमानतळ सुंदर आहे,' अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. 'विमानतळावरून कुठे सेवा सुरू आहे, रोज किती उड्डाणे होतात, दिल्ली आणि मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या किती आहे,' याची माहिती वार्ष्णेय यांच्याकडून घेतली. त्यावेळी 'औरंगाबादहून अनेक प्रवाशांना दिल्ली किंवा मुंबईला जाण्यासाठी पुण्याहून जावे लागते,' अशी खंत वार्ष्णेय यांनी बोलून दाखविली.'विमान प्रवाशांची मागणी लक्षात घेता टाटा उद्योग समूहाला 'विस्तारा' आणि 'एअर एशिया'ची सेवा औरंगाबादमधून मुंबई, दिल्लीसाठी सुरू करण्याची संधी आहे,' असे लक्षात आणून दिले.
-
औरंगाबाद विमानतळ सुंदर आहे. औरंगाबादहून मुंबई आणि दिल्लीसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. आम्ही नक्की विचार करू.- सायरस मिस्त्री, प्रमुख, टाटा समूह
-
औरंगाबादहून मुंबई आणि दिल्ली विमानसेवा सुरू करण्याबाबत सायरस मिस्त्री यांनी केलेल्या सूचनेनुसार लवकरच प्रस्ताव पाठविणार आहोत.
- आलोक वार्ष्णेय, विमानतळ संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूर तालुक्यात फळबागा जळाल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
पाणी नसल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा जळाल्या आहेत. विशेषतः लासूर-गंगापूर रस्त्यावरील मोसंबीच्या बागा सुकून गेल्या आहेत. जिवापाड जपलेल्या फळबागा जळत असताना पाहणे शेतकऱ्यांच्या जिवावर आले आहे.
यावर्षी पाऊस कमी असल्याचा मोठा फटका शेतीच्या उत्पादनाला बसला आहे. तालुक्यात नांदूर-मधमेश्वरचे पाणी उपलब्ध झाल्यानंतर फळबागा फुलवण्यात आल्या. या फळबागा जोपोसणे अत्यंत कठीण झाले आहे. तीन वर्षांपासून तालुक्यात पर्जन्यमान कमी झाले आहे. गेल्या वर्षी थोड्याफार प्रमाणात पाण्याची उपलब्धता असल्यामूळे शेतकऱ्यांनी टँकरच्या पाण्यावर बाग जगवली. परंतु, यावर्षी परिसरातील विहिरी आटल्या आहेत. पाण्याचे स्त्रोत नसल्याने मोसंबीच्या बागांना पाणी कसे द्यावे, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. लासूर-गंगापूर रस्त्यावरील जगन्नाथ गोपीनाथ निकम यांनी पाच वर्षापासून जगवलेली दीड एकरवरील बाग यावर्षीच्या दुष्काळात जळाली आहे. त्यांनीही गेल्यावर्षी टँकरच्या पाण्यावर बाग जगवली. मात्र, यावर्षी टँकरचे पाणी मिळणे सुद्धा मुश्किल झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, यावर्षी शासनाने दुष्काळ अनुदान कापूस व फळबागांना वगळून जाहीर केले आहे. यामुळेही शेतकरी हवालदिल आहेत. फळबाग जगवण्यासाठी किंवा