Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महिला पोलिसांमुळे तरुणीची पर्स परत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पीसीआर मोबाइलमधील महिला पोलिसांना सापडलेली पाच हजार रुपये रक्कम असलेली पर्स सबंधित तरुणीला पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते बुधवारी परत करण्यात आली. या चार महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी प्रत्येकी हजार रुपयाचे बक्षिस देऊन गौरव केला.

टीव्ही सेंटर येथील भारती माळी मंगळवारी सायंकाळी सेव्हन हिल्स येथील टाटा डोकोमोच्या कार्यालयात बिल भरण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांची पर्स गहाळ झाली. या पर्समध्ये रोख पाच हजार रुपये व कागदपत्रे होती. त्यावेळी तेथे पोलिस कंट्रोल रुमची महिलांची पीसीआर मोबाइल गस्त घालत होती. जमादार लता जाधव, संगिता धोंगडे, वंदना उबाळे व चालक संगिता दांडगे यांचा या पथकामध्ये समावेश होता. या पथकाला ही पर्स आढळली. त्यामध्ये असलेल्या मोबाइल क्रमांकावरून त्यानी माळी यांच्याशी संपर्क साधला. पर्स त्यांची असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना ओळखपत्र घेऊन बुधवारी पोलिस आयुक्तालयात बोलावण्यात आले. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते माळी यांची पर्स त्यांना परत करण्यात आली. महिला पोलिसांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करीत आयुक्तांनी त्याना प्रत्येकी हजार रुपयाचे बक्षिस जाहीर केले. भारती माळी यांनी देखील या महिला पोलिसांच्या पथकाचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बनावट कागदपत्रांआधारे प्लॉट विकून फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बनावट कागदपत्रांआधारे प्लॉटची विक्री करून व्यापाऱ्याची ८४ हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सय्यद अशरफ सय्यद आसीन (वय ३४, रा. सिल्क मिल्क कॉलनी) या व्यापाऱ्याने डिसेंबर २०११मध्ये मौजे मिटमिटा येथील गट क्रमांक ६१मध्ये तीन प्लॉटची खरेदी केली होती. ६०० चौरस फुटांचे हे प्लॉट सय्यद सलाउद्दिन उर्फ जेम्स सय्यद शकुर सालार (रा. बुढीलाइन) याने त्याला ८४ हजारांत विकले होते.

दरम्यान, काही दिवसानंतर सलाउद्दिन याने जमीन त्याच्या नावावर नसताना देखील बनावट कागदपत्राआधारे हे प्लॉट आपल्याला विक्री केल्याचे अशरफच्या निदर्शनास आले. मंगळवारी त्याने छावणी पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोकलेन खरेदीचा निधी पडून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यात गंभीर दुष्काळ आहे. पालकमंत्री रामदास कदम यांनी ९ पोकलेन खरेदीसाठी निधी दिला होता, मात्र खरेदीसाठी ई-टेंडरिंग प्रक्रियाच राबवण्यात आली नसल्यामुळे जिल्हा दक्षता व संनियंत्रण समीतीच्या बैठकीत खासदार चंद्रकांत खैरे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (२० एप्रिल) पार पडली. यावेळी पोकलेनसाठी ‌मिळालेल्या निधीवर चर्चा झाली. पावसाळा संपण्यापूर्वी पोकलेन आलेच नाहीत तर, त्याचा उपयोग काय, असे म्हणत महापालिकेकडे दिलेले पोकलेन उद्याच घेऊन टाका आणि ग्रामिण भागात त्याचा वापर करा, असे आदेश त्यांनी बुधवारी बैठकीत दिले. पोकलेनच्या विषयावरून आमदार बंब आणि खैरे यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

दुष्काळी परिस्थितीला यशस्वीरित्या सामोरे जाण्यासाठी भारत निर्माण योजनेंतर्गत राबविण्यावत येत असलेल्या योजना व इतर कामे तत्काळ मार्गी लावावित. यासाठी गावांमध्ये पुरेसा पाऊस आणि मुबलक पाणीसाठा उपलब्ध होईपर्यंत जिल्हाधिकारी प्रतिनिधी म्हणून तलाठ्यांनी तर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी म्हणून ग्रामसेवकांनी गाव सोडू नये, असेही खैरे यांनी सूचित केले. यावेळी खैरे यांनी अधिकाऱ्यांना केंद्र पुरस्कृत पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांसह पाणीपुरवठा, कृषी, सिंचन, सर्व शिक्षा अभियान योजनांची प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करावीत, असे निर्देश दिले.

बैठकीसाठी आमदार संदिपान भुमरे, आमदार प्रशांत बंब, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके आदींसह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बैठकीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक यांना, एकात्मिक पाणलोट विकास अभियान, राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय सामाजिक ‌अर्थसहाय्य योजना, राष्ट्रीय पेयजल अभियान आदी योजनांचा आढावा घेतला.

बैठकीसाठी समिती सदस्य, तालुक्यांचे सभापती, जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर, अधीक्षक कृषी अधिकारी पडवळ; तसेच जिल्हा परिषदेचे वासुदेव साळुंके, उपजिल्हाधिकारी संगीता सानप आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे पोलिसांच्या अॅपमुळे प्रवाशांना मिळाली मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तपोवन एक्स्प्रेसमध्ये मुंबईला जात असताना काही प्रवासी आरक्षित सिटवरून उठत नसल्याची तक्रार रेल्वे पोलिसांच्या अॅपवर नोंदविताच पुढील स्टेशनवर पोलिसांनी कोच गाठून आरक्षण असलेल्या प्रवाशांना बसण्यासाठी त्यांच्या हक्काची जागा दिली.

रेल्वेमध्ये अनेक प्रवाशांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून धोका असतो. गुन्हेगारी कमी करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे 'पोलिस अॅप'ची सुरवात केली आहे. नागपूर लोहमार्ग पोलिसांनी तयार केलेल्या अॅपद्वारे थेट पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्काशी साधता येतो. अॅपच्या माध्यमातून थेट संबंधित पोलिस ठाण्याकडे तक्रार वर्ग केली जाते. app.nagpurrailwaypolice.org व www.nagpurrailwaypolice.org या बेबसाइटवर औरंगाबाद लोहमार्गाशी संबंधित चार तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांनी दिली.

तपोवन एक्स्प्रेसमध्ये दरवाज्यात उभे राहून एका प्रवासी मोबाइलवर बोलत असताना मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळ काही अज्ञात व्यक्तीने प्रवाशाला छडी मारली. छडी हाताला लागल्यामुळे प्रवाशी किशोर लाल पठारे यांच्या हातातील मोबाइल खाली पडला. यानंतर पठारे यांनी त्यांच्या मित्रांच्या मोबाइलवरून रेल्वे पोलिसांच्या अॅपवर तक्रार नोंदविली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याशिवाय तपोवन एक्स्प्रेसमध्येही जागा मिळत नसल्याची तक्रार अॅपवरून मिळताच पोलिसांनी सोडविली. याशिवाय काही किरकोळ तक्रारीही प्राप्त झाल्या असून, त्याही त्वरित सोडविण्यात आल्याची माहिती कांबळे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॅन्सर हॉस्पिटल’ला टँकरचे ग्रहण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल साडेतीन वर्षांपासून म्हणजेच शासकीय कॅन्सर हॉस्पिटल सुरू झाल्यापासून आजतागायत हॉस्पिटल पुरेशा पाण्यापासून अखंडपणे वंचित असून, हॉस्पिटलच्या पहिल्या दिवसापासून रोजच ३० ते ५० हजार लिटर पाणी खासगी टँकरद्वारे विकत घ्यावे लागत आहे. आतापर्यंत हॉस्पिटलचे तब्बल १५ ते २० लाख रुपये केवळ खासगी टँकरवर खर्च झाले आहेत. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हायकोर्टाच्या आदेशानंतर हॉस्पिटल प्रशासनाने स्वतंत्र पाइप लाइनसाठी ४५ लाख रुपयांचा धनादेश देऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे; परंतु अजूनही स्वतंत्र पाइप लाइन करण्यात आली नाही. परिणामी, जबर फटका रुग्णांना बसत आहे.

