Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सरकारी महोत्सवात पर्यटक-रसिक कोसो दूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पर्यटनाला चालना देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून भरवलेला वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव केवळ स्थानिक महोत्सव ठरला. शहरातील एक खासगी सांस्कृतिक संस्था आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठीच महोत्सव भरवला गेल्याचे चित्र होते. महोत्सवाची रया घालवणारे फिल्मी कार्यक्रम आणि ढिसाळ नियोजनामुळे पर्यटक व सर्वसामान्य रसिकांना महोत्सवापासून दूर ठेवण्यात प्रशासनाला पुरेपूर यश आले.
‘पर्यटन राजधानी’ औरंगाबाद शहराचा लौकिक वेरूळ-अजिंठा या जागतिक वारसास्थळांमुळे आहे. जगभरातील लाखो पर्यटक लेणी पाहण्यासाठी नियमित येत असतात, पण पर्यटन व्यवसायाला चालना देण्यात प्रशासनाला यश आले नाही. पर्यटकांची संख्या वाढवून शहराचा नावलौकिक उजळ करण्यासाठी वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव भरवण्यात आला. देश-विदेशातील पर्यटकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेणे महोत्सवात अपेक्षित असते, मात्र शास्त्रीय आणि लोकसंस्कृतीशी संबंधित दर्जेदार कार्यक्रम घेण्याचा रिवाज आहे. हा आदर्श पायंडा मोडीत काढत प्रशासनाने महोत्सवाचा बट्ट्याबोळ केला. ढिसाळ नियोजनाचा अनुभव रसिकांना पहिल्या दिवसापासून आला. वेरूळ लेणीच्या पायथ्याशी उद्घाटन समारंभाला मोजकेच रसिक उपस्थित होते. विदेशी पर्यटकांची संख्या ७० होती. रसिक नसल्यामुळे नावाजलेल्या कलाकारांना रिकाम्या खुर्च्यांसमोर नृत्य सादर करावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निघताच बहुतेक गर्दी पांगली. त्यामुळे ग्रेसी सिंग आणि पूर्णाश्री राऊत यांचे नृत्य बघायला शंभर रसिकसुद्धा नव्हते. महोत्सवात शास्त्रीय नृत्य-गायन आणि लोकनृत्य अपेक्षित असते, मात्र अजय-अतुल आणि अदनान सामी यांच्या फिल्मी गाण्यांचा भडीमार करण्यात आला. दोन दिवस हा फिल्मी धुमाकूळ असल्याने जाणकार पर्यटक व रसिकांनी पाठ फिरवली.
कलाग्राम परिसरातील ‘लोकजागर’ कार्यक्रमात शुकशुकाट होता. पर्यटकांपर्यंत महोत्सव पोहचवणे आणि स्थानिकांना सहभागी करून घेण्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महसूल प्रशासन सपशेल अपयशी ठरले. अजय-अतुल ‘कॉन्सर्ट’च्या बनावाने महोत्सवाची पुरती बदनामी झाली. सरकारी पैशातून भरवलेल्या महोत्सवात नागरिक आणि विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यात आले. महोत्सवात खासगी संस्थांचा हस्तक्षेप थांबवू, असे आश्वासन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिले आहे.

खासगी संस्थेची लुडबूड
वेरूळ-अजिंठा महोत्सवात जवळपास साडेतीन हजार तिकिटे एका खासगी सांस्कृतिक संस्थेला देण्यात आली. एकगठ्ठा तिकीटे दिल्यामुळे इतर रसिकांना इच्छा असूनही तिकिटे मिळाली नाहीत. तिकीट दर एक हजार आणि पाचशे रुपये असल्यामुळे विद्यार्थी महोत्सवापासून वंचित राहिले. महसूल प्रशासनाने निधीसाठी एका संस्थेलाच महोत्सव आंदण दिल्यामुळे रसिक व कलाकारांमध्ये संताप आहे.

वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात होईल. पुढील काळात कोणत्याही खासगी संस्थेचा समन्वयात सहभाग नसेल आणि पर्यटक-रसिकांसाठी तिकीट उपलब्ध असतील. पर्यटनाला चालना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू.
- जयकुमार रावल, पर्यटनमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भूमिहीनांना अद्याप जम‌िनीची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत जमीन मिळविण्यासाठी शेतमजूर, भूमिहीन सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. अर्जदारांच्या तुलनेत सरकारकडे पुरेशी जमीन नसल्याचे समोर आले आहे. प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने व योजनेतील काही त्रुटींमुळे अनेक गरजू या कल्याणकारी योजनेपासून अनेक लाभार्थी दूरच आहे.
दारिद्र्यरेषेखालील भूमीहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतमजूर यांच्या कुटुंबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावेत व त्यांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी, त्यांचे शेतमजुरीवरील अवलंबित्व कमी व्हावे या उद्देशाने शासनाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना २००४पासून सुरू केली आहे.
या योजनेद्वारे अनुसुचित जाती व नवबौद्ध भूमिहीन शेतमजुरांना चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर ओलिताखालील जमीन शासकीय दराने खरेदी करून दिली जाते. शासनाकडून ५० टक्के अनुदान व ५० टक्के बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ही योजना राबवली जाते.
२००४ ते २०१६ या कालावधीत जिल्ह्यातील एकूण ४७९ अर्जदारांना सुमारे १८०० एकर शेतजमीन या योजनेंतर्गत देण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे पावणेबारा कोटी रुपये अनुदान म्हणून वाटप करण्यात आले आहे. या कल्याणकारी योजनेमुळे या शेतमजुरांचे खऱ्याअर्थाने कल्याण झाले, पण कर्ज वसुलीचे प्रमाण अत्यल्प आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत काही तरतुदी अडथळे करत असल्याचे समोर आले आहे. शासन खासगी शेतजमीन खरेदी करून ती अर्जदारांना देते.
शंभराहून अधिक पात्र अर्जदार या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शासन दरबारी वर्षानुवर्ष खेटा मारत आहेत, पण सरकारकडे केवळ सात एकरच शेतजमीन शिल्लक आहे. त्यात दिवसेंदिवस शेतजमिनीच्या किंमत वाढत आहे. शासनाचा जमीन खरेदीदर हा खूप कमी आहे. त्यामुळे जमीन मिळण्यात अडचण होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. परिणामी गरजुंपर्यंत योजनेचा लाभ पोचत नाही. त्यांची प्रतिक्षा यादी वाढत आहेत.

