Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मांस भरलेला कंटेनर खडकी पुलावर पकडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कंटेनरमधून मुंबईला जाणारे सुमारे १४ टन मांस देवगाव रंगारी पोलिसांनी रविवारी रात्री पकडले. हे मांस पोलिस आयुक्तालय हद्दीतील जांभाळा परिसरातून आणण्यात आले होते, अशी माहिती समोर येत असून कंटेनरचालकास अटक करण्यात आली आहे.
देवगाव रंगारी पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार ए. एस. जावळे हे सहकारी कर्मचाऱ्यांसह रात्री साडेबाराच्या सुमारास औरंगाबाद-शिऊर रोडवर गस्त घालत होते. त्यावेळी देवगाव शिवारातील खडकी पुलावर त्यांना एक कंटेनर (एम. एच. ४६,एफ ५३६९) हा भरधाव वेगाने जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत कंटेनर थांबवून चालकाकडे चौकशी केली. त्यावेळी कंटेनरमध्ये सुमारे १४ टन मांस असल्याचे समोर आले. ही बाब समजताच सहायक पोलिस निरीक्षक राजश्री आडे, पोलिस उपनिरीक्षक एल. आर. कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासणीत खाकी रंगाच्या बॉक्समध्ये मांस ठेवण्यात आल्याचे समोर आले.
कंटेनरचालक मुख्तार मोहम्मद अमीन (रा. उत्तरप्रदेश) याने चौकशीत हा कंटेनर रायगड येथील छोट्टन अशरफी यांच्या मालकीचा असून मांस औरंगाबाद जवळील जांभाळा येथील आजाद कुरेशी याच्याकडून आणल्याचे पोलिसांना सांगितले. चालकाकडे मांस वाहतूक व बाळगण्याचा परवाना सापडला नाही. त्यामुळे पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवगाव रंगारी पोलिसांनी कारवाई करत मुख्तार मोहम्मद अमीन, कंटेनर मालक छोट्टन अशरफी व जांभाळा येथील आजाद कुरेशी या तिघांविरुद्ध न्हा दाखल केला. अटकेत असलेल्या अमीन याला कन्नड कोर्टाने २८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सूनावली, अशी माहिती आडे यांनी दिली.

मांसाची तपासणी
दरम्यान, कंटेनरमधील मांस हे नेमके कोणत्या जनावराचे आहे, हे अद्याप समजू शकले नाही. तपासणीसाठी काही नमुने मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सफारी पार्कची जागा; मोजणीला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
गेल्या चार-पाच वर्षांपासून रखडलेल्या सफारी पार्कसाठी मिटमिटा येथील शंभर एकर जागेच्या मोजणीला सोमवारी (२६ सप्टेबर) सुरुवात झाली.
जागेच्या अडचणीमुळे शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या सिद्धार्थ उद्यान, प्राणीसंग्रहालय इतरत्र हलविण्यासाठी महापालिका प्रशासनाचे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. शहरातील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय शहराच्या मध्यवर्ती भागात असून प्राणिसंग्रहालयात असलेल्या प्राण्यांना सध्याची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे सेंट्रल झू अथॉरिटीने प्राणिसंग्रहालय इतरत्र हलवण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिका प्रशासनाने मिटमिटा परिसरात असलेल्या शंभर एकर जागेची मागणी महसूल प्रशासनाकडे केली होती. त्या वेळी विभागीय आयुक्तांनी शासकीय दराने रक्कम भरून जमीन ताब्यात घ्यावी असे म्हटले होते, महापालिकेने दर कमी करण्याची मागणी केली होती. दरम्यान तत्कालिन महापालिका आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्या कार्यकाळात महसूल विभागाला दोन कोटी रुपये देऊन जमीन ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी दोन कोटी रुपये देण्यास चालढकल केल्यामुळे सफारी पार्कच्या जागेचा विषय मागे पडला. आता अखेर गेल्या चार-पाच वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे. सोमवारी महापालिकेचा नगररचना विभाग व महसूल प्रशासनातर्फे संयुक्तपणे १०० एकर जागेच्या मोजणीचे काम सुरू झाले आहे.

