Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जनावरांसाठी पशुधन विमा योजना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानबाद

शेती व्यवस्थेवर कोसळणाऱ्या आपत्तीमधून शेतकरी आणि पिके यांना सरंक्षण देण्यपाठोपाठ शेतीसाठी अतिमहत्वाचा घटक असलेल्या पशुधनाचे संरक्षण करण्यासलाठी राज्यात आपत्ती व्यवस्थापन आराखडा लागू करण्यात आला आहे. राज्यात दुष्काळ, पूर चक्रीवाळ भूकंप आणि इतर मानवनिर्मित संकटे अशा कोणत्याही कालावधीत हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा लागू राहिल, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे यांनी दिली.

भारतासारख्या खंडप्राय देशात निसर्गाच्या विविध छटांचा अनुभव शेतकऱ्यांना घ्यावा लागतो. एकाच हंगामात उत्तरेकडे जलप्रलयात गावेबुडत असताना दक्षिणेकडे भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागते. यंदा आपत्तीमध्ये नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा अस्तित्वात आला. या आराखड्याच्या आधारे मनुष्यबळाची व मालमत्तेची कमीत कमी हानी व्हावी, याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले. हा आराखडा संपूर्ण देशभरात जिल्हास्तरावर आता कार्यरत झाला आहे. त्यामुळे मोठ्या जीवित हानीला आटकाव घालण्यात केंद्र व राज्य शासन यशस्वी ठरले असले तरी शेती आणि पशुधनाचे नुकसान मात्र, आजपर्यंत शेतकऱ्याला सोसावे लागत होते. यातील शेतीचे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना प्रस्तावित केली आणि सरकारी व खासगी विमा कंपन्यांच्या सहयोगातून कमीत कमी हप्त्यामध्ये शेतीला संरक्षण देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. यामध्ये पशुधनाचा फारसा विचार आजवर झाला नव्हता.

आपत्तीमध्ये नागरिकांबरोबर पशुधनावरही मोठे संकट कोसळते. जलप्रलयात त्यांच्या सुरक्षित निवाऱ्याचा तर दुष्काळामध्ये पाणी, चारा व पशुखाद्याचे प्रश्न गंभीर बनत जातात. स्वतःच्या उदरनिर्वाहाची विंवचना असलेल्या शेतकऱ्यांना आपली पोटं भरण्यासाठी जनावरे सरकारी किंवा सामाजिक संस्थाद्वारे उभारलेल्या चारा छावण्यांमध्ये नेण्यावाचून पर्याय राहत नाही. पशुधनाचा ही हलाखीची अवस्था रोखण्यासाठी आता केंद्र सरकारने पशुधनाचा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडाही संकल्पना समोर आली.

पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स व्यवसाय मंत्रालयाने तीन भागांमध्ये आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले. त्यानुसार पहिल्या भागात आपत्ती पुर्ण सज्ज असून दुसऱ्या भागात आपत्ती कालावधीतील कामे आणि तिसऱ्या भागात आपत्तीनंतर करावयाच्या योजनांचा समावेश आहे.

आपत्तीपूर्व कामांमध्ये सुचनांचा प्रचार प्रसार पशुधनातील संभाव्य नुकसानीची ओळख लसीकरण चारा पुरवठा आदी संबंधित कृषी आराखड्याचचा तर आपत्ती कालावधीमध्ये साथीचे रोग स्वच्छता देखभाल तसेच गुरेढोरांचा बचाव वैरण व पशुखाद्य पुरवठा यांचा समावेश आहे. आपत्तीनंतरच्या काळात आजारी प्राणी रोगासंबंधी उपाय आणि पशुधन वृद्धी धोरण याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

देशात २०१२ मध्ये करण्यात आलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणात पशुधनाची संख्या ५१ कोटीवर असल्याची माहिती आहे. यामध्ये दूध उत्पादनास उपयुक्त असलेल्या म्हैस, गाय, शेळी अशा दुग्धजन्य पशुधनाची संख्या ११ कोटींवर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पदोन्नतीत खोडा; शिक्षकांचा हिरमोड

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सुट्या वगळल्या, तर दररोज कुठला ना कुठला नवीन विषय अडचण म्हणून उभा राहतो. नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिना उलटून गेला, तरी अनेक शाळांवर मुख्याध्यापक नाहीत. त्यासाठी प्रशासनाने मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया राबविण्याचे ठरविले होते. काही कारणास्तव ही प्रक्रिया पुन्हा पुढे ढकलली गेल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

दरम्यान, आता ३१ जुलै रोजी रोजी रिक्त होणाऱ्या जागाही याच पदोन्नती प्रक्रियेत भराव्यात, अशी मागणी केली जात आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये मुख्याध्यापकांची ५९९ पदे आहेत. त्यापैकी २७ पदे कित्येक महिन्यांपासून रिक्त आहेत. १८ मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुख म्हणून अभावित पदोन्नती दिली आहे. त्यामुळे ही पदे रिक्त या संकल्पनेत मोडत नाहीत. तरीही ४५ शाळांवर मुख्याध्यापक नाहीत. जेव्हा पदोन्नती प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा हे केंद्रप्रमुख मूळ पदस्थापनेवर रुजू होतील. गेल्या महिन्यात शिक्षण विभागाने मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया राबविली होती. ६३ रिक्त जागांसाठी ३४० जणांना बोलाविले होते, पण अनेकांनी पदोन्नती स्वीकारण्यास नकार दिला. समुपदेश पद्धतीने या जागा भरल्या गेल्याने सोयीच्या जागांवरचा हक्क गेल्यामुळे अनेक गुरुजींनी मुख्याध्यापक होणे टाळले. त्यामुळे २७ जागा रिक्त राहिल्या. यामुळे शाळांच्या प्रशासकीय बाबीत अडचण येऊ नये, यासाठी शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी २० जुलै रोजी मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया आयोजित केली होती. यावेळी १९९२ पर्यंत शिक्षक म्हणून रूजू झालेल्या ४७० जणांना बोलाविण्यात आले होते. मात्र, काही कारणास्तव प्रक्रिया होऊ शकली नाही. कधी नव्हे ते प्रशासनाने एवढ्या तातडीने पदोन्नती प्रक्रिया राबविण्याचे ठरविले होते. त्यात अडचण झाल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

दरम्यान, ३१ जुलै रोजी काही मुख्याध्यापक सेवानिवृत्त होत आहेत. या जागांची माहिती घेऊन प्रशासनाने या जागेसाठीही पदोन्नती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण विभागाकडे केली आहे. संघाच्या माहितीनुसार ३१ जुलै रोजी सात जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने ३४ जागांसाठी प्रक्रिया राबवावी, अशी मागणी संघाचे राज्य संपर्कप्रमुख मधुकर वालतुरे, राजेश हिवाळे,काकासाहेब जगताप, कैलास गायकवाड, संजय भूमे, दिलीप साखळे आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५ लाख आण; नाही तर अॅसिड टाकेन