शासन खासगी जमीन खरेदी करून ती लाभार्थींनाना दिली जाते. दिवसेंदिवस जमिनीच्या किंमती वाढत आहेत. शासकीय दरात विभागाला शेतजमीन खरेदी करण्यास अडथळा निर्माण होता. शेकडो शेतमजूर योजनेच्या लाभापासून दूर आहेत. त्यांच्या प्रगतीसाठी हा प्रश्न तातडीने निकाली लागला पाहिजे. शेतपिकांचे नुकसान झालेल्या कर्ज फेड करणाऱ्या लाभार्थींना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.
- प्रा. राम बाहेती, नेते भाकप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादेत हजारावर सर्जन, भूलतज्ज्ञ सव्वाशेच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरामध्ये हजारापेक्षा जास्त शल्यचिकित्सक आहेत आणि शहरात दररोज तीन ते पाच हजार शस्त्रक्रिया होतात; परंतु भूलतज्ज्ञ केवळ सव्वाशेच आहे. तालुक्यांच्या ठिकाणी तर भूलतज्ज्ञच नाहीत. ही स्थिती गंभीर असून यातून मार्ग काढण्याची नितांत गरज आहे, अशी हाक भूलतज्ज्ञांच्या तीन दिवसांच्या राज्यस्तरीय परिषदेच्या समारोपप्रसंगी भूलतज्ज्ञांनी दिली. तसेच भूलतज्ज्ञांची संख्या वाढविण्याची मागणी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंकडेही करण्यात आली.
‘इंडियन सोसायटी ऑफ अनेस्थेशियालॉजिस्ट’ची राज्य व शहर शाखा आणि एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय परिषदेच्या रविवारी (१६ ऑक्टोबर) समारोप झाला. या निमित्त विविध विषयांवरील परिसंवाद, मार्गदर्शन आणि चर्चासत्रांबरोबरच संघटना राबविणार असलेल्या जीवन संजीवनी योजनेअंतर्गत सायकल फेरी, पथनाट्य आणि प्रथमोपचार प्रात्यक्षिक-प्रशिक्षण, रक्तदान, पोस्टर प्रदर्शन असे विविध उपक्रम रविवारी शहरात झाले.
परिषदेच्या समारोपप्रसंगी अवयवदानाकडे लक्ष वेधण्यात आले. हजारो रुग्ण अवयव प्रत्यारोपणाकरिता दात्यांच्या प्रतिक्षेत आहेत, मात्र समाजात अवयवदानाविषयी पुरेशी जागरूकता नाही. अवयव दान व प्रत्यारोपणात भूलतज्ज्ञांचा फार मोठा सहभाग असतो. त्यांच्याशिवाय ही प्रक्रियाच पार पडू शकत नाही. त्यामुळे अवयवदानाला एका समाजहिताच्या चळवळीचे स्वरूप देणे आवश्यक असून, त्यामध्ये भूलतज्ज्ञांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहनही रविवारी विविध वक्त्यांनी केले. यानिमित्त मुंबईच्या डॉ. उर्मिला थत्ते यांनी भूलशास्त्र या विषयावरील वैज्ञानिक संशोधनावर मार्गदर्शन केले. मुंबईचेच प्रख्यात हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. अनिल तेंडुलकर यांनी सर्जन व भूलतज्ज्ञ यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंधाचे महत्व विशद केले. ‘भूलशास्त्र काल, आज व उद्या’ या विषयावरील परिसंवादात डॉ. ए. एस. तोंडरे, डॉ. साधना कुलकर्णी व बेंगळुरूचे डॉ. मुरली चक्रवर्ती यांनी विचार मांडले. भविष्यात येऊ घातलेल्या ‘रोबोटिक अॅनास्थेशिया’बाबत त्यांनी माहिती दिली.

सायकल फेरी, पथनाट्य, रक्तदान
आजच्या ‘जागतिक भूलशास्त्र दिन’चे औचित्य साधून रविवारी सकाळी सहा वाजता शहानूरमिया दर्ग्याजवळील सिग्मा हॉस्पिटलपासून एमजीएम हॉस्पिटलपर्यंत सायकल फेरी काढण्यात आली. या प्रसंगी ‘एमजीएम’च्या अपघात विभागासमोर आणीबाणीच्या प्रसंगी करावयाच्या प्रथमोपचारांची माहिती देणारे पथनाट्य सादर करण्यात आले. गेल्या शंभर वर्षांत भूलशास्त्रामध्ये झालेली प्रगती या विषयावर पोस्टर प्रदर्शनाचे आयोजनही परिषदस्थळी करण्यात आले होते. तसेच परिषदेनिमित्त रक्तदान शिबिरही घेण्यात आले. ऑपरेशन थिएटरमध्ये काम करण्याऱ्या ८०पेक्षा जास्त तंत्रज्ञांना आणीबाणीच्या प्रसंगी करायच्या प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात आले. दुपारी झालेल्या समारोप समारंभात परिषदेत आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

डॉ. महाजन, डॉ. काटकरांनी घेतला पदभार
संघटनेचे नवनिर्वाचित राज्य अध्यक्ष डॉ. हितेंद्र महाजन व सचिव डॉ. मनीषा काटकर यांनी रविवारी पदभार स्वीकारला. परिषदेसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप देशमुख, सचिव डॉ. बालाजी आसेगावकर, शाखा अध्यक्ष डॉ. रोशन रानडे, सचिव डॉ. सुजीत खाडे, डॉ. प्रसाद देशपांडे, डॉ. गणेश देशपांडे, डॉ. प्रमोद भाले आदींनी पुढाकार घेतला. पुढील परिषद नोव्हेंबर-डिसेंबर २०१७ मध्ये नांदेड येथे होणार आहे. या परिषदेत राज्यभरातून हजारापेक्षा जास्त भूलतज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अफू, शस्त्र प्रकरणात चौघांना १० वर्षे कारावास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अंदाजे दीड लाख रुपये किंमतीची मादक द्रव्ये (अफू) , गावठी कट्टे, काडतूस आणि दरोड्याचे साहित्य घेऊन जाताना पोलिसांनी अटक केलेल्या चौघा आरोपींना विशेष सत्र न्यायाधीश एस. जी. शेटे यांनी ‘मादक द्रव्य प्रतिबंधक कायद्यान्वये’ प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास, एक लाख रुपये दंड ठोठावला.
‘भारतीय हत्यार कायद्यांतर्गत’ प्रत्येकी ३ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड सुद्धा न्यायालयाने आरोपींना ठोठावला आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली जीप (वाहन) जप्त करून तिचा लिलाव करावा. यातून मिळणारी रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा करावी असेही आदेशात म्हटले आहे.
२४ सप्टेंबर २०१२ रोजी औरंगाबाद ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक नांदेडकर यांना, बीडकडून तवेरा जीपने दरोडेखोर पाचोडकडे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सचिन सुभाष गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाचोडपासून काही अंतरावरील एकांत ढाब्याजवळ सापळा रचला. पोलिस पथकाने झडप घालून नारायण जाधव (४९, रा. नारायण खेडा, जि. मेदक, मध्य प्रदेश), शेखर शर्मा (३६, रा. बागरतवा, जि. होशंगाबाद), दत्ता बसगुडे (रा. पाडळशिंगी, ता. गेवराई, जि. बीड) आणि लक्षमण नरवडे (४५, रा. अर्धामसला, ता. गेवराई, जि. बीड) यांना पकडले. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, दोन सुरे, वाहनातील लाकडी दंडे, मिर्ची पूड, दोरी आदी दरोड्याचे साहित्य, एका प्लास्टिकच्या बरणीत असलेला काळा घट्ट पदार्थ (अफू, किंमत अंदाजे दीड लाख रुपये) असा ऐवज जप्त केला. तपासाअंती पोलिसांनीकोर्टात दोषारोपपत्र दाखल केले.