मराठवाडा-विदर्भासह लगतच्या जिल्ह्यांतील कर्करुग्णांचा विचार करून प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर शासकीय विभागीय कर्करुग्णालयाचे उद्घाटन २१ सप्टेंबर २०१२ रोजी मोठ्या राजकीय नाट्यानंतर एकदाचे झाले. शहरातील आमखास मैदानासमोर हॉस्पिटलची भव्य इमारत उभी राहिली व 'लिनॅक', 'ब्रेकेथेरपी'सह विविध अत्याधुनिक उपकरणेही दाखल झाली. विशेष तज्ज्ञांसह एकूणच अपुऱ्या डॉक्टर-कर्मचाऱ्यांमुळे त्यावेळी हॉस्पिटल चर्चेत आले खरे; परंतु हॉस्पिटलच्या पाण्याचा प्रश्न फारसा चर्चेत आला नाही व नेहमीच दुर्लक्षित राहिला. हॉस्पिटलमध्ये महापालिकेचा ८ इंची नळ आहे, परंतु हॉस्पिटल म्हणून नव्हे तर घरगुती वापराप्रमाणे दर तिसऱ्या दिवशी हॉस्पिटलला अत्यल्प पाणी मिळते. दरम्यान, हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच रुग्णसंख्या वाढत गेली व मागच्या दोन वर्सांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील कर्करुग्ण हॉस्पिटलमध्ये विविधांगी उपचार-शस्त्रक्रियांसाठी येत आहेत. सर्व प्रकारचे विशेषज्ञ आजही उपलब्ध झाले नसले व ५० टक्के डॉक्टर-कर्मचारी वर्ग आजही रिक्त असला तरी, हॉस्पिलमध्ये विविधांगी उपचारांची संख्या वाढत गेल्यामुळे हॉस्पिटल हाउसफुल्ल झाले आहे, मात्र अशा वेळी पाणी पुरवठ्याच्या स्थितीमध्ये कुठलीही सुधारणा झालेली नाही. मागच्या दीड-दोन वर्षांपासून रोजच हॉस्पिटलला सर्व प्रकारच्या उपचार-शस्त्रक्रियांसह स्वच्छतेसाठी, पिण्यासाठी, वापरासाठी किमान एक ते दीड लाख लिटर पाण्याची गरज असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येते. मात्र हॉस्पिटलच्या ८ इंची नळातून केवळ १० ते २० हजार लिटरपेक्षा जास्त पाणी मिळत नाही व तेही तिसऱ्या दिवशी मिळते. त्यामुळेच पहिल्या दिवसापासून हॉस्पिटलला टँकरशिवाय पर्याय राहिला नाही. कर्करुग्णालयाचा विचार करून घाटीप्रमाणे दररोज पुरेसा पाणीपुरवठा करण्याची मागणी हॉस्पिटल प्रशासनाने वेळोवेळी केली; पण हॉस्पिटलच्या मागणीकडे पालिकेने कायम दुर्लक्ष केले. कर्करुग्णालयासाठी प्रक्रियायुक्त पाण्याची गरज असल्याने टँकर देण्याची विनंतीही पालिकेने उधळून लावली. शेवटी खासगी टँकरशिवाय हॉस्पिटलला पर्याय राहिला नाही.

कॅन्सर हॉस्पिटलला पाणी पुरविण्यासाठी स्वतंत्र पाइप लाइन करावी म्हणून महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे, मात्र अजूनही स्वतंत्र पाइप लाइन करण्यात आलेली नाही व कॅन्सर हॉस्पिटलला आजही पुरेसे पाणी मिळत नाही.

- डॉ. अरविंद गायकवाड, विशेष कार्य अधिकारी, कॅन्सर हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझं शिवारः दुष्काळात मोसंबीचे रसाळ उत्पादन

$
0
0

tushar.bodkhe@timesgroup.com
फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाणी टंचाई सर्वात मोठी समस्या ठरली आहे. भर उन्हाळ्यात फळबाग वाचवणे कठीण झाले आहे. आतापर्यंत हजारो हेक्टरवरील फळबागा जळाल्या आहेत. मोसंबी व डाळिंब फळबागांचे सर्वात जास्त नुकसान झाले. सर्वाधिक फळबाग क्षेत्र असलेल्या औरंगाबाद तालुक्यात सिंचनाचा प्रश्न बिकट झाला आहे. करमाड, पिंप्रीराजा परिसरातील शेतकरी फळबागा वाचवण्यासाठी नियोजन करीत आहेत. पाण्याचे व्यवस्थापन, फळझाडांची निगा, बाष्पीभवन रोखण्यासाठी सेंद्रीय आच्छादन अशा उपाययोजनांद्वारे सांजखेडा (ता. पैठण) येथील ज्ञानेश्वर घोडके यांनी मोसंबीचे लक्षणीय उत्पादन घेतले. या चविष्ट व रसाळ मोसंबीला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे शेवटच्या बहारात ४१ हजार रूपये प्रतिटन दर मिळाला. सध्या दोन एकरवर मोसंबी असून चांगले उत्पादन निघत आहे. विशेष म्हणजे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे उन्हाळ्यातही फळझाडे उत्तम स्थितीत आहेत. उन्हाची तीव्रता वाढली असली तरी सेंद्रीय आच्छादनामुळे (मल्चिंग) फळबागेला इजा पोहचली नाही. याबाबत घोडके यांनी स्वतःचे तंत्र विकसित केले आहे. 'दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाणी कमी असणार असे गृहीत धरले आहे. पाणी नसल्यामुळे खचून जाण्यापेक्षा उपलब्ध पाण्यात फळबाग घेण्यावर भर दिला' असे घोडके यांनी सांगितले. पाणीसाठा करण्यासाठी घोडके यांनी शेतात शेततळे केले आहे. या शेततळ्यात शेजारच्या ओढ्यातील पाणी भरतात. पावसाळ्यात साधारणपणे चार-पाच पाऊस झाल्यानंतर ओढ्याला पूर येतो. ओढ्यात मोठे खड्डे असल्यामुळे पाणी असते. मोटारीने ओढ्यातील पाणी शेततळ्यात भरून ठेवल्यामुळे किमान सहा महिने पाण्याची व्यवस्था होते. या पाण्यावरच डाळिंब आणि मोसंबीची फळबाग घेण्यात आली आहे. शिवाय मोसंबीच्या प्रत्येक झाडाला दररोज १२० ते १५० लिटर पाण्याची आवश्यकता असते. मात्र, घोडके यांनी ५० लिटर पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. बाष्पीभवन रोखण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रयोगही यशस्वी झाला. उन्हाळ्यात उत्पादन घेण्याऐवजी फळबाग जगवणे महत्त्वाचे असल्यामुळे कमी पाणी देण्याचा निर्णय घेतला असे घोडके सांगतात. डाळिंबाच्या फळबागेलाही कमी पाणी दिले आहे. डाळिंबाला ४० ते ६० लिटर पाणी आवश्यक असते. पण, निश्चित प्रमाणापेक्षा कमी पाणी दिले आहे. अत्यंत कमी पाण्यातही फळबागांनी टिकाव धरला. खत आणि ठिबक सिंचन यांचे वेळापत्रक काटेकोरपणे अवलंबल्यामुळे दोन्ही फळबागा बहरल्या आहेत. वर्षभरात तीन बहार घेऊन घोडके यांना चांगले उत्पन्न मिळाले. सरासरी २५ ते ३० हजार रूपये प्रतिटन दर मिळाल्यामुळे दुष्काळातही मोसंबीची बाग वरदान ठरली. फळझाडांना फळे लगडलेली असून स्थानिक बाजारपेठेत मागणी आहे. कृषीतज्ज्ञांचा सल्ला घेऊन काटेकोर व्यवस्थापन करणे दुष्काळी परिस्थितीत शक्य नसते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता आपल्या फळबागांची अवस्था लक्षात घेऊन स्वतः उपाययोजना करावी असे घोडके यांचे स्पष्ट मत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक दराने मोसंबी विक्री करणारा शेतकरी अशी त्यांची ओळख आहे. सातत्याने गुणवत्तायुक्त उत्पादन घेऊन घोडके यांनी आदर्श पायंडा पाडला आहे. यापूर्वी मोसंबीच्या फळबागेजवळ एक एकरवर शेवग्याचे पीक घेतले. शेवग्याची झाडे फळबागांभोवती असल्यामुळे उष्ण वाऱ्यापासून फळबागाचे संरक्षण झाले. तसेच हमखास उत्पादन निघाल्यामुळे आर्थिक फायदा झाला. तीन वर्षे शेवग्याची शेती केल्यानंतर यावर्षी झाडे काढली आहेत. उन्हाची तीव्रता आणि कमी पाणी अशी दुहेरी कसरत करून घोडके यांनी फळबाग टिकवली आहे.