$
0
0

औरंगाबाद : घर खरेदसाठी माहेराहून पाच लाख रुपये आण म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ सुरू असल्याचा प्रकार सिडको एन ७ मध्ये उघड झाला आहे. पीडिता नोकरी करणारी असून पैशांसाठी पती अण्णासाहेब भोसले व सासू इंदूबाई भोसले (रा. एन सात, सिडको) हे छळ करत. रॉकेल व अॅसिड टाकून मुलांसह जाळून टाकू, अशी धमकी ते देत होते. यावरून गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरी घटना जिन्सी भागात घडली. रिक्षा खरेदीसाठी ५० हजार आणावेत, यासाठी पती शेख समीर याच्यासह सासरचे लोकांनी (रा. कैसर कॉलनी) छळ केला, घराबाहेर हाकलून दिले, अशी तक्रार वीस वर्षीय विवाहितेने केली आहे. विशेष म्हणजे महिला तक्रार निवारण केंद्रात याप्रकरणी पीडितेने अर्ज केला होता. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिसऱ्या घटनेत दुचाकी घेण्यासाठी पन्नास हजार रुपये आणावेत, यासाठी एका ३४ वर्षीय विवाहितेचा छळ करणाऱ्या पती विशाल आवळे (रा. शांतीपुरा) याच्यासह तिघांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेचा विनयभंग

'तू सैराट चित्रपटातील हिरोइनसारखी दिसतेस. सैराट पाहण्यासाठी चल,' असे म्हणत महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी प्रदीप दगडू पल्हाळविरुद्ध (रा. हर्सूल) हर्सूल पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पल्हाळ हा फिर्यादी महिलेच्या घरमालकाच्या मुलाचा मित्र आहे. मित्राला भेटण्यासाठी येणाऱ्या प्रदीपने भाड्याने राहणाऱ्या पीडितेचा (वय २७) मोबाइल क्रमांक मिळवला. त्यानंतर तो एक जूनपासून त्रास देत होता. पीडितेच्या पतीने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता प्रदीपने त्यांनाही शिवीगाळ केली, अशी तक्रार पीडितेने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

IS कनेक्शन; परभणीतून शाहीद खानला अटक

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

'आयएस' या दहशतवादी संघटनेनं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याच्या संशयाला बळ देणारी आणखी एक घटना समोर आली आहे. 'आयएस'शी संबंधांच्या संशयावरून काल कल्याणमधून रिझवान खानला ताब्यात घेतल्यानंतर २४ तास उलटत नाहीत तोच आज परभणीतून शाहीद खान याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक किलो स्फोटकं जप्त करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र एटीएसनं ही कारवाई केली. काही दिवसांपूर्वीच एटीएसनं परभणीतून नासेरबिन याला अटक केली होती. नासेरबिननं 'आयएस'साठी बॉम्ब बनवून त्याचे फोटो सीरियातील 'आयएस'च्या हस्तकाला पाठवले होते. नासेरबिननं बनवलेला बॉम्ब नेमका कुठं आहे याची चौकशी सुरू असतानाच नासेरच्या संपर्कात असलेल्या शाहीद खानची टीप एटीएसला मिळाली. त्यानंतर एटीएसनं आज त्याला अटक केली. शाहीद खानच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.

एटीएसचे प्रमुख मराठवाड्यात

मराठवाड्यातील अनेक मुस्लिम तरुण बेपत्ता असून ते 'आयएस'च्या संपर्कात असल्याचं बोललं जातं. या पार्श्वभूमीवर एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी सध्या मराठवाड्यातच आहेत. येथील तरुणांना दहशतवादासाठी प्रवृत्त केलं जात असल्याच्या वृत्ताला कुलकर्णी यांनी आज दुजोरा दिला. 'आयएस'च्या आकर्षणातून परदेशी गेलेल्या १०० मुलांचं समुपदेशन करून त्यांना परत आणण्यात यश आलं आहे,' असंही त्यांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध वाहतुकीवर आजपासून कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
फुलंब्री तालुक्यातील पाथ्री येथे झालेल्या अपघातानंतर खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने आता कारवाई करण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी २५ ते ३१ जुलै दरम्यान पोलिस व आरटीओ विभागाकडून धडक कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १२ महिने २४ तास सर्रास अवैध प्रवासी वाहतुक सुरू असताना ही कारवाई केवळ पाच दिवस होणार आहे.
पाथ्रीजवळ गिरिजा नदीच्या पुलावार झालेल्या अपघाताची कारणमिमांसा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी दिले होते. यानुसार आरटीओ आणि पोलिस प्रशासनाकडून पथके स्थापन करण्यात आली आहेत. शहरात मालवाहू वाहनामधून प्रवासी वाहतूक होणार नाही, यासाठी वाळूज, एमआयडीसी वाळूज, छावणी, दौलताबाद पॉइंट तसेच करमाड परिसरामध्ये कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
आरटीओ विभागाने तीन पथक तयार केले असून पोलिस विभागासोबत संयुक्तरित्या कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्याभरामध्ये राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन तसेच कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल, वाहनधारक दोषी आढळल्यास चार महिने वाहन परवाना रद्द करण्यात येऊन कायदेशिररित्या दंड वसूल करण्यात येणार आहे.

शहराबाहेर अधिक जोर
औरंगाबाद शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतुक होते. यामध्ये काळी-पिवळीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवणे, मालवाहू वाहनांमध्ये प्रवासी बसवण्याचे प्रकार घडतात. प्रामुख्याने औरंगाबादहून सिल्लोड, खुलताबाद, फुलंब्री, पैठण, करमाड, वाळूज या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतुकीचे प्रकार होतात.

'ग्रामीण'ची दोन पथके
ग्रामीण भागामध्ये टेम्पो, ट्रक, क्रुझर, मॅझिक आदी वाहनांमधून अवैध प्रवासी वाहतूक करण्यात येते. यासाठी ग्रामीण भागात पोलिसांची दोन पथके तैनात करण्यात आली असून आरटीओ पथकासोबत पाच पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगीत अध्यापकांचे एक ऑगस्टपासून उपोषण

$
0
0

औरंगाबाद ः संगीत प्राध्यापकांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय संगीत अध्यापक महासंघातर्फे एक ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करण्यात येणर आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष जे. एस. कळसणे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. तारांकित प्रश्न उपस्थित झाल्यानंतर दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.
संगीत शिक्षकांच्या मागण्यांकडे २००४ पासून च्या काँग्रेस आघाडी सरकार आणि आताचे युती सरकार दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, दत्ता मोघे, रामनाथ मोते, माजी आमदार श्रीकांत जोशी, संजीवनी रायकर यांनी विरोधी पक्षात असताना तारांकित प्रश्न उपस्थित केला, याकडे लक्ष वेधण्यात आले. चित्रकला शिक्षकांला संगीत शिकवण्यास सांगितल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. मंत्री विनोद तावडे, मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ मागितली, मात्र प्रतिसाद मिळत नसल्याचे कळसणे यांनी सांगितले. विद्यालयीन स्तरावर संगीत सुरू करणे, डी.एड. व बी.एडची अट रद्द करणे, तबलावादक, वाद्यवादक शिक्षकांची पदे भरणे आदी मागण्या आहेत. यावेळी उपाध्यक्ष प्रा. भारती पोहनेकर, सचिव उषा जोशी, कोषाध्यक्ष स्मिता कुलकर्णी, आनंद पाटील, प्रा. डॉ. के. बी. देशपांडे, चित्रा निलंगेकर, भारती सोहेनी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नीट’ची परीक्षा त्रासदायक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
परीक्षा केंद्रात प्रवेश करताना प्रत्येक विद्यार्थ्याची मेटल डिटेक्टरने झालेली तपासणी, कानात रिंग असेल, तर ती काढल्यानंतरच विद्यार्थिनीला परीक्षा केंद्रात दिला गेलेला प्रवेश, यासह प्रत्यक्ष वर्गात स्वाक्षरी, बोटाचे ठसे घेण्याची लांबलचक प्रक्रिया अशा वातावरणात रविवारी (२४ जुलै) 'नीट' परीक्षा पार पडली. प्रत्यक्ष वर्गात परीक्षकांकडून वारंवार व्यत्यय आणला जात असल्याने पुरेसा वेळ मिळाला नसल्याचा अारोप परीक्षार्थिंनी केला आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीबीएसईतर्फे 'नीट' घेण्यात आली. यंदा 'एमएचटी-सीईटी' की 'नीट' याबाबत वादंग उठले होते. केंद्र सरकारलाही हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे या 'नीट' 'फेज-२' परीक्षेला महत्त्व आले होते. शहरातील १३ परीक्षा केंद्रावर ५ हजार ८२० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सूचनांची भरमार आणि त्यानुसार झालेली प्रक्रिया विद्यार्थ्यांची परीक्षा पाहणारी ठरली. सकाळी साडेसातपासून विद्यार्थी परीक्षा केंद्रावर दाखल झाले. प्रत्येकाची मेटल डिटेक्टरने तपासणी केली गेली. या तपासणीनंतर प्रत्यक्ष वर्गातराबविण्यात आलेली प्रक्रिया व्यत्यय आणणारी ठरल्याचे परीक्षार्थींनी सांगितले. ही सगळी प्रक्रिया पूर्ण करत पेपर सोडविण्यासाठी पूर्ण वेळ दिला पाहिजे, शिस्तीचा बडगा त्रासदायक नसावा, असे विद्यार्थी व पालकांनी सांगितले.