पळून जाण्याचा प्रयत्न
एका पोलिस कर्मचाऱ्यास एक किलोमीटर पुढे हरियाणा हॉटेलजवळ नेमले. आरोपींची जीप (क्रमांक एमएच २३ वाय २४०४) दिसताच संबंधित पोलिसाने पोलिस पथकाला मोबाइलद्वारे ही खबर दिली. पोलिस पथक सावध झाले. त्यांनी रस्त्यावर बॅरिकेट लावून आरोपींची जीप अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने भरधाव वेगात जीप रस्त्याच्या खाली नेऊन बंद केली व तो पळून गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासऱ्याचा खून; जावयाला जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद
दारुड्या पतीच्या मारहाणीला कंटाळून एक वर्षापासून पत्नी गंगगाबाई उर्फ हौसाबाई माहेरी राहत होती. तिला नांदायला पाठवीत नसल्याच्या कारणावरून सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयास वैजापूरचे सत्र न्यायाधीश के. ए. कोठेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. घराता घुसून मारहाण केल्याच्या आरोपाखाली (ट्रेसपास) तीन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड सुद्धा कोर्टाने आरोपीला ठोठावला आहे. आरोपीला या दोन्ही शिक्षा एकत्रितपणे भोगावयाच्या आहेत.
तलवाडा, वैजापूर येथील सुभाष शहादू सोनवणे यांची मुलगी गंगाबाई उर्फ हौसाबाईचे १५ वर्षांपूर्वी वैजापूरमधीलच बांधकाम मजूर लहानू रघुनाथ मोरे सोबत लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. चार वर्षांपासून लहानू दारू पिऊन पत्नीला मारहाण करीत असे. या त्रासाला कंटाळून एक वर्षापासून गंगाबाई वैजापूर लगतच तलवाडा येथे तिच्या माहेरी राहत होती. २१ एप्रिल २०१४ रोजी गंगाबाईचा भाऊ, फिर्यादी राजू सोनवणे हा मजुरीसाठी बाहेर गेला होता. आरोपी लहानू याने राजुचे वडील (आरोपीचे सासरे) सुभाष यांना मारहाण केल्याचे गावातील मोईनुद्दीन शेख यांनी राजूला सांगितले होते. राजू घरी गेला असता त्याचे वडील सुभाष सोनवणे (५५) हे गंभीर जखमी झालेले बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले.
घटनेनंतर शेजारी राहणाऱ्या शकिलाबी शेख युनूस आणि वाहनचालक शेख अमजद शेख सलीम यांनी आरोपीला हातात विट घेवून घराबाहेर पडताना पाहिले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता सुभाष गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे दिसले. त्यांच्याजवळ रक्त लागलेली काठी, दगड आणि विटा पडल्याचे त्यांनी पाहिले. या प्रकरणी राजू सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी लहानूविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक डी. बी. जाधव यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणीच्या वेळी अतिरिक्त लोकअभियोक्ता बाळासाहेब महेर यांनी एकूण १० साक्षीदारांचे जवाब नोंदविले. घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली आरोपीची पत्नी सुनावणीच्यावेळी फितूर झाली होती. सुनावणीअंती आरोप सिद्ध झाल्यामुळे कोर्टाने आरोपीला शिक्षा व दंड ठोठावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दगडफेक प्रकरणातील १२ शिक्षकांना जामीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिसांवर दगडफेक करून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या १२ विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांंना सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी शनिवारी प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजूर केला.
आंदोलनकर्त्या शिक्षकांनी ४ ऑक्टोबर रोजी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केल्यामुळे पोलिसांनी चार अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून लाठीहल्ला केला होता. दगडफेक करणाऱ्या ५९ जणांना पोलिसांनी त्याच दिवशी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात असलेले सीताराम उंधळ्या म्हसकर (रा. मोपाड, जि. रायगड), मनोज शिवाजी पाटील (रा. बालाजीनगर), खंडेराव शिवाजी जगदाळे (रा. शिरोळे, जि. कोल्हापूर), शिवराम विश्वनाथ म्हस्के (रा. द्वारकापुरी, औरंगाबाद), वाल्मिक सखाराम सुरासे (रा. तिरुपती पार्क), रवींद्र पदमसिंग मंडावर (रा. वैजापूर), मिर्झा सलीम बेग (रा. सादातनगर, औरंगाबाद), अन्सारी मोहम्मद जावेद (रा. आसमिरा टाउनशिप, औरंगाबाद), अभिजित दिनकर कदम (रा. पूर्णा), रमेश सदाशिव देशमुख (रा. परभणी), संंदीप रामधन देवरे (रा. गारखेडा), दीपक विठ्ठल इंगळे (रा. सातगाव म्हसला, जि. बुलडाणा) या १२ शिक्षकांच्यावतीने जामीन अर्ज दाखल केले होते. सुनावणीअंती कोर्टाने या शिक्षकांना जामीन मंजूर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२४ ऑक्टोबर रोजी पाथ्रीकर गौरव सोहळा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कृषी, सहकार, शिक्षण, क्रीडा, सामाजिक आणि राजकारण क्षेत्रातील कार्यकर्ते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २४ ऑक्टोबर रोजी अमृत महोत्सव गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोहळा समितीचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पाटील म्हणाले, ‘द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्याने अमिट ठसा उमटविला. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा परिचय आहे. येत्या २४ ऑक्टोबर रोजी त्यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गौरव करण्यात येणार आहे. संत तुकाराम नाट्यगृहात दुपारी चार वाजता हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री कमल किशोर कदम यांची प्रमुख उपस्थिती असेल. तसेच आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, अब्दुल सत्तार, सतीश चव्हाण, संजय शिरसाट, हर्षवर्धन जाधव, अतुल सावे, विक्रम काळे, सुभाष झांबड, संग्राम कोते पाटील, प्रशांत बंब, जवाहरलाल गांधी, चित्रा वाघ, विठ्ठल लहाने यांची प्रमुख उपस्थिती राहील. या सोहळ्यानिमित्त स्मरणिकाही प्रकाशित करण्यात येणार आहे.’
पत्रकार परिषदेस माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंगनाथ काळे, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय, काशीनाथ कोकाटे, सुधाकर सोनवणे, विजय बोराडे, सुरजितसिंग खुंगर, राजेंद्र जगताप, अनुपमा पाथ्रीकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