महापौरांची भेट
महापौर त्र्यंबक तुपे, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी या कामाची पहाणी केली. या वेळी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, प्राणिसंग्रहालय संचालक विजय पाटील, मालमत्ता अधिकारी मोहंमद शफी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकाच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेत शाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वैजापूर तालुक्यातील टाकळी सागज येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे गेल्या तीन वर्षांपासून हाल सुरू आहेत. शिक्षक नसल्याने त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना काही महिन्यांपूर्वी तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक दिला गेला. प्रशासनाने काही दिवसांतच हा शिक्षक काढून घेतल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हा परिषद सीइओ मधुकर अर्दड यांच्या दालनासमोर शाळा भरवून ठिय्या आंदोलन केले. त्याची दखल घेत प्रशासाने तत्काळ एक शिक्षक प्रतिनियुक्तीवर दिला.
वैजापूर तालुक्यातील टाकळीसागज येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. याठिकाणी ३५ विद्यार्थी आहेत. शाळेतील शिक्षक पी. डी. दळवी गेल्या तीन वर्षांपासून गैरहजर राहत होते. जिल्हा परिषद सदस्य मनाजी मिसाळ यांनी याबाबत झेडपी सर्वसाधारण सभेत अनेकदा मुद्दा उपस्थित केला. सध्या ते दीर्घ रजेवर आहेत. प्रशासनाने त्यांच्या जागेवर एक शिक्षक प्रतिनियुक्तीवर पाठविले. गटशिक्षणाधिकारी रजेवर गेल्यानंतर केंद्रप्रमुखांनी संबंधित शिक्षकांना मूळ पदस्थापनेच्या शाळेवर पाठविले त्यामुळे विद्यार्थ्यांची पुन्हा अडचण झाली. या कटकटीला कंटाळून सोमवारी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य बाबासाहेब जाधव, विजय कराळे, शिवाजी कराळे, कैलास पवार, के. के. खैरनार यांच्यासह विद्यार्थी जिल्हा परिषदेत आले आणि सीइओंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल आज सुटीवर होते. विद्यार्थी आल्याचे कळताच अर्दड यांनी तत्काळ शिक्षण विभागाकडून माहिती मागवून घेतली आणि शाळेवर एका शिक्षकाची तत्काळ नियुक्ती करण्याचे आदेश दिले. त्यानुसार देवरे यांची प्रतिनियुक्ती टाकळीसागज जिल्हा परिषद शाळेवर करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशिक्षणाचे वराती मागून घोडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आल्यानंतर माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाला मराठी विषयाच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे सुचले आहे. त्यातही जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण काही तासांतच उरकण्यात आले. त्यामुळे केवळ औपचारिकता पाळण्यासाठी मंडळाच्या तिजोरीतून खर्च केला वाया जात असल्याची भावना शिक्षकांमध्ये आहे.
अकरावीच्या अभ्यासक्रमात २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून मराठी विषयाचे पाठपुस्तक बदलले आहे. पाठ्यपुस्तकातील बदल विचारात घेऊन शिक्षकांना शिकविणे सोपे व्हावे म्हणून शिक्षण विभागाकडून प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच प्रशिक्षण पूर्ण होणे गरजेचे असते. त्याकडे शिक्षण मंडळाकडून मात्र दुर्लक्ष केले गेले. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन-तीन महिने उलटले. अनेक कॉलेजांमध्ये अकरावीचा अभ्यासक्रम शिकविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र आहे. त्यानंतर मंडळाने विषय शिक्षकांना प्रशिक्षणाचे वेळापत्रक आखले. त्यानुसार १९ ते २३ सप्टेंबरपर्यंत जिल्हावार ट्रेनिंगही देण्यात आले. एका जिल्ह्यात एक दिवस त्यातही सहा-सातच तास ट्रेनिंग असल्याने शिक्षकांचा पुरता हिरमोड झाला.
शिक्षण मंडळाचा असा कारभार असेल, तर अभ्यासक्रम शिकविण्याबाबत नव्या पद्धती शिक्षकांमध्ये कशा रुजतील, असेही शिक्षकांना वाटते आहे. त्यात काही तासांतच ट्रेनिंग कसे संपते, असा सवालही या शिक्षकांनी केला आहे.

अनेक बदल
विद्यार्थ्यांना विषय बोजड वाटू नये, यासाठी अकरावी मराठी पाठ्यपुरस्तकात यंदा अमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. साहित्य, व्याकरण, उपयोजीत मराठी असे विविध भाग करण्यात आले आहेत. त्यामध्ये वृत्तलेखन, जाहिरात, सादरीकरण, कल्पनाविस्तार भाषेचे वाङमयीन उपयोजन, पाठ, कवितांचा समावेश आहे. झालेले हे बदल लक्षात घेत, त्यानुसार शिकविण्याच्या पद्धतीतही बदल होणे अपेक्षित आहे. त्यामुळेच प्रशिक्षण आवश्यक असते, परंतु उशिराने होणारी प्रक्रियाच गुणवत्तापूर्ण शिक्षणाला मारक ठरत असल्याची भावनाही आहे.

शिक्षकांना हे प्रशिक्षण उपयुक्तच ठरणार आहे. त्यासाठी वेळापत्रक मात्र चुकल्याचे वाटते. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच हे प्रशिक्षण असेल, तर सोयीचे ठरेल. त्यासह प्रशिक्षणाबाबत ‌शिक्षकांना एक दिवस आधी कळविण्यात आले.
- डॉ. वीरा राठोड

प्रशिक्षणाचे वेळापत्रक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच हवे होते. तसे झालेले नाही. त्याचे नियोजन करण्यात गल्लत झाल्याने प्रशिक्षणाला फारसा अर्थ उरत नाही.
- डॉ. ज‌िजा शिंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक गॅरंटीच्या जप्तीला अंतरिम स्थगिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीची बँक गॅरंटी महापालिकेने जप्त करण्यास मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. औरंगाबाद शहराची पाणीपुरवठा योजना राबविणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने महापालिकेविरोधात जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील निकालाविरोधात खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवरील सुनावणी १ ऑक्टोबरला होणार आहे.
औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी आणि महानगरपालिका यांच्यात झालेला करार रद्द करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असल्याने कंपनीने जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करून, करारानुसार लवादाची नेमणूक होईपर्यंत महापालिकेला कोणतीही कारवाई करण्यास मनाई करण्यात यावी आणि कंपनीची बँक गॅरंटी जप्त करण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंती केली होती. यावर सुनावणीअंती जिल्हा कोर्टाने कंपनीचे म्हणणे अंशतः मंजूर केले आणि लवादाची प्रक्रिया सुरू असताना महापालिकेने करारात नमूद अटींचे पालन केल्याशिवाय कंपनीविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करू नये, असे आदेश दिले. बँक गॅरंटीबाबत आदेशात उल्लेख नव्हता.
खंडपीठात दाखल अपिलामध्ये कंपनीच्या वतीने बँक गॅरंटी जप्त न करण्याची विनंती केली आणि प्रतिबंधात्मक कारवाईबाबत जिल्हा कोर्टाच्या आदेशात पुरेशी स्पष्टता नसल्याचे म्हटले. महापालिकेच्या वतीने अनिल बजाज यांनी काम पहिले. कंपनीच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ विजयसिंह थोरात, राहुल तोतला, स्नेहल तोतला यांनी काम पहिले.