आव्हान नेहमीचेच
२०१२ यावर्षीचा दुष्काळ फळबागा उत्पादक शेतकऱ्यांनी आव्हानात्मक होता. या दुष्काळात घोडके यांनी फळबाग वाचवण्यासाठी टँकरचे पाणी विकत घेतले होते. फळबाग जगवण्यासाठी पाणी देऊ असे नियोजन न करता त्यांनी या पाण्यावर उत्पादन काढण्याचा निर्णय घेतला होता. जवळपास सात लाख रूपयांपेक्षा जास्त खर्च करून त्यांनी फळबाग वाचवली. सुदैवाने, नऊ लाख रूपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. कठीण काळातही हार न मानता घोडके यांनी फळबाग वाचवून उत्पादनसुद्धा काढले. हवामान बदल झाल्यामुळे शेती व्यवसाय कठीण होणार आहे. आपण शेतीच्या समस्यांवर तोडगा काढू शकतो असा विश्वास ज्ञानेश्वर घोडके यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी गमावले प्राण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

पाणी काढण्यासाठी गेलेल्या बारा वर्षांच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना बीड जिल्ह्यातील विडा (ता. केज) येथे गुरुवारी सकाळी घडली. सचिन गोपीनाथ केंगार असे या मुलाचे नाव आहे.