दागिने काढावे लागले
मुलींच्या अंगावरील दागिने, केसांना लावलेली क्लिप काढल्यानंतरच केंद्रावर प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांना वर्गात सकाळी साडेनऊ वाजता प्रवेश देण्यात आला, १० वाजता पेपरला सुरुवात झाली. त्यानंतरही विद्यार्थ्यांची उपस्थिती चार्टवर स्वाक्षरी, बोटाचे ठसे घेण्याची प्रक्रिया लांबलचक असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. ही सगळी प्रक्रिया व्यत्यय आणणारी असल्याची तक्रार परीक्षार्थिंनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोळा वर्षांच्या मुलाचा डबक्यात बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोहण्यासाठी गेलेल्या सोळा वर्षाच्या मुलाचा डबक्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजता चिकलठाणा एमआयडीसी परिसरात घडली. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अनिकेत रामदास आहिरे (वय १६, रा. लोकशाही कॉलनी, मुकुंदवाडी) हा मुलगा त्याच्या मित्रांसह रविवारी दुपारी सिडको एमआयडीसी परिसरात गेला होता. रत्नप्रभा मोटार्सच्या बाजूला एका खड्डयामध्ये पाणी साचले आहे. या पाण्यामध्ये ही मुले पोहण्यासाठी उतरली होती. अनिकेतला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. बाकीच्या मुलांनी आरडाओरड केल्याने नागरिक जमा झाले. सिडको एमआयडीसी पोलिसांना हा प्रकार कळवण्यात आला. अनिकेत पाण्यात बुडाल्याने त्याचा मृतदेह दिसून येत नव्हता. अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यांनी शोधमोहीम राबवत गळ टाकून अनिकेतचा मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यानी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तिखट वरण-भाताचा मारा, भाज्या गायब

$
0
0

Dhananjay.Kulkarni@timesgroup.com
औरंगाबाद ः आंतरवाली खांडी. जेमतेम ४२०० लोकसंख्येचे गाव. मुला-मुलींनी शाळेत नियमित यावे आणि त्यांच्या खाण्याची आबाळ होऊ नये म्हणून सुरू करण्यात आलेल्या पोषण आहार योजनेची लक्तरेच या गावातील शाळेत टांगलेली. किळसवाणी अस्वच्छता, निकृष्ट धान्य आणि निधीची चणचण अशा तिहेरी संकटात या शाळेची मुले सापडली आहेत.
पैठण तालुक्यातील आंतरवाली खांडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्थाच भयंकर आहे. औरंगाबाद शहरापासून ४७ किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत शालेय पोषण आहार योजनेची अक्षरश: खिल्ली उडविली जाताना दिसते. शाळेच्या खोल्या पडायाला आल्या आहेत. पोषण आहार शिजवत असलेल्या स्वयंपाकघर काळेकुट्ट. या योजनेत दररोज मुलांना कोणते अन्न द्यावे, याचा तक्ता कागदावर जरूर तयार आहे, पण तो अडगळीत टाकून दररोज उसळ आणि तिखट वरण-भाताचा मारा या मुलांवर केला जात आहे. मुलांना तो आहार पोषक ठरतोय का, हा संशोधनाचा विषय ठरावा. शौचालय-स्वच्छतागृहाशेजारचीच जागा पोषण आहाराच्या स्वयंपाक घरासाठी शाळेने निवडली अाहे. तेथेच आहार शिजवला जातो. कित्येक वर्षांपासून स्वच्छता न केलेले काळेकुट्ट स्वयंपाकघरावर विद्यार्थ्यांच्या वाट्याला आले आहे. पत्र्याची तुटकी शेड हेच स्वयंपाकघर. तेथेच डाळ-तांदळाची पोती ठेवली जात आहेत.

पूरक पोषण आहाराचे काय?
शेंगदाणे-गूळ, चिक्की, बिस्किटे आठवड्यातून एकदा दिले जातात. पूरक आहारात अंडी आणि दूध हे नाशवंत पदार्थ देण्यचे प्रयोग फसले आहेत. अंड्यांना कायम विरोध होतो म्हणून मुलांना अंडी देत नसल्याचे शालेय पोषण आहाराचे इंचार्ज शिक्षक जगन्नाथ कारके सांगतात.

शाळेत जिन्नस किती? प्रमाण काय?
- पहिली ते पाचवी वर्गाच्या प्रति मुला-मुलींसाठी ः कडधान्य ५० ग्रॅम, डाळ १५० ग्रॅम, तांदूळ १०० ग्रॅम, जिरे ०.२५ ग्रॅम, मोहरी ०.३० ग्रॅम, तिखट-मिरची १.५० ग्रॅम.
- सहावी ते आठवी वर्गाच्या प्रति मुला-मुलींसाठी ः कडधान्य ३० ग्रॅम, डाळ १०० ग्रॅम, तांदूळ ७०ग्रॅम, जिरे ०.२५ ग्रॅम, मोहरी ०.३० ग्रॅम, तिखट-मिरची १.५० ग्रॅम.

जिन्नसांचे सरकारने ठरवलेले प्रमाण
- पहिली ते पाचवी वर्ग ः प्रति विद्यार्थी रोज १०० ग्रॅम, तांदूळ शिजवून ४५० कॅलरी, १२ ग्रॅम प्रथिने.
- सहावी ते आठवी ः दररोज १५० ग्रॅम तांदूळ शिजवून ७५० कॅलरी, २० ग्रॅम प्रथिने

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आंतरवाली खांडी (पैठण) दृष्टिक्षेपात
शाळेची वेळ ः रोज सकाळी ९.५० ते दुपारी ४
शिक्षकांची संख्या : ८ (६ पुरुष आणि २ महिला)
एकूण वर्गखोल्या : ८
पडायला आलेल्या व कायम रिकाम्या असलेल्या खोल्या ः ३
मैदान ः सुमारे २ ते ३ हजार चौरस फूट
शाळेच्या पटावरील ः संख्या १८७ (८९ मुले, ९८ मुली)
शिक्षकांची स्थिती ः सर्व शिक्षक औरंगाबादचे स्थानिक रहिवासी. रोज अप-डाउन करतात. अन्न शिजवायला येत असलेल्य स्वयंपाकी महिलाच स्थानिक रहिवासी.