....कर बसला मानगुटीवर; ८१४७ जणांना नोटीस

$
0
0



dhananjay.kulkarni@timesgroup.com
औरंगाबादः प्राप्तिकर न भरणाऱ्या ८१४७ नागरिक व आस्थापनांना प्राप्तिकर विभागाने नोटीस बजावली आहे. नोकरदारांना नोटीस बजावण्याची ही पहिलीच वेळ असून त्यांची संख्या गेल्यावर्षीपेक्षा वाढल्याची माहिती समोर आली आहे.
प्रा‌प्तिकर विभागाद्वारे ‘कर निर्धारण पत्र’ (नॉन फाइल मॉनिटरिंग सिस्टीम) याअंतर्गत आणि सेक्शन १४२ व १४८ अंतर्गत स्टॅच्युटरी नोटीस बजावण्यात येते. ही नोटीस बजावण्याचे दोन प्रकार आहेत. ज्या करपात्रधारकांची नावे किंवा आस्थापनांची नावे प्राप्तिकर विभागात आहेत व गेल्या दोन वर्षांपासून कर भरलेला नाही अशांना कर निर्धारण पत्र देऊन नोटीस बजावण्यात आली आहे. अशांची संख्या सुमारे ८१४७ असून गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण एक हजाराने वाढले आहेत. औरंगाबाद विभागात रेंज १ पासून रेंज ३ पर्यंत तीन विभाग कार्यरत असून यात नोकरदार, उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनीअर, आर्किटेक्ट आणि छोटे व्यावसायिक यांचा समावेश आहे. या अंतर्गत या सर्वांना पत्राद्वारे नोटीस देऊन कर भरा असे सांगण्यात आले आहे. प्राप्तिकर विभागाच्या सेक्शन १४२ आणि १४८ अंतर्गत ‘स्टॅच्युटरी नोटीस’ही शहरात बजावण्यात आली आहे. याप्रकारची नोटीस प्राप्तिकर चुकवणारे, नोटीसींना उत्तर न देणारे आणि कर चुकवून ‌आस्थापनांचे व्यवहार करणारे जे आहेत त्यांनाच बजावण्यात येतात. शहरात अशा प्रकारच्या जवळपास सव्वादोनशे जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. शहरातील नोकरदार मंडळी, उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर, आर्किटेक्ट आणि वकिलांना या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांसाठी ‌प्राप्तिकर विभागाच्या विविध सेक्शनचा आधार घेण्यात आला असून नुकतेच शहरात नामांकित बेकरी उदयोग, सराफा आणि इतर व्यावसायिकांच्या आस्थापनांवर ‘सर्च’ही करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

...अन्यथा कारवाई
बजावण्यात आलेल्या नोटीसला संबंधितांनी उत्तर न दिल्यास किंवा कर न भरल्यास त्यांच्यावर प्राप्तिकर विभाग आगामी काळात कारवाईचा बडगा उचलणार आहे. इन्कम डिक्लेरेशन स्किम अंतर्गत या नोटीस नसून कर न भरणाऱ्यांना इशारा मिळावा यासाठी या नोटीसा बजावण्याचा घाट प्राप्तिकर विभागाने घातला आहे.

आयडीएस सर्वाधिक जमा
इन्कम डिक्लेरेशन स्किम जून२०१६ मध्ये भारत सरकारने जाहीर केली होती. त्याअंतर्गत सप्टेंबर २०१६ पर्यंत ‘अघोषित उत्त्पन्न’ जाहीर करण्याची संधीही मिळाली होती. शहरात याअंतर्गत उत्तम प्रतिसाद लाभला असून कोट्यवधींचा कर जमा झाला आहे. देशपातळीवर सुमारे चौतीस हजार कोटी रुपये यात जाहीर झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गळित हंगाम अधांतरी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील साखर कारखाने एक डिसेंबरला सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, परराज्यातील कारखाने ऊस नेण्याची शक्यता असल्यामुळे दिवाळीनंतर ऊस गाळप करण्यास परवानगी देण्याची मागणी साखर कारखान्यांनी केली आहे. या मुद्द्यावर गुरुवारी पुणे येथे साखर संचालक कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
औरंगाबाद विभागातील २२ साखर कारखान्यांनी ऊस गाळपाची तयारी केली आहे. पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना बंद राहणार आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात उसाचे क्षेत्र तुलनेने घटले आहे. औरंगाबाद विभागात उसाचे क्षेत्र निम्मे घटले असून साखर उत्पादन कमी होणार आहे. शेजारील जिल्ह्यातील साखर कारखाने ऊस घेऊन जात असल्यामुळे बहुतेक कारखान्यांना ऊस टंचाई जाणवणार आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात गाळप हंगाम सुरू होतो. उसाचे क्षेत्र कमी असल्यामुळे डिसेंबर महिन्यात गाळप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सर्वाधिक साखर उतारा असलेला परिपक्व ऊस कर्नाटक राज्यातील कारखाने घेऊन जातील. तसेच डिसेंबर महिन्यात राज्यातील कारखान्यांना चांगला ऊस मिळणार नाही असा मुद्दा सीमावर्ती भागातील कारखान्यांनी मांडला आहे. लातूर, सोलापूर, कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यातील उसाला परराज्यात विशेष मागणी आहे. राज्यातील साखर कारखान्यांना हा फटका सहन करावा लागणार आहे. हा मुद्दा चिघळत असल्यामुळे राज्य सरकार व साखर कारखानदार यांच्यात वाद रंगला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्याची मागणी केली आहे. औरंगाबाद, बीड व जालना जिल्ह्यात उसाचे क्षेत्र घटले असून दुष्काळाचा फटका साखर उद्योगाला बसत आहे. साखर कारखान्यांचा हंगाम दरवर्षी १६० दिवसांचा असतो. यंदा ऊस कमी असल्यामुळे फक्त ६० दिवस हंगाम राहणार आहे. दोन महिने ऊस मिळवण्यासाठी साखर कारखाने प्रयत्न करीत आहेत.

दराबाबत संभ्रम
मागील वर्षीच्या साखर उताऱ्यानुसार कारखाने उसाचा दर ठरवणार आहेत. सध्या साडेनऊ उतारा असलेल्या उसाला २३०० रुपये प्रतिटन दर आहे. त्यानंतरच्या प्रत्येक टक्क्याला २३० रुपये दर मिळेल. तसेच सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यात मुबलक पाणीसाठा असून उसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी उसाचे बेणे शोधत असून बहुतेक ऊस बेण्यासाठी वापरला जाणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना जागेवर पैसे मिळणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समर्थनगरमध्‍ये शारदोत्सव उत्साहात