सचिन सकाळी पाणी आणण्यासाठी गावाजवळ असलेल्या कोरडेवाडी रस्त्यावरील विहिरीवर गेला होता. पाण्याने विहिरीचा तळ गाठल्यामुळे, तो वाकून पाण्याचा अंदाज घेत होता. त्यातच तोल गेल्यामुळे तो विहिरीत पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. 'गावासाठी मंजूर करण्यात आलेले टँकर वेळेवर येत नाहीत. टँकर चालू असते, तर सचिनवर विहिरीतून पाणी काढण्याची वेळ आली नसती आणि त्याचा जीव वाचला असता,' अशा शब्दांत सचिनच्या आई-वडिलांनी भावना व्यक्त केल्या. विडा हे पाच हजार लोकवस्तीचे गाव असून, या गावासाठी चार टँकर मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, पंचायत समितीकडे हा प्रस्ताव धूळखात असून, त्यामुळेच सचिनचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटल इंडिया कुठे आहे?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'देशाच्या भ्रष्ट व्यवस्थेत शेतकरी व सैनिक मरत आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून अंबानी, अदाणी, मल्ल्या यांच्यावर सवलतींची खैरात सुरू आहे. दलित-सवर्ण भेद, भ्रष्टाचार अशा अनेकानेक समस्या आहेत. गटार साफ करताना सफाई कामगार गुदमरून मरतात. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'डिजिटल इंडिया' आहे का' असा सवाल प्रसिद्ध कन्नड लेखिका मुद्दू तीर्थहळ्ळी यांनी केला. पत्रकार भवनात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी देशातील सद्यस्थितीवर भाष्य केले.
शिमोगा (कर्नाटक) येथील मुद्दू तीर्थहळ्ळी व्यवस्थेवरील लिखाणामुळे चर्चेत आहे. दोन कादंबऱ्या, कवितासंग्रह, ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. देशातील असहिष्णुतेविरोधात मुद्दू यांनी कर्नाटक साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला आहे. एका कादंबरीवर चित्रपट निर्मिती झाली आहे. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी शहरात आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'जेएनयू, हैदराबाद विद्यापीठातील प्रकार शाळांमध्येही सुरू आहेत. मुले असमानता, शोषण सहन करीत आहेत. प्राथमिक शिक्षणावर एका गटाला नियंत्रण हवे आहे. कारण स्वस्तात मजूर मिळण्यासाठी सरकारी शाळा बंद पाडण्याचे षडयंत्र रचायचे आहे. या शाळांमध्ये गरीब, दलित विद्यार्थी शिकतात' असे मुद्दू यांनी सांगितले. देशात धार्मिक वाद निर्माण करून वातावरण बिघडवले जात असल्याचे मुद्दा त्यांनी मांडला. 'डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे व एम. कलबुर्गी यांना जिवे मारण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ पुरस्कार परत केल्यानंतर आमच्यावर टीका करण्यात आली. सोशल मीडियातून वाईट पोस्ट टाकण्यात आल्या. अमूक घटना घडली तेव्हा तुम्ही पुरस्कार परत का केले नाही असे विचारण्यात आले. पण, आम्हाला विचारणारे स्वतः का लढले नाही हा सवाल आहे' असे मुद्दू यांनी म्हटले. सरकारविरोधात कुणी बोलल्यास त्याला देशद्रोही ठरवतात. हा प्रकार धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेला अॅड. सुभाष गायकवाड, आवेस अहमद, सुभाष लोमटे उपस्थित होते.
भैरप्पांना 'पद्मभूषण' हवे
'कर्नाटकातील लेखकांनी पुरस्कार परत केल्यानंतर ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांनी सरकारचे समर्थन केले. दिल्लीत इतर लेखकांसोबत निदर्शने केली. नेहमी वर्णवर्चस्ववादी लेखन करणाऱ्या भैरप्पा यांना बक्षीस म्हणून 'पद्मश्री' पुरस्कार मिळाला. मात्र, त्यांना त्यापेक्षा मोठा पुरस्कार हवा होता. त्यामुळे त्यांनी 'पद्मश्री' पुरस्कार स्वीकारला नाही,' अशी टीका मुद्दू यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ओल्या कचऱ्यातून ५८ टन खत निर्मिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ओल्या कचऱ्यापासून सहा महिन्यात ५८ टन खत निर्मिती करण्यात गुलमोहर कॉलनी वार्डातील नागरिकांना यश मिळाले आहे. यानिमित्ताने येथील नागरिकांनी स्वच्छ व सुंदर वार्ड ही संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणली.
आपला वॉर्ड आपला परिसर स्वच्छ राहावा, यासाठी गुलमोहर कॉलनी वॉर्डातील नागरिकांनी केलेल्या प्रयत्नाना यश मिळू लागले आहे. गुलमोहर कॉलनीसह, श्रीनगर, सत्यमनगर, वीर सावरकरनगर, विजयश्री कॉलनी, मिलतनगर, एन पाच सिडको, प्रियदर्शनी कॉलनी, आदी कॉलनीचा वॉर्ड क्रमांक ६४ गुलमोहर कॉलनीमध्ये समावेश होतो. उच्चभ्रु, मध्यमवर्गीय लोकांची वसाहत असलेल्या या भागात नोकरदार, व्यापारी, व्यवसायिक मंडळी मोठ्या प्रमाणात राहतात.
परिसर स्वच्छतेसाठी गेल्या काही महिन्यांपासून येथील नगरसेवक शिवाजी दांडगे यांनी नागरिकांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले. कचऱ्याचे संकलन करताना ओला व सुका कचरा वेगवेगळा असावा, यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात आले. कचरा संकलन करणाऱ्या बचत गटाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी खास पुढाकार घेतला. जनजागृतीमुळे त्यास अल्पकाळातच मोठा प्रतिसाद मिळाला.
'डोअर टू डोअर' कचरा गोळा केला जातो. मात्र, प्रश्न होता जमा होणाऱ्या या कचऱ्याची योग्य विल्हेवाट कशी लावणार यांचा; त्यातून मार्ग काढण्यासाठी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी खत प्रकल्प सुरू करण्याची संकल्पना पुढे आली. लोकांना त्याची माहिती देण्यात आली व नंतर त्यासाठी मिलननगरनजिक असलेल्या एक सेक्टर येथील मनपाच्या भूखंडावर प्रकल्प उभारण्यात आला. त्यासाठी खड्डे खोदण्यात आले व त्यात रोज जमा होणारा ओला कचरा टाकण्यात आला.
सुरुवातील कचरा डेपो तयार होत असल्याची ओरड करत काहींनी त्यास विरोधही केला. पण, त्यांची समजूत काढण्यात संबंधितांना यश आले आणि खत निर्मितीची प्रक्रिया शास्त्रोक्त पद्धतीने सुरू झाली. कचऱ्यापासून दुर्गंधी पसरू नये म्हणून त्यावर औषध फवारणी केली जाते. दरम्यान, गेल्या पाच महिन्यानंतर येथे तब्बल पाच टन खताची निमिती झाली तर, सुका कचरा पुर्नवापरासाठी भंगार व्यावसायिकांना दिला जातो. त्यातूनच स्वच्छतेसाठी लागणाऱ्या काही साहित्याची खरेदीही कर्मचाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनीही प्रकल्पची पाहणी केली आहे.

कचरा साठवून राहिल्याने त्याचा नागरिकांवर व पर्यावरणावर दुष्परिणाम होतो. हीच बाब लक्षात घेऊन लोकांच्या मदतीने खत निर्मिती प्रकल्प उभारला व त्यातून ५८ टन खत निर्मिती होऊ शकली. हे खत शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.
- शिवाजी दांडगे, नगरसेवक, गुलमोहर कॉलनी, सिडको

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळजाचा तुकडा दुष्काळानं गिळला

$
0
0

Pramod.Mane@timesgroup.com
विडा (ता. केज) ः पोटाची खळगी भरण्यासाठी लेकराबाळांसह संसार पाठीवर घेऊन गाव सोडला, पण तिथंही या काळ्या ठिक्कर दुष्काळानं पिच्छा सोडला नाही. वडील मजुरीला, आई भंगार गोळा करायला गेली. ही परवड पाहून मुलांनी अर्धा किलोमीटरहून पाणी आणाण्याच काम अंगावर घेतलं. या पाण्यानंच माझ्या लेकराचा घात केला. पाणी शेंदता, शेंदता तोल जाऊन माझ्या काळजाचा तुकडा गेला. तो दुष्काळानं गिळला, असा पिळवटून टाकणारा आर्त टाहो विडा येथील सचिन केंगारच्या आईने 'मटा'शी बोलताना फोडला.

दुष्काळ बळीची मन सुन्न करणारी ही व्यथा जेव्हा त्यांनी मांडली, तेव्हा समोर बसलेल्या साऱ्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले. सचिनचा गुरुवारी विहिरीत पडून मृत्यू झाला.

गावातील दोन विहिरीत फक्त २५ हजार लिटर पाणी टँकरने टाकले जाते. पाच हजार लोकसंख्येला हे पाणी पुरणार कसे? बीड तालुक्यातील मुर्शदपूर येथील मूळ रहिवासी असलेले महादेव केंगार यांची सासरवाडी विडा. त्यांची पत्नी आशा या गावच्या. पोटाची खळगी भरण्यासाठी केंगार कुटुंब विडा गावात आले. महादेव मजुरी, तर आशाबाई गावात फिरून भंगार गोळा करतात. त्यांना सचिन, सिंधू, महेश आणि पुष्पा अशी चार मुले.

आई-वडील दिवसभर कामावर जायचे. घरात पाण्याचा थेंब नाही. त्यामुळे सचिन आणि त्याचा मोठा भाऊ महेश हे सायकलवर अर्धा किलोमीटर अंतरावरील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले होते. पाणी शेंदताना अचानक तोल गेल्याने सचिनचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तब्बल २४ तासानंतरही सायकल विहिरीजवळ उभी होती. ही विहीर १५ फूट खोल आहे. त्यात ६ फूट पाणी आहे, पण हे पाणी बोअरने आणून विहिरीत टाकले जाते. शेंदायला अवघड अशी विहीर आहे.