काळ्याकुट्ट भिंती, धुराने व्यापले स्वयंपाकघर
सरपणाची लाकडं आणून चुलीवर आहार बनवला जातो. असतो. चुलीमुळे स्वयंपाक घर काळे झाले आहे, धूर-धुळीने माखले आहे. कित्येक वर्षांपासून भिंतीला चुना लावण्यात आलेला नाही. अाहार शिजवत असलेल्या महिला व शालेय परिसरातील मुलांच्या आरोग्यास या धूर-धुळीचा कायम त्रास होतो.

प्रश्न असे, उकल तशी!!
- या शाळेत शालेय पोषण आहाराच्या नोंदी अद्ययावत नाहीत. दैनंदिन कामाच्या धबडग्यात भाज्या, फळे किंवा इतर नोंदीचे बंधन असताना शिक्षकांनी त्या केलेल्या नाहीत.
- पोषण आहार शिजविण्याची वेळ सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा आहे. हा आहार दुपारी बारा ते एक या वेळेदरम्यान वाटणे अपेक्षित आहे. या वेळा शाळेत पाळल्या जातात.
- दुसऱ्या दिवशी आहार शिजवण्यासाठी डाळी, उसळी अदल्यादिवशीच भिजत घातल्या जातात, परंतु त्याची वेळ ठराविक नाही. डाळ-तांदूळ तर शिजवण्याआधीच पाखडले व निवडले जातात. बचतगटांकडून डाळी किंवा तांदूळ पाखडून, निवडून मिळत नाहीत.
- बचतगटाचे पदाधिकारी पोषण आहारात मदत करायला येत नाहीत, देखभाल करत नाही. कॉन्ट्रॅक्टरकडून माल पाठवला जातो. मागणी तसा पुरवठा असतो.
- धान्य निवडणे, स्टॉक तपासणे ही दैनंदिन कामे केली जातात. त्याची नोंदही ठेवली जाते आणि आढावा आठवड्याला दिला जातो, पण कॉन्ट्रॅक्टर पुरवेल तसेच धान्य दिले जाते.
- विद्यार्थ्यांची संख्या मोजून अन्न शिजवले जाते. ते अन्न शिक्षकही सेवन करत असतात. याशिवाय शिक्षक रोज घरून डबेही आणतात.
- शाळेचे स्वतंत्र गोदाम नाही. वर्गांमध्येच बेंचेसच्या मागे डाळ-तांदळाची पोती ठेवली जातात. गोदामच नसल्याने त्याचे साठ्याच्या नोंदी ठेवल्या जात नाहीत.
- डाळ-तांदूळ शिजवताना त्यासाठी लागणाऱ्या मोहरी, जिरे, तिखट, हळद यांच्या उत्पादनाच्या तारखा व एक्सपायरी डेट पाहिली जात नाहीत.

समस्यांचा डोंगर आहे. स्वयंपाक घर, शौचालय अस्वच्छ आहे, सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छता होतच नाही. शाळा परिसरात पाण्याची सोय नाही. एक बोअर आहे, पण कोरडा. आजुबाजुच्या खासगी बोअरमधून पाणी आणले जाते. शाळांच्या खोल्या जीर्ण झाल्या आहेत. कोणत्याही क्षणी पडतील अशा तीन खोल्या तर बंदच करून ठेवल्या आहेत. वारंवार यासंबंधी जिल्हा परिषदेला कळवूनही काहीच होत नाही, पण यातून मार्ग काढत शाळेचे कामकाज सुरू आहे.
- पांडुरंग सखाराम सपकाळ, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

गेल्या १४ वर्षांपासून मी शाळेत अन्न शिजवतेय. आधी २० रुपये रोज मिळायचे. आता काही वर्षांपासून ३५ रुपये मिळतात. मानधन मिळेल त्याप्रमाणे काम होईल. हजार रुपयात घर चालवायचे कसे, हे तरी शासनाने आम्हाला सांगावे.
- चंद्रकलाबाई जायभाय, शालेय पोषण आहार मदतनीस

गेल्या अकरा-बारा वर्षांपासून शाळेत अन्न शिजवतेय. पगार काही वाढत नाही. तेच 'रांधा, वाढा, उष्टी काढा' हे किती दिवस चालणार. आम्ही आमच्या परीने काम करतो. आता जसा माल येईल तसाच शिजवावाही लागतो. आम्ही तरी कुठं कुठं पाहणार?
- बायजाबाई दिशागत, शालेय पोषण आहार मदतनीस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजिंठाच्या बस भाड्यात कपात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अजिंठा येथे जाणाऱ्या पर्यटकांसाठी सुरू केलेल्या वातानुकूलित बसचे भाडे शंभर रुपयांनी कमी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद ते अजिंठा लेणीचा प्रवास आता ६१२ रुपये भाडे असेल.
औरंगाबाद शहरात देशी-परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यांच्यासाठी ‌तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी पुढाकार घेऊन जिल्हा संनियंत्रण समितीच्या निधीतून दोन व्होल्व्हो बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे दोन वातानुकूलित बस घेण्यात आल्या आहेत. या सेवेला पर्यटकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे बसचे भाडे कमी करावे, अशी मागणी केली जात होती. औरंगाबाद ते अजिंठा लेणीच्या प्रवासासाठी सध्या ७२१ रुपये भाडे आकारले जात होते. एसटी महामंडळाच्या वातानुकूलित बस सेवेच्या एका टप्प्यासाठी १६ रुपये प्रती किलोमीटर दर आकारणी केली जात आहे. त्यानुसार औरंगाबाद ते अजिंठा लेणीपर्यंत ६२६ रुपये भाडे आकारणे अपेक्षित होते.
या दरामध्ये अजिंठा लेणी ते टी पाइंट हा प्रवास जोडल्यामुळे शंभर रुपये आकारणी करण्यात येत होती. आता पर्यटन बसच्या दरामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. एसटी विभागाने औरंगाबाद ते अजिंठा लेणी टी पॉइंट या प्रवासासाठी आता ६१२ रुपये आकारण्यात येणार आहे.

पूर्वी प्रवास दरात ‌अजिंठा टी पाइंट ते लेणी हा टप्पा जोडला होता. यामुळे भाडे वाढलेले होते. आता ही बस टी पाइंटपर्यंतच प्रवाशांना सोडण्यात येणार आहे. यामुळे हे दर कमी झालेले आहेत.
- सी. के. सोळसे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, मध्यवर्ती बस स्थानक, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वन टू वन’ : पाणंदमुक्ती हा जलजन्य आजारांवर रामबाण उपाय

$
0
0

शहरात तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी असलेल्या जलवाहिनींची गळती तसेच 'निगेटिव्ह प्रेशर'मुळे ठिकठिकाणी पाणी दूषित होते आणि गॅस्ट्रो, कॉलरा, टायफॉईड, डायरिया, डिसेन्ट्री आदी जलजन्य आजार दरवर्षी पावसाळ्यात भेडसावतात. पाणी दूषित होण्यामागे उघड्यावर नैसर्गिक विधी उरकण्याची सवय हे एक प्रमुख कारण आहे आणि त्यामुळेच पाणंदमुक्ती हा त्यावरील रामबाण उपाय आहे. त्याचवेळी जलवाहिन्यांची गळती बंद करणे, योग्य प्रमाणात 'क्लोरिनेशन'चा अत्यंत नियमित व काटेकोर वापर करणे खूप आवश्यक आहे. नागरिक स्वतःदेखील क्लोरिनचे काही थेंब पिण्याच्या पाण्यात टाकून आजारपणाला दूर ठेऊ शकतात, असे स्पष्ट मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी 'मटा'ला सांगितले.