अहवाल दाखल करण्याचे आदेश
प्राथमिक सुनावणीअंती खंडपीठाने बँक गॅरंटी जप्त करण्यास अंतरिम मनाई केली. या प्रकल्पाचे आजपर्यंत काय काम झाले, किती खर्च झाला, आजची स्थिती काय आहे याबाबत सविस्तर माहितीचा अहवाल दोन्ही पक्षांनी पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचे आदेशही खंडपीठाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारच्या परिपत्रकात ‘शासन निर्णया’चा भंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षण क्षेत्राविषयी राज्य सरकार नकारात्मक धोरणाचा अवलंब करत असून, सरकार कधीतरी लक्ष देईल, या आशेतून दीर्घ काळापासून विनावेतन शिक्षक काम करत आहेत, मात्र त्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी शिक्षण खात्याने १९ सप्टेंबर रोजी अन्यायकारक परिपत्र काढले आहे. जुन्या शासननिर्णयांचा भंग करणारे हे परिपत्रक आहे. त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने २८ सप्टेंबर रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
बुधवारी दुपारी दोन वाजता ही निदर्शने करण्यात येतील. शाळेतील वर्गातील पट संख्या ३०पेक्षा कमी असल्यास स्वयंअर्थसहाय्य शाळा समजण्यात येऊ नये, शिक्षक व शिक्षकेतर पदभरती संदर्भात आरक्षण धोरणाचे पालन न करणाऱ्या शाळा ना स्वयंअर्थ सहाय्य शाळा समजण्यात येऊ नये, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदविण्यात यावी ही अट रद्द करावी, कमी पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नये, नववी व दहावीचा निकाल १०० टक्के असावा ही अट रद्द करावी, शिक्षकांना पूर्वीची पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यां मांडण्यात येणार आहेत.
निदर्शनासाठी जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन शिक्षक सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष नामदेव सोनवणे, सरचिटणीस श्याम राजपूत, सचिव विठ्ठल बदर, भाऊसाहेब वाहुळ, उपाध्यक्ष सुधाकर कापरे, प्रवीण लोहाडे, संपर्कप्रमुख गणेश पिंपळे,जिल्हाध्यक्ष दीपक पवार, दत्ता पवार आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार कट्टा वेबसाइटमध्येच अडकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विविध कुशल कारागिरांच्या सेवा ग्राहकांना उपलब्ध व्हाव्यात म्हणून सरकारने कामगार कट्टा या नावाने वेबसाइटवर खास सोय केली. यलो पेजेसप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना विविध सेवा पुरविणाऱ्या कारागिरांची माहिती येथे उपलब्ध करून देण्याचे नियोजन होते, मात्र तेथे कोणतीही माहिती अपलोड करण्यात आली नाही. त्यामुळे हा कट्टा ओस पडला आहे.
इलेक्ट्रिशिअन, टीव्ही, फ्रीज दुरुस्ती करणे, प्लंबिगची कामे, बागकाम, लाँड्री, वैद्यकीस सेवा, गवंडीकाम आदी विविध सेवा देणाऱ्यांची सर्वसामान्यांना कायम गरज असते. आपल्याला आवश्यक असलेली सेवा देणारे ऐनवेळी कोठे उपलब्ध होतील, याची माहिती बहुतेक जणांना नसते. त्यामुळे नागरिकांना धावपळ करावी लागते. या पार्श्वभूमीवर नागरिकांची सोय व्हावी आणि कारागीर, कामगारांच्या हाताला काम मिळावे म्हणून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वेबसाइटवर (www.maharojgar.gov.in) स्वतंत्र पेज सुरू करण्याची घोषणा सरकारने केली. या पेजला कामगार कट्टा हे नाव देण्यात आले. शासकीय तसेच खासगी क्षेत्रातील उपलब्ध रिक्त पदांची माहितीही या वेबसाइटवर बेरोजगारांना उलपब्ध करून देण्यात येते.

कामगार कट्टा वेबपेजवर पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही. सुमारे अडीच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या कामगार कट्ट्यावर विविध सेवा पुरविणाऱ्यांची माहिती विनामूल्य प्रसिद्ध करण्यात येते. त्यात संबंधित सेवा देणाऱ्याचे नाव, पत्ता, संपर्कासाठी फोन नंबर आदी माहिती देण्याचे नियोजन करण्यात आले. या वेबसाइटच्या माध्यमातून ग्राहकांना आपआपल्या शहरात विविध सेवा देणाऱ्यांची माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचे नियोजन होते. नागरिकांना विविध सेवा सहजपणे उपलब्ध होतील आणि कामगार, कारागिरांच्या रोजगाराच्या संधीत वाढ होईल, असे कामगार कट्टा उपक्रमातून अपेक्षित होते, पण ही कल्याणकारी योजना गेल्या अडीच वर्षांपासून वेबसाइटवर अडकून पडली आहे. सुरुवातील कामगार कट्ट्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम केले, पण राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर या उपक्रमाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या उपक्रमाचा बोजवारा उडाला असून, कामगार, कारागिर रोजगारांच्या संधी खुंटल्या आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना घरपोच मिळणाऱ्या सेवेपासून वंचित रहावे लागत आहे.

वरिष्ठांचे दुर्लक्ष
सेवा देणाऱ्यांच्या सेवेच्या गुणवत्तेबाबत प्रतवारी ऑनलाइन नोंदविण्याची व वेबपोर्टलवर प्रदर्शित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण काम व सेवा मिळणे शक्य होईल, असे नियोजन करण्यात आले. सर्व यंत्रणा तयार आहेत, पण त्यास वरिष्ठ पातळीवरून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरूमंत्र : सुट्टीतही कर्सिव्ह रायटिंगचे धडे