त्याच्या नुकसान भरपाईपोटी रक्कक मिळणार नसल्याने हा फटका न सावरण्यासारखा असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणच्या फळबागांची पाहणी केली आहे. सध्या तरी ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाईबद्दल काहीही सांगत नाहीत. राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जानराव यांनी नुकताच वैजापूर व गंगापूर तालुक्याचा दुष्काळी दौरा केला. त्यांनीही फळबागांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता अभियानाला कॉपीमुक्तीचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत वार्षिक कृती आराखड्यामध्ये कन्नड तालुक्यातील १८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ही गावे १५ मार्चपर्यंत १०० टक्के हगणदारीमुक्त करायची आहेत. हतनूर व नाचनवेल येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांना कॉपीमुक्त परीक्षा अभियानात सामील केल्यामुळे हगणदारीमुक्त अभियानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
वार्षिक कृती आराखड्यात तालुक्यातील आडगाव जेहूर, आडगाव पिशोर, आलापूर, औराळी, बनशेंद्रा, बरकतपूर, चिमणापूर, देवगाव रंगारी, हतनूर, जवखेडा बुद्रुक, जैतापूर, जळगाव घाट, जेहूर, कळंकी, नाचनवेल, नादरपूर, नागद नागापूर या गावांची निवड झालेली आहे. या गावातील बेसलाइन सर्वेक्षणात नाव असलेल्या कुटुंबाना १२ हजार रुपये अनुदान मिळत आहे. या सर्व कुटुंबानी स्वच्छागृह बांधण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. हे काम १५ मार्चपर्यंत करायचे आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी स्वच्छतागृहांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. यावेळी नाचनवेल, हतनूर येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांना १० वी व १२ वीच्या कॉपीमुक्त परीक्षा मोहिमेत सामील करून घेण्यात आले आहे. यामुळे त्यांना गावातील कामांकडे लक्ष देणे शक्य नाही.
बांधलेल्या स्वच्छतागृहाचे व लाभार्थ्यांचे छायाचित्र काढून परीपूर्ण प्रस्ताव पंचायत समितीत दाखल केल्यानंतर अनुदानाचा धनादेश मिळतो. सध्या नाचनवेल येथील १४२, हतनूर येथील ५९, देवगाव रंगारी येथील १६९, नागद येथील १०७, नागपूर येथील १२६ प्रस्ताव प्रलंबित आहेत. याबरोबरच अंतिम टप्प्यातील स्वच्छतागृह बांधण्याची घाई सुरू आहे. यामुळे कृती आराखड्यातील ग्रामपंचायतीचे कामे ग्रामविकास अधिकारी परीक्षेत गुंतल्याने रखडली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘युनानी’च्या जखमेवर सरकारचे मीठ