प्रश्न ः पाणी दूषित होण्याचे नेमके कारण काय?
उत्तरः आपल्याकडे केवळ ग्रामीण भागात नव्हे तर शहरी भागातही अनेक ठिकाणी उघड्यावर नैसर्गिक विधी उरकण्यात येतो आणि हीच घाण पावसाळ्यात ठिकठिकाणच्या पाण्यात मिसळते, डबक्यात मिसळते, सूक्ष्म स्वरुपात जागोजागच्या परिसरात मिसळते. अशा ठिकाणाहून पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी गेलेली असेल आणि जलवाहिनीमध्ये 'लिकेजेस' असल्यास हे घाण पाणी जलवाहिनीच्या पाण्यात हमखास मिसळते आणि पाणी दुषित होते. त्याचवेळी जलवाहिनीचे पाणी गेल्यानंतर 'निगेटिव्ह प्रेशर'मुळे पुन्हा हेच घाण-दूषित पाणी जलवाहिनीमध्ये जाते आणि अधिकाधिक पाणी दुषित होते. जेव्हा या जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा होतो, तेव्हा हेच दूषित पाणी घरोघरी जाते आणि गॅस्ट्रो, टायफॉइड, डायरिया, डिसेन्ट्री, कॉलरा हे जलजन्य आजार उद्भवतात. या पार्श्वभूमीवर जलजन्य आजारांवर पाणंदमुक्ती हा खरे तर रामबाण उपाय आहे. त्याचबरोबर शुद्ध पाणी पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतींनी तसेच पालिकांनी जलवाहिनीचे 'लिकेजेस' दूर करावेत.

प्रश्नः बोअरचे पाणी दूषित होऊ शकते का?
उत्तरः जलवाहिनीबरोबरच बोअरचे पाणीदेखील दूषित होऊ शकते. बोअरचा पाइप-कठडे तुटलेले असल्यास किंवा आसपास गटारी, ड्रेनेजचे पाणी असेल किंवा ड्रेनेजचे पाणी वाहात येत असेल, तर हेच घाण पाणी झिरपून बोअरचे पाणीदेखील दूषित होऊ शकते. त्यामुळे बोअरचा परिसर स्वस्छ असणे, कठडे व्यवस्थित असणे, आजुबाजुला ड्रेनेज-गटारी नसणे खूप आवश्यक आहे. याबाबत प्रत्येक बोअर धारकाने काळजी घेतली पाहिजे.

प्रश्नः नागरिक स्वतः कशी काळजी घेऊ शकतात?
उत्तरः प्रत्येक वेळी पाणी पुरवठा होताना योग्य त्या प्रमाणात 'क्लोरिनेशन' झाले पाहिजे. त्याचबरोबर नागरिकदेखील स्वस्तातील 'मेडिक्लोअर'चा वापर करू शकतात. एका घागरीच्या पाण्यात दोन-तीन 'मेडिक्लोअर'चे थेंब टाकल्यास क्लोरिनची सुरक्षा मिळू शकते.

प्रश्नः जलजन्य आजार झालाच तर काय उपाय घ्यावेत?
उत्तरः कुठलाही जलजन्य आजार झाल्यास लवकरात लवकर 'ओआरएस'चा वापर सुरू करावा. जलजन्य आजारामुळे जेव्हा केव्हा मृत्यू ओढवतो तेव्हा तो शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे ओढवतो, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे साखर-मीठ-पाण्याचे योग्य मिक्षण असलेल्या 'ओआरएस'चा निश्चितपणे वापर करावा. 'ओआरएस'च्या पाण्याचे २४ तासांत सेवन करावे व दुसऱ्या दिवशी 'ओआरएस'च्या नवीन पाण्याचे सेवन करावे. मुळात वैयक्तिक, परिसर आणि सार्वजनिक स्वच्छता खूप आवश्यक आहे. सर्वांगीण स्वच्छतेमुळेच जलजन्य आजारांना कायमचे दूर ठेवता येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११६ दिवसानंतरही निकाल नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या सामाजिककार्य पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा (एमएसडब्ल्यू) निकाल जुलै संपत आला तरी जाहीर झालेला नाही. परीक्षा होऊन चार महिने होत आले तरी निकाल नसल्याने विद्यार्थी गोंधळलेल्या अवस्थेत आहे. गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संधीवर पाणी सोडावे लागले आहे.
विद्यापीठातंर्गत एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमाची पाच कॉलेज आहेत. या अभ्यासक्रमाची परीक्षा १५ ते २९ मार्चदरम्यान एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास विद्यापीठ विसरले आहे. परीक्षा होऊन चार महिने होत आले आहेत. अद्याप निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. निकाल का लागत नाही, याची माहिती घेण्यासाठी विद्यार्थी परीक्षा विभागाकडे खेटा मारत आहेत. निकाल केव्हा लागेल, अशी विचारणा विद्यार्थी करत आहेत, विद्यापीठातंर्गत सगळ्या अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशाची प्रक्रियाही संपली आहे. त्यानंतरही एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झालेला नाही.

प्रवेशाची संधीही हुकली
विद्यापीठातर्फे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाची प्रक्रिया संपली आहे. त्यामुळे एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या संधीही हुकलेल्या आहेत. आता निकाल केव्हा लागणार आणि या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घ्यायचे असेल तर विद्यापीठ प्रशासन काय भूमिका घेणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. परीक्षेनंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करावा, असे यूजीसीचा नियम आहे, परंतु परीक्षेच्या ११६ दिवसानंतरही 'एमएसडब्ल्यू'सारख्या अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झालेला नाही.