पाणी टंचाई विडा गावात आहे याची कल्पना गावकऱ्यांनी जानेवारीमध्ये दिली होती. २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेऊन टँकर मागणीचा प्रस्ताव ग्रामपंचायतने पंचायत समितीला पाठविला होता. लाल फितीच्या कारभारामुळे विडा गावाला पाणी देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी एप्रिल उजाडला. तब्बल अडीच महिन्यानंतर गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला. गावातील पाणीपुरवठा योजना जर सात वर्षे रखडली नसती तर गाव टँकरमुक्त झाले असते, पण नियतीला हे मान्य नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी कपात ५० टक्के करा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई व दुष्काळसदृश परिस्थितीमुळे मद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यांची पाण्याचा प्राधान्यक्रम लक्षात घेऊन १० मेपर्यंत किमान ५० टक्के पाणी कपात करावी. त्यानंतर १० जूनपर्यंत पाणी कपातीत उत्तरोत्तर टक्केवारीत वाढ करावी, अशी अपेक्षा मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे आणि न्या. व्ही. के. जाधव यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय भास्करराव काळे यांनी गेल्यावर्षी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्यातील धरणांत एकूण १९ टक्के तर, मराठवाड्यात अवघा ३ टक्के पाणीसाठा असताना दारू कारखान्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तो बंद करावा, अशी विनंती जनहित याचिकेत करण्यात आली आहे. खंडपीठातील सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी शासनातर्फे शपथपत्र सादर केले. मद्य निर्मिती कारखान्यांनी पुढील चाळीस दिवसांत टप्याटप्यांने १५ टक्के म्हणजे एकूण ४५ टक्के पाणी कपात करण्याची तयारी दर्शविली असल्याचे खंडपीठास सांगितले.

बिकट परिस्थीतीचा सामना करण्यासाठी मद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यांनी स्वत:हून पाणी कपात करण्याची तयारी दर्शवावी. यासाठी शासनाने कारखानदारांशी संवाद साधून जास्तीत जास्त पाणी कपातीसाठी त्यांना तयार करावे, अशीही अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली. जनहित याचिका दाखल होण्यापूवी शासनाने अन्य उद्योग आणि मद्य उद्योगाची दहा टक्के पाणी कपात केली होती. त्यानंतर पुन्हा शासनाने अन्य उद्योग व मद्य उद्योगांची २० टक्के पाणी कपात केली आहे. याचिकेच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मद्य उद्योजकांनी शासनाला दिलेल्या प्रस्तावानुसार २४ एप्रिलपर्यंत पाच टक्के, ८ मेपासून पाच टक्के आणि २३ मेपासून पुन्हा पाच टक्के, अशी पुढील ४० दिवसांत ४५ टक्के म्हणजे ६२.३३ एमएलडी अर्थात ६२ कोटी लीटर पाणी वाचू शकेल, असे गिरासे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. खंडपीठाच्या भूमिकेवर विचार करण्यासाठी सरकारी वकील गिरासे यांनी आणखी वेळ देण्याची विनंती केली. ही विनंती खंडपीठाने मान्य करून याचिकेची सुनावणी सोमवारी ठेवली आहे. याचिकाकर्त्याची बाजू सतीश तळेकर मांडत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंचाईने पर्यटनस्थळे कोरडीठाक

$
0
0

औरंगाबाद ः जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना पाणी टंचाईची झळ बसली आहे. बीबी का मकबरा परिसरातील उद्यानाला टँकरचे पाणी दिले जात आहे. पाणचक्की, औरंगाबाद लेणी, मकबरा आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात पर्यटकांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही. परिणामी, पर्यटकांची गैरसोय होत असून, बाटलीबंद पाण्याची विक्री वाढली आहे.

उन्हाची तीव्रता वाढताच पर्यटकसंख्या कमालीची घटली आहे. उन्हाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्यानंतर देशी व विदेशी पर्यटकांनी पर्यटन थांबवले आहे. सध्या देशी पर्यटक पर्यटनस्थळ पाहण्यासाठी येत आहेत. शिर्डी आणि शिंगणापूरला दर्शनासाठी आलेल्या दाक्षिणात्य भाविकांची पर्यटकांत जास्त संख्या आहे. सर्व पर्यटकांना सुविधा देण्याची जबाबदारी केंद्रीय पुरातत्व विभाग, महापालिका व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची आहे. पण, शहरातील एकाही पर्यटनस्थळी पिण्यासाठी पाणी नाही. पाणचक्कीचा नैसर्गिक जलस्रोत थांबल्यामुळे कोसळणारे पाणी पाहता येत नाही. या प्रकारामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. पाणचक्कीत पर्यटकांसाठी पाण्याची व्यवस्था नाही. बीबी का मकबरा प्रवेशद्वाराजवळ पिण्याचे पाणी आहे. मात्र, पाणी गरम असून सभोवती प्रचंड घाण आहे. मकबरा पाहण्यासाठी आत गेलेल्या पर्यटकांचे पाण्याअभावी प्रचंड हाल होतात. त्यामुळे बहुतेक पर्यटक सोबत पाणी घेऊन जात आहेत. अंतर्गत भागात पाण्याचे कूलर हवे, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे. विशेष म्हणजे पाण्याचे मोठे कूलर नादुरुस्त असल्यामुळे अडगळीत पडले आहे. औरंगाबाद लेणी परिसरात पाण्याची बोंब आहे. काही पायऱ्या चढून वर गेल्यानंतर केंद्रीय पुरातत्व विभागाचा पाण्याचा हौद आहे. हे पाणी गरम आणि अस्वच्छ असल्यामुळे पर्यटक पित नाहीत. लेणीच्या पायथ्याजवळील बौद्ध विहाराच्या प्रांगणात पाण्याचे रांजण आहेत. पर्यटक लेणी पाहण्यापूर्वी किंवा लेणी पाहून आल्यानंतर रांजणातील पाणी पितात. काहीजण बाटल्यात पाणी भरून घेऊन जातात. केंद्रीय पुरातत्व विभागाने पाण्याची व्यवस्था केली नसल्यामुळे पर्यटक बेजार झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात पर्यटकांची वर्दळ असते. या ठिकाणी महापालिकेने पाण्याची व्यवस्था केली आहे. शहरातील प्रमुख पर्यटनस्थळी उन्हाळ्यात पर्यटकांचे हाल सुरू आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने संबंधित विभागांच्य समन्वयाने पर्यटकांची गैरसोय दूर करणे आवश्यक आहे. अजूनही 'एमटीडीसी'ने पुढाकार घेतला नसल्यामुळे पर्यटकांची गैरसोय कायम आहे.

उद्यानाला टँकरचे पाणी
बीबी का मकबरा पाहण्यासाठी पर्यटकांची सर्वाधिक गर्दी असते. मकबऱ्यातील उद्यानाचा विस्तार अधिक असून उद्यान हिरवे ठेवण्यासाठी जास्त पाणी लागते. सध्या पाणी टंचाई असल्यामुळे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मकबऱ्यातील उद्यानाला टँकरचे पाणी दिले जात आहे; तसेच मकबऱ्यातील दर्शनी भागातील हौदातही टँकरचे पाणी टाकले आहे. पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेल्या हौदाजवळ बसून अनेकजण फोटोसेशन करतात.

पाणी विक्रीत तेजी
पर्यटनस्थळी संबंधित विभागांनी पाणी पुरवठा करण्याबाबत माघार घेतल्यामुळे व्यावसायिकांचा धंदा तेजीत आहे. सर्व पर्यटनस्थळी दररोज हजारो पाण्याच्या बाटल्यांची विक्री होते. रसवंती, लिंबू सरबत, आईस्क्रिमच्या दुकानात गर्दी वाढली आहे. पर्यटनस्थळातही विक्रेते सहज फिरून पाण्याच्या बाटल्यांची विक्री करतात. पर्यटकांना थंड व स्वच्छ पाणी मोफत देण्याची जबाबदारी विभागांनी झटकल्यामुळे विक्रेत्यांची उलाढाल वाढली आहे.