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समर्थनगर महिला मंडळातर्फे आयोजित तीन दिवसीय शारदोत्सव मोठ्या उत्साहात झाला. स्वामी समर्थ केंद्रात झालेले सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांनी महिलांना कलागुण सादर करण्याची संधी मिळाली.
३५ वर्षांच्या परंपरेस जपताना कार्यकारिणीने यंदाही छान कार्यक्रम आयोजित केले होते. पौरोहित्य वैशाली बावस्कर व वृंदा लहुरीकर यांच्या उपस्थितीत अध्यक्ष शैलजा देव व नंदा खडके यांनी शारदेची स्‍थापना केली. यानंतर महिला पौरोहित्य वर्गाने श्रीसुक्त पठण केले. दुसऱ्या दिवशी मालती करंदीकर व लता पाठक यांच्या हस्ते आरती झाली. यावेळी बौद्धिक स्पर्धांनी उपस्थित महिलांना चांगलेच विचार करायला लावले. या स्पर्धा मालती करंदीकर, लता पाठक, छाया मुन्‍शी व शैलजा देव यांनी आयोजित केल्या होत्या. छाया मुन्‍शी यांनी म्हणी स्पर्धा घेतली. यामध्ये मंगला पारगावकर, नंदा खडके व स्मिता घन विजेत्या ठरल्या. मालती करंदीकर यांनी देवीची नावे लिहण्यास सांगितली. नीता जड, स्मिता देशपांडे व स्मिता घन यांनी स्पर्धेत बाजी मारली. शैलजा देव यांनी शेवटी ‘ळ’ अक्षर येणारे शब्द लिहण्याची स्पर्धा घेतली. यामध्ये संध्या नागापूरकर, नीता जड व स्मिता देशपांडे ‌यांनी बक्षीस मिळावले. शारदोत्सवाच्या समारोप कार्यक्रमास स्मिता घन, घाणेकर व वृंदा लहुरीकर यांच्या हस्ते आरती झाली. वसुधा आपटे व त्यांच्या स‌हकाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषेत मंगळागौरीचे खेळ सादर करून उत्सवाचा शानदार समारोप केला. उपस्थित महिलाही खेळात सहभागी झाल्या होत्या. दुग्धपानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वीर अकलंग’ नाटकातून साकारले

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत राजाबाजार मंदिर, राजाबाजार व चातुर्मास समिती, तीस चौबीसी विधान समिती यांच्या वतीने आयोजित धार्मिक कार्यकमांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी नाटक सादर केले.
गणधर धाम हिराचंद कस्तुरचंद कासलीवाल महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘वीर अकलंग निकलंग यांचे बलिदान’ हा नाटकाचा विषय होता. नाटकात १०० मुला-मुलींनी भाग घेतला. अतिशय कमी वेळात मुलांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे नाटक यशस्वी केले. यावेळी भगवान बाबा एडसग्रस्त मुलांना प्रकाश सेठी व सरिता महावीर जैन दिल्लीवाले कुटुंबाच्या वतीने कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले. धीरज पाटणी परिवाराच्या वतीने प्रसाद देण्यात आला. यावेळी गुप्तीनंदी महाराज, मुनिश्री सुयेश गुप्ती महाराज, मुनिश्री चंद्रगुप्त महाराज, सुनिधीमती माताजी महाराज, आर्यिका सुनिती मती माता महाराज, आर्यिका कुलभुषणमती माताजी महाराज उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर, आचार्य गुप्तीनंद महाराज, चातुर्मास समिती २०१६ , तीस चोबीसी विधान समिती व प्रज्ञायोगी ग्रुपच्या सर्व सदस्य, संयोजक नरेंद्र अजमेरा, पीयूष कासलीवाल आदींनी परिश्रम घेतले.

शास्त्र व ग्रंथांचे रक्षण केल्याने संस्कृतीचे रक्षण होते. जो व्यक्ती स्वतः प्रामणिक आहे त्याचे वचनही प्रामाणिक असते. नियम व संकल्पांचे पालनही व्यवस्थित करावे लागते. धर्म हा प्रामाणिक असतो. जिनवाणीच्या प्रचार व प्रसारासाठी वीर निकलंगने आपल्या जीवनाचे बलिदान दिले व भटट अकलंग महास्वामींनी अहिंसा व शांतीच्या प्रचारासाठी आपले जीवन समर्पन केले. - आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८० वर्षांच्या ज्येष्ठाने केले वॉकेथॉन पूर्ण

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्वप्न पाहिले, हिंमत ठेवली, आशावाद जगला की अशक्य असा शब्द नसतो. याची प्रचिती वेरूळ महोत्सवानिमित्त आयोजित ‘वॉकेथॉन’ स्पर्धेमध्ये आली. एका ८० वर्षांच्या आजोबांनी जिगरबाजपणे ही स्पर्धा पूर्ण केली आणि आपण अजूनही तरुण आहोत, हे मोतीला भुतडा यांनी शहरवासीयांना दाखवून दिले.
रविवारी सकाळी कलाग्राम चिकलठाणा एमआयडीसी ते कलाग्राम अशा वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १२ स्पर्धेकांनी सहभाग नोंदविला. ६० ते ७० या महिला वयोगटात उमाबाई कांदडा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अरुणा काब्रा या ‌दुसऱ्या क्रमांकावर, तर साधना जाजू यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. ६० ते ७० पुरुष या वयोगटात हरिकिशन मालानी हे प्रथम आले. तर द्वितीय क्रमांक रमेश चंद्र जाजू आणि ओमप्रकाश काबरा यांना पटकावला, तर तृतीय स्थानी शरद लासूरकर होते. ७० ते ८० वयोगटात सुरेंद्र खानके हे विजयी राहिले. तर ऐंशी वर्ष वयोगटात मोतीलाल भुतडा यांनी स्पर्धा पूर्ण करून उपस्थितांची दाद मिळविली. या स्पर्धेतील विजेत्यांना उपजिल्हाधिकारी महेंद्र हरपळकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. मंगला बोरकर यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांची भूमिका नामंजूर

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या प्रारूप विकास आराखड्याशी सहमत नसल्याची स्पष्ट भूमिका महापालिकेचे आयु्क्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सुप्रीम कोर्टात घेतली आहे. आयुक्त कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत. कायद्याची प्रक्रिया राबवित नसल्याचा आक्षेप महापौरांच्या वकिलांनी सोमवारी घेतला.
सर्वसाधारण सभेने मंजूर केलेला विकास आराखडा मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने ५ ऑगस्ट रोजी रद्द केला होता. त्याला महापौर त्र्यंबक तुपे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. महापौरांच्या १० याचिकांवर सुनावणी न्या. मदन लोकूर व न्या. आदर्शकुमार गोयल यांच्यासमोर सोमवारी झाली. विशेष म्हणजे या महापौरांच्या दहा याचिकांत पालिकेचे वैधानिक प्रमुख असलेल्या आयुक्तांना प्रतिवादी करण्यात आले आहेत. पालिका अधिनियमानुसार कोर्टात बाजूने किंवा विरुद्ध भूमिका मांडायची असेल, तर त्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पालिका आयुक्त बकोरिया यांचे शपथपत्र त्यांचे वकील अनिरुद्ध माई यांनी कोर्टात सादर केले. औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाशी सहमत असल्याने सुप्रीम कोर्टात दाद न मागण्याचा निर्णय घेतल्याचे या शपथपत्रात म्हटले आहे.
आयुक्त हे महापौरांच्या सोबत येण्यास तयार नाहीत. आयुक्त सर्वसाधारण सभेच्या विकास आराखड्याशी असहमत कसे असू शकतात, असा सवाल करण्यात आला. ही माहिती राज्य शासनाकडे दिली आहे. राज्य शासनाचे आदेश येईपर्यंत वेळ देण्यात यावा, अशी विनंती महापौरांचे जेष्ठ वकील गोपाल सुब्रह्मण्यम यांनी कोर्टाकडे केली. किती वेळ पाहिजे, असे कोर्टाने विचारल्यावर दोन आठवड्याचा वेळ मागवून घेतला. त्यास कोर्टाने मंजुरी दिली.
महापौरांची बाजू जेष्ठ वकील शाम दिवाण, गोपाळ जैन, शिवाजी जाधव, अतुल कराड यांनी मांडली. मूळ याचिकाकर्ते गोविंद नवपुते यांची बाजू जेष्ठ वकील बसवा पाटील, नागमोहन दास, देवदत्त पालोदकर हे मांडत आहेत.