नोकरीच्या संधीवर पाणी
या अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर न झाल्याने शेकडो विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधीवर पाणी सोडावे लागले आहे. जूनमध्ये राज्यातील विविध नगर पंचायतीमधील नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या होत्या. निकाल वेळेत जाहीर झाला असता, तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्ज करता आले असते, परंतु निकाल लांबल्याने ही संधी हुकल्याचे विद्यार्थ्यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ गावांतील भूसंपादन लवकरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सोलापूर-धुळे (एनएच २११) या ४५० किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गासाठी औरंगाबाद आणि गंगापूर तालुक्यांतील २५ गावांमधील जमीन संपादित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी यासंदर्भात औरंगाबादचे उपविभागीय अधिकारी शशीकांत हदगल यांना आदेश दिले आहेत.
राष्ट्रीय महामार्गाच्या येडशी ते औरंगाबाद या पहिल्या टप्प्यासाठी भूसंपादनाने वेग घेतला असून, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद व जालना जिह्यांत कामाला सुरुवात झाली आहे. आता राष्ट्रीय महामार्गाचा औरंगाबाद ते धुळे या दुसऱ्या टप्प्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात हा राष्ट्रीय महामार्ग झाल्टा फाट्याजवळील निपाणी येथून सुरू होत आहे. हा रस्ता गांधेली-सातारा-वाल्मी-एएस क्लब-तीसगाव-भांगसीमाता गड-दौलताबाद-वेरूळमार्गे धुळे रस्त्याला जाऊन मिळणार आहे. या महामार्गावर दोन उड्डाणपूल, दोन सर्व्हिस रोड, पाच भुयारी मार्ग असतील. औरंगाबाद-कन्नड यादरम्यान होणाऱ्या ८० किलोमीटर महामार्गासाठी ४४ गावांमधील ५१३ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. यामध्ये औरंगाबाद १८, गंगापूर ७, खुलताबाद ८, कन्नड तालुक्यांतील ११ गावांचा समावेश आहे.
दरम्यान, औरंगाबाद आणि गंगापूर तालुक्यातील एकूण २५ गावांतील भूसंपादन प्रक्रिया लवकरच हाती घेण्यात येणार असून, यासाठी आवश्यक असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

भूसंपादन प्रक्रियेतील गावे
औरंगाबाद तालुक्यातील निपाणी, आडगाव बुद्रुक, झाल्टा, गांधेली, बागलगाव, बाळापूर, देवळाई, सातारा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, वळदगाव, पंढरपूर, तीसगाव, साजापूर, करोडी, माळीवाडा, केसापुरी तांडा, रामपुरी, तर गंगापूर तालुक्यातील आसेगाव, तळेसमान, फतियाबाद, जांभाळा, वरझडी, पाचपीरवाडी, दिवसी या सात गावांमधील जमीन संपादित करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्म्या मराठवाड्यावर पाऊस रुसलेलाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात शुक्रवारी व शनिवारी अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता, मात्र हिंगोली, नांदेड जिल्ह्यांचा काही भाग वगळता उर्वरित मराठवाड्याला अतिवृष्टीने हुलकावणी दिली. विभागातील आठही जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाने हजेरी लावली. निम्मा पावसाळा उलटून गेला, मात्र अद्याप मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांनी अपे‌क्षित पावसाची सरासरी ओलांडलेली नाही. त्यामुळे निम्म्या मराठवाड्यावर पाऊस रुसल्याचे चित्र आहे.

भारतीय हवामान विभागाने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मराठवाड्यातील सर्व ७६ तालुक्यांत शनिवारी पावसाने हजेरी लावली असली, तरी अतिवृष्टीचा इशारा केवळ नांदेड व हिंगोली जिल्ह्यांसाठी खरा ठरला. इतर सहा जिल्ह्यांना मात्र दमदार पावसाने हुलकावणी दिली. दोन दिवसात इतर जिल्ह्यांमध्ये केवळ रिमझिम पाऊस झाला. आठवड्याभराच्या खंडानंतर शुक्रवारी नांदेड व हिंगोली जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली शनिवारी सकाळपर्यंत दोन्ही जिल्ह्यांच्या १५ मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. रविवारी सकाळपर्यंत नांदेड जिल्ह्याच्या एका मंडळात अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली (९७ मिलीमीटर), माळविरा (११३) सरसम बुद्रूक (६९), वासंबा (११९), डिग्रस (९६), आंबा (१२५), तर नांदेड जिल्ह्यातील मुदखेड (९४), बारड (८२), अर्धापूर (९४) मालेगाव (८०), दहेली (७२), वाई (८६) हदगाव (७१), पिंपरखेड (७१ मिलीमीटर) या मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदवण्यात आली.

रविवार सकाळपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात ७.४० मिलीमीटर, जालना ११.७९, परभणी ३.१३, हिंगोली १२.८२, नांदेड १.४६, बीड १३.८७, लातूर ७.७२, उस्मानाबाद जिल्ह्यात १०.८३ मिलिमीटर पाऊस झाला.

पाच जिल्ह्यांना पावसाची प्रतीक्षा

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला असला पाच जिल्ह्यांनी अद्यापही अपेक्षित पावसाची सरासरी गाठली नाही. जालना (११५.५५ मिलीमीटर), हिंगोली (११७.१७), नांदेड (१२३.२३ या जिल्ह्यांनी आतापर्यंत अपेक्षित सरासरी गाठली असून, औरंगाबाद (९८.६५ मिलीमीटर), परभणी (९८.८१), बीड (८९.९३), लातूर (९९.७०) तर उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ९२.०९ मिलिमीटर अपेक्षित पाऊस झाला आहे.

गेल्या दोन दिवसांतील पाऊस

जिल्हा............२३ जुलै.......२४ जुलै औरंगाबाद.......७.८५...........७.४० जालना...........२५.९...........११.७९ परभणी...........१३.३२..........३.१३ हिंगोली...........४९.३३..........१२.८२ नांदेड..............२९.१६..........१.४६ बीड................४.४४...........१४.८७ लातूर.............११.९२...........७.७२ उस्मानाबाद.....३.७२...........१०.८३ एकूण.............१८.१०...........८.७५

(पाऊस मिलीमीटरमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये ‘राष्ट्रवादी’ला एमआयएमचा धक्का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा गड असलेल्या बीड नगर पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सात नगरसेवक 'एमआयएम'च्या (ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन) वाटेवर आहेत. येत्या २६ जुलै रोजी ते 'एमआयएम'मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. बीड पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ४२ नगरसेवक आहेत.

हैदराबाद येथील एमआयएम पक्षाने नांदेड महापालिकेतून राज्याच्या राजकारणात प्रवेश केला. औरंगाबाद, भायखळा या विधानसभा मतदारसंघात पक्षाने विजय मिळविला. त्यानंतर औरंगाबाद महापालिकेत पक्षाचे २४ नगरसेवक विजयी झाले. त्यानंतर पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बीड नगर पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर बीड शहराला मिळणारा निधी कमी झाला आहे. त्याचबरोबर विकासाची अनेक कामे होत नाहीत. दलित आणि मुस्लिम वॉर्डांकडे दुर्लक्ष होत असल्याचा नगरसेवकांचा आरोप होता. यामुळे काही नगरसेवकांनी 'एमआयएम'मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २६ जुलै रोजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांच्या उपस्थितीत बीड येथे आयोजित कार्यक्रमात हे नगरसेवक पक्षात प्रवेश करणार येणार आहेत, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. ते म्हणाले, 'काही नगरसेवक एमआयएममध्ये प्रवेश करणार असल्याचा विषय जुना आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची आवश्यकता नाही.'

एमआयएम हा गोर गरीबांची आवाज म्हणून समोर आलेला पक्ष आहे. पक्षात विकास कामांना प्राधान्य आहे. बीडचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. येत्या काही दिवसांत हे नगरसेवक पक्षात अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत. २६ जुलै रोजीच्या कार्यक्रमात तुम्हाला किती नगरसेवक 'एमआयएम'मध्ये प्रवेश करतील, हे दिसून जाईल.