ध्या पर्यटन हंगाम नसला तरी सुटीनंतर देशातील पर्यटकांची संख्या वाढते. पर्यटनस्थळांचे तिकीट दर वाढवले आहेत. या तुलनेत सुविधांचा अभाव आहे. केंद्रीय पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने समन्वयाने पर्यटकांची गैरसोय दूर करावी. पिण्यासाठी पाणी नाही हे पर्यटन राजधानीचे दुर्दैव आहे.
- जसवंतसिंग राजपूत, अध्यक्ष, टुरिस्ट प्रमोटर्स गिल्ड

सध्या उन्हामुळे पर्यटकांच्या संख्या कमी झाली आहे. वस्तूसंग्रहालयात पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पार्किंग सुविधा आहेत. पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी योग्य खबरदारी घेतली आहे.
- सर्वेश नांद्रेकर, व्यवस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रबरसील’ अभावी पाणी गेले वाया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेने जिल्ह्यात ५८५ कोल्हापुरी बंधारे बांधले. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यातील पावसामुळे अनेक बंधाऱ्यांमध्ये कोट्यावधी लिटर पाणी साचले होते, पण रबरसील नसल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले होते. पुढच्या वर्षी पाणी वाया जाऊ नये यासाठी ४० लाखांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या ५८५पैकी १५० बंधाऱ्यांना दरवाजे नाहीत. ५८०० नवीन दरवाजांची आवश्यकता आहे. ज्यामुळे जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. दरवाज्यातून पाणी गळून जाऊ नये म्हणून गेल्या वर्षी रबरसील खरेदीसाठी २० लाखांची तरतूद करण्यात आली होती, पण निविदा प्रक्रिया न झाल्यामुळे खरेदी होऊ शकली नाही. रबरसील न घेता आल्यामुळे या बंधाऱ्यांमध्ये दरवाजे टाकता आले नाहीत. त्यामुळे एक थेंबही पाणी अडले गेले नाही. यावर्षी तसे होऊ नये, यासाठी रबरसील खरेदीची प्रक्रिया आतापासूनच सुरू झाली आहे. यंदा ४० लाखांची तरतूद केली असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. दरवाजे खरेदीसाठी यंदा दोन कोटींची तरतूद केली आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेच्या २२३ कामांची निवड करण्यात आली असून, तांत्रिक मान्यताही घेण्यात आली आहे. जास्तीची नवीन कामे न घेता नादुरुस्त असलेले बंधारे, पाझर तलाव यांची यादी तयार करून अंदाजपत्रक तयार करावे, असे आदेश महाजन यांनी प्रशासनाला दिले आहेत.

१०५ सिमेंट बंधारे बांधणार
जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी अध्यक्ष महाजन यांनी १२ कोटींची १०५ नवीन सिमेंट बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. जलयुक्त शिवार योजनेची ३० कामे पूर्ण झाली आहेत. सरकारकडून गेल्या वर्षी सिंचनासाठी दहा कोटी रुपये अधिकचे आले. त्यावर २५ कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यातून १०५ नवीन बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. १०३ पाझर तलावांची दुरुस्तीही करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंचाईग्रस्त शहरांना दहा कोटींचा दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळामुळे मराठवाड्यातील ग्रामीण भागासह शहरातही तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असलेल्या शहरी भागांमध्ये तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शहरी भागातील तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आलेल्या प्रस्तावामध्ये आंबाजोगाई शहर तातडीची पूरक पाणीपुरवठा योजनेसाठी ३ कोटी ५० लाख, अर्धापूर नगरपंचायतीच्या तातडीच्या योजनेसाठी ८७ लाख ८ हजार, पालम नगरपंचायतीच्या तातडीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ६६ लाख ४१ हजार रुपये, मंठा नगरपंचायतीसाठी २८ लाख तर मिरज ते लातूर रेल्वेने पाणीपुवठा करण्यासाठी मिरज रेल्वे स्थानक येथील पाणीपुरवठा योजना सुधारणा कामांसाठी १ कोटी ८४ लाख, लातूर शहरास रेल्वेने पाणी पुरवठा करण्याच्या ३ कोटी ९५ लाख तर माकणी धरणात तरंगते विद्युतपंप बसवण्याच्या २१ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास नुकत्याच विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.

यंदा नगरपालिका, नगरपंचायतींनाही दुष्काळाचा फटका बसत असून, अनेक नगर पालिकांच्या पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत आटल्याने ते मार्चमध्येच बंद पडले. काही नगर पालिकांना मार्चअखेरपर्यंत पिण्याचे पाणी मिळेल, अशी स्थिती आहे. एप्रिल-मे आणि जूनमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नगर पालिका प्रशासन कामाला लागले असले तरी निधीची मोठी अडचण होती, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी धरणात चर खोदणे, तातडीची उपाययोजना राबविणे, विहीर, बोअरवेल्स घेणे, जुन्या विहिरीत आडवे बोअर घेणे आदी उपाययोजना हाती घेतल्या असल्या तरी निधीची कमतरता होती, विभागीय आयुक्त कार्यालयात टंचाईसदृष्य परिस्थितीच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकांमध्ये अनेक नगरपालिकांनी १० लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत निधी हवा असल्याची मागणी नोंदवली होती.

खर्च अवास्तव तरी प्रस्ताव
उदगीर शहरासाठी तातडीची पाणीपुरवठा योनेअंतर्गतर्गत तिरू मध्यम प्रकल्पातून पाणी आणण्यासाठी १० कोटी १२ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भातील प्रस्ताव समितीसमोर आला होता, मात्र मुख्य अभियंता जलसंपदा यांनी प्रकल्पात उपयुक्त जलसाठा निरंक असल्याचा अहवाल दिला होता. सोनपेठ यांच्या तातडीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी खर्च अवास्तव दिसून आल्यामुळे विभागीय समितीने सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे कळवले आहे. तांत्रिक मान्यता नसने, दुरुस्तीच्या कामांचा समावेश तात्पुरत्या योजनेत समावेश केल्यामुळेही काही प्रस्ताव नामंजूर करण्यात आले.

या शहरांचे प्रस्ताव
टंचाईमुळे तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत प्रशासनाकडे लातूर महापालिकेने २४ कोटी, परभणी महापालिकेने ३ कोटी ४२ लाख, उदगीर पालिका १२ कोटी, पाथरी पालिका ३० लाख, उदगीर पालिका ३ कोटी ६१ लाख, उदगीर १० कोटी, उस्मनाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २ कोटी ५ लाख तर, सोनपेठ पालिकेने पुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरीच मागणी केली होती होती, मात्र यांचे प्रस्ताव नामंजूर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाख घनमीटर गाळाचा उपसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
सिल्लोड तालुक्यातील विविध प्रकल्पामधून लोकसहभागातून एक लाख ९२ हजार तीनशे घनमीटर गाळ उचलण्यात आला आहे, अशी माहीती तालुका कृषी अधिकारी सुभाष आघाव यांनी दिली. यामुळे आगामी काळात प्रकल्पामध्ये पाणी साठा होऊन कृषी उत्पादनात वाढ होणार आहे, असा दावा त्यांनी केला. हे शासनाकडून केले असते तर, त्यावर ५५ लाख ७६ हजार रुपये खर्च झाला असता.

सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे एक लाख ४३ हजार घनमीटर, पेंडगाव येथे दोन हजार, अजिंठा येथे २० हजार, रहिमाबाद साडेपाच हजार, मोढा सात हजार, अनाड सहा हजार, अंधारी साडेपाच हजार, कायगाव तीन हजार ३०० घनमीटर, असा एकूण एक लाख ९२ हजार तीनशे घनमीटर गाळ उपसण्यात आला आहे. यामुळे गाळ काढलेल्या प्रकल्पाची खोली वाढणार आहे. सुपिक गाळ शेतकऱ्यांनी शेतात टाकल्यामुळे जमिनीची सुपिकता वाढून तीन वर्ष या जमिनीला खताची मात्रा देण्याची गरज नाही, परिणामी शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन माळरान व हलक्या प्रतीची होती; त्या शेतकऱ्यांनी गाळ टाकल्याने त्यांची जमीन मळ्याची झाली आहे, असा दावा आघाव यांनी केला. शेतकऱ्यांच्या जमिनीची सुपिकता वाढून आगामी काळात पिक उत्पादनात वाढ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सराईच्या सरपंचावर टंचाईमुळे अविश्वास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
दुष्काळी परिस्थितीत पाणीपुरवठ्याचे नियोजन करत नसल्याने सराई-सालुखेडा ग्रुपग्रामपंचातीच्या सरपंच लताबाई बाळू नागे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावावर मतदान घेण्यासाठी २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पाणीप्रश्नामुळे सरपंचांवर अविश्वास ठराव आणण्याची या वर्षातील ही पहिलीच वेळ आहे.

सध्या दुष्काळी परिस्थिती असून सराई येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याविषयी सरपंच कोणतेही नियोजन करत नाहीत, परिणामी गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी १० ते १५ दिवसाआड मिळत आहे, असे तहसीलदारांना सादर केलेल्या अविश्वास ठरावात म्हटले आहे. याशिवाय १४ व्या वित्त आयोगाची शासनाकडून आलेली रक्कम परस्पर खर्च करणे, सराई गाव जलयुक्त शिवारमध्ये असतांना सरपंचांनी कोणतेही काम न करणे, सरपंचांच्या पतीचा ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप, मासिक सभा वेळेवर न घेणे, सरपंच झाल्यानंतर एक सुद्धा महिला ग्रामसभा न घेणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत. या ग्रुपग्रामपंचायतीमध्ये सात सदस्य असून त्यापैकी पाच जणांनी सह्या केल्या आहेत. उपसरपंच कल्पना कैलास काळे, सदस्य आम्रपाली बनकर, आशा वाल्मिक आंबेकर, बाळू काळे, रामहरी नागे यांच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यनिर्मिती उद्योगांचा पाणीप्रश्न कायमचा सोडवावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेतील उद्योगांचे पाणी कमी करणे आणि विशेषतः मद्यनिर्मिती उद्योगांचे पाणी बंद करावे किंवा कसे, याविषयी उलटसुलट विचार व्यक्त केले जात आहेत. राष्ट्रीय स्तरावर व्यापक चर्चा करून हा प्रश्न कायमचा सोडविणे गरजेचे असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चरचे माजी अध्यक्ष मानसिंह पवार, विद्यमान अध्यक्ष राम भोगले, डॉ. उल्हास गवळी, मुनिष शर्मा, मुकुंद भोगले, मिलिंद कंक, उमेश दाशरथी, अनिल भालेराव, सी. जे. पाठक, कमांडर अनिल सावे, मुकुंद कुलकर्णी, एन. श्रीराम यांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे काही मुद्दे मांडले आहेत.

दुष्काळग्रस्त भागातील जनतेला पिण्याचे पाणी पुरविणे यास कोणत्याही परिस्थितीत प्राधान्य देण्यात यावे, त्यासाठी सर्वच उद्योगांसाठी आवश्यक ती पाणीकपात आणि मद्य किंवा शीतपेये उद्योगांचे पाणी पूर्णपणे बंद करणे योग्य ठरेल, पण अशा प्रकारे उद्योगांचे पाणी बंद करून त्यातून बचत झालेले पाणी गरज असलेल्या भागांमध्ये पिण्यासाठी पुरविण्याचे किंवा पोचते करण्याची प्रभावी, कार्यक्षम व व्यवहार्य यंत्रणा प्रशासनाकडे उपलब्ध असली पाहिजे, अन्यथा ही उपाययोजना व्यर्थ ठरू शकेल. मराठवाड्यातील मद्यनिर्मिती उद्योगांकडून दरवर्षी राज्य सरकारला चार हजार कोटींचा महसूल मिळतो, असे सांगितले जाते. त्यातील एक मोठा भाग बिअर निर्मिती कारखान्यांकडून मिळतो. यंदाच्या सरकारच्या मंजूर अंदाजपत्रकात अशा प्रकारे मिळणाऱ्या महसुलाचा निश्चितपणे विचार केलेला असेल, त्यामुळे हे मद्य निर्मिती कारखाने बंद करावे लागल्यास हा महसूल सरकारला मिळणार नाही.

हे पाणी दुष्काळग्रस्तांना कसे पुरविणार
मद्यनिर्मिती उद्योगांचे पाणी बंद केल्यामुळे उपलब्ध होणारे पाणी गरजू जनतेपर्यंत पोचविण्याची प्रभावी व व्यवहार्य यंत्रणा आपल्याकडे आज उपलब्ध नसल्यास केवळ भावनेचा प्रश्न करून, असे कारखाने बंद करणे अयोग्य ठरेल. त्यामुळे तशी परिस्थिती असल्यास उन्हाळ्याच्या काळात मद्य निर्मिती कारखानदारांकडून मिळणारा महसूल दुष्काळग्रस्त भागांमध्ये कायमस्वरुपी योजना राबविण्यासाठी उपयोगात आणला जावा, अशी आग्रही मागणी आपणास सरकारकडे करता येऊ शकेल, असे निवेदनात म्हटले आहे.

रोजगारावरही संकट
सर्व कारखान्यांमध्ये ग्रामीण भागाल कामगार व कर्मचारी नोकरीला आहेत. त्यांचे काम बंद करून त्यांना आपण काही महिन्यांसाठी का होईना पण त्यांच्या मूळ दुष्काळग्रस्त गावी पाठविणार आहोत काय, याचाही विचार व्हावा. हा प्रश्न फक्त कायमस्वरुपी कामगारांचा नसून उन्हाळ्याच्या दिवसांत अतिरिक्त उत्पादन होत असल्याने तात्पुरत्या स्वरुपाचे काम करणाऱ्या हंगामी कामगारांची आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.