$
0
0

ramchandra.vaybhat@timesgroup.com
Tweet : ramvaybhatMT
आपला पाल्य स्पर्धेच्या युगामध्ये सर्वांच्या पुढे रहावा, यासाठी इंग्रजी भाषेचे महत्त्व ओळखून शहरी भागातील पालक लाखो रुपये खर्च करतात. आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश देतात, मात्र ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना हे शक्य होत नाही. इंग्रजी भाषेत जिल्हा परिषदेचा विद्यार्थी टिकूच शकणार नाही, आपला विद्यार्थी नेहमीच मागे राहील, याची जाणिव जगन्नाथ दिवटे यांना झाली. मुळातच इंग्रजीचे शिक्षक असलेल्या दिवटे सरांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय पक्का करण्याचा निर्धार केला आणि सुरू झाला प्रवास. लोहगाव (ता. पैठण) येथे २०१०मध्ये कार्यरत असतांना प्रारंभी दिवटे सरांनी स्वतः कर्सिव्ह रायटिंग शिकून घेतले. विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग सुरू झाले. अजिंठा येथील शाळेत २०१४पासून रुजू झाल्यानंतर दिवटे सरांनी सुटी असो की शाळा दररोज सकाळी पावणेनऊ ते साडेनऊ यावेळेत जादा वर्ग सुरू केले. अगदी उन्हाळ्याची सुटी असो की दिवाळीची विद्यार्थ्यांचा वर्ग हा न चुकता होणारच. दिवाळीच्या सुटीमध्ये बाहेरगावी शिकण्यासाठी असलेले विद्यार्थीही केवळ कर्सिव्ह रा‌यटिंग शिकण्यासाठी सरांच्या वर्गात येऊन बसतात. लहान वयातच हाताला सुंदर हस्ताक्षराचे वळण लागावे यासाठी सहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम कर्सिव्ह पध्दतीने 'एबीसीडी' लिहिण्यास शिकविणे सुरू करण्यात येते. सुंदर हस्ताक्षराशिवाय अचूक वाचनावर भर दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची भीती निघून गेली. विद्यार्थ्यांत इंग्रजीची गोडी निर्माण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. शाळेत असलेल्या सुमारे ३५० विद्यार्थी असून, सहावी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांचे इंग्रजी अवघ्या दीड महिन्यात पक्के झाले अाहे.

दीड महिन्यात सुंदर हस्ताक्षर
पहिल्या आठ दिवसांमध्ये विद्यार्थ्यांचा पाया पक्का व्हावा यासाठी 'एबीसीडी'चा सराव करून घेण्यात येतो. त्यानंतर पुढच्या आठ दिवसांमध्ये लहान शब्दांची जुळवणी आणि त्यानंतर आठ दिवसांमध्ये लहान वाक्ये तयार करून घेतली जातात. साधारणपणे दीड महिन्यात विद्यार्थी सुंदर हस्ताक्षरासह कर्सिव्ह रा‌यटिंगमध्ये तरबेज होतो. यासाठी विद्यार्थ्यांना चार रेघी कर्सिव्ह रायटिंगचे नोटबूक आणि एक पुस्तक एवढाच खर्च येत असल्याचे दिवटे सरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘गव्हर्नमेंट फार्मसी’ला ‘एनबीए’ मानांकन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औषधनिर्माण, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या शिक्षणात उच्च दर्जा निश्चित करणाऱ्या नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडिएशनचे (एनबीए) मानांकन औरंगाबाद शासकीय औषधनिर्माणशास्त्र कॉलेजमधील पदवी अभ्यासक्रमाला देण्यात आले आहे. त्यामुळे औरंगाबाद येथील कॉलेजमधून संपादन केलेल्या पदवीला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे. यापूर्वी फार्मसी पदवी संपादन केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहा महिन्यांचा ब्रीज कोर्स करावा लागत होता. एनबीए मानांकनामुळे ब्रीज कोर्स करण्याची आवश्यकता नाही. 'आउटकम बेस््ड एज्युकेशन' (ओबीई) पद्धतीनुसार झालेल्या मूल्यांकनात हे यश मिळविणारे हे पहिले शासकीय कॉलेज ठरले आहे.
या मानांकनामुळे औरंगाबादमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण दिले जाते, यावर शिक्कामोर्तब झाले. अत्याधुनिक शिक्षणपद्धती, संशोधन, रिसर्च पोजेक्टच्या बळावर कॉलेजने ही मजल मारली आहे. फार्मसी, इंजिनीअरिंग शिक्षणात 'एनबीए' मानांकनाला मोठे महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता असलेल्या 'एनबीए'चे मानांकन कॉलेजमधील गुणवत्तेवर शिक्कामोर्तब करते. औरंगाबादच्या औषधनिर्माणशास्त्र कॉलेजने मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये 'एनबीए' मानांकनासाठी प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर १९ व २० मार्चदरम्यान 'एनबीए' टीमने कॉलेजला भेट देत पाहणी केली होती. शाखानिहाय शैक्षणिक दर्जाचे मूल्यांकन, अत्यंत खडतर आणि महाग प्रक्रिया आहे. त्यात केवळ पात्र की अपात्र, एवढेच स्पष्ट केले जाते. त्यामुळे अनेक कॉलेज या मूल्यांकनाला सामोरे जात नाहीत. त्यात यंदा 'आउटकम बेस््ड एज्युकेशन' (ओबीई) पद्धतीनुसार हे मूल्यांकन केले जाते आहे. औरंगाबादच्या फार्मसी कॉलेजने गुणवत्तेच्या बळावर हे मानांकन मिळविले आहे. या कॉलेजमधून पदवी संपादन करणारे विद्यार्थी जागतिक स्तरावर समान पातळीवर असतील. हे मानांकन दोन वर्षांसाठी आहे.
'आउटकम बेस््ड एज्युकेशन' (ओबीई) पद्धतीनुसार मानांकन मिळविणारे राज्यातील हे पहिले शासकीय कॉलेज आहे. कॉलेजच्या यशाबद्दल तंत्रशिक्षण संचालक डॉ. एस. के. महाजन, सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांनी प्राचार्य व प्राध्यापकांचे अभिनंदन केले. प्रक्रियेसाठी डॉ. साधना साही, डॉ. मधुरा काळे, डॉ. आर. बी. नवले, डॉ. आर. पी. मराठे या शिक्षकांनी परिश्रम घेतले.

मराठवाड्यात पहिले
फार्मसी, अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील पदविका, पदवी अभ्यासक्रमांच्या कॉलेजांना 'एनबीए'कडून मूल्यांकन करून घेणे आवश्यक असते. तंत्रशिक्षण विभाग याबाबत कॉलेजांना वारंवार सूचना देते, परंतु त्याबाबत कॉलेजांमध्ये उदासिनता आहे. अद्याप मराठवाड्यातील एकाही औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी कॉलेजने एनबीएचे मानांकन मिळविलेले नाही.