- सय्यद मोईन, प्रदेशाध्यक्ष, एमआयएम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साडेबारा लाख १८ मिनिटांत लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मावस बहिणीला पाठवण्यासाठी रेल्वेस्टशनवर गेल्यानंतर अवघ्या ५० मिनिटांच्या कालावधीत चोरांनी सिडको एन सहा भागात धाडसी घरफोडी करून रोख ११ लाख रुपयांसह साडेबारा लाख रुपयांचा ऐवज पळवला. चोरांनी घराचा कडीकोयंडा तोडून ही चोरी फक्त १८ मिनिटांत केली. ही घटना रविवारी पहाटे घडली.
सिडको बजरंग चौक परिसरातील केसरीनंद हाउसिंग सोसायटीमध्ये अनिकेत गणेश कोंडावार यांचे घर आहे. त्यांचे प्रोझोन मॉल शेजारी भारत बाझारमध्ये दुकान आहे. अनिकेत यांचे वडील गणेश कोंडावार हे आजारी असून त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

आजारी गणेश कोंडावार यांना भेटण्यासाठी अनिकेत यांची मावस बहीण नांदेड येथून आली होती. त्यांना पाठवण्यासाठी अनिकेत रविवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास रेल्वेस्टेशनला गेले. यावेळी घरातील एका खोलीत त्यांची पत्नी व दोन वर्षांची मुलगी झोपली होती. साधारणतः ४५ ते ५० मिनिटांत ते घरी परतले. यादरम्यान दोन चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजाचे कुलूप तोडून चोरी केली होती. कोंडावार यांची पत्नी व मुलगी झोपलेल्या खोलीला चोरांनी बाहेरून कडी लावली. त्यानंतर दुसऱ्या खोलीमधील कपाटातील रोख ११ लाख रुपये व सोन्याचे दागिने, असा १२ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. काही मिनिटांत चोरटे ऐवज घेऊन पसार झाले. रेल्वेस्टेशनहून घरी परतल्यानंतर हा प्रकार अनिकेत यांच्या निदर्शनास आला. त्यांनी सिडको पोलिसांना या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी अनिकेत कोंडावार यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती तपास करीत आहेत.

मित्राचेह‌ी साडेसात लाख गेले

चोरीस गेलेल्या ११ लाख रुपयांच्या रक्कमेत त्यांच्या मित्राचे साडेसात लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. मुकुंदवाडी येथील त्यांचे मित्र नंदकुमार ढोले यांच्या शेतीच्या व्यवहारात त्यांना साडेसात लाख रुपये मिळाले होते. ही रक्कम त्यांनी कोंडावार यांच्याकडे ठेवण्यास दिली होती. ही रक्कम देखील चोरट्यानी लंपास केली.

श्वान चौकातच घुटमळले

घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटोळे, सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती आदींनी भेट दिली. श्वानपथक तसेच फिंगर प्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले, मात्र श्वान जवळच्या चौकात जाऊन घुटमळले.

सीसीटीव्ही कॅमेरा

कोंडावार यांच्या घरासमोरील इमारतीबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे. या कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद झाले आहेत. पल्सर सारख्या दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी हे कृत्य केले आहे. आतमध्ये गेल्यानंतर अवघ्या १८ मिनिटात हे चोरटे बाहेर आल्याचे फुटेजमध्ये दिसत आहेत. या फुटेजवरून आरोपींचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयएस संशयिताकडे रिमोट कंट्रोल बाँब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'इस्लामिक स्टेट'च्या (आयएस) संपर्कातील व सध्या पोलिस कोठडीत असलेल्या नासेरबिन अबुबकर याफई (चाऊस) याने तयार केलेला दीड किलोचा रिमोट कंट्रोल 'आयईडी' बाँब परभणीतील महंमद शाहेद खान महंमद कादरअली खान याच्याकडे सापडला आहे. नासेरबिन यानेच शाहेद खान याच्याकडे बाँब ठेवल्याची कबुली दिली होती. त्यावरून 'एटीएस'च्या पथकाने शाहेद खानला शनिवारी (२३ जुलै) रात्री साडेहाच्या सुमारास परभणी येथे अटक केल्यानंतर शाहेद खानच्या आजोळच्या घरातून बाँब जप्त करण्यात आला आहे.

नासेरबिन याफई चाऊस (वय ३४, रा. देशमुख गल्ली, परभणी) हा इंटरनेटद्वारे 'आयएस' संघटनेच्या संपर्कात होता. त्याला 'एटीएस'ने १४ जुलै रोजी परभणी येथे अटक केली होती. नासेरबिनकडून २ लॅपटॉप, ५ मोबाइल हँडसेट, २ पेनड्राईव्ह, १ कार्डरिडर, १ ब्ल्यूटूथ कनेक्टर, २ बॅटरी सेल, २ पासपोर्ट जप्त करण्यात आले होते. त्याचवेळी 'एटीएस'ने केलेल्या तपासात, नासेरबिनने बाँब तयार केल्याचे स्पष्ट झाले होते.

या तयार केलेल्या बाँबचे छायाचित्र नासेरबिन याने 'टेलिग्राम अॅप'द्वारे फारुकला पाठवल्याचे 'एटीएस'ने केलेल्या तपासात समोर आले होते. बाँब तयार करण्यासाठी नासेरबिन याला 'हवाला'मार्फत पैसे मिळाल्याचेही निष्पन्न झाले होते. दरम्यान, नासेरबिनने चौकशीत दिलेल्या माहितीवरून, त्याच्या संपर्कात असलेल्या मोहम्मद शाहेद खान मोहम्मद कादरअली खान (२४, रा. गोलघुमट, परभणी) याला शनिवारी रात्री १० वाजून २० मिनिटांनी 'एटीएस'च्या पथकाने अटक केली. शाहेद खान हादेखील उच्चशिक्षित असून, इंटरनेटद्वारे सिरियास्थित फारुबकच्या संपर्कात असल्याचे 'एटीएस'च्या सूत्रांनी सांगितले. शाहेदला २९ जुलैपर्यंत कोठडी : शाहेद खानला शनिवारी रात्री परभणीत अटक करण्यात आल्यानंतर त्याला रविवारी (२४ जुलै) औरंगाबाद येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी, शाहेद खानने अाणखी किती बाँब तयार केले आहेत, तसेच त्याचे अजून किती साथीदार आहेत, स्फोटके कुठून आणले, कुणी पुरवले आदींचा सखोल तपास करणे बाकी असल्याने आरोपीला १५ दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी केली.

ही विनंती ग्राह्य धरुन आरोपीला २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. एल. पठाण यांनी रविवारी दिले.

मोठ्या घातपाताचा कट

अवघ्या दहा दिवसांच्या अंतराने 'आयएस'च्या संपर्कात असलेल्या व दहशतवादी कारावायांमध्ये सक्रिय असलेल्या दोन आरोपींना 'एटीएस'च्या पथकाने अटक केली आहे आणि तेही एकाच शहरातून. हा मोठ्या घातपाताचा कट असू शकतो आणि यामध्ये मराठवाड्यातील अनेक तरूण सहभागी असू शकतात, अशी शक्यताही सूत्रांकडून व्यक्त होत आहे. लवकरच आणखी तरुणांना अटक होऊ शकते, असेही संकेत आहेत. विशेष म्हणजे शाहेद खानकडे सापडलेला 'आयईडी' बाँब हा अतिशय विनाशकारी असल्याचे मानण्यात येते व रमझानच्या काळात त्याचा वापर करण्याचा कट होता, असाही अंदाज बांधण्यात येत आहे.