विकास आराखडा अमान्य ः आयुक्त
याचिकाकर्ता म्हणून सामील करण्यासाठी अर्ज आला, तर तो फेटाळून लावावा, अशी विनंती आयुक्तांनी केली आहे. हे शपथपत्र रेकॉर्डवर ठेवण्याचे माई यांनी कोर्टाला सांगितले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या विकास आराखड्याच्या ड्राफ्टला महापालिकेचे आयुक्त म्हणून आपले समर्थन नाही, असे शपथपत्रात स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंगायत समाजात मुला-मुलींचे सम प्रमाण

$
0
0



म. टा. प्र‌तिनिधी, औरंगाबाद

लिंगायत समाजामध्ये मुला-मुलींचे प्रमाण सम आहे. हळूहळू पोट जात पाहण्याची संकल्पनाही मागे पडली आहे, असा सकारत्मक बदल लिंगायत वीरशैव वधू-वर परिचय मेळाव्यात दिसून आला.
रविवारी ज्योतीनगरच्या विश्वरूप हॉलमध्ये झालेल्या मेळाव्याला जवळपास दीड हजार समाजबांधव उपस्थित होते. समितीच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्याचे हे नववे वर्ष होते.

बालाजी मुळे यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले. व्यासपीठावर बसवराज मंगरुळे, अॅड. उमाकांत पाठील, नगरसेवक शोभा बुरांडे व सुमित्रा हळनोर, जगन्‍नाथअप्‍पा वाडकर, संयोजक सचिन संगशेट्टी आदी उपस्थित होते. सर्व पोटजातींसाठी खुल्या असलेल्या या मेळाव्यात राज्यासह मध्यप्रदेश, हैदराबाद, कर्नाटक, तेलंगणा, दिल्‍ली या राज्यातूनही इच्छुकांनी नोंदणी केली. मेळाव्यापूर्वी १०० पेक्षा अधिक नोंदणी झाली. तर कार्यक्रमाच्या ठिकाणीही नोंदणीची व्यवस्था असल्याने युवक-युवती मिळून ४०० नोंदणी झाल्या. अशा कार्यक्रमाने आमचा वेळ वाचतो व प्रत्यक्ष बोलता येते अशी प्रतिक्रिया एका युवतीने दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी, सुधाकर मापारी, सुभाष वाडकर, आर. वाय. जाबा, सुधाकर काचेवार, अर्जुन बोरखेडे, उमेश लिंभारे, मंगल मिटकरी, रवींद्र लकडे, शिवराम बुलबुले, शिवा गुळवे, अनिल मोघे, जगदीश कोठाळे, बसवराज निंबुरगे आदींनी परिश्रम घेतले. महिला स‌मितीतर्फे स्मिता ममदापुरे, विद्या हुरणे, लद्दे व माधुरी घोंडगे यांनी काम पाहिले.

पोटजातींचा स्वीकार

लिंगायत समाजाने काळाची पावले ओळखत पोटजाती पाहणे गौण केले. लिंगायत समाजातील जंगम, वाणी, गठडी, कोष्टी, तेली, माळी, सोनार, गुरव, कुंभार, न्हावी, परिट, फुलारी, सुतार, बुरूड, ककय्या आदी सर्व पोट जातींनीही यावेळी नोंदणी केली. गेल्या वर्षी अशा पद्धतीने स्थळे जुळवण्यात आयोजकांना यश आले होते. यंदाही पालकांचा अशा पद्धतीने स्‍थळ जुळवण्यावर कल होता. हुंडापद्धतीवरही नव्या पिढीचा आक्षेप असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

गेल्या नऊ वर्षांपासून संपूर्ण समिती अतिशय सक्रियपणे काम करत आहे. समाजातील ज्येष्ठ व महिलाही आम्हाला सहकार्य करतात. कोणत्याही प्रकारची फसवेगिरी होऊ न देता पारदर्शीपणा जपण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

- सचिन संगशेट्टी, संयोजक

मेळाव्याचे संस्‍थापक संयोजक दिवंगत विश्वनाथअप्पा संगशेट्टी होते. गेल्या नऊ वर्षांपासून या उपक्रमात खंड पडला नाही व समितीही उत्तम काम करत असून दरवर्षी प्रतिसाद वाढतच आहे.

- दीपक उरगुंडे, संयोजन समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगर, नाशिकने वापरले २० टीएमसी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नगर, नाशिक जिल्ह्यांत पावसाळ्यात खरीप पिकासाठी ५७६ दशलक्ष घनमीटर पाणी वापरण्यात आले आहे. दरम्यान, जायकवाडी प्रकल्पात ६५ टक्क्यांपेक्षा जास्त साठा असल्यामुळे ऊर्ध्व खोऱ्यातील धरणांमधून पाणी सोडण्यात येणार नाही, अशी माहिती गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी दिली.
ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाण्याच्या समन्यायी वाटपाची बैठक सोमवारी पार पडली. महामंडळाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीसाठी एस. एस. वाघमारे, राजेश मोरे, अलका अहिरराव, संजय भर्गोदेव, अरूण कांबळे या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार म्हणाले की, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या १९ सप्टेबर २०१४च्या निर्णयानुसार पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. समन्यायी पाणीवाटपाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. यामध्ये १५ ऑक्टोबरचा पाणीसाठा; तसेच खरिपात मुळा, प्रवरा, गंगापूर, दारणा, पालखेड या धरण समूहांतील पाण्याचा आढावा घेण्यात आला. या समूहांमधून पिण्याचे पाणी, सिंचनासाठी किती पाणी वापरले याची माहिती घेण्यात आली. जायकवाडी धरणामध्ये ८२.६१ टक्के पाणी शिल्लक आहे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सूत्रानुसार; ६५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे ऊर्ध्व भागातून पाणी सोडण्याची आवश्यकता नसल्याचे बिराजदार यांनी सांगितले. ऊर्ध्व खोऱ्यातीलधरणांतून १४ ऑक्टोबरपर्यंत ८६० दशलक्ष घनमीटर पाणी वापरण्याची मुभा आहे. प्रत्यक्षात या वर्षी ५७६ दशलक्ष घनमीटर पाणी वापरण्यात आले.