$
0
0


Makarand.Kulkarni
@timesgroup.com
औरंगाबाद ः देशातील प्राचीन उपचारपद्धतीपैकी असलेल्या युनानी शाखेकडे सरकारी यंत्रणेने प्रचंड दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यात या उपचारपद्धतीचा अवलंब करणारी लाखो मंडळी आहेत, पण त्यांना उपचारासाठी केवळ दोन सरकारी डॉक्टर उपलब्ध आहेत. सहा रुग्णालयांमध्ये हे दोन डॉक्टरच सेवा बजावतात. वारंवार मागणी करूनही मनुष्यबळ तसेच सुविधा पुरविल्या जात नसल्याने युनानी उपचारपद्धतीच आजारी पडली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत युनानी रुग्णालये चालविली जातात. जिल्ह्यात औरंगाबाद, पिंप्री राजा (ता. औरंगाबाद), लासूरगाव (ता.वैजापूर), चिकलठाण (ता.कन्नड), गोंदेगाव (ता. सोयगाव) आणि शिवना (ता. सिल्लोड) अशी सहा रुग्णालये आहेत. काही वर्षांपूर्वी या रुग्णालयांमधून पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी सेवेत होते, पण सेवानिवृत्ती काहींना अधिक चांगली संधी मिळाल्याने त्यांनी नोकरी सोडली. त्यामुळे सध्या केवळ दोनच वैद्यकीय अधिकारी सेवेत आहेत. डॉ. मुक्तार शेख, डॉ. रहमान या दोघांवर जिल्ह्यातील युनानीची जबाबदारी आहे. औरंगाबाद शहरातील जुना बाजार परिसरात युनानीचे उपचार केंद्र आहे. याठिकाणी एक कपाऊंडर कामासाठी आहे. जिल्ह्यातील सहाही केंद्रांमध्ये युनानीची मागणी असल्याने हे दोन डॉक्टर प्रत्येकी तीन केंद्रांमध्ये पेशंट तपासतात. त्यासाठी त्यांनी टाइमटेबल ठरवून घेतला आहे. सोमवार - मंगळवार एक ठिकाणी, बुधवार-गुरुवार दुसऱ्या ठिकाणी तर शुक्रवार - शनिवारी तिसऱ्या केंद्रातील बाह्य रुग्ण विभागात हे डॉक्टर उपलब्ध असतात. प्राचीन उपचारपद्धतीची औषधीही याच ठिकाणी दिली जाते. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पडलेला अतिरिक्त कार्यभार दुर्दैवाने प्रशासन, लोकप्रतिनिधी कुणाच्याच प्राधान्यक्रमात नाही. औरंगाबादमधील रुग्णालयात २०० पेशंट बाह्य रुग्ण विभागात असतात. एवढी मोठी गर्दी एखाद्या सरकारी रुग्णालयात क्वचितच पाहावयास मिळते. ग्रामीण भागातील केंद्रांवरही १०० पर्यंत रुग्ण असतात. रुग्णांची गरज पाहून तरी सरकारने या पॅथीला पुनरुज्जीवीत करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते. मात्र, आजवर काहीच कार्यवाही झालेली नाही.
सगळीकडे खच्चीकरण
युनानी डॉक्टरांचे सगळ्या बाजूंनी खच्चीकरण सुरू आहे. आयुष अंतर्गत आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, सिद्ध आणि योगा पाच उपचारपद्धती येतात. आयुर्वेद, होमिओपॅथीच्या डॉक्टरांना वर्ग दोनचा दर्जा आहे, तर युनानी डॉक्टर वर्ग तीनच्या प्रवर्गात येतात. त्यामुळे पदोन्नती, ग्रेडपेच्या बाबतीत युनानीच्या डॉक्टरांना अजून दुय्यम स्थान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाची नाथषष्ठी यात्रा पाण्याविना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
नाथषष्ठी यात्रा महोत्सवाच्या तयारीसाठी शुक्रवारी आमदार संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली नाथसमाधी मंदिरात नुकतीच बैठक घेण्यात आली. यात्रा महोत्सव २९ मार्च ते ३१ मार्च दरम्यान होणार आहे. यात्रा काळात योग्य नियोजन करण्याचे निर्देश यात्रेशी संबंधित शासकीय विभागांना देण्यात आले. यावर्षी यात्रेकरिता धरणातून नदीपात्रात पाणी सोडणे शक्य नसल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.
राज्यातील प्रमुख यात्रेपैकी असलेल्या नाथषष्ठी यात्रेला जवळपास सहाशे पायी दिंड्यांसह लाखो भाविक पैठणला भेट देणार आहेत. या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीधर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार किशोर देशमुख, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहूल सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक चत्रभुज काकडे आदींची उपस्थिती होती. नाथसमाधी मंदिरामागील वाळवंटाची सफाई करणे, गोदापात्र कोरडे करावी, या सूचना करण्यात आल्या. दोन दिवसात संपूर्ण गोदापात्र कोरडे करणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले. शहरात सुरू असलेली काही कामे यात्रेपूर्वी व काही काही कामे यात्रेनंतर पूर्ण होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी यांनी दिली. शहर व दहा किलोमिटर परिसरात लोडशेडिंग केले जाणार नसल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. रॉकेल सहज उपलब्ध होण्यासाठी विक्री केंद्र सुरू करणार असल्याचे तहसीलदार देशमुख म्हणाले. या बैठकीला एसटी महामंडळ, तालुका भूमी अभिलेख, आरोग्य विभाग, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम व यात्रेशी संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जायकवाडी धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने यावर्षी यात्रेत धरणातून नदीपात्रात पाणी सोडणे शक्य नसल्याची पाटबंधारे विभागाचे अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले. भाविक व वारकऱ्यांना पाणीटंचाई जाणवू नये यासाठी जिल्हा परिषदेतर्फे १० व दूध संघातर्फे ३ टँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयएसओ राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज

$
0
0

फुलंब्री: तालुक्यातील बाबरा येथे विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते महादेव मंदिर सभागृह व पाच अंगणवाड्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. नामदेवराव गाडेकर होते. 'आयएसओ मानांकन मिळालेल्या ग्रामपंचायतींनी ते टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत,' असे आवाहन बागडे यांनी केले.
बाबरा येथील महादेव मंदिर सभागृहासाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिवाय पाच अंगणवाड्यांचे बांधकामही करण्यात येणार आहे. याप्रसंगी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील तिघांना तहसीलदार संगीता चव्हाण व नायब तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या उपस्थितीत धनादेश प्रदान करण्यात आले.
'ग्रामपंचायतींना शासनाकडून मिळणाऱ्या अतिरिक्त निधीसाठी पाठपुरावा करून उर्वरित विकास कामांना चालना द्यावी,' असे आवाहन विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी केले. यावेळी फुलंब्रीचे माजी सरपंच सुहास शिरसाठ, जितेंद्र जैस्वाल, शिवाजी पाथ्रीकर, गोविंद वाघ, पंचायत समिती सभापती माधुरी गाडेकर, जळगाव मेटेचे सरपंच सर्जेराव मेटे, सरपंच भगवान भिवसने, छायाबाई जंगले, हौसाबाई काटकर, डॉ. मिनोजोद्दीन शेख, डॉ. इकबाल अन्सारी आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोलेनाथ रमापते शंभोशंकर पशूपते!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'हर हर महादेव', 'ओम नम: शिवाय'च्या जयघोषात सोमवारी शहरातील सर्व महादेव मंदिरात महाशिवरात्रीचे निमित्त साधत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. खडकेश्वर पसिरातील खडकेश्वर मंदिर, नागेश्वरवाडी येथील नागेश्वर मंदिर, जुन्या भावसिंगपुऱ्यातील शिव-पार्वती प्राचीन मंदिर, पारदेश्वर मंदिर पळशी रोड परिसर, आविष्कार कॉलनीतील महादेव मंदिर, दशमेशनगरातील दशमेश्वर मंदिर, सिडको एन-३च्या गणेश मंदिरातील महादेव मंदिर, उल्कानगरीतील ओंकारेश्वर मंदिर, बजरंग चौकातील महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावल्या.
महायोगाची पर्वणी
यंदाची महाशिवरात्र सोमवारी दुपारी १.२० वाजता सुरू झाली. ती उद्या, मंगळवार सकाळी १०.३३ मिनिटांपर्यंत असेल. या महाशिवरात्रीला सोमवारी त्रयोदशी आणि चतुर्दशी अशा दोन्ही तिथ्या आल्या आहेत. याच दिवशी शुभ योग तसेच पंचग्रह, ग्रहण तसेच कालसर्प योगही येणार असल्याने अनेकांनी ग्रहशांतीचाही लाभ घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलींचा टक्का वाढविण्याचे आव्हान

$
0
0

Ashish.Choudhari@timesgroup.com
औरंगाबाद ः लोकसंख्येच्या नैसर्गिक वाढीबरोबर दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या मुलींची संख्या वाढत आहे, मात्र त्यांच्या प्रमाणात सुधारणा झालेली नाही. दहावीची परीक्षा देणाऱ्या मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण गेल्या पाच वर्षांत जवळपास दोन टक्क्यांनी घसरले आहे. दुसऱ्या बाजुला बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रमाण दोन टक्क्यांनी वाढले आहे. शिक्षण विभागासमोर गळतीचे प्रमाण थांबविण्याचे आव्हान कायम आहे.

मुलींचे शिक्षणातील प्रमाण मुलांच्या तुलनेने कमी आणि गळतीचे प्रमाण जास्त असे चित्र असते. त्यात गेल्या पाच वर्षांत बदल झालेला नाही. माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावी, बारावी परीक्षेच्या आकडेवारीतून हे वास्तव समोर आले आहे. लोकसंख्येच्या नैसर्गिक वाढीच्या तुलनेत दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या मुलींची संख्या वाढली आहे, मात्र गेल्या पाच वर्षांत दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रमाण दोन टक्क्यांनी कमी झाले. हे प्रमाण आणखी वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने पाऊले उचलायला हवीत, आवश्यक त्या सुविधा, सुरक्षा आदींकडे लक्ष दिले गेले तर, हे प्रमाण आणखी वाढेल असे तज्ज्ञ, महिला शिक्षकांना वाटते.

२०११ मध्ये दहावीला परीक्षेला बसलेल्या मुलींची संख्या ६७ हजार ६९७ एवढी होती. २०१६ मध्ये ही संख्या ७५ हजार १८६ एवढी आहे. विभागात २०११मध्ये ४६ हजार ३२० मुलींनी बारावीची परीक्षा दिली. यावर्षी विभागातून ५१ हजार ९८३ मुली बारावीची परीक्षा देत आहेत. हा आकडा वाढलेला असला तरी दहावीत मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत घसरलेले आहे.


विद्यार्थिनींचे प्रमाण
वर्ष.......दहावी....बारावी
२०११......४३........३४.८
२०१२......४२.८.....३५.३
२०१३......४२.६.....३५.९
२०१४......४१.७.....३६.४
२०१५......४२........३६.७
२०१६......४१.४......३६.४

मुलींचे शिक्षणातील प्रमाण वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी तसे वातावरण, पायाभूत सुविधा, सुरक्षा असे अनेक प्रश्न आहेत. त्यावर शासनस्तरावर सातत्याने लक्ष दिले गेले पाहिजे. त्यामुळे शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.
- मयुरा पटेल, मुख्याध्यापिका, गुजराती कन्या विद्या मंदिर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images