सामाजिक जबाबदारीचे भान
सामान्य जनतेच्या आणि विशेषतः ग्रामीण विभागाच्या सुख-दुःखांशी व्यापार उद्योग क्षेत्राता काही घेणे-देणे नाही असा एका समज दृढ आहे. राजकीय नेते, राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांच्यावतीने आयोजित केलेल्या शहरी व ग्रामीण भागातील सर्व कार्यक्रमांना आर्थिक पाठबळ उद्योग, व्यापार क्षेत्रातील मंडळीच देत असतात. त्यातील बहुतेक मंडळी प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करतात. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क, त्यांची निवास व भोजन व्यवस्था, ग्रामीण भागातील जलसंधारणाची कामे, मुलींचे शिक्षण व नुकतेच पार पडलेले सामुदायिक विवाह या सर्वच कार्यक्रमांमध्ये उद्योग व्यवसाय क्षेत्रातील बहुतांश मंडळींनी योगदान दिल्याचे स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यानेच पेटवली मोसंबीची बाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
दुष्काळामुळे विहीर आटली, टँकरने पाणी घेण्यासाठी पैसे नाहीत. शिवाय राज्य शासनाकडून कोणतीही मदत मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्यांने मुलांप्रमाणे जपलेली मोसंबीची एक, दोन नव्हे तर, तब्बल पाचशे झाडे शुक्रवारी जाळून टाकली. पाण्याअभावी या शेतकऱ्याची बाग सुकून गेली होती.

तालुक्यातील पोरगाव येथील शेतकरी किसन गायकवाड यांनी सहा वर्षापूर्वी त्यांच्या शेतात पाचशे मोसंबीच्या झाडांची लागवड केली होती. लागवडीनंतर चौथ्या वर्षापासून बागेपासून उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली होती. बाग जगवण्यासाठी त्यांच्याकडे शेतातील विहीर हा एकमात्र स्त्रोत होता. तीन वर्षांपासून पाऊस कमी पडत असूनही त्यांनी हिंमतीने प्रसंगी टँकरने पाणी आणून बाग जगवली. यावर्षी मात्र, त्यांना बाग जगवणे अशक्य झाले. गायकवाड यांच्या विहिरीचे पाणी डिसेंबरपर्यंत कसेबसे टिकले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विहीर आटली. त्यानंतर गायकवाड यांनी टँकरने पाणी आणून ठिबक सिंचनाद्वारे आतापर्यंत बाग जोपासली. यावर्षी पोरगाव भागात पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नसल्याने मोसंबीची बाग जगवण्यासाठी पाणी मिळणे अशक्य झाले. पैसे सुद्धा संपल्याने हताश झालेल्या गायकवाड यांनी शुक्रवारी पाचशे झाडे पेटवून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस मार्गात ‘ट्रान्सपोर्ट’चा खोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत आजवर शहरातील फक्त निम्म्याच ट्रान्सपोर्ट चालकांनी कामगार बसच्या थांब्यांची यादी सादर केली आहे. त्यामुळे बसचे मार्ग आणि थांबे यावर अद्यापही निर्णय झालेला नाही.

बेशिस्त रिक्षाचालक, खासगी ट्रॅव्हल्स चालकांना ताळ्यावर आणल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा कामगारांची वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्टचालकांकडे वळवला आहे. औद्योगिक क्षेत्रातील कामगार, कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी शहर हद्दीत सुमारे एक हजार खासगी बस धावतात. सुमारे २५हून अधिक बस ट्रान्सपोर्ट एजन्सी शहरात ही सुविधा पुरवितात. मात्र, अनेकदा प्रवासी घेताना चालक अन्य वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, या पद्धतीने बस थांबवितात असे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त संदीप आटोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बस ट्रान्सपोर्ट एजन्सी चालकांची एक बैठक पोलिस आयुक्तालयात मार्च महिन्यात घेण्यात आली होती. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सी. डी. शेवगण यांच्यासह ट्रान्सपोर्ट चालकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रवाशांची चढ-उतार करताना चालक अनेकदा रस्त्याच्या मधोमध बस उभी करतात, असुरक्षितपणे बस थांबविण्यात येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता आणि वाहतूक कोंडीचा प्रश्नही निर्माण होतो. त्यामुळे नियमांचे पालन करा आणि सुरक्षित वाहतुकीवर भर द्या, अन्यथा कारवाई करू अशी तंबी पोलिसांनी बैठकीत दिली होती. कुठेही बस उभी करू नका, बस थांब्यांची यादी सादर करा, असे निर्देश दिले होते. या थांब्याची प्रत्यक्ष पाहणी करून वाहतुकीस अडथळा होणार नाही, असे थांबे निश्चित केले जातील, असेही या बैठकीत ठरले. मात्र, आतापर्यंत निम्म्या ट्रान्सपोर्ट चालकांनी यादीच सादर केली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. परिणामी, बस थांबे निश्चित करण्यासाठीची पुढील कारवाई संथ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघाला गांधी-नेहरू विचारांची धास्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'केंद्र सरकारने नियोजन आयोग बंद करून नीती आयोग सुरू केला. 'जेएनयू'मध्ये मोठा गोंधळ घालण्यात आला. पंडित नेहरू यांचे विचार व ठसा मिटवण्यासाठी हा प्रकार सुरू आहे. नेहमी गांधी-नेहरू वाद, बोस-गांधी वाद सांगून सावरकर-गोळवलकर श्रेष्ठ असल्याचे दाखवत आहेत. अजूनही संघाला आणि भाजपला गांधी-नेहरूंच्या विचारांची व प्रतिभेची धास्ती वाटते,' असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

अॅड. भगवानराव देशपांडे लिखित 'विचार मंथन' पुस्तकाचे शनिवारी महसूल प्रबोधिनी सभागृहात प्रकाशन झाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत. अॅड. भगवानराव देशपांडे, शारदा साठे, जयश्री सावंत, उषा देशपांडे व कॉ. भालचंद्र कानगो यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी केतकर म्हणाले, 'सध्या उजव्या विचाराच्या नावाखाली फॅसिझम मांडण्याची प्रक्रिया सुरू आहे. गांधी-नेहरू विचारांचा प्रभाव मिटवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. या विचारांची व प्रतिभेची संघाला धास्ती वाटते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कागदपत्रे खुली करण्यासाठी दीड वर्षे आंदोलन करण्यात आले. या कागपत्रातून नेहरू-बोस यांच्या संबंधाची वादग्रस्त माहिती मिळेल असे वाटले होते. कागदपत्रात वादग्रस्त काही नसल्याने आंदोलक शांत आहेत. धार्मिक गोंधळातून राजकीय अराजक निर्माण करण्याचा डाव आहे. जर्मनीत १९२३ ते १९३३ या कालावधीत हाच प्रयोग झाला होता. 'मेक इन इंडिया'चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला स्वस्तात मजूर देण्याचे वक्तव्य करतात. जपानऐवजी भारतात उद्योग उभारण्याचे निमंत्रण देतात. तरी प्रतिक्रिया उमटत नाही'.

अॅड. देशपांडे यांनी सद्यस्थितीवर भाष्य केले. 'देशात निर्माण झालेल्या किंवा केलेल्या परिस्थितीवर मूलगामी चर्चा झाल्याशिवाय प्रश्नांचे स्वरूप कळणार नाही. धर्मशृंखलेतून बाहेर पडल्याशिवाय देशाचा विकास नाही. अध्यात्मवादाला राजसत्तेचे संरक्षण असल्यामुळे भौतिकवाद सर्वमान्य झाला नाही,' असे देशपांडे म्हणाले. 'लोकशाही टिकवण्यासाठी सामाजिक सहिष्णुता पाहिजे. धर्मनिरपेक्षा लोकसत्ता निर्माण करणे आवश्यक असते' असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. राम बाहेती यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images