जायकवाडीतून ६.१७ टक्के पाणीवापर
जायकवाडी धरणातून १ जुलै ते १४ ऑक्टोबरदरम्यान १३३. ८५ दशलक्ष घनमीटर (६.१७ टक्के) पाणीवापर करण्यात आला. यामध्ये माजलगावसाठी ३८.६५ दलघमी, पिण्यासाठी २२.५ दलघमी, औद्योगिक वापरासाठी ३.६० दलघमी पाणी वापर करण्यात आले. शेतकऱ्यांनी १९.३६ दलघमी पाणीउपसा केला, तर ४९.५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले.

असे वापरले पाणी
धरणसमूह.....वापरलेले पाणी
मुळा................१५९.३
प्रवरा...............१४६.५
गंगापूर............४२
दारणा.............१६८.८
पालखेड............५९
(पाणी वापर दशलक्ष घनमीटरमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठात ‘काम बंद आंदोलन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले. एकत्रित वेतनावर घेण्याच्या मागणीसाठी हे कर्मचारी आंदोलन करीत आहेत. प्रशासनाने दोन दिवसापूर्वी सहा कर्मचाऱ्यांना एकत्रित वेतनावर घेतल्याने आंदोलकांमध्ये संतापाची भावना पसरली आहे.
विद्यापीठातील विविध विभागांमध्ये साडेचारशेपेक्षा अधिक कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत. विद्यापीठ सेवेत समावून घेण्याची, एकत्रित वेतनावर घेण्याची मागणी कामगारांनी केली आहे. आश्वासन देऊनही प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन सुरू केले. मुख्य इमारतीसमोरील हिरवळीवर जमा होऊन कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा निषेध केला. सायंकाळी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांना ‘घेराओ’ घातला. कुलगुरू दौऱ्यावर असल्याने ते आल्यानंतरच याबाबत निर्णय होईल, असे डॉ. जब्दे यांनी सांगितले. प्रश्न निकाली न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा इमारतीसमोर ठिय्या मांडला. यापूर्वी या मुद्द्यावर आमदार आणि खासदार यांच्यातील वाद समोर आला होता.

सहा कर्मचाऱ्यांनाच संधी का?
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना विद्यापीठाने मागील काही दिवसात काही कर्मचाऱ्यांना एकत्रित वेतनावर घेतले. त्यातच १५ ऑक्टोबरला पुन्हा सहा कर्मचाऱ्यांना ११ महिन्यांची एकत्रित वेतनावर ऑर्डर दिली. त्यात डॉ. कामाजी डाक, कैलास काटकर, रुपाली शिंदे, विशाल जंगले, विजय बोडखे, शेख इलियास गुलामनबी अशी नावे आहे. ई-सुविधा विभागात असलेले हे कर्मचारी एमकेसीएलचे आहेत. त्यांना ऑर्डर कशी दिली असा, प्रश्न आंदोलनकांनी केला आहे. त्यातील महिला कर्मचारी तर काही महिन्यांपूर्वीच रुजू झाल्यानंतरही ११ महिन्यांची एकत्रित वेतनावर ऑर्डर दिल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ दिली आहे. नव्याने ऑर्डर दिली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

निर्णय प्रक्रियेत मी एकटा नसतो. कुलगुरू आल्यानंतर याबाबत काय तो निर्णय होईल. काम बंद आंदोलनाची कुलगुरूंना कल्पना दिलेली आहे.
- डॉ. प्रदीप जब्दे, कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये सानुग्रह द्या

$
0
0

औरंगाबाद : महापालिकेने सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १० हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी कामगार शक्ती संघटनेचे अध्यक्ष गौतम खरात यांनी केली आहे.
यासंदर्भात संघटनेने महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. औरंगाबाद शहराची लोकसंख्या सुमारे १५ लाख आहे. शहरात स्वच्छतेसाठी ४५०० कामगारांची गरज आहे, मात्र सध्या १६०० ते १७०० कर्मचारी स्वच्छतेचे काम करीत आहेत, याकडे निवेदनात लक्ष वेधले आहे.
महापालिका कामगारांना दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे. याशिवाय कामगारांना अग्रीम दहा हजार रुपये देण्यात यावेत. कामगारांना राज्य शासनाच्या सुधारित वेतनानुसार अर्ध कुशल कामगारांच्या श्रेणीनुसार कामगारांच्या श्रेणीनुसार वेतन देण्यात यावे. रोजंदारी कामगारांना पाच हजार रुपये बोनस द्यावा, अशा मागण्याही निवेदनात केल्या आहेत.
लोकसंख्येनुसार नवीन आकृतिबंध तयार करून सफाई कामगारांची भरती करावी. रिक्त असलेल्या पदांवर भरती करण्यात यावी, आदी मागण्याही कामगार शक्ती संघटनेने केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रमाई आवास योजनेची वाटचाल संथगतीने

$
0
0

Ravindra.Taksal@timesgroup.com
Tweet : @rtaksalMT
औरंगाबाद ः सरकारी यंत्रणेच्या संथ कारभारामुळे ‘रमाई आवास योजने’ची अपेक्षित उद्दिष्टे साध्य होण्यास अडथळा निर्माण होत आहे. या योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रात सव्वाचार हजार घरकूल बांधण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २ हजार ८४० घरकुले मंजूर झाली आहेत. आतापर्यंत त्यातील केवळ ४०० लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळाला असून, शेकडो गरजू योजनेपासून वंचित आहेत.
अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी राज्य सरकारतर्फे ‘रमाई आवास योजना’ राबविण्यात येते. ग्रामीण भाग, नगर परिषद, महापालिका हद्दीत याच विभागाच्या संबंधित यंत्रणेमार्फत योजना राबवली जाते. शासनाच्या समाजिक न्याय विभागाकडून त्यासाठी संबंधित यंत्रणेस निधी दिला जातो.
येथील महापलिकास्तरावर ४ हजार १५७ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २ हजार ८४० घरकुले मंजूर झाली. पण, त्यापैकी गेल्या पाच वर्षांत सुमारे ४०० घरांचे वाटप करण्यात आले असून, ६०० घरांचे काम प्रगतीपथावर आहे. घरकुलांचे बांधकाम व अन्य कार्यवाही संथ गतीने होत असल्याने शेकडो अर्जदार लाभापासून वंचित आहेत. अनेक अर्जदार महापालिकेत वारंवार खेटा मारतात. याप्रश्नी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली, पण योजनेला गती मिळू शकली नाही.
जिल्ह्यातील नगर पालिकास्तरावर यापेक्षा वेगळे चित्र नाही. ३९० मंजूर घरकुले असताना त्यापैकी केवळ ११८ घरकुलांचे काम पूर्ण झाले. १३३ कामे प्रगतीपथावर असून, १३९ घरकुलांच्या बांधकाम संबंधित यंत्रणेने अद्याप सुरू केले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. परिणामी, अनेक गरजू अद्यापही हक्काच्या घरापासून दूर आहेत. महापालिका, नगर पालिका क्षेत्रांत ही योजना संथगतीने राबविण्यात येत असतानाच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने ग्रामपातळीवर या योजना समाधानकारक राबविण्यात आल्याचे चित्र आहे.

गेल्या पाच वर्षांपासून योजनेचे काम अंत्यत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे गरजू लाभापासून वंचित आहेत. शासनाने याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असून, अर्जदारांना तातडीने न्याय मिळवून द्यावा.
- विजय वाहुळ, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरूमंत्र : चित्रकलेतून भरले आयुष्यात रंग

$
0
0

Ramchandra.Vaybhat@timesgroup.com
Tweet : @ramvaybhatMT
चित्रकलेचे शिक्षक केवळ फळ्यावर चित्र काढून देण्याएवढेच मर्यादित न राहता कला विषयासोबतच शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवनात नेटकेपणा, सुंदरता, अचूकता, रंगातील नाविन्य, चित्रातील वेगळेपण आदी गुण विद्यार्थ्यांमध्ये सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून रुजवण्याचे काम करतात. विनायकराव पाटील प्राथमिक शाळेतील राजेंद्र वाळके हे त्यापैकीच एक. मुलांवर चांगले संस्कार होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शाळेत चित्रकला विषयासोबतच चांगल्या संस्कारासाठी; तसेच महापुरुषांनी आपल्या देशासाठी केलेल्या कार्याची ओळख व्हावी म्हणून त्यांच्या जीवनातील प्रसंग त्यांच्या जयंती, पुण्यतिथीच्या दिवशी मुलांसमोर सजीव देखाव्यांच्या माध्यमातून काही वर्षांपासून सादर करणे सुरू केले. महापुरुषांची जयंती, पुण्यतिथीच्या कार्यक्रमात केवळ मोठमोठी भाषणे होतात. त्याऐवजी महापुरुषांचे प्रसंग देखाव्यांच्या माध्यमातून सादर केल्यास विद्यार्थ्यांना त्या महापुरुषाच्या कार्याची ओळख पटकन होते, असे वाळकेसर सांगतात.
या देखाव्यांमध्ये विद्यार्थीच सहभागी होतात. देखावा सादर करण्यासाठी लागणारी माहिती काही शिक्षक सांगतात, तर काही विद्यार्थी स्वतः माहिती शोधतात. वाचन करून देखावा सादर करण्यासाठी मदत करतात. या निमित्ताने विद्यार्थ्यांचे वाचन होत असल्याचे लक्षात आले. प्रत्येक कार्यक्रम नाविन्यपूर्ण कसा करता येईल, याचा वाळकेसर नेहमी प्रयत्न करत असतात. अशा कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये ऐक्याची भावना निर्माण होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. याशिवाय शाळा सुरू होण्याच्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा उत्सव साजरा करण्यात येतो. यासह इतर उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग, उपक्रमात वेगळेपण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
विद्यार्थ्यांच्या अक्षरामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी दररोज विद्यार्थ्यांकडून शुद्धलेखनाचे एक पान लिहून घेतले जाते. शाळेत होणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने फलक लेखन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद मिळतो. शाळेत चित्रकला; तसेच इतर उपक्रमांसाठी शाळेचे मुख्याध्यापक, सहशिक्षकांचे मोठे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरण व पाणी वाचवाचा संदेश
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण व्हावी; तसेच पाण्याचे महत्त्व कळावे यासाठी विद्यार्थ्यांना वारंवार माहिती दिली जाते. याशिवाय शाळेसह इतर ठिकाणीही चित्रांच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देण्याचे काम वाळकेसर करतात.

स्त्री-भ्रूणहत्या, शिक्षणाची जनजागृती
शाळेत चित्रकलेच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नावर प्रकाश टाकणे; तसेच समाजोपयोगी संदेश देण्यासोबतच शहरातील विविध ठिकाणी स्त्री-भ्रूणहत्या, पाणी वाचवा, एड्स, शिक्षणाचे महत्त्व या सामाजिक प्रश्नाबाबत रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे कामही वाळकेसर करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोयाबीनला हमीभाव मिळेना

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

यंदा जिल्ह्यामध्ये पावसाने चांगली साथ दिली असली, तरीही सोयाबीनचे दर दिवसेंदिवस कमी होत चालल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने हमी भावाची खरेदी केंद्रे चालू न केल्यास, चांगल्या पावसानंतरही शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात जूनमध्ये सोयाबीनचा भाव चार हजार रुपये प्रतिक्विंटल होता. मात्र, आता शेतकऱ्यांना जेमतेम १५०० रुपये मिळत आहेत. यातून, पेरणीसह मशागतीचा खर्च निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यात सोयाबीन काढणीला वेग आला असून, काढणी व मळणीची मजुरी एकरी चार ते पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सध्या मिळत असलेल्या दरामुळे लागवडीपासून मळणीपर्यंत केलेला संपूर्ण खर्च निघत नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. सध्या मिळत असणारे दर परवडणारे नसले, रब्बी हंगामाच्या तयारीसाठी त्यांना पीक काढणे भाग आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उत्पन्नातही घट झाली असून, एकरी सरासरी पाच क्विंटलचा उतारा शेतकऱ्यांना मिळत आहे. पावसामुळे सोयाबीनच्या गुणवत्ता व दर्जातही घसरण झालेली आहे. सोयाबीनचे बियाणे व खतासाठी एकरी चार ते पाच हजार रुपयांचा खर्च व त्यानंतर फवारणी, खुरपणी यांचा एकरी तीन हजारांचा खर्च आणि आता पुन्हा काढणी व मळणीसाठीच्या दरात बेसुमार वाढ झाल्याने सोयाबीनसाठी एकरी दहा ते बारा हजार रुपये खर्च चालला आहे. खर्चाच्या तुलनेत सध्याच्या दराने होणारे सोयाबीनचे उत्पन्न पाहता सोयाबीनची शेती नुकसानीची ठरली आहे.
रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने अल्पभूधारक व गरजू शेतकऱ्यांनी मातीमोल दराने सोयाबीन विकले आहे.
सोयाबीनमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने व शासनही हमी भावाने सोयाबीन खरेदी करत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

आदेशाप्रमाणे कारवाई नाही
सोयाबीनसाठी शासनाने प्रतिक्विंटल सुमारे २६०० रुपये हमीभाव देण्याची जाहीर केलेले आहे. सध्या बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी सुमारे १२०० ते १५०० रुपये या दराने सुरू आहे. डागीमाल संबोधून व्यापारी सोयाबीन पड्या दराने खरेदी करत आहेत. सोयाबीन व कापसाच्या कमी भावासाठी व्यापारी आणि दलाल जबाबदार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यापुढे कमी दराने शेतीमाल खरेदी केल्यास संबंधित व्यापाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेशही त्यांनी दिले. प्रत्यक्षात मात्र अशा प्रकारची कारवाई राज्यात कुठेही होताना दिसत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images