जमेच्या बाजू
उद्योगांसोबत सामंजस्य करार.........३
टेक्नॉलॉजी ट्रान्सफरतंर्गत प्रोजेक्ट... १
पेंटेट ...........................................१
रिसर्च प्रोजेक्ट...............................७
बी. फार्मसीसाठी प्रयोगशाळा...........१४

जागतिक पातळीवर गुणवत्तेसाठीचे असलेल्या निकषांनुसार कॉलेजची तपासणी केली जाते. त्यात संलग्नीकरण मिळणे ही मराठवाड्यासाठी महत्त्वाची बाब आहे. औषधनिर्माणशास्त्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे डीएससी, यूजीसीच्या मोठ्या रिसर्च प्रकल्पांसाठी प्राधान्य मिळेल. त्याचा विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे.
- डॉ. व्ही. के. मौर्य, प्राचार्य, शासकीय औषधनिर्माणशास्त्र कॉलेज, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर, भगवान गडाच्या महंतांनी गादी सोडावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

१९५८ पासून चालत आलेली भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी दसरा मेळावा कृती समितीने आक्रमक पावित्रा घेतला आहे. मेळावा व्हावा, अशी समाजाची मागणी असेल, तर महंतांनी तो होऊ दिला पाहिजे. समाजाचा निर्णय महंतांना मान्य नसेल, तर त्यांनी गादी सोडावी, अशी मागणी दसरा मेळावा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

सर्व जातीधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा यासाठी श्रीक्षेत्र भगवानगडाची उभारणी झालेली आहे. हे महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून समजले जाते. गडाची स्थापना समाजाच्या शैक्षणिक, राजकीय, सामाजिक व आर्थिक विकासासाठी करण्यात आली असून येथे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली आहे. त्यांच्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी हा वारसा गतवर्षी चालविला. यंदा परंपरा खंडित करण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप कृती समितीचे अध्यक्ष उद्धव ढाकणे यांनी केला.

भगवान गड परिसरातील ६० तसेच उर्वरित महाराष्ट्रातील जवळपास २०० ग्रामपंचायतींनी पंकजा मुंडे यांच्या गडावरील मेळाव्याला आणि भाषणाला सहमती दर्शवून ठराव घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले. राज्यभर बैठका समिती पदाधिकाऱ्यांनीही समाजाचा कौल जाणून घेतला आहे. जवळपास ९७ टक्के समाज दसरा मेळावा व्हावा या बाजुने असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. यावेळी बाळासाहेब चौधर, इंदुमती आघाव, सविता घुले, अभिषेक बढे आदी उपस्थित होते.

सल्याने विरोध

महंतांनी पंकजा मुंडे यांना गडाची कन्या म्हणून घोषित केले आहे. एकीकडे गडाची कन्या म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांना कडाडून विरोध करायचा हे न पटणारे आहे. एक महिला वारसा चालवित आहे, म्हणून पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातील उपस्थितीला विरोध केला जात आहे का?, असा सवाल कृती समितीच्या पदाधिकारी इंदुमती आघाव व सविता घुले यांनी केला. असाच विरोध झाल्यास त्यास प्रखर विरोध करू, महिला आयोगाकडे धाव घेऊ, असा इशारा त्यांनी दिली. दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी महंतांची भेट घेऊन मेळावा घेण्यासाठी हात जोडून विनंतीही करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी नेत्यास मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत आमदार संदीपान भुमरे यांच्या समर्थकांनी जयाजीराव सूर्यवंशी यांना मारहाण केल्याने चांगलाच गोधळ उडाला आहे. मारहाणप्रकरणी आमदार भुमरे व सूर्यवंशी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे.
संत एकनाथ साखर कारखाना यावर्षी चालू होणार का, कोण चालवणार, कसा चालवणार असे प्रश्न उपस्थित होत असताना सोमवारी संत एकनाथ साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन तुषार शिसोदे हे होते. सभेत चेअरमन, आमदार संदीपान भुमरे, संचालक, जयाजीराव सूर्यवंशी यांची भाषणे झाल्यानंतर शेतकऱ्यांचे भाषण सुरू असताना, जयाजीराव सूर्यवंशी यांनी मध्येच पुन्हा एकदा माईकचा ताबा घेतला. यापूर्वीचे संचालक मंडळ व चेअमरन यांच्या चुकीच्या निर्णयामुळे व त्यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे व सचिन घायाळ यांना कारखाना भाडेतत्वावर देऊन या दोघांना कारखान्याच्या 'उरावर' बसवले. यामुळे सध्या कारखान्याची अशी बिकट अवस्था झाली, असा आरोप सूर्यवंशी यांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार समर्थकांनी सूर्यवंशी यांना मारहाण करण्यात सुरुवात केली. यावेळी भुमरे समर्थकांनी सूर्यवंशी यांना मारहाण करत मंडपाबाहेर आणले व पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अचानक सुरू झालेल्या मारहाणीमुळे एकच गोंधळ उडाला. काही वेळानंतर आमदार भुमरे व सूर्यवंशी समर्थक कारखाना परिसरात एकमेकासमोर आल्याने तणावाचे वातावरण झाले होते. याप्रकरणी आमदार भुमरे व सूर्यवंशी यांनी एकमेकांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आमदार भुमरे हे अनेक वर्षांपासून कारखाना स्वतः न चालवता चेअरमन राहिले. याकाळात त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे कारखाना डबघाईस आला. हे सत्य मी सभेत बोलल्याने आमदार भुमरे व त्यांच्या समर्थकांनी मला मारहाण केली. मात्र, मारहाणीला मी घाबरत नसून यापुढे आमदार भुमरे यांचे पितळ उघडे पाडणार आहे.
- जयाजीराव सूर्यवंशी, शेतकरी नेते

कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत अनेक महिला उपस्थित होत्या. जयाजीराव सूर्यवंशी हे महिलांसमोर खालच्या भाषेत बोलत होते. त्यामुळे सभेत उपस्थित लोकांनी त्यांना मारहाण केली. माझ्या समर्थकांनी त्यांना मारहाण केलेली नाही.
- संदीपान भुमरे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्त मराठवाड्याची पाणीचिंता मिटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात तीन-चार दिवसांपासून पावसाने धुवांधार हजेरी लावली असून यामुळे सरासरी पावसाची टक्केवारी ओलांडली आहे. पाणीटंचाईमुळे सर्वाधिक दुष्काळाची दाहकता सोसणाऱ्या बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील परिस्थिती बदलली असून मराठवाड्यातील तलाव, बंधारे, मध्यम व लघु प्रकल्प भरले आहेत. परभणीतील लोअर दुधनाचे १८ तर, माजलगाव धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले.

मराठवाड्यात औरंगाबाद वगळता सातही जिल्ह्यांत दमदार पावसाने हजेरी लावली. बीड, लातूर जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या ११३ टक्के तर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यात सरासरीच्या ९५ ते ९८ टक्के पाऊस झाला आहे. लातूरसह १२ गावांना पाणी पुरवणाऱ्या मांजरा-धनेगाव धरणात ३० टक्के जलसंचय झाला आहे. साठलेले हे पाणी दोन वर्षे पुरू शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. शिवाय पाऊस सुरुच असल्याने ५० टक्के जलसाठा होईल अशी चिन्हे आहेत. मांजरा भरल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बीडला पाणीपुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प तुडुंब भरला असून माजलगाव तालुक्यातील उमरी आणि पारगावचा संपर्क तुटला आहे. जोडजवळ्याजवळ रस्त्यावर पाणी आल्याने लातूर-कळंब मार्ग बंद झाला आहे.


गोदावरीला पूर

नांदेड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदी भरून वाहत आहे. मुदगल, रामपुरी व दिग्रस येथील बंधाऱ्यातूनही पाणी सोडण्यात आले आहे. विष्णूपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून २ हजार ५९८ क्यूसेक्स घनमीटर प्रति सेंकद पाण्याचा विसर्ग होत आहे.

उमरग्यात विक्रमी पाऊस

उमरगा तालुक्यात गेल्या नऊ वर्षांपूर्वी तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ९०० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला होता. गेल्या नऊ वर्षांचे रेकॉर्ड मोडत यंदा पावसाची तब्बल १०२३ मिलिमीटरची नोंद झाली आहे. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, भूम, वाशी तालुक्यात पावसाने हजेरी लावली.

मांजरा १०० टक्के भरले

लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी वरदान असणारे केज तालुक्यातील धनेगावच्या मांजरा धरण सोमवारी पहाटे १०० टक्के भरले.मांजरा धरणाची धमता २२४ घनमीटर इतकी आहे. तीन दिवसांपासून धरणाच्या पाण्याची पातळी दरताशी १५ सेंटीमीटरने वाढत हाेती, अशी माहिती मांजरा धरणाचे शाखाव्यवस्थापक अनिल मुळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूज परिसरातील अतिक्रमण काढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
बजाजनगरासह औद्योगिक क्षेत्रातील वाढते अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेच्या पथकासह पोलिसांचा बंदोबस्त घेऊन लवकरच अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आर. एस. कुलकर्णी यांनी दिली.
वाळूज महानगरातील बजाजनगर व औद्योगिक वसाहतीच्या परिसरात रस्त्यावरील अतिक्रमणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या पानटपऱ्या व गाळेधारक दुकानदारांच्या अतिक्रमणामुळे वाहनधारकांची मोठी गर्दी होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. बजाजनगरातील मोहटादेवी चौकात भरणाऱ्या भाजीमंडईमुळे सांयकाळी होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करून परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यावर सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बजाजनगरातील मोरेचौक, मोहटादेवी मंदिर चौक, महाराणा प्रताप चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रांजणगाव शेणपुंजी, औद्योगिक क्षेत्रातील विविध सेक्टरमधील अतिक्रमणावर एमआयडीसीकडून मार्किंग सुरू झाली आहे. मार्किंगचे काम पूर्ण झाल्यानंतर सदरील अतिक्रमण संबंधितांनी काढून घेतले नाही, तर एमआयडीसी मोहिमेतून हे अतिक्रमण काढण्यात येणार आहे.

एमआयडीसीकडे स्वतंत्र अतिक्रमण विभाग नाही त्यामुळे केवळ दोन कर्मचारी अतिक्रमणाचे काम पाहतात. मात्र वाढत्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमण पथक व पोलिसांची मदत घेऊन मोहीम राबवण्यात येणार आहे.
- आर. एस. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदी सरकारकडून मतदारांची फसवणूक

$
0
0

 म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

‘मोदी सरकारने ‘अच्छे दिन’च्या भूलथापा देऊन मतदारांची फसवणूक केली. नागरिकांनी यापुढील काळात भूलथापांना बळी पडू नये,’ असे आवाहन बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरूड यांनी केले. आगामी काळात सर्व निवडणुका बहुजन समाज पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वैजापूर येथे पक्षाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते. ‘या सरकारने राज्यातील जनतेची घोर निराशा केली आहे. हे सरकार जातीय तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. जनतेने त्यांच्या भूलथापांना बळी न पडता बहुजन समाज पक्षामध्ये सामील व्हावे,’ असे आवाहन त्यांनी केले. येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचामत समिती निवडणूक स्वबळावर लढवू असे त्यांनी बैठकीत सांगितले. या कार्यक्रमाला प्रदेश सचिव डॉ. शरदचंद्र वानखेडे, जिल्हाध्यक्ष दादाराव आळणे, जिल्हा महासचिव बाबासाहेब पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पगारे यांनी केले. यावेळी जाकेर पठाण, काशिनाथ बागुल, विजय त्रिभुवन, आकाश भाटे, सचिन बनकर, पोपट त्रिभुवन आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साई’ केंद्रात बॉक्सिंगचे ‘नोडल सेंटर’

$
0
0

‘साई’ केंद्रात बॉक्सिंगचे ‘नोडल सेंटर’
आजपासून निवड चाचणी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारताच्या युवा बॉक्सरच्या कायमस्वरूपी प्रशिक्षणासाठी औरंगाबादच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) प्रशिक्षण केंद्राची ‘नोडल सेंटर’ म्हणून निवड करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये साठ बॉक्सरची निवड करून त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करण्यात येणार आहे.
साई केंद्रात २८ व २९ सप्टेंबर रोजी ‘नॅशनल टॅलेंट हंट’ उपक्रमांतंर्गत भारताच्या युवा बॉक्सरचा संघ निवडण्याकरिता निवड चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीतून रशिया येथे १४ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या एआयबीए युथ वर्ल्ड अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय युथ बॉक्सिंग संघाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती साई केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी दिली.
भांडारकर म्हणाले, ‘नॅशनल टॅलेंट हंट उपक्रमांतंर्गत देशातील गुवाहाटी, कोलकाता, बंगळुरू, भोपाळ, रोहतक व औरंगाबाद येथील साई केंद्रात निवड चाचणी घेण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रातील निवड चाचणीतून अव्वल दहा बॉक्सरची निवड करण्यात येणार आहे. या सहाही केंद्रात प्रशिक्षक, समन्वयक व निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबादेतील केंद्रात गुजरात, महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, दादर, हवेली, दमण व दीव येथील खेळाडू निवड चाचणीत सहभागी होणार आहेत.’ निवड चाचणीसाठी विविध राज्यातून बॉक्सर शहरात दाखल झाले आहेत. या चाचणीतून निवडण्यात आलेले साठ बॉक्सर ‘नोडल सेंटर’मध्ये प्रशिक्षण घेतील. 
कोट...
देशातील प्रमुख सहा केंद्रांतून औरंगाबादच्या साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राची ‘नोडल सेंटर’ म्हणून निवड करण्यात आली आहे. येथे वर्षभर नियमित स्वरूपात प्रशिक्षण शिबिरांचेही आयोजन करण्यात येईल. यामुळे मराठवाड्यातील तसेच राज्यातील युवा बॉक्सिंगला मोठी चालना मिळणार आहे. साहजिकच औरंगाबादेतील उदयोन्मुख बॉक्सरनाही या सुविधेचा फायदा होईल.
- वीरेंद्र भांडारकर, उपसंचालक, साई केंद्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबादच्या जिम्नॅस्टची १६ पदकांची कमाई

$
0
0

औरंगाबादच्या जिम्नॅस्टची १६ पदकांची कमाई
राज्य जिम्नॅस्टिक्स स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय अक्रोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत औरंगाबाद संघाने १४ सुवर्ण, १ रौप्य, १ ब्राँझ अशी सोळा पदकांची कमाई केली.
श्री गुरुगोविंदसिंग स्टेडियममध्ये ही स्पर्धा झाली. नॅशनल डेव्हलपमेंट, कनिष्ट गट १, कनिष्ठ गट २, वरिष्ठ गट अशा विविध गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली.
औरंगाबादच्या सर्वेश भाले, सुरज ताकसांडे, गौरव जोगदंड, ऋग्वेद जोशी, अमेय पदातुरे, ऐश्वर्या देशपांडे यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदके जिंकली. ईशा महाजन, मयुर बोढारे, शर्वरी लिमये, साक्षी लड्डा, स्वामिनी मंडलिक यांनी एकेक सुवर्णपदक जिंकत आपला ठसा उमटवला. काही खेळाडूंनी दुहेरी व सांघिक गटात पदकांची कमाई केली.
या संघासमवेत अमेय जोशी, राहुल श्रीरामवार, सिद्धार्थ कदम, विवेक देशपांडे, रोहन श्रीरामवार, आदित्य जोशी हे गेले होते. या यशाबद्दल मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष शरद भोगले, सचिव राम पातूरकर, प्राचार्य डॉ. प्रदीप दुबे, जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष अॅड. संकर्षण जोशी, सचिव सागर कुलकर्णी, डॉ. मकरंद जोशी, विशाल देशपांडे, रणजित पवार, तनुजा गाढवे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
सुवर्णपदक विजेते खेळाडू ः राधा सोनी, अमेय पदातुरे, ऐश्वर्या देशपांडे, अथर्व जोशी, श्रीपाद हराळ, रिची भंडारी, ऋग्वेद जोशी, स्वामिनी मंडलिक, साक्षी लड्डा, धैर्यशील देशमुख, संदेश चिंतलवाड, ध्रुव देशपांडे, सर्वेश भाले, शर्वरी लिमये, मयुर बोढारे, ईशा महाजन, सुरज ताकसांडे, गौरव जोगदंड, संदीप चौधरी, संदीप उंटवाल, रजत मेघावाले.
रौप्यपदक ः अद्वैत वझे, राधा सोनी.
ब्राँझपदक ः अद्वैत वझे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलावात बुडून दोघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
सुधाकरनगरजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाऊण तास शोध घेऊन त्यांचे मृतदेह बाहेर काढले.
गिरीश अविनाश दहिवाल (१८, रा. राठी संस्कार पिसादेवी रोड), धनराज संजय धनाड (१८, रा. एन ९, बळीराम पाटील) हे दोघे तीन मित्रांसह दुपारी चारच्या सुमारास सुधाकरनगरजवळील तलावात (वाल्मी तलाव) पोहण्यासाठी गेले. गिरीश व धनराज दोघेजण कपडे काढून तलावात उतरले, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. ते पाहून बाहेर उभ्या असलेले त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा सुरू केला. घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला कळविली. तेथून माहिती मिळाल्यावर उपअग्निशमन अधिकारी डी. डी. सोळुंके, व्ही. आर. लिमकर, एस. पी. कोल्हे, चालक अब्दुल हमीद यांचे पथक घटनास्थळी पोचली. बुडालेल्या तरुणांच्या मोबाईलवरून त्यांच्या नातेवाईकांनाही माहिती देण्यात आली. तोपर्यंत तलावाच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. या तरुणांचे नातेवाईकही घटनास्थळी पोचले. एकाचा मृतदेह लगेचच काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. पाऊण तासानंतर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह काढण्यात आला. मृतदेह पाहून नातेवाईकांनी आक्रोश सुरू केला. गिरीश हा महाविद्यालयात शिकत होता. या तलावात गणेश विसर्जन करण्यात आले होते. त्यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार ऑक्टोबरला मंत्रिमंडळ बैठक

$
0
0

औरंगाबाद : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये औरंगाबादमध्ये मंत्रिमंडळ बैठक घेण्याचे अखेर निश्चित करण्यात आले असून, बैठकीसाठी विभागीय प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. तारीख जाहीर केली नसली, तरी येत्या चार ऑक्टोबर रोजी ही बैठक होईल, असे सूत्रांनी सांगितले.
मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठकीची परंपरा गेल्या आठ वर्षांपूर्वी खंडित झाली होती. ही बैठक पुन्हा घेण्यात यावी, यासाठी अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती. १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये मंत्रिमंडळ बैठक घेण्याचे जाहीर केले होते. यासंदर्भात प्रशासनाला आज पत्र प्राप्त झाले. यापूर्वी २००९मध्ये शहरात मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. बैठकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये अपर आयुक्त जी. एम. बोडखे यांनी मंगळवारी सर्व उपायुक्तांची बैठक घेतली. बैठकीसाठी २३ कॅबिनेट मंत्र्यांसह १६ राज्यमंत्री, विविध विभागांचे सचिव, उपसचिव, संचालक, कर्मचारी औरंगाबादला येणार आहेत.
दरम्यान, बुधवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत मंत्रिमंडळ बैठकीच्या नियोजनासंदर्भात बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाज कल्याणचा उपायुक्त गजाआड

$
0
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त जितेंद्र वळवी व माजी वरिष्ठ निरीक्षक कैलास घोडके यांना मंगळवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. वळवी व घोडके यांनी बीड येथील आश्रमशाळेतील शिक्षकांच्या मंजुरीसाठी आणि पो‌षण आहाराचे अनुदान मंजूर करण्यासाठी या लाचेची मागणी केली होती.
बीड येथील तीन आश्रमशाळांच्या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. एका आश्रमशाळेत सहा शिक्षक व चार कर्मचारी यांना वैयक्तिक मान्यता मिळण्यासाठी जुलै २०१५मध्ये समाज कल्याणच्या प्रादेशिक उपायुक्त कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्याच्या मंजुरीसाठी लाच मागितली होती, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणात सोमवारी बीड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर यांनी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी जितेंद्र रमेश वळवी (वय ५६, रा. काठेगल्ली,फ्लॅट क्रमांक ४, मार्वेल बिल्डिंग, रवींद्र हायस्कूलमागे, ‌नाशिक) व कैलास किसनराव घोडके (वय ५८, रा. सी ३,८ तापडिया पार्क, जयभवानीनगर चौक, एन ४, सिडको) यांना अटक केली आहे.

पडताळणीनंतर कारवाई
संस्थेच्या अध्यक्षांनी बीड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत ११ डिसेंबर २०१५ रोजी तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता वळवी व घोडके यांनी सात शिक्षकांच्या मंजुरीसाठी प्रत्येकी एक लाख, तीन चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मंजुरीसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये व प्रलंबित पोषण आहार अनुदान मंजुरीसाठी दोन लाख १० हजार असे एकूण १० लाख ६० हजारांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दैव बलवत्तर म्हणून कार्तिक बचावला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चेंबरवरील ढापा ड्रेनेज लाइन दुरुस्तीसाठी काढून ठेवलेला. चेंबर सुमारे दहा फूट खोल. सकाळी साडेदहाच्या सुमारास दीड वर्षाचा मुलगा खेळतखेळत तेथे गेला अन् चेंबरमध्ये पडला. ही घटना परिसरात उभ्या असलेल्या काही नागरिकांनी पाहिला. त्यांनी धावपळ केली आणि बालकाला चेंबरमधून काढले. आयुष्याची दोरी मजबूत म्हणून त्याचे प्राण बचावले. हा प्रकार घडला फाजलपुरा भागातील कामगार वसाहतीत.
फाजलपुरा येथे महापालिका कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. चतुर्थश्रेणी कर्मचारी व सफाई कामगार तेथे राहतात. संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचे काम करणाऱ्या या कामगारांची वसाहत कमालीची अस्वच्छ. पालिकेचे प्रशासन या वसाहतीकडे लक्षच देत नाही. मूलभूत सोई-सुविधांपासून ही वसाहत कोसो दूर. वसाहतीमधील एक ड्रेनेज चेंबर चोकअप झाले होते. ते स्वच्छ करण्यासाठी १५ दिवसांपूर्वी त्याच्या वरचे ढापे काढण्यात आले होते. ढापे काढल्यानंतर चेंबर स्वच्छ करण्यात आले नाही. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कार्तिक साठे हा दीड वर्षाचा मुलगा खेळत-खेळत त्या चेंबरजवळ गेला आणि चेंबरमध्ये पडला. ही घटना आजुबाजुला उभ्या असलेल्या नागरिकांच्या लगेचच लक्षात आली. धावपळ करीत त्यांनी चेंबरमध्ये पडलेल्या कार्तिकला बाहेर काढले. तो बेशुद्ध झाला होता. त्याला तातडीने रोशनगेट येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी लगेचच उपचार सुरू केल्यामुळे कार्तिकवरचे संकट टळले. कार्तिकचे वडील सुधीर साठे महापालिकेत सफाई कामगार आहेत. कार्तिक ड्रेनेज चेंबरमध्ये पडल्याचे कळाल्यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी फाजलपुरा येथील वसाहतीला भेट दिली.

महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत पायाभूत सुविधा नाहीत. हा परिसर अस्वच्छ आहे. या वसाहतीमधील नागरिकांना सार्वजनिक स्वच्छतागृह वापरावे लागते. ते देखील स्वच्छ नाही. कार्तिक साठे हा थोडक्यात बचावला. तेथील नागरिकांनी धावपळ केली नसती, तर काय झाले असते, याचा विचार न केलेला बरा. पालिका आयुक्तांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी व आवश्यक त्या सुविधा द्याव्यात.
- गौतम खरात, कामगार नेते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images