मीडियामुळे चेंबरमध्ये सुनावणी

शाहेद खानला परभणी येथे अटक होऊन औरंगाबाद येथील विशेष न्यायालयात आणणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे रविवारी कोर्ट हॉलमध्ये प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. त्यामुळेच कोर्ट हॉलऐवजी न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये सुनावणीचा निर्णय घेण्यात आला. या वेळी एटीएसचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशांसह गाडी आरटीओ कार्यालयात दाखल

$
0
0

प्रवाशांसह गाडी आरटीओ कार्यालयात दाखल

पहिल्या दिवशी आरटीओ कडून ४३ वाहनांवर झाली कारवाई

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः

अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी ४३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यातील २१ वाहने जप्त करण्यात आली. अनेक वाहने तर प्रवाशांसह आरटीओ कार्यालयात जमा करण्यात आली.

फुलंब्री तालुक्यातील गिरीजा नदीच्या पुलावरून एका टेम्पो नदीत पडल्याने ४ जणांचा मृत्यू झाला होता, तर २२ प्रवासी जखमी झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी निधी पांडेय यांनी तातडीने विशेष बैठक घेऊन अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरटीओ अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांचे पथक कारवाईसाठी तयार करण्यात आले. त्यासोबतच ग्रामीण पोलिसांचेही विशेष पथक तयार करण्यात आले होते.

सोमवारी (२५ जुलै) झालेल्या कारवाईत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ४३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यासोबतच पोलिस आणि ग्रामीण पोलिसांनीही वेगळी कारवाई करीत अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने जप्त केली. यात पैठण रोड, बीड बायपासवरून अवैध वाहतूक होत असलेल्या खासगी जीप व अन्य वाहनांवर कारवाई करण्यात आली. काही वाहनांमध्ये असलेल्या प्रवाशांसहित ती वाहने आरटीओ कार्यालयात आणावी लागली. कारवाई पूर्ण होईपर्यंत प्रवाशांना आरटीओ कार्यालयातच उभे राहावे लागले.

त्या वाहनांवर कारवाई कधी ?

खासगी जीप तसेच अन्य अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई केली जात आहे. मात्र, अनेक कमर्शिअल वापरासाठी असलेल्या टूर्स, ट्रॅव्हल्सच्या खासगी वाहनांमधूनही अनेकदा अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. अशा वाहनांवर मात्र कोणतीही कारवाई संबंधित विभागाकडून होताना दिसत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआर’चौकशी पालिकेच्या माथी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
टीडीआर घोटाळ्याची चौकशी विभागीय आयुक्तांनी महापालिकेच्याच गळ्यात मारली आहे. महापालिकेनेच अधिकारी नियुक्त करावा व चौकशी करावी, असे आदेश त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिकेत सहा महिन्यांपूर्वी टीडीआर घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्याची चौकशी तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर व विद्यमान आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी स्वतंत्रपणे केली. चौकशीनंतर बकोरिया यांनी नगररचना विभागातील तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले. या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले. नगरविकास खात्याच्या संचालकांना चौकशी संदर्भात पालिकेतर्फे पत्र पाठवण्यात आले, पण आमच्याकडे चौकशी करण्यासाठी अधिकारी उपलब्ध नाही, असे सांगून संचलकांनी चौकशी करण्यास नकार दिला. त्यानंतर महापालिकेने विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून विभागीय चौकशीसाठी अधिकारी उपलब्ध करून द्यावा, त्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, अशी विनंती केली. या पत्रावर विभागीय आयुक्तांनी शनिवारी निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. विभागीय आयुक्तांनी महापालिकेलाच चौकशी अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
महापालिकेतील नगररचना विभागाशी संबंधित या घोटाळ्यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे पालिका परिसरात बोलले जात आहे. शिवाय या विभागातील अधिकाऱ्यांना आतापर्यंत कोणीच हात लावण्याचे धाडस केले नव्हते. आयुक्त बकोरिया यांनी कारवाई केल्याने अनेकांना धक्का बसला होता.

पालिका आयुक्त घेणार निर्णय
आयुक्त बकोरिया सुप्रीम कोर्टाच्या कामानिमित्त दोन दिवस दिल्लीला गेले आहेत. ते परतल्यानंतर विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार चौकशी अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. चौकशी अधिकारी महापालिकेतीलच असेल, तर चौकशी निःपक्षपणे होईल की नाही याबद्दल आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरातत्व खात्‍याने दीपमाळेला चोपडले सिमेंट

$
0
0

पुरातत्व खात्‍याने दीपमाळेला चोपडले सिमेंट

सातारा खंडोबा मंदिर

सुनील पांडव, सातारा

साताऱ्यातील प्राचीन व हेमाडपंती खंडोबा मंदिर व दीपमाळेच्‍या दुरूस्तीकडे पुरातत्व खात्‍याचे अक्षम्य दुर्लक्ष असून, निधी मंजूर होऊनही कंत्राटदार मिळत नाही या कारणास्तव काम रखडले आहे. दीपमाळेचा काही भाग धोकादायक झाला असून, मागील वर्षी पावसाळ्यात त्यातील दिवे पडले होते. त्याचे काम चुन्यात करणे गरजेचे असताना पुरातत्व खात्‍याने नियम पायदळी तुडवत सिमेंट चोपडल्‍याने विश्‍वस्त व गावकऱ्यांनी संतप्‍त भावना व्‍यक्‍त केल्या आहेत.

साताऱ्याचे खंडोबा मंदिर म्हणजे ऐतिहासिक ठेवा असून, राज्‍यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्‍थान आहे. परंतु, कालान्वये त्याची पडझड सुरू झाली असून, दीपमाळेचे दिवेही ढासळले आहेत. हे मंदिर पुरातत्व खात्‍याच्‍या अखत्यारित येत असल्‍याने त्याचे काम विश्‍वस्त किंवा इतरांना करता येत नाही. परंतु, या ठेव्‍याकडे पुरातत्व खात्‍याचे दुर्लक्ष आहे. मागील वर्षी एक कोटी १३ लाख रुपयांचा निधी या मंदिराची डागडुजी, सभागृह बांधकाम व दीपमाळ दुरूस्तीसाठी मंजूर झाला. परंतु, दोन वेळेस निविदा काढूनही कंत्राटदार न मिळाल्‍याने अद्याप कामास सुरूवात झालेली नाही. पावसाळ्यात दीपमाळेचे दिवे ढासळू नये यासाठी पुरातत्व खात्‍याने पाल बांधून कामास सुरूवात केली. हे चुन्यात करणे बंधनकारक असताना दीपमाळेला चक्क थातूरमातूर पद्धतीने सिमेंट चोपडण्‍याचा धक्‍कादायक प्रकार केला आहे. तसेच हे काम करत असताना योग्‍य ती काळजी न घेतल्‍याने एक दिवा ढासळल्याचा आरोप विश्‍वस्तांनी केला आहे. पुरात्व खात्‍याने निव्वळ चालढकल चालवली असून, यात्रेपूर्वी योग्‍य पद्धतीने काम करण्‍याची मागणी अध्‍यक्ष साहेबराव पळसकर, सचिव गंगाधर पारखे, पुजारी विशाल धुमाळ, सोमीनाथ ‌श‌िराणे यांनी केला आहे.

मंदिराच्‍या कामाला सुरूवात झालेली नाही. दीपमाळेचा भाग पडू नये यासाठी सिमेंट वापरून तात्पुरते काम केले आहे. नव्‍याने काम करताना चुन्‍यात काम करण्‍यात येईल.

अजित खंदारे

उपसंचालक, पुरातत्